श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणेंद्रजित् पराक्रमं वर्णयित्वा राक्षसैर्भवान् रामं विजेष्यतीति रावणाय विश्वासदापनम् -
राक्षसांनी रावण आणि इंद्रजिताच्या बळ-पराक्रमाचे वर्णन करून त्यांस रामावर विजय मिळविण्यासंबंधी विश्वास देणे -
इत्युक्ता राक्षसेन्द्रेण राक्षसास्ते महाबलाः ।
ऊचुः प्राञ्जलयः सर्वे रावणं राक्षसेश्वरम् ॥ १ ॥

द्विषत्पक्षमविज्ञाय नीतिबाह्यास्त्वबुद्धयः ।
राक्षसांना ना नीतिचे ज्ञान होते आणि ना ते शत्रु पक्ष्याच्या बळाबळास जाणत होते. ते बलवान्‌ तर खूपच होते, परंतु नीतिच्या दृष्टीने महामूर्ख होते. म्हणून जेव्हा राक्षसराज रावणाने त्यांना पूर्वोक्त गोष्टी सांगितल्या तेव्हा ते सर्वच्या सर्व हात जोडून त्यास म्हणाले- ॥१ १/२॥
राजन् परिघशक्त्यृष्टि शूलपट्टिशसङ्‌कुलम् ॥ २ ॥

सुमहन्नो बलं कस्माद् विषादं भजते भवान् ।
राजन ! आमच्या जवळ परिघ, शक्ति, ऋष्टि, शूल, पट्टिश आणि भाल्यांनी युक्त फार मोठी सेना विद्यमान आहे, मग आपण विषाद का करत आहात. ॥२ १/२॥
त्वया भोगवतीं गत्वा निर्जिताः पन्नगा युधि ॥ ३ ॥

कैलासशिखरावासी यक्षैर्बहुभिरावृतः ।
सुमहत् कदनं कृत्वा वश्यस्ते धनदः कृतः ॥ ४ ॥
आपण तर भोगवती पुरीमध्ये जाऊन नागांनाही युद्धात परास्त करून टाकले होते. बहुसंख्य यक्षांनी घेरलेल्या कैलासशिखरावर निवास करणार्‍या कुबेरांनाही युद्धात फार मोठी मारपीट करून वश करून घेतले होते. ॥३-४॥
स महेश्वरसख्येन श्लाघमानस्त्वया विभो ।
निर्जितः समरे रोषात् लोकपालो महाबलः ॥ ५ ॥
प्रभो ! महाबलाढ्‍य लोकपाल कुबेर महादेवांशी मैत्री आसल्यामुळे आपल्या बरोबर फार स्पर्धा करीत होते, परंतु आपण समरांगणावर रोषपूर्वक त्यांना हरवलेत. ॥५॥
विनिहत्य च यक्षौघान् विक्षोभ्य विनिगृह्य च ।
त्वया कैलासशिखराद् विमानमिदमाहृतम् ॥ ६ ॥
यक्षांच्या सेनेला विचलित करून कैदी बनविले आणि कित्येकांना धराशायी करून कैलास शिखरावरून त्यांचे हे विमान पळवून आणलेत. ॥६॥
मयेन दानवेन्द्रेण त्वद्‌भयात् सख्यमिच्छता ।
दुहिता तव भार्यार्थे दत्ता राक्षसपुङ्‌गव ॥ ७ ॥
राक्षसशिरोमणी ! दानवराज मयाने आपल्याला घाबरूनच आपल्याला मित्र बनविण्याची इच्छा केली आणि याच उद्देशाने आपल्याला धर्मपत्‍नीच्या रूपाने आपली कन्या समर्पित केली. ॥७॥
दानवेन्द्रो महाबाहो वीर्योत्सिक्तो दुरासदः ।
विगृह्य वशमानीतः कुम्भीनस्याः सुखावहः ॥ ८ ॥
महाबाहु ! आपल्या पराक्रमाचा गर्व बाळगण्यार्‍या दुर्जय दानवराज मधुलाही, जो आपली बहीण कुंभीनसीला सुख देणारा तिचा पति आहे, त्यालाही आपण युद्ध छेडून वश करून घेतले आहे. ॥८॥
निर्जितास्ते महाबाहो नागा गत्वा रसातलम् ।
वासुकिस्तक्षकः शङ्‌खो जटी च वशमाहृताः ॥ ९ ॥
विशालबाहु वीर ! आपण रसातलावर चढाई करून वासुकि, तक्षक, शंख आणि जटी आदि नागांना युद्धात जिंकलेत आणि आपल्या अधीन करून घेतले आहेत. ॥९॥
अक्षया बलवन्तश्च शूरा लब्धवराः पुनः ।
त्वया संवत्सरं युद्ध्वा समरे दानवा विभो ॥ १० ॥

स्वबलं समुपाश्रित्य नीता वशमरिन्दम ।
मायाश्चाधिगतास्तत्र बह्व्यो वै रक्षसाधिप ॥ ११ ॥
प्रभो ! शत्रुदमन राक्षसराज ! दानवलोक फारच बलवान्‌, कुणाकडूनही नष्ट न होणारे, शूरवीर तसेच वर मिळवून अद्‌भुत शक्तीने संपन्न होऊन गेले होते, परंतु आपण समरांगणात एक वर्षापर्यंत युद्ध करून आपल्याच बळाच्या भरवशावर त्या सर्वांना आपल्या अधीन करून घेतलेत आणि तेथे त्यांच्याकडून बर्‍याचशा मायाही प्राप्त केलात. ॥१०-११॥
शूराश्च बलवन्तश्च वरुणस्य सुता रणे ।
निर्जितास्ते महाभाग चतुर्विधबलानुगाः ॥ १२ ॥
महाभाग ! आपण वरुणाच्या शूरवीर आणि बलवान्‌ पुत्रांनाही त्यांच्या चतुरंगिणी सेनेसहित युद्धात परास्त केले होते. ॥१२॥
मृत्युदण्डमहाग्राहं शाल्मलिद्रुममण्डितम् ।
कालपाशमहावीचिं यमकिङ्‌करपन्नगम् ॥ १३ ॥

महाज्वरेण दुर्धर्षं यमलोकमहार्णवम् ।
अवगाह्य त्वया राजन् यमस्य बलसागरम् ॥ १४ ॥

जयश्च विपुलः प्राप्तो मृत्युश्च प्रतिषेधितः ।
सुयुद्धेन च ते सर्वे लोकास्तत्र सुतोषिताः ॥ १५ ॥
राजन्‌ ! मृत्युचा दंड हेच ज्यामध्ये महान्‌ ग्राहाप्रमाणे आहे, जो यम-यातना संबंधी शाल्मलि आदि वृक्षांनी मंडित आहेत, काळपाशरूपी उत्ताल तरंग ज्याची शोभा वाढवतात, यमदूतरूपी सर्प ज्यात निवास करतात तसेच जो महान्‌ ज्वरामुळे दुर्जय आहे, त्या यमलोकरूपी महासागरात प्रवेश करून आपण यमराजांच्या सागरा सारख्या सेनेला घुसळून काढले, मृत्युला रोखून धरले आणि महान विजय प्राप्त केला. एवढेच नव्हे तर युद्धाच्या उत्तम कलेने आपण तेथील सर्व लोकांना पूर्ण संतुष्ट केले होते. ॥१३-१५॥
क्षत्रियैर्बहुभिर्वीरैः शक्रतुल्यपराक्रमैः ।
आसीद् वसुमती पूर्णा महद्‌भिरिव पादपैः ॥ १६ ॥
पूर्वी ही पृथ्वी विशाल वृक्षांप्रमाणे इंद्रतुल्य पराक्रमी बहुसंख्य क्षत्रिय वीरांनी भरलेली होती. ॥१६॥
तेषां वीर्यगुणोत्साहैः न समो राघवो रणे ।
प्रसह्य ते त्वया राजन् हताः परमदुर्जयाः ॥ १७ ॥
त्या वीरांमध्ये जो पराक्रम, जे गुण, जो उत्साह होता त्या दृष्टीने राम रणभूमीमध्ये त्यांच्या समान कदापि नाही आहे. राजन ! जर आपण त्या समर दुर्जय वीरांनाही बळपूर्वक मारून टाकले होते तर रामावर विजय मिळविणे आपल्यासाठी काय मोठीशी गोष्ट आहे ? ॥१७॥
तिष्ठ वा किं महाराज श्रमेण तव वानरान् ।
अयमेको महाबाहुः इंद्रजित् क्षपयिष्यति ॥ १८ ॥
अथवा महाराज ! आपण गुपचुप येथेच बसावे. आपल्याला परीश्रम करण्याची काय आवश्यकता आहे ? एकटे हे महाबाहु इंद्रजितच सर्व वानरांचा संहार करून टाकतील. ॥१८॥
अनेन च महाराज माहेश्वरमनुत्तमम् ।
इष्ट्‍वा यज्ञं वरो लब्धो लोके परमदुर्लभः ॥ १९ ॥
महाराज ! यांनी परम उत्तम माहेश्वर यज्ञाचे अनुष्ठान करून असा वर प्राप्त केला आहे जो संसारात दुसर्‍यांना अत्यंत दुर्लभ आहे. ॥१९॥
शक्तितोमरमीनं च विनिकीर्णान्त्रशैवलम् ।
गजकच्छपसंबाधं अश्वमण्डूकसंकुलम् ॥ २० ॥

रुद्रादित्यमहाग्राहं मरुद् वसुमहोरगम् ।
रथाश्वगजतोयौघं पदातिपुलिनं महत् ॥ २१ ॥

अनेन हि समासाद्य देवानां बलसागरम् ।
गृहीतो दैवतपतिः लंकां चापि प्रवेशितः ॥ २२ ॥
देवतांची सेना समुद्राप्रमाणे होती. शक्ति आणि तोमरच त्यातील मत्स्य होते. उखडून फेकून दिलेल्या शेवाळाचे काम करत होती. हत्ती हेच त्या सेना-सागरात कासवांप्रमाणे भरलेले होते. घोडे बेडकांप्रमाणे सर्वत्र व्याप्त होते. रूद्रगण आणि आदित्यगण त्या सेनारूपी समुद्रातील मोठमोठे ग्राह होते. मरुद्‌गण आणि वसुगण तेथील विशाल नाग होते, रथ, हत्ती आणि घोडे जळराशीसमान होते आणि पायदळ सैनिक त्याचे विशाल तट होते, परंतु या इंद्रजिताने देवतांच्या त्या सैन्य-समुद्रात घुसून देवराज इंद्राला कैद करून टाकले आणि त्यांना लंकापुरीत आणून बंद करून ठेवले. ॥२०-२२॥
पितामहनियोगाच्च मुक्तः शंबरवृत्रहा ।
गतस्त्रिविष्टपं राजन् सर्वदेवनमस्कृतः ॥ २३ ॥
राजन्‌ ! नंतर ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून यांनी शंबर आणि वृत्रासुर यांना मारणार्‍या सर्व वेदवंदित इंद्रांना मुक्त केले, तेव्हा ते स्वर्गलोकात गेले. ॥२३॥
तमेवं त्वं महाराज विसृजेन्द्रजितं सुतम् ।
यावद्वानरसेनां तां सरामां नयति क्षयम् ॥ २४ ॥
म्हणून महाराज ! या कामासाठी आपण राजकुमार इंद्रजितांनाच धाडावे, ज्यायोगे हे रामांसहित वानरसेनेचा येथे येण्यापूर्वीच संहार करून टाकतील. ॥२४॥
राजन्नापदयुक्तेयं आगता प्राकृताज्जनात् ।
हृदि नैव त्वया कार्या त्वं वधिष्यसि राघवम् ॥ २५ ॥
राजन्‌ ! साधारण नर आणि वानरांकडून प्ताप्त झालेल्या या आपत्तीविषयी चिंता करणे आपल्यासाठी उचित नाही. आपण तर आपल्या हृदयात या गोष्टीला स्थानच देता कामा नये, आपण अवश्यच रामाचा वध करून टाकाल. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सातवा सर्ग पूर्ण झाला. ॥७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP