[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन मारीचस्य भर्त्सनं सीतापहृतौ साहाय्यं कर्तुमादेशदानं च - रावणाने मारीचाला धिक्कारणे आणि सीताहरणाच्या कार्यात सहायता करण्याची आज्ञा देणे -
मारीचेन तु तद्वाक्यं क्षमं युक्तं च रावणः ।
उक्तो न प्रतिजग्राह मर्तुकाम इवौषधम् ॥ १ ॥
मारीचाचे हे कथन उचित आणि मानण्यायोग्य असूनही ज्याप्रमाणे मरण्याची इच्छा असणारा रोगी औषध घेत नाही. त्याप्रमाणे त्यांनी खूप सांगूनही रावणाने त्याची गोष्ट मानली नाही. ॥१॥
तं पथ्यहितवक्तारं मारीचं राक्षसाधिपः ।
अब्रवीत् परुषं वाक्यमयुक्तं कालचोदितः ॥ २ ॥
कालाने प्रेरित झालेल्या त्या राक्षसराजाने यथार्थ आणि हिताची गोष्ट सांगणार्‍या मारीचाला अनुचित आणि कठोर वाणीमध्ये म्हटले- ॥२॥
दुष्कुलैतदयुक्तार्थं मारीच मयि कथ्यते ।
वाक्यं निष्फलमत्यर्थं बीजमुप्तमिवोषरे ॥ ३ ॥
दूषित कुळात उत्पन्न झालेल्या मारीचा ! तू मला ज्या ज्या निरर्थक गोष्टी सांगितल्यास त्या पडीक जमिनीवर बीज पेरावे त्याप्रमाणे माझ्यासाठी अनुचित आणि असंगत, अत्यंत निष्फळ आहेत. ॥३॥
त्वद्वाक्यैर्न तु मां शक्यं भेत्तुं रामस्य संयुगे ।
मूर्खस्य पापशीलस्य मानुषस्य विशेषतः ॥ ४ ॥
तुझ्या या वचनांच्या द्वारे मूर्ख, पापाचारी आणि विशेषतः मनुष्य असलेल्या रामाशी युद्ध करणे अथवा स्त्रीचे अपहरण करणे या माझ्या निश्चयापासून मला विचलित केले जाऊ शकत नाही. ॥४॥
यस्त्यक्त्वा सुहृदो राज्यं मातरं पितरं तथा ।
स्त्रीवाक्यं प्राकृतं श्रुत्वा वनमेकपदे गतः ॥ ५ ॥

अवश्यं तु मया तस्य संयुगे खरघातिनः ।
प्राणैः प्रियतरा सीता हर्तव्या तव संनिधौ ॥ ६ ॥
एका स्त्रीचे (कैकेयीचे) मूर्खतापूर्ण वचन एकून जो राज्य, मित्र, माता आणि पिता यांना सोडून एकाएकी जंगलात निघून आला तसेच ज्याने युद्धात खराचा वध केला आहे, त्या रामचंद्रांची प्राणाहून प्रिय भार्या सीता हिचे मी तुझ्या निकटच अवश्य हरण करीन. ॥५-६॥
एवं मे निश्चिता बुद्धिर्हृदि मारीच विद्यते ।
न व्यावर्तयितुं शक्या सेन्द्रैरपि सुरासुरैः ॥ ७ ॥
मारीचा ! असा माझा हृदयांतील निश्चित विचार आहे. याला इंद्र आदि देवता आणि सारे असुर मिळूनही बदलू शकत नाहीत. ॥७॥
दोषं गुणं वा सम्पृष्टस्त्वमेवं वक्तुमर्हसि ।
अपायं वा उपायं वा कार्यस्यास्य विनिश्चये ॥ ८ ॥
जर या कार्याचा निर्णय करण्यासाठी तुला विचारले गेले असते की यात काय दोष आहे, तथा गुण आहे, याच्या सिद्धिमध्ये काय विघ्न आहे तरच तू अशा गोष्टी सांगणे आवश्यक ठरले असते. ॥८॥
सम्पृष्टेन तु वक्तव्यं सचिवेन विपश्चिता ।
उद्यताञ्जलिना राज्ञो य इच्छेद् भूतिमात्मनः ॥ ९ ॥
जो आपले कल्याण इच्छितो त्या बुद्धिमान मंत्र्याला हे उचित आहे की तो राजाने विचारल्यावर आपला अभिप्राय प्रकट करतो आणि तेही हात जोडून नम्रतेसह. ॥९॥
वाक्यमप्रतिकूलं तु मृदुपूर्वं हितं शुभम् ।
उपचारेण वक्तव्यो युक्तं च वसुधाधिपः ॥ १० ॥
राजाच्या समोर अशी गोष्ट सांगितली पाहिजे की जी सर्वथा अनुकूल, मधुर, उत्तम, हितकर, आदरयुक्त आणि उचित असेल. ॥१०॥
सावमर्दं तु यद्वाक्यमथवा हितमुच्यते ।
नाभिनन्देत तद् राजा मानार्थी मानवर्जितम् ॥ ११ ॥
राजा सन्मानाचा भुकेला असतो. त्याच्या गोष्टीचे खंडण करून आक्षेपपूर्ण भाषेत जरी हितकर वचनही सांगितले गेले तर त्या अपमानपूर्ण वचनाचे कधी अभिनंदन केले जात नाही. ॥११॥
पञ्च रूपाणि राजानो धारयन्त्यमितौजसः ।
अग्नेरिन्द्रस्य सोमस्य यमस्य वरुणस्य च ॥ १२ ॥

औष्ण्यं तथा विक्रमं च सौम्यं दण्डं प्रसन्नताम् ।
धारयन्ति महात्मानो राजानः क्षणदाचर ॥ १३ ॥
निशाचरा ! अमित तेजस्वी महामनस्वी राजा अग्नि, इंद्र, सोम, यम, आणि वरूण - या पाच देवतांचे स्वरूप धारण करून राहात असतो, म्हणून तो आपल्यामध्ये या पाच गुणांना - प्रताप, पराक्रम, सौम्यभाव, दण्ड आणि प्रसन्नता ही धारण करतो. ॥१२-१३॥
तस्मात् सर्वास्ववस्थासु मान्याः पूज्याश्च नित्यदा ।
त्वं तु धर्ममविज्ञाय केवलं मोहमाश्रितः ॥ १४ ॥

अभ्यागतं तु दौरात्म्यात् परुषं वदसीदृशम् ।
गुणदोषौ न पृच्छामि क्षमं चात्मनि राक्षस ॥ १५ ॥
म्हणून सर्व अवस्थामध्ये सदा राजेलोकांचा सन्मान आणि पूजनच केले पाहिजे. तू तर आपल्या धर्माला न जाणता केवळ मोहाच्या वशीभूत होत आहेस. मी तुझा अभ्यागत अतिथि आहे तरीही तू दुष्टतावश माझ्याशी अशा कठोर गोष्टी करीत आहेस. राक्षसा ! मी तुला आपल्या कर्तव्याचे गुण दोष विचारत नाही आणि हेही जाणू इच्छित नाही की माझ्यासाठी काय उचित आहे. ॥१४-१५॥
मयोक्तमपि चैतावत् त्वां प्रत्यमितविक्रम ।
अस्मिंस्तु स भवान् कृत्ये साहाय्यं कर्तुमर्हसि ॥ १६ ॥
अमित पराक्रमी मारीचा ! मी तर तुला इतकेच सांगितले होते की या कार्यात तुम्हाला माझी सहायता केली पाहिजे. ॥१६॥
शृणु तत्कर्म साहाय्ये यत्कार्यं वचनान्मम ।
सौवर्णस्त्वं मृगो भूत्वा चित्रो रजतबिन्दुभिः ॥ १७ ॥

आश्रमे तस्य रामस्य सीतायाः प्रमुखे चर ।
प्रलोभयित्वा वैदेहीं यथेष्टं गन्तुमर्हसि ॥ १८ ॥
ठीक आहे. आता तुला सहायता करण्यासाठी माझ्या कथनानुसार जे कार्य करावयाचे आहे ते ऐक. तू सुवर्णमय चर्मानी युक्त चितकबर्‍या रंगाचा मृग होऊन जा. तुझ्या सार्‍या अंगावर चांदीसारखे पांढरे ठिपके असावयास हवेत असे रूप धारण करून तू रामाच्या आश्रमात सीतेच्या समोर विचरण कर. एक वेळ वैदेहीला लोभ उत्पन्न करून तुला हवे तेथे निघून जा. ॥१७-१८॥
त्वां तु मायामयं दृष्ट्‍वा काञ्चनं जातविस्मया ।
आनयैनमिति क्षिप्रं रामं वक्ष्यति मैथिली ॥ १९ ॥
तुला, मायामय कांचन मृगाला पाहून मैथिली सीतेला फार आश्चर्य वाटेल. आणि ती शीघ्रच रामास सांगेल की आपण याला पकडून आणा. ॥१९॥
अपक्रान्ते तु काकुत्स्थे दूरं गत्वाप्युदाहर ।
हा सीते लक्ष्मणेत्येवं रामवाक्यानुरूपकम् ॥ २० ॥
जेव्हा राम तुम्हाला पकडण्यासाठी आश्रमापासून दूर निघून जातील तेव्हा तूही दूरवर निघून जाऊन श्रीरामांच्या बोलीला अनुरूपच - बरोबर त्यांच्याच स्वरांत हा सीते ! हा लक्ष्मणा ! असे म्हणून ओरड. ॥२०॥
तच्छ्रुत्वा रामपदवीं सीतया च प्रचोदितः ।
अनुगच्छति सम्भ्रान्तं सौमित्रिरपि सौहृदात् ॥ २१ ॥
तुझे ते ओरडणे ऐकून सीतेच्या प्रेरणेने सौमित्र लक्ष्मण ही स्नेहवश घाबरून आपल्या भावाच्याच मार्गाचे अनुसरण करील. ॥२१॥
अपक्रान्ते च काकुत्स्थे लक्ष्मणे च यथासुखम् ।
आनयिष्यामि वैदेहीं सहस्राक्षः शचीमिव ॥ २२ ॥
याप्रकारे राम आणि लक्ष्मण दोघे आश्रमापासून दूर निघून गेल्यावर मी सुखपूर्वक सीतेला हरून आणीन जसे इंद्राने शचीचे हरण करून तिला आणले होते त्या प्रमाणेच. ॥२२॥
एवं कृत्वा त्विदं कार्यं यथेष्टं गच्छ राक्षस ।
राज्यस्यार्धं प्रयच्छामि मारीच तव सुव्रत ॥ २३ ॥
उत्तम व्रताचे पालन करणार्‍या मारीचा ! या प्रकारे हे सर्व कार्य संपन्न करून जेथे तुझी इच्छा असेल तिकडे निघून जा. मी यासाठी तुला माझे अर्धे राज्य देईन. ॥२३॥
गच्छ सौम्य शिवं मार्गं कार्यस्यास्य विवृद्धये ।
अहं त्वाऽनुगमिष्यामि सरथो दण्डकावनम् ॥ २४ ॥
सौम्या ! आता या कार्याचा सिद्धिसाठी प्रस्थान कर. तुझा मार्ग मंगलमय होवो. मी रथावर बसून दण्डकवनापर्यत तुझ्या पाठोपाठ येईन. ॥२४॥
प्राप्य सीतामयुद्धेन वञ्चयित्वा तु राघवम् ।
लङ्‌कां प्रति गमिष्यामि कृतकार्यः सह त्वया ॥ २५ ॥
रामाला धोका देऊन युद्ध न करता सीतेला आपल्या स्वाधीन करून घेऊन कृतार्थ होऊन मी तुझ्यासह लंकेस परत जाईन. ॥२५॥
न चेत् करोषि मारीच हन्मि त्वामहमद्य वै ।
एतत् कार्यमवश्यं मे बलादपि करिष्यसि ।
राज्ञो विप्रतिकूलस्थो न जातु सुखमेधते ॥ २६ ॥
मारीचा ! जर तू नकार देशील तर मी तुला आत्ताच मारून टाकीन. माझे हे कार्य तुला अवश्य केलेच पाहिजे. मी बलप्रयोग करूनही तुझ्याकडून हे कार्य करवीन. राजाच्या प्रतिकूल वागणारा पुरुष कधी सुखी होत नाही. ॥२६॥
आसाद्य तं जीवितसंशयस्ते
मृत्युर्ध्रुवो ह्यद्य मया विरुध्यतः ।
एतत् यथावत् परिगण्य बुद्ध्या
यदत्र पथ्यं कुरु तत्तथा त्वम् ॥ २७ ॥
रामाच्या समोर गेल्यावर तुझे प्राण जातील हा केवळ संदेह मात्र आहे. परंतु माझ्याशी विरोध केल्यावर तर आजच तुझा मृत्यु निश्चित आहे. या गोष्टींवर बुद्धि खर्च करून उत्तम प्रकारे विचार कर. त्यानंतर येथे जे हितकर जाणून येईल ते त्याप्रकारे तू कर. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चत्वारिंशः सर्गः ॥ ४० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP