[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ द्वात्रिशं सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शूर्पणखाय कङ्‌कायां रावणस्य पार्श्वे गमनम् - शूर्पणखेचे लंकेत रावणाजवळ जाणे -
ततः शूर्पणखी दृष्ट्‍वा सहस्राणि चतुर्दश ।
हतान्येकेन रामेण रक्षसां भीमकर्मणाम् ॥ १ ॥

दूषणं च खरं चैव हतं त्रिशिरसं रणे ।
दृष्ट्‍वा पुनर्महानादान् ननाद जलदोपमा ॥ २ ॥
तिकडे शूर्पणखेने जेव्हा पाहिले की श्रीरामांनी भयंकर कर्म करणार्‍या चौदा हजार राक्षसांना केवळ एकट्‍याने ठार मारले तसेच युद्धाच्या मैदानात दूषण, खर आणि त्रिशिरालाही मृत्युच्या स्वाधीन केले तेव्हा ती शोकामुळे मेघगर्जने प्रमाणे पुन्हा अत्यंत जोरजोराने घोर चीत्कार करू लागली. ॥१-२॥
सा दृष्ट्‍वा कर्म रामस्य कृतमन्यै सुदुष्करम् ।
जगाम परमोद्विग्ना लङ्‌कां रावणपालिताम् ॥ ३ ॥
दुसर्‍यांना अत्यंत दुष्कर असणारे कर्म श्रीरामांनी करून दाखविले. हे आपल्या डोळ्यानी पाहून ती अत्यंत उद्विग्न झाली आणि उठून रावणद्वारा सुरक्षित लंकापुरीला गेली. ॥३॥
सा ददर्श विमानाग्रे रावणं दीप्ततेजसम् ।
उपोपविष्टं सचिवैर्मरुड्‌भिरिव वासवम् ॥ ४ ॥
तेथे पोहोचल्यावर तिने पाहिले की रावण पुष्पक विमानात (अर्थात् सात मजली राजवाड्‍याच्या) वरील भागात बसलेला आहे. त्याचे राजोचित तेज उद्दिप्त होत आहे तसेच मरुद्‌गणांनी घेरलेल्या इंद्राप्रमाणे तो आसपास बसलेल्या मंत्र्यांनी वेढलेला आहे. ॥४॥
आसीनं सूर्यसंकाशे काञ्चने परमासने ।
रूक्मवेदिगतं प्राज्यं ज्वलन्तमिव पावकम् ॥ ५ ॥
रावण ज्या उत्तम सुवर्णमय सिंहासनावर विराजमान होता, ते सूर्याप्रमाणे झगमगत होते. ज्या प्रमाणे सोन्याच्या विटांनी बनविलेल्या वेदीवर स्थापित अग्निदेव तुपाची अधिक आहुती मिळून प्रज्वलित होतो त्या प्रकारे त्या स्वर्ण सिंहासनावर रावण शोभत होता. ॥५॥
देवगन्धर्वभूतानामृषीणां च महात्मनाम् ।
अजेयं समरे घोरं व्यात्ताननमिवान्तकम् ॥ ६ ॥

देवासुरविमर्देषु वज्राशनिकृतव्रणम् ।
ऐरावतविषाणाग्रैरुत्कृष्टकिणवक्षसम् ॥ ७ ॥
देवता, गंधर्व, भूत आणि महात्मा ऋषिही त्याला जिंकण्यास असमर्थ होते. समरभूमीमध्ये तो तोंड पसरून उभ्या असलेल्या यमराजाप्रमाणे भयानक वाटत असे. देवता आणि असुर यांच्या संग्रामात वेळोवेळी त्याच्या शरीरावर वज्र आणि अशनिचे जे घाव झाले होते, त्याची चिन्हे आत्तापर्यत विद्यमान होती. त्याच्या छातीवर ऐरावत हत्तीने जे आपले दात रोवले होते त्याच्या खुणा आताही दिसून येत होत्या. ॥६-७॥
विंशद्‌भुजं दशग्रीवं दर्शनीयपरिच्छदम् ।
विशालवक्षसं वीरं राजलक्षणक्षितम् ॥ ८ ॥

नद्धवैदूर्यसंकाशं तप्तकाञ्जनभूषणम् ।
सुभुजं शुक्लदशनं महास्यं पर्वतोपमम् ॥ ९ ॥
त्याला वीस भुजा आणि दहा मस्तके होती. त्याचे छत्र, चवरी, आभूषणे आदि उपकरणे पाहण्यासारखी होती. वक्षःस्थल विशाल होते. तो वीर राजोचित लक्षणांनी संपन्न दिसून येत होता. तो आपल्या शरीरावर जी वैडूर्यमण्याची (नीलमण्याची) आभूषणे धारण करून राहिला होता त्यांच्या प्रमाणेच त्याच्या शरीराची कांति होती. त्याने तापविलेल्या सोन्याची आभूषणे धारण केलेली होती. त्याच्या भुजा सुंदर, दात पांढरे शुभ्र, मुख खूप मोठे आणि शरीर पर्वतासमान विशाल होते. ॥८-९॥
विष्णुचक्रनिपातैश्च शतशो देवसंयुगे ।
अन्यैः शस्त्रैः प्रहारैश्च महायुद्धेषु ताडितम् ॥ १० ॥
देवतांशी युद्ध करते समयी त्याच्या अङ्‌गावर शेकडो वेळा भगवान विष्णुंच्या चक्राचा प्रहार झाला होता. मोठमोठ्‍या युद्धात अन्यान्य अस्त्र-शस्त्रांचाही त्याच्यावर मारा झाला होता. (त्या सर्वांची चिह्ने दृष्टीगोचर होती.) ॥१०॥
अहताङ्‌गैः समस्तैस्तं देवप्रहरणैस्तदा ।
अक्षोभ्याणां समुद्राणां क्षोभणं क्षिप्रकारिणम् ॥ ११ ॥
देवतांच्या समस्त आयुधांच्या प्रहारांनीही जी खण्डित होऊ शकली नव्हती त्याच अङ्‌गांनी तो अक्षोभ्य समुद्रांमध्येही क्षोभ उत्पन्न करीत होता. तो सर्व कार्ये अत्यंत त्वरेने करीत असे. ॥११॥
क्षेप्तारं पर्वताग्राणां सुराणां च प्रमर्दनम् ।
उच्छेत्तारं च धर्माणां परदाराभिमर्शनम् ॥ १२ ॥
पर्वतशिखरांनाही तोडून फेकून देत होता, देवतांनाही तुडवून टाकत होता, धर्माचे तर तो मूळच कापून टाकीत होता आणि परस्त्रियांच्या सतीत्वाचा नाश करणारा होता. ॥१२॥
सर्वदिव्यास्त्रयोक्तारं यज्ञविघ्नकरं सदा ।
पुरीं भोगवतीं गत्वा पराजित्य च वासुकिम् ॥ १३ ॥

तक्षकस्य प्रियां भार्यां पराजित्य जहार यः ।
तो सर्व प्रकारच्या दिव्यास्त्रांचा प्रयोग करणारा आणि सदा यज्ञांत विघ्न आणणारा होता. एका समयी पाताळातील भोगावती पुरीमध्ये जाऊन त्याने नागराज वासुकीला परास्त करून तक्षकालाही हरवून त्याच्या प्रिय पत्‍नीचे हरण करून तो तिला घेऊन आला होता. ॥१३ १/२॥
कैलासं पर्वतं गत्वा विजित्य नरवाहनम् ॥ १४ ॥

विमानं पुष्पकं तस्य कामगं वै जहार यः ।
याच प्रमाणे कैलास पर्वतावर जाऊन कुबेराला युद्धात पराजित करून त्याने त्यांचे इच्छानुसार चालणारे पुष्पकविमानही आपल्या अधिकारात आणले होते. ॥१४ १/२॥
वनं चैत्ररथं दिव्यं नलिनीं नन्दनं वनम् ॥ १५ ॥

विनाशयति यः क्रोधाद् देवोद्यानानि वीर्यवान् ।
तो पराक्रमी निशाचर क्रोधपूर्वक कुबेराचे दिव्य चैत्ररथ वनास, सौगंधिक कमलांनी युक्त नलिनी नावाच्या पुष्करिणीला, इंद्राच्या नंदनवनाला तसेच देवतांच्या दुसर्‍या दुसर्‍या उद्यानांना नष्ट करीत राही. ॥१५ १/२॥
चन्द्रसूर्यौ महाभागावुत्तिष्ठन्तौ परंतपौ ॥ १६ ॥

निवारयति बाहुभ्यां यः शैलशिखरोपमः ।
तो पर्वत शिखरासमान आकार धारण करून शत्रुंना संताप देणारा महाभाग चंद्रमा आणि सूर्य यांना त्यांच्या उदयकाळीच आपल्या हातानी रोखून धरीत होता. ॥१६ १/२॥
दशवर्षसहस्राणि तपस्तप्त्वा महावने ॥ १७ ॥

पुरा स्वयम्भुवे धीरः शिरांस्युपजहार यः ।
त्या धीर स्वभावाच्या रावणाने पूर्वकाळी एका विशाल वनामध्ये दहा हजार वर्षापर्यंत घोर तपस्या करून ब्रह्मदेवांना आपल्या मस्तकांचा बळी दिलेला होता. ॥१७ १/२॥
देवदानवगन्धर्वपिशाचपतगोरगैः ॥ १८ ॥

अभयं यस्य संग्रामे मृत्युतो मानुषादृते ।
त्याच्या प्रभावाने त्याला देवता, दानव, गंधर्व, पिशाच, पक्षी आणि सर्प या सर्वांपासून संग्रामात अभय प्राप्त झालेले होते. मनुष्याशिवाय दुसर्‍या कुणाच्या हाताने त्याला मृत्युचे भय नव्हते. ॥१८ १/२॥
मन्त्रैरभिष्टुतं पुण्यमध्वरेषु द्विजातिभिः ॥ १९ ॥

हविर्धानेषु यः सोममुपहन्ति महाबलः ।
तो महाबलाढ्‍य राक्षस सोमसवन कर्मविशिष्ट यज्ञांमध्ये द्विजातियांच्या द्वारे वेदमंत्रांच्या उच्चारणपूर्वक काढले गेलेल्या तसेच वैदिक मंत्रांनीच सुसंस्कृत तसेच स्तुत्य असलेल्या पवित्र सोमरसाला तेथे पोहोचून नष्ट करून टाकीत होता. ॥१९ १/२॥
प्राप्तयज्ञहरं क्रूरं ब्रह्मघ्नं क्रूरकारिणम् ॥ २० ॥

कर्कशं निरनुक्रोशं प्रजानामहिते रतम् ।
समाप्तीच्या जवळ पोहोंचलेल्या यज्ञांचा विध्वंस करणारा तो दुष्ट निशाचर ब्राह्मणांची हत्या तसेच इतर अनेक क्रूर कर्मे करीत होता. तो फारच कोरड्‍या स्वभावाचा आणि निर्दय होता. सदा प्रजाजनांच्या अहितामध्येच लागलेला असे. ॥२० १/२॥
रावणं सर्वभूतानां सर्वलोकभयावहम् ॥ २१ ॥

राक्षसी भ्रातरं क्रूरं सा ददर्श महाबलम् ।
समस्त लोकांना भय देणार्‍या आणि संपूर्ण प्राण्यांना रडविणार्‍या आपल्या या महाबलवान क्रूर भावाला राक्षसी शूर्पणखेने त्यावेळी पाहिले. ॥२१ १/२॥
तं दिव्यवस्त्राभरणं दिव्यमाल्योपशोभितम् ॥ २२ ॥

आसने सूपविष्टं तं काले कालमिवोद्यतम्

राक्षसेन्द्रं महाभागं पौलस्त्यकुलनन्दनम् ॥ २३ ॥
तो दिव्य वस्त्रे आणि आभूषणांनी विभूषित होता. दिव्य पुष्पांच्या माळा त्याची शोभा वाढवित होत्या. सिंहासनावर बसलेला राक्षसराज पुलस्त्य कुलनंदन महाभाग दशग्रीव प्रलयकारी संहारासाठी उद्यत झालेल्या महाकाळा समान भासत होता. ॥२२-२३॥
उपगम्याब्रवीद् वाक्यं राक्षसी भयविह्वला ।
रावणं शत्रुहन्तारं मन्त्रिभिः परिवारितम् ॥ २४ ॥
मंत्र्यांनी घेरलेल्या शत्रुहंता बंधु रावण याच्याजवळ जाऊन भयाने विव्हल झालेली ती राक्षसी काही सांगण्यासाठी उद्यत झाली. ॥२४॥
तमब्रवीद् दीप्तविशाललोचनं
प्रदर्शयित्वा भयलोभमोहिता ।
सुदारुणं वाक्यमभीतचारिणी
महात्मना शूर्पणखा विरूपिता ॥ २५ ॥
महात्मा लक्ष्मणाने नाक-कान कापून जिला कुरूप करून टाकले होते तसेच जी निर्भय विचरणारी होती, ती भय आणि लोभाने मोहित झालेली शूर्पणखा मोठ मोठे चमकदार नेत्र असणार्‍या अत्यंत क्रूर रावणाला आपली दुर्दशा दाखवून त्यास म्हणाली- ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्वात्रिशं सर्गः ॥ ३२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा बत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP