॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय बाविसावा ॥
सूर्यवंशवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दशरथ राजा मिथिलेला येतो :

जीवशिवांचे समाधान । ते हे कथा रामायण ।
पवित्र परिकर पावन । जगदुद्धरन जडजीवां ॥ १ ॥
श्रीरामीं संलग्नता । सर्वांगें समरसें सीता ।
यादि नांव सुलग्नता । ते लग्नकथा अवधारा ॥ २ ॥
मार्गीं वसोनि चारी वस्ती । राजा दशरथ शीघ्रगतीं ।
आला विदेहपुराप्रतीं । जेथें रघुपति निजविजयी ॥ ३ ॥
विदेहपुरा वस्ती आले । ते त्रिभुवनीं विजयी जाले ।
विश्वामित्रें मित्रत्व केलें । गुरुत्व दिधलें वसिष्ठें ॥ ४ ॥
श्रीवसिष्ठें विश्वामित्रु । केला श्रीरामीं धनुर्विद्यागुरु ।
आपण ब्रह्मविद्यासद्‌गुरु । विजयी रामचम्द्र याचेनि ॥ ५ ॥
वसिष्ठनिष्ठानिजनिर्धारीं । दशरथ पावला विदेहपुरी ।
रत्न्कळसांचिया हारी । तेजें अंबरीं रवि लोपे ॥ ६ ॥
दशरथ आला निजनगरीं । छत्रें पल्लवछत्रें वरी ।
निशाणें त्राहाटिल्या भेरी । मंगळतुरीं गर्जत ॥ ७ ॥

जनकाने सामोरे जाऊन सर्वांचे स्वागत केले :

आला ऐकोनि दशरथ । जनक सामोरा धांवत ।
शतानंद पुरोहोत । सवें समस्त प्रधान ॥ ८ ॥
पुढें वसिष्ठ देखिला दृष्टीं । धांवोनि चरणीं घातली मिठी ।
जगदुद्धार स्वचरणांगुष्टीं । सभाग्य सृष्टीं मी एक ॥ ९ ॥
वसिष्ठचरण जाले प्राप्त । आजि माझें कुळ पुनीत ।
आजि माझे पितर तृप्त । वंश सनाथ आजि माझा ॥ १० ॥
वसिष्ठ भेटल्या अभिष्ट । वसिष्ठ भेटल्या अनिष्ट इष्ट ।
वसिष्ठ भेटल्या बाग्य वरिष्ठ । वसिष्ठें श्रेष्ठ निजदास ॥ ११ ॥
वसिष्ठ अत्यंत सज्ञान । जनक सद्‌भाव संपूर्ण ।
देखोनि दिधले आलिंगन । समाधान दोघांसी ॥ १२ ॥
दोनी दीप एक होती । द्वैतलोपें एकचि दीप्ती ।
तैसें आलिंगन देती । अभेदवृत्तीं आल्हाद ॥ १३ ॥
वसिष्ठ देहींच विदेही । जनक सहजची विदेही ।
दोघे निःसंदेह विदेही । दिधलें पाहीं आलिंगन ॥ १४ ॥
जनक वसिष्ठांचे भेटी । आल्हाद न माये सृष्टी ।
पुढें दसह्रथ देखिला दृष्टीं । उठाउठी आलिंगी॥ १५ ॥
जानकीजनका श्रीराम जनका । आलिंगन पडलें देखा ।
तेणें संतोष सकळिकां । तिही लोकां आल्हाद ॥ १६ ॥
एक जनक एक दसह्रथ । समर्थु आलिंगी समर्थ ।
तेणें सुखावे रघुनाथ । पुरला मनोरथ सीतेचा ॥ १७ ॥
दोघां अतिप्रीतीं आलिंगन । दोघे राजे सुखसंपन्न ।
सीतारघुनाथांचे लग्न । वेगीं सुलग्न करावें ॥ १८ ॥
देखोनि भरत आणि शत्रुघ्न । राज प्रधान विस्मयापन्न ।
विस्मित मिथिलेचे जन । रामलक्ष्मण केंवि आले ॥ १९ ॥
कांही जाला अपमान । किंवा चुकलें विधिविधान ।
दोघे आले हे रुसोन । अति उद्विग्न विदेही ॥ २० ॥
पुसोनि येतां कौशिकासी । दोघे होते गुरुसेवेसी ।
तेचि दोघे दशरथापासीं । शीघ्रवेगेंसी कां आले ॥ २१
जनक वसिष्टासी पुसे आपण । रामलक्ष्मण दोघे जण ।
येथें कां आले रुसोन । कोण विधान मी चुकलों ॥ २२ ॥

दशरथपुत्रांचे वसिष्ठाकडून वरणन :

विदेहासी सांगे वसिष्ठ । रामलक्ष्मण ते ज्येष्ठ ।
भरतशत्रुघ्न हे कनिष्ठ । सांगतां स्पष्ट कळेना ॥ २३ ॥
रूपरेखा समसमान । ठाणमाण गुण लावण्य ।
हे दोघे रामलक्ष्मण । भरतशत्रुघ्न ते कवण ॥ २४ ॥
ऐसें बोलता विदेहासी । हांसे आलें वसिष्ठासी ।
मग बैसवोनि सावकाशीं । पूर्ववृत्तांतासी साम्गत ॥ २५ ॥
भरत रामपिंडाचा अर्धभाग । तो रामरूपी दिसे सांग ।
शत्रुघ्न सौमित्राचा भाग । त्याचें सर्वांग तद्‌रूप ॥ २६ ॥
हे चतुर्विध चारी मूर्ती । एकरूपें चतुर्धा भासती ।
ऐसें ऐकोनि भूपती । विस्मयें चित्तीं तटस्थ ॥ २७ ॥
तेचि समयी विश्वामित्र । घेवोनि आला रामसौमित्र ।
दशरथाचे चारी पुत्र । शोभा विचित्र एकत्वें ॥ २८ ॥
देखतां चतुर्मूर्ति चतुरर्क । पाहणे पाहतां अवघे एक ।
ऐकोनि जनका परमसुख । परम पुरुष हे चारी ॥ २९ ॥

दशरथपुत्रांच्या लग्नाची जनकाकडून सूचना :

कुशध्वज माझा कनिष्ठ बंधू । त्याच्या कन्या स्वरूपसिंधू ।
भरतशत्रुघ्ना करूं वधू । उर्मिलासंबंधू लक्ष्मणासी ॥ ३० ॥
ऐसा जनकाचा मनोरथ । चवघां बंधूंसहित ।
जामाता जोडला रघुनाथ । उल्लासत स्वानंदें ॥ ३१ ॥

विश्वामित्रांची दशरथाकडून स्तुती :

घेवोनी रामलक्श्मण । विश्वामित्र आला आपण ।
दशरथ घाली लोटांगण । हर्षें चरण वंदिलें ॥ ३२ ॥
आनंदें दशरथ बोलत । तुझी धनुर्विद्या समर्थ ।
तुझेनि विजयी रघुनाथ । कीर्ति विख्यात तुझेनि ॥ ३३ ॥
तुझेनि ताटिकेसी अंत । तुझेनि सुबाहूसी घात ।
तुझिये कृपे जानकी प्राप्त । तूं अतिसमर्थ ऋषिवर्या ॥ ३४ ॥
माझे अत्यंत कृपणपण । नेदीं म्हणे रामलक्ष्मण ।
ते त्वां आणोनि आपण । यशभूषण आपण दिधलें ॥ ३५ ॥
तुझेनि निजशिष्यपणें । तिहीं लोकीं मिरवे लेणें ।
ऐसी लेवविलीं भूषणें । कंठाभरणें शिवासी ॥ ३६ ॥

विश्वामित्रांचे उत्तर :

ऐसें ऐकतां स्तुतिस्तोत्र । हांसोनि बोले विश्वामित्र ।
रामचम्द्रे मी पवित्र । ब्रह्मीं ब्रह्मसूत्र श्रीराम ॥ ३७ ॥
श्रीरामाचेनि शिष्यपणें । तिहीं लोकीं माझे गुरुत्व वंदनें ।
श्रीरामें माझें सनाथ जिणें । जिणें मरणें मज नाहीं ॥ ३८ ॥
पूर्वीं यागीं मी अनाथ । तो श्रीरामें केलों सनाथ ।
कर्माकर्मा करोनि घात । श्रीरघुनाथ तुष्टला ॥ ३९ ॥
श्रीरामशिष्यत्वाची नवाई । मज देहवंता वम्दी विदेही ।
रामकीर्ति सांगो काई । पाषाण पायीं पुनीत ॥ ४० ॥
ज्याचेनि पायें तरती पाषाण । त्याचेनि गुरुत्वें मी धन्य ।
माझेंही यज्ञाचें फण जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीराम ॥ ४१ ॥
ऐसें बोलतां विश्वामित्र । सुर सिद्ध करिती जयजयकार ।
वर्षतीं सुमनांचे संभार । प्रेमें विश्वामित्र मूर्च्छित ॥ ४२ ॥
वसिष्ठ येवोनियां तेथ । विश्वामित्रा करी सावचित ।
जें बोलिलासी तें इत्थंभूत । श्रीरघुनाथ परब्रह्म ॥ ४३ ॥
आल्हादें दशरथ उठोन । आलिंगी श्रीराम-लक्ष्मण ।
रत्नें् धन धान्य ओंवाळून । चौघेही जण बैसविले ॥ ४४ ॥
वसिष्ठविश्वामित्रवचन । श्रीराम ब्रह्म पूर्ण ।
तेणे जनकासी आल्हाद पूर्ण । करावया लग्न उद्यत ॥ ४५ ॥

दशरथाच्या चारही मुलांच्या विवाहनिश्चितीसाठी कुशध्वजाला निमंत्रण :

शतानंत पुरोहितासी । जनकधाडी कुशध्वजापासीं ।
तो चाकटा बंधु आम्हांसी । शीघ्र त्यासी आणावें ॥ ४६ ॥
संकाशा नाम नगरीसी । म्यां राज्यीं स्थापिलें प्रतिष्ठेसीं ।
दोघी कन्या आहेत त्यासी । लावण्यराशी सुंदरा ॥ ४७ ॥
श्लाघ्य संबंधुरघुनंदना । दोघी द्याव्या भरत शत्रुघ्नां ।
यालागीं त्यासी शीघ्र आणा । लग्नीं सुलग्ना साधावया ॥ ४८ ॥
ऐकोनि जनकाचें आकारण । शीघ्र कुशध्वज आला आपण ।
रायासी करोनि नमन । आलिंगन दिधलें ॥ ४९ ॥
जनकसभा सावकाशीं । मूळ धाडिले दशरथासी ।
वेगीं बोलावूनी त्यासी । लग्नदिवसासी नेमावया ॥ ५० ॥
दशरथ आला ऋषिमूळी । वसिष्ठ वामदेव रायाजवळी ।
कश्यप कात्यायन जाबाली । तपोबळी मार्कंडेया ॥ ५१ ॥
आले सखे सुहृज्जन । जनकें दिधला सन्मान ।
अवघे बैसविले सावधान । लग्नदिन नेमावया ॥ ५२ ॥
विवाह करावया सत्कुळीं । दोहीं वंशांची वंशावळी ।
शोधोनि पहावी समूळी । ऋषि सकळी नेमिले ॥ ५३ ॥
वराचे कुळ समस्त । सांगावया वसिष्ठ कुळदैवत ।
तेणें सांगावा आद्यंत । इत्थंभूत रविवंश ॥ ५४ ॥

वसिष्ठकृत सूर्यवंशवर्णन :

ऐकोनि ऋषींचे उत्तर । वसिष्ठें केला नमस्कार ।
ऐका सूर्यवंशविस्तार । अति पवित्र भूपती ॥ ५५ ॥
सूर्यवंशाचिये ख्याती । महापातकी मुक्त होती ।
एक एक चक्रवर्ती । त्रिजगती भूषण ॥ ५६ ॥
सूर्याचा मुख्य मनु पुत्र । मनूचा इक्ष्वाकु पवित्र ।
तेणें अयोध्या मुक्तक्षेत्र । केलें नगर निजवासा ॥ ५७ ॥
यालागीं सूर्यवंशी जाण । म्हणती इक्ष्वाकुनंदन ।
म्हणावया हेंचि कारण । पदव्याख्यान याचि स्थितीं ॥ ५८ ॥
येच वंशी पृथु चक्रवर्ती । रसातळा जातां क्षिती ।
पृथूनें धरिली आत्मशक्तीं । पृथ्वी म्हणती त्याचेनि ॥ ५९ ॥
तेणें केले पृथ्वीचें दोहन । सुखी केले सकळ जन ।
पूजाभक्तीनें पावन पूर्ण । अनर्घ्य रत्‍न सूर्यवंशीं ॥ ६० ॥
येच वंशी उत्तानचरण । त्याचा पुत्र ध्रुव जाण ।
बाळपनीं देव सुप्रसन्न । करोनि आपण अढळ जाला ॥ ६१ ॥
योनिद्वारें न जन्मतां । पित्याचे कुशीं जन्म पावतां ।
परी मरों नेदीच निजधाता । तो मांधाता रविवंशीं ॥ ६२ ॥
शिबी चक्रवर्ती येच वंशी । पक्ष्यासाठी तुकी मांसासी ।
नगरी नेली वैकुंठासी । सत्वराशी शिबी देखा ॥ ६३ ॥
सूर्यवम्शीं अति पवित्र । जन्म पावला हरिश्चंद्र ।
स्वप्नदानविधि उपचार । केला साचार जागृतीं ॥ ६४ ॥
दक्षिणा द्यावया समग्र । डोंबाघरीं होय परतंत्र ।
विकोनियां स्त्रीपुत्र । विश्वामित्र सुखी केला ॥ ६५ ॥
रक्मांगद येच वंशीं । व्रत पाळोनि एकादशी ।
नगरी नेली वैकुंठासी । व्रतें जगासी उद्धार ॥ ६६ ॥
सुरासुरां नागवे वैरी । धूमांकित पातालविवरीं ।
त्यातें शोधोनियां मारी । तो धुंधुमार रविवंशीं ॥ ६७ ॥
त्याचा पुत्र धर्मांगद । एकादशीव्रतीं आल्हाद ।
शिर देतां न मानी खेद । परमानंद पावला ॥ ६८ ॥
सूर्यवंशींचे भूपती । एका चढी एकाची ख्याती ।
श्रवणें जन पावन होती । वंशात्पत्ती अवधारा ॥ ६९ ॥
येच वंशी अंकऋषी । व्रत साधोनि द्वादशी ।
देव आणिला गर्भवासासी । दुर्वासासी वांचविलें ॥ ७० ॥
येच वंशी राजे सगर । ज्यांचेनि नांवें जाले सागर ।
कपिलशापें जळतां शूर । करी उद्धार भगीरथ ॥ ७१ ॥
भगीरथें निजात्मशक्तीं । आणोनियां भागीरथी ।
पूर्वज तारिलें नेणों किती । त्रिजगतीं उद्धार ॥ ७२ ॥
भगीरथसुत प्रवीण युद्धीं । देवा दैत्यां युद्धसंधीं ।
इंद्रें बैसवोनियां खांदी । नेला त्रिशुद्धी युद्धासी ॥ ७३ ॥
बैसला इंद्राच्या ककुदीं । यालागीं काकुत्स्थ म्हणती ।
त्यांच्या नामाची निजख्याती । काकुत्स्थ म्हनती श्रीरामा ॥ ७४ ॥
रविवंशीं अति निष्पाप । राजा जन्मला दिलीप ।
कामधेनु उपासी नृप । अति साक्षेपें पुत्रार्थीं ॥ ७५ ॥
कामधेनु प्रसन्न पूर्ण । रघु पुत्र पावला सुलक्षण ।
ज्याचेनि नांवें रघुनंदन । वंशींचा जाण म्हणताती ॥ ७६ ॥
रघूचा अज अतुर्बळी । अति प्रतापी भूमंडळीं ।
वैरी अजप्राय बळी । पायांतळी मेमाती ॥ ७७ ॥
त्या अजाचा दशरथ । शुक्र जिंकिला युद्धात ।
स्वर्गीं जाला यशवंत । सन्मानिला अमरेंद्रें ॥ ७८ ॥
पराभविलें दैत्यगुरूसी । अति आल्हाद बृहस्पतीसी ।
आलिंगूनियां हृदयेंसीं । निजनगरासी धाडेला ॥ ७९ ॥
त्याचे पुत्र चौघे जण । श्रीराम आणि लक्ष्मण ।
धाकुटे भरत शत्रुघ्न । आदिकारण हे चारी ॥ ८० ॥
केला ताटिकेचा निर्वाळा । सुबाहु मारिला राक्षमेळां ।
रावण अपमानिला बळा । चरणीं शिळा उद्धरिली ॥ ८१ ॥
सूर्यवंशींचें वर्णन । वसिष्ठ गर्जें आल्हादोन ।
सुमनें वर्षती सुरगण । हर्षत मन जनकाचें ॥ ८२ ॥
ऐकोनि सूर्यवंशावली । महासिद्धीं पिटिली टाळी ।
धन्य धन्य जनकबाळी । भाग्यें तत्कुळीं सुलग्न ॥ ८३ ॥
परिसोनि निजवंशवर्णन । दशरथासी आल्हाद पूण ।
वसिष्ठावरी ओंवाळून । देत गोदान लक्षकोटी ॥ ८४ ॥
मग उठोनि महाऋषीं । बैसविलें वसिष्ठासी ।
तूं सूर्यवंशाचा सद्‌गुरू होसी । रविवंशासी भूषण ॥ ८५ ॥
सूर्यवांशीं जे जे भूप । सांगितले अतिप्रताप ।
ते तुझेनि निष्पाप । तूं सद्‌रूप सद्‌गुरू ॥ ८६ ॥
जेवीं सूर्य निजतेजेंसीं । सूर्यकांतीं तेज प्रकाशी ।
तेंवी तुझेनि अनुग्रहेंसी । सूर्यवंशासी प्रताप ॥ ८७ ॥
अचेतन तुझिया कृपादृष्टी । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
तुझा अनुग्रह जाल्यापाठीं । शिष्य सृष्टीं निजविजयी ॥ ८८ ॥
वसिष्ठ वक्ता सुखस्वानंद । सभेसी जाला परमानंद ।
जनक भाग्याचा अगाध । लग्नसंबंध श्रीरामीं ॥ ८९ ॥
एकाजनार्दना शरण । जालें सूर्यवंशव्याख्यान ।
जनकवंशांचे निरूपण । सावधान अवधारा ॥ ९० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
सूर्यवंशनिरूपणं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥ २२ ॥
॥ ओंव्या ९० ॥



GO TOP