॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अयोध्याकाण्ड
॥ अध्याय सातवा ॥
सीता-लक्ष्मण वनगमननिर्धर
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांचा दृढ निश्चय ओळखून कौसल्या त्यांचे स्वस्तयन करते :
झाली कौसल्या सप्रसन्न । श्रीरामासी वनाभिगमन ।
करावया करि पुण्याहवाचन । स्वस्त्ययन अवधारा ॥१॥
निश्चितं तं तथा रामं विज्ञाय गमनोत्सुकम् ।
प्रास्थानिकं स्वस्त्ययनं कर्तृमेवोपचक्रमे ॥१॥
सा विनिय तमायासमुपस्पृश्य जलं शुचि ।
चकार माता रामस्यं मंगलानि मनस्विनी ॥२॥
गधैश्चापि समालभ्य राममायतलोचना ।
ओषधीं च सुसिद्धार्थां विशल्य करणीं शुभाम् ॥३॥
चकार रक्षां कौसल्या मंत्रैरभिजजाप च ।
देवानभ्यर्च्य विधिवत्पणम्य च शुभव्रता ॥४॥
वनीं व्हायया वनवासी । अति उल्हास श्रीरामासी ।
कौसल्या जाणोनि निश्चयेसीं । धाडी वनासी स्वस्तयनें ॥२॥
करोनि करचरणक्षाळण । कौसल्या करी शुद्धाचमन ।
करविलें देवतार्चन । रघुनंदननिजविजया ॥३॥
सुमनचंदनीं अति ओजा । पूजा केली अधोक्षजा ।
लोटांगणीं गरुडध्वजा । वनीं राम माझा तुं संरक्षीं ॥४॥
नाना जळें सेवितां पाहें । भोग उपजोंचि न लाहें ।
त्या औषधी आणोनि लवलाहें । बांधिल्या बाहे श्रीरामा ॥५॥
ज्या औषधी देखिल्याप्रती । राक्षस जीव घेवोनि पळती ।
त्याही आणोनि निश्चितीं । बांधिल्या हातीं श्रीरामा ॥६॥
वनवासीं नित्य निर्विघ्न । विजयी व्हावया रघुनंदन ।
सर्वीं सर्वांचे प्रार्थन । करी आपण कौसल्या ॥७॥
ब्रह्मदेवादिकांची रामरक्षणाविषयी प्रार्थना :
जगद्गुरु जो कां ब्रह्मा । तेणें रक्षावें श्रीरामा ।
सदाशिवासहित उमा । माझ्या श्रीरामा संरक्षू ॥८॥
विष्णु जो क त्रैलोक्यनाथ । तेणें रक्षाव माझा रघुनाथ ।
विचरता वनाआंत । साद्य संतत अहर्निशी ॥९॥
साह्य होऊत ऋषिगण । साह्य होऊत सिद्ध चारण ।
साह्य होऊत मरुदेवगण । रघुनंदनवनवासीं ॥१०॥
पूषा भगार्यमा धाता । मित्र चंद्र यम आदित्य ।
वरुण सुविधी विधाता । वनीं रघुनाथा रक्षावें ॥११॥
एकादश रुद्रादि देवतास प्रार्थना :
अकरा रुद्र चौदा विद्या । श्रीरामा साह्य होऊत सदा ।
मंत्र मूर्ति मंत्रानुवादा । राम सर्वदा रक्षवा ॥१३॥
वेदांमाजी अथर्वण । त्याचे मंत्र अति दारुण ।
श्रीरामा साह्य होऊत संपूर्ण । वनीं निर्विघ्न करावया ॥१४॥
सप्त ऋषीं आणि ब्रह्मऋषी । रामा रक्षोत देवऋषी ।
नारदा लागतें पायांसी । माझ्या रामासी तूं रक्षीं ॥१५॥
शनि भौम महाक्रूर । राहु केतु गुरु शुक्र ।
श्रीरामासी नव्हावे वक्र । अहोरात्र रक्षावें ॥१६॥
नक्षत्रें आणि नक्षत्रपती । ध्रुवें रक्षावा श्रीरघुपती ।
सप्तऋषींसीं अरुंधती । श्रीराममूर्ती तुम्ही रक्षा ॥१७॥
विजांसि येतें काकुळती । तुम्हीं न पदावें श्रीरामप्रती ।
नानाविधा दिव्यदीप्ती । तुम्हीं रघुपती रक्षावा ॥१८॥
बृह जंबुक सिंह व्याघ्र । आश्वलें तरस गौर तगर ।
सर्प शार्दूळ आणि वानर । तिहीं रामचंद्र रक्षावा ॥१९॥
मातलें म्हैसे उन्मत्त गज । मृग वराह आणि दिग्गज ।
वनदेवता नाचती भोज । तिहीं रघुराज रक्षावा ॥२०॥
महापक्षी अति दुर्धर । अग्निमुख नखें क्रूर ।
श्येन गीधा उलूक घार । तिहीं रामचंद्र रक्षावा ॥२१॥
जळींचे क्रूर जळचर । मत्स्य मगर महामकर ।
माझा रक्षावा रामचंद्र । निरंतर वनवासीं ॥२२॥
यश राक्षस पिशाचक । जे कां शिवाचे सेवक ।
तिहीं माझा रघुकुळटिळक । आवश्यक रक्षावा ॥२३॥
मार्गी चालतां रघुकुळटिळक । कंटक होवोनि निष्कंटक ।
दंश मशक गांधिलें वृश्चिक । तें विख निर्विख को रामा ॥२४॥
गमन शयन अशना । पृथ्वी साह्य होऊन रघुनंदना ।
त्यांना प्राशना मार्जना । श्रीरामा साह्य जाणा आपू ॥२५॥
तमनिरासीं प्रकाशघन । जठराग्निपदीपन ।
वनीं शीत निवारण । अग्नि संपूर्ण साह्य श्रीरामा ॥२६॥
करितां वनवास् प्रयाण । श्रीरामा साह्य संपूर्ण आकाशा ।
हृदयीं चिंतेचा पैं वळसा । अल्पही ऐसा रिघों नेंदीं ॥२८॥
दिशा आणि विदिशा । साह्य होऊत श्रीराम परेशा ।
हृदयीं दावोनि चिद्विलासा । चिंतेचा घसा निवटावा ॥२९॥
ऋतु मास संवत्सर । लवनिमेषादि तिथिवार ।
होरा मुहूर अहोरात्र । श्रीरामचंद्र रक्षावा ॥३०॥
यांहीवेगळे अरण्यवासीं । जे जे असती सामर्थेंसी ।
ते ते साह्य होऊत रामासी । तुमची दासी मी झालें ॥३१॥
इंद्र निघतां वृत्रवधासी । गुरूने मंगळें केलीं त्यासी ।
तीं तीं मंगळे तुजपाशीं अहर्निशीं तिष्ठोत ॥३२॥
गरुड जातां अमृतासी । विनतेनें मंगळें केलीं त्यासी ।
तीं मंगळे तुजपाशीं । अहर्निशीं तिष्ठोत ॥३३॥
हरें मर्दावया त्रिपुरासी । उमेनें मंगळें केलीं त्यासी ।
तीं तीं मंगळे तुजपाशीं । अहर्निशीं तिष्ठोत ॥३४॥
हरीनें मर्दितां मुरासी । रमेनें मंगळें केलीं त्यासी ।
तीं तीं मंगळे तुजपाशीं अहर्निशीं तिष्ठोत ॥३५॥
जळचर भूचर खेचर । उग्र रुद्र महाक्रूर ।
तेणेंसी साह्य करी श्रीशंकर । दासी किंकर मी त्यांची ॥३६॥
वनीं रक्षो तुज वामन । जनीं रक्षो जनर्दन ।
निरंजनीं मधुसूदन । तुज संपूर्ण संरक्षोत ॥३७॥
जळीं रक्षो तुज नारायण । स्थळीं रक्षो संकर्षण ।
रणीं रक्षो सिंहवदन । वितारण अभ्क्तांसी ॥३८॥
शयनीं रक्षो शेषशायी । शिव रक्षो स्मशानाचे ठायीं ।
सुषुप्तीमाझारी विदेही । चित्सुख पाहीं तुज रक्षो ॥३९॥
वनीं वसतां रघुनाथ । वीर्य धैर्य नव्हें च्युत ।
तो तुज राखो अच्युत । वनाआंत विचारतां ॥४०॥
तुज रक्षो आगमनिगम । तुज रक्षो स्थावर जंगम ।
तुझें संकट दुर्गम । पुरुषोत्तम निवारो ॥४१॥
जनवनां जो जीवन । निरंजना जो निजजीवन ।
ते तुज रक्षो जनार्दन । लोटांगण त्यासी माझें ॥४२॥
मातेचे करुणाकोमल हृदय :
म्यां प्रार्थिलें देव देवतां । म्यां प्रार्थिलें भूतां समस्तां ।
म्यां प्रार्थिलें आदिअच्युता । वनी रघुनाथा रक्षावया ॥४३॥
राम जगाचा निजजिव्हाळा । त्याहीवरी मातेचा कळवळा ।
अश्रु पूर्ण भरले डोळां । वेळोवेळां आलिंगी ॥४४॥
धणी न पुरे आलिंगीतां । धणी न पुरे मुख पाहतां ।
धणी न पुरे गुज बोलतां । निजमाता कृपाळु ॥४५॥
धणी न पुरे मुख मर्दितां । धणी न पुरे चुंबिता ।
धणी न पुरें हृदयीं धरितां । ऐसी निजमाता कृपाळु ॥४६॥
धणी न पुरे वदनीं गाता । धणी न पुरे नयनीं पाहतां ।
धणी न पुरे कृदयीं ध्यातां । निजमाता कृपाळु ॥४७॥
श्रीरामांचा प्रणिपात :
श्रीरामें येवोनि आपण । त्रिवार करोनि प्रदक्षिणा ।
वंदोनि मातेचे चरण । वनप्रयाण करियेलें ॥४८॥
देखोनि जननीचें वदन । पुढती नमन पुढती गमन ।
पुढती चाले लोटांगण । प्रेम पूर्ण मातेचें ॥४९॥
कौसल्येचा कळवळा :
देखोनि मातेचा कळवळा । श्रीराम कृपेचा कोवळा ।
आनंदाश्रु आले डोळां । बाष्पें गळा रोधिला ॥५०॥
तें देखोनि उठाउठीं । कौसल्यें राम धरिला पोटीं ।
ललाट मर्दोनि ललाटीं । घातली मिठी दृढ चरणीं ॥५१॥
वनाहूनि रघुनाथा । अयोध्येसी तूं येसील विजपता ।
कैं मी डोळां देखेन मागुतां । श्रीमुखता श्रीरामा ॥५२॥
मागुतेनि श्रीमुख देखेन । तैं होय डोळ्यां पारण ।
म्हणोनि आलिंगी जीवें प्राण । वियोगमन न सहावे ॥५३॥
माउलीचें प्रेम पूर्ण । तेणें अश्रु लोटले संपूर्ण ।
जालें श्रीरामचरणक्षालण । प्रक्षाळण निजदुःखा ॥५४॥
आकाशवाणीची गर्जना :
तंव गर्जली आकाशवाणी । श्रीरामा निजविजयो वनीं ।
दुःख नको करूं जननी । राम त्रिभुवनीं महाराज ॥५५॥
श्रीराम दंद्य ब्रह्मादि देवां । श्रीराम वंद्य दैत्यदानवां ।
श्रीराम वंद्य सर्व मानवां । श्रीराम स्वयमेव परब्रह्म ॥५६॥
श्रीराम स्वयें परात्पर । श्रीराम स्वयें स्वतंत्र ।
श्रीराम स्वयें चिन्मात्र । श्रीरामचंद्र परब्रह्म ॥५७॥
श्रीराम गुणी गुणातीत । श्रीराम जीवशीवातीत ।
श्रीराम स्वयें सदोदित । श्रीराम निश्चित परब्रह्म ॥५८॥
श्रीरामा नाहीं सुखदुःख । जे मानिती ते केवळ मूर्ख ।
ऐकतां कौसल्ये जालें सुख । हृदयीं हरिख कोंदाटला ॥५९॥
त्यामुळे कौसल्येच्या जीवाला समाधान :
ऐसी आकाशवाणी ऐकतां । परम सुख मायपुतां ।
मावळमी द्वंद्वदुःखता । उल्हासता वना धाडी ॥६०॥
मावळले संकल्प विकल्प । मावळलें द्वंद्वदुःख ।
श्रीराम वना जातां देख । परम हरिख कौसल्ये ॥६१॥
एकजनार्दना शरण । कौसल्या करोनि नीराजन ।
श्रीरामाचें वनप्रयाण । आल्हादें आपण करविलें ॥६२॥
जें स्वस्त्ययन रघुनंदना । तेंचि स्वस्त्ययन लक्ष्मणा ।
कौसल्येनें करोनि जाणा । दोघे वना धाडिले ॥६३॥
लागोनि मातेच्या चरणा । तीसी करोनि प्रदक्षिणा ।
वेगें निघावया वना । निजभावना राम आला ॥६४॥
राज्याभिषेका श्रीराममूर्ती । गजरें येईल रघुपती ।
ओंवाळावया सीता सती । घेवोनि आरति तिष्ठत ॥६५॥
तंव देखिला रामचंद्र । नाही छत्र ना चामर ।
नाहीं द्विजांचा जयजयकार । नायके गजर वाद्यांचा ॥६६॥
चरणां लागोनियां सीता । आदरें पुसे श्रीरघुनाथा ।
राज्याभिषेका न देखूं माथां । विलंबता कां जाली ॥६७॥
अभिषेक नाहीं तत्वतां । राज्यावीण उल्हासता ।
देखतसें मी रघुनाथा । हे मज कथा सांगावी ॥६८॥
राहिलें राज्याभिषिंचन । अति दूर वनाभिगमन ।
तरी रघुनाथा नव्हेचि दुर्मन । उल्हास पूर्ण पितृवाक्यें ॥६९॥
एकाकी राम वना जातां । तेणें सुखावे कैकेयी माता ।
भाके उत्तीर्णता दशरथा । तोचि रघुनाथा उल्हास ॥७०॥
श्रीराम म्हणे ऐक सीते । कैकेयीसी श्रीदशरथें ।
दोनी वरद दिधले होते । शुक्रविजयार्थें युद्धसंधीं ॥७१॥
शुक्रे रायाचा भंगिला रथ । कैकेयीयें चक्रीं सूदला हात ।
तेणें विजयी जाला दशरथ । तैं वरदार्थ वदला रावो ॥७२॥
तेची कैकेयीयें वर दोन । आजि मागितले आपण ।
एक मजला वनाभिगमन । शीघ्र प्रयाण आजीच ॥७३॥
राज्यांतील अणुप्रमाण । कांही न घ्यावें आपण ।
हे रायाची आज्ञाप्रमाण । शीघ्रप्रयाण आजीच ॥७४॥
दुसरे वरदें रायापासीं । राज्याभिषेक भरतासी ।
तेही मर्यादा नवपंचवर्षी । मग आम्हांसी रामराज्य ॥७५॥
ऐसी जानकीये जाली कथा । मज वनवासीं निघणें आतां ।
गुरुपुष्य या सुमुहूर्ता । तुज तत्वतां पुसों आलों ॥७६॥
श्रीरामांचा सीतेला उपदेश :
तूं कौसल्येपासीं । द्वेष म करावा कैकेयीसीं ।
हें गुह्य सांगतो तुजपासीं । तिचेन आम्हांसी अति कीर्ति ॥७७॥
कैकेयीचें वरदान । ते मज जालें सुप्रसन्न ।
समुद्रीं तरतील पाषाण । हें महिमान तिचेनि ॥७८॥
इनें वना न दवडिलें । प्रतापभांडार मज दिधलें ।
त्रिभुवनीं रामराज्य जालें । इचेनि बोलें वनवासीं ॥७९॥
जाणोनिया ऐसा स्वार्था । मज उल्हास वना जातां ।
हें त्वां जाणोनि तत्वतां । कैकेयी सर्वथा द्वेशूं नको ॥८०॥
जैसीं लक्षुमीनारायण । तैसें सासूसासऱ्यां भावून ।
सेवा करावी आपण । सावधान सभ्दावें ॥८१॥
सौमित्राची सखी जननी । कौसल्येहूनि अधिक मानीं ।
सुखीं करावी सेवा करूनी । अनुदिनीं निजभवनें ॥८२॥
माझी आज्ञा प्रमाण जैसी । भरताची आज्ञा मानीं तैसीं ।
विकल्प् न धरावा मानसीं । वरा देवरासी भेद न मानीं ॥८३॥
माझी आज्ञा आहे ऐसी । तुवां न जावें माहेरासी ।
वेगळें न रहावें निजमंदिरासीं । कौसल्येपासीं नित्य वस्ती ॥८४॥
जंव होय माझें पुनरागमन । तंववरी करावें माझें ध्यान ।
मुखीं माझे नामस्मरण । विस्मरण येवों नेंदी ॥८५॥
माझें ध्यान अहर्निशीं । उपमा नाहीं त्या सुखासी ।
माझेनि नामस्मरणॆं सुखी होसी । वियोगासी विसरोनी ॥८६॥
जानकीची दुःख, तिची विनंती :
ऐकोनि श्रीरामाचें वचन । हृदयीं लागला तो वाग्बाण ।
अश्रुपूर्ण झाले नयन । अधोवदन जानकी ॥८७॥
पतिवियोगाचे दुःख । तेणें कोरडें जालें मिख ।
हारपलें सकळ सुख । परम दुःख ओढवलें ॥८८॥
दुःखे जामी कासाविसी । मग लागली पतिपायासी ।
काय बोलिली श्रीरामासी । तें सावकाशीं अवधारा ॥८९॥
राज्यीं असतां श्रीरामासी । सेवा वांटिली सेवकांसी ।
तें मी एकली वनवासीं । सर्वस्वेसीं सेवीन ॥९०॥
सर्व सेवेचा निजस्वार्थ । मज लाभेल वनाआंत ।
सर्वज्ञ श्रीरघुनाथ । माझा मनोरथ पुरवावा ॥९१॥
मग बोलिला रघुनंदन । नेणसी वनवासाचें चिन्ह ।
वनवासीं दुःख दारुण । सावधान अवधारीं ॥९२॥
राज्यांतील अणुप्रमाण । घेवों नये वो आपण ।
त्यागोनियां वास्त्राभरण । पादत्राणें त्यागावीं ॥९३॥
वल्कलांचे वस्त्राभरण । कृष्णाजीन प्रावरण ।
तूं तंव सुकुमार पूर्ण । दुःख दारुण वनवासीं ॥९४॥
दंडकारण्य दुर्धर वन । तेथे वसावें आपण ।
पायीं चालता कंटक पूर्ण । दुःख दारुण वनवासीं ॥९५॥
सिंह शार्दूळ व्याघ्र वृक । तरस तगर मृग जंबुक ।
रीस वानर सर्प वृश्चिक । परम दुःख वनवासीं ॥९६॥
पतंग भृंग दंष्ट्री क्रूर । मकर सुसरी मत्स्य मगर ।
कंक बक पक्षी घोर । दुःख दुर्धर वनवासीं ॥९७॥
वनीं वनफळांचा आहार । तृणपर्णाचा सेजार ।
शीत उष्ण निरंतर । दुःख दुर्धर वनवासीं ॥९८॥
तूं तंव रायाची राजबाळा । अतिशयेंसीं वेव्हाळा ।
नवीं द्वंद्वदुःखउमाळा । तूं अबळा केंवि साहसी ॥९९॥
बाधेच्या भीतीचा सीतेकडून उपहास :
ऐकोनि द्वंद्वबाधावचन । सीता झाली हास्यवदन ।
जवळी असतां रघुनंदन । द्वंद्वबंधन बाधीना ॥१००॥
करितां तुझें नामस्मरण । द्वंद्वदुःखाचें निर्दळण ।
तो तूं जवळी असतां जाण । द्वंद्वबंधन मज कैचें ॥१॥
वृक व्याघ्र पंचानन । त्यांचा आत्मा रघुनंदन ।
तो तूं जवळी असतां जाण । द्वंद्वबंधन मज कैचें ॥२॥
जवळी असतां रघुकुळटिळक । कंटक होती निष्कटंक ।
विष तें होय पीयूख । परम सुख वनवासीं ॥३॥
पतिसहवासाचे महत्व, स्वतःला वनवासात नेण्याची सीतेची विनंती :
तुजसांगातें वनवास । तो मज वैकुंठ कैलास ।
तुजवेगळा संसार ओस । दुःख असोस मज तेव्हां ॥४॥
माझा स्वामी तू रघुनाथ । ऐक माझें मनोगत ।
तुजवेगळें जीवित । दुःखाभिभूत संसारू ॥५॥
पति प्रियेचें निजजीवन । पति प्रियेचें निजनिधान ।
पति प्रियेचें निजभूषण । तेणेंवीण ते अति दीन सुंदरा ॥६॥
पति प्रियेचें निजमूर्तीं । पति प्रियेचें निजात्मगती ।
पति प्रियेचें मुक्ती । होय उपहती त्यावीण ॥७॥
पति प्रियेचें निजशोभन । पति प्रियेचें निजमंडन ।
पति प्रियेचें सौजन्य । तेणेंवीण ते अति दीन ॥८॥
पति प्रियेचें निजवैभव । पति प्रियेचें सुख स्वमेव ।
पति प्रियेचें नित्यगौरव । तेणेंवीण पहा हो अति दीन ॥९॥
तूं तव माझा प्राणनाथ । तुजवेगळा मज प्राणांत ।
माझा परमात्मा रघुनाथ । हृदयस्थ अवधारीं ॥११०॥
जेव्हांचि तुझें वनप्रयाण । तुजसवें येती माझे प्राण ।
मागें मज राहिवतां जाण । अचुक मरण मज राम ॥११॥
कृपाळू तूं हृषीकेशी । ऐसीं बिरुदें तूं स्वयं वाहसी ।
तरी मज न्यावें वनासी निजसेवेसी दासत्वा ॥१२॥
म्हणोनि धरिले दोन्ही चरण । गहिवरें गळताती नयन ।
जालें पतिपाद प्रक्षाळण । श्रीराम पूर्ण तुष्टला ॥१३॥
कोणासही न पुसता । तुज म्यां सवें वना नेतां ।
म्हणतील स्त्रीजित कामलोलुपता । वना सीता राम नेतो ॥१४॥
जेणें चुके लोकनिंद्यता । जेणें स्वार्थ साधे परमार्था ।
ऐसिया सांगेन निजस्वार्था । तें तुवां शीघ्रता करावें ॥१५॥
लौकिकें मानिजे सर्वांसी । स्वार्थ पाविजे परमार्थासीं ।
ऐसिया सांगेन निजगुह्यासी । त्या कार्यासी तूं साधीं ॥१६॥
सीतेला राम वसुष्ठाची आज्ञा घेण्यास सांगतात :
भूत भविष्य वर्तमान । वसिष्ठाचे आहे ज्ञान ।
त्यासी रिघावें तुवां शरण । वनाभिगमन करावया ॥१७॥
रिघालिया सद्गुरूसी शरण विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
गुरुवचन उल्लंघी ऐसा कोण । हरिहर पूर्ण वंदिती ॥१८॥
आज्ञा पुसलिया वसिष्ठासी । ना न म्हणवे दशरथासी ।
मजही नुल्लंघवे आज्ञेसी । गुरुवाक्य जगद्वंद्व ॥१९॥
जयाचिया जाण वचनासाठीं । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
येवढा गुरू आमुचे गांठीं । हे गुह्य गोष्टी त्यासी पुसें ॥१२०॥
वसिष्ठांना विनंती केल्यावरून त्यांची अनुज्ञा मिळते :
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सीता हरिखली संपूर्ण ।
धरिले वसिष्ठाचे चरण । वनाभिगमनआज्ञार्थ ॥२१॥
मज न्यावया वनवासासी आज्ञा द्यावी श्रीरामासी ।
तूं तंव हृदयस्थ जाणसी । सर्वज्ञ होसी गुरुवर्या ॥२२॥
वसिष्ठ म्हणे श्रीरघुनाथा । वना अवश्य न्यावी सीता ।
इचेनि पावसी पुरुषार्थ । यश सर्वथा इचेनि ॥२३॥
सुरनर वानितील पवाडे । येवढी कीर्ति इचेनि जोडे ।
इयेसी घालोनियां पुढें । वना रोकडें निघावें ॥२४॥
कौसल्या म्हणे वनवासासी । श्रीरामा सीता न्यावी सरसी ।
येथे ठेवितां आम्हांपासी । देखतां इसी नित्य दुःख ॥२५॥
स्त्रीपुरुषां वेगळेपण । हें तंव मरणापरिस मरण ।
हेंचि स्त्रियेसी दुःख दारुण । पृथक् शयन पुरुषेंसी ॥२६॥
अयोध्येचे जनंची वार्ता । जे श्रीरामें वनासी न्यावी सीता ।
वचन मानलें श्रीरघुनाथ । वना निजकांता नेऊं इच्छी ॥२७॥
बाप श्रीरामाची करणी । सद्गुरुआज्ञा लाहोनी ।
लौकिक स्वयें संपादोनी । वना निजपत्नी नेऊं पाहे ॥२८॥
श्रीराम म्हणे सीतेसी । त्यजोनि वस्त्रांभूषणांसी ।
वल्कमांबरें परिधानेंसीं । वेगीं वनासी निघावे ॥२९॥
वस्त्राभरणें त्यागितां । उल्हास सीतेच्या निजचित्ता ।
धनधान्यादि वस्तुजाता आणोनि रघुनाथापुढें ठेवी ॥१३०॥
लक्ष्मणाची विनंती :
लक्ष्मण म्हणे रघुनाथा । तुम्ही सवें घेतली सीता ।
मीही वना येईन आतां । निजस्वार्था सेवावया ॥३१॥
श्रीराम म्हणे सौमित्रा । तूं मज निजाचा सोयरा ।
मागें धरावया राज्यधारा । जवळी तिसरा दिसेना ॥३२॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । लक्ष्मणें माडिलें निर्वाण ।
तुजवेगळा सांडिन प्राण । तुझी आण श्रीरामा ॥३३॥
वाहोनियां निर्वाण आड । दृढ धरिलें श्रीरामचरण ।
सोडवितां न सोडी जाण । कळवळोनि बोलत ॥३४॥
स्त्रियांना प्रमदा का म्हणतात :
तुम्ही दोघें वनवासी । आश्रमी सांडोनि सीतेसी ।
तूं जाशील वनफळासी । मागें इसी कोण रक्षी ॥३५॥
स्त्रियेसी मुळींहूनि रक्षण । माता संरक्षी बाळपण ।
कुमारपणीं पिता रक्षण । लग्न लाविलिया रक्षण सासूसासरे ॥३६॥
सासूसासरा भावे दीर । नणंदा जावादिकादि अपार ।
मुख्य रक्षण भर्तार । तेणें निरंतर रक्षावी ॥३७॥
अरक्षणता स्त्रियेसी । अनर्थ आला त्या घरासी ।
लांछन लावील त्या कुळासी । प्रमदा तिसी निजनाम ॥३८॥
प्रमासीं पाडी पतिपुत्रांसी । प्रमादी पाडी कुळगोत्रासी ।
यालागीं प्रमदा नम तिसीं । वेदशास्त्रांसी संमत ॥३९॥
लक्ष्मणाचा बरोबर येण्याचा हट्ट :
तुम्ही दोघें वनवासी । मी असलिया तुम्हांपासीं ।
आणीन फळमूळपुष्पांसी । अहर्निशीं रक्षण ॥१४०॥
तुझें वाहीन धनुष्यबाण । काष्ठें आणीन जीवन ।
तुम्हांसी करावया शयन । शेज करीन तृणपर्णीं ॥४१॥
तुझिया रंकाचाही रंक । मोलेंवीण मी सेवक ।
वनवासींचा पाइक । विश्वासुक आंगवणा ॥४२॥
वनीं एकली सांडितां सीता । अनर्थ होईल रघुनाथा ।
हा विचार पुसावा समर्था । श्रीरघुनाथा वसिष्ठासी ॥४३॥
लक्ष्मणाची निजयुक्ती । सत्य मानिली समस्तीं ।
एकली सीता वनाप्रती । ठेवितां निश्चितीं अनर्थ ॥४४॥
वसिष्ठांची अनुमती :
ऐकोनि लक्ष्मणाचें वचन । वसिष्ठ आज्ञा दे सर्वज्ञा सर्वज्ञ ।
तेणें खुणाविला रघुनंदन । वना लक्ष्मण स्वयें न्यावा ॥४५॥
ऐकोनि श्रीगुरुसंज्ञा । श्रीराम म्हणे लक्ष्मणा ।
जरी तुज येणें आहे वना । तरी धनधान्या वांटावें ॥४६॥
परिसतां श्रीरामाचें वचन । हर्षें निर्भर लक्ष्मण ।
एकजनार्दना शरण । वनप्रयाण अवधारा ॥१४७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अयोध्याकांडे एकाकारटीकायां जानकीलक्ष्मणवनाभिगमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥ ॥ ओंव्या १४७ ॥ श्लोक ४ ॥ एवं १५१ ॥
GO TOP
|