॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय बारावा ॥
रावणादिकांचा विवाह व इंद्रजिताचा जन्म

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

शूर्पणखा - विद्युज्जिव्ह यांचा विवाह :

तिघां बंधूंसमवेत । दशग्रीवा लंकाराज्य प्राप्त ।
नांदत असतां सुखस्वस्थ । पुढील कथार्थ अवधारा ॥१॥
तदनंतरें शूर्पणखा भगिनी । देखिली यौवनेंकरोनी ।
रावणासि चिंता मनीं । हे कोणास पैं द्यावी ॥२॥
ते शूर्पणखा कैसी । सुपासारिखीं नखें जीसी ।
म्हणोनि शूर्पणखा नांव तियेसी । श्रीरामा ऐसी जाणिजे ॥३॥
दनूपासूनि संभव । यालागीं तो दानव ।
विद्युज्जिव्ह ऐसें नांव । रावण तयाअ भगिनी देता झाला ॥३॥
जेंवी विद्यल्लता अंबरीं । तैसी जिव्हा मुखाबाहेरी ।
म्हणोनि विद्युज्जिव्ह नामाधिकारी । महाभयंकर दानव ॥५॥
विधिपूर्वक कन्यादानासीं । शूर्पणखा दिधली त्यासी ।
दशग्रीव आपण पारधीसी । मृगें मारावयासी हिंडता झाला ॥६॥

रावणाची आणि मयासुराची भेट :

तिथें दशग्रीव विचरतां । दृष्टी देखिलें दितिसुता ।
मय ऐसें नाम प्रसिद्धता । सवें दुहिता स्वरूपिणी ॥७॥
कन्येसहित मयासुरासी । विच्रतां ते वनप्रदेशीं ।
दशग्रीव देखोनि तयासी । थोर आश्चर्यासी पावला ॥८॥
म्हणे हें निर्मानुष वन। या वनीं नाहीं मृगपक्षिगण ।
तूं कोण कोणाचा कोठील किंकारण । सवें कन्यारत्न किमर्थ असे ॥९॥
सांग ते हे मृगनयनी । अत्यंत सुकुमार कन्या कीं भगिनी ।
हिंडतसां इये वनीं । कोण कार्यालागूनी मज सांगा ॥१०॥
ऐकोन रावणाचें वचन । मय बोलिला आपण ।
ऐक माझें समूळ कथन । सावधान राक्षसेंद्रा ॥११॥

मयासूर आपली कन्या मंदोदरी हिची माहिती सांगतो :

हेमानामें अप्सरेतें । ऐकिलें असेल पूर्वी तीतें ।
ते देवीं दिधली होती मातें । सुखसंभोगाकारणं ॥१२॥
ते हेमा अत्यंत सुंदरी । मी तिसीं क्रीडें विषयेंकरीं ।
जैसा शचीसीं वृत्रारी । नंदनवनीं क्रीडतसे ॥१३॥
तिसीं मग सक्त होवोन । सहस्त्र वर्षेपर्यंत जाण ।
मज ते देवकार्यालागून । दीन करूनि गेली ॥१४॥
तियेकारणें दशग्रीवा जाण । म्यां केलें मायामय हें भवन ।
सर्व नगर हेमवर्ण । विचित्र रचन पैं केलें ॥१५॥
वज्रवैडूर्यरत्नभित्ती । पाचबद्ध शोभे क्षिती ।
अवघी मायामय स्थिती । ते मी किती वर्णूं आता ॥१६॥
हेमेवीण येथे आपण । वसता झालों अति दीन ।
हेमा होती माझा प्राण । ते सोडोन मज गेली ॥१७॥
आम्ही तिचेनि दुःखकरीं । दोघे झालों रानभरी ।
हे कन्या धरोनि करीं । वनाभीतरीं मी आलों ॥१८॥
हे होय माझी कुमारी । हेमेच्या कुशीं जन्मली निर्धारीं ।
इसी रूपें गुणें वयेंकरी । वरविचारणीं मज चिंता ॥१९॥
कन्यचें पितयासी बहुदुःख । कन्या राखतांही परम क्लेश ।
उभयतां कुळ पाहिजे चोख । तरीच देख शुद्ध पुण्य ॥२०॥
याहीपूर्वी माझिये घरीं । होती गुणवंती नारी ।
दोघे पुत्र तियेचे उदरीं । मायावीदुंदुभिनामें जन्मले॥२१॥
मायावी प्रथम पुत्र जाण । दुसरियाचें दुंदुभि नामकरण ।
हें प्रथम स्त्रियेचें संतान । हेमेची हे मंदोदरी ॥२२॥

रावणाने आपली माहिती मयासुराला सांगितली :

ऐसा माझा वृतांत । तुजप्रति सांगितला यथोक्त ।
तूं कोण कोणाचा या वनांत । किंनिमित्त आलासी ॥२३॥
कृपा करिनो मजवरी । आपुला वृत्तांत झडकरी ।
आम्हांप्रती श्रुत करीं । ऐसें मयासुर बोलिला ॥२४॥
ऐकोनि मयासुराचें वचन । मग तो राक्षसेंद्र आपण ।
म्हणे मी पौलस्तिनंदन । दशग्रीव जाण नाम माझें ॥२५॥
वैश्रवणासमवेत । आम्ही चौघे पौलस्तिसुत।
आमुचा पूर्वज ब्रह्मा निश्चित । ऐक गा दानवेंद्रा ॥२६॥
अगस्ति म्हणे श्रीरामासी । ऐसें रावण बोलिला दानवेंद्रासी ।
तेचि कथा मी तुजपासीं । सांगतसे रावणारि ॥२७॥

रावण - मंदोदरीचा विवाह :

रावण पौलस्तिनंदन । ऐसें दानवेंद्रे ऐकोन ।
करीं धरोनि कन्यारत्न । रावणासि देता झाला ॥२८॥
तदनंतर मयासुर रावणासी । बोले माझी कन्या हे परियेसीं ।
हेमेपासोनी जन्म इसी । मंदोदरी इसी नाम साचें ॥२९॥
प्रतिगृह्यताम् वचनेंकरीं । दान देता झाला कुमारी ।
येरें पतिगृह्णामि झडकरी । बोलोनि हातीं सुंदरी धरियेली ॥३०॥
प्रीत्यर्थ हे तुजप्रती । शमी देतों गा लंकापती ।
येरें बहु बरें म्हणोनि चित्तीं । बोलता झाला रावण ॥३१॥
तेथे अग्नि प्रज्वळून । करिता झाला लाजाहवन ।
सोमसूर्य साक्षी करून । विवाहहोम संपादिला ॥३२॥
तदनंतरें मयासुरासी । ठाऊक नाहीं जे शाप रावणासी ।
पूर्वी वदला महाऋषी । हें नेणेचि मयासुर ॥३३॥

रावणाला मयासुराकडून दारूण शक्तीचा लाभ :

प्रजापतिवंशीं उत्पत्ती । म्हणोनि मंदोदरी रावणाप्रती ।
आणिक मयनामें शक्ती । देता झाला मयासुर ॥३४॥
ते शक्ती अत्यंत दारूण । भेणें सुरासुर कंपायमान ।
जे शक्तीनें भेदिला लक्ष्मण । जैं द्रोणाद्री आणिला हनुमंतें ॥३५॥
या प्रकारें श्रीरघुपती । स्त्रियेसहित लंकापती ।
राज्य करीत पुढील स्थिती । सावधान श्रोतीं अवधारिजे ॥३६॥
कोणी एके दिवसीं लंकापती । जाता झाला वनाप्रती ।
भ्रातृलग्नचिंता चित्तीं । तंव दोघी कन्या देखिल्या ॥३७॥

कुंभकर्णाचा वज्रसारेशीं व बिभीषणाचा सरमेशीं विवाह :

त्या कन्यांचें आख्यान । सांगतसें श्रीरामा जाण ।
एक वैरोचकन्येचें कन्यारत्न । वज्रसारा नाम जीचें ॥३८॥
ते भार्या कुंभकर्णासी । रावण करिता झाला समकाळेसीं ।
दुसरी गंधर्वकन्या सरमानामासीं । ते बिभीषणासी नेमिली ॥३९॥

सरमा नाव का पडले ? :

तें गंधर्वराजकन्येसी । सरमा नाम झालें काशानसी ।
सांगावें मुनि मजपासीं । विस्तारेंसी कथेसी त्या ॥४०॥
ऐकोनि राघवाचें वचन । काय बोले अगस्ति आपण ।
म्हणे श्रीरामा तूं ब्रह्म पूर्ण । आमचा मान वाढविसी ॥४१॥
तरी आईकें जी श्रीरामा । तियेसि नाम कां झाले सरमा ।
येविषयीं पृच्छा आम्हां । पुससी तूं श्रीरघुवीरा ॥४२॥
तरी मानसनाम सरोवर । माजि कमळिणी मनोहर।
तेणें तडाग अति सुंदर । सरमा मातेसहित तेथें होती ॥४३॥
तेथें पर्जन्य वर्षला । तेणें सरोवरासि पूर आला ।
सरमा भिऊन शब्द केला । माते धांव बुडालें ॥४४॥
ऐकोनि कन्येचें वचन । माता झाली उद्विग्न ।
सरोवराप्रति दीनवदन । बोलती झाली ते काळीं ॥४५॥
अगा सरोवरा महाजळेसीं । वाढों नको वचन परियेसीं ।
ऐकतां लागली तटप्रदेशीं । सरमा नाम यास्तव ॥४६॥
सरमा गंधर्वनंदिनीं । रूपें तरी मृगनयनी ।
ते स्त्री बिभीषणालागूनी । करिता झाला रावण ॥४७॥
एवं तिघे बंधु लंकेप्रती । आपुलाले भार्येसीं राज्य करिती ।
जैसे स्वर्गी गंधर्व क्रीडती । तैसे राहती राक्षस ते ॥४८॥

इंद्रजिताचा जन्म :

तयाउपरी मंदोदरीसी । पुत्र झाला मेघनाद नामेंसीं ।
शुक्रजित म्हणती ज्यासी । प्रतापें बळें आगळा ॥४९॥
श्रीराम म्हणे अगस्ति मुनी । मेघनाद ऐसें काशानी ।
म्हणती इंद्रजितां लागोनी । तें मज मुनि सांगावें ॥५०॥
ऐकोनियां श्रीरामाचें वचन । अगस्ति बोले सुखसंपन्न ।
मंदोदरी प्रसूत झाली जाण । बाळकें दीर्घ रुदण पैं केलें ॥५१॥
मेघासारिखें गर्जन । बाळकें ते समयी केलें जाण ।
तेणें लंकावासी बधिर जन । भयेंकरोन पैं झाले ॥५२॥
रावण योवोनि ते समयीं । मेघनाद ऐसें नाम पाहीं ।
ठेवोनि बाळक ते गृहीं । अंतःपुरीं वाढतें झालें ॥५३॥
रावणातें रंजवित । मातेचें मन मोहित ।
स्त्रियांमाजी पुत्रापत्य । असे वाढत महाबाहो ॥५४॥
मंदोदरीसी बहु हर्श । रावणासी परम संतोष ।
राक्षसांसी परम सुख । दीर्घ दुःख देवांसी ॥५५॥
एक पुत्र गुणवंत सगुण । निर्गुण संतानाचें किंप्रयोजन ।
एक शशी जगाचा प्रकाश पूर्ण । नवलक्ष तारांगणीं काय काज ॥५६॥
जैसा कां पुरिला हुताशन । प्रज्वाळी देदीप्यमान ।
तैसा तो राक्षसनंदन । अंतःपुरीं वाढता झाला ॥५७॥
एका जनार्दना शरण । राक्षसांचे पाणिग्रहण ।
इंद्रजिताचें जन्मकथन । सांग संपूर्ण पैं झालें ॥५८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणादिपाणिग्रहणं इंद्रजिज्जन्मकथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥ ओंव्या ॥५८॥

GO TOP