[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। प्रथमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामसद्‌गुणानां वर्णनं, श्रीरामं यौवराज्ये स्थापयितुं दशरथस्य विचारस्तदर्थं मन्त्रणां कर्तुं विभिन्ननरेषाणां पौराणां जानपदानां च राज्ञा स्वसंसदि समाह्वानम् - श्रीरामांच्या सदगुणांचे वर्णन, राजा दशरथांचा श्रीरामास युवराज बनविण्याचा विचार तथा विभिन्न नरेश आणि नगर एवं जनपदाच्या लोकांना मंत्रणेसाठी आपल्या दरबारात बोलावणे -
गच्छता मातुलकुलं भरतेन तदानघः ।
शत्रुघ्नो नित्यशत्रुघ्नो नीतः प्रीतिपुरस्कृतः ॥ १ ॥
(प्रथमच हे सांगितले गेले आहे की) भरत आपल्या मामाच्या घरी जातांना काम आदि शत्रूंना कायमचे नष्ट करणार्‍या निष्पाप शत्रुघ्नाला ही प्रेमवश आपल्या बरोबर घेऊन गेले होते. ॥१॥
स तत्र न्यवसद्‍ भ्रात्रा सह सत्कारसत्कृतः ।
मातुलेनाश्वपतिना पुत्रस्नेहेन लालितः ॥ २ ॥
तेथे भावासहित त्यांचा खूप आदर-सत्कार झाला आणि ते तेथे सुखपूर्वक राहू लागले. त्यांचे मामा युधाजित, जे अश्वयूथाचे अधिपति होते, त्या दोघांवर पुत्रांहून अधिक प्रेम करत होते आणि त्यांचे खूप कौतुक-लाड करीत होते. ॥२॥
तत्रापि निवसन्तौ तौ तर्प्यमाणौ च कामतः ।
भ्रातरौ स्मरतां वीरौ वृद्धं दशरथं नृपम् ॥ ३ ॥
जरी मामाच्या येथे त्या दोन्ही वीर भावांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना पूर्णतः तृप्त केले जात होते, तरी तेथे राहत असताही त्यांना आपले वृद्ध पिता महाराज दशरथांचा कधीही विसर पडत नव्हता. ॥३॥
राजापि तौ महातेजाः सस्मार प्रोषितौ सुतौ ।
उभौ भरतशत्रुघ्नौ महेन्द्रवरुणोपमौ ॥ ४ ॥
महातेजस्वी राजा दशरथही परदेशात गेलेल्या महेंद्र आणि वरूणा समान पराक्रमी आपल्या त्या दोन पुत्रांचे - भरत आणि शत्रुघ्नाचे सदा स्मरण करीत होते. ॥४॥
सर्व एव तु तस्येष्टाश्चत्वारः पुरुषर्षभाः ।
स्वशरीराद् विनिर्वृत्ताश्चचत्वार इव बाहवः ॥ ५ ॥
आपल्या शरीरापासून प्रकट झालेल्या चार भुजांच्या प्रमाणे ते सर्व चार्‍ही पुरूष शिरोमणी पुत्र महाराजांना फारच प्रिय होते. ॥५॥
तेषामपि महातेजा रामो रतिकरः पितुः ।
स्वयम्भूरिव भूतानां बभूव गुणवत्तरः ॥ ६ ॥
परंतु त्यातही महातेजस्वी राम सर्वांपेक्षा अधिक गुणवान असल्या कारणाने समस्त प्राण्यांना ब्रह्मदेव जसे अधिक प्रिय असतात तसे ते पित्याला विशेष प्रीतिवर्धक होते. ॥६॥
स हि देवैरुदीर्णस्य रावणस्य वधार्थिभिः ।
अर्थितो मानुषे लोके जज्ञे विष्णुः सनातनः ॥ ७ ॥
याचे एक कारण आणखीही असे होते की- ते साक्षात सनातन विष्णु होते आणि परम प्रचण्ड रावणाच्या वधाची अभिलाषा ठेवणार्‍या देवतांच्या प्रार्थनेवरून मनुष्यलोकात अवतीर्ण झाले होते. ॥७॥
कौसल्या शुशुभे तेन पुत्रेणामिततेजसा ।
यथा वरेण देवानामदितिर्वज्रपाणिना ॥ ८ ॥
त्या अमित तेजस्वी पुत्र श्रीरामामुळे महाराणी कौसल्येची अशी शोभा होत होती की वज्रधारी देवराज इंद्रामुळे जशी देवमाता अदिति सुशोभित होत असते. ॥८॥
स हि रूपोपपन्नश्च वीर्यवाननसूयकः ।
भूमावनुपमः सूनुर्गुणैर्दशरथोपमः ॥ ९ ॥
श्रीराम अत्यंत रूपवान आणि परक्रमी होते. ते कुणाचेही दोष बघत नसत. भूमण्डलात त्यांची समता करणारा कुणीही नव्हता. ते आपल्या गुणांनी पिता दशरथा समान एवं योग्य पुत्र होते. ॥९॥
स च नित्यं प्रशान्तात्मा मृदुपूर्वं च भाषते ।
उच्यमानोऽपि परुषं नोत्तरं प्रतिपद्यते ॥ १० ॥
ते सदा शांत चित्त राहात आणि सांत्वनापूर्वक मधुर वचन बोलत असत. जरी कुणी त्यांना काही कठोर शब्द बोलले तर ते त्यांना उत्तरच देत नसत. ॥१०॥
कदाचिदुपकारेण कृतेनैकेन तुष्यति ।
न स्मरत्युपकाराणां शतमप्यात्मवत्तया ॥ ११ ॥
कधी कुणी एक वेळ जरी उपकार केला तर ते त्याच्या त्या एकाच उपकाराने सदा संतुष्ट राहात होते आणि मनाला वश ठेवत असल्या कारणाने एखाद्याने शेकडो अपराध जरी केले तरी ही त्याच्या अपराधांची आठवण ते ठेवत नसत. ॥११॥
शीलवृद्धैर्ज्ञानवृद्धैर्वयोवृद्धैश्च सज्जनैः ।
कथयन्नास्त वै नित्यमस्त्रयोग्यान्तरेष्वपि ॥ १२ ॥
अस्त्रशस्त्रांच्या अभ्यासात उपयुक्त अशा समयी सुद्धा मधे मधे अवसर काढून ते चरित्रात, ज्ञानात तथा अवस्थेत श्रेष्ठ असलेल्या सत्पुरूषांशीच सदा वार्तालाप करीत असत. (आणि त्यांच्याकडून ज्ञान शिक्षण प्राप्त करीत) ॥१२॥
बुद्धिमान् मधुराभाषी पूर्वभाषी प्रियंवदः ।
वीर्यवान्न च वीर्येण महता स्वेन विस्मितः ॥ १३ ॥
ते अत्यंत बुद्धिमान होते आणि सदा गोड बोलत असत. आपल्या जवळ आलेल्या माणसाशी तेच पहिल्याने स्वतःच बोलत आणि त्यांना प्रिय वाटतील अशाच गोष्टी ते मुखावाटे बोलत. बल आणि पराक्रमांनी संपन्न असूनही आपल्या महान पराक्रमाचा त्यांना कधी गर्व होत नसे. ॥१३॥
न चानृतकथो विद्वान् वृद्धानां प्रतिपूजकः ।
अनुरक्तः प्रजाभिश्च प्रजाश्चाप्यनुरज्यते ॥ १४ ॥
असत्य गोष्ट तर त्यांच्या मुखातून कधी निघतच नसे. ते विद्वान होते आणि सदा वृद्ध पुरूषांचा सन्मान करीत असत. प्रजेचा श्रीरामाप्रति आणि श्रीरामांचा प्रजेप्रति अत्यंत अनुराग होता. ॥१४॥
सानुक्रोशो जितक्रोधो ब्राह्मणप्रतिपूजकः ।
दीनानुकम्पी धर्मज्ञो नित्यं प्रग्रहवाञ्छुचिः ॥ १५ ॥
ते परम दयाळु, क्रोधाला जिंकणारे आणि ब्राह्मणांचे पुजारी होते. त्यांच्या मनांत दीन-दुःखी लोकाविषयी फार दया होती. ते धर्माचे रहस्य जाणणारे, इंद्रियांना सदा वश ठेवणारे आणि आत बाहेरून परम पवित्र होते. ॥१५॥
कुलोचितमतिः क्षात्रं स्वधर्मं बहु मन्यते ।
मन्यते परया प्रीत्या महत् स्वर्गफलं ततः ॥ १६ ॥
आपले कुलोचित आचार, दया, उदारता आणि शरणागताचे रक्षण आदिमध्ये त्यांचे मन लागत असे. ते आपल्या क्षत्रियधर्माला अधिक महत्व देत असत आणि मानत असत. ते क्षत्रिय धर्माच्या पालनाने महान स्वर्ग (परमधाम) याची प्राप्ति होते असे मानत होते; म्हणून अत्यंत प्रसन्नतेने त्यात संलग्न राहात होते. ॥१६॥
नाश्रेयसि रतो यश्च न विरुद्धकथारुचिः ।
उत्तरोत्तरयुक्तीनां वक्ता वाचस्पतिर्यथा ॥ १७ ॥
अमंगलकारी निषिद्ध कर्मात त्यांची कधीही प्रवृत्ती होत नसे; शास्त्र विरूद्ध गोष्टी ऐकण्याची त्यांना रूचि नव्हती, ते आपल्या न्याययुक्त पक्षाच्या समर्थनासाठी एकापेक्षा एक उत्तम युक्ति प्रदान करण्यांत बृहस्पति समान होते. ॥१७॥
अरोगस्तरुणो वाग्मी वपुष्मान् देशकालवित् ।
लोके पुरुषसारज्ञः साधुरेको विनिर्मितः ॥ १८ ॥
ते निरोगी होते आणि त्यांची अवस्था तरूण होती. ते उत्तम वक्ता, सुंदर शरीराने सुशोभित आणि देश-कालाच्या तत्वास समजणारे होते. त्यांना पाहून असे वाटत होते की विधात्याने संसारात समस्त पुरूषांच्या सारतत्वास समजणार्‍या साधु पुरुषाच्या रूपात एकमात्र श्रीरामांनाच प्रकट केले आहे. ॥१८॥
स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥ १९ ॥
राजकुमार श्रीराम श्रेष्ठ गुणांनी युक्त होते. ते आपल्या सद्‌गुणांच्या मुळे प्रजाजनांना बाहेर विचरणार्‍या प्राणांप्रमाणे प्रिय होते. ॥१९॥
सर्वविद्याव्रतस्नातो यथावत् साङ्‌‍गवेदवित् ।
इष्वस्त्रे च पितुः श्रेष्ठो बभूव भरताग्रजः ॥ २० ॥
भरताचे मोठे बंधु श्रीराम संपूर्ण विद्यांच्या व्रतात निष्णांत आणि सहा अंगांसहित संपूर्ण वेदांचे यथार्थ ज्ञाता होते. बाणविद्ये मध्ये तर ते आपल्या पित्याहूनही अधिक पारंगत होते. ॥२०॥
कल्याणाभिजनः साधुरदीनः सत्यवागृजुः ।
वृद्धैरभिविनीतश्च द्विजैर्धर्मार्थदर्शिभिः ॥ २१ ॥
ते कल्याणाची जन्मभूमी, साधु, दैन्यरहित, सत्यवादी आणि सरल होते. धर्म आणि अर्थाचे ज्ञाते असलेल्या वृद्ध ब्राह्मणांच्या द्वारे त्यांना उत्तम शिक्षण प्राप्त झाले होते. ॥२१॥
धर्मकामार्थतत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् ।
लौकिके समयाचारे कृतकल्पो विशारदः ॥ २२ ॥
त्यांना धर्म (१), अर्थ (३), काम(२) यांच्या तत्वांचे सम्यग ज्ञान होते. ते आश्चर्यकारक स्मरणशक्तीने संपन्न आणि प्रतिभाशाली होते. ते लोक व्यवहाराच्या संपादनात समर्थ आणि समयोचित धर्माचरणात कुशल होते. ॥२२॥
निभृतः संवृताकारो गुप्तमन्त्रः सहायवान् ।
अमोघक्रोधहर्षश्च त्यागसंयमकालवित् ॥ २३ ॥
ते विनयशील, आपल्या (आकांक्षाला) अभिप्रायाला लपविणारे, मंत्रास गुप्त ठेवणारे आणि उत्तम सहायकांनी संपन्न होते. त्यांचा क्रोध अथवा हर्ष निष्फल होत नसे. ते वस्तूंच्या त्याग आणि संग्रहाच्या अवसरास उत्तम प्रकारे जाणत होते. ॥२३॥
दृढभक्तिः स्थिरप्रज्ञो नासद्‍ग्राही न दुर्वचः ।
निस्तन्द्रिरप्रमत्तश्च स्वदोषपरदोषवित् ॥ २४ ॥
गुरूजनांच्या प्रति त्यांची दृढ भक्ती होती. ते स्थितप्रज्ञ होते आणि असत् वस्तुंना कधी ग्रहण करीत नव्हते. त्यांच्या मुखांतून कधी दुर्वचन निघत नसे. ते आलस्यरहित, प्रमादशून्य तसेच आपल्या आणि परक्या मनुष्यांच्या दोषांना उत्तम प्रकारे जाणणारे होते. ॥२४॥
शास्त्रज्ञश्च कृतज्ञश्च पुरुषान्तरकोविदः ।
यः प्रग्रहानुग्रहयोर्यथान्यायं विचक्षणः ॥ २५ ॥
ते शास्त्रांचे ज्ञाता, उपकार्‍यांच्या प्रति कृतज्ञ, तसेच पुरूषांच्या तारतम्यास अथवा दुसर्‍या पुरूषांच्या मनोभावास जाणण्यात कुशल होते. यथायोग्य निग्रह आणि अनुग्रह करण्यात ते पूर्ण चतुर होते. ॥२५॥
सत्संग्रहानुग्रहणे स्थानविन्निग्रहस्य च ।
आयकर्मण्युपायज्ञः संदृष्टव्ययकर्मवित् ॥ २६ ॥
त्यांना सत्पुरूषांचा संग्रह आणि पालन तथा दुष्ट पुरूषांच्या निग्रहाच्या अवसरांचे (ठीक-ठीक) यथायोग्य ज्ञान होते. धनाच्या आयाचे उपायांना ते उत्तम प्रकारे जाणत होते. (अर्थात फुलांना नष्ट न करता त्यांच्या पासून रस घेणार्‍या भ्रमराप्रमाणे ते प्रजांना कष्ट ने देता ही त्यांच्याकडून न्यायोचित धनाचे उपार्जन करण्यात कुशल होते.) तथा शास्त्रवर्णित व्यय कर्माचे ही त्यांना ठीक-ठीक (यथायोग्य) ज्ञान होते $$. ॥२६॥
[$$ शास्त्रात व्ययाचे विधान या प्रकारे दिसून येते - कार्च्चदायस्य चार्थेन चतुर्भागेन वा पुनः । पादभागैस्त्रिभिर्वापि व्ययः संशुद्धते तव ॥ (महा. सभा. ५/७१०) - नारद म्हणतात - युधिष्ठिर ! काय तुझ्या आयाच्या एक चौथाई अथवा अर्धा अथवा तीन चौथाई भागात तुमचा सारा खर्च चालतो कां ?
श्रैष्ठ्यं चास्त्रसमूहेषु प्राप्तो व्यामिश्रकेषु च ।
अर्थधर्मौ च सं‍गृह्य सुखतन्त्रो न चालसः ॥ २७ ॥
त्यांनी सर्व प्रकारचे अस्त्रसमूह तथा संस्कृत, प्राकृत आदि भाषांनी मिश्रित नाटके आदिच्या ज्ञानात निपुणता प्राप्त केली होती. ते अर्थ आणि धर्माचा संग्रह (पालन) करीत असता तदनुकूल कामाचे सेवन करीत होते आणि कधी आळसाला जवळही फिरकू देत नव्हते. ॥२७॥
वैहारिकाणां शिल्पानां विज्ञातार्थविभागवित् ।
आरोहे विनये चैव युक्तो वारणवाजिनाम् ॥ २८ ॥
विहारा (क्रीडा अथवा मनोरंजना) च्या उपयोगात येणार्‍या संगीत, वाद्य आणि चित्रकारी आदि शिल्पांचेही ते विशेषज्ञ होते अर्थांच्या विभजनाचेही त्यांना सम्यग ज्ञान होते.%% ते हत्ती आणि घोड्यांवर चढण्यात आणि त्यांना नाना प्रकारच्या चालींचे शिक्षण देण्यातही निपुण होते. ॥२८॥
[%% पुढीलप्रमाणे पाच वस्तुंसाठी अर्थाचे विभाजन करणारा मनुष्य इहलोक आणि परलोकातही सुखी होतो. त्यावस्तु आहेत- धर्म, यश, अर्थ, आत्मा आणि स्वजन. यथा- धर्माय यशसेर्थाय कामाय स्वजनाय च । पञ्चधा विभजन वित्तमिहामुत्र च मोदते॥ (श्रीमद्‌भा. ८/१९/३७)]
धनुर्वेदविदां श्रेष्ठो लोकेऽतिरथसम्मतः ।
अभियाता प्रहर्त्ता च सेनानयविशारदः ॥ २९ ॥
श्रीराम या लोकात धनुर्वेदाच्या सर्व विद्वानात श्रेष्ठ होते. अतिरथी वीरही त्यांचा विशेष सन्मान करीत असत. शत्रुसेनेवर आक्रमण आणि प्रहार करण्यातही ते विशेष कुशल होते. सेना-संचालनाच्या नीतिमध्ये त्यांनी अधिक निपुणता प्राप्त केली होती. ॥२९॥
अप्रधृष्यश्च सङ्‌‍ग्रामे क्रुद्धैरपि सुरासुरैः ।
अनसूयो जितक्रोधो न दृप्तो न च मत्सरी ॥ ३० ॥
संग्रामात कुपित होऊन आलेल्या समस्त देवता आणि असुर त्यांना परास्त करू शकत नसत. त्यांच्या ठिकाणी दोषदृष्टीचा सर्वथा अभाव होता. त्यांनी क्रोधाला सर्वस्वी जिंकले होते. दर्प आणि ईर्षेचा त्यांच्या ठिकाणी अत्यंत अभाव होता. ॥३०॥
नावज्ञेयश्च भूतानां न च कालवशानुगः ।
एवं श्रेष्ठगुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ॥ ३१ ॥

सम्मतस्त्रिषु लोकेषु वसुधायाः क्षमागुणैः ।
बुद्ध्या बृहस्पतेस्तुल्यो वीर्ये चापि शचीपतेः ॥ ३२ ॥
कुठल्याही प्राण्याच्या मनात त्यांच्या विषयी अवहेलनेचा भाव नव्हता. ते कालाला वश होऊन त्याच्या मागे मागे जाणारे नव्हते. (काल त्यांच्या मागे मागे जात होता.) या प्रकारे उत्तम गुणांनी युक्त असल्याने राजकुमार श्रीराम समस्त प्रजा आणि तीन्ही लोकातील प्राण्यांसाठी आदरणीय होते. ते आपल्या क्षमा संबंधी गुणांच्या द्वारा पृथ्वीची बरोबरी करीत होते. बुद्धिमध्ये बृहस्पति आणि बल-पराक्रमांत शचीपति इंद्र तुल्य होते. ॥३१-३२॥
तथा सर्वप्रजाकान्तैः प्रीतिसंजननैः पितुः ।
गुणैर्विरुरुचे रामो दीप्तः सूर्य इवांशुभिः ॥ ३३ ॥
ज्याप्रमाणे सूर्यदेव आपल्या किरणांनी प्रकाशित होतात त्याप्रकारे श्रीरामचंद्र समस्त प्रजांना प्रिय वाटणारे तथा पित्याची प्रीति वाढविणार्‍या सदगुणांनी सुशोभित होत होते. ॥३३॥
तमेवंव्रतसम्पन्नमप्रधृष्यपराक्रमम् ।
लोकनाथोपमं नाथमकामयत मेदिनी ॥ ३४ ॥
अशा सदाचारसंपन्न, अजेय, पराक्रमी आणि लोकपालांप्रमाणे तेजस्वी श्रीरामचंद्रांना पृथ्वी (भूदेवी आणि भूमण्डलावरील प्रजा) यांनी आपले स्वामी बनविण्याची कामना केली. ॥३४॥
एतैस्तु बहुभिर्युक्तं गुणैरनुपमैः सुतम् ।
दृष्ट्‍वा दशरथो राजा चक्रे चिन्तां परन्तपः ॥ ३५ ॥
आपला पुत्र श्रीराम यास अनेक अनुपम गुणांनी युक्त पाहून शत्रूंना संताप देणार्‍या राजा दशरथांनी मनात काही विचार करण्यास आरंभ केला. ॥३५॥
अथ राज्ञो बभूवैव वृद्धस्य चिरजीविनः ।
प्रीतिरेषा कथं रामो राजा स्यान्मयि जीवति ॥ ३६ ॥
त्या चिरंजीवी वृद्ध महाराज दशरथांच्या हृदयात ही चिंता उत्पन्न झाली की कुठल्या प्रकारे मी जिवंत असतांनाच श्रीरामचंद्र राजा होऊन जाईल आणि त्यांचा राज्याभिषेकाने प्राप्त होणारी ही प्रसन्नता मला कशी सुलभ होईल ? ॥३६॥
एषा ह्यस्य परा प्रीतिर्हृदि सम्परिवर्तते ।
कदा नाम सुतं द्रक्ष्याम्यभिषिक्तमहं प्रियम् ॥ ३७ ॥
त्यांच्या हृदयात ही उत्तम अभिलाषा वारंवार घोळू लागली की केव्हा मी आपल्या प्रिय पुत्र श्रीरामाचा राज्याभिषेक पाहीन. ॥३७॥
वृद्धिकामो हि लोकस्य सर्वभूतानुकम्पकः ।
मत्तः प्रियतरो लोके पर्जन्य इव वृष्टिमान् ॥ ३८ ॥
ते विचार करू लागले की श्रीराम सर्व लोकांच्या अभ्युदयाची कामना करतात आणि संपूर्ण जीवांवर दया करतात. ते लोकांमध्ये वृष्टी करणार्‍या मेघाप्रमाणे माझ्यापेक्षाही अधिक प्रिय झालेले आहेत. ॥३८॥
यमशक्रसमो वीर्ये बृहस्पतिसमो मतौ ।
महीधरसमो धृत्यां मत्तश्च गुणवत्तरः ॥ ३९ ॥
यम व इंद्र यांच्यासमान बल असलेला, बुद्धीमध्ये बृहस्पतीची बरोबरी करणारा, आणि पर्वतासमान धैर्य असलेला हा राम माझ्यापेक्षाही गुणी आहे. ॥ ३९ ॥
महीमहमिमां कृत्स्नामधितिष्ठन्तमात्मजम् ।
अनेन वयसा दृष्ट्‍वा यथा स्वर्गमवाप्नुयाम् ॥ ४० ॥
मी याच वयात आपला पुत्र श्रीराम यास सर्व पृथ्वीचे राज्य करतांना पाहून यथासमय सुखाने स्वर्ग प्राप्त करीन, हीच माझ्या जीवनाची अभिलाषा आहे'. ॥४०॥
इत्येवं विविधैस्तैस्तैरन्यपार्थिवदुर्लभैः ।
शिष्टैरपरिमेयैश्च लोके लोकोत्तरैर्गुणैः ॥ ४१ ॥

तं समीक्ष्य महाराजो युक्तं समुदितैः गुणैः ।
निश्चित्य सचिवैः सार्धं यौवराज्यममन्यत ॥ ४२ ॥
याप्रकारे विचार करुन तथा आपला पुत्र श्रीराम यास नाना प्रकारच्या विलक्षण, सज्जनोचित, असंख्य आणि लोकोत्तर गुणांनी, जे अन्य राजांच्यात दुर्लभ आहेत, विभूषित पाहून राजा दशरथांनी मंत्र्यांच्या बरोबर सल्ला-मसलत करून त्यांना युवराज बनविण्याचा निश्चय केला. ॥४१-४२॥
दिव्यन्तरिक्षे भूमौ च घोरमुत्पातजं भयम् ।
संचचक्षेऽथ मेधावी शरीरे चात्मनो जराम् ॥ ४३ ॥
बुद्धिमान महाराज दशरथांनी मंत्र्यांना स्वर्ग, अंतरिक्ष तथा भूतलावर दृष्टिगोचर होणार्‍या उत्पातांचे घोर भय सूचित केले आणि आपल्या शरीरात वृद्धावस्थेच्या आगमनाची ही गोष्ट सांगितली. ॥४३॥
पूर्णचन्द्राननस्याथ शोकापनुदमात्मनः ।
लोके रामस्य बुबुधे सम्प्रियत्वं महात्मनः ॥ ४४ ॥
पूर्ण चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असणारे महात्मा श्रीराम समस्त प्रजेला प्रिय होते. लोकात त्यांचे सर्वप्रिय होणे राजांच्या आपल्या आंतरिक शोकाला दूर करणारे होते ही गोष्ट राजांनी नीटपणे जाणली होती. ॥४४॥
आत्मनश्च प्रजानां च श्रेयसे च प्रियेण च ।
प्राप्ते काले स धर्मात्मा भक्त्या त्वरितवान् नृपः ॥ ४५ ॥
त्यानंतर उपयुक्त समय आल्यावर धर्मात्मा राजा दशरथांनी आपल्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी मंत्र्यांना श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी शीघ्र तयारी करण्याची आज्ञा दिली. या उतावळेपणास त्यांच्या हृदयांतील प्रेम आणि प्रजेचा अनुराग ही करण होता. ॥४५॥
नानानगरवास्तव्यान् पृथग्जानपदानपि ।
समानिनाय मेदिन्यां प्रधानान् पृथिवीपतिः ॥ ४६ ॥
त्या भूपालांनी भिन्न भिन्न नगरात निवास करणार्‍या प्रधान- प्रधान पुरूषांना तथा इतर जनपदाच्या सामंत राजांनाही मंत्र्याच्या द्वारे अयोध्येत बोलावून घेतले. ॥४६॥
तान् वेश्मनानाभरणैर्यथार्हं प्रतिपूजितान् ।
ददर्शालंकृतो राजा प्रजापतिरिव प्रजाः ॥ ४७ ॥
त्या सर्वाना राहण्यासाठी घरे देऊन नाना प्रकारच्या आभूषणांच्या द्वारे त्यांचा यथायोग्य सत्कार केला. त्यानंतर स्वतः ही अलंकृत होऊन राजा दशरथ त्या सर्वांना, प्रजापति ब्रह्मदेव ज्याप्रमाणे प्रजावर्गास भेटतात त्या प्रमाणे भेटले. ॥४७॥
न तु केकयराजानं जनकं वा नराधिपः ।
त्वरया चानयामास पश्चात्तौ श्रोष्यतः प्रियम् ॥ ४८ ॥
उतावळेपणामुळे राजा दशरथांनी केकयनरेशांना तसेच मिथिलापति जनकांना ही बोलावले नाही. (केकयनरेशा बरोबर भरत शत्रुघ्नही आले असते. या सर्वांच्या तथा राजा जनकांच्या राहाण्याने श्रीरामाच्या राज्यभिषेक संपन्न झाला असता आणि ते वनात जाऊ शकले नसते- या भयाने देवतांनी राजा दशरथांना या सर्वांना न बोलावण्याची बुद्धि दिली. ) त्यांनी विचार केला की ते दोन्ही संबंधी हा प्रिय समाचार नंतर ऐकतील. ॥४८॥
अथोपविष्टे नृपतौ तस्मिन् परपुरार्दने ।
ततः प्रविविशुः शेषा राजानो लोकसम्मताः ॥ ४९ ॥
त्यानंतर शत्रुनगरीला पीडित करणारे राजा दशरथ जेव्हा दरबारात येऊन बसले, तेव्हा (केकयराज आणि जनक सोडून) शेष सर्व लोकप्रिय नरेशांनी राजसभेत प्रवेश केला. ॥४९॥
अथ राजवितीर्णेषु विविधेष्वासनेषु च ।
राजानमेवाभिमुखा निषेदुर्नियता नृपाः ॥ ५० ॥
हे सर्व नरेश राजाद्वारा दिलेल्या नाना प्रकारच्या सिंहासनांवर त्यांच्याकडेच तोंड करून विनीतभावाने बसले होते. ॥५०॥
स लब्धमानैः विनयान्वितैर्नृपैः
     पुरालयैर्जानपदैश्च मानवैः ।
उपोपविष्टैर्नृपतिर्वृतो बभौ
     सहस्रचक्षुर्भगवानिवामरैः ॥ ५१ ॥
राजाकडून सन्मानित होऊन विनीतभावाने त्यांच्या आसपास बसलेल्या सामंत नरेशांनी आणि जनपदाचे निवासी मनुष्यांनी घेरलेले महाराज दशरथ त्यासमयी देवतांमध्ये विराजमान झालेल्या सहस्त्र नेत्रधारी भगवान इंद्राप्रमाणे शोभून दिसत होते. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP