श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भेदनीत्या वानरान् स्वपक्षे समानीय हनुमताङ्‌गदस्यात्मना सह चलितुं प्रबोधनम् - हनुमानांनी भेदनीति द्वारा वानरांना आपल्या पक्षात करुन घेऊन अंगदाला आपल्या बरोबर येण्यासाठी समजाविणे -
तथा ब्रुवति तारे तु ताराधिपतिवर्चसि ।
अथ मेने हृतं राज्यं हनुमानङ्‌गिदेन तत् ॥ १ ॥
तारापति चंद्रम्या समान तेजस्वी तारने असे सांगितल्यावर हनुमान् यांनी असे मानले की आता अंगदाने ते राज्य (जे आत्तापर्यत सुग्रीवाच्या अधिकारात होते) हरण केले आहे. (या प्रकारे वानरांमध्ये फूट पडण्यामुळे बरेचसे वानर अंगदाला साथ देतील आणि बलवान् अंगद सुग्रीवांना राज्यापासून वंचित करील- अशी संभावना हनुमानाच्या मनांत उत्पन्न झाली.) ॥१॥
बुद्ध्या ह्यष्टाङ्‌गतया युक्तं चतुर्बलसमन्वितम् ।
चतुर्दशगुणं मेने हनुमान् वालिनः सुतम् ॥ २ ॥
हनुमान् हे उत्तम प्रकारे जाणत होते की वालिकुमार अंगद आठ(*१) गुणांनी युक्त बुद्धिने, चार(*२) प्रकारच्या बलाने आणि चौदा(*३) गुणांनी संपन्न आहेत. ॥२॥
(*१-बुद्धिचे आठ गुण आहेत - ऐकण्याची इच्छा, ऐकून ग्रहण करणे, ग्रहण करून धारण करणे, ऊहापोह करणे, अर्थ अथवा तात्पर्यास उत्तम प्रकारे समजणे तसेच तत्त्वज्ञानाने संपन्न होणे.)
(*२-साम, दाम, दण्ड आणि भेद - हे जे शत्रुला वश करण्याचे चार उपाय नीति-शास्त्रात सांगितले गेले आहेत. त्यांनाच येथे चार प्रकारचे बल म्हटले गेले आहे. कुणा कुणाच्या मते बाहुबल, मनोबल, उपायबल, आणि बंधुबल ही चार बले आहेत.)
(*३- चौदा गुण या प्रकारे सांगितले गेले आहेत- देश-कालाचे ज्ञान, दृढता, सर्व प्रकारच्या क्लेशांना सहन करण्याची क्षमता, सर्व विषयाचे ज्ञान प्राप्त करणे, चतुरता, उत्साह अथवा बल, मंत्रणेला गुप्त ठेवणे, परस्पर विरोधी गोष्टी न सांगणे, शूरता, आपल्या आणि शत्रूच्या शक्तिचे ज्ञान, कृतज्ञता, शरणागत वत्सलता, अमर्षशीलता तसेच अचञ्चलता (स्थिरता अथवा गंभीरता).
आपूर्यमाणं शश्वच्च तेजोबलपराक्रमैः ।
शशिनं शुक्लपक्षादौ वर्धमानमिव श्रिया ॥ ३ ॥
ते सदा तेज, बल आणि पराक्रमाने परिपूर्ण आहेत. शुक्ल पक्षाच्या आरंभीच्या चंद्रम्यासमान राजकुमार अंगदाची श्री दिवसेदिवस वाढत आहे. ॥३॥
बृहस्पतिसमं बुद्ध्या विक्रमे सदृशं पितुः ।
शुश्रूषमाणं तारस्य शुक्रस्येव पुरंदरम् ॥ ४ ॥
ते बुद्धिमध्ये बृहस्पति समान आणि पराक्रमात आपला पिता वालीच्या तुल्य आहेत. ज्याप्रमाणे देवराज इंद्र बृहस्पतिच्या मुखाने नीतिच्या गोष्टी ऐकतात त्याप्रकारे अंगद तारचे बोलणे ऐकत आहेत. ॥४॥
भर्तुरर्थे परिश्रांतं सर्वशास्त्रविशारदः ।
अभिसंधातुमारेभे हनुमानङ्‌गरदं ततः ॥ ५ ॥
आपले स्वामी सुग्रीवांचे कार्य सिद्ध करण्यात हे परिश्रमांचा (थकवा अथवा शिथिलता यांचा) अनुभव करीत आहेत. असा विचार करून संपूर्ण शास्त्रांच्या ज्ञानांत निपुण हनुमानांनी अंगदाला तार आदि वानरांच्या बाजूने फोडण्याचा प्रयत्‍न करण्यास आरंभ केला. ॥५॥
स चतुर्णामुपायानां तृतीयमुपवर्णयन् ।
भेदयामास तान् सर्वान् वानरान् वाक्यसंपदा ॥ ६ ॥
ते साम, दाम, भेद आणि दण्ड - या चार उपायांपैकी तीसर्‍याचा उपयोग करीत आपल्या युक्तियुक्त वाक्य-वैभवाच्या द्वारा त्या सर्व वानरांना फोडू लागले. ॥६॥
तेषु सर्वेषु भिन्नेषु ततोऽभीषयदङ्‌गादम् ।
भीषणैर्बहुभिर्वाक्यैः कोपोपायसमन्वितैः ॥ ७ ॥
जेव्हा ते सर्व वानर फुटले, तेव्हा त्यांनी दण्डरूप चौथ्या उपायाने युक्त नाना प्रकारच्या भयदायक वचनांच्या द्वारा अंगदास घाबरविण्यास आरंभ केला. ॥७॥
त्वं समर्थतरः पित्रा युद्धे तारेय वै धुरम् ।
दृढं धारयितुं शक्तः कपिराज्यं यथा पिता ॥ ८ ॥
’तारानंदन ! तुम्ही युद्धात आपल्या पित्यासमानच अत्यंत शक्तिशाली आहात - हे निश्चित रूपाने सर्वांना विदित आहे. ज्याप्रमाणे तुझे पिता वानरांचे राज्य सांभाळत होते, त्या प्रकारे तुम्हीही त्याला दृढतापूर्वक धारण करण्यास समर्थ आहांत. ॥८॥
नित्यमस्थिरचित्ता हि कपयो हरिपुंगवः ।
नाज्ञाप्यं विषहिष्यंति पुत्रदारान् विना त्वया ॥ ९ ॥
’परंतु हरिपुंगव ! हे कपिलोक सदाच चञ्चलचित्त असतात. आपल्या स्त्री-पुत्रांपासून अलग राहून तुमच्या आज्ञेचे पालन करणे ह्यांच्यासाठी सहन होणार नाही. ॥९॥
त्वां नैते ह्यनुयुञ्जेयुः प्रत्यक्षं प्रवदामि ते ।
यथायं जांबवान् नीलः सुहोत्रश्च महाकपिः ॥ १० ॥

न ह्यहं ते इमे सर्वे सामदानादिभिर्गुणैः ।
दण्डेन वा त्वया शक्याः सुग्रीवादपकर्षितुम् ॥ ११ ॥
’मी तुमच्या समक्षच सांगतो की ह्या वानरांतील कोणीही वानर सुग्रीवाशी विरोध करून तुमच्या प्रति अनुरक्त होऊ शकत नाही. जसे हे जांबवान्, नील आणि महाकपि सुहोत्र आहेत त्याच प्रकारे मीही आहे. मी, तसेच हे सर्व लोक साम, दाम आदि उपायांच्या द्वारे सुग्रीवांपासून अलग केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही दण्डद्वारा आम्हा सर्वांना वानरराजा पासून दूर करू शकाल हेही संभव नाही आहे. (म्हणून सुग्रीव तुमच्यापेक्षा प्रबल आहे.) ॥१०-११॥
विगृह्यासनमप्याहुः दुर्बलेन बलीयसा ।
आत्मरक्षाकरस्तस्मान् न विगृह्णीत दुर्बलः ॥ १२ ॥
दुर्बलाशी विरोध करून बलवान् पुरुष गुपचुप बसून राहील- हे तर संभव आहे. परंतु कोणा बलवानाशी वैर बांधून कुणी दुर्बल पुरुष कोठेही सुखाने राहू शकत नाही; म्हणून आपली सुरक्षा इच्छिणार्‍या दुर्बल पुरुषाने बलवानाबरोबर कधी विग्रह करता कामा नये - हे नीतिज्ञ पुरुषांचे वचन आहे. ॥१२॥
यां चेमां मन्यसे धात्रीं एतद् बिलमिति श्रुतम् ।
एतल्लक्ष्मणबाणानां ईषत् कार्यं विदारणम् ॥ १३ ॥
’तुम्ही जे असे मानू लागला आहात की ही गुहा आपल्याला मातेसमान आपल्या मांडीवर लपवून ठेवील, म्हणून आपले रक्षण होईल तसेच या बिळाच्या अभेद्यते विषयी जे तुम्ही तारच्या मुखाने काही ऐकले आहे, हे सर्व व्यर्थ आहे, कारण की या गुहेला विदीर्ण करून टाकणे लक्ष्मणांच्या बाणांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे. (अत्यंत तुच्छ कार्य आहे.) ॥१३॥
स्वल्पं हि कृतमिंद्रेण क्षिपता ह्यशनिं पुरा ।
लक्ष्मणो निशितैर्बाणैः भिंद्यात् पत्रपुटं यथा ॥ १४ ॥
’पूर्वकाळी येथे वज्राचा प्रहार करून इंद्रांनी तर गुहेला फारच थोडी हानी पोहोचविली होती; परंतु लक्ष्मण आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा हिला पानांच्या द्रोणाप्रमाणे विदीर्ण करून टाकतील. ॥१४॥
लक्ष्मणस्य तु नाराचा बहवः संति तद्विधाः ।
वज्राशनिसमस्पर्शा गिरीणामपि दारकाः ॥ १५ ॥
’लक्ष्मणांच्या जवळ असे बरेच नाराच आहेत ज्यांचा हलकासा स्पर्श ही वज्र आणि अशनि समान आघात पोहोचविणारा आहे. ते नाराच पर्वतालाही विदीर्ण करू शकतात. ॥१५॥
अवस्थानं यदैव त्वं आसिष्यसि परंतप ।
तदेव हरयः सर्वे त्यक्ष्यंति कृतनिश्चयाः ॥ १६ ॥
 ’परंतप वीर ! जसे तुम्ही या गुहेत राहावयास आरंभ कराल त्याच क्षणी हे सर्व वानर तुमचा त्याग करतील; कारण की यांनी असे करण्याचा निश्चय केला आहे. ॥१६॥
स्मरंतः पुत्रदाराणां नित्योद्विग्ना बुभुक्षिताः ।
खेदिता दुःखशय्याभिः त्वां करिष्यंति पृष्ठतः ॥ १७ ॥
’हे आपल्या मुलाबाळांची आठवण करीत सदा उद्विग्न राहातील. जेव्हा येथे त्यांना भुकेचे कष्ट सहन करावे लागतील आणि दुःखद शय्येवर झोपल्यामुळे अथवा दुरावस्थेत राहिल्यामुळे त्यांच्या मनांत खेद उत्पन्न होईल तेव्हा हे तुम्हांला सोडून निघून जातील. ॥१७॥
स त्वं हीनः सुहृद्‌भिश्च हितकामैश्च बंधुभिः ।
तृणादपि भृशोद्विग्नः स्पंदमानाद् भविष्यसि ॥ १८ ॥
’अशा स्थितिमध्ये तुम्ही हितैषी बंधु आणि सुहृदांच्या सहयोगापासून वंचित होऊन उडणार्‍या गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ होऊन जाल आणि सदा अधिक घाबरलेल्या स्थितीत राहाल. (अथवा हलणार्‍या गवताच्या पाल्याप्रमाणे अत्यंत भयभीत होत राहाल.) ॥१८॥
न च जातु न हिंस्युस्त्वां घोरा लक्ष्मणसायकाः ।
अपवृत्तं जिघांसंतो महावेगा दुरासदाः ॥ १९ ॥
’लक्ष्मणांचे बाण घोर, महान् वेगवान् आणि दुर्जय आहेत. श्रीरामांच्या कार्यापासून विमुख झाल्यावर ते तुम्हांला मारल्याशिवाय कदापि राहाणार नाहीत. ॥१९॥
अस्माभिस्तु गतं सार्धं विनीतवदुपस्थितम् ।
आनुपूर्व्यात्तु सुग्रीवो राज्ये त्वां स्थापयिष्यति ॥ २० ॥
’आमच्या बरोबर येऊन जेव्हा तुम्ही विनीत पुरुषाप्रमाणे त्यांच्या सेवेत उपस्थित व्हाल तेव्हा सुग्रीव क्रमशः आपल्यानंतर तुम्हांलाच राज्यावर बसवतील. ॥२०॥
धर्मकामः पितृव्यस्ते प्रीतिकामो दृढव्रतः ।
शुचिः सत्यप्रतिज्ञश्च न त्वां जातु न नाशयेत् ॥ २१ ॥
’तुमचे काका सुग्रीव धर्माच्या मार्गावर चालणारे राजे आहेत. ते सदा तुमची प्रसन्नता इच्छिणारे, दृढव्रत, पवित्र आणि सत्यप्रतिज्ञ आहेत. म्हणून कदापि तुमचा नाश करू शकत नाहीत. ॥२१॥
प्रियकामश्च ते मातुः तदर्थं चास्य जीवितम् ।
तस्यापत्यं च नास्त्यन्यत् तस्मादङ्‌गृद गम्यताम् ॥ २२ ॥
’अंगदा ! त्यांच्या मनात सदा तुमच्या मातेचे प्रिय करण्याची इच्छा राहात असते. तिच्या प्रसन्नतेसाठीच ते जीवन धारण करतात. सुग्रीवांना तुमच्या शिवाय दुसरा कोणी पुत्र नाही, म्हणून तुम्ही त्यांच्याच जवळ आले पाहिजे. ॥२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुष्पञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP