[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। षड्‌विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्यौदासिन्यं दृष्ट्‍वा सीतया तं प्रति तत्कारणस्य जिज्ञासनं पितुराज्ञया वनं गन्तुमात्मनो निश्चयं ब्रुवता श्रीरामेण गृहेऽवस्थातुं सीताया बोधनम् - श्रीरामास उदास पाहून सीतेने त्यांना याचे कारण विचारणे आणि श्रीरामांनी पित्याच्या आज्ञेवरून वनात जाण्याचा निश्चय सांगून सीतेला घरांत राहाण्यासाठी समजाविणे -
अभिवाद्य च कौसल्यां रामः सम्प्रस्थितो वनम् ।
कृतस्वस्त्ययनो मात्रा धर्मिष्ठे वर्त्मनि स्थितः ॥ १ ॥
धर्मिष्ठ मार्गावर स्थित झालेले श्रीराम मातेच्या द्वारे स्वास्तिवचन कर्म संपन्न झाल्यावर कौसल्येला प्रणाम करून तेथून वनासाठी प्रस्थान करते झाले. ॥१॥
विराजयन् राजसुतो राजमार्गं नरैर्वृतम् ।
हृदयान्याममन्थेव जनस्य गुणवत्तया ॥ २ ॥
त्या समयी मनुष्यांच्या गर्दीने भरलेल्या राजमार्गाला प्रकाशित करीत राजकुमार श्रीराम आपल्या सद्‍गुणांच्या कारणांनी लोकांच्या मनांचे जणु मंथन करीत जाऊ लागले. ( अशा गुणवान रामांना वनवास दिला जात आहे या विचाराने तेथील लोक अत्यंत बैचेन होऊ लागले. त्यांच्या मनाची शांति ढळली). ॥२॥
वैदेही चापि तत् सर्वं न शुश्राव तपस्विनी ।
तदेव हृदि तस्याश्च यौवराज्याभिषेचनम् ॥ ३ ॥
तपस्विनी वैदेहीने अद्यापपर्यंत हा सारा वृत्तांत ऐकलेला नव्हता. तिच्या हृदयात अजून हीच गोष्ट बसलेली होती की माझ्या पतिचा युवराज पदावर अभिषेक होत आहे. ॥३॥
देवकार्यं स्म सा कृत्वा कृतज्ञा हृष्टचेतना ।
अभिज्ञा राजधर्माणां राजपुत्री प्रतीक्षति ॥ ४ ॥
विदेह राजकुमारी सीता प्रासंगिक कर्तव्ये आणि राजधर्माला जाणत होती म्हणून देवतांची पूजा करून प्रसन्नचित्ताने रामांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत होती. ॥४॥
प्रविवेशाथ रामस्तु स्ववेश्म सुविभूषितम् ।
प्रहृष्टजनसम्पूर्णं ह्रिया किञ्चिदवाङ्‌‍मुखः ॥ ५ ॥
इतक्यांतच रामांनी आपल्या उत्तम प्रकारे सजविलेल्या अंतःपुरात प्रवेश केला. त्यावेळी ते प्रसन्न मनुष्यांनी भरलेले होते. त्यावेळी रामांचे मुख लज्जेने काहीसे खाली वळलेले होते. ॥५॥
अथ सीता समुत्पत्य वेपमाना च तं पतिम् ।
अपश्यच्छोकसन्तप्तं चिन्ताव्याकुलितेन्द्रियम् ॥ ६ ॥
त्यांना पहाताच सीता आसनावरून उठून उभी राहिली, आणि त्यांची अवस्था पाहून कांपू लागली आणि चिंतेने व्याकुळ इंद्रिये झालेल्या आपल्या त्या शोकसंतप्त पतीला न्याहाळून पाहू लागली. ॥६॥
तां दृष्ट्‍वा स हि धर्मात्मा न शशाक मनोगतम् ।
तं शोकं राघवः सोढुं ततो विवृततां गतः ॥ ७ ॥
धर्मात्मा राघव सीतेला पाहून आपल्या मानसिक शोकाचा वेग सहन करू शकले नाहीत म्हणून त्यांचा तो शोक प्रकट झाला. ॥७॥
विवर्णवदनं दृष्ट्‍वा तं प्रस्विन्नममर्षणम् ।
आह दुःखाभिसन्तप्ता किमिदानीमिदं प्रभो ॥ ८ ॥
त्यांचे मुख उदास झाले होते. त्यांच्या अंगांतून घाम निथळत होता. ते आपला शोक दाबून ठेवण्यास असमर्थ झाले होते. त्यांना या अवस्थेत पाहून सीता दुःखाने संतप्त झाली आणि म्हणाली - 'प्रभो ! या समयी आपली ही कशी दशा झाली आहे ? ॥८॥
अद्य बार्हस्पतः श्रीमान् युक्तः पुष्येण राघव ।
प्रोच्यते ब्राह्मणैः प्राज्ञैः केन त्वमसि दुर्मनाः ॥ ९ ॥
'हे राघव ! आज बृहस्पति देवता संबंधी मंगलमय पुष्यनक्षत्र आहे, जे अभिषेकाला योग्य आहे. योगामध्ये विद्वान ब्राह्मणांनी त्याच पुष्य नक्षत्रावर आपला अभिषेक ठरवला आहे. अशा समयी की ज्यावेळी आपण प्रसन्न असावयास पाहिजे होते, आपले मन इतके उदास का आहे ? ॥९॥
न ते शतशलाकेन जलफेननिभेन च ।
आवृतं वदनं वल्गु च्छत्रेणाभिविराजते ॥ १० ॥
मी पहात आहे की यावेळी आपले मनोहर मुख जलफेनाप्रमाणे उज्ज्वल तथा शत शलाकांनी युक्त श्वेत छत्राने आच्छादित नाही आहे त्यामुळे अधिक शोभून दिसत नाही. ॥१०॥
व्यजनाभ्यां च मुख्याभ्यां शतपत्रनिभेक्षणम् ।
चन्द्रहंसप्रकाशाभ्यां वीज्यते न तवाननम् ॥ ११ ॥
कमलासारखे सुंदर नेत्र धारण करणार्‍या आपल्या मुखावर चंद्रमा आणि हंसाप्रमाणे, श्वेत वर्ण असलेल्या दोन श्रेष्ठ चवर्‍यांच्या द्वारे वारा घातला जात नाही आहे. ॥११॥
वाग्मिनो वन्दिनश्चापि प्रहृष्टास्त्वां नरर्षभ ।
स्तुवन्तो नात्र दृश्यन्ते मङ्‌‍गलैः सूतमागधाः ॥ १२ ॥
'नरश्रेष्ठ ! प्रवचन कुशल बंदी, सूत आणि मागधजन आज अत्यंत प्रसन्न होऊन आपल्या मांगलिक वचनांच्या द्वारे आपली स्तुती करतांना दिसून येत नाहीत. ॥१२॥
न ते क्षौद्रं च दधि च ब्राह्मणा वेदपारगाः ।
मूर्ध्नि मूर्धाभिषिक्तस्य ददति स्म विधानतः ॥ १३ ॥
'वेदांच्या पारंगत विद्वान ब्राह्मणांनी आज मूर्धाभिषिक्त झालेल्या आपल्या मस्तकावर तीर्थोदक मिश्रित मधु आणि दही यांचा विधिपूर्वक अभिषेक केलेला नाही. ॥१३॥
न त्वां प्रकृतयः सर्वाः श्रेणीमुख्याश्च भूषिताः ।
अनुव्रजितुमिच्छन्ति पौरजानपदास्तथा ॥ १४ ॥
'मंत्री- सेनापति आदि सार्‍या प्रकृति, वस्त्राभूषणांनी विभूषित मुख्य-मुख्य धनिक-सावकार तथा नगर आणि जनपदांतील लोक आज आपल्या पाठोपाठ चालण्याची इच्छा करत नाहीत. (याचे काय कारण आहे ?) ॥१४॥
चतुर्भिर्वेगसम्पन्नैर्हयैः काञ्चनभूषणैः ।
मुख्यः पुष्परथो युक्तः किं न गच्छति तेऽग्रतः ॥ १५ ॥
'सोन्याच्या भूषणांनी सजलेल्या चार वेगवान घोडे ज्याला जोडलेले आहेत असा श्रेष्ठ पुष्परथ (पुष्पभूशित केवळ भ्रमणोपयोगी रथ) आज आपल्या पुढे का चालत नाही आहे ? ॥१५॥
न हस्ती चाग्रतः श्रीमान् सर्वलक्षणपूजितः ।
प्रयाणे लक्ष्यते वीर कृष्णमेघगिरिप्रभः ॥ १६ ॥
'वीर आपल्या यात्रेच्या समयी समस्त शुभ लक्षणांनी प्रशंसित तथा काळ्या मेघाच्या पर्वतासमान विशालकाय तेजस्वी गजराज आज आपल्या पुढे का दिसून येत नाही ? ॥१६॥
न च काञ्चनचित्रं ते पश्यामि प्रियदर्शन ।
भद्रासनं पुरस्कृत्य यातं वीर पुरःसरम् ॥ १७ ॥
'प्रिय दर्शन वीर ! आज आपल्या सुवर्णजडित भद्रासनाला सादर हातात घेऊन अग्रगामी सेवक पुढे येतांना का दिसून येत नाही ? ॥१७॥
अभिषेको यथा सज्जः किमिदानीमिदं तव ।
अपूर्वो मुखवर्णश्च न प्रहर्षश्च लक्ष्यते ॥ १८ ॥
जर अभिषेकाची सारी तयारी झाली आहे, अशा समयी आपली काय ही दशा होत आहे ? आपल्या मुखाची कांति उडून गेली आहे, (ते निस्तेज दिसत आहे) असे पहिल्याने कधी झाले नव्हते. आपल्या चेहर्‍यावर प्रसन्नतेचे कुठलेही चिन्ह दिसून येत नाही. याचे काय कारण आहे ? ॥१८॥
इतीव विलपन्तीं तां प्रोवाच रघुनन्दनः ।
सीते तत्र भवांस्तातः प्रव्राजयति मां वनम् ॥ १९ ॥
याप्रकारे विलाप करणार्‍या सीतेला रघुनंदन राम म्हणाले - 'सीते ! आज पूज्य पिताश्री मला वनात पाठवित आहेत.' ॥१९॥
कुले महति सम्भूते धर्मज्ञे धर्मचारिणि ।
शृणु जानकि येनेदं क्रमेणाद्यागतं मम ॥ २० ॥
'महान कुलात उत्पन्न झालेल्या, धर्माला जाणणार्‍या तथा धर्मपरायण जानकी ! ज्या कारणांमुळे हा वनवास आज मला प्राप्त झाला आहे ती क्रमशः सांगतो, ऐक. ॥२०॥
राज्ञा सत्यप्रतिज्ञेन पित्रा दशरथेन च ।
कैकेय्यै मम मात्रे तु पुरा दत्तौ महावरौ ॥ २१ ॥
'माझे सत्यप्रतिज्ञ पिता महाराज दशरथांनी माता कैकेयीला पूर्वी कधी दोन महान वर दिले होते. ॥२१॥
तयाद्य मम सज्जेऽस्मिन्नभिषेके नृपोद्यते ।
प्रचोदितः स समयो धर्मेण प्रतिनिर्जितः ॥ २२ ॥
'इकडे ज्यावेळी महाराजांच्या प्रयत्‍नाने माझ्या राज्याभिषेकाची तयारी होऊ लागली तेव्हा कैकेयीने त्या वरदानाच्या प्रतिज्ञेचे आठवण दिली आणि महाराजांना धर्मतः काबूत घेतले. ॥२२॥
चतुर्दश हि वर्षाणि वस्तव्यं दण्डके मया ।
पित्रा मे भरतश्चापि यौवराज्ये नियोजितः ॥ २३ ॥
सोऽहं त्वामागतो द्रष्टुं प्रस्थितो विजनं वनम् ।
'यामुळे विवश होऊन पित्यांनी भरताला तर युवराजाच्या पदावर नियुक्त केले आणि माझ्यासाठी दुसरा वर स्वीकारला ज्याला अनुसरून मला चौदा वर्षांपर्यंत दण्डकारण्यांत निवास करावा लागेल. ॥२३॥
भरतस्य समीपे तु नाहं कथ्यः कदाचन ॥ २४ ॥

ऋद्धियुक्ता हि पुरुषा न सहन्ते परस्तवम् ।
तस्मान्न ते गुणाः कथ्या भरतस्याग्रतो मम ॥ २५ ॥
या समयी मी निर्जन वनात जाण्यासाठी प्रस्थान करून चुकलो आहे, आणि तुला भेटण्यासाठी येथे आलो आहे. तू भरता समीप कधी माझी प्रशंसा करू नको, कारण समृद्धशाली पुरुष दुसर्‍याची स्तुति सहन करू शकत नाही, म्हणून सांगतो आहे की तू भरताच्या समोर माझ्या गुणांची प्रशंसा करू नको. ॥२४-२५॥
अहं ते नानुवक्तव्यो विशेषेण कदाचन ।
अनुकूलतया शक्यं समीपे त्वस्य वर्तितुम् ॥ २६ ॥
'विशेषता तू भरताच्या समक्ष आपल्या सख्यांच्या बरोबरही वारंवार माझी चर्चा करता कामा नये, कारण त्याच्या मनास अनुकूल वर्तन करूनच तू त्याच्या निकट राहू शकशील. ॥२६॥
तस्मै दत्तं नृपतिना यौवराज्यं सनातनम् ।
स प्रसाद्यस्त्वया सीते नृपतिश्च विशेषतः ॥ २७ ॥
'सीते ! राजांनी त्यांना कायमचे यौवराज्यपद दिलेले आहे, म्हणून तू विशेष प्रयत्‍नपूर्वक त्याला प्रसन्न ठेवले पाहिजेस, कारण की आता तेच राजा होतील. ॥२७॥
अहं चापि प्रतिज्ञां तां गुरोः समनुपालयन् । वनमद्यैव यास्यामि स्थिरीभव मनस्विनी ॥ २८ ॥ 'मीही पित्याच्या त्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी आजच वनांत निघून जाईन. मनस्विनी ! तू धैर्य धारण करून राहावे. ॥२८॥
याते च मयि कल्याणि वनं मुनिनिषेवितम् ।
व्रतोपवासपरया भवितव्यं त्वयाऽनघे ॥ २९ ॥
'कल्याणी ! निष्पाप सीते ! मी मुनिजन सेवित वनात निघून गेल्यावर तुला प्रायः व्रत आणि उपवासात संलग्न होऊन राहावे लागेल (राहिले पाहिजे). ॥२९॥
कल्यमुत्थाय देवानां कृत्वा पूजां यथाविधि ।
वन्दितव्यो दशरथः पिता मम जनेश्वरः ॥ ३० ॥
'प्रतिदिन पहांटे उठून देवतांची विधिपूर्वक पूजा करून तुला माझे पिता महाराज दशरथ यांची वंदना केली पाहिजे. ॥३०॥
माता च मम कौसल्या वृद्धा संतापकर्शिता ।
धर्ममेवाग्रतः कृत्वा त्वत्तः सम्मानमर्हति ॥ ३१ ॥
'माझी माता कौसल्या हिला प्रणाम केला पाहिजे. एक तर ती वृद्ध झाली आहे, दुसरे दुःख आणि संताप यांनी तिला दुर्बल करुन टाकले आहे, म्हणून धर्माचा विचार पुढे ठेवून ती तुझ्याकडून विशेष सन्मान प्राप्त करण्यास योग्य आहे. ॥३१॥
वन्दितव्याश्च ते नित्यं याः शेषा मम मातरः ।
स्नेहप्रणयसम्भोगैः समा हि मम मातरः ॥ ३२ ॥
'माझ्या ज्या इतर माता आहेत, त्यांच्या चरणीही तुला प्रतिदिन प्रणाम केला पाहिजे; कारण स्नेह, उत्कृष्ट प्रेम आणि पालन पोषणच्या दृष्टिने सर्व माता माझ्यासाठी समान आहेत. ॥३२॥
भ्रातृपुत्रसमौ चापि द्रष्टव्यौ च विशेषतः ।
त्वया भरतशत्रुघ्नौ प्राणैः प्रियतरौ मम ॥ ३३ ॥
'भरत आणि शत्रुघ्न तर मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहेत, म्हणून तू त्या दोघांना विशेषतः आपल्या भावाप्रमाणे अथवा पुत्राप्रमाणे पहावयास हवे आणि मानायला हवे. ॥३३॥
विप्रियं न च कर्तव्यं भरतस्य कदाचन ।
स हि राजा च वैदेहि देशस्य च कुलस्य च ॥ ३४ ॥
'वैदेही ! तू भरताच्या इच्छेविरूद्ध कोणतेही काम करता कामा नये; कारण या समयी तेच माझ्या देशाचे आणि कुळाचे राजे आहेत. ॥३४॥
आराधिता हि शीलेन प्रयत्‍नैश्चोपसेविताः ।
राजानः सम्प्रसीदन्ति प्रकुप्यन्ति विपर्यये ॥ ३५ ॥
'अनुकूल आचरणाद्वारे आराधना आणि प्रयत्‍नपूर्वक सेवा केल्यावर राजे लोक प्रसन्न होतात आणि विपरीत वर्तन केल्याने ते कुपित होत असतात. ॥३५॥
औरस्यानपि पुत्रान् हि त्यजन्त्यहितकारिणः ।
समर्थान् सम्प्रगृह्णन्ति जनानपि नराधिपाः ॥ ३६ ॥
'जे अहित करणारे असतात ते आपले औरस पुत्रही का असेनात राजे लोक त्यांचा त्याग करतात आणि आत्मीय नसूनही जे सामर्थ्यवान असतात त्यांना आपलेसे करतात. ॥३६॥
सा त्वं वसेह कल्याणि राज्ञः समनुवर्तिनी ।
भरतस्य रता धर्मे सत्यव्रतपरायणा ॥ ३७ ॥
'म्हणून कल्याणी ! तू राजा भरताच्या अनुकूल वर्तन करीत राहून धर्म एवं सत्यव्रतात तत्पर राहून येथे निवास कर. ॥३७॥
अहं गमिष्यामि महावनं प्रिये
     त्वया हि वस्तव्यमिहैव भामिनि ।
यथा व्यलीकं कुरुषे न कस्यचित्-
     तथा त्वया कार्यमिदं वचो मम ॥ ३८ ॥
'प्रिये ! आता मी त्या विशाल वनात निघून जाईन. भामिनी ! तुला येथेच निवास करावा लागेल. तुझ्या आचरणाने कुणाला कष्ट होणार नाहीत इकडे लक्ष देऊन तुला येथे माझ्या या आज्ञेचे पालन करीत राहिले पाहिजे.' ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे षड्विशः सर्गः ॥ २६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सव्विसावा सर्ग पूरा झाला. ॥२६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP