॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय आठवा ॥
श्रीरामांचे वनाकडे प्रयाण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामस्त्वनेन नाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।
व्रजापृच्छस्व सौमित्र सर्वमेव सुहृज्जनम् ॥१॥
ये च राज्ञे ददौ महात्मा वरुणः स्वयम् ।
जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥२॥
अभेद्ये कवचे दिव्ये तूणी चाक्षय्यसायकौ ।
सर्वमायुधमादाय क्षिप्रमाव्रज लक्ष्मण ॥३॥
स सुहृज्जनमामंत्र्य वनवासाय निश्चितः ।
इक्ष्वाकुगुरुमागस्य जग्राहायुधमुत्तमम् ॥४॥
तद्दिव्यं राजशार्दूलः संस्कृतं माल्यभूषितम् ।
रामास्य दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम् ॥५॥

श्रीराम लक्ष्मणाला मातेचा आशीर्वाद घेऊन आयुधे आणण्यास पाठवितात :

श्रीराम म्हणे सौमित्रासी । जरी तूं वनवासासी येसी ।
तरी पुसोनि ये निजमातेसी । आणि पत्‍नीसी भेटोनि ॥१॥
आणिकही सुहृदसंबंधे । त्यांसी पुसोनि यावें यथवबोधें ।
माझीं आणावीं दिव्यायुधें । तीं अति शुद्धें युद्धार्थी ॥२॥
मज दिधलें दशरथें । वरुणदत्त धनुष्यातें ।
तेणेसीं आणावे अक्षय भाते । अभेद्य कवचातें आणावें ॥३॥
शत्रुघातीं अति खडतर । अतिशयेंसी सतेज धार ।
तेंही खर्ग आणावें अति शीघ्र । आज्ञा गंभीर रामाची ॥४॥
सद्‌गुरू वसिष्ठाचे घरीं । माझे आयुधांची सामग्री ।
ते आणावी त्वरां करीं । वनांतरीं जावया ॥५॥
लक्ष्मण सांगे सुमित्रेसी । राम सीता जाताती वनासी ।
मीही जातों त्याचे सेवेसी । म्हणोनि मातेसी वंदिलें ॥६॥
सुमित्रा म्हणे रामसेवा । करितां सुख माझे जीवा ।
वनीं सुखी केलिया राघवा । धन्य कुसवा तैं माझा ॥७॥
ज्येष्ठ बंधु सद्‌गुरु परम । ज्येष्ठबंधु पित्यासम ।
ज्येष्ठ बंधु आत्माराम । पुरुषोत्तम ज्येष्ठ बंधु ॥८॥
श्रीरामसेवा परम दान । श्रीरामसेवा परम ध्यान ।
श्रीरामसेवा परम सावधान । ब्रह्मज्ञान श्रीरामसेवा ॥९॥
श्रीरामसेवेचा करी आदर । तो सुखरुप नित्य नर ।
ऐसा मातेनें देवोनि वर । वना सौमित्र पाठविला ॥१०॥
यापरी वंदोनि जननी । निजपत्‍नीतें आश्वासुनी ।
दिव्यायुधें सवें घेवोनी । आला धांवोनी सौमित्री ॥११॥
आला देखोनि सौमित्रासी । अति उल्हास स्वयें सीतेसी ।
परम सुख श्रीरामासी । धरिला पोटासीं आल्हादें ॥१२॥
जो त्यागी निजकांतेसी । जो त्यागी वित्तविषयांसी ।
तोचि पढियंता श्रीरामासी । जीवीं अहर्निशीं आवडता ॥१३॥

तमुवाचात्मवान्रामः प्रीत्या लक्ष्मणागतम् ।
काले त्वमागतः सौम्य कांक्षिते मम लक्ष्मण ॥६॥
अहं प्रदातुनिच्छामि यदिदं मामकं धनम् ॥७॥

श्रीराम, सीता व लक्ष्मण आपले सर्व धन ब्राह्मणांस व गरीबांस दान देतात :

श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । यथाकाळीं शीघ्र आलासी ।
मी निजधन देईन दीनांसी । तूं त्या कार्यासी संपादी ॥१४॥
तूं सखा साह्य वनवासी । तूं सखा निजधर्मासी ।
तू सखा साह्य निजकर्मासी । सहाकारी होसी सर्वार्थी ॥१५॥
माझें निःशेष निजधन । मी धर्मार्थ करितों दान ।
तें वाटावया विधान । सावधान अवधारीं ॥१६॥
सर्वार्थीं सखा साह्यातें । आधीं पुजावें वसिष्ठातें ।
सर्वस्व अपार्वें श्रीगुरुतें । हा मुख्य आमुतें स्वधर्म ॥१७॥
धन धान्य असंख्याक । धाडावे गाईंचे कळप अनेक ।
वस्त्रें अर्पावीं अमोलिक । रथ वारु अलोकिक अर्पीं श्रीगुरुसी ॥१८॥
अनर्घ्य रत्‍नांचिया कोडी । भरोनि धाडाव्या कावडी ।
सद्‌गुरु पूजावा आवडी । निजपरवडी धर्माची ॥१९॥
तुवां जावोन सांगातें । स्वयें अर्पावें सद्‌गुरूतें ।
सुयज्ञ ज्येष्ठपुत्र त्यातें । आणीं येथें प्रार्थोनि ॥२०॥
वसिष्ठासी द्यावें धन । ऐकोनि श्रीरामाचें वचन ।
लक्ष्मणासी हर्ष पूर्ण । जावोनि आपण गुरु पूजी ॥२१॥
वसिष्ठ बोले उल्हासेसीं । त्रैलोक्यविजय श्रीरामासी ।
म्हणोनि त्याची सुबुद्धि ऐसी । पूर्णभाग्यासी प्रकाशक ॥२२॥
मग जावोनि सुयज्ञघरांसी । सौमित्र वंदी सुयज्ञासी ।
श्रीराम जातो वनासी । तेणें भेटीसी बोलाविलें ॥२३॥
ऐकोनि श्रीरामाचें गमन । सुयज्ञ जाला उद्विग्नमन ।
लावोनियां दोनी नयन । ठेला आपण तटस्थ ॥२४॥
मग करोनियां संध्यावंदन । सुयज्ञ आला जी आपण ।
देखतांची रघुनंदन । घाली लोटांगण सद्‌गुरुपुत्रा ॥२५॥
मधुपर्क विधिविधान । केलें यथोक्त पूजन ।
आपलीं भूषणें रघुनंदन । करी समर्पण गुरुपुत्रा ॥२६॥
जडित कुंडलें रत्‍नमेखळा । बाहुभूषणें अनर्घ्य माळा ।
करकंकणे मुद्रिका सकळा । शृंगारिला गुरुपुत्र ॥२७॥
श्रीराम स्वयें सांगे सीतेसी । म्हणे तूंही पूजीं सुयज्ञासी ।
तिनेंही अनर्घ्य अलंकारासी । दिधेलें त्यासी उल्हासें ॥२८॥
वना जातां श्रीरामासरिसीं । परम आल्हाद सीतेसी ।
सर्वस्व देतां सुयज्ञासी । निजमानसीं उल्हास ॥२९॥
अमूल्य वस्त्रें सीतेंपाशीं । तींही दिधली सुयज्ञासी ।
जडितशय्य्या आस्तरणेंसीं त्यावरी बैसवोनि सुयज्ञासी ॥३०॥
मातुळदत्त गज रामापासी । तो शृंगारोनि अलंकारेंसीं ।
त्यावरी बैसवोनि सुयज्ञासी । गज गजरेंसी बोळविला ॥३१॥
उल्हासें पूजी ना गुरुसी । जो भजेना सत्पात्रासी ।
तेंचि दूषण दात्यांसी । आम्हीं महाऋषी पूजावे ॥३२॥
श्रीराम सांगे सौमित्रासी । अगस्त्या शांदिल्या गार्ग्यऋषींसी ।
वामदेवादि कौशिकांसी । बहु धनराशी पाठवाव्या ॥३३॥
वेदपाठक अग्निहोत्री । सत्कर्माचार नित्यश्रोत्री ।
आगमिक महामंत्री । द्रव्यसंभारीं पूजावे ॥३४॥
ऐसियांसी दिधल्या दान । तें तव अतिशयेंसी पावन ।
सत्पात्र तें आहे आन । सावधान अवधारीं ॥३५॥

दान कोणास व कोणते द्यावे :

अयाचित भगवभ्दावें । आवस्यदान त्यासी द्यावें ।
आपण जावोनियां सवें । धन अर्पावें याचकां ॥३६॥
कुटुंबवत्सल आणि निर्धन । बहु अपत्य अत्यंत दीन ।
त्याचें सुखी होय मन । इतुकें धन अर्पावें ॥३७॥
शिलवृति आणि उंच्छवृत्ती । जावोनि त्यांच्या गृहाप्रती ।
जितुकें द्रव्य ते मागती । तितकें चतुर्गुणी तुं त्या देई ॥३८॥
त्यांसी कैंचें साधन शाक । गोसहस्त्र सवत्सक ।
त्यांसी द्यावें आवश्यक । घृत दधि तक्र भोजनार्थ ॥३९॥
धन धान्य कौसल्येघरीं । आधीं द्यावें धर्माचारीं ।
संन्यासी मधुकरी करपात्री । ब्रह्माचारी भिक्षार्थीं ॥४०॥
कौसल्येचे निजसेवक । आणि तिचे उपासक ।
तैसेच सुमित्रेचे देख । धन अनेक त्यां देई ॥४१॥
आमचे सुहृद आणि सेवक । परिचारिक आणि प्रेषक ।
कथाकथक पुराणिक । द्रव्य अनेक त्यां द्यांवे ॥४२॥
वार्तासूचक आणि गंधलेपक । सभास्थानीं हास्यभाषक ।
ते पावती परम सुख । त्या आवश्यक धन देई ॥४३॥
छत्रकार चामधारी । हडपी बारी आणि व्यवहारी ।
जळप्राशक धूपी फुलारी । सुखी करीं द्रव्यदानें ॥४४॥
मल्ल दर्शनी नटनाटक । अश्ववाहक वस्त्रप्रक्षाळक ।
रायविनोदी उपहासक । शिल्प्कारक सुखी करीं ॥४५॥
माझा सारथि चित्ररथ । त्यासी अर्पी अपार अर्थ ।
दीन सरिद्री जे जे समस्त । अर्थवंत ते करीं ॥४६॥
आमचे सखे सुहृद भक्त । जे कां आमचे नित्याश्रित ।
जे जे आम्हासी आर्तभूत । ते धनें समस्त सुखी करीं ॥४७॥
द्रव्य कांही ठेवणें नाही । निःशेष वेंचीं धर्मी सर्वही ।
आणिक जें जें लागेल कांही । तें तें पाहीं मी देईन ॥४८॥

खजिन्यातील द्रव्याचा विनियोग :

मग पाचारोनियां भांडारी । म्हणे निःशेष द्रव्य काढीं बाहेरी ।
त्यचिया विनियोगाची परी । ऐक निर्धारीं सौमित्रा ॥४९॥
कृपण अनाथ अति दीन । अंध पंगु वृत्तिहीन ।
जे जे मागती तें त्यां द्यावें धन । अति सन्मानें सुखी करीं ॥५०॥
सुख उपजे दिधल्या दान । त्याहूंनि सुख दे सन्मान ।
तेणें सुखें सुखावे भगवान । ये विधीं दान अति श्रेष्ठ ॥५१॥
वृद्ध ब्राह्मण स्त्रिया तरुण । बहु बाळकेसीं निर्धन ।
त्यांसी सन्मानें द्यावें धन । सूक्ष्मदान या नावें ॥५२॥
ऐषिया ब्राह्मणांचे ठायीं । सवत्सा आणी सुदोही ।
सहस्र अर्पी गाई । खिल्लारीं कांहीं उरों नेदीं ॥५३॥
माझें होय पुनरागमन । तंववरी खावया पुरे धन ।
ऐसें दीनासी द्यावें दान । सनातन हा धर्म ॥५४॥
मज वना गेलियापाठीं । कोणीं न व्हावे कष्टी ।
कोणी न पडावे संकटी । अगाध तुष्टीं धन देई ॥५५॥
श्रीरामें आज्ञा दिधली जैसी । लक्ष्मण दे त्याहूनि विशेषी ।
दान देतां लक्ष्मणासी । चौगुणा मानसीं उल्हास ॥५६॥

सर्वस्वाचे दान करून दशरथाचा निरोप घेतात , लोकांचा विषाद :

निःशेष वांटोनि धन । सीता श्रीराम आणि लक्ष्मण ।
करावया वनप्रयाण । निघालीं आपण राया पुसों ॥५७॥
राम सीता निघालीं बाहेरी । पाहॊं धांविन्नल्या नरनारी ।
एक चढले उपरीवरी । माडिया गोपुरीं पैं एक ॥५८॥
राम चालतां राजबिंदीं । सवें दाटली जनांची मांदी ।
कैकेयीची दुष्ट बुद्धी । राजा निर्बुद्धि कां आयके ॥५९॥
रथ गज चतुरंगश्रेणी । राम गजरें जाय प्रतिदिनीं ।
तो श्रीराम आजि अनवाणी । जातो चरणीं वनवासा ॥६०॥
राम देखतांचि निवती नयन । राम देखतांची निवे मन ।
राम देखतांची निवे जन । जगज्जीवन श्रीराम ॥६१॥
राम जगाचें जीवन । त्या जीवनी जन मीन ।
तो श्रीराम जातांची जाण । जनांचे प्राण जातील कीं ॥६२॥
ऐसिया सुखरूप श्रीरामासी । दशरथ धाडितो वनासी ।
कैकेयीग्रहें घेतलें त्यासी । लागलें रायासी स्त्रीपिसें ॥६३॥
सीता सुकुमार महासती । इंद्रादि देव पाहों न शकती ।
तेहीं चरणीं चलता क्षितीं । लोक देखती मार्गस्थ ॥६४॥
ऐसे बोलता जनांसी । तिघें अनुद्विग्न मानसीं ।
वेगीं आलीं राजगृहासी । दशरथासी पुसावया ॥६५॥
सुमंत प्रधान अति विश्वासी । तेणे सांगितलें रायासी ।
श्रीराम जातो वनवासासी । आज्ञा तुम्हांसी पुसों आला ॥६६॥
रामें वांटिलें निजधन । सेवक सुहृद आणि ब्राह्मण ।
सुखी केले दीन जन । वनप्रयाण सुमुहूर्तीं ॥६७॥
ऐकोनि सुमंताचे वचन । रायासी आलें पैं रुदन ।
जळो कैकेयीचें वदन । धाडी राम वनवासा ॥६८॥

श्रीरामांनी वनाचा निर्धार बदलावा म्हणून दशरथाची विनंती :

श्रीराम देखतां दृष्टीं । राजा मूर्च्छित पडला सृष्टीं ।
रामे उठविला उठाउठीं । स्वयें थापटी पर्यंकीं ॥६९॥
राजा होवोनि सावधान । श्रीरामासी बोले आपण ।
नको करूं वनप्रयाण । माझा प्राण जाऊण् पाहे ॥७०॥
कैकेयी ते मशक कोण । तुज मी राज्य देतों संपूर्ण ।
आतांचि करितों अभिषिंचन । ऋषिगणसमवेत ॥७१॥

वचन्भग होईल म्हणून श्रीरामांचा नकार :

श्रीराम लागला पायांसी । नको करूं अभिषेकासी ।
मिथ्या करितां भाकेसी । दोघें दोषी वेदोक्तें ॥७२॥
आतां मज राज्य घेतां । जग निंदील सर्वथा ।
तुझी भाक मिथ्या करितां । अधःपाता मी जाईन ॥७३॥
वेदवचन गुरुवचन । त्याहूनि अधिक पितृवचन ।
यावज्जन्म जो करी पाळण । त्याचें वचन अनुल्लंघ्य ॥७४॥
तुझे वचनें त्यागीन सीता । तुझें वचनें त्यागीन जीवीता ।
परी वनवासाचिया निश्चितार्था । मी सर्वथा त्यागींना ॥७५॥
माझा जरी जाईल प्राण । तरी त्यागीना वनप्रायाण ।
राया तुझी वाहतों आण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥७६॥

श्रीरामांचा दृढ निश्चय पाहून राजा सैन्य बरोबर देण्यास सांगतो :

देखोनि रामाचें निर्वांण । राजा करी दीर्घ रुदन ।
कैकेयीनें नागविले पूर्ण । राम निधान अंतरलें ॥७७॥
न विचारितां निजकार्यासी । भाक देवों नये स्त्रियांसी ।
तेणें भाके गोंवोनि आम्हांसी । केला वनवासी श्रीराम ॥७८॥
श्रीरामाचें दृढपण । वनभिगमनीं अति निर्वाण ।
रायें वृत्त जाणोन आपण । निजप्रधान आज्ञापिला ॥७९॥
सन्नद्ध चतुरंगसेना । रामासवें द्यावी वना ।
वनीं वेंचावया रघुनंदना । असंख्य धना सवें देई ॥८०॥
उष्णें पीडेल श्रीरामचंद्र । सवें देइजे छत्रचामर ।
कापडगृहे अति विचित्र । देईं खिल्लार धेनूंचे ॥८१॥

कैकेयी क्रोधाविष्ट, त्यामुळे राजाचा संताप :

ऐकोनि रायाचें वचन । कैकेयी जाली क्षोभायमान ।
आरक्त करोनियां नयन । काय आपण बोलिली ॥८२॥
घेवोनि उंसाच्या रसासी । बाकस देइजे जेवीं दीनासी ।
लक्ष्मी देवोनियां रामासी । भरता देसी शून्य राज्य ॥८३॥
दावोनि गज भद्रजाती । दानसंकल्प द्विजाहातीं ।
त्यासी दीजे चित्रींचा हस्ती । ते गतीं राज्य देणें ॥८४॥
माझें म्हणतां काळें मुख । तुम्ही दृष्ट नष्टविवेक ।
मिथ्या करिता आपली भाक । निश्चयें नरक भोगाल ॥८५॥
कैकेयीचें कठिण वचन । ऐकोनि राजा कोपायमान ।
नष्ट दुष्ट तूं अति कठिण । वर्मीं वाग्बाण विंधिसी ॥८६॥

सैन्यसंभार घेण्यास श्रीरामांचा विरोध :

श्रीराम म्हणे स्वामी दशरथा । सेनासंपत्ति सांगातें घेतां ।
राज्यभार आला माझे माथां । तो सर्वथा मी नेघें ॥८७॥
गंगोदक अति शुद्ध । त्यामाजि पडलिया मद्यबिंद ।
अवघेंचि होय अविशुद्ध । तेवीं विरुद्ध दुष्टसंगे ॥८८॥
तुम्ही राज्य दिधलें भरता । त्यातून अणुमात्रही घेतां ।
माझ्या वनवासाच्या व्रता । दोष तत्वतां लागेल ॥८९॥
ऐसें बोलतां श्रीरामासीं । कैकेयी वल्कलें दे त्यासी ।
वेगीं वेढोनि यांसी । शीघ्र वनासी निघावें ॥९०॥
सांडोनि वस्त्रें अलंकार । परिधान करावें वल्कलांबर ।
माथां धरोनि जटाबार । होई वनचर वनवासीं ॥९१॥
स्वयमेव देखतां दशरथ । वल्कलें वेढी श्रीरघुनाथ ।
लक्ष्मण येवोनि शीघ्र तेथ । स्वयें वेष्टित वल्कलें ॥९२॥
वल्कलें दिधली सीतेसी । तीं वेढितां नये तिसी ।
श्रीराम येवोनि तीपासीं । सुयुक्तीसीं नेसविलीं ॥९३॥
रामसौमित्रसीतेच्या वस्त्रांसी । कैकेयी घे आपणापासीं ।
देखोनि क्षोभ आला रायासी । अति निर्भत्सीं कोपयोगें ॥९४॥

वसुष्ठ गुरुंचा कोप व कैकेयीचा धिक्कार :

कोप आला वसुष्ठासी । निर्भर्त्सिलें कैकेयीसी ।
नष्ट दुष्ट शठ तूं होसी । न लाजसी अति स्वार्थें ॥९५॥
तुझिया वरदाच्या नेमासीं । एकला एक राम वनवासी ।
तूं कां वल्कलें देतेसी सीतेसी । दुष्ट होसी दुर्भगा ॥९६॥
वस्त्रें अळंकार त्यांचीं आतां । तूं कां घेसी सभेदेखतां ।
काळें वदन तुझें तत्वतां । मुख दावितां लाजसि ना ॥९७॥

दशरथाचा संताप :

दुस्तर कोप दशरथा । कैकेयीस मारूं धांवे लाता ।
तूं नव्हेसी माझी कांता । तुझा भर्ता मी नव्हें ॥९८॥
माझ्या बाळांची घेसी लुगडीं । तूं तंव रामा हाटींची धगडी ।
घरीं घातलीसे धांगडी । जाय रोकडी बैस हाटीं ॥९९॥
ऐसें क्रोधें बोलतां । गहिंवर आला दशरथा ।
पोटांसी धरोनियां सीता । होय अर्पिता आभरणें ॥१००॥

सीतेला वस्त्रसमर्पण :

चौदा वर्षें वनवासीं । वस्त्राभरणें पुरती ऐसीं ।
तितुकीं द्यावीं सीतेसी । सुमतांसी आज्ञापिलें ॥१॥
वस्त्रें भूषणें सीतेजवळीं । सुमंते दिधलीं ते काळी ।
दशरथा वंदी जनकबाळी । वंदी वेल्हाळी वसिष्ठासी ॥२॥
वसिष्ठें दिधलें आशीर्वचन । वनीं सतीत्वा पाळिसी पूर्ण ।
विजयी होईल रघुनंदन । तुज त्रिभुवन वंदील ॥३॥
राजा आज्ञापी सुमंता । शीघ्र आणीं माझिया रथा ।
बैसावया श्रीरघुनाथा । समेत सीतसौमित्र ॥४॥

तिघांचे पित्यास वंदन , सर्वत्र शोकाकुल आक्रोश :

रामलक्ष्मण प्रदक्षिणा । करोनि लागती पित्याचे चरणा ।
सात शतें माता जाणा । अभिवंदना तिहीं केलें ॥५॥
तंव तिहीं केला कोल्हाळ । अवघियांनी एकचि आरोळ ।
तंव राम निघाला तत्काळ । अति विव्हळ समस्तही ॥६॥
जातां देखोनि रघुनंदन । राजा पडिला मूर्च्छापन्न ।
रुदन करिती सकळही जन । दीनवदन अयोध्या ॥७॥
एकी माता कपाळ पिटिती । एकी दिर्घस्वरें हाका देती ।
एकी वक्षःस्थलें ताडिती । पडल्या बहुती मूर्च्छिता ॥८॥
श्रीराम म्हणे येथें राहतां । अधिक वाढेल ममता ।
रथीं वाहोनियां सीता । होय निघता तत्काळ ॥९॥
आक्रंदोनि आरडे निजमाता । म्हणे मुख पाहों दे रघुनाथा ।
केंवी मी देखेन मागुता । वदन श्रीरामा दाखवीं ॥११०॥
येई येईं रे माझ्या श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।
विव्हळ सांडोनियां आम्हां । वना दुर्गमा केंवी जासी ॥११॥
तुज निघतां बा रे वना । मज आला प्रेमाचा पान्हा ।
कोणासी पाजूं रघुनंदना । निजवदना मज दावीं ॥१२॥
वना जातां रघुनंदन । गायींचे गळती लोचन ।
अश्व गज करिती रुदन । दुःखे पाषाण उलताती ॥१३॥
डोहींचें आटतां जीवन । जेंवी तळमळती मीन ।
तेंवी अयोध्येचे जन । श्रीरामेंवीण तळमळती ॥१४॥
कैकेयी ते अति कठिण । सीतेचे हरी वस्त्राभरण ।
तीखालें येथें राहे कोण । करूं प्रयाण वनवास ॥१५॥

तिघांमागून सर्व नागरिक जातात :

निघाले ज्योतिषी वेदपाठक । निघाले अग्निहोत्री साग्निक ।
त्यांचिये समागमे देख । एक एक निघाले ॥१६॥
सुतार कुंभार नापिक । निघाले ते नटनाटक ।
रजक रंगारी चार्मिक । अनामिक निघाले ॥१७॥
निघाले भुसी साळी माळी । चाटी भाटी तेली तांबोळी ।
कोष्टी सोनार शिंपी गोवळी । कोळी माळी निघाले ॥१८॥
कैकेयी ती दुष्टबाधा । ती आम्हांसी पीडील सर्वदा ।
जिकडे राम तिकडे अयोध्या । सर्वांची श्रद्धा वनवासी ॥१९॥
श्रीराम जंव मागें पाहे । तंव नगरजन धांवती लवलाहें ।
राम सुमंतासी म्हणे राहें । जनसमुदाय केंवी येती ॥१२०॥

नागरिकांना अयोध्येत परतून जाण्याची श्रीरामांची विनंती :

श्रीराम स्वयें विनवी जन । दंड कारण्या मज गमन ।
दूरस्थ पंथ अति कठिण । तुम्हां आगमन तेथें नव्हे ॥२१॥
कृपा करोनियां मजवरी । तुम्हीं राहावें निजनगरीं ।
राजा दशरथ आहे शिरीं । सुखोद्गारीं नांदावें ॥२२॥
माझी आज्ञा पाळील भरत । तुम्हीं राहावें सुनिश्चित ।
ऐसें सांगोनि रघुनाथ । जन समस्त राहविले ॥२३॥
माझें स्मरण जया अहर्निशीं । मी अखंड तयापासीं ।
मज न विसरावें निजमानसीं । मी तुम्हांपासी सर्वदा ॥२४॥
यापरी राहवोनियां जन । श्रीराम करी वनाभिगमन ।
एकाजनार्दना शरण । पुढे निरुपण रसाळ ॥२५॥
रसाळ कथा रामायणी । वदली वाल्मीकाची वाणी ।
एका शरण जनार्दनीं । कृपासज्जनीं करावी ॥२६॥
स्वस्तिश्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामवनाभिगमनं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
॥ ओव्या १२६ ॥ श्लोक ७ ॥ एवं १३३ ॥



GO TOP