श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अष्टादश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शरणागतरक्षणस्य महत्त्वं स्वकीयं व्रतं च प्रतिपाद्य श्रीरामस्य विभीषणेन सह समागमः - भगवान्‌ श्रीरामांनी शरणागताचे रक्षण करण्याचे महत्व आणि आपले व्रत सांगून विभीषणास भेटणे -
अथ रामः प्रसन्नात्मा श्रुत्वा वायुसुतस्य ह ।
प्रत्यभाषत दुर्धर्षः श्रुतवानात्मनि स्थितम् ॥ १ ॥
वायुनंदन हनुमानाच्या मुखाने आपल्या मनात असलेलीच गोष्ट ऐकून दुर्जय वीर भगवान्‌ श्रीरामांचे चित्त प्रसन्न झाले. ते या प्रकारे बोलले- ॥१॥
ममापि तु विवक्षास्ति काचित् प्रति विभीषणम् ।
श्रोतुमिच्छामि तत् सर्वं भवद्‌भिः श्रेयसि स्थितैः ॥ २ ॥
मित्रांनो ! विभीषणाच्या संबंधात मी जे काही सांगू इच्छित आहे, आपण सर्व लोक माझ्या हित साधण्यात संलग्न राहाणारे आहात म्हणून माझी इच्छा आहे की आपण ही ते ऐकावे. ॥२॥
मित्रभावेन संप्राप्तं न त्यजेयं कथंचन ।
दोषो यद्यपि तस्य स्यात् सतामेतदगर्हितम् ॥ ३ ॥
जो मित्रभावाने माझ्याजवळ आलेला असतो, त्याला मी कुठल्याही प्रकारे त्यागू शकत नाही. संभव आहे की त्याच्या ठिकाणी काही दोषही असेल, परंतु दोषीला आश्रय देणे ही सत्पुरूषांसाठी निंदित नाही आहे. (म्हणून विभीषणाला मी अवश्य आपलासा करीन) ॥३॥
सुग्रीवस्त्वथ तद्वाक्यं आभाष्य च विमृश्य च ।
ततः शुभतरं वाक्यं उवाच हरिपुङ्‌गवः ॥ ४ ॥
वानरराज सुग्रीवांनी भगवान्‌ श्रीरामांचे ते कथन ऐकून स्वत:ही त्याचा पुनरूच्चार केला आणि त्यावर विचार करून ही परम सुंदर गोष्ट सांगितली. ॥४॥
सुदुष्टो वाप्यदुष्टो वा किमेष रजनीचरः।
ईदृशं व्यसनं प्राप्तं भ्रातरं यः परित्यजेत् ॥ ५ ॥

को नाम स भवेत् तस्य यमेष न परित्यजेत् ।
प्रभो ! हा दुष्ट असो वा अदुष्ट याच्याशी काय करायचे आहे ? आहे तर हा निशाचरच. मग जो पुरूष अशा संकटात पडलेल्या आपल्या भावाला सोडू शकतो, त्याचा दुसरा असा कोण संबंधी असेल की ज्याचा तो त्याग करू शकणार नाही. ॥५ १/२॥
वानराधिपतेर्वाक्यं श्रुत्वा सर्वानुदीक्ष्य तु ॥ ६ ॥

ईषदुत्स्मयमानस्तु लक्ष्मणं पुण्यलक्षणम् ।
इति होवाच काकुत्स्थो वाक्यं सत्यपराक्रमः ॥ ७ ॥
वानरराज सुग्रीवाची ही गोष्ट ऐकून सत्यपराक्रमी श्रीराम सर्वांकडे पाहून थोडेसे हसले आणि पवित्र लक्षणे असलेल्या लक्ष्मणांना याप्रकारे बोलले- ॥६-७॥
अनधीत्य च शास्त्राणि वृद्धाननुपसेव्य च ।
न शक्यमीदृशं वक्तुं यदुवाच हरीश्वरः ॥ ८ ॥
सौमित्र ! यासमयी वानरराजाने जशी गोष्ट सांगितली आहे तशी कोणीही पुरूष शास्त्रांचे अध्ययन आणि गुरूजनांची सेवा केल्याखेरिज सांगू शकणार नाही. ॥८॥
अस्ति सूक्ष्मतरं किञ्चिद् यथात्र प्रतिभाति मा ।
प्रत्यक्षं लौकिकं वापि विद्यते सर्वराजसु ॥ ९ ॥
परंतु सुग्रीवा ! तुम्ही विभीषणाच्या ठिकाणी जो भावाचा परित्यागरूप दोषाची उद्‍भावना केली आहे, या विषयी मला एका अशा अत्यंत सूक्ष्म अर्थाची प्रतीती येत आहे, जी समस्त राजांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिली गेली आहे आणि सर्व लोकात प्रसिद्ध आहे. (मी तीच तुम्हा सर्व लोकांना सांगू इच्छित आहे.) ॥९॥
अमित्रास्तत्कुलीनाश्च प्रातिदेश्याश्च कीर्तिताः ।
व्यसनेषु प्रहर्तारः तस्मादयमिहागतः ॥ १० ॥
राजांची छिद्रे दोन प्रकारची सांगितली गेली आहेत - एक तर त्याच कुळात उत्पन्न झालेले जाति-बांधव आणि दुसरे शेजारील देशाचे निवासी. हे संकटात पडल्यावर आपला विरोधी राजा अथवा राजपुत्र यांच्यावर प्रहार करून बसतात. याच भयाने हा विभीषण येथे आला आहे. (यालाही आपल्या जातिबांधवापासून भय आहे.) ॥१०॥
अपापास्तत्कुलीनाश्च मानयन्ति स्वकान् हितान् ।
एष प्रायो नरेन्द्राणां शङ्‌कनीयस्तु शोभनः ॥ ११ ॥
ज्याच्या मनात पाप नाही आहे, अशा एका कुळात उत्पन्न झालेले बंधु-बांधव आपल्या कुटुंबीजनांना हितैषी मानतात. परंतु हाच सजातीय बंधु चांगला असूनही प्राय: राजांच्या साठी शंकनीय होत असतो. (रावणही विभीषणाला शंकेच्या दृष्टीने पाहू लागला आहे म्हणून याचे आपल्या रक्षणासाठी येथे येणे अनुचित नाही आहे. ) म्हणून तुम्ही त्याच्यावर भावाच्या त्यागाचा दोष ठेवता कामा नये. ॥११॥
यस्तु दोषस्त्वया प्रोक्तो ह्यादानेऽरिबलस्य च ।
तत्र ते कीर्तयिष्यामि यथाशास्त्रमिदं शृणु ॥ १२ ॥
तुम्ही शत्रुपक्षीय सैनिकाला आपला म्हणण्यामध्ये जो हा दोष सांगितला आहे की तो अवसर पाहून प्रहार करून बसतो, त्याच्या विषयी मी तुम्हांला हे नीतिशास्त्रास अनुकूल उत्तर देत आहे, ऐका. ॥१२॥
न वयं तत्कुलीनाश्च राज्यकाङ्‌क्षी च राक्षसः ।
पण्डिता हि भविष्यन्ति तस्माद् ग्राह्यो विभीषणः ॥ १३ ॥
आम्ही लोक त्याचे कुटुंबी तर नाही म्हणून आमच्यापासून याला स्वार्थहानिची आशंका नाही. आणि हा राक्षस राज्य प्राप्त करण्याचा अभिलाषी आहे. (म्हणून ही हा आपला त्याग करू शकत नाही) या राक्षसांमध्ये बरेचसे लोक मोठे विद्वानही असतात (म्हणून ते मित्र झाले असता मोठ्‍या कामाचे सिद्ध होतील) म्हणून विभीषणाला आपल्या पक्षात सामील करून घेतले पाहिजे. ॥१३॥
अव्यग्राश्च प्रहृष्टाश्च ते भविष्यन्ति संगताः ।
प्रणादश्च महानेषः अन्योऽस्य भयमागतम् ।
इति भेदं गमिष्यन्ति तस्माद् ग्राह्यो विभीषणः ॥ १४ ॥
आम्हाला सामील झाल्यावर हे विभीषण आदि निश्चिंत आणि प्रसन्न होऊन जातील यांची जी ही शरणागतिसाठी प्रबल प्रार्थना आहे यावरून कळून येत आहे की राक्षसांमध्ये एक दुसर्‍यापासून भय उत्पन्न झालेले आहे. या कारणांमुळे त्यांच्यात परस्परांत फूट पडेल आणि हे नष्ट होऊन जातील. म्हणूनही विभीषणास ग्रहण केले पाहिजे. ॥१४॥
न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः ॥ १५ ॥
तात्‌ सुग्रीव ! संसारात सर्व भाऊ भरतासमान नसतात. वडिलांचे सर्व मुलगे माझ्याच सारखे असत नाहीत आणि सर्व मित्र तुमच्याच सारखे असत नाहीत. ॥१५॥
एवमुक्तस्तु रामेण सुग्रीवः सहलक्ष्मणः ।
उत्थायेदं महाप्राज्ञः प्रणतो वाक्यमब्रवीत् ॥ १६ ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर महाबुद्धिमान्‌ सुग्रीवाने उठून लक्ष्मणासहित त्यांना प्रणाम केला आणि याप्रकारे म्हटले- ॥१६॥
रावणेन प्रणिहितं तमवेहि निशाचरम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये क्षमं क्षमवतां वर ॥ १७ ॥
उचित कार्य करणारांमध्ये श्रेष्ठ रघुनंदना ! आपण त्या राक्षसाला रावणाने धाडलेलाच समजावे. मी तर त्याला कैद करून ठेवणेच ठीक समजतो. ॥१७॥
राक्षसो जिह्मया बुद्ध्या सन्दिष्टोऽयमिहागतः ।
प्रहर्तुं त्वयि विश्वस्ते विश्वस्ते मयि वानघ ॥ १८ ॥

लक्ष्मणे वा महाबाहो स वध्यः सचिवैः सह ।
रावणस्य नृशंसस्य भ्राता ह्येष विभीषणः ॥ १९ ॥
हे अनघा (निष्पाप रामा) ! हा निशाचर रावणाच्या सांगण्यावरून मनात कुटिल विचार ठेवूनच येथे आला आहे. ज्यावेळी आपण याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या विषयी निश्चिंत होऊन जाऊ, त्यासमयी हा आपल्यावर, माझ्यावर अथवा लक्ष्मणावर ही प्रहार करू शकेल. म्हणून महाबाहो ! क्रूर रावणाचा भाऊ या विभीषणाचा मंत्र्यासहित वध करून टाकणेच उचित आहे. ॥१८-१९॥
एवमुक्त्वा रघुश्रेष्ठं सुग्रीवो वाहिनीपतिः ।
वाक्यज्ञो वाक्यकुशलं ततो मौनमुपागमत् ॥ २० ॥
वाक्यकुशल रघुकुलतिलक श्रीरामांना असे सांगून वाक्यज्ञ सेनापति सुग्रीव मौन झाले. ॥२०॥
स सुग्रीवस्य तद्वाक्यं रामः श्रुत्वा विमृश्य च ।
ततः शुभतरं वाक्यं उवाच हरिपुङ्‌गवम् ॥ २१ ॥
सुग्रीवांचे ते वचन ऐकून आणि त्यावर उत्तम प्रकारे विचार करून श्रीरामांनी त्या वानरश्रेष्ठास ही परम मंगलमयी गोष्ट सांगितली- ॥२१॥
सुदुष्टो वाप्यदुष्टो वा किमेष रजनीचरः ।
सूक्ष्ममप्यहितं कर्तुं ममाशक्तः कथंचन ॥ २२ ॥
वानरराज ! विभीषण दुष्ट असो अथवा साधु, काय हा निशाचर कुठल्याही प्रकारे सूक्ष्माहून ही सूक्ष्मरूपात माझे अहित करू शकतो का ? ॥२२॥
पिशाचान् दानवान् यक्षान् पृथिव्यां चैव राक्षसान् ।
अङ्‌गुल्यग्रेण तान् हन्यां इच्छन् हरिगणेश्वर ॥ २३ ॥
वानर यूथपते ! जर मी इच्छा करीन तर पृथ्वीवर जितके म्हणून पिशाच, दानव, यक्ष आणि राक्षस आहेत त्या सर्वांना एका बोटाच्या अग्रभागाने ही मारू शकतो. ॥२३॥
श्रूयते हि कपोतेन शत्रुः शरणमागतः ।
अर्चितश्च यथान्यायं स्वैश्च मांसैर्निमंत्रितः ॥ २४ ॥
असे ऐकले जाते की एका कबूतराने आपल्याला शरण आलेल्या आपल्याच शत्रुचा एका व्याधाचा अतिथी-सत्कार केला होता आणि त्याला निमंत्रण देऊन आपल्या शरीराच्या मांसाचे भोजन करविले होते. ॥२४॥
स हि तं प्रतिजग्राह भार्याहर्तारमागतम् ।
कपोतो वानरश्रेष्ठ किं पुनर्मद्विधो जनः ॥ २५ ॥
त्या व्याधाने त्या कबूतराची भार्या कबूतरीला पकडलेले होते तरी ही आपल्या घरी आल्यावर कबूतराने त्याचा आदर केला, मग माझ्या सारखा मनुष्य शरणागतावर अनुग्रह करील, यासाठी काही सांगण्याची काय आवश्यकता आहे ? ॥२५॥
ऋषेः कण्वस्य पुत्रेण कण्डुना परमर्षिणा ।
शृणु गाथां पुरा गीता धर्मिष्ठां सत्यवादिना ॥ २६ ॥
पूर्वकाळी कण्व मुनिंचे पुत्र सत्यवादी महर्षि कंडुंनी एका धर्मविषयक गाथेचे गान केले होते. ते सांगतो, ऐका. ॥२६॥
बद्धाञ्जलिपुटं दीनं याचन्तं शरणागतम् ।
न हन्याद् आनृशंस्यार्थं अपि शत्रुं परंतप ॥ २७ ॥
परंतप ! जर शत्रुही शरण आला आणि दीनभावाने हात जोडून दयेची याचना करू लागला तर त्याच्यावर प्रहार करता कामा नये. ॥२७॥
आर्तो वा यदि वा दृप्तः परेषां शरणं गतः ।
अरिः प्राणान् परित्यज्य रक्षितव्यः कृतात्मना ॥ २८ ॥
शत्रु दु:खी असो वा अभिमानी, जर तो आपल्या विपक्षीला शरण गेला तर शुद्ध हृदयाच्या श्रेष्ठ पुरूषाने आपल्या प्राणांचा मोह सोडून त्याचे रक्षण केले पाहिजे. ॥२८॥
स चेद् भयाद् वा मोहाद् वा कामाद् वापि न रक्षति ।
स्वया शक्त्या यथान्यायं तत्पापं लोकगर्हितम् ॥ २९ ॥
जर तो भय, मोह अथवा काही कामनेने न्यायानुसार यथाशक्ती त्याचे रक्षण करणार नाही तर त्याच्या त्या पाप-कर्माची लोकात फारच निंदा होते. ॥२९॥
विनष्टः पश्यतस्तस्य रक्षिणः शरणं गतः ।
आदाय सुकृतं तस्य सर्वं गच्छेदरक्षितः ॥ ३० ॥
जर शरण आलेला पुरूष संरक्षण न मिळता त्या रक्षकाच्या डोळ्यादेखतच नष्ट झाला तर तो त्याचे सारे पुण्य आपल्या बरोबर घेऊन जातो. ॥३०॥
एवं दोषो महानत्र प्रपन्नानामरक्षणे ।
अस्वर्ग्यं चायशस्यं च बलवीर्यविनाशनम् ॥ ३१ ॥
याप्रकारे शरणागताचे रक्षण न करण्यात महान दोष सांगितला गेला आहे. शरणागताचा त्याग स्वर्ग आणि सुयशाच्या प्राप्तीला नष्ट करतो, आणि मनुष्याच्या बळाचा आणि वीर्याचा नाश करतो. ॥३१॥
करिष्यामि यथार्थं तु कण्डोर्वचनमुत्तमम् ।
धर्मिष्ठं च यशस्यं च स्वर्ग्यं स्यात् तु फलोदये ॥ ३२ ॥
म्हणून मी तर महर्षि कंडुंच्या त्या यथार्थ आणि उत्तम वचनांचे पालन करीन, कारण की ते परिणामी धर्म, यश आणि स्वर्गाची प्राप्ती करून देणारे आहे. ॥३२॥
सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते ।
अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतं मम ॥ ३३ ॥
जो एक वेळ शरण येऊन मी तुमचा आहे असे म्हणून माझ्या जवळ रक्षणाची प्रार्थना करतो, त्याला मी समस्त प्राण्यांपासून अभय करून टाकतो. हे माझे कायमचे व्रत आहे. ॥३३॥
आनयैनं हरिश्रेष्ठ दत्तमस्याभयं मया ।
विभीषणो वा सुग्रीव यदि वा रावणः स्वयम् ॥ ३४ ॥
म्हणून कपिश्रेष्ठ सुग्रीव ! हा विभीषण असो अथवा स्वत: रावण आलेला असो, तुम्ही त्यास घेऊन यावे. मी त्याला अभयदान दिलेले आहे. ॥३४॥
रामस्य तु वचः श्रुत्वा सुग्रीवः प्लवगेश्वरः ।
प्रत्यभाषत काकुत्स्थं सौहार्देनाभिपूरितः ॥ ३५ ॥
भगवान्‌ श्रीरामांचे हे वचन ऐकून वानरराज सुग्रीवांनी सौहार्दाने भरून त्यांना म्हटले- ॥३५॥
किमत्र चित्रं धर्मज्ञ लोकनाथशिखामणे ।
यत् त्वमार्यं प्रभाषेथाः सत्त्ववान् सत्पथे स्थितः ॥ ३६ ॥
धर्मज्ञ ! लोकेश्वर शिरोमणि ! आपण जी ही श्रेष्ठ धर्माची गोष्ट सांगितली आहे यात काय आश्चर्य आहे ? कारण की आपण महान्‌ शक्तिशाली आणि सन्मार्गावर स्थित आहात. ॥३६॥
मम चाप्यन्तरात्मायं शुद्धं वेत्ति विभीषणम् ।
अनुमानाच्च भावाच्च सर्वतः सुपरीक्षितः ॥ ३७ ॥
हा माझा अंतरात्माही विभीषणाला शुद्ध समजतो आहे. हनुमानानेही अनुभव आणि भावपूर्ण आंतून-बाहेरून सर्व बाजूनी उत्तम प्रकारे परीक्षा केलेली आहे. ॥३७॥
तस्मात् क्षिप्रं सहास्माभिः तुल्यो भवतु राघव ।
विभीषणो महाप्राज्ञः सखित्वं चाभ्युपैतु नः ॥ ३८ ॥
म्हणून रघुनंदना ! आता विभीषण शीघ्रच येथे आमच्या सारखा होऊन राहील आणि आमची मैत्री प्राप्त करेल. ॥३८॥
ततस्तु सुग्रीववचो निशम्य तद्
हरीश्वरेणाभिहितं नरेश्वरः ।
विभीषणेनाशु जगाम संगमं
पतत्रिराजेन यथा पुरंदरः ॥ ३९ ॥
तदनंतर वानरराज सुग्रीवाने सांगितलेली ही गोष्ट ऐकून राजा श्रीराम शीघ्र पुढे होऊन विभीषणास भेटले, जणु देवराज इंद्रच पक्षिराज गरूडास भेटत होते. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टादशः सर्गः ॥ १८ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा अठरावा सर्ग पूर्ण झाला. ॥१८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP