[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षष्ठः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
ससीतस्य श्रीरामस्य नियमपरायणता संहृष्टैः पुरजनैर्नगरस्यालंकरणं राजानं प्रति कृतज्ञता प्रकटनं च पुर्य्यां जानपदजनानां समुदायस्यैकत्रसमवायः - सीतेसहित रामाचे नियमपरायण होणे, हर्षांनी भरलेल्या पुरवासींच्या द्वारे नगराची सजावट, राजाच्या प्रति कृतज्ञता प्रकट करणे तथा अयोध्यापुरीत जनपदवासी माणसांची अत्यंत गर्दी होणे -
गते पुरोहिते रामः स्नातो नियतमानसः ।
सह पत्‍न्या विशालाक्ष्या नारायणमुपागमत् ॥ १ ॥
पुरोहित निघून गेल्यावर मनाला संयमित राखणार्‍या रामाने स्नान करून आपली विशाल लोचना पत्‍नी सीता हिच्या बरोबर श्रीनारायणाची उपासना करण्यास आरंभ केला. ॥१॥
(असे मानले जाते कि येथे नारायण शब्दांनी श्रीरङ्‌‍गनाथाची ती अर्चामूर्ति अभिप्रत आहे, की जी पूर्वजांच्या समयापासूनच दीर्घकाळ पर्यंत अयोध्येत उपास्य देवतेच्या रुपात राहिली होती. नंतर श्रीरामांनी ती मूर्ति विभिषणास दिली होती ज्यायोगे ती वर्तमान श्रीरङ्‌‍गक्षेत्रात पोहोचली. याची विस्तृत कथा पद्मपुराणात आहे. )
प्रगृह्य शिरसा पात्रीं हविषो विधिवत् ततः ।
महते दैवतायाज्यं जुहाव ज्वलितानले ॥ २ ॥
त्यांनी हविष्य पात्राला मस्तक नमवून नमस्कार केला आणि प्रज्वलित अग्निमघ्ये महान देवते (शेषशायी नारायणा) च्या प्रसन्नतेसाठी विधिपूर्वक त्या हविष्याची आहुति दिली. ॥२॥
शेषं च हविषस्तस्य प्राश्याशास्यात्मनः प्रियम् ।
ध्यायन्नारायणं देवं स्वास्तीर्णे कुशसंस्तरे ॥ ३ ॥

वाग्यतः सह वैदेह्या भूत्वा नियतमानसः ।
श्रीमत्यायतने विष्णोः शिश्ये नरवरात्मजः ॥ ४ ॥
तत्पश्चात आपल्या प्रिय मनोरथाच्या सिद्धीचा संकल्प मनांत धरून त्यांनी यज्ञशेष हविष्याचे भक्षण केले आणि मनाला संयमात ठेवून मौन राखून राजकुमार श्रीराम वैदेही सह भगवान विष्णुच्या सुंदर मंदिरात श्रीनारायण देवाचे ध्यान करीत तेथे उत्तम प्रकारे पसरलेल्या कुशाच्या चटईवर झोपी गेले. ॥३-४॥
एकयामावशिष्टायां रात्र्यां प्रतिविबुध्य सः ।
अलङ्‌‍कारविधिं सम्यक् कारयामास वेश्मनः ॥ ५ ॥
ज्यावेळी तीन प्रहर उलटून जाऊन एकच प्रहर रात्र शेष राहिली होती तेव्हा झोपलेले राम उठून बसले. त्या समयी त्यांनी सभामण्डपास सजविण्याची सेवकांना आज्ञा दिली. ॥५॥
तत्र शृण्वन् सुखा वाचः सूतमागधवन्दिनाम् ।
पूर्वां संध्यामुपासीनो जजाप सुससमाहितः ॥ ६ ॥
तेथे सूत मागध आणि बंदीजनांची श्रवण सुखद वाणी ऐकत श्रीरामांनी प्रातःकालीन संध्योपासना केली. नंतर एकाग्रचित्त होऊन ते जप करु लागले. ॥६॥
तुष्टाव प्रणतश्चैव शिरसा मधुसूदनम् ।
विमलक्षौमसंवीतो वाचयामास च द्विजान् ॥ ७ ॥
त्यानंतर रेशमी वस्त्र धारण केले. रामानी मस्तक नमवून भगवान मधुसूदनाला प्रणाम करून त्याचे स्तवन केले. त्यानंतर ब्राह्मणांच्या कडून स्वस्तिवाचन करविले. ॥७॥
तेषां पुण्याहघोषोऽथ गम्भीरमधुरस्तथा ।
अयोध्यां पूरयामास तूर्यघोषानुनादितः ॥ ८ ॥
त्या ब्राह्मणांचा पुण्याहवाचन संबंधी गंभीर एवं मधुर घोष, नाना प्रकारच्या वाद्यांच्या ध्वनिने व्याप्त होऊन सार्‍या अयोध्यापुरी मध्ये पसरला. ॥८॥
कृतोपवासं तु तदा वैदेह्या सह राघवम् ।
अयोध्यानिलयः श्रुत्वा सर्वः प्रमुदितो जनः ॥ ९ ॥
त्या समयी अयोध्यावासी लोकांनी जेव्हा ऐकले की राघवाने सीतेसह उपवास- व्रताचा आरंभ केला आहे तेव्हा सर्वांना फार प्रसन्नता वाटली. ॥९॥
ततः पौरजनः सर्वः श्रुत्वा रामाभिषेचनम् ।
प्रभातां रजनीं दृष्ट्‍वा चक्रे शोभयितुं पुरीम् ॥ १० ॥
प्रभात होताच रामाच्या अभिषेकाचा समाचार ऐकून समस्त पुरवासी अयोध्यापुरी सजविण्यास दंग झाले. ॥१०॥
सिताभ्रशिखराभेषु देवतायतनेषु च ।
चतुष्पथेषु रथ्यासु चैत्येष्वट्टालकेषु च ॥ ११ ॥

नानापण्यसमृद्धेषु वणिजामापणेषु च ।
कुटुम्बिनां समृद्धेषु श्रीमत्सु भवनेषु च ॥ १२ ॥

सभासु चैव सर्वासु वृक्षेष्वालक्षितेषु च ।
ध्वजाः समुच्छ्रिता साधु पताकाश्चाभवंस्तथा ॥ १३ ॥
ज्यांच्या शिखरांवर श्वेत ढग विश्राम करतात त्या पर्वतासमान गगनचुंबी देवमंदिरे, चौक, गल्ल्या, देववृक्ष, समस्त सभा, अट्टालिका (गच्च्या), नाना प्रकारच्या विकावयाच्या वस्तुंनी भरलेली व्यापार्‍यांची मोठी मोठी दुकाने तथा कुटुंबी गृहस्थांची सुंदर समृद्धशाली भवने, आणि दूरून दिसून येणारे वृक्षांवरही उंच ध्वजा उभारलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये पताका फडकत होत्या. ॥११-१३॥
नटनर्तकसङ्‌‍घानां गायकानां च गायताम् ।
मनःकर्णसुखा वाचः शुश्राव जनता ततः ॥ १४ ॥
त्या समयी तेथील जनता सर्व बाजूनी नटी आणि नर्तकांच्या समूहांची तथा गाणार्‍या गायकांची मन आणि कानाला सुख देणारी वाणी ऐकत होती. ॥१४॥
रामाभिषेकयुक्ताश्च कथाश्चक्रुर्मिथो जनाः ।
रामाभिषेके सम्प्राप्ते चत्वरेषु गृहेषु च ॥ १५ ॥
रामाच्या राज्याभिषेकाचा शुभ अवसर प्राप्त झाल्यावर प्रायः सर्व लोक चौंकातून आणि घरामध्येही आपसात श्रीरामाच्या राज्याभिषेकाची चर्चा करत होते. ॥१५॥
बाला अपि क्रीडमाना गृहद्वारेषु सङ्‌‍घशः ।
रामाभिषेकसंयुक्ताश्चक्रुरेव कथाः मिथः ॥ १६ ॥
घराच्या द्वारांजवळ खेळणार्‍या बालकांच्या झुंडीच्या झुंडी आपसात रामाच्या राज्याभिशेकाच्याच गोष्टी करत होत्या. ॥१६॥
कृतपुष्पोपहारश्च धूपगन्धाधिवासितः ।
राजमार्गः कृतः श्रीमान् पौरै रामाभिषेचने ॥ १७ ॥
पुरवासी लोकांनी रामाच्या राज्याभिषेकाच्या समयी राजमार्गावर फुलांची भेट चढवून तेथे सर्व बाजूस धूपाचा सुगंध पसरवून दिला होता, असे करून त्यांनी राजमार्गाला फार सुंदर बनविले होते. ॥१७॥
प्रकाशकरणार्थं च निशागमनशङ्‌‍कया ।
दीपवृक्षांस्तथा चक्रुरनुरथ्यासु सर्वशः ॥ १८ ॥
राज्याभिषेक होता होता रात्र होऊन जाईल या आशंकेने प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी पुरवासी लोकांनी सर्व बाजूस रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षाप्रमाणे अनेक शाखांनी युक्त दीप स्तंभ उभे केले होते. ॥१८॥
अलंकारं पुरस्यैवं कृत्वा तत् पुरवासिनः ।
आकाङ्‌क्षमाणा रामस्य यौवराज्याभिषेचनम् ॥ १९ ॥

समेत्य सङ्‌‍घशः सर्वे चत्वरेषु सभासु च ।
कथयन्तो मिथस्तत्र प्रशशंसुर्जनाधिपम् ॥ २० ॥
याप्रकारे नगरास सजवून रामाच्या यौवराज्याभिषेकाची अभिलाषा बाळगणारे समस्त पुरवासी चौकातून आणि सभांमध्ये झुंडीच्या झुंडीने एकत्र येऊन तेथे परस्परात गप्पागोष्टी करीत महाराज दशरथांची प्रशंसा करु लागले. ॥१९-२०॥
अहो महात्मा राजायमिक्ष्वाकुकुलनन्दनः ।
ज्ञात्वा वृद्धं स्वमात्मानं रामं राज्येऽभिषेक्ष्यति ॥ २१ ॥
'अहो ! इक्ष्वाकुकुलाला आनंदित करणारे हे राजा दशरथ मोठे महात्मा आहेत कारण की आपण स्वतः वृद्ध झालो आहो हे जाणून रामाला राज्याभिषेक करीत आहेत. ॥२१॥
सर्वे ह्यनुगृहीताः स्म यन्नो रामो महीपतिः ।
चिराय भविता गोप्ता दृष्टलोकपरावरः ॥ २२ ॥
भगवंताचा हा आम्हा लोकावर मोठाच अनुग्रह आहे की राम आमचे राजे होणार आहेत. आणि चिरकालपर्यंत आमचे रक्षण करीत राहातील कारण की या समस्त लोकांतील निवासी लोकात जो चांगुलपणा अथवा वाईटपणा आहे तो ते उत्तम प्रकारे पाहून चुकले आहेत. ॥२२॥
अनुद्धतमना विद्वान् धर्मात्मा भ्रातृवत्सलः ।
यथा च भ्रातृषु स्निग्धस्तथास्मास्वपि राघवः ॥ २३ ॥
राघवाचे मन कधी उद्धत होत नाही. ते विद्वान, धर्मात्मा आणि आपल्या भावांवर स्नेह ठेवणारे आहेत. त्यांचा त्यांच्या भावांवर जसा स्नेह आहे तसाच तो आमच्यावर आहे. ॥२३॥
चिरं जीवतु धर्मात्मा राजा दशरथोऽनघः ।
यत्प्रसादेनाभिषिक्तं रामं द्रक्ष्यामहे वयम् ॥ २४ ॥
'धर्मात्मा आणि निष्पाप राजा दशरथ चिरकालपर्यत जीवित (जिवंत) राहोत; ज्यांच्या प्रसादानेच आम्हांला अभिषिक्त रामांचे दर्शन सुलभ होणार आहे'. ॥२४॥
एवंविधं कथयतां पौराणां शुश्रुवुः परे ।
दिग्भ्यो विश्रुतवृत्तान्ताः प्राप्ता जानपदा जनाः ॥ २५ ॥
अभिषेकाचा वृत्तांत ऐकून नाना दिशांकडून त्या त्या जनपदाचे लोकही तेथे येऊन पोहोचले. त्यांनी उपर्युक्त गोष्टी करणार्‍या पुरवासी लोकांची सर्व चर्चा ऐकली. ॥२५॥
ते तु दिग्भ्यः पुरीं प्राप्ता द्रष्टुं रामाभिषेचनम् ।
रामस्य पूरयामासुः पुरीं जानपदा जनाः ॥ २६ ॥
ते सर्वच्या सर्व रामाचा अभिषेक पाहण्यासाठी अनेक दिशांतून अयोध्यापुरीत आले होते. त्या जनपद निवासी मनुष्यांनी श्रीरामपुरीला आपल्या उपस्थितीने भरून टाकले होते. ॥२६॥
जनौघैस्तैर्विसर्पद्‌भिः शुश्रुवे तत्र निःस्वनः ।
पर्वसूदीर्णवेगस्य सागरस्येव निःस्वनः ॥ २७ ॥
तेथे मनुष्यांची गर्दी अत्यंत वाढल्याने जो जनरव (लोकांचा कोलाहल) ऐकू येत होता तो पर्वकाळी वाढलेल्या वेगवान महासागराच्या गर्जने प्रमाणे वाटत होता. ॥२७॥
ततस्तदिन्द्रक्षयसन्निभं पुरं
     दिदृक्षुभिर्जानपदैरुपाहितैः ।
समन्ततः सस्वनमाकुलं बभौ
     समुद्रयादोभिरिवार्णवोदकम् ॥ २८ ॥
त्यावेळी रामाच्या अभिषेकाचा उत्सव पाहण्यासाठी आलेल्या जनपदवासी मनुष्यांच्या द्वारा सर्व बाजूने व्याप्त झालेले ते इंद्रपुरी समान नगर अत्यंत कोलाहल पूर्ण झाल्यामुळे मकर, नक्र, तिमिङ्‌‍गल आदि विशाल जल-जंतूनी परिपूर्ण महासागरा प्रमाणे प्रतीत होत होते. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP