॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय त्र्याहत्तरावा ॥
सीतेचे पाताळात आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


वानरसेनेसीं श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।
अयोध्ये येवोनि कार्यार्थ । पुढें काय वर्तला ॥१॥
मारोनियां कुंभकर्णपुत्र । विजयी झाला श्रीराम जानकीसहित ।
ऐसें ऐकोनि महंत । थोर थोर येते झाले ॥२॥
आले विबुध सुधापानी । आला अगस्ति ज्याची जननी ।
उर्वशी नामें प्रसिद्ध ॥३॥
ऐसिये शरयूतीरपुराभीतरी । सभासदनीं पौलस्त्यारी ।
बंधुपुत्रवेष्टित ऋषीश्वरीं । बैसजेल निजस्थानीं ॥४॥
कौसल्यादि माता जाण । पूरवासी नागरिक प्रधान ।
श्रीगुरू वसिष्ठ पावन । यांहीं विराजमान शोभत ॥५॥
जेंवी इंदुमंडळा पुढें मागें । परिवेष्टित तारागणें अनेगें ।
तैसें समस्तांसहित श्रीरंगें । सभासदानीं शोभिजे ॥६॥
जेंवी मानससरोवरीं । पक्षिये मुक्ताफळाहारी ।
जेंवी सुधापानियांमाजी शैलारी । तैसा राजेश्वरीं शोभे श्रीराम ॥७॥
कुळाचळामध्ये हिमगिरी । कीं समुद्रामध्यें पयोधरी ।
समस्त धातूंच्या शिरीं । शोभे सुवर्ण पैं जैसें ॥८॥
कीं श्वापदांमाजी शार्दूळ । कीं लतामृगांमाजी अंजनीबाळ ।
कीं अवतारांमध्यें विशाळ । त्रिविक्रम पैं जैसा ॥९॥
कीं तापसियांमाजी धूर्जटी । कीं ऋषींमाजी तपे ज्याची काठी ।
कीं जापकांमाजी दुजा सृष्टी । कर्ता विश्वामित्र ॥१०॥
कीं मुनींमाजी नारद । कीं पांडवांमाजी धर्म अगाध ।
कीं मुक्तींमाजी सायुज्यपद । तैसा अगाध शोभे श्रीराम ॥११॥
ऐसिये सभामंडळीं । मध्यें कैकेयी बोलली ते काळीं ।
तें अवधारावें सकळीं । आश्चर्य एक वाटतसे ॥१२॥
जानकीचे रुप यौवनें । भुलली कनकाची हरिणें ।
राज्य त्यागून रावणें । भिक्षुक होवोनि हरूं आला ॥१३॥
एवढे इचें सौंदर्य साजिरें । पक्षी भुललें कंठाक्षरें ।
ती जानकी वल्कांबरें । वेढोनि अशोकीं कैसी होती ॥१४॥
परिवेष्टित विशाळा क्रूरें । रक्षणें ठेविलीं दशकंधरें ।
तेथें इणें निजसामर्थ्याद्वारें । निजसत्व राखिलें कैसें ॥१५॥
जे तारुण्यें मुसमुसी वनिता । परदेशीं दृष्टसंगें असतां ।
तिचा पतिव्रताधर्म । हें थोर आश्चर्य होतसे ॥१६॥

कैकेयीच्या वचनानें जानकी दुःखित :

ऐसें कैकेयीचें कुरासवचन । ऐकोनियां समस्त जन ।
विस्मय पावोनि अधोवदन । जानकी पैं बैसली ॥१७॥
सापत्न सासूचे वाग्बाणीं । हृदयीं खोंचली जनकनंदिनी ।
जेंवी अनिळें कर्पूरजननी । थरारूं लागे निजांगें ॥१८॥
जेंवी कुवायूचेनि प्रसंगें । समुद्री नौका बुडूं लागे ।
नातरी दुर्जनवचनें भंगे । चित्तवृत्ती साधूंची ॥१९॥
हरिकथेचा मांडिला रंग । तेथें कुवार्ता येतां रसभंग ।
तैसें कैकेयीवाग्बाणें जग । जानकीसहित भेदिलें ॥२०॥
कीं तापसियावरी कामबाण । कीं पंडितांपुढें दुर्जन ।
तैसे कैकेयीशब्दें जन । जानकीसहित दुखावले ॥२१॥
उरगमाथां काटा नेहटे । कीं पालीचें पुच्छ तुटे ।
कीं पतिवियोगें फुटे । वनितेचें हृदय जैसें ॥२२॥
यापरीच ती राजबाळा । अधोवदन निस्तेजमुखकमळा ।
वहोट पडला सुखकल्लोळा । अमांतीं चंद्र जैसा ॥२३॥
सरोवरीं शोषलिया जीवन । कमळिणीं जाय सुकोन ।
तैसें जानकीचें हृदय गहन । चिंतासर्पिणीनें चाटिलें ॥२४॥
म्हणे आतां काय कारणे । किती वेळा दिव्य देणें ।
मी जरी शुद्ध अंतःकरणें । तरी या लोकां विपरीत वाटतसे ॥२५॥
सत्यवादी पहा जन । सोपहास मिथ्या वदोन ।
असंभाव्य देवोनिं मान । सत्य भाषण म्हणती त्याते ॥२६॥
तैसिया लोकांची वर्तती स्थिती । त्यासी निंदणें हेचि अयुक्ती ।
आपलें प्रारब्ध भोगती । अवश्यभावें भोगावें ॥२७॥
प्रारब्धें दमयंतीनळां । प्रारब्धें हरिश्चंद्रभूपाळा ।
प्रारब्धें पांडुपुत्रां सकळां । विवरद्वारें पैं नेलें ॥२८॥
बंधु जियेचा श्रीहरी । ऐसी ते द्रौपदी सुंदरी ।
वस्त्रें हरोनि दुराचारी । सभेमाजी नग्न करिते झाले ॥२९॥
तरी आतां प्रारब्ध प्रमाण । अवश्य भोगणें पडिलें जाण ।
कैकेयी बापुडें तें कोण । मजसी कठिण बोलावया ॥३०॥
ऐसें विचारोनि सीता देवी । मनातें विवेकमार्गीं लावी ।
पुढील कथा ते परिसावी । चतुर पंडितादिकीं ॥३१॥

जानकीची पृथ्वीला प्रार्थना :

जानकी म्हणे अवो धरणी माय । पुढें म्यां आतां काय करावें ।
तुवां मज हावोनि साह्य । ठाव द्यावा निजहृदयीं ॥३२॥
जन्मलें मी तुझ्या उदरीं । वाढलें विदेहाचे घरीं ।
नांदलें निजभाग्येकरीं । श्रीरामाची सेवा करुन ॥३३॥
काया वाचा निजमानसें जाण । आराधिला असेल श्रीरघुनंदन ।
तरी मज देई वस्तीसी स्थान । आपुलिये हृदयकमळीं ॥३४॥
पूर्वीं म्यां लंकेच्या प्रदेशीं । दिव्य दिधलें देखतां जगासी ।
तैं मिळाले होते महाऋषी । आणि इंद्रादि देवगण ॥३५॥
ब्रह्मा शिव आणि सुधापानी । आणि मिळाली होती कपिवाहिनी ।
या समस्तां देखतां प्रवेशोनि अग्नीं । दिव्य दिधलें श्रीरामा ॥३६॥
तरी आतां तेचि असती समस्त । तयांसी कळेल माझें मनोगत ।
परी न सोडी प्रारब्ध बळवंत । ठाकोनियां पुढें आलें ॥३७॥
जैसा दरिद्री आयास करी । उदीम न करी श्रमाचि उरी ।
तैसी मी निष्पाप जरी । तरी प्रारब्धभोग पुढें पावे ॥३८॥
निर्दैवें साधितां निधान । पुढें ठाके एखादें विघ्न ।
तैसें माझें दिव्य दारुण । मिथ्या गेलें जनवाणी ॥३९॥
करांडितां नारिकेळासी । चंचु चिरोनि झाली कैसी ।
तो शुक पुन्हां त्या वृक्षासी । कल्पांतीहीं न शिवे ॥४०॥
तरी या समस्तां देखतां जाण । माये धरणीचें हृदय प्रवेशून ।
साहिला न वचे निंदापमान । मिथ्यापवाद जनाचा ॥४१॥
ऐसें विचारोनि राघवसुंदरी । करुणावचनीं प्रार्थना करी ।
म्हणे माये अवनिये उदरीं । ठाव देईं मजलागीं ॥४२॥
मी वो तुझें अपत्य तान्हें । कृपा करीं मज उदार मनें ।
तुवां धरिलीं चतुर्दश भुवनें ।अगाधपणें निजहृदयीं ॥४३॥
तुवां हृदयींची परम वाड । उदरीं धरिला विरंचिअंड ।
सप्तसागर गिरी प्रचंड । तुझिये कुक्षीमाजी वसती ॥४४॥
अठरा भार वनस्पती । आणि विरंचीची प्रपंचस्थिती ।
या सकळां तूं जीवविती । ऐसी तुझी थोरीव ॥४५॥
ऐसें तुझें अगाधपण । तुझे ठायीं शांति दया पूर्ण ।
नाहीं मान्यता मानापमान । हें थोरपण तुज ऐसें साजे ॥४६॥
तुजलागीं जाळिती पोळती । चिरोनियां विदारिती ।
तयांतें तूं मिष्टान्नदाती । होतेसी उदारपणें ॥४७॥
तुजवरी एकीं स्वधर्मचरण । केलें त्याचा नाहीं अभिमान ।
गुजियानें कओर्नि आनेआन । तयाचा खेद न वाहसी ॥४८॥
एक तुजलागीं आर्तै पूजिती । दुजे लातांवरी तुडविती ।
त्यांचा न मानिसी विषमभाव चित्तीं । न धरिसी गंगेसारिखा ॥४९॥
तरी मी तुझें हृदयींचे बाळ । तूं माता परम दयाळ ।
मज हॄदयीं राख ये वेळ । अपत्य दीन म्हणोनि ॥५०॥
जरी म्यां निर्मळ मनें श्रीरघुनाथ । आरधिला असेल सत्य ।
तरी तूं ठाव देईं कृपायुक्त । निजअपत्य म्हणोनी ॥५१॥
लक्ष्मण ब्रह्मचारी । शेषावतार निर्धारीं ।
हें सत्य असेल निश्चयें तरी । निजोदरीं मज सांठवीं ॥५२॥
पांचाळी जे द्रुपदतनया । जे कां पांचां पांडवांची जाया ।
सत्य पतिव्रता म्हणती तिया । प्रातःस्मरणीं योगीश्वर ॥५३॥
पतिव्रता अनसूया इर्धारें । पतिचरण प्रक्षाळॊनि उरलेनि नीरें ।
ब्रह्मा विष्णू माहेश लेकुरें । पायावरीं न्हाणिलीं ॥५४॥
ते अनसूया आदिशक्ती । तिचे पुण्यें मज धरित्री ।
ठाव देईल काकुळती । देखोनि ग्लांती पैं माझी ॥५५॥
नैष्ठिक बटु अंजनीतनजु । कपिवाहिनीचा दक्षिणभुज ।
सत्य तरी तूं मज । निजहृदयीं राखावें ॥५६॥
ब्रह्मतनया अहल्या जाण । हें कां गौतमगृहींचें मंडण ।
इंद्रें भोगिली करोनि छ्ळण । ऋषिशापें पाषाण पैं झाली ॥५७॥
ते पविव्रता म्हणती पुराणीं । वदतसे व्यासादिकांची वाणी ।
तियेचे पुण्यें हे धरणी । निजहृदयीं सांठवो मातें ॥५८॥
सद्गुरु वसिष्ठ ब्रह्म पूर्ण । ऐसें बोले वेदपुराण ।
जरी म्यां केलें असेल् भजन । तरी मार्गदान मज दीजे ॥५९॥
गुरु माता गुरु पिता । सद्गुरूवांचोनि नाहीं दुजा तारिता ।
ऐसी सत्य वाचा असेल तरी आतां । पृथ्वी मार्ग देईल ॥६०॥

सीतेचा धरणीत प्रवेश :

ऐसें जानकीमुखीम्चें वचन । ऐकोनि धरा उल्हासोन ।
भाग्यद्वय झाली कारण । देखोनियां सीतेचें ॥६१॥
जेंवी स्वातीचे जळतुषारें । भागद्वय शिंपला अति आदरे ।
होवोनियां उदरीं नीरें । समावित वर्षाकाळीं ॥६२॥
जेंवी गौतमभगीरथसामर्थ्ये । भागद्वय गंगा आणिली येथें ।
पुढें पूर्वसमुद्रातें । मिश्रित होवोनि मिनलिया ॥६३॥
तैसी दों ठायीं झाली धरणी । ऐसे देखोनि श्रीरामपत्नी ।
नमस्कार करोनि सभासदनीं । श्रीगुरु मनीं चिंतिला ॥६४॥
हृदयीं धरोनि श्रीरामध्यान । नमस्कारोनि सिंहासन ।
धरणिये करोनि नमन । पुढें काय देखती झालीं ॥६५॥
अवलोकोनि पृथ्वींत पाहे । तों रत्नजडित सिंहासन माथां आहे ।
ऐसा एक पुरुष गमताहे । जानकीस ते समयीं ॥६६॥
माथां घेवोनि सिंहासन । तिष्ठत उभा राहोन ।
जेंवी स्वामिकार्यार्थ लक्षोन । सेवेसी भृत्य राहे ॥६७॥
पूजावया कैलासपती । पूजासंभार सेवका हातीं ।
घेवोनि निघे सहित पार्वती । पाताळभुवनातें ॥६८॥
पाताळी वसे हाटकेश्वर । तयाचें पूजेलागीं विद्याधर ।
सेवकमाथां नाना उपचार । देवोनियां जात जैसें ॥६९॥
किंवा शेष घेवोनि पृथ्वीभार । कीं कूर्मे पृष्ठ करोनि कठोर ।
तैसें माथां सिंहासन सुंदर । पुरुष एक उभा असे ॥७०॥
ऐसा अवनीच्या जठरीं । रत्नसिंहासन घेवोनि शिरीं ।
उभा तिष्ठत प्रतीक्षा करी । तें जानकीनें देखिलें ॥७१॥
संतोष झाला अति मनीं । म्हणॆ मज हे तुष्टली अवनी ।
शेषमाथां सिंहासन देवोनी । मज मूळ पाठविलें ॥७२॥
ऐसें भावोनि ते समयीं । जानकी सिहांसनीं बैसली पाहीं ।
मग प्रवेशती झाली हृदयीं । पृथीचिये ते काळीं ॥७३॥
भागद्वय अवनी एक झाली । जैसी स्वातीजळें शिंपीमुखें मिळालीं ।
याउपरी कथा वर्तली । ते श्रोतीं सादर ऐकिजे ॥७४॥
समस्तां झालें आश्चर्य । तटस्थ ठेले ऋषिवर्य ।
स्वर्गवासी देव सर्व । पुष्पवर्शाव करिते झाले ॥७५॥

सीतेच्या गमनामुळॆ सर्वांस दुःख :

वानरां झाले परम क्लेश । हनुमंता खेद बहुवास ।
दुःखें दाटला जगदीश । जानकीच्या गमनें हो ॥७६॥
चिंतातुर समस्त माता । सुख पावली कैकेय दुहिता ।
देव म्हणती चतुर सीता । किती अपवाद सोसील ॥७७॥
ऐसें वर्तलें ते समयीं । देखोनि श्रीराम शोकार्णवांत पाहीं ।
शोक करिता झाला वैदेही । हातींची गेली म्हणीनी ॥७८॥
अवो प्रिये तुजकारण । खडतर सेविलें अरण्य ।
पादपां पाषाणां आलिंगन । भ्रमोनियां देत होतों ॥७९॥
श्वापदां पुसें सीता कोठें । उल्लंघी खेटें खर्वटे ।
पायी मोडती दीर्घ कांटॆं । पडें उठें मूर्छित ॥८०॥
सीता सीता आक्रंदोनी । दश हिंडें मेदिनीं ।
मार्गीं भेटे तयालागोनी । पुसें जानकी कोणीं देखिली ॥८१॥
तुजलागीं वानरासीं सख्य केलें । तुजलागीं समुद्र शिळीं बुजिले ।
तुजलागीं अराक्षसी केलें । रावणा वधोनि लंकेसी ॥८२॥
विराधें हरिले जे काळीं । तैं अवेक्षितां वनस्थळीं ।
राक्षस वधोनिया धुळी । क्षणामाजी मेळविला ॥८३॥
चित्रकूटी काकें शतविक्षत केलें । तयावरी म्यां ईशिकेतें मोकलिलें ।
पुढें काग मागें ईषिका पाताळॆं । हिंडोनियां स्वर्गा गेली ॥८४॥
नारदवचनें तुज शरण । काग म्हणॆ ईषिका निवारीं दारुण ।
ग्लांति देखोनि माझें स्तवन । तयालागीं त्वां केलें ॥८५॥
तुझेनि वचनें तया न मारून । वामनेत्रास त्याच्या केलें छेदन ।
ऐसी आज्ञा प्रमाण । म्यां नाहीं उल्लंघिली ॥८६॥
ते तूं आजि कां वो रुसलीस । मज सांडोनि पाताळा गेलीस ।
तरी तुज काय पातले यश । पतिवचनास उल्लंघूनि ॥८७॥
मी काय तुझें चुकलों । कोणे अन्याया आचरलों ।
पूर्वी लोकलाजे भ्यालों । वना पाठाविलें म्हणोनी ॥८८॥
अवो अवनिये अवधारीं । माझी सीता तुझे उदरीं ।
जन्मलीं तुं माझी सासू खरी । जानकी पाठवीं मजपासीं ॥८९॥
तुझें उदरीम् उत्पन्न । झाली सीता निश्चयें जाण ।
तरी आतां पुनरपि दान । देईं वो तू मजलागीं ॥९०॥
ऐसी करुणा करितां राजीवनयनें । दुखावलीं समस्तांची मनें ।
गाईं दांतीं न धरती तृणें । न पीता जीवनें सीताविरहें ॥९१॥
क्रोधा चडला कार्मुकपाणी । अग्निबाण लावोनि गुणीं ।
म्हणॆ पूर्वीं सांडिली दाहोनी । पुनरपि दग्ध करीन ॥९२॥
माझी प्रिया हरिली इणें । न बोले मजसीं धरोनि मौनें ।
नवखंड करीन एक्या बाणॆं । रुद्रावेशें कोपला ॥९३॥
कोपला देखोनि चापशरपाणी । देव चिंतातुर मनीं ।
तंव विधाता पुढें होवोनी । बोलता झाला श्रीरामासी ॥९४॥
ब्रह्मा म्हणॆ श्रीरामचंद्रा । अरिदळणी प्रतापरुद्रा ।
कल्याणवंता भुजंगशयना राजेंद्रा । वचन गुणसमुद्रा अवधारीं ॥९५॥
अनंतब्रह्मांडांचा नायक । भास्करकुळीं कुळदीपक ।
पुण्यश्लोक त्र्यंबक । तुज ध्यात हृदयकमळीं ॥९६॥
तूं या चराचराभूतां प्रतिपाळिता । तुं या सकळां भूतां स्रजविता ।
प्रळयांती संहार करिता । कळीकाळा माथां आज्ञां तुझी ॥९७॥
तो तूं लीला सूत्रधारी । अवतार धरीसी नानापरी ।
विरंचिअंडांची माळ तुझ्या उदरीं । रोमरंथ्रीं भासत ॥९८॥
ऐसा तूं कैलोक्यनायक । अवतरोनि मायाकौतुक ।
खेळ खेळसी वाल्मीक । वदला होता पूर्वी जें ॥९९॥
अनागत भाष्य़ ऋषीश्वरें । वाल्मींकें कथिलें ब्रह्मवरें ।
शोधोनि पाह्लें विभागद्वारें । तीन अंश पैं केलें ॥१००॥
ती हे कथा येथपर्यंत । वाल्मीकमुखींची झाली सत्य ।
पुढें आता उरली किंचित । ते अनुपम्य पैं असे ॥१०१॥
ते श्रवण करावया अधिकारी । नाहींत जीव पृथ्वीवर ।
श्रीरामकथा अमृतलहरी । ऐकावया पुण्य पाहिजे ॥१०२॥

आकाशवाणी :

ऐसें शब्द चतुराननें । वदत असता मार्गगगनें ।
वाणी झाली ती रघुनंदनें परिसिली विधात्यसहित ॥३॥
ते वाणीचें रूप कैसें । तीस देह शिर वाचा नसे ।
अव्यक्त परी व्यक्त जैसें । वदे एखादा आगळें ॥४॥
आप्त एखादे अवस्रीं । संकटा हितोपदेश करी ।
तैसी ते समयीं वाचा अशरीरी । काय म्हणती पैं झाली ॥५॥
वाणी नव्हे ती गंधर्वनगरींची देवता । दुःखित देखोनि जामदग्न्यजेता ।
संबोधूं आली आप्तता । निजदुहितेच्या पतीतें ॥६॥
वाणी नव्हे ती कुळस्वामिनी । दुःखित श्रीरघुनाथ देखोनी ।
संबोखोनी हितवचनीं । काय बोलती पैं झाली ॥७॥
वाणी नव्हे हे कालरात्री । संबोखावया श्रीरघुपती ।
आश्वासनातें झाली देती । हितोपदेशवचनेंकरोनी ॥८॥
वाणी म्हणे श्रीरघुनंदना । पूर्णब्रह्म सनातना ।
योगियांच्या विश्रामस्थाना । कैलासरमणा प्रियकरा ॥९॥
भक्तजनभयभंगा । महेशाच्या प्राणलिंगा ।
भरतादिबंधुवर्गा । प्रियकरा श्रीरामा ॥११०॥
मदनाचिया तूं जनका । वैदेहीच्या प्राणनायका ।
मिथ्या सांडीं या शोका । उरग त्वचा पैं जैसी ॥११॥
वाल्मीकमुखीचें हें निरुपण । संपूर्ण कथिलें रामयण ।
ते हें झाले सत्य जाण । किंचित शेष उरलेंसें ॥१२॥
तें आकर्णिजे रविकुळभूषणा । अनागत भाष्य़ रामायणा ।
अधिकार नाहीं ये चराचरीं । पुत्रांसमवेत रावणारी ।
एकांतीं स्रवण पैं कीजे ॥१४॥
जानकीच्या वियोगें गहन । दीर्घ दुःख करणें मिथ्या जाण ।
तूं परमात्मा श्रीनारायण । लीला दाविसी नानापरी ॥१५॥
लक्ष्मी लागीं ये लोकीं । पुनश्चरणें साधकीं ।
करिजेताती ते लक्ष्मीनिकी । वैकुंठीं पैं वसताहे ॥१६॥
घेवोनि मायेची बुंथी । बहुरूपी सोंगे संपादिती ।
तैसी तुझी अवतारस्थिती । नाना चरित्रें दाखविसी ॥१७॥
तुझी भार्या हरिली रावणें । हें मिथ्या बोलावयाकारणें ।
लटकें जगीं मिरवणें । ऐसा खेळ खेळसी ॥१८॥
वृक्षापासोनियां छाया । हरिली हें बोलणॆं वायां ।
तैसी रावणें हरिली जाया । हें लौकिकीं उरलेंसे ॥१९॥
अमृतापासोनि गोडी । कोण चतुर बाहेर दवडी ।
सुवर्णांची कीळा काढी । ऐसें काय घडेल ॥१२०॥
मक्षिका सर्व रस चाखे । अग्नी भक्षितां मरण ठाके ।
उन्मत्त झालेनि जंबुकें । सिंहा काय जिंतवेल ॥२१॥
ऐसी लंकेशें तुझी भार्या । हरिली मिथ्या रघुराया ।
आपुलें पूर्णत्व शोधोनियां । निजस्थिती राहे उगा ॥२२॥
आकाशवाणीचीं ऐसी उत्तरें । परसोनियां श्रीरघुवरें ।
सभा विसर्जून दोन्ही पुत्र करें । धरोनी देवगृहीं प्रवेशला ॥ २३ ॥
सद्‌गुरु वसिष्ठासमवेत । देवगृहीं प्रवेशला रघुनाथ ।
एका जनार्दना विनवीत । सावचित्त परिसावें ॥ १२४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
जानकीपातालगमनं नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः ॥७३॥ ओंव्या ॥१२४॥

GO TOP