[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
त्रिशिरसो वधः -
त्रिशिराचा वध -
खरं तु रामाभिमुखं प्रयान्तं वाहिनीपतिः ।
राक्षसस्त्रिशिरा नाम संनिपत्येदमब्रवीत् ॥ १ ॥
खराला भगवान श्रीरामांच्या सन्मुख जातांना पाहून सेनापति राक्षस त्रिशिरा तात्काळ त्याच्या जवळ येऊन पोहोचला आणि या प्रकारे बोलला - ॥१॥
मां नियोजय विक्रान्त संनिवर्तस्व साहसात् ।
पश्य रामं महाबाहुं संयुगे विनिपातितम् ॥ २ ॥
राक्षसराज ! मला पराक्रमी वीराला या युद्धात जुंपा आणि स्वतः या साहसपूर्ण कार्यापासून अलग राहा. पहा, मी आत्ता महाबाहु रामाला युद्धात ठार मारून टाकतो. ॥२॥
प्रतिजानामि ते सत्यं आयुधं चाहमालभे ।
यथा रामं वधिष्यामि वधार्हं सर्वरक्षसाम् ॥ ३ ॥
आपल्या समोर मी सत्य प्रतिज्ञा करीत आहे आणि आपल्या हत्यारास स्पर्श करून शपथ घेत आहे की जे समस्त राक्षसांच्यासाठी वधास कारण आहेत त्या रामांचा मी अवश्य वध करीन. ॥३॥
अहं वास्य रणे मृत्युरेष वा समरे मम ।
विनिवर्त्य रणोत्साहं मुहूर्तं प्राश्निको भव ॥ ४ ॥
या युद्धात एक तर मी त्यांचा मृत्यु बनेन अथवा तेच समराङ्‌गणात माझ्या मृत्युचे कारण होतील. आपण या समयी आपल्या युद्धविषयक उत्साहास रोखून एक मुहूर्तभरासाठी जयपराजयाचा निर्णय करणारे साक्षी व्हावे. ॥४॥
प्रहृष्टे वा हते रामे जनस्थानं प्रयास्यसि ।
मयि वा निहते रामं संयुगाय प्रयास्यसि ॥ ५ ॥
जर माझ्या द्वारे राम मारले गेले तर आपण प्रसन्नतापूर्वक जनस्थानात परत जावे अथवा जर रामांनी मलाच मारून टाकले तर आपण युद्धासाठी त्यांच्यावर आक्रमण करावे. ॥५॥
खरस्त्रिशिरसा तेन मृत्युलोभात् प्रत्प्रसादितः ।
गच्छ युद्ध्येत्यनुज्ञातो राघवाभिमुखो ययौ ॥ ६ ॥
भगवंताच्या हातून मृत्यु प्राप्त व्हावा या लोभामुळे ज्यावेळी त्रिशिराने या प्रकारे खराला प्रसन्न करून घेतले तेव्हा त्याने आज्ञा दिली - बरे जा, युद्ध कर. आज्ञा मिळताच तो श्रीरामचंद्रांच्या कडे निघाला. ॥६॥
त्रिशिराश्च रथेनैव वाजियुक्तेन भास्वता ।
अभ्यद्रवद् रणे रामं त्रिशृङ्‌ग इव पर्वतः ॥ ७ ॥
घोडे जुंपलेल्या एका तेजस्वी रथाच्या द्वारे त्रिशिराने रणभूमित रामांवर आक्रमण केले. त्या समयी तो तीन शिखरे असलेल्या पर्वतासमान भासत होता. ॥७॥
शरधारासमूहान् स महामेघ इवोत्सृजन् ।
व्यसृजत् सदृशं नादं जलार्द्रस्येव दुन्दुभेः ॥ ८ ॥
त्याने येताच एखाद्या फार मोठ्‍या मेघाप्रमाणे बाणरूपी धारांची वृष्टी करण्यास आरंभ केला आणि तो जलाने भिजलेल्या नगार्‍याप्रमाणे विकट गर्जना करू लागला. ॥८॥
आगच्छन्तं त्रिशिरसं राक्षसं प्रेक्ष्य राघवः ।
धनुषा प्रतिजग्राह विधुन्वन् सायकाञ्शितान् ॥ ९ ॥
त्रिशिरा नामक राक्षसास येताना पाहून राघवांनी धनुष्याच्या द्वारा तीक्ष्ण बाण सोडून आपल्या प्रतिद्वंदीच्या रूपात त्याला ग्रहण केले. ॥९॥
स सम्प्रहारस्तुमुलो रामत्रिशिरसोस्तदा ।
सम्बभूवातिबलिनोः सिंहकुञ्जरयोरिव ॥ १० ॥
अत्यंत बलशाली श्रीराम आणि त्रिशिराचा हा संग्राम महाबलाढ्‍य सिंह आणि गजराजाच्या युद्धाप्रमाणे फार भयंकर प्रतीत होत होता. ॥१०॥
ततस्त्रिशिरसा बाणैर्ललाटे ताडितस्त्रिभिः ।
अमर्षी कुपितो रामः संरब्ध इदमब्रवीत् ॥ ११ ॥
त्या समयी त्रिशिराने तीन बाणांनी श्रीरामचंद्रांच्या ललाटास विंधले. श्रीराम त्याची ही उद्दण्डता सहन करू शकले नाहीत. ते कुपित होऊन रोषावेशाने भरून याप्रमाणे बोलले - ॥११॥
अहो विक्रमशूरस्य राक्षसस्येदृशं बलम् ।
पुष्पैरिव शरैर्योऽहं ललाटेऽस्मि परिक्षतः ॥ १२ ॥

ममापि प्रतिगृह्णीष्व शरांश्चापगुणच्च्युतान् ।
अहो ! पराक्रम प्रकट करण्यात शूरवीर राक्षसाचे असेच बळ आहे की ज्यामुळे तू फुलांसारख्या बाणांच्या द्वारे माझ्या ललाटावर प्रहार केला आहेस. ठीक आहे, आता धनुष्याच्या दोरीतून सुटलेले माझे बाणही तू ग्रहण कर. ॥१२ १/२॥
एवमुक्त्वा सुसंरब्धः शरानाशीविषोपमान् ॥ १३ ॥

त्रिशिरोवक्षसि क्रुद्धो निजघान चतुर्दश ।
असे म्हणून रोषाने भरलेल्या श्रीरामांनी त्रिशिराच्या छातीत क्रोधपूर्वक जे विषधर सर्पाप्रमाणे भयंकर होते असे चौदा बाण मारले. ॥१३ १/२॥
चतुर्भिस्तुरगानस्य शरैः सन्नतपर्वभिः ॥ १४ ॥

न्यपातयत तेजस्वी चतुरस्तस्य वाजिनः ।
अष्टभिः सायकैः सूतं रथोपस्थे न्यपातयत् ॥ १५ ॥
त्यानंतर तेजस्वी रघुनाथांनी वाकलेल्या गांठीचे चार बाण मारून त्याच्या चारी घोड्‍यांना मारून टाकले. नंतर आठ सायकांनी त्याच्या सारथ्यासही रथाच्या बैठकीतच झोपवून टाकले (ठार केले). ॥१४-१५॥
रामश्चिच्छेद बाणेन ध्वजं चास्य समुच्छ्रितम् ।
ततो हतरथात् तस्मादुत्पतन्तं निशाचरम् ॥ १६ ॥

चिच्छेद रामस्तं बाणैर्हृदये सोऽभवज्जडः ।
त्यानंतर श्रीरामांनी एका बाणाने त्याची ध्वजाही कापून टाकली आणि नंतर जेव्हा तो त्या नष्ट झालेल्या रथातून उडी मारू लागला त्यासमयी श्रीराघवेन्द्रांनी अनेक बाणांच्या द्वारे त्या निशाचराची छाती भेदून टाकली, मग तर तो जडवत होऊन गेला. ॥१६ १/२॥
सायकैश्चाप्रमेयात्मा सामर्षस्तस्य रक्षसः ॥ १७ ॥

शिरांस्यपातयत् त्रीणि वेगवद्‌भिस्त्रिभिः शरैः ।
त्यानंतर अप्रमेयस्वरूप श्रीरामांनी अमर्षाने भरून वेगवान आणि विनाशकारी बाणांच्या द्वारे त्या राक्षसाची तीन्ही मस्तके छाटून टाकली. ॥१७ १/२॥
स धूमशोणितोद्‌गारी रामबाणाभिपीडितः ॥ १८ ॥

न्यपतत् पतितैः पूर्वं समरस्थो निशाचरः ।
समरङ्‌गणात उभा असलेला तो निशाचर रामबाणांनी पीडित होऊन आपल्या धडातून वाफेसहित रक्त ओकत प्रथमच पडलेल्या मस्तकांबरोबरच धराशायी होऊन गेला. ॥१८ १/२॥
हतशेषास्ततो भग्ना राक्षसाः खरसंश्रयाः ॥ १९ ॥

द्रवन्ति स्म न तिष्ठन्ति व्याघ्रत्रस्ता मृगा इव ।
तत्पश्चात खराच्या सेवेत राहाणारे राक्षस जे मरण्यापासून वाचले होते ते पळून गेले. ते व्याघ्रामुळे भयभीत झालेल्या मृगांप्रमाणे पळून जाऊ लागले, तेथे उभे राहू शकले नाहीत. ॥१९ १/२॥
तान् खरो द्रवतो दृष्ट्‍वा निवर्त्य रुषितस्त्वरन् ।
राममेवाभिदुद्राव राहुश्चन्द्रमसं यथा ॥ २० ॥
त्यांना पळून जातांना पाहून रोषाने भरलेल्या खराने त्यांना तात्काळ परतवले आणि ज्याप्रमाणे राहु चंद्रम्यावर आक्रमण करतो त्याप्रकारे त्याने श्रीरामचंद्रांवर हल्ला केला. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सत्ताविसावा सर्ग पूरा झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP