श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ अष्टाविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण वर्षर्तोर्वर्णनम् - श्रीरामद्वारा वर्षा-ऋतुचे वर्णन -
स तथा वालिनं हत्वा सुग्रीवं अभिषिच्य च ।
वसन् माल्यवतः पृष्ठे रामो लक्ष्मणमब्रवीत् ॥ १ ॥
याप्रकारे वालीचा वध आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक केल्यानंतर माल्यवान पर्वताच्या पृष्ठभागी निवास करणारे राम लक्ष्मणास म्हणू लागले- ॥१॥
अयं स कालः संप्राप्तः समयोऽद्य जलागमः ।
संपश्य त्वं नभो मेघैः संवृतं गिरिसंनिभैः ॥ २ ॥
’सुमित्रानंदन ! आता हा जलाची प्राप्ति करून देणारा हा प्रसिद्ध वर्षाकाल आला आहे. पहा, पर्वतासमान प्रतीत होणार्‍या मेघांनी आकाशमण्डल झाकोळून गेले आहे. ॥२॥
नवमासधृतं गर्भं भास्करस्य गभस्तिभिः ।
पीत्वा रसं समुद्राणां द्यौः प्रसूते रसायनम् ॥ ३ ॥
’ही आकाशस्वरूपा तरूणी सूर्याच्या किरणांद्वारा समुद्रांचा रस पिऊन कार्तिक आदि नऊ महिन्यांपर्यत धारण केलेल्या गर्भाच्या रूपात जलरूपी रसायनाला जन्म देत आहे. ॥३॥
शक्यमंबरमारुह्य मेघसोपानपङ्‌क्ति्भिः ।
कुटजार्जुनमालाभिः अलङ्‌कपर्तुं दिवाकरः ॥ ४ ॥
’यासमयी मेघरूपी सोपानपंक्तींच्या द्वारे आकाशात चढून गिरिमल्लिका आणि अर्जुनपुष्पाच्या मालांनी सूर्यदेवास अलंकृत करणे सरळ सोपे झाल्यासारखे झाले आहे. ॥४॥
संध्यारागोत्थितैः ताम्रैः अंतेष्वपि च पाण्डुभिः ।
स्निग्धैरभ्रपटच्छेदैः बद्धव्रणमिवांबरम् ॥ ५ ॥
’संध्याकाळची लाली प्रकट होण्यामुळे मध्येच लाल आणि किनार्‍याच्या भागात श्वेत आणि स्निग्ध प्रतीत होणार्‍या मेखखण्डानी आच्छादित झालेले आकाश जणु त्याने आपल्या जखमेवर रक्तरंजित पांढरी कपड्याची पट्टी बांधून ठेवली आहे की काय असे भासत होते. ॥५॥
मंदमारुतिनिःश्वासं संध्याचंदनरञ्जितम् ।
आपाण्डुजलदं भाति कामातुरमिवांबरम् ॥ ६ ॥
’मंद मंद हवा निश्वासासारखी प्रतीत होत आहे. संध्याकाळची लाली लाल चंदन बनून ललाट आदि अंगांना अनुरंजित करीत राहिली आहे तसेच मेघरूपी कपोल काहींसे पांडुवर्णाचे प्रतीत होत आहे. याप्रकारे हे आकाश कामातुर पुरुषासमान वाटत आहे. ॥६॥
एषा घर्मपरिक्लिष्टा नववारिपरिप्लुता ।
सीतेव शोकसंतप्ता मही बाष्पं विमुञ्चति ॥ ७ ॥
जी ग्रीष्म-ऋतूत उन्हाने तापली गेली होती ती पृथ्वी वर्षाकालच्या नूतन जलाने भिजून (सूर्य किरणांनी तापलेली आणि अश्रुनी भिजलेली) शोकसंतप्त सीतेप्रमाणे वाष्प विमोचन (उष्णतेचा त्याग अथवा अश्रुपात) करीत आहे. ॥७॥
मेघोदरविनिर्मुक्ताः कह्लारसुखशीतलाः ।
शक्यमञ्जलिभिः पातुं वाताः केतकिगंधिनः ॥ ८ ॥
’मेघाच्या उदरातून निघालेला, कर्पूरदलाप्रमाणे थंड आणि केवड्याच्या सुंगधाने भरलेला हा पावसाळी वारा जणु ओंजळीत भरून घेऊन पिता येऊ शकतो आहे. ॥८॥
एष फुल्लार्जुनः शैलः केतकैरभिवासितः ।
सुग्रीव इव शांतारिः धाराभिरभिषिच्यते ॥ ९ ॥
’हा पर्वत, ज्याच्यावर अर्जुनाचे वृक्ष फुललेले आहेत तसेच जो केवड्यांच्या सुगंधाने सुवासित होऊन राहिला आहे; ज्याचे शत्रु शांत झाले आहेत त्या सुग्रीवाप्रमाणे जलधारांनी अभिषिक्त होत आहे. ॥९॥
मेघकृष्णाजिनधरा धारायज्ञोपवीतिनः ।
मारुतापूरितगुहाः प्राधीता इव पर्वताः ॥ १० ॥
मेघरूपी काळे मृगचर्म तसेच वर्षाची धारारूपी यज्ञोपवीत धारण केलेले, वायुने पूरित हृदय असणारे हे पर्वत, ब्रह्मचार्याप्रमाणे जणु वेदाध्ययनास आरंभ करीत आहेत. ॥१०॥
कशाभिरिव हैमीभिः विद्‌भिरिव ताडितम् ।
अंतः स्तनितनिर्घोषं सवेदनमिवांबरम् ॥ ११ ॥
’या विजा सोन्याचा बनविलेल्या चाबकाप्रमाणे भासत आहेत. त्यांचा मार खाऊन जणु व्यथित झालेले आकाश आपल्यातच आंत व्यक्त झालेल्या मेघांच्या गंभीर गर्जनेच्या रूपात आर्तनाद करीत आहे. ॥११॥
नीलमेघाश्रिता विद्युत् स्फुरंती प्रतिभाति मे ।
स्फुरंती रावणस्याङ्‌के वैदेहीव तपस्विनी ॥ १२ ॥
’नील मेघाचा आश्रय घेऊन प्रकाशित होणारी ही विद्युत्माला रावणाच्या अंकावर तडफडणार्‍या तपस्विनी सीतेप्रमाणे प्रतीत होत आहे. ॥१२॥
इमास्ता मन्मथवतां हिताः प्रतिहता दिशः ।
अनुलिप्ता इव घनैः नष्टग्रहनिशाकराः ॥ १३ ॥
’मेघांचा लेप लागल्यामुळे ज्यातील ग्रह, नक्षत्र आणि चंद्रमा अदृश्य झालेले आहेत म्हणून जी नष्ट झाल्यासारखी झालेली आहे, त्या दिशा, त्या कामी जनांना, ज्यांना प्रेयसीचे संयोगसुख सुलभ आहे, हितकर प्रतीत होत असते. ॥१३॥
क्वचिद् बाष्पाभिसंरुद्धान् वर्षागमसमुत्सुकान् ।
कुटजान् पश्य सौमित्रे पुष्पितान् गिरिसानुषु ।
मम शोकाभिभूतस्य कामसंदीपनान् स्थितान् ॥ १४ ॥
’सौमित्र ! पहा, या पर्वताच्या शिखरावर फुललेले कुटज कसे शोभा प्राप्त करीत आहेत ? कोठे तर पहिल्यानेच वर्षा झाल्यावर भूमीतून निघणार्‍या वाफेने ते व्याप्त होत आहेत आणि कोठे वर्षा (ऋतु) च्या आगमनाने अत्यंत उत्सुक, हर्षोत्फुल्ल दिसून येत आहेत. मी तर प्रियेच्या विरहाच्या शोकाने पीडित आहे आणि ही कुटज पुष्पे माझ्या प्रेमाग्निला उद्दीप्त करीत आहेत. ॥१४॥
रजः प्रशांतं सहिमोऽद्य वायुः
निदाघदोषप्रसराः प्रशांताः ।
स्थिता हि यात्रा वसुधाधिपानां
प्रवासिनो यांति नराः स्वदेशान् ॥ १५ ॥
पृथ्वीवरील धूळ शांत झाली आहे. आता वायुमध्ये शीतलता आली आहे. उन्हाळ्याच्या दोषांचा प्रसार बंद झालेला आहे. भूपालांची युद्धयात्रा थांबली आहे आणि परदेशी माणसे आपापल्या देशाला परत जात आहेत. ॥१५॥
संप्रस्थिता मानसवासलुब्धाः
प्रियान्विताः संप्रति चक्रवाकाः ।
अभीक्ष्णवर्षोदकविक्षतेषु
यानानि मार्गेषु न संपतंति ॥ १६ ॥
’मानसरोवराच्या निवासाचे लोभी हंस तेथे जाण्यासाठी प्रस्थित झाले आहेत. या समयी चक्रवाक आपल्या प्रियांना भेटत आहेत. निरंतर होणार्‍या वृष्टिच्या जलाने मार्ग तुटून फुटून गेले आहेत म्हणून त्यांच्यावर रथ आदि चालू शकत नाहीत. ॥१६॥
क्वचित् प्रकाशं क्वचिदप्रकाशं
नभः प्रकीर्णांबुधरं विभाति ।
क्वचित् क्वचित् पर्वतसंनिरुद्धं
रूपं यथा शांतमहार्णवस्य ॥ १७ ॥
’आकाशामध्ये सर्व बाजूस ढग विस्कळित झाले आहेत. कोठेतर त्या ढगांनी झाकले जाण्याने आकाश दिसतच नाही आणि काही ठिकाणी ढग फाटल्यामुळे ते स्पष्ट दिसून येत आहे. ज्याप्रमाणे ज्याच्या तरंगमाला शांत झालेल्या आहेत त्या महासागराचे रूप काही ठिकाणी पर्वतमालांनी झांकले गेल्याने दिसतच नाही तर काही ठिकाणी पर्वतांचे आवरण नसल्याने ते स्पष्ट दिसून येत असते. ॥१७॥
व्यामिश्रितं सर्जकदंबपुष्पैः
नवं जलं पर्वतधातुताम्रम् ।
मयूरकेकाभिरनुप्रयातं
शैलापगाः शीघ्रतरं वहंति ॥ १८ ॥
’यावेळी पहाडी नद्या वर्षाच्या नूतन जलाला अत्यंत वेगाने वाहून नेत आहेत. ते जल सर्ज आणि कदंबाच्या फुलांनी मिश्रित आहे. पर्वताच्या गेरू आदि धातुंनी लाल रंगाचे झालेले आहे तसेच मयूरांच्या केकाध्वनी त्या जलाच्या कलकल नादाचे अनुसरण करीत राहिला आहे. ॥१८॥
रसाकुलं षट्पदसंनिकाशं
प्रभुज्यते जंबुफलं प्रकामम् ।
अनेकवर्णं पवनावधूतं
भूमौ पतत्याम्रफलं विपक्वम् ॥ १९ ॥
’काळ्या काळ्या भुंग्याप्रमाणे प्रतीत होणारी सरस जांभळे आजकाल लोक पोटभर खात आहेत आणि अनेक वर्णांची, वार्‍याच्या झुळुकांनी हलणारी आंब्याची पिकलेली फळे भूमीवर मत्त गळून पडत आहेत. ॥१९॥
विद्युत्पताकाः सबलाकमालाः
शैलेंद्रकूटाकृतिसंनिकाशाः ।
गर्जंति मेघाः समुदीर्णनादा
मत्ता गजेंद्रा इव संयुगस्थाः ॥ २० ॥
’ज्याप्रमाणे युद्धस्थळी उभा असलेला मत्त गजराज उच्चस्वराने चित्कारत असतो त्याच प्रकारे गिरिराजाच्या शिखरासारखी आकृती असणारे मेघ जोरजोराने गर्जना करीत आहेत. चमकणार्‍या वीजा या मेघरूपी गजराजांवर पताकाप्रमाणे फडकत आहेत आणि बगळ्यांच्या पंक्ती मालांच्या प्रमाणे शोभून दिसत आहेत. ॥२०॥
वर्षोदकाप्यायितशाद्वलानि
प्रवृत्तनृत्तोत्सवबर्हिणानि ।
वनानि निर्वृष्टबलाहकानि
पश्यापराह्णेष्वधिकं विभांति ॥ २१ ॥
’पहा ! अपराह्न काळात या वनांची शोभा अधिकच वाढत आहे. पावसाच्या पाण्यामुळे यांच्यात हिरवेगार गवत उगवले आहे. मोरांच्या झुंडीच्या झुंडींनी आपल्या नृत्योत्सवाचा आरंभ केला आहे. आणि मेघ या वनात निरंतर जल वर्षाव करीत आहेत. ॥२१॥
समुद्वहंतः सलिलातिभारं
बलाकिनो वारिधरा नदंतः ।
महत्सु शृङ्‌गेाषु महीधराणां
विश्रम्य विश्रम्य पुनः प्रयांति ॥ २२ ॥
बगळ्यांच्या पंक्तीने सुशोभित झालेले हे जलधर मेघ जलाचा अधिक भार वहात आणि गर्जत मोठ मोठ्या पर्वतशिखंरावर जणुं विश्राम घेत घेत पुढे जात आहेत. ॥२२॥
मेघाभिकामा परिसन्पतंती
सम्मोदिता भाति बलाकपङ्‌क्ति ।
वातावधूता वरपौण्डरीकी
लंबेव माला रुचिरांबरस्य ॥ २३ ॥
’गर्भधारणेसाठी मेघांची कामना ठेवून आकाशांतून उडणारी आनंदमग्न बगळ्यांची माला जणु आकाशाच्या गळ्यात वार्‍यामुळे हलणारी श्वेत-कमलांची सुंदर माळच लटकत आहे की काय अशी भासत आहे. ॥२३॥
बालेंद्रगोपांतरचित्रितेन
विभाति भूमिर्नवशाद्वलेन ।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण
नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥ २४ ॥
’लहान लहान इंद्रगोप (लाल रंगाचे कीड) नामक कीड्यांनी मध्ये मध्ये चित्रित झालेल्या नवीन गवतांनी आच्छादित भूमी, जिने अंगावर पोपटी चादर पांघरली आहे, जिला मध्ये मध्ये लाखेच्या रंगाने रंगवून विचित्र शोभेने संपन्न केलेले अशा स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त करीत आहे. ॥२४॥
निद्रा शनैः केशवमभ्युपैति
द्रुतं नदी सागरभ्युपैति ।
हृष्टा बलाका घनमभ्युपैति
कांता सकामा प्रियमभ्युपैति ॥ २५ ॥
’चातुर्मासाच्या या आरंभकाळी निद्रा हळू हळू भगवान् केशवाच्या समीप जात आहे. नदी तीव्र वेगाने समुद्राच्या निकट पोहोचत आहे. हर्षयुक्त बगळ्यांची माळ उडून मेघाकडे जात आहे आणि प्रियतमा सकामभावाने आपल्या प्रियतमाच्या सेवेमध्ये उपस्थित होत आहे. ॥२५॥
जाता वनांताः शिखिसुप्रनृत्ता
जाताः कदंबाः सकदंबशाखाः ।
जाता वृषा गोषु समानकामा
जाता मही सस्यवनाभिरामा ॥ २६ ॥
’वनप्रांत मोरांच्या सुंदर नृत्यांनी सुशोभित झाला आहे. कदंब वृक्ष फुलांनी आणि शाखांनी संपन्न झालेले आहेत. वळू गायींच्या प्रति त्यांच्या प्रमाणेच कामभावाने आसक्त आहेत आणि पृथ्वी हिरवीगार शेते आणि हिरव्यागार वनांनी अत्यंत रमणीय प्रतीत होत आहे. ॥२६॥
वहंति वर्षंति नदंति भांति
ध्यायंति नृत्यंति समाश्वसंति ।
नद्यो घना मत्तगजा वनांताः
प्रियाविहीनाः शिखिनः प्लवंगमाः ॥ २७ ॥
’नद्या वहात आहेत, ढग पाणी वर्षत आहेत, मत्त हत्ती चित्कार करीत आहेत, वनप्रांत शोभा प्राप्त करीत आहे, प्रियतमेच्या संयोगाने वंचित झालेले वियोगी प्राणी चिंतामग्न होत आहेत, मोर नाचत आहेत आणि वानर निश्चिंत आणि सुखी होत आहेत. ॥२७॥
प्रहर्षिताः केतकपुष्पगंधं
आघ्राय मत्ताष्टा वननिर्झरेषु ।
प्रपातशब्दाकुलिता गजेंद्राः
सार्धं मयूरैः समदा नदंति ॥ २८ ॥
’वनातील निर्झरांच्या समीप क्रीडेने उल्लसित मदवर्षी गजराज केवड्याच्या फुलांचा सुगंध हुंगून मत्त झालेले आहेत आणि निर्झरांच्या पाणी पडण्यामुळे जो शब्द होत आहे, त्याने आकुलित होऊन मोरांच्या के-के बरोबरच स्वतःही गर्जना करीत आहेत. ॥२८॥
धारानिपातैरभिहन्यमानाः
कदंबशाखासु विलंबमानाः ।
क्षणार्जितं पुष्परसावगाढं
शनैर्मदं षट्चरणास्त्यजंति ॥ २९ ॥
’जलाच्या धारा पडण्यामुळे आहत होऊन आणि कदंबाच्या फाद्यांवर लटकत राहून भ्रमर, तात्काळ ग्रहण केलेल्या पुष्परसाने उत्पन्न झालेल्या गाढ मदाचा हळूहळू त्याग करीत आहेत. ॥२९॥
अङ्‌गामरचूर्णोत्करसंनिकाशैः
फलैः सुपर्याप्तरसैः समृद्धैः ।
जंबूद्रुमाणां प्रविभांति शाखा
निलीयमाना इव षट्पदौघैः ॥ ३० ॥
’कोळशांच्या चूर्णाच्या राशीप्रमाणे काळ्या आणि प्रचुर रसांनी युक्त मोठमोठ्या फळानी लगडलेल्या जांभळाच्या वृक्षांच्या शाखा जणु भ्रमरांचे समुदाय त्यांना चिकटून त्यांचा रस पित असल्यप्रमाणे भासत आहेत. ॥३०॥
तडित्पताकाभिरलङ्‌कृातानां
उदीर्णगंभीरमहारवाणाम् ।
विभांति रूपाणि बलाहकानां
रणोद्यतानामिव वारणानाम् ॥ ३१ ॥
’विद्युतरूपी पताकांनी अलंकृत तसेच जोरजोराने गंभीर गर्जना करणार्‍या या मेघांचे रूप युद्धासाठी उत्सुक झालेल्या गजराजांच्या प्रमाणे प्रतीत होत आहेत. ॥३१॥
मार्गानुगः शैलवनानुसारी
संप्रस्थितो मेघरवं निशम्य ।
युद्धाभिकामः प्रतिनागशङ्‌कीम
मत्तो गजेंदः प्रतिसंनिवृत्तः ॥ ३२ ॥
’पर्वतीय वनात विचरण करणारे तसेच आपल्या प्रतिद्वंद्वाच्या बरोबर युद्धाची इच्छा ठेवणारे मदमत्त गजराज, जो आपल्या मार्गाचे अनुसरण करून पुढे जात होता; पाठी मागून मेघगर्जना ऐकून प्रतिपक्षी हत्तीचा गर्जनेची आशंका करून एकाएकी परत फिरला. ॥३२॥
क्वचित् प्रगीता इव षट्पदौघैः
क्वचित् प्रनृत्ता इव नीलकण्ठैः ।
क्वचित् प्रमत्ता इव वारणेंद्रैः
विभांत्यनेकाश्रयिणो वनांताः ॥ ३३ ॥
कोठे भ्रमरांचे समुदाय गीत गात आहेत, कोठे मोर नाचत आहेत आणि कोठे गजराज मदमत्त होऊन विचरत आहेत. याप्रकारे हे वनप्रांत अनेक भावांचा आश्रय बनून शोभा प्राप्त करीत आहेत. ॥३३॥
कदंबसर्जार्जुनकंदलाढ्या
वनांतभूमिर्नववारिपूर्णा ।
मयूरमत्ताभिरुतप्रनृत्तैः
आपानभूमिप्रतिमा विभाति ॥ ३४ ॥
’कदंब, सर्ज, अर्जुन आणि स्थल-कमलांनी संपन्न वनाच्या मधील भूमी मधु-जलाने परिपूर्ण होऊन मोरांच्या मदयुक्त कलरवांनी आणि नृत्यांनी उपलक्षित होऊन आपानभूमी (मधुशाळे) प्रमाणे प्रतीत होत आहे. ॥३४॥
मुक्तासकाशं सलिलं पतद् वै
सुनर्मलं पत्रपुटेषु लग्नम् ।
हृष्टा विवर्णच्छदना विहंगाः
सुरेंद्रदत्तं तृषिताः पिबंति ॥ ३५ ॥
’आकाशांतून पडणारे मोत्याप्रमाणे स्वच्छ आणि निर्मल जल पानांच्या द्रोणात सांठलेले पाहून तहानलेले पक्षी चातक हर्षाने युक्त होऊन देवराज इंद्राने दिलेल्या त्या जलास पित आहेत. पावसाने भिजल्यामुळे त्यांचे पंख विविध रंगांचे दिसत आहेत. ॥३५॥
षट्पादतंत्रीमधुराभिधानं
प्लवंगमोदीरितकण्ठतालम् ।
आविष्कृतं मेघमृदङ्‌गानादैः
वनेषु संगीतमिव प्रवृत्तम् ॥ ३६ ॥
’भ्रमररूप वीणेचा मधुर झंकार होत आहे. बेडकांचा आवाज कण्ठताला प्रमाणे भासत आहे, मेघांच्या गर्जनेच्या रूपात मृदुंग वाजत आहे. याप्रकारे वनांमध्ये संगीतोत्सवाचा जणु आरंभ होत आहे. ॥३६॥
क्वचित् प्रनृत्तैः क्वचिदुन्नदद्‌भिः
क्वचिच्च वृक्षाग्रनिषण्णकायैः ।
व्यालंबबर्हाभरणैर्मयूरैः
वनेषु संगीतमिव प्रवृत्तम् ॥ ३७ ॥
विशाल पंखरूपी आभूषणांनी विभूषित मोर वनांत कोठे नाचत होते, तर कोठे जोरजोराने गोड बोलीमध्ये बोलत होते तर, कोठे वृक्षांच्या शाखांवर आपल्या शरीराचा भार टाकून बसलेले होते. या प्रकारे त्यांनी संगीताचे (नाच-गाण्यांचे) जणुं आयोजनच करून ठेवले आहे. ॥३७॥
स्वनैर्घनानां प्लवगाः प्रबुद्धा
विहाय निद्रां चिरसंनिरुद्धाम् ।
अनेकरूपाकृतिवर्णनादा
नवांबुधाराभिहता नदंति ॥ ३८ ॥
मेघांच्या गर्जना ऐकून चिरकालापासून रोखून धरलेल्या निद्रेचा त्याग करून जागे झालेले अनेक प्रकारच्या रूप, आकार, वर्ण आणि बोली असणारे बेडूक नवीन जलाच्या धारांनी अभिहत होऊन जोरजोराने बोलत आहेत. ॥३८॥
नद्यः समुद्वाहितचक्रवाकाः
तटानि शीर्णान्यपवाहयित्वा ।
दृप्ता नवप्राभृतपूर्णभोगा
द्रुतं स्वभार्तारमुपोपयांति ॥ ३९ ॥
(कामातुर युवतींप्रमाणे) दर्पयुक्त नद्या आपल्या वक्षःस्थळावर चक्रवाकांना वाहून आणि मर्यादेत ठेवणार्‍या जीर्ण शीर्ण तटांची मोडतोड करीत आणि त्यांना दूर वाहून नेत नूतन पुष्प आदिच्या उपहारांनी पूर्ण भोगासाठी सादर स्वीकृत आपले स्वामी समुद्र यांच्या समीप वेगपूर्वक जात आहेत. ॥३९॥
नीलेषु नीलाः नववारिपूर्णाः
मेघेषु मेघा प्रतिभांति सक्ताः ।
दवाग्निदग्धेषु दवाग्निदग्धाः
शैलेषु शैला इव बद्धमूलाः ॥ ४० ॥
’नीळ्या मेघांना चिकटलेले नूतन जलाने परिपूर्ण नील मेघ असे प्रतीत होत आहेत की जणु दावानलाने जळलेल्या पर्वतात दावानलाने दग्ध झालेले दुसरे पर्वत बद्धमूल होऊन चिकटले आहेत. ॥४०॥
प्रहृष्टसंनादितबर्हिणानि
सशक्रगोपाकुलशाद्वलानि ।
चरंति नीपार्जुनवासितानि
गजाः सुरम्याणि वनांतराणि ॥ ४१ ॥
’जेथे मत्त मोर कलनाद करीत आहेत, जेथील हिरवेगार गवत इंद्रगोपाच्या समुदायाने व्याप्त आहे, जे नीम आणि अर्जुन वृक्षांच्या फुलांच्या सुगंधाने सुवासित झाले आहेत अशा परम रमणीय वनप्रांतात बरेचसे हत्ती विचरण करीत असतात. ॥४१॥
नवांबुधाराहतकेसराणि
द्रुतं परित्यज्य सरोरुहाणि ।
कदंबपुषाणि सकेसराणि
नवानि हृष्टा भ्रमराः पतंति ॥ ४२ ॥
’भ्रमरांचे समुदाय नूतन जलाच्या धारेने ज्यांचे केसर नष्ट झालेले आहेत, अशा कमल-पुष्पांचा तात्काळ त्याग करून केसर शोभित नवीन कदंब पुष्पांचा रस अत्यंत हर्षाने पित आहेत. ॥४२॥
मत्ता गजेंद्रा मुदिता गवेंद्रा
वनेषु विक्रांततरा मृगेंद्राः ।
रम्या नगेंद्रा निभृता नरेंद्राः
प्रक्रीडितो वारिधरैः सुरेंद्रः ॥ ४३ ॥
’गजेन्द्र (हत्ती) मदमत्त होत आहेत. गवेन्द्र (वृषभ) आनंदात मग्न आहेत, मृगेन्द्र (सिंह) अत्यंत पराक्रम प्रकट करीत आहेत. नगेन्द्र (मोठ मोठे पर्वत) रमणीय दिसून येत आहेत, नरेन्द्र (राजे लोक) मौन आहेत - युद्धविषयक उत्साह सोडून बसले आहेत आणि सुरेन्द्र (इंद्रदेव) जलधरांबरोबर क्रीडा करीत आहेत. ॥४३॥
मेघाः समुद्‌भूातसमुद्रनादा
महाजलोघैर्गगनावलंबाः ।
नदीस्तटाकानि सरांसि वापीः
महीं च कृत्स्नामपवाहयंति ॥ ४४ ॥
’आकाशात लोंबणारे हे मेघ आपल्या गर्जनेने समुद्राच्या कोलाहलालाही तिरस्कृत करून आपल्या जलाच्या महान् प्रवाहाने नदी, तलाव, सरोवरे, विहिरी, तसेच समस्त पृथ्वीला आप्लावित करीत आहेत. ॥४४॥
वर्षप्रवेगा विपुलाः पतंती
प्रवांति वाताः समुदीर्णवेगाः ।
प्रनष्टकूलाः प्रवहंति शीघ्रं
नद्यो जलं विप्रतिपन्नमार्गाः ॥ ४५ ॥
’अत्यंत वेगाने वृष्टि होत आहे. वाराही जोराने वहात आहे, आणि नद्या आपल्या तटांना तोडून अत्यंत तीव्र गतीने जल वाहून नेत आहेत. त्यांनी मार्ग अडवून धरले आहेत. ॥४५॥
नरैर्नरंद्रा इव पर्वतेंद्राः
सुरेंद्रदत्तैः पवनोपनीतैः ।
घनांबुकुंभैरभिषिच्यमाना
रूपं श्रियं स्वामिव दर्शयंति ॥ ४६ ॥
’ज्याप्रमाणे मनुष्य जलाच्या कलशांनी नरेशांचा अभिषेक करतात, त्याचप्रकारे इंद्रानी दिलेल्या आणि वायुदेवतेद्वारा आणल्या गेलेल्या मेघरूपी जलकलशांनी ज्यांचा अभिषेक होत आहे, ते पर्वतराज आपल्या निर्मल रूपाचे तसेच शोभारूपी संपत्तिचे जणु दर्शन करवीत आहे. ॥४६॥
घनोपगूढं गगनं सतारं
न भास्करो दर्शनमभ्युपैति ।
नवैर्जलौघैर्धरणी विसृप्ता
तमोविलिप्ता न दिशः प्रकाशाः ॥ ४७ ॥
’मेघांच्या समुदायानी समस्त आकाश आच्छादित झालेले आहे. रात्री तारे दिसत नाहीत, दिवसा सूर्य दिसत नही. नूतन जलराशी प्राप्त करून पृथ्वी पूर्ण तृप्त झाली आहे. दिशा अंधःकाराने आच्छ्न्न होत आहेत, म्हणून प्रकाशित होत नाहीत- त्यांचे स्पष्ट ज्ञान होत नाही आहे. ॥४७॥
महांति कूटानि महीधराणां
धाराभिधौतान्यधिकं विभांति ।
महाप्रमाणैर्विपुलैः प्रपातैः
मुक्ताकलापैरिव लंबमानैः ॥ ४८ ॥
’जलधारांनी विरघळलेली पर्वतांची विशाल शिखरे मोत्यांच्या लटकणार्‍या हारांप्रमाणे भासणार्‍या बहुसंख्य प्रपातांमुळे (धबधब्यांमुळे) अधिक शोभा प्राप्त करीत आहेत. ॥४८॥
शैलोपलप्रस्खलमानवेगाः
शैलोत्तमानां विपुलाः प्रपाताः ।
गुहासु संनादितबर्हिणासु
हारा विकीर्यंत इवावभांति ॥ ४९ ॥
’पर्वतीय प्रस्तरखण्डावर आपटल्यामुळे ज्यांचा वेग खंडित झाला आहे, असे त्या श्रेष्ठ पर्वतांवरील सर्व प्रपात मयूरांच्या बोलीने निनादित होणार्‍या गुहांमध्ये तुटून विखरून मोत्यांच्या हारांप्रमाणे प्रतीत होत होते. ॥४९॥
शीघ्रप्रवेगा विपुलाः प्रपाता
निर्धौतशृङ्‌गोिपतला गिरीणाम् ।
मुक्ताकलापप्रतिमाः पतंतो
महागुहोत्संगतलैर्ध्रियंते ॥ ५० ॥
’ज्यांचा वेग शीघ्रगामी आहे, ज्यांची संख्या अधिक आहे, ज्यांनी पर्वतीय शिखरांच्या निम्न प्रदेशांना धुवून स्वच्छ बनविले आहे, तसेच जे दिसण्यात मोत्यांच्या माळेप्रमाणे प्रतीत होत आहेत; पर्वतावरून झरणार्‍या त्या निर्झरांना मोठ मोठ्या गुहांनी आपल्या अंकावर (मांडीवर) धारण केले आहे. ॥५०॥
सुरतामर्दविच्छिन्नाः स्वर्गस्त्रीहारमौक्तिकाः ।
पतंतीवाकुला दिक्षु तोयधराः समंततः ॥ ५१ ॥
’सुरत-क्रीडेच्या समयी होणार्‍या अंगांच्या आमर्दनांनी तुटलेल्या देवांगनांच्या मौक्तिक हारांसमान प्रतीत होणार्‍या जलाच्या अनुपम धारा संपूर्ण दिशांमध्ये सर्व बाजूस कोसळत आहेत. ॥५१॥
निलीयमानैर्विहगैः निमीलद्‌भिश्च पङ्‌कमजैः ।
विकसंत्या च मालत्या गतोऽस्तं ज्ञायते रविः ॥ ५२ ॥
’पक्षी आपल्या घरट्यात लपले आहेत; कमले संकुचित झाली आहेत आणि मालती फुलू लागली आहे, यावरून कळून येत आहे की सूर्याचा अस्त झाला आहे. ॥५२॥
वृत्ता यात्रा नरेंद्राणां सेना पथ्येव वर्तते ।
वैराणि चैव मार्गाश्च सलिलेन समीकृताः ॥ ५३ ॥
’राजांची युद्ध-यात्रा अडविली गेली आहे. प्रस्थित झालेली सेना ही रस्त्यांतच पडाव ठोकून राहिली आहे. वर्षा ऋतुच्या जलाने राजांच्या वैरासही शांत केले आहे. आणि मार्ग ही रोखले आहेत. याप्रकारे वैर आणि मार्ग दोहोंची एकसारखीच अवस्था करून टाकली आहे. ॥५३॥
मासि प्रोष्ठपदे ब्रह्म ब्राह्मणानां विवक्षताम् ।
अयमध्यायसमयः सामगानामुपस्थितः ॥ ५४ ॥
’भाद्रपदाचा महिना आला आहे. हा वेदांच्या समान स्वाध्यायाची इच्छा ठेवणार्‍या ब्राह्मणांसाठी उपाक्रमाचा समय उपस्थित झाला आहे. सामगान करणार्‍या विद्वानांसाठीही स्वाध्यायाचा हाच समय आहे. ॥५४॥
निवृत्तकर्मायतनो नूनं सञ्चितसञ्चयः ।
आषाढीमभ्युपगतो भरतः कोसलाधिपः ॥ ५५ ॥
’कोसलदेशाचा राजा भरत यांनी चार महिन्यासाठी आवश्यक वस्तूंचा संग्रह करून गेल्या आषाढी पौर्णिमेस निश्चित कुठल्या तरी उत्तमव्रताची दीक्षा घेतली असेल. ॥५५॥
नूनमापूर्यमाणायाः सरय्वा वर्धते रयः ।
मां समीक्ष्य समायांतं अयोध्याया इव स्वनः ॥ ५६ ॥
’मला वनाकडे येतांना पाहून ज्याप्रकारे अयोध्यापुरीतील लोकांचा आर्तनाद वाढला होता, त्याच प्रकारे या समयी वर्षाच्या जलाने परिपूर्ण झालेल्या शरयू नदीचा वेगही अवश्यच वाढत असेल. ॥५६॥
इमाः स्फीतगुणा वर्षाः सुग्रीवः सुखमश्नुते ।
विजितारिः सदारश्च राज्ये महति च स्थितः ॥ ५७ ॥
’ही वर्षा अनेक गुणांनी संपन्न आहे. या समयी सुग्रीव आपल्या शत्रुला परास्त करून विशाल वानर राज्यावर प्रतिष्ठित आहे आणि आपल्या स्त्रीसह राहून सुखभोग करीत आहे. ॥५७॥
अहं तु हृतदारश्च राज्याच्च महतश्च्युतः ।
नदीकूलमिव क्लिन्नं अवसीदामि लक्ष्मण ॥ ५८ ॥
’परंतु लक्ष्मणा ! मी आपल्या महान् राज्यापासून तर भ्रष्ट झालोच आहे, माझी स्त्रीही हरण केली गेली आहे म्हणून पाण्याने ढासळून वाहून गेलेल्या नदीच्या तटाप्रमाणे कष्ट भोगीत आहे. ॥५८॥
शोकश्च मम विस्तीर्णो वर्षाश्च भृशदुर्गमाः ।
रावणश्च महान् शत्रुः अपारं प्रतिभाति मे ॥ ५९ ॥
’माझा शोक वाढला आहे. माझ्यासाठी पावसाळ्याचे (वर्षाऋतूचे) दिवस घालविणे अत्यंत कठीण झाले आहे. आणि माझा महान् शत्रु रावणही मला अजेय असल्यासारखा प्रतीत होत आहे. ॥५९॥
अयात्रां चैव दृष्ट्‍वेमां मार्गांश्च भृशदुर्गमान् ।
प्रणते चैव सुग्रीवे न मया किञ्चिदीरितम् ॥ ६० ॥
’एक तर हा यात्रेचा समय नाही आहे, दुसरे मार्ग ही अत्यंत दुर्गम आहे, म्हणून सुग्रीवांनी नतमस्तक होऊनही मी त्यांना काही बोललो नाही. ॥६०॥
अपि चातिपरिक्लिष्टं चिराद्दारैः समागतम् ।
आत्मकार्यगरीयस्त्वाद् वक्तुं नेच्छामि वानरम् ॥ ६१ ॥
’वानर सुग्रीव खूपच दिवस कष्ट भोगत होते आणि दीर्घकालानंतर आता आपल्या पत्‍नीला भेटले आहेत. इकडे माझे कार्यही फारच दुर्घट आहे (थोड्या दिवसात सिद्ध होणारे नाही.) म्हणून मी यासमयी त्यांना काहीही सांगू इच्छित नाही. ॥६१॥
स्वयमेव हि विश्रम्य ज्ञात्वा कालमुपागतम् ।
उपकारं च सुग्रीवो वेत्स्यते नात्र संशयः ॥ ६२ ॥
’काही दिवस विश्राम केल्यावर उपयुक्त समय आलेला पाहून ते स्वतःच माझे उपकार जाणतील, यात संशय नाही. ॥६२॥
तस्मात् कालप्रतीक्षोऽहं स्थितोऽस्मि शुभलक्षण ।
सुग्रीवस्य नदीनां च प्रसादमनुपालयन् ॥ ६३ ॥
’म्हणून शुभलक्षण लक्ष्मणा ! मी सुग्रीवाची प्रसन्नता आणि नद्यांच्या जलाची स्वच्छता यांची इच्छा करीत शरत्कालाच्या प्रतीक्षेत गुपचुप बसून राहिलो आहे. ॥६३॥
उपकारेण वीरो हि प्रतिकारेण युज्यते ।
अकृतज्ञोऽप्रतिकृतो हंति सत्त्ववतां मनः ॥ ६४ ॥
’जो वीर पुरुष कुणाच्या उपकाराने उपकृत होतो, तो प्रत्युपकार करून त्याची परतफेड अवश्य करतो, परंतु जर कुणी उपकाराला न मानून अथवा विसरून प्रत्युपकार करण्यापासून तोंड फिरवले तर त्या शक्तिशाली श्रेष्ठ पुरुषांचे मनास निश्चितच दुःख होते. ॥६४॥
अथैवमुक्तः प्रणिधाय लक्ष्मणः
कृताञ्जलिस्तत् प्रतिपूज्य भाषितम् ।
उवाच रामं स्वभिरामदर्शनं
प्रदर्शयन् दर्शनमात्मनः शुभम् ॥ ६५ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर लक्ष्मणांनी विचार करून त्या बोलण्याची भरपूर प्रशंसा केली आणि दोन्ही हात जोडून आपल्या शुभ दृष्टिचा परिचय करवीत नयनाभिरामांना या प्रकारे म्हटले- ॥६५॥
यथोक्तमेतत् तव सर्वमीप्सितं
नरेंद्र कर्ता नचिराद्धरीश्वरः ।
शरत् प्रतीक्षः क्षमतामिमं भवान्
जलप्रपातं रिपुनिग्रहे धृतः ॥ ६६ ॥
’नरेश्वर ! आपण जसे म्हणतात, त्याप्रमाणे वानरराज सुग्रीव शीघ्रच आपला हा सर्व मनोरथ सिद्ध करतील, म्हणून आपण शत्रूचा संहार करण्याचा दृढ निश्चय करून शरत्कालाची प्रतीक्षा करावी आणि या वर्षाकालाच्या विलंबाला सहन करावे. ॥६६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
याप्रकारे श्रीवल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP