[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। दशमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
कैकेय्याः सद्मनि समागतस्य दशरथस्य तां कोपभवनगतामवलोक्य दुःखं तेन तस्यै सान्त्वनाप्रदानं च - राजा दशरथांचे कैकेयीच्या भवनांत जाणे, तिला कोपभवनात स्थित पाहून दुःखी होणे आणि तिला अनेक प्रकारांनी सांत्वना देणे -
विदर्शिता यदा देवी कुब्जया पापया भृशम् ।
तदा शेते स्म सा भूमौ दिग्धविद्धेव किन्नरी ॥ १ ॥
पापिणी कुब्जेने जेव्हां देवी कैकेयीला उलट सर्व विपरीत गोष्टी पढविल्या तेव्हा ती विषाक्त बाणाने विद्ध झालेल्या किन्नरी प्रमाणे जमिनीवर लोळू लागली. ॥१॥
निश्चित्य मनसा कृत्यं सा सम्यगिति भामिनी ।
मन्थरायै शनैः सर्वमाचचक्षे विचक्षणा ॥ २ ॥
मंथरेने सांगितलेल्या समस्त कार्याला हे फारच उत्तम आहे, असा मनातल्या मनात निश्चय करून संभाषण करण्यात कुशल भामिनी कैकेयीला मंथरेने हळू हळू आपले सारे मंतव्य सांगितले. ॥२॥
सा दीना निश्चयं कृत्वा मन्थरावाक्यमोहिता ।
नागकन्येव निःश्वस्य दीर्घमुष्णं च भामिनी ॥ ३ ॥

मुहू्र्तं चिन्तयामास मार्गमात्मसुखावहम् ।
मंथरेच्या वचनाने मोहित आणि दीन झालेली भामिनी कैकेयी पूर्वोक्त निश्चय करून नागकन्ये प्रमाणे गरम आणि दिर्घ श्वास घेऊं लागली आणि दोन घटकापर्यंत आपल्यासाठी सुखदायक मार्गाचा विचार करीत राहिली. ॥३ १/२॥
सा सुहृच्चार्थकामा च तं निशम्य विनिश्चयम् ॥ ४ ॥

बभूव परमप्रीता सिद्धिं प्राप्येव मन्थरा ।
आणि ती मंथरा जी कैकेयीचे हित इच्छिणारी आणि सुहृदही होती आणि तिच्या मनोरथांना सिद्ध करण्याची अभिलाषा बाळगून होती, कैकेयीचा हा निश्चय ऐकून फारच प्रसन्न झाली. जणु काही तिला एखादी फार मोठी सिद्धीच प्राप्त झाली होती की काय. ॥४ १/२॥
अथ सा रुषिता देवी सम्यक्कृत्वा विनिश्चयम् ॥ ५ ॥

संविवेशाबला भूमौ निवेश्य भ्रुकुटीं मुखे ।
त्यानंतर रोषाने भरलेली देवी कैकेयी आपल्या कर्तव्याचा उत्तम प्रकारे निश्चय करून मुखमंडलामध्ये स्थित असलेला भुवया वक्र करून जमिनीवर झोपून राहिली. आणखी काय करू शकणार होती, अबला तर होती ना ? ॥५ १/२॥
ततश्चित्राणि माल्यानि दिव्यान्याभरणानि च ॥ ६ ॥

अपविद्धानि कैकेय्या तानि भूमिं प्रपेदिरे ।
त्यानंतर त्या कैकेयीने आपले विचित्र पुष्पहार आणि दिव्य आभूषणे उतरवून फेकून दिली. ती सारी आभूषणे जमिनीवर इकडे तिकडे पडली होती. ॥६ १/२॥
तया तान्यपविद्धानि माल्यान्याभरणानि च ॥ ७ ॥

अशोभयन्त वसुधां नक्षत्राणि यथा नभः ।
ज्या प्रमाणे विखुरलेल्या तारकांमुळे आकाशाची शोभा वाढते, त्या प्रमाणे इकडे तिकडे फेकून दिलेल्या पुष्पहार आणि आभूषणांनी तेथील जमिनीची शोभा वाढली होती. ॥७ १/२॥
क्रोधागारे च पतिता सा बभौ मलिनाम्बरा ॥ ८ ॥

एकवेणीं दृढां बध्वा गतसत्त्वेव किन्नरी ।
मलीन वस्त्र नेसून आणि सर्व केसांना दृढतापूर्वक एकाच वेणीत बांधून कोपभवनात पडून राहिलेली कैकेयी बलहीन अथवा अचेत (निश्चेष्ट) किन्नरी प्रमाणे भासत होती. ॥८ १/२॥
आज्ञाप्य तु महाराजो राघवस्याभिषेचनम् ॥ ९ ॥

उपस्थानमनुज्ञाप्य प्रविवेश निवेशनम् ।
तिकडे महाराज दशरथ मंत्री आदिंना राघवाच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यासाठी आज्ञा देऊन सर्वांना यथासमय उपस्थित होण्यास सांगून राणीवशात गेले. ॥९ १/२॥
अद्य रामाभिषेको वै प्रसिद्ध इति जज्ञिवान् ॥ १० ॥

प्रियार्हों प्रियमाख्यातुं विवेशान्तःपुरं वशी ।
त्यांनी विचार केला- आजच रामाच्या अभिषेकाची गोष्ट प्रसिद्ध केली गेली आहे म्हणून हा समाचार अजून कुठल्याही राणीला माहीत झालेला नसेल असा विचार करून जितेंद्रिय राजा दशरथांनी आपली प्रिय राणी (कैकेयी) हिला हा प्रिय समाचार ऐकविण्यासाठी अंतःपुरात प्रवेश केला. ॥१० १/२॥
स कैकेय्या गृहं श्रेष्ठं प्रविवेश महायशाः ॥ ११ ॥

पाण्डुराभ्रमिवाकाशं राहुयुक्तं निशाकरः ।
त्या महायशस्वी नरेशांनी प्रथम कैकेयीच्या श्रेष्ठ भवनात प्रवेश केला. जणुं श्वेत मेघांनी युक्त राहुयुक्त आकाशात चंद्रमाने पदार्पण केले होते. ॥११ १/२॥
शुकबर्हिसमायुक्तं क्रौञ्चहंसरुतायुतम् ॥ १२ ॥

वादित्ररवसङ्‌‍घुष्टं कुब्जावामनिकायुतम् ।
लतागृहैश्चित्रगृहैश्चम्पकाशोकशोभितैः ॥ १३ ॥
त्या भवनांत पोपट, मोर, क्रौञ्च आणि हंस आदि पक्षी कलरव करत होते. तेथे वाद्यांचा मधुर घोष गुंजत होता. बर्‍याचशा कुब्जा आणि ठेंगण्या दासींनी ते भरलेले होते. चंपा आणि अशोकांनी सुशोभित बरीचशी लताभवने आणि चित्रमंदिरे त्या महालाची शोभा वाढवत होती. ॥१२-१३॥
दान्तराजतसौवर्णवेदिकाभिः समायुतम् ।
नित्यपुष्पफलैर्वृक्षैर्वापीभिरुपशोभितम् ॥ १४ ॥
हस्तीदंत, चांदी आणि सोन्यांनी बनविलेल्या वेदिंनी संयुक्त त्या भवनाला नित्य फुलणार्‍या, फळणार्‍या वृक्षांनी बर्‍याचशा वापीनी (विहिरीनी) सुशोभित केले होते. ॥१४॥
दान्तराजतसौवर्णैः संवृतं परमासनैः ।
विविधैरन्नपानैश्च भक्ष्यैश्च विविधैरपि ॥ १५ ॥

उपपन्नं महार्हैश्च भूषणैस्त्रिदिवोपमम् ।
त्यांत हस्तीदंत, चांदी आणि सोन्याची बनविलेली उत्तम सिंहासने ठेवण्यांत आली होती. नाना प्रकारचे अन्न, पान आणि विविध प्रकारचे भक्ष्य, भोज्य पदार्थांनी ते भवन समृद्ध होते. बहुमूल्य आभूषणांनी संपन्न कैकेयीचे ते भवन स्वर्गाप्रमाणे शोभत होते. ॥१५ १/२॥
स प्रविश्य महाराजः स्वमन्तःपुरमृद्धिमत् ॥ १६ ॥
आपल्या त्या समृद्धशाली अंतःपुरात प्रवेश करून राजा दशरथांनी तेथील उत्तम शय्येवर राणी कैकेयीला पाहिले नाही. (त्यांना तेथे ती दिसली नाही) ॥१६॥
न ददर्श स्त्रियं राजा कैकेयीं शयनोत्तमे ।
स कामबलसंयुक्तो रत्यर्थी मनुजाधिपः ॥ १७ ॥

अपश्यन् दयितां भार्यां पप्रच्छ विषसाद च ।
कामबलाने संयुक्त ते नरेश राणीची प्रसन्नता वाढविण्याच्या अभिलाषेने आंत गेले होते. तेथे आपली प्रिय पत्‍नी न दिसल्याने त्यांच्या मनात फार विषाद उत्पन्न झाला आणि ते तिच्या विषयी चौकशी करू लागले. ॥१७ १/२॥
न हि तस्य पुरा देवी तां वेलामत्यवर्तत ॥ १८ ॥

न च राजा गृहं शून्यं प्रविवेश कदाचन ।
ततो गृहगतो राजा कैकेयीं पर्यपृच्छत ॥ १९ ॥

यथापुरमविज्ञाय स्वार्थलिप्सुमपण्डिताम् ।
यापूर्वी कधीही राणी कैकेयी राजांच्या आगमनाच्या समयी कधी अन्यत्र कुठे जात नसे. राजांनी कधी शून्य भवनात प्रवेश केला नव्हता, म्हणून ते घरी येऊन कैकेयी संबंधी चौकशी करू लागले. त्यांना हे माहीत नव्हते की ती मूर्ख (स्त्री) कुठला तरी स्वार्थ सिद्ध करू पाहात आहे. म्हणून त्यांनी पूर्वीप्रमाणेच प्रतिहारीला तिच्या संबंधी विचारले. ॥१८-१९ १/२॥
प्रतिहारी त्वथोवाच संत्रस्ता तु कृताञ्जलिः ॥ २० ॥
प्रतिहारी खूप घाबरलेली होती. तिने हात जोडून म्हटले- 'देव ! देवी कैकेयी अत्यंत कुपित होऊन कोपभवना कडे धावत गेली आहे.' ॥२०॥
देव देवी भृशं क्रुद्धा क्रोधागारमभिद्रुता ।
प्रतीहार्या वचः श्रुत्वा राजा परमदुर्मनाः ॥ २१ ॥

विषसाद पुनर्भूयो लुलितव्याकुलेन्द्रियः ।
प्रतिहारीचे हे म्हणणे ऐकून राजाचे मन फार उदास झाले. त्यांची इंद्रिये चञ्चल आणि व्याकुळ होऊन गेली आणि ते पुन्हा अधिक विषाद करू लागले. ॥२१ १/२॥
तत्र तां पतितां भूमौ शयानामतथोचिताम् ॥ २२ ॥

प्रतप्त इव दुःखेन सोऽपश्यज्जगतीपतिः ।
कोपभवनात ती जमिनीवर पडलेली होती व अशा रीतीने झोपलेली होती की जे तिच्यासाठी योग्य नव्हते. राजांनी दुःखाने संतप्त होऊन तिला त्या अवस्थेत पाहिले. ॥२२ १/२॥
सवृद्धस्तरुणीं भार्यां प्राणेभ्योऽपि गरीयसीम् ॥ २३ ॥

अपापः पापसंकल्पां ददर्श धरणीतले ।
लतामिव विनिष्कृत्तां पतितां देवतामिव ॥ २४ ॥
राजे म्हातारे होते आणि त्यांची पत्‍नी तरूण होती म्हणून ते तिला आपल्या प्राणांपेक्षाही अधिक मानत होते. राजांच्या मनात काहीही पाप नव्हते, परंतु कैकेयी आपल्या मनांत पापपूर्ण संकल्प घेऊन बसलेली होती. त्यांनी तिला कापलेल्या वेलिप्रमाणे पृथ्वीवर पडलेली पाहिली- जणु कोणी देवांगनाच स्वर्गातून पृथ्वीवर कोसळून पडली आहे. ॥२३-२४॥
किन्नरीमिव निर्धूतां च्युतामप्सरसं यथा ।
मायामिव परिभ्रष्टां हरिणीमिव संयुताम् ॥ २५ ॥
ती स्वर्गभ्रष्ट किन्नरी, देवलोकापासून च्युत झालेली अप्सरा, लक्ष्य भ्रष्ट माया अथवा जाळ्यांत बांधल्या गेलेल्या हरीणी प्रमाणे भासत होती. ॥२५॥
करेणुमिव दिग्धेन विद्धां मृगयुना वने ।
महागज इवारण्ये स्नेहात् परमदुःखिताम् ॥ २६ ॥

परिमृज्य च पाणिभ्यामभिसन्त्रस्तचेतनः ।
कामी कमलपत्राक्षीमुवाच वनितामिदम् ॥ २७ ॥
ज्या प्रमाणे कुणी महान गजराज वनांत व्याधाच्या द्वारा विषलिप्त बाणाने विद्ध होऊन जमिनीवर पडलेल्या अत्यंत दुःखित हरीणीला स्नेहवश स्पर्श करतो त्याप्रकारे कामी राजा दशरथांनी महान दुःखात पडलेल्या कमलनयनी भार्या कैकेयीला स्नेहपूर्वक दोन्ही हातांनी स्पर्श केला. त्या समयी त्यांच्या मनात सर्व बाजूंनी हे भय सामावलेले होते की न जाणो ही काय सांगेल आणि काय करील ? ते तिच्या अंगांवरून हात फिरवित या प्रमाणे बोलले- ॥२६-२७॥
न तेऽहमभिजानामि क्रोधमात्मनि संश्रितम् ।
देवि केनाभियुक्तासि केन वासि विमानिता ॥ २८ ॥
"देवि ! तुझा क्रोध माझ्यावर आहे असा विश्वास तर मला वाटत नाही. मग कुणी तुझा तिरस्कार केला आहे ? कुणाकडून तुझी निंदा केली गेली आहे ? ॥२८॥
यदिदं मम दुःखाय शेषे कल्याणि पांसुषु ।
भूमौ शेषे किमर्थं त्वं मयि कल्याणचेतसि ॥ २९ ॥

भूतोपहतचित्तेव मम चित्तप्रमाथिनी ।
'कल्याणी ! तू याप्रमाणे मला दुःख देण्यासाठी जी धुळीत लोळत पडली आहेस त्याचे कारण काय आहे ? माझ्या चित्ताला घायाळ करणार्‍या सुंदरी ! माझ्या मनात तर सदा तुझ्या कल्याणाचीच भावना राहात असते. मग मी विद्यमान असतां तू कशासाठी जमिनीवर झोपली आहेस ? असे वाटते आहे की तुझ्या चित्तावर कुणी पिशाचाने अधिकार प्राप्त केला आहे ? (तुला एखादे पिचाच्च लागले असावे आणि त्याने तुझ्या चित्तावर कब्जा केला आहे.) ॥२९ १/२॥
सन्ति मे कुशला वैद्यास्त्वभितुष्टाश्च सर्वशः ॥ ३० ॥

सुखितां त्वां करिष्यन्ति व्याधिमाचक्ष्व भामिनि ।
"भामिनी ! तू आपला रोग सांग. माझ्या येथे बरेचसे चिकित्साकुशल वैद्य अहेत, ज्यांना मी सर्व प्रकारे संतुष्ट करून ठेवलेले आहेत, ते तुला सुखी करतील. ॥३० १/२॥
कस्य वा ते प्रियं कार्यं केन वा विप्रियं कृतम् ॥ ३१ ॥

कः प्रियं लभतामद्य को वा सुमहदप्रियम् ।
अथवा सांग बरे आज कुणाचे प्रिय करायचे आहे ? अथवा कुणी तुझे अप्रिय केले आहे ? तुझ्या कुणा उपकार्‍याचा आज प्रिय मनोरथ प्राप्त होणार आहे अथवा कुणा अपकार्‍याचे अत्यंत अप्रिय होणार आहे ? कुणाला कठोर दण्ड दिला जाणार आहे ? ॥३१ १/२॥
मा रौत्सीर्मा च कार्षीस्त्वं देवि सम्परिशोषणम् ॥ ३२ ॥

अवध्यो वध्यतां को वा वध्यः को वा विमुच्यताम् ।
दरिद्रः को भवेदाढ्यो द्रव्यवान् वाप्यकिञ्चनः ॥ ३३ ॥
'देवि ! तू रडू नको. आपल्या देहाला सुकवू नको; आज तुझ्या इच्छेवरून कुणा अवध्याचा वध करू ? अथवा कुणा प्राणदण्ड मिळण्यायोग्य अपराध्यालाही मुक्त करू ? कुणा दारिद्य्राला धनवान आणि कुणा धनवानाला कंगाल बनवूं ? ॥३२-३३॥
अहं च हि मदीयाश्च सर्वे तव वशानुगाः ।
न ते कञ्चिदभिप्रायं व्याहन्तुमहमुत्सहे ॥ ३४ ॥

आत्मनो जीवितेनापि ब्रूहि यन्मनसि स्थितम् ।
"मी आणि माझे सर्व सेवक, तुझ्या आज्ञेच्या अधीन आहोत. तुझा कुठलाही मनोरथ मी भंग करू शकत नाही - तो पूरा करूनच मी राहीन. मग त्यासाठी वाटल्यास मला माझे प्राण जरी द्यावे लागले तरी हरकत नाही. म्हणून तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग'. ॥३४ १/२॥
बलमात्मनि जानन्ती न मां शङ्‌कितुमर्हसि ॥ ३५ ॥

करिष्यामि तव प्रीतिं सुकृतेनापि ते शपे ।
आपले बळ जाणत असूनही तू माझ्यावए संदेह करतां कामा नये. मी आपल्या सत्कर्मांची शपथ घेऊन सांगतो की ज्यायोगे तुला प्रसन्नता वाटेल तेच मी करीन. ॥३५ १/२॥
यावदावर्तते चक्रं तावती मे वसुंधरा ॥ ३६ ॥

द्राविडाः सिन्धुसौवीराः सौराष्ट्रा दक्षिणापथाः ।
वङ्‌‍गाङ्‌‍गमगधा मत्स्याः समृद्धाः काशिकोसलाः ॥ ३७ ॥
जो पर्यत सूर्याचे चक्र फिरत आहे तेथपर्यंतची सर्व पृथ्वी माझ्या अधिकारात आहे. द्रविड, सिंधु-सौवीर, सौराष्ट्र, दक्षिण भारतातील सारे प्रदेश तथा अङ्‌‍ग, वङ्‌‍ग, मगध, मत्स्य, काशी आणि कोसल - या सर्व समृद्धशाली देशांवर माझे अधिपत्य आहे. ॥३७॥
तत्र जातं बहु द्रव्यं धनधान्यमजाविकम् ।
ततो वृणीष्व कैकेयि यद् यत् त्वं मनसेच्छसि ॥ ३८ ॥
'कैकेयी ! त्यात पैदा होणारी विविध प्रकारची धन-धान्य-द्रव्य आणि बकरी, मेंढा आदि जे काही तुला मनापासून घ्यावयाची इच्छा असेल ते तू माझ्या जवळ माग. ॥३८॥
किमायासेन ते भीरु उत्तिष्ठोत्तिष्ठ शोभने ।
तत्त्वं मे ब्रूहि कैकेयि यतस्ते भयमागतम् ।
तत् ते व्यपनयिष्यामि नीहारमिव रश्मिवान् ॥ ३९ ॥
'भीरू ! इतके क्लेश सोसण्याची प्रयास करण्याची काय आवश्यकता आहे ? शोभने ! ऊठ, ऊठ ! कैकेयी ! ठीक ठीक सांग बरे तुला कुणापासून कसले भय उत्पन्न झाले आहे ? ज्याप्रमाणे अंशुमाळी सूर्य जसे धुके दूर करून टाकतो, त्याप्रकारेच मी तुझ्या भयाचे सर्वथा निवारण करून टाकीन.' ॥३९॥
तथोक्ता सा समाश्वस्ता वक्तुकामा तदप्रियम् ।
परिपीडयितुं भूयो भर्त्तारं उपचक्रमे ॥ ४० ॥
राजाने असे म्हटल्यावर कैकेयीला काहीशी सांत्वना मिळाली. आता तिला आपल्या स्वामींना ती अप्रिय गोष्ट सांगण्याची इच्छा झाली. तिने पतिला अधिकच पीडा देण्याची तयारी केली. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP