॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ तृतीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



तारेचा विलाप, श्रीरामचंद्रांनी तिची समजूत काढणे आणि सुग्रीवाला राजपदाची प्राप्ती -


निहते वालिनि रणे रामेण परमात्मना ।
दुद्रुवुर्वानराः सर्वे किष्किन्धां भयविह्वलाः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, परमात्म्या श्रीरामांनी युद्धात वालीला ठार मारल्यावर, सर्व वानर भयाने विव्हळ होऊन किष्किंधा नगरीत पळून गेले. (१)

तारामूचुर्महाभागे हतो वाली रणाजिरे ।
अङ्‌गदं परिरक्षाद्य मन्‍त्रिणः परिणोदय ॥ २ ॥
ते तारेला म्हणाले, "हे महाभागे, रणांगणात वाली मारला गेला आहे. आता तू अंगदाचे रक्षण कर, आणि सर्व मंत्र्यांना सावधगिरीची सूचना दे. (२)

चतुर्द्वारकपाटादीन् बद्‍ध्वा रक्षामहे पुरीम् ।
वानराणां तु राजानं अङ्‌गदं कुरु भामिनि ॥ ३ ॥
हे भामिनी, आपल्या नगरीच्या चारही द्वारांची कवाडे बंद करून आम्ही नगरीचे रक्षण करू. तू अंगदाला वानरांचा राजा कर." (३)

निहतं वालिनं श्रुत्वा तारा शोकविमूर्छिता ।
अताडयत्स्वपाणिभ्यां शिरो वक्षश्च भूरिशः ॥ ४ ॥
वाली मेला हे ऐकताच तारा शोकाने मूर्छित झाली. आणि ती आपल्या हातांनी आपले मस्तक आणि छाती वारंवार बडवून घेऊ लागली. (४)

किमङ्‌गदेन राज्येन नगरेण धनेन वा ।
इदानीमेव निधनं यास्यामि पतिना सह ॥ ५ ॥
ती म्हणू लागली. 'आता मला अंगद, राज्य, नगर अथवा धन यांचा काय उपयोग ? मी आता पतीचे बरोबरच सहगमन करून मरून जाते.' (५)

इत्युक्‍त्वा त्वरिता तत्र रुदती मुक्तमूर्धजा ।
ययौ तारातिशोकार्ता यत्र भर्तृकलेवरम् ॥ ६ ॥
असे बोलून रडणारी, केस मोकळे सोडलेली, आणि अतिशय शोकाने आर्त झालेली तारा पतीच्या शवाजवळ तत्काळ गेली. (६)

पतितं वालिनं दृष्ट्‍वा रक्तैः पांसुभिरावृतम् ।
रदती नथनाथेति पतिता तस्य पादयोः ॥ ७ ॥
रक्त आणि धूळ यांनी माखलेल्या आणि मृत होऊन पडलेल्या वालीला पाहून, 'हे नाथा ! हे नाथा !' असा आक्रोश करीत ती त्याच्या पायांवर पडली. (७)

करुणं विलपन्ती सा ददर्श रघुनन्दनम् ।
राम मां जहि बाणेन येन वाली हतस्त्वया ॥ ८ ॥
करुण स्वरात विलाप करताना तिला रघुनंदन दिसले. ती म्हणाली, "हे रामा, ज्या बाणाने तुम्ही वालीला ठार केलेत त्याच बाणाने तुम्ही मलाही ठार मारून टाका. (८)

गच्छामि पतिसालोक्यं पतिर्मामभिकाङ्‌क्षते ।
स्वर्गेऽपि न सुखं तस्य मां विना रघुनन्दन ॥ ९ ॥
म्हणजे मी पतीच्याच लोकात जाईन. माझे पती माझी वाट पाहात असतील. हे रघुनंदना, माझ्याशिवाय त्यांना स्वर्गातसुद्धा सुख लाभणार नाही. (९)

पत्‍निवियोगजं दुःखं अनुभूतं त्वयानघ ।
वालिने मां प्रयच्छाशु पत्‍नीदानफलं भवेत् ॥ १० ॥
हे पुण्यशील रामा, पत्‍नीच्या वियोगाने होणारे दुःख तुम्ही अनुभवले आहेच. तुम्ही मला वालींकडे पाठवा. त्यामुळे त्याला पुन्हा पत्‍नी प्राप्त करून दिल्याचे फळतुम्हाला मिळेल. (१०)

सुग्रीवं त्वं सुखं राज्यं दापितं वालिघातिना ।
रामेण रुमया सार्धं भुङ्‌क्ष्व सापत्‍नवर्जितम् ॥ ११ ॥
हे सुग्रीवा, वालीचा वध करणार्‍या श्रीरामांनी तुला राज्य दिलेच आहे. तेव्हा ते शत्रुरहित राज्य तू रुमा या तुझ्या पत्‍नीसह सुखाने भोग." (११)

इत्येवं विलपन्तीं तां तारां रामो महामनाः ।
सान्त्वयामास दयया तत्त्वज्ञानोपदेशतः ॥ १२ ॥
अशा प्रकारे विलाप करणार्‍या त्या तारेला महामना श्रीरामांनी दयापूर्वक तत्त्वज्ञानाचा उपदेश करून, तिचे सांत्वन केले. (१२)

किं भीरु शोच्यसि व्यर्थं शोकस्याविषयं पतिम् ।
पतिस्तवायं देहो वा जीवो वा वद तत्त्वतः ॥ १३ ॥
श्रीराम म्हणाले, "हे तारे, शोक करण्यास पात्र नसणार्‍या तुझ्या पतीबद्दल तू का बरे व्यर्थ शोक करीत आहेस ? हा तुझा पती म्हणजे त्याचा देह की जीव हे तू मला तत्त्वतःसांग. (१३)

पङ्चात्मको जडो देहः त्वङ्‌मांसरुधिरास्थिमान् ।
कालकर्मगुणोत्पन्नः सोऽप्यास्तेऽद्यापि ते पुरः ॥ १४ ॥
(जर हा दे ह तुझा पती असेल तर बघ.) पंचमहाभूतांनी बनलेला हा अचेतन देह त्वचा, मांस, रक्त व हाडे यांनी युक्त आहे. तो देह काल, कर्म, आणि गुण यांच्यामुळे उत्पन्न झालेला आहे. आणि तोच हा देह आतासुद्धा तुझ्यासमोर पडलेला आहे. (१४)

मन्यसे जीवमात्मानं जीवस्तर्हि निरायमः ।
न जायते न म्रियते न तिष्ठति न गच्छति ॥ १५ ॥
आता जर जीवात्मा म्हणजे तुझा पती असे तुला वाटत असेल, तर लक्षात घे की जीव हा निरामय (= रोग रहित, विकाररहित) आहे, तो जन्माला येत नाही, मरत नाही, उभा राहात नाही आणि कुठे जात-येत नाही. (१५)

न स्त्री पुमान्वा षण्ढो वा जीवः सर्वगतोऽव्ययः ।
एक एवाद्वितीयोऽयं आकाशवदलेपकः ।
नित्यो ज्ञानमयः शुद्धः स कथं शोकमर्हति ॥ १६ ॥
जीव हा स्त्री अथवा पुरुष किंवा नपुंसक नाही. तो सर्वव्यापक आणि अव्यय आहे. तो एकमेव, अद्वितीय असून तो आकाशाप्रमाणे लेपरहित आहे; तो नित्य, ज्ञानस्वरूप आणि शुद्ध आहे. अशा जीवाबद्दल शोक करणे हे कसे बरे योग्य होईल ? " (१६)

तारोवाच
देहोऽचित्काष्ठवद्‍राम जीवो नित्यश्चिदात्मकः ।
सुखदुःखादिसम्बन्धः कस्य स्याद्‍राम मे वद ॥ १७ ॥
तारा म्हणाली- "हे रामा, देह हा काष्ठाप्रमाणे अचेतन आहे आणि चैतन्यस्वरूप असणारा जीव हा नित्य आहे. मग हेश्रीरामा, मला सांगा की सुख-दुःख इत्यादींचा संबंध कुणाशी येतो ? " (१७)

श्रीराम उवाच
अहङ्‌कारादिसम्बन्धो यावद्देहेन्द्रियैः सह ।
संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्त्वविवेकिनः ॥ १८ ॥
राम म्हणाले -"जोपर्यंत अविवेकी जीवांचा देह व इंद्रिये यांच्या ठायी मी, माझे इत्यादी संबंध असतो तोपर्यंतच त्याला संसार असतो. (१८)

मिथ्यारोपितसंसारो न स्वयं विनिवर्तते ।
विषयान्ध्यायमानस्य स्वप्ने मिथ्यागमो यथा ॥ १९ ॥
ज्या प्रमाणे विषयांचे चिंतन करणार्‍या माणसाला स्वप्नात मिथ्या पदार्थ उत्पन्न झालेले दिसतात, त्या प्रमाणे आत्म्यावर आरोपित केलेला मिथ्या संसार ज्ञानाविना आपोआप निवृत्त होत नाही. (१९)

अनाद्यविद्यासम्बन्धात् तत्कार्याहङ्‌कृतेस्तथा ।
संसारोऽपार्थकोऽपि स्यात् रागद्वेषादिसङ्‌कुलः ॥ २० ॥
अनादी अविवेशी संबंध आल्यामुळे तसेच त्या अविद्येच्या अहंकार या कार्याशी संबंध आल्यामुळे जरी हा संसार सत्य नसला तरी तो राग, द्वेष इत्यादींनी भरलेला अरातो. (२०)

मन एव हि संसारो बन्धश्चैव मनः शुभे ।
आत्मा मनः समानत्वं एत्य तद्‍गतबंधभाक् ॥ २१ ॥
हे कल्याणी, मन हेच संसार आहे आणि मन हाच बंध आहे. अनात्म वस्तू असलेल्या मनाबरोबर एकाकार झाल्यामुळे (अन्योन्याध्यास) आत्मा हा मनातील सुखदुःखाच्या बंधनात पडतो. (२१)

यथा विशुद्धः स्फटिको अलक्तकादिसमीपगः ।
तत्तद्वर्णयुगाभाति वस्तुतो नास्ति रञ्जनम् ॥ २२ ॥
बुद्धीन्द्रियादिसामीप्यात् आत्मनः संसृतिर्बलात् ।
आत्मा स्वलिङ्‌गं तु मन परिगृह्य तदुद्‌भवान् ॥ २३ ॥
कामान् जुषन् गुणैर्बद्धः संसारे वर्ततेऽवशः ।
आदौ मनोगुणान् सृष्ट्‍वा ततः कर्माण्यनेकधा ॥ २४ ॥
शुक्ललोहितकृष्णानि गतयस्तत्समानतः ।
एवं कर्मवशाज्जिवो भ्रमत्याभूतसम्प्लवम् ॥ २५ ॥
ज्या प्रमाणे शुद्ध स्फटिक मणी हा लाख इत्यादींच्या समीप आला असताना तो त्या रंगाचा आहे असे भासते; परंतु खरे तर त्या स्फटिकात ते रंग नसतात, त्या प्रमाणे बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सान्निध्यामुळे आत्म्याला बळजबरीने संसार येतो; स्वतःला ओळखण्याची खूण असणार्‍या मनाचा स्वीकार करून, त्या मनामुळे प्राप्त होणार्‍या विषयांचे सेवन करीत आत्मा हा राग, द्वेष इत्यादी गुणांनी बद्ध होतो आणि मग तो असहायपणे संसारात अडकून राहातो. प्रथम मन हे राग इत्यादी गुण निर्माण करते. मग ते नाना प्रकारची कर्मे उत्पन्न करते. जीव हा मनाबरोबर त्या गुणांमध्ये संचार करतो आणि नंतर त्यांच्या संबंधांमुळे तो नाना प्रकारची कर्मे करतो. ती कर्मे शुक्ल म्हणजे जप, ध्यान इत्यादी उत्तम, लोहित म्हणजे काम्य कर्मे इत्यादी मध्यम आणि कृष्ण म्हणजे आभिचारिक कर्मे इत्यादी कनिष्ठ अशी तीन प्रकारची असतात. त्या कर्मांनुसार जीवाला उत्तम, मध्यम, अधम अशा गती प्राप्त होतात. अशा प्रकारे कर्मांना वश होऊन जीव हा प्रलयकालापर्यंत जन्ममरणरूपी संसारात भ्रमण करीत राहातो. (२२-२५)

सर्वोपसंहृतौ जीवो वासनाभिः स्वकर्मभिः ।
अनाद्यविद्यावशगः तिष्ठत्यभिनिवेशतः ॥ २६ ॥
प्रलयाच्यावेळी सर्वांचा लय झाला असतानासुद्धा स्वतःमध्ये कर्ता-भोक्तारूप अभिनिवेशामुळे हा जीव आपल्या वासना आणि कर्मे यांच्यासह अनादी अविद्येच्या ताब्यात राहातो. मुक्त होत नाही. (२६)

सृष्टिकाले पुनः पूर्व वासनामानसैः सह ।
जायते पुनरप्येवं घटीयन्त्रमिवावशः ॥ २७ ॥
नंतर पुनः जेव्हा नवीन सृष्टीचा प्रारंभ होतो, तेव्हा हा जीव असहायपणे आपल्या पूर्वीच्या वासना आणि मन यांचेसह रहाटगाडग्याप्रमाणे पुनरपि जन्माला येतो. (२७)

यदा पुण्यविशेषेण लभते सङ्‌गतिं सताम् ।
मद्‌भक्तानां सुशान्तानां तदा मद्विषया मतिः ॥ २८ ॥
नंतर ज्या वेळी एखाद्या तरी विशेष पुण्याईमुळे त्याला सज्जनांची तसेच अतिशय शांत चित्त असणार्‍या माझ्या भक्तांची संगती लाभते, तेव्हा त्याची बुद्धी माझ्या ठिकाणी जडते. (२८)

मत्कथाश्रवणे श्रद्धा दुर्लभा जायते ततः ।
ततः स्वरूपविज्ञानं अनायासेन जायते ॥ २९ ॥
त्यानंतर माझ्या कथा ऐकण्याच्या बाबतीत त्याच्या ठिकाणी दुर्लभ अशी श्रद्धा उत्पन्न होते. त्यामुळे माझ्या स्वरूपाचे ज्ञान त्याच्या ठायी विनासायास निर्माण होते. (२९)

तदाचार्यप्रसादेन वाक्यार्थज्ञानतः क्षणात् ।
देहेन्द्रियमनः प्राण अहङ्‌कृतिभ्यः पृथक्स्थितम् ॥ ३० ॥
स्वात्मानुभवतः सत्यं आनन्दात्मानमद्वयम् ।
ज्ञात्वा सद्यो भवेन्मुक्तः सत्यमेव मयोदितम् ॥ ३१ ॥
त्या वेळी गुरूंच्या कृपेने आणि 'तत्त्वमसि' इत्यादी महावाक्यांच्या अर्थाच्या ज्ञानाने, तसेच स्वतःच्या अनुभवामुळे, आपला आत्मा हा देह, इंद्रिये, मन, प्राण व अहंकार यांच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे, तसेच तो आत्मा हा सत्य आणि आनंदस्वरूप तसेच अद्‌वितीय आहे असे जाणून, तो जीव एका क्षणात तत्काळ मुक्त होऊन जातो. हे सत्यच मी तुला सांगितले आहे. (३०-३१)

एवं मयोदितं सम्यक् आलोचयति योऽनिशम् ।
तस्य संसारदुःखानि न स्पृश्यन्ति कदाचन ॥ ३२ ॥
अशा प्रकारे मी सांगितलेल्या उपदेशांचा जो कोणी रात्रंदिवस योग्य विचार करतो, त्याला संसारातील दुःखे केव्हाही स्पर्श करीत नाहीत. (३२)

त्वमप्येतन्मया प्रोक्तं आलोचय विशुद्धधीः ।
न स्पृश्यसे दुःखजालैः कर्मबन्धाद्विमोक्ष्यसे ॥ ३३ ॥
तू सुद्धा मी जे सांगितले आहे, त्याचा नीट विचार कर. मग तुझी बुद्धी शुद्ध होईल आणि तुला दुःखसमूहाचा कधीही स्पर्श होणार नाही. आणि तू कर्मांच्या बंधनातून मुक्त होऊन जाशील. (३३)

पूर्वजन्मनि ते सुभ्रु कृता मद्‌भक्तिरुत्तमा ।
अतस्तव विमोक्षाय रूपं मे दर्शितं शुभे ॥ ३४ ॥
हे सुंदरी, पूर्व जन्मी तू माझी उत्तम भक्ती केली होतीस. म्हणून हे शुभे तुझ्या मोक्षासाठी मी तुला दर्शन दिले आहे. (३४)

ध्यात्वा मद्‌रूपमनिशं आलोचय मयोदितम् ।
प्रवाहपतितं कार्यं कुर्वत्यपि न लिप्यसे ॥ ३५ ॥
माझ्या रूपाचे ध्यान करीत, तू रात्रंदिवस मी जे सांगितले आहे त्याचे मनन कर. मग जीवनाच्या प्रवाहात प्राप्त होतील ती कर्मे करूनसुद्धा तू त्या कर्मांनी लिप्त होणार नाहीस." (३५)

श्रीरामेणोदितं सर्वं श्रुत्वा तारातिविस्मिता ।
देहाभिमानजं शोकं त्यक्‍त्वा नत्वा रघूत्तमम् ॥ ३६ ॥
आत्मानुभवसंतुष्टा जीवन्मुक्ता बभूव ह ।
क्षणसङ्‌गममात्रेण रामेण परमात्मना ॥ ३७ ॥
अनादिबन्धं निर्धूय मुक्ता सापि विकल्मषा ।
सुग्रीवोऽपि च तच्छ्रुत्वा रामवक्‍त्रात्समीरितम् ॥ ३८ ॥
जहावज्ञानमखिलं स्वस्थचित्तोऽभवत्तदा ।
ततः सुग्रीवमादेहं रामो वानरपुङ्‌गवम् ॥ ३९ ॥
श्रीरामांनी सांगितलेले सर्व काही ऐकून तारा अतिशय विस्मयचकित झाली. देहावरील अभिमानामुळे उत्पन्न होणारा शोक टाकून आणि रघूत्तमांना नमस्कार करून, आत्मानुभवाने संतुष्ट झालेली तारा जीवन्मुक्त झाली. परमात्म्या श्रीरामांशी क्षणमात्र झालेल्या सत्संगामुळे अनादी अविद्येचे बंधन झुगारून देऊन, तारासुद्धा निष्पाप आणि मुक्त झाली. श्रीरामांच्या मुखातून बाहेर आलेले ते वचन ऐकल्यावर संपूर्ण अज्ञान नष्ट झाल्यामुळे सुग्रीवसुद्धा स्वस्थचित्त झाला. त्यानंतर वानरश्रेष्ठ सुग्रीवाला श्रीराम म्हणाले. (३६-३९)

भ्रातुर्ज्येष्ठस्य पुत्रेण यदुक्तं साम्परायिकम् ।
कुरु सर्वं यथान्यायं संस्कारादि ममाज्ञया ॥ ४० ॥
"हे सुग्रीवा, माझ्या आज्ञेने, ज्येष्ठ भावाच्या अंगद या पुत्राकडून जे काही शास्त्रानें सांगितले असेल ते और्ध्वदेहिक अंस्कार सर्व तू विधिपूवक करवून घे." (४०)

तथेति बलिभिर्मुख्यैः वानरै परिणीय तम् ।
वालिनं पुष्पके क्षिप्त्वा सर्वराजोपचारकैः ॥ ४१ ॥
भेरीदुन्दुभिनिर्घोषैः ब्राह्मणैर्मंत्रिभिः सह ।
यूथपैर्वानरै पौरैः तारया चाङ्‌गदेन च ॥ ४२ ॥
गत्व चकार तत्सर्वं यथाशास्त्रं प्रयत्‍नतः ।
स्नात्वा जगाम रामस्य समीपं मंत्रिभिः सह ॥ ४३ ॥
'ठीक आहे' असे म्हणवून बलवान आणि मुख्य अशा वानरांना बरोबर घेऊन, राजाला उचित अशा सर्व उपचारांसह, फुलांनी बनवलेल्या पुष्पक विमानात सुग्रीवाने वालीला ठेवले. नंतर भेरी, दुंदुभी इत्यादींच्या वाद्यघोषात, ब्राह्मण व मंत्री यांचेसह तसे च वानर-सेनापती, नागरिक वानर, तारा आणि अंगद यांच्यासह जाऊन, सुग्रीवाने प्रयत्‍नपूर्वक ते सर्व और्ध्वदेहिक संस्कार यथाशास्त्र केले. तदनंतर स्नान करून, सर्व मंत्र्यांसह सुग्रीव पुनः श्रीरामांजवळ गेला. (४१-४३)

नत्वा रामस्य चरणौ सुग्रीवः प्राह हृष्टधीः ।
राज्यं प्रशाधि राजेन्द्र वानराणां समृद्धिमत् ॥ ४४ ॥
आनंदित मनाने सुग्रीवाने रामांच्या चरणांना वंदन करून म्हटले " हे राजेंन्द्रा, वानरांच्या वै भवाने संपन्न असणार्‍या या राज्याचे प्रशासन आता तुम्ही करा. (४४)

दासोऽहं ते पादपद्मं सेवे लक्ष्मणवच्चिरम् ।
इत्युक्तो राघवः प्राह सुग्रीवं सस्मितं वचः ॥ ४५ ॥
मी तुमचा दास आहे. लक्ष्मणाप्रमाणे मीसुद्धा चिरकाळ तुमच्या पदकमळांची सेवा करीन." त्याने असे म्हटल्यावर राघव स्मित करीत सुग्रीवाला म्हणाले. (४५)

त्वमेवाहं न सन्देहः शीघ्रं गच्छ ममाज्ञया ।
पुरराज्याधिपत्ये त्वं स्वात्मानमभिषेचय ॥ ४६ ॥
" हे सुग्रीवा, तुझ्यात व माझ्यात काही अंतर नाही. तू म्हणजेच मी आहे, यात संदेह नाही. तथापि माझ्या आज्ञेने तू सत्वर जा आणि किष्किंधा नगरीच्या राज्यपदावर स्वतःलाच अभिषेक करवून घे. (४६)

नगरं न प्रवेक्ष्यामि चतुर्दश समाः सखे ।
आगमिष्यति मे भ्राता लक्ष्मणः पत्तनं तव ॥ ४७ ॥
अरे मित्रा, चौदा वर्षेपर्यंत मी कोणत्याही नगरात प्रवेश करणार नाही. म्हणून माझा भाऊ लक्ष्मण तुझ्या नगरीत येईल. (४७)

अङ्‌गदं यौवराज्ये त्वं अभिषेचय सादरम् ।
अहं समीपे शिखरे पर्वतस्य सहानुजः ॥ ४८ ॥
वत्स्यामि वर्षदिवसान् ततस्त्वं यत्‍नवान् भव ।
किञ्चित्कालं पुरे स्थित्वा सीतायां परिमार्गणे ॥ ४९ ॥
तू अंगदाला आदरपूर्वक यौवराज्याभिषेक कर. मी माझ्या धाकट्या भावासह जवळच असलेल्या पर्वताच्या शिखरावर पावसाळ्याचे दिवसांत राहीन. त्यानंतर तू काही काळ तुझ्या नगरात राहून मग सीतेचा शोध करण्याचे प्रयत्‍न सुरू कर. " (४८-४९)

साष्टाङ्‌गं प्रणिपत्याह सुग्रीवो रामपादयोः ।
यदाज्ञापयसे देव तत्तथैव करोम्यहम् ॥ ५० ॥
मग श्रीरामांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सुग्रीव म्हणाला, "हे देवा, जशी तुमची आज्ञा आहे, तसेच मी करीन." (५०)

अनुज्ञानश्च रामेण सुग्रीवस्तु सलक्ष्मणः ।
गत्वा पुरं तथा चक्रे यथा रामेण चोदितं ॥ ५१ ॥
नंतर रामांची आज्ञा मिळालेला सुग्रीव लक्ष्मणाला बरोबर घेऊन किष्किंधा नगरीत गेला आणि श्रीरामांनी त्याला आज्ञा दिली होती, ते सर्व त्याने केले. (५१)

सुग्रिवेण यथान्यायं पूजितो लक्ष्मणस्तदा ।
आगत्य राघवं शीघ्रं प्रणिपत्योपतस्थिवान् ॥ ५२ ॥
त्यानंतर सुग्रीवाकडून यथोचित आदरपूर्वक सत्कार झाल्यावर लक्ष्मण हा त्वरित राघवांकडे परत आला आणि त्यांना प्रणाम करून त्यांच्या सेवेत उपस्थित झाला. (५२)

ततो रामो जगामाशु लक्ष्मणेन समन्वितः ।
प्रवर्षणगिरेरूर्ध्वं शिखरं भूरिविस्तरम् ॥ ५३ ॥
त्यानंतर प्रभू श्रीराम लगेच लक्ष्मणाला घेऊन प्रवर्षण नावाच्या पर्वताच्या उंच आणि अतिशय विस्तृत अशा शिखरावर गेले. (५३)

तत्रैक गह्वरं दृष्ट्‍वा स्फाटिकं दीप्तिमच्छुभम् ।
वर्षवातातपसहं फलमूलसमीपगम् ।
वासाय रोचयामास तत्र रामः सलक्ष्मणः ॥ ५४ ॥
तेथे स्फटिक-मण्यांनी बनलेली, प्रकाशमान आणि स्वच्छ अशी एक गुहा त्यांनी पाहिली. पाऊस, वारा आणि ऊन यांपासून रक्षण करणारी ती गुहा होती. तिच्या जवळच फळे आणि मुळे होती. ती गुहा रामांना आवडली. आणि लक्ष्मणासह तेथे राहाण्याचे त्यांनी ठरविले. ५४.

दिव्यमूलफलपुष्पसंयुते
    मौक्तिकोपमजलौघपल्वले ।
चित्रवर्णमृगपक्षिशोभिते
    पर्वते रघुकुलोत्तमोऽवसत् ॥ ५५ ॥
दिव्य मुळे, फळे आणि फुले यांनी युक्त, मोत्याप्रमाणे स्वच्छ अशा पाण्याने भरलेल्या, अनेक सरोवरांनी संपन्न, चित्रविचित्र पशू-पक्ष्यांनी सुशोभित, अशा त्या पर्वतावर रघुकुलश्रेष्ठ श्रीराम राहू लागले. (५५)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥
इति श्रीमदध्यात्मसमायणे उमामहेश्वरसंवादे किष्किधाकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥


GO TOP