॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
कुंभकर्णवध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स्वतःची विद्रुपता समजल्यावर कुंभकर्णाचा खेद व संताप :

कुंभकर्णा लावोनि ख्याती । सुग्रीव पावोनि विजयवृत्ती ।
स्वयें आला श्रीरामाप्रती । वानर गर्जती उल्लासे ॥ १ ॥
येरीकडे कुंभकर्ण । विजयोल्लासें आपण ।
लंकेसीं जातसे जाण । दशानन वंदावया ॥ २ ॥
हांसती लंकेचे जन । हारवोनियां नाक कान ।
विजय मिरवितो आपण । काळें वदन कुंभकर्णा ॥ ३ ॥
कुंभकर्ण अति उन्मत्त । नाककानां झाला घात ।
कोणी सांगों न शके मात । तेणें लंकानाथ अति दुःखी ॥ ४ ॥
शत्रु मर्दिल कुंभकर्ण । ऐसा भरंवसा होता पूर्ण ।
शेखीं हरवोनि नाककान । आला आपण फेंपात ॥ ५ ॥
सुग्रीवें छेदिले नाककान । हें कुंभकर्णा व्हावया ज्ञान ।
दीर्घ काष्ठीं आरसा बांधोन । दावी रावण कुंभकर्णा ॥ ६ ॥
आरसा देखतां संमुख । आरशासीं भांडे देख ।
नापितहस्तें तूं काळमुख । मज निर्नासिक दाविसी ॥ ७ ॥
हातें पाहों जाता स्पष्ट । नाक कान सरसपाट ।
सुग्रीवे केलें यथेष्ट । अहा कटकट कुंभकर्णा ॥ ८ ॥
सुग्रीव पाहतां काखेतळीं । तेणें सुटोनि तेचि काळीं ।
नाककानां करोनि होळी । श्रीरामाजवळी तो गेला ॥ ९ ॥
जळो माझी रणव्युत्पत्ती । सम्मुखपणें विजयवृत्ती ।
कीर्ति जाली अपकीर्ती । केंवी लंकापती मुख दावूं ॥ १० ॥
हारवोनि नाककान । केंवी वंदूं दशानन ।
कोपें परतला कुंभकर्ण । वाररसैन्य निर्दळावया ॥ ११ ॥


कर्णनासाविहीनस्तु कुंभकर्णो महाबलः ।
रराज शोणितोत्सेकेर्गिरिः प्रस्रवणौरिव ॥१॥
पुनः स पुर्याः सहसा महात्मा निष्कम्य तद्वनरसैन्यमुग्रम् ।
बभक्ष रक्षो युधि कुंभकर्णः प्रजा युगांताग्नीरवि प्रदप्तिः ॥२॥
बुभुक्षितः शोणितमांसगृध्नुः प्रविश्य तद्वानरसैन्यमाशु ।
चखाद रक्षांसि हरीन्पिशाचानृक्षांश्च मोहाद्युधि कुंभकर्णः ॥३॥
एवं द्वौ त्रीन्वहुंश्चापि वानरान्सराक्षसैः सह ।
समादायैकहस्तेन मुखे प्रक्षिपति स्म सः ॥४॥

संतापातिरेकामुळे कुंभकर्णांचे विवेकशून्य वर्तन :

सुग्रीवें नेले नाककान । अपमानिला कुंभकर्ण ।
कोपें परतला आपण । वानरगण मारावया ॥ १२ ॥
नाकीं कानीं रुधिरधारा । रक्तें न्हाणिलें निशाचरा ।
गेरू शोभे जेंवी गिरिवरा । तेंवी साजिरा रणीं दिसे ॥ १३ ॥
सांडोनियां लंकाभवन । केलें कुंभकर्णें उड्डान ।
कर्दुनियां वानरगण । स्वयें आपण भक्षित ॥ १४ ॥
वटारोनियां दोनी नयन । पररोनियां दीर्घ वदन ।
भक्षीतसे वानरगण । कुंभकर्ण आक्रोशें ॥ १५ ॥
एक दोन तीन चोरी । वानरसैन्याचिया हारी ।
राक्षससैन्या त्याचि परी । मुखभीतरी घालीत ॥ १६ ॥
रणीं मातला अति दुर्धर । त्यासीं नाठवे आपपर ।
वानर आणि निशाचर । भक्षी एकत्र समसगट ॥ १७ ॥
प्रळयकाळीं हुताशन । सर्व भक्षिता होय आपण ।
तेंवी वानररक्षोगण । कुंभकर्ण भक्षित ॥ १८ ॥
मांस खावया येती भूतें । कुंभकर्ण भक्षी त्यांते ।
पिशाचें कंकाळें समस्तें । अस्वलांतें भक्षित ॥ १९ ॥


ते वध्यमाना हरयो रामं जग्मुः सतां गतिम् ।
राघवश्च समुत्पत्य धनुरुग्रं समाददे ॥५॥
स वानरगणैस्तैस्तु वृतः परपुरंजयः ।
लक्ष्मणानुगतो रामः संप्रतस्थे महाबलः ॥६॥

श्रीरामांचे प्रतिकारार्थ आगमन :

वृक्षशिळापर्वत पाषाण । वानरीं युद्ध करितां निर्वाण ।
रणीं नागवे कुंभकर्ण । आले धांवोन श्रीरामापाशीं ॥ २० ॥
कुंभकर्ण नाकेंविण । रणीं वानरां करितां कंदन ।
देखोनि कोपला रघुनंदन । धनुष्यबाण सज्जूनी ॥ २१ ॥
सुवर्णबंदी अति सुंदर । मणिरत्‍नांकित मनोहर ।
पाचूबंद परिकर । चाप गंभीर शोभत ॥ २२ ॥
ऐसिया सज्जोनियां धनुष्यासी । वानर घालोनि पाठींसीं ।
राम खवळला रणाभिनिवेशीं । कुंभकर्णासी निघटावया ॥ २३ ॥

बिभीषणाची श्रीरामांना विनंती :

श्रीरामें सज्जोनियां मेढा । उभा कुंभकर्णापुढां ।
राम नेटकां धनुर्वाडा । मागां पुढां हालों नेदी ॥ २४ ॥
दोहीं बाहीं वानरगण । निकटवर्तीं लक्ष्मण ।
रणीं क्षोभतां रघुनंदन । बिभीषण धांविन्नला ॥ २५ ॥
घालोनियां लोटांगण । वंदोनि श्रीरामचरणा ।
मृदु मंजुळ मधुर वचन । बिभीषण विनवीत ॥ २६ ॥
कुंभकर्णा आवडी मोठी । त्याची घेवोनियां भेटी ।
जंव मी सांगेन जीवींच्या गोष्टी । तंव शरवृष्टी न करावी ॥ २७ ॥
निवारुन वानरगणा । युद्ध ठेवोनि अर्ध क्षणा ।
भेटावया कुंभकर्णा । आज्ञापना मज द्यावें ॥ २८ ॥
कृपेनें बोले रघुनाथ । कुंभकर्ण अति उन्मत्त ।
रागें करील तुझा घात । कुळक्षयार्थ वाढेल ॥ २९ ॥
ऐकतां श्रीराम वचन । बिभीषणा आलें रुदन ।
प्रेम देखोनि रघुनंदन । आज्ञापन दीधलें ॥ ३० ॥


बिभीषणः पुरो दृष्ट्वा मालिनीय लघुः
सदा । करुणाक्रोधलज्जाभिर्व्याप्तो विहृलतां गतः ॥७॥
बिभीषणो महाबाहुः कुंभकर्णमुवाच ह ।
गदितं मे कुलस्यास्य रक्षणार्थमरिंदम ॥८॥
न कृतं सर्वरक्षोभिस्तस्तोऽहं राममागतः ।
क्षमितव्यं तु भवता सुकृतं दुष्कृतं तु वा ॥९॥
एवमुक्त्वाश्रुपूर्णाक्षो गदापाणिर्बिभीषणः ।
एकांतमाश्रितो भूत्वा चिंतयामास तत्क्षयम् ॥१०॥

कुंभकर्ण व बिभीषण यांची भेट :

संमुख देखोनि बिभीषण । कुंभकर्णा आलें रुदन ।
बाळपणापासून प्रतिपालन । येणें केलें ॥ ३१ ॥
माता पिता धाय धाता । त्याहून त्याची अधिक प्रेमता ।
त्यासी रावणें हाणितां लाता । अति विव्हलता स्फुंदत ॥ ३२ ॥
देखोनि कुंभकर्णाचें रुदन । स्वयें बोले बिभीषण ।
कुळरक्षणार्थ आपण । स्वहित संपूर्ण सांगितलें ॥ ३३ ॥
हा सविवेक प्रपंचहिता । हाचि हितार्थ परमार्था ।
त्यासी रावणें हाणितल्या लाथा । दुःखावस्था स्फुंदत ॥ ३४ ॥
ते स्वहिताची माझी मात । नायके इंद्रजित लंकानाथ ।
प्रधान परिवार समस्त । शेखीं प्रहस्त नायके ॥ ३५ ॥
लाथा हाणिल्या सभेप्रती । मज क्षोभ चढला नाही चित्तीं ।
बलात्कारें धरोनि हातीं । श्रीरामाप्रती दवडिलें ॥ ३६ ॥
यालागीं गा आपण । श्रीरामासीं आलों शरण ।
माझे अपराध जे दारुण । क्षमा संपूर्ण करावे ॥ ३७ ॥
ऐकता बिभीषणवचन । कुंभकर्णा आलें रुदन ।
दोघां पडिलें आलिंगन । स्रवती नयन दोघांचें ॥ ३८ ॥
बिभीषण धरोनि हातीं । कुंभकर्णो नेला एकांती ।
वैर करितां रघुपती । कुळसमाप्ती कुळाक्षयो ॥ ३९ ॥
देखोनियां अति एकांत । कुंभकर्ण सांगे अति भावार्थ ।
बिभीषणा तुझें भाग्य समर्थ । श्रीरघुनाथ पावलासी ॥ ४० ॥
करितां जप तप ध्यान । योगायोग अनुष्ठान ।
स्वप्नीं न दिसे रघुनंदन । तो सुप्रसन्न तुज जाला ॥ ४१ ॥


आत्मकार्यं कृतं वत्स यस्त्वं राममुपागतः ।
त्वमेको रक्षसां लोके सत्यर्माभिरक्षितः ॥११॥
नास्ति सत्याभिसक्तानां व्यसनं तु कदाचन ।
संतानर्थं त्वमेवैकः कुलस्यास्य भविष्यसि ॥१२॥
राघवस्य प्रसादाच्च रक्षसां राज्यमाप्स्यसि ।
प्रकृत्याहं सुदुर्धर्षः शीघ्रं मार्गादपक्रम ॥१३॥
नस्थातव्यं पुरस्तान्मे संभ्रमान्नष्टचेतसः ।
न वेद्मि संयुगे सक्तः स्वान्परान्वा निशाचर ॥१४॥
रक्षणीयोसि मे वत्स सत्यमेतद्व्रवीमि ते ॥१५॥

कुंभकर्ण रामाच्या हातून मरण्याची इच्छा व्यक्त करतो :

दोघे बंधूचा एकांत । कुंभकर्ण सांगे भावार्थ ।
पूर्णावतार श्रीरघुनाथ । निश्चितार्थ मी जाणें ॥ ४२ ॥
नारदवाक्याच्या निर्धारीं । श्रीराम अवतारां अवतारी ।
त्यासी पहातां वैराकारीं । करील बोहरी कुळाची ॥ ४३ ॥
श्रीराम वैरी करितां जाण । सुपुत्र ससैन्यप्रधान ।
क्षय पावेल रावण । हेंही संपूर्ण मी जाणे ॥ ४४ ॥
तुवां थोर केलें उचित । होवोनि श्रीरामा शरणागत ।
कुळ तारिलें निश्चितार्थ । आम्ही समस्त उद्धरिलों ॥ ४५ ॥
राक्षसांच्या कुळाप्रती । बिभीषणा तूं भावार्थी ।
तुझ्या ठायीं श्रीरामभक्ती । परम परमार्थीं तूं एक ॥ ४६ ॥
राक्षसकुळीं धर्मभुषण । सत्यानुवर्ती बिभीषण ।
तुझ्या धर्माचें निशाण । वैकुंठी जाण गाजत ॥ ४७ ॥
ज्याच्या ठायीं श्रीरामभक्ती । त्यास भय नाहीं कल्पांती ।
कळिकाळ शरण येती । पायां लागती महाविघ्नें ॥ ४८ ॥
रणीं खवळला श्रीरघुनाथ । करील राक्षसांचा घात ।
मजसकट लंकानाथ । कुळ समस्त निर्दाळील ॥ ४९ ॥
रिघोन श्रीरामासीं शरण । राक्षसकुळा संरक्षण ।
तूं वांचलासी बिभीषण । तिळतर्पण पिंडदाना ॥ ५० ॥
तुझें भाग्य अति समर्थ । तुज तुष्टाला श्रीरघुनाथ ।
लंकाराज्य होईल प्राप्त । जाण निश्चित बिभीषणा ॥ ५१ ॥
धन्य प्रतापी रघुनंदन । न जिणता दशानन ।
लंकाराज्य दिधलें दान । अन्यथा कोण करुं शके ॥ ५२ ॥
आम्हीं जोडिला लौकिकार्थ । दाटुगेपणाचा पुरषार्थ ।
तुवां जोडिला श्रीरघुनाथ । निजमोक्षार्थ राक्षसां ॥ ५३ ॥
लागतां श्रीरामाचे बाण । मी पावेन ब्रह्म पूर्ण ।
परम उल्लासें आपण । कुंभकर्ण अनुवादे ॥ ५४ ॥
घालोनियां लोटांगण । वंदून बिभीषणाचे चरण ।
श्रीरामासीं करावया रण आज्ञापन मज देईं ॥ ५५ ॥

कुंभकर्णाचा बिभीषणाला निरोप व रणभूमीवर आगमन :

मज कोप आल्या घोरांदर । युद्धीं नाठवे आपपर ।
तूं येथोनि परता सर । आम्ही निशाचर अविवेकी ॥ ५६ ॥
आम्ही राक्षस अति उन्मत्त । संमुख तुजला असतां येथ ।
अवचट होईल अनर्थ । नीग निश्चित सुबंधो ॥ ५७ ॥
तूं श्रीरामाचा शरणागत । तुज मारणें नाहीं येथ ।
जवळी असतां होईल अनर्थ । नीघ निश्चित सभाग्या ॥ ५८ ॥
ठाकूनि जाई श्रीरघुनाथ । तेथें तुज न लागे आघात ।
ऐसें बोलोनि कुंभकेत । रणाआंत निघाला ॥ ५९ ॥


मर्दंतं वानरान्संख्ये कालांतकयमोपमम् ।
तं दृष्ट्वा राक्षसश्रेष्ठं प्रदीप्तानलवर्चसम् ॥१६॥
विस्फारयामास तसा कार्मुकं पुरुषर्षभः ।
स तस्य चापनिर्घोषात्कुपितो नैर्‍ऋतर्षभ ॥१७॥
अमृष्यमाणस्तं घोषाममिदुद्राव राघवम् ।
तस्मिन्काले सुमित्रायाः पुत्रः परबलार्दनः ॥१८॥
चकार लक्ष्मणः क्रुद्धो युद्धं शस्त्रविदां वरः ।
स कुंभकर्णस्य शराञशरीरे सप्त वीर्यवान् ॥१९॥
निचखानाददे चान्यन्विससर्ज स लक्ष्मणः ।
अतिक्रम्य स सौ‍मित्रिं कुंभकर्णो महाबलः ॥२०॥
राममेवाभिदुद्राव कंपयन्निव मेदिनीम्॥२१॥

कुंभकर्णाच्या आगमनामुळे वानरसैन्य भयभीत :

जैसा काळ भूतां आंकळित । कां यम यमपाशीं बांधित ।
अंतक सगळाचि गिळित । तेंवी वानरांतें कुंभकर्ण ॥ ६० ॥
जेंवी वन्ही वनाआंत । वनस्थळी भस्म करित ।
तेंवी कुंभकर्ण वानरांत । कंदन करित कपिकुळा ॥ ६१ ॥

रामधनुष्याच्या टणत्काराने कुंभकर्ण दचकला :

करित वानरां मर्दन । येतां देखोनि कुंभकर्ण ।
तेणें क्षोभला रघुनंदन । धनुष्यबाण सज्जूनी ॥ ६२ ॥
करित धनुष्यीं टणत्कार । नादें दुमदुमिलें अंबर ।
कुंभकर्णाचें जिव्हार । अति दुर्धर दचकलें ॥ ६३ ॥
ऐकोनि चापगर्जन । कोपें खवळला कुंभकर्ण ।
लक्षुनियां रघुनंदन । सवेग आपण धांविन्नला ॥ ६४ ॥

कुंभकर्ण रागाने रामांवर चालून जात असता लक्ष्मण मध्ये येतो :

धावोनि येतां कुंभकर्ण । आडवा आला लक्ष्मण ।
धनुष्य सज्जोनि संपूर्ण । सात बाण विंधिले ॥ ६५ ॥
लागतांही सात बाण । डंडळीना कुंभकर्ण ।
तें देखोनि लक्ष्मण । बाण दारुण विंधिले ॥ ६६ ॥
अव्हेरुन त्याचे बाण । उपेक्षोनियां लक्ष्मण ।
लक्षूनियां रघुनंदन । कुंभकर्ण धावला ॥ ६७ ॥


कुंभकर्णो महातेजा राघवं वाक्यमब्रवीत् ।
नाहं विरोधो विज्ञेयो न कबन्धः खरो न च ॥२२॥
न वाली न च मारीचः कुंभकर्णमवैहि माम् ।
पश्य मे मुदरं घोरं सर्वकालायसं दृढम् ॥२३॥
अमेन निर्जिता देवा दानवाश्च मया रणे ।
शक्रश्च निर्जितो राम नप्ताहं च स्वयंभुवः ॥२४॥
विकर्णनास इति मां नावज्ञातुमिहार्हसि ।
अल्पापि हि न मे पीडा कर्णनासाविकर्तनात् ॥२५॥

लक्ष्मणाला अव्हेरुन कुंभकर्णाची रामांना दार्पोक्ती :

श्रीरामाची आंगवण । नोकोनि बोले कुंभकर्ण ।
रणीं मारिले रक्षोगण । ते उपेक्षून अनुवादे ॥ ६८ ॥
विराध नव्हे मी वनगोचर । त्रिशिरा दूषण नव्हे मी खर ।
मी तंव नव्हें वाळी वानर । दुश्चित्ता शर विंधावया ॥ ६९ ॥
कबंध नव्हें मी पायेंवीण । मारीच नव्हें मी कनकहरिण ।
माझें नांव कुंभकर्ण । रामलक्ष्मण मर्दावया ॥ ७० ॥
माझे हातींचा मुद्‌गर । तिखट तिख्याचा दुर्धर ।
येणें जिंतिलें सुरासुर । यक्ष किन्नर पन्नर ॥ ७१ ॥
दैत्य दानव मानव । येणें जिंतिलें म्या सर्व ।
रणीं मारावया राघव । घेवोनि धांव आलों असें ॥ ७२ ॥
इंद्र धरिला जीवें जीत । तो मी ब्रह्मयाचा नात ।
नाककानां जाला घात । उपेक्षित न मानावा ॥ ७३ ॥
नाककानांची हे व्यथा । अल्प बाधीना माझ्या चित्ता ।
उणीव नव्हेच पुरुषार्थ । रणीं रघुनाथा मर्दिन ॥ ७४ ॥

कुंभकर्ण मुद्‌गारानें श्रीरामांवर प्रहार करतो :

ऐकोनि कुंभकर्णवचन । रामें विंधिले दुर्धर बाण ।
तेणें न ढळे कुंभकर्ण । मग निर्वाण मांडिलें ॥ ७५ ॥
रामें विंधितां रुद्रास्त्र । त्याचे हृदयीं भेदला शर ।
अति विव्हळ निशाचर । हातींचा मुद्‌गर गळाला ॥ ७६ ॥
मुद्‌गर पडतांचि क्षिती । कोपें खवळला भर्दजाती ।
तोचि मागुता घेवोनि हातीं । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥ ७७ ॥
रणीं मर्दित वानर । आपुले भक्षी राक्षसभार ।
गिळित अश्व खर कुंजर । आपपर नोळखे ॥ ७८ ॥
रणीं मातला निशाचर । नोळखे आपपर ।
मारावया श्रीरामचंद्र । घेवोनि मुद्‌गर धांविन्नला ॥ ७९ ॥
मुद्‌गरेंसीं घेवोनि धांव । निकट ठाकिला राघव ।
तो जंव हाणीं घाव । केलें लाघव श्रीरामें ॥ ८० ॥


दर्शयेक्ष्वाकुशार्दूल वीर्यं गात्रेषु मेऽनघ ।
ततस्त्वां भक्षयिष्यामि दृष्टपौरुषविक्रमम् ॥२६॥
वायव्यमादाय ततो महास्त्रं रामः प्रचिक्षेप निशाचराय ।
समुद्ररं तेन जहार बाहुं निकृत्तबाहुस्तुमुलं ननाद ॥२७॥
स कुंभकर्णोऽस्त्रनिकृत्तबाहु र्महासिकृत्ताग्र इवाचलेंद्रः ।
उत्पाटयामास करेण वृक्षः ततोमिदुद्राव रणे नरेंद्रम् ॥२८॥
तं तस्य बाहुं सहशालवृक्षं समुद्यतं पन्नगभोगकल्पम् ।
इंद्रास्त्रयुक्तेन जहार रामो बाणेन जांबुनदभूषितेन ॥२९॥

श्रीराम कुंभकर्णाचा डावा हात तोडून टाकतात :

निकट येतां कुंभकर्ण । वायव्यास्त्र सज्जून ।
श्रीरामें सोडिला बाण । निजनिर्वाणसाटोपें ॥ ८१ ॥
धन्य त्या बाणाची नव्हाळी । मुद्‌गर असतांही करतळीं ।
बाहू छेचोन समूळीं । भूमंडळी पाडिला ॥ ८२ ॥
बाहुं छेदितां समूळीं । कुंभकर्ण आतुर्बळी ।
तेणें घायें न डंडळीं । आला आरोळी देऊनी ॥ ८३ ॥

उजव्या हाताने शालवृक्ष घेऊन कुंभकर्ण रामांवर धावला :

छेदिलिया वामहस्त । माझा न वचे पुरुषार्थ ।
दक्षिण हस्तें मी समर्थ । रणीं रघुनाथ मारावया ॥ ८४ ॥
श्रीराम लक्षून केवळ । दिर्घ उपडोनियां शाल ।
धांविन्नला उतावेळ । रणकल्लोळ संग्रामी ॥ ८५ ॥
रणीं सरकत थरकत । शालहस्तें तळपत ।
मारावया श्रीरघुनाथ । असे धांवत साटोपें ॥ ८६ ॥
श्रीरामाचे येतां बाण । शालहस्तें मोडून ।
रणीं मारावया रघुनंदन । आला गर्जोन कुंभकर्ण ॥ ८७ ॥
आजानुबाहु अत्यंत थोर । शोभा शोभे भुजंगाकार ।
मारावया श्रीरामचंद्र । शाल वृक्ष उचलिला ॥ ८८ ॥

श्रीरामांनी कुंभकर्णाचा उजवा हात इंद्रास्त्राने तोडला :

त्याचा जंव लागे घावो । तंव श्रीरामें करोनि लवलाहो ।
इंद्रास्त्र सज्जूनि पहा हो । सशाल बाहु छेदिला ॥ ८९ ॥
सुवर्णपत्री बाण शोभत । छेदोनि कुंभकर्णाचा हात ।
बाण परतोनि भातां रिघात । श्रीरघुनाथ प्रतापी ॥ ९० ॥
उभय भुजा रघुपती । छेदोनि पाडिलिया क्षितीं ।
धनुष्य ठेवोनियां हातीं । श्रीरघुपति राहिला ॥ ९१ ॥
उभय भुजा जाल्या क्षीण । रणीं निःशस्त्री कुंभकर्ण ।
त्या वीर न विंधी बाण । धर्मप्रवीण श्रीराम ॥ ९२ ॥

हस्तविहीन कुंभकर्णाने उड्डाण केलें :

कुंभकर्ण म्हणे श्रीरामासीं । तूं कां रे युद्ध न करिसी ।
प्रळयशक्ति आहे मजपासीं । तुम्हा दोघांसी मारावया ॥ ९३ ॥
मज न मानीं निःशस्त्री क्षीण । करोनियां रण‍उड्डाण ।
दोघां करीन शतचूर्ण । वानरसैन्यसमवेत ॥ ९४ ॥
ऐसें बोलोनि कुंभकर्ण । दुर्धर धांव घेतली जाण ।
मारावया रामलक्ष्मण । आला आपण साटोपें ॥ ९५ ॥
अमित विंधितां पैं बाण । मागें न सरे कुंभकर्ण ।
दोघां करावया शतचूर्ण । दीर्घ उड्डाण तेणें केले ॥ ९६ ॥


त कृत्तबाहुं समवेक्ष्य रामः समापतंतं सहसोन्नदन्तम् ।
ततोऽर्धचंद्रौ निशितो गृहीत्वा चिच्छेद पादौ युधि राक्षसस्य ॥३०॥
स कृत्तबाहुर्विनिकृत्तपादो विदार्य वक्र्त्रं वडवामुखाभम् ।
दुद्राव रामं सहसाभिगर्जन्‍राहुर्यथा चंद्रमिवांतरिक्षे ॥३१॥

श्रीरामांनी कुंभकर्णाचे दोन्ही पाय तोडलें :

बाहु छेदिल्या निशाचर । मारावया रामचंद्र ।
धांविन्नला अति सत्वर । कोपें दुर्धर उडाला ॥ ९७ ॥
सवेग घालोनि उड्डाण । चूर्ण करावे रामलक्ष्मण ।
येणें लाघवें कुंभकर्ण । आला धांवोनि आवेंशें ॥ ९८ ॥
म्हणे रामा राहें साहें । माझा यावा आला पाहें ।
तुझ कोण राखेल माये । गर्जोनि लवलाहें उडाला ॥ ९९ ॥
येतां देखोनि निशाचर । बाण काढिला अर्धचंद्र ।
ज्याची लागतांचि धार । छेदी जिव्हार वायूचें ॥ १०० ॥
श्रीराम धनुर्वाडा संपूर्ण । विंधोनि अर्धचंद्र बाण ।
उडतां विंधोनि दोनी चरण । कुंभकर्ण पाडिला ॥ १ ॥
नाहीं नाक नाहीं कान । छेदोनियां करचरण ।
रणीं पाडिला कुंभकर्ण । तरी आंगवण सांडीना ॥ २ ॥
पसरोनिया निजमुख । झेंपावे श्रीरामासंमुख ।
ते देखोनि शक्रादिक । अलोलिक मानिती ॥ ३ ॥
नाहीं नासिक नाहीं कर्ण । नाहीं त्यासी करचरण ।
अभिनव सोंग कुंभकर्ण । वानरगण हांसती ॥ ४ ॥
मुख नाडिले सुग्रीवें । करचरण खंडिले राघवें ।
कुंभकर्ण हें सोंग नवें । उचित पावे श्रीरामें ॥ ५ ॥
श्रीराम उदार चकवर्ती । त्यासी छेदोनि दरिद्रकुमती ।
त्यासी देईल ब्रह्मप्राप्ती । वेद गर्जती पवाडे ॥ ६ ॥

हस्तपादविहीत कुंभकर्णाचे धूड श्रीरामांना ग्रासावयास धांवले :

जेंवी कां राहु आकाशीं । ग्रासूं धांवे पूर्ण चंद्रासी ।
तेंवी कुंभकर्ण श्रीरामासी । ग्रासावयासी धांवत ॥ ७ ॥
सुवर्णपत्री श्रीरामबाण । मुखें ग्रासी कुंभकर्ण ।
जे जे सोडी रघुनंदन । ते ते आपण स्वयें ग्रासी ॥ ८ ॥


अथाददे सूर्यमरीचिकल्पं सब्रह्मदंडातककालतुल्यम् ।
अरिष्टमैंद्रं निशितं सुपुंखं रामः शरं मारुततुल्यवेगम् ॥३२॥
तं कार्मुके समाधाय विकेष्य च महाबलः ।
ससर्ज कुंभकर्णस्य वधाय शरमुत्तमम् ॥३३॥
दिव्यं मघवता दत्तं ज्वलंतमिव तेजसा ।
स विसृष्टो बलवता रामेण निशितः शरः ॥३४॥
कुंभकर्णस्य हृदयं भित्वा धरणिमाविशत् ॥३५॥

श्रीरामांचा कुंभकर्णाच्या हृदयावर बाणानें हल्ला :

निजमुखें कुंभकर्ण । रणांगणी ग्रासी बाण ।
तेणें क्षोभोनि रघुनंदन । शर दारुण सज्जिले ॥ ९ ॥
घ्यावया राक्षसाचा प्राण । जेंवी खडतर सूर्यकिरण ।
तैसे सज्जिले निर्वाणबाण । ज्यांसी निवारण असेना ॥ ११० ॥
श्रीरामें सज्जूनि कोदंड । काळदंड यमदंड ।
अनिवार ब्रह्मदंड । तैसाच प्रचंड शरविंधी ॥ ११ ॥
अरिघ्नास्त्र आणि रुद्रास्त्र । दोन्ही अस्त्रें अनिवार ।
रामें सज्जून समंत्र । रणीं रघुवीर विंधत ॥ १२ ॥
ऐसे विधितां निर्वाणबाण । हृदयीं भेदे कुंभकर्ण ।
घायीं पडला मूर्च्छापना । धरा भेदून शर गेला ॥ १३ ॥


अथाददे शरं चान्यं दिव्यं दिव्याभिमंत्रितम् ।
कुंभकर्णवधस्यार्थे राघवो हि महाबलः ॥३६॥
स तं महापर्वतकूटसन्निभं सुवृत्तदंष्ट्रं चलचारुकुंडलम् ।
चकर्त रक्षोधिपतेः शिरस्तदा यथैव वृत्रस्य पुरा पुरंदरः ॥३७॥
तद्रामबाणाभिहतं पपात रक्षःशिरः पर्वतसन्निकाशम् ।
बभंज पुर्या गृहगोपुराणि प्राकारमुच्चं तमपातयश्च ॥३८॥

कुंभकर्णाचा शिरच्छेद झाला तरी त्यांचे शिर रामांवर आलें :

हृदयीं भेदला बाण । तरी मरेना कुंभकर्ण ।
श्रीरामासीं करावया रण । उपरमे आपण साटोपें ॥ १४ ॥
ऐसें देखोनि जाण । दिव्यास्त्र परम निर्वाण ।
श्रीरामें सज्जिला बाण । कुंभकर्ण मारावया ॥ १५ ॥
सुवर्णपत्री सुतीक्ष्ण । श्रीरामे स्वयें अभिमंत्रून ।
मारावया कुंभकर्ण । निर्वाणबाण सोडिला ॥ १६ ॥
अचुकहस्ती श्रीरामचंद्र । पर्वतप्राय त्यांचे शिर ।
छेदूनि पाडिलें भूमीवर । तरी निशाचर मरेना ॥ १७ ॥
शिर उडोनि आकाशीं । ग्रासूं धांवे श्रीरामासी ।
धड गडबडित वेगेंसी । ये रघुरायासी रगडावया ॥ १८ ॥

रामांनी कुंभकर्णाचे धड लंकेमध्ये उडविल्याने लंकेमध्ये आकांत :

श्रीरामें शरधारी । शिर उडविलें अंबरीं ।
धड विंधोन बाणेंकरीं । लंकेमाझारीं पाडिलें ॥ १९ ॥
धड पाडितां लंकेआंत । तेथेंही मांडला आकांत ।
गृहें गोपुर पाडित । रगडूं रघुनाथ धड धांवें ॥ १२० ॥
धड धांवे रगडावयासी । तें पिटून घाली बाणेंसीं ।
शिर येता ग्रासावयासी । उडवी आकाशी शराग्रें ॥ २१ ॥
धड धांवे धरेंसी । शिर धांवे आकाशीं ।
श्रीराम पिटी त्या दोहींसी । लघुलाघवेंसीं बाणाग्रें ॥ २२ ॥

वरदाच्या बळाने कुंभकर्णाला पाठ दाखवेपर्यत प्राण जात नाही :

कुंभकर्णवरदाची थोरी । दुधड केलिया शरीरीं ।
पाठिमोरा न होतां वैरी । तो धरेवरी पडेना ॥ २३ ॥
शिववरदाची निजथोरी । रणीं पाठिमोरा जाल्या वैरी ।
तैंच पडावें धरेवरी । प्रेतापरी अचेतन ॥ २४ ॥

बिभीषणाची अर्धा क्षण पाठ दाखविण्याची श्रीरामांना विनंती :

बिभीषण म्हणे श्रीरामासी । क्षणार्ध पाठी द्यावी यासी ।
तरीच मरण कुंभकर्णासी । येरवीं आकल्प मरेना ॥ २५ ॥
ऐकतां बिभीषणवचन । क्षोभा चढला रघुनंदन ।
आकल्पांत करितां रण । पाठी आपण दावीना ॥ २६ ॥

सूर्यवंशास लांछनास्पद म्हणून श्रीरामांचा नकार :

तिळभरी मागें सरणें । तरी सूर्यवंशा आलें उणें ।
पूर्वजांसी लाजिरवाणें । निंद्य जिणें क्षत्रियांचे ॥ २७ ॥
मागें सरणे नाहीं सर्वथा । हें नित्य व्रत श्रीरघुनाथा ।
बिभीषणासीं परम चिंता । होय सांगता कपीप्रती ॥ २८ ॥
पाठी न देता रघुनंदन । आकल्प करितां रण ।
तरी मरेना कुंभकर्ण । अटक संपूर्ण ओढविलें ॥ २९ ॥
अंगदसुग्रीवादि जुत्पत्ती । अवघे गजबजिले ठाती ।
कोणे बुझवावा रघुपती । चिंतावर्ती समस्त ॥ १३० ॥
कार्य साधावया आकांत । एक बळियाढा हनुमंत ।
आतर्क्य साधील कार्यार्थ । तोही वृत्तांत अवधारा ॥ ३१ ॥

हनुमंताने शेपटीने श्रीरामांना डिंवचताच
श्रीरामांनी पाठ फिरविली व कुंभकर्णाचे धड पडले :

युद्ध करीतां धडशिरेंसी । हनुमान येवोनि पाठींसीं ।
पुच्छें डंवची श्रीरामासी । तो फिरोनि त्यासी पूसत ॥ ३२ ॥
राम फिरतां रणांगणीं । धडशिर पडलें धरणीं ।
जयजयकारें देववाणी । स्वर्गी निशाणीं गाजत ॥ ३३ ॥
एक वेळ जयजयकार । अवघे गर्जती वानर ।
विजयी झाला श्रीरामचंद्र । निशाचर पाडिला ॥ ३४ ॥
क्षोभो न देतां रघुनाथ । हनुमंतें साधिला कार्यार्थ ।
अवघे वानर आल्हादयुक्त । हारिखें गर्जत हरिनामें ॥ ३५ ॥
माझें राखोनि सत्यव्रत । कळो न देतां विमुख पुरुषार्थ ।
हनुमंते साधिला कार्यार्थ । तेणें रघुनाथ तुष्टला ॥ ३८ ॥
बळवंत विवेकवंत । भक्तिवैराग्य ज्ञानवंत ।
सर्वार्थां साधक हनुमंत । श्रीरघुनाथ तुष्टला ॥ ३७ ॥
ऐसें अनुवादोनि गुण । संतोषोन रघुनंदन ।
देवोनि हनुमंता आलिंगन् । सुखसंपन्न स्वयें केला ॥ ३८ ॥
सुखसंपन्न सुरगण । सुखसंपन्न सिद्ध चारण ।
सुखसंपन्न वानरगण । रणीं कुंभकर्ण पाडिला ॥ ३९ ॥


तं तु भूमौ निपतितं रक्षा विक्षिप्तभूषणम् ।
राक्षसानां सहस्रे द्वे कायेनातिव्यपोथयत् ॥३९॥
स चातिकायो हिमवत्प्रकाशो रक्षोधिपस्तोयनिधेः समीपे ।
ग्राहान्परान्मीनवरान्मुजंगान्विक्षोभ्य भूमिं च तथा पपात ॥४०॥
सवेगं पतता लंका प्राकारास्तोरणानि च ।
तस्मिन्निपतिते भूमौ चक्षुमे च महोदधिः ॥४१॥

कुंभकर्णाच्या शरीरावयवपाताने अनेक जीवांना त्रास :

मुकुट कुंडले सालंकार । विक्राळ दंष्ट्रा दशन क्रूर ।
कुंभकर्णाचें दीर्घ शरीर । रामें सत्वर छेदिले ॥ १४० ॥
श्रीरामें शिर छेदोनि बाणीं । सवग पाडितांचि धरणी ।
दोन सहस्र राक्षसश्रेणी । दडपोनि रणीं निमाले ॥ ४१ ॥
दडपोनि मारावया श्रीरामासी । धड गडबडितां आवेशीं ।
असंख्य दडपिलें राक्षसांसी । अति आवेशीं रणमर्दे ॥ ४२ ॥
शरीर रणवेगें गडबडित । जावोनि पडिलें समुद्रांत ।
तेथें जळचरांचा विघात । केला वृत्तांत तो ऐका ॥ ४३ ॥
तिमि तिमिंगिळ मत्स्य मगर । कच्छप नक्र जळचर ।
या अवधियाचा करितां चूर । गेले सत्वर पाताळा ॥ ४४ ॥
कुंभकर्ण पडतां तळीं । भूकंप जाला ते काळीं ।
गडबडिल्या लंकापौळी । समुद्र ते काळीं उचंबळला ॥ ४५ ॥
बैसतांचि रसातळीं । महाभुजंगाच्या मेळी ।
पन्नग दडपले देहातळीं । नेटेंपाटें बैसला ॥ ४६ ॥
जैसा हिमाचल गिरिवर । तैसें शरीर महाथोर ।
करित जळचरांचा चकचूर । गेले सत्वर रसातळा ॥ ४७ ॥

राक्षस-सैन्याची लंकेला माघार :

रणीं मारितां वानर । उरले जे का निशाचर ।
दीर्घ करोनि बोंबस्वर । रणीं सत्वर पळाले ॥ ४८ ॥
युद्धाभिघातें अति आंत । रणमारें जर्जरीभूत ।
कण्हत कुंथत कापत । लंकेआंत पळाले ॥ ४९ ॥
जेंवी इंद्रे मारिला वृत्रासुर । तेंवी रामें मारिला महावीर ।
सुमनें वर्षती सुरवर । जयजयकारें गर्जोंनी ॥ १५० ॥
एका जनार्दना शरण । रणीं मारोनि कुंभकर्ण ।
विजयी जाला रघुनंदन । सुखसंपन्न कपिकुळें ॥ ५१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
कुंभकर्णवधो नाम अष्टविंशतिमोऽध्यायः ॥ २८ ॥
ओंव्या ॥ १५१ ॥ श्लोक ॥ ४१ ॥ एवं ॥ १९२ ॥


GO TOP