[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
दशरथस्याज्ञया सुमन्त्रेण श्रीरामलक्ष्मणयोः संदेशस्य श्रावणम् -
महाराज दशरथांच्या आज्ञेने सुमंत्रांनी श्रीराम आणि लक्ष्मणाचा संदेश ऐकविणे -
प्रत्याश्वस्तो यदा राजा मोहात् प्रत्यागतस्मृतिः ।
तदाजुहाव तं सूतं रामवृत्तान्तकारणात् ॥ १ ॥
मूर्च्छा दूर झाल्यावर ज्यावेळी महाराज भानावर (शुद्धिवर) आले त्यावेळी सुस्थिर चित्त होऊन त्यांनी श्रीरामांचा वृत्तान्त ऐकविण्यासाठी सारथी सुमंत्रांना समोर बोलावले. ॥१॥
तदा सूतो महाराज कृताञ्जलिरुपस्थितः ।
राममेवानुशोचन्तं दुःखशोकसमन्वितम् ॥ २ ॥
त्या समयी सुमंत्र श्रीरामांच्याच शोकात आणि चिंतेत निरंतर बुडून राहणार्‍या, दुःख-शोकाने व्याकुळ झालेल्या महाराज दशरथांच्या जवळ हात जोडून उभे राहिले. ॥२॥
वृद्धं परमसंतप्तं नवग्रहमिव द्विपम् ।
विनिःश्वसन्तं ध्यायन्तमस्वस्थमिव कुञ्जरम् ॥ ३ ॥

राजा तु रजसा सूतं ध्वस्ताङ्‌गं समुपस्थितम् ।
अश्रुपूर्णमुखं दीनमुवाच परमार्तवत् ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे जंगलातून नुकताच पकडून आणलेला हत्ती आपल्या यूथपति गजराजाचे चिंतन करीत दीर्घ श्वास घेत रहातो आणि अत्यंत संतप्त आणि अस्वस्थ होऊन जातो त्या प्रकारेच वृद्ध दशरथ राजे श्रीरामांसाठी अत्यंत संतप्त होऊन दीर्घ श्वास घेत त्यांचेच चिंतन करीत अस्वस्थसे झाले होते. राजांनी पाहिले की सारथ्याचे सारे शरीर धुळीने भरलेले आहे. हा समोर उभा आहे. याच्या मुखांवरून अश्रुंची धारा वहात आहे आणि हा अत्यंत दीन दिसत आहे. त्या अवस्थेत राजांनी अत्यंत आर्त होऊन त्याला विचारले- ॥३-४॥
क्व नु वत्स्यति धर्मात्मा वृक्षमूलमुपाश्रितः ।
सोऽत्यन्तसुखितः सूत किमशिष्यति राघवः ॥ ५ ॥
’सूत ! धर्मात्मा राघव वृक्षाच्या बुंध्याचा (सहारा) आश्रय घेऊन कोठे निवास करील ? जे अत्यंत सुखात वाढलेले आहेत ते माझे लाडके राम तेथे काय खातील ? ॥५॥
दुःखस्यानुचितो दुःखं सुमन्त्र शयनोचितः ।
भूमिपालात्मजो भूमौ शेते कथमनाथवत् ॥ ६ ॥
’सुमंत्र ! जे दुःख भोगण्यास योग्य नाहीत, त्याच श्रीरामांना भारी दुःख प्राप्त झाले आहे. जे राजोचित शय्येवर शयन करण्यास योग्य आहेत, ते राजकुमार श्रीराम अनाथाप्रमाणे भूमिवर कसे झोपत असतील ? ॥६॥
यं यान्तमनुयान्ति स्म पदातिरथकुञ्जराः ।
स वत्स्यति कथं रामो विजनं वनमाश्रितः ॥ ७ ॥
’जे यात्रा करीत असता त्यांच्या मागे मागे पायदळ, रथी आणि (हत्ती) गजदलासहित सेना चालत असे तेच श्रीराम निर्जन वनात पोहोंचल्यावर तेथे कसे निवास करतील ? ॥७॥
व्यालैर्मृगैराचरितं कृष्णसर्पनिषेवितम् ।
कथं कुमारौ वैदेह्या सार्धं वनमुपाश्रितौ ॥ ८ ॥
’जेथे अजगर आणि व्याघ्र-सिंह आदि हिंस्त्र पशु विचरत असतात तथा काळे सर्प ज्याचे सेवन करतात त्याच वनाचा आश्रय घेणारे माझे दोन्ही कुमार सीतेसह तेथे कसे बरे रहातील ?’ ॥८॥
सुकुमार्या तपस्विन्या सुमन्त्र सह सीतया ।
राजपुत्रौ कथं पादैरवरुह्य रथाद् गतौ ॥ ९ ॥
’सुमंत्र ! परम सुकुमारी तपस्विनी सीतेसह ते दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण रथांतून उतरून पायी कसे गेले असतील ?’ ॥९॥
सिद्धार्थः खलु सूत त्वं येन दृष्टौ ममात्मजौ ।
वनान्तं प्रविशन्तौ तावश्विनाविव मन्दरम् ॥ १० ॥
’सारथी ! तू कृत्यकृत्य झाला आहेस कारण की जसे दोन्ही अश्विनीकुमार मंदराचलाच्या वनात जातात, त्याप्रकारेच वनात प्रवेश करणार्‍या माझ्या दोन्ही पुत्रांना तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. ॥१०॥
किमुवाच वचो रामः किमुवाच च लक्ष्मणः ।
सुमन्त्र वनमासाद्य किमुवाच च मैथिली ॥ ११ ॥
’सुमंत्र ! वनात पोहोचल्यावर श्रीरामांनी तुम्हाला काय सांगितले ? लक्ष्मणाने काय म्हटले ? तथा मैथिली सीतेने काय संदेश दिला ? ॥११॥
आसितं शयितं भुक्तं सूत रामस्य कीर्तय ।
जीविष्याम्ययमेतेन ययातिरिव साधुषु ॥ १२ ॥
’सूत ! तू श्रीरामांचे बसणे, झोपणे, खाणे- पिणे यांच्याशी संबंधित (सर्व) गोष्टी सांग. ज्या प्रमाणे स्वर्गांतून पडलेले राजा ययाति सत्पुरुषांमध्ये उपस्थित झाल्याने सत्संगाच्या प्रभावाने पुन्हां सुखी झाले, त्याच प्रमाणे तुमच्या सारख्या साधुपुरुषाच्या मुखाने पुत्राचा वृत्तान्त ऐकून मी सुखपूर्वक जीवन धारण करू शकेन.’ ॥१२॥
इति सूतो नरेन्द्रेण चोदितः सज्जमानया ।
उवाच वाचा राजानं स बाष्पपरिबद्धया ॥ १३ ॥
महाराजांनी या प्रकारे विचारल्यावर सारथि सुमंत्रांनी अश्रूनी रूद्ध झालेल्या गद्‍गद वाणी द्वारा त्यांना म्हटले - ॥१३॥
अब्रवीन्मे महाराज धर्ममेवानुपालयन् ।
अञ्जलिं राघवः कृत्वा शिरसाभिप्रणम्य च ॥ १४ ॥

सूत मद्वचनात् तस्य तातस्य विदितात्मनः ।
शिरसा वन्दनीयस्य वन्द्यौ पादौ महात्मनः ॥ १५ ॥

सर्वमन्तःपुरं वाच्यं सूत मद्वचनात् त्वया ।
आरोग्यमविशेषेण यथार्हमभिवादनम् ॥ १६ ॥
’महाराज ! राघवाने धर्माचेच निरंतर पालन करीत दोन्ही हात जोडून आणि मस्तक नमवून असे सांगितले आहे- ’सुत ! तुम्ही माझ्या वतीने आत्मज्ञानी आणि वंदनीय माझे महात्मा पिता यांच्या दोन्ही चरणी प्रणाम सांगा आणि अंतःपुरातील सर्व मातांना माझ्या आरोग्याचा समाचार देऊन त्यांनाही विशेषरूपाने माझा यथोचित प्रणाम निवेदन करा.’ ॥१४-१६॥
माता च मम कौसल्या कुशलं चाभिवादनम् ।
अप्रमादं च वक्तव्या ब्रूयाश्चैनामिदं वचः ॥ १७ ॥

धर्मनित्या यथाकालमग्न्यगारपरा भव ।
देवि देवस्य पादौ च देववत् परिपालय ॥ १८ ॥
’यानंतर माझी माता कौसल्या हिला माझा प्रणाम सांगून असे सांगा की ’मी कुशल आहे आणि धर्मपालनात सदा सावध रहात आहे’ नंतर परत तिला माझा हा संदेश ऐकवा की ’माते ! तू सदा धर्मामध्ये तत्पर राहून यथासमय अग्निशालेच्या सेवनात (अग्निहोत्र - कार्यात) संलग्न रहावे. देवि ! महाराजांना देवता समान मानून त्यांच्या चरणांची सेवा कर. ॥१७-१८॥
अभिमानं च मानं च त्यक्त्वा वर्तस्व मातृषु ।
अनुराजानमार्यां च कैकेयीमम्ब कारय ॥ १९ ॥
’अभिमान* आणि मान+ यांचा त्याग करून सर्व मातांच्या प्रति समान आचरण करावे- त्यांच्या बरोबर मिळून मिसळून रहावे. राजांचा जिच्या ठिकाणी अनुराग आहे त्या कैकेयीलाही श्रेष्ठ मानून तिचा सत्कार करावा. ॥१९॥
[*’अभिमान’ - मुख्य पट्टराणी होण्याचा अहंकार. + ’मान’ आपल्या मोठेपणाच्या घमेंडित राहून दुसर्‍यांचा तिरस्कार करण्याची भावना.]
कुमारे भरते वृत्तिर्वर्तितव्या च राजवत् ।
अर्थज्येष्ठा हि राजानो राजधर्ममनुस्मर ॥ २० ॥
’कुमार भरताप्रति राजोचित वर्तन करावे. राजा लहान वयाचा असेल तरीही तो आदरणीयच असतो- या राजधर्माची आठवण ठेवावी.’ ॥२०॥
भरतः कुशलं वाच्यो वाच्यो मद्वचनेन च ।
सर्वास्वेव यथान्यायं वृत्तिं वर्तस्व मातृषु ॥ २१ ॥
’कुमार भरतालाही माझा कुशल समाचार सांगून त्यास माझ्या वतीने सांगावे- भाऊ ! तुम्ही सर्व मातांप्रति न्यायोचित वर्तन करीत रहावे. ॥२१॥
वक्तव्यश्च महाबाहुरिक्ष्वाकुकुलनन्दनः ।
पितरं यौवराज्यस्थो राज्यस्थमनुपालय ॥ २२ ॥
इक्ष्वाकुकुलाचा आनंद वाढविणारा महाबाहु भरत याला असेही सांगितले पाहिजे की युवराजपदावर अभिषिक्त झाल्यानंतरही तउम्ही राजसिंहावर विराजमान पित्याचे रक्षण आणि सेवा यांत संलग्न राहावे. ॥ २२ ॥
अतिक्रान्तवया राजा मा स्मैनं व्यपरोरुधः ।
कुमारराज्ये जीवस्व तस्यैवाज्ञाप्रवर्तनात् ॥ २३ ॥
’राजे फार वृद्ध झालेले आहेत- असे मानून तुम्ही त्यांच्या विरोध करू नये. त्यांना राजसिंहासना वरून उतरवू नये. युवराज पदावरच प्रतिष्ठित राहून त्यांच्या आज्ञेचे पालन करीतच जीवन निर्वाह करावा. ॥२३॥
अब्रवीच्चापि मां भूयो भृशमश्रूणि वर्तयन् ।
मातेव मम माता ते द्रष्टव्या पुत्रगर्धिनी ॥ २४ ॥

इत्येवं मां महाबाहुर्ब्रुवन्नेव महायशाः ।
रामो राजीवपत्राक्षो भृशमश्रूण्यवर्तयत् ॥ २५ ॥
’नंतर त्यांनी नेत्रांनी बरेचसे अश्रु ढाळीत मला भरताला सांगण्यासाठीच हा संदेश दिला- ’भरत ! माझ्या पुत्रवत्सल मातेला आपल्याच मातेसमान समज, मला इतकेच सांगून महाबाहु महायशस्वी कमलनयन श्रीराम अत्यंत वेगाने अश्रूंची वृष्टि करू लागले. ॥२४-२५॥
लक्ष्मणस्तु सुसङ्‌क्रुद्धो निःश्वसन् वाक्यमब्रवीत् ।
केनायमपराधेन राजपुत्रो विवासितः ॥ २६ ॥
’परंतु लक्ष्मण त्यावेळी अत्यंत कुपित होऊन दीर्घ श्वास घेत म्हणाले- ’सुमंत्र ! कुठल्या अपराधासाठी महाराजांनी या राजपुत्र श्रीरामांना देशांतून घालवून दिले आहे ? ॥२६॥
राज्ञा तु खलु कैकेय्या लघु चाश्रुत्य शासनम् ।
कृतं कार्यमकार्यं वा वयं येनाभिपीडिताः ॥ २७ ॥
’राजांनी कैकेयीचा आदेश ऐकून झटक्यात तो पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांचे हे कार्य उचित असो अथवा अनुचित असो, परंतु आम्हांला त्यामुळेंच कष्ट तर भोगावेच लागत आहेत. ॥२७॥
यदि प्रव्राजितो रामो लोभकारणकारितम् ।
वरदाननिमित्तं वा सर्वथा दुष्कृतं कृतम् ॥ २८ ॥
’श्रीरामांना वनवास देणे कैकेयीच्या लोभाने झालेले असो अथवा राजांनी दिलेल्या वरदानामुळे झालेले असो, माझ्या दृष्टीने हे सर्वथा पापच केले गेले आहे. ॥२८॥
इदं तावद् यथाकाममीश्वरस्य कृते कृतम् ।
रामस्य तु परित्यागे न हेतुमुपलक्षये ॥ २९ ॥
’हे श्रीरामांना वनवास देण्याचे कार्य राजांच्या स्वेच्छाचारिते मुळे केले गेलेले असो, अथवा ईश्वरी प्रेरणेने झालेले असो, परंतु मला तर श्रीरामांच्या परित्यागासाठी कुठलेही समुचित कारण दिसून येत नाही. ॥२९॥
असमीक्ष्य समारब्धं विरुद्धं बुद्धिलाघवात् ।
जनयिष्यति सङ्‌क्रोशं राघवस्य विवासनम् ॥ ३० ॥
’बुद्धिच्या कमतरतेमुळे अथवा तुच्छ्तेमुळे उचित- अनुचित विचार न करता हे जे रामवनवासरूपी शास्त्रविरूद्ध कार्य आरंभले गेले आहे हे अवश्यच निंदा आणि दुःखाचे जनक होईल. ॥३०॥
अहं तावन्महाराजे पितृत्वं नोपलक्षये ।
भ्राता भर्त्ता च बन्धुश्च पिता च मम राघवः ॥ ३१ ॥
’मला या समयी महाराजांच्या ठिकाणी पित्याचा भाव दिसून येत नाही. आता तर राघवच (श्रीरामच) माझे बंधु (भ्राता), स्वामी, बंधु-बांधव तथा पिता आहेत. ॥३१॥
सर्वलोकप्रियं त्यक्त्वा सर्वलोकहिते रतम् ।
सर्वलोकोऽनुरज्येत कथं चानेन कर्मणा ॥ ३२ ॥
’जे संपूर्ण लोकांच्या हितामध्ये तत्पर असल्यामुळे सर्व लोकांना प्रिय आहेत त्या श्रीरामांचा परित्याग करून राजांनी हे जे क्रूरतापूर्ण पापकृत्य केले आहे, या कारणामुळे आता सारा संसार त्यांच्या ठिकाणी कसा अनुरक्त राहू शकेल ? (आता त्यांच्या ठिकाणी राजोचित गुण कुठे राहिले आहेत ?) ॥३२॥
सर्वप्रजाभिरामं हि रामं प्रव्रज्य धार्मिकम् ।
सर्वलोकविरोधेन कथं राजा भविष्यति ॥ ३३ ॥
’ज्यांच्या ठिकाणी समस्त प्रजेचे मन रमते त्या धर्मात्मा श्रीरामांना देशातून घालवून देऊन समस्त लोकांशी विरोध केल्यावर आता ते राजा कसे काय होऊ शकतात ? ॥३३॥
जानकी तु महाराज निःश्वसन्ती तपस्विनी ।
भूतोपहतचित्तेव विष्ठिता विस्मृता स्थिता ॥ ३४ ॥
’महाराज ! तपस्विनी जानकी तर दीर्घश्वास घेत अशा प्रकारे निश्चेष्ट उभी होती कि जणु तिच्यात कुणा भूताचा आवेश झाला आहे. ती भुलल्यासारखी वाटत होती. ॥३४॥
अदृष्टपूर्वव्यसना राजपुत्री यशस्विनी ।
तेन दुःखेन रुदती नैव मां किञ्चिदब्रवीत् ॥ ३५ ॥
’त्या यशस्विनी राजकुमारीने पूर्वी असे संकट कधी पाहिले नव्हते. ती पतिच्या दुःखानेच दुःखी होऊन रडत होती. तिने मला काहीही सांगितले नाही. ॥३५॥
उद्वीक्षमाणा भर्तारं मुखेन परिशुष्यता ।
मुमोच सहसा बाष्पं मां प्रयान्तमुपवीक्ष्य सा ॥ ३६ ॥
’मला इकडे येण्यास उद्यत (तयार) झालेला पाहून ती सुकलेल्या मुखाने पतिकडे पहात एकाएकी अश्रु ढाळू लागली होती. ॥३६॥
तथैव रामोऽश्रुमुखः कृताञ्जलिः
     स्थितोऽब्रवील्लक्ष्मणबाहुपालितः ।
तथैव सीता रुदती तपस्विनी
     निरीक्षते राजरथं तथैव माम् ॥ ३७ ॥
’या प्रकारे लक्ष्मणाच्या भुजांनी सुरक्षित श्रीराम त्या समयी हात जोडून उभे होते. त्यांच्या मुखावरून अश्रूंच्या धारा वहात होत्या. तपस्विनी सीताही कधी रडत रडत आपल्या या रथाकडे तर कधी माझ्याकडे पहात होती. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP