॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चोविसावा ॥
नारदांचे यमपुरीला आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाला नारदाचे दर्शन :

गत कथा झाली ऐसी । जे कां कलिकमल्ष नाशी ।
तदनंतरें विचारतां नारदासीं । राक्षसेश्वरें देखिलें ॥१॥
नारद जातां गगनीं । रावणें देखिला दुरोनी ।
म्हणे देवऋषि कृपा करुनी । नावेक येथवरी येइजे ॥२॥
म्हणोनि केलें नमन । दोन्ही कर जोडोन ।
स्वामी क्षेम कुशळ कल्याण । हें तुम्हांस पुसणें न लगे ॥३॥
तुमचेनि भूतमात्र प्राणी । स्वानंदें वर्तती निजस्थानीं ।
तुम्हीं विचंरां परोपकारालागोनी । तुमच्या दर्शनीं मी धन्य ॥४॥
ऐकोनि विबुधारिजनकाचें वचन । मग बोले नारद भगवान ।
म्हणे राया तुझें वैभव देखोन । आनंदें पूर्ण निवालों ॥५॥

नारदांकडून रावणाची स्तुती :

तुज पुष्पकासारिखें विमान । इंद्रजिताऐसें पुत्रनिधान ।
जयाचे आहारा न पुरे त्रिभुवन । तो बंधु कुंभकर्ण पैं तुझा ॥६॥
प्रताप सकळांहूनि आगळा । जिणिलें त्वां क्षितिपाळां ।
तुझे ठायीं भावो भूपाळा । देखोनियां निघालों ॥७॥
राक्षसाधिपा तुझी थोरी । न देखों त्रिभुवनामाझारी ।
सदाशिव आज्ञाधारी । विष्णूस तेथें कवण पुसे ॥८॥
देव दैत्य गंधर्व । सिद्ध चारण मुनिपुंगव ।
आणीक पृथ्वीपति सर्व । समरांगणीं जिंतिले ॥९॥
ऐसा पराक्रम दारुण । देखोनि मी तुष्टमान ।
परी काहींएक वचन । हितालागोन सांगतसें ॥१०॥
राक्षसेंद्रा अवधारीं । माझिया वचनाची थोरी ।
तुवा जिंतिले ते सामान्य अरी । जे काळचक्रीं पडिले असतीं ॥११॥
जें संसारी गांजिले । ते मृत्युनें मारिले ।
जे प्रारब्धीं घातले । ते मेले आपुलेनि कर्मे ॥१२॥
जे संसारबांदवंडीं पडिले । जे मी माझें म्हणत गेले ।
जे विधिनिषेधीं नाडिले । ते पडिले काळचक्रीं ॥१३॥
माझी स्त्री माझे पुत्र । माझें धन माझें गोत ।
जयांचे भ्रांत झालें चित्त । तयां ग्रासिलें कळिकाळें ॥१४॥
तुवां मारिले गांजिले हे वदंती । मिथ्यात्वें भासे माझे चित्तीं ।
ऐसें ऐकोनि लंकापती । नारदाप्रती बोलिला ॥१५॥
अहो जी ऐका नारदमुनी । आतां रसातळा जातों दैत्यमर्दनीं ।
आपुले करें तयां जिंतोनी । समरांगणीं भिडोनियां ॥१६॥
मग समस्त जिंतिल्यावरी । ज्याचे त्यांस करीन अधिकारी ।
पुढें समुद्र मथीन त्याउपरी । अमृतपानाकारणें ॥१७॥
ऐसें रावण बोलिल्यावरी । ऐकोनि नारद ते अवसरीं ।
प्रत्युत्तरशब्दचातुरीं । बोलतसे रावणेसीं ॥१८॥

नारदांचा यमाला जिंकण्याचा रावणाला सल्ला :

तुज रसातळासि जातां । आम्हासि सुख न वाटे सर्वथा ।
मी सांगतों त्या मार्गें लंकानाथा । समस्तां सुख होईल ॥१९॥
अति दुर्गम कठिण । ब्रह्मादिकां न कळे जाण ।
त्या मार्गीं करावे गमन । प्रेतराज तेथें असे ॥२०॥
वैरी त्रासूनि तूं उद्धट । इये मार्गीं जाय स्पष्ट ।
यमराज बळें अचाट । त्यातें रणीं जिंकिजे ॥२१॥
जया यमाचा सर्वां दंड । जेणें दंडिले प्राणी उदंड ।
जया दंडाभेणें जन अखंड । शरण हरीसी पैं जाती ॥२२॥
प्रेतराज तो पापियां यम । साधुजनांतें तोचि धर्म ।
सांगतां त्याचा पराक्रम परम । त्यासि दशानन पुरवसी ॥२३॥

यमाला जिंकण्याचा रावणाचा निर्धार :

मुनीची ऐकोनि गोष्टी । राक्षसें हाक मारिली मोठी ।
जैसा मेघ कडकडाटीं । गर्जतसे पर्जन्यकाळीं ॥२४॥
कुंभकर्णानुज म्हणे नारदमुनी । माझें वचन ऐकें सावधानीं ।
यमराम मारिला हे सत्य वाणी । तुम्हीं असत्य न म्हणावी ॥२५॥
मी जातों दक्षिणदिशेसी । जेथें रविसुत करी राज्यासी ।
माझेही नारदा मानसीं । क्रोध अत्यंत उचंबळत ॥२६॥
प्रत्युत्तर माझें ऐक वचन । मी तयातें मुनि दंडीन ।
छेदीन तयाचा अभिमान । जेणें प्राणिगण दंडिले ॥२७॥
ऐसें बोलोनि मंदोदरीकांत । मुनीस करोनी दंडवत ।
येतां झाला लंकानाथ । प्रधानांसमवेत दक्षिणे ॥२८॥
मग तो नारद महाऋषी । जयाच्या तेजें कळाहीन रविशशी ।
जयांचें वचन देवां दैत्यासीं । अति प्रीतीसीं रुचतसे ॥२९॥
ब्रह्मनिष्ठेचा जो सागर । ब्रह्मदृष्टीं देखे चराचर ।
ब्रह्मयाचा मानसकुमर । ब्रह्मादिकां पार न कळे ॥३०॥
ब्रह्मवीणा वाजवीत । ब्रह्मानंदें डुल्लत ।
ब्रह्मपदें मुखीं गात । गात नाचत ब्रह्मानंदें ॥३१॥
ऐसा तो नारद महामुनी । रावणाचें वचन ऐकोनि ।
क्षणैक विचारिता झाला मनीं । जैसा अग्नि तैसा ऋषि ॥३२॥
माझें वचनएं हा रावण । यमरायासीं करील रण ।
तरी मी यमासी सांगेन । येतो रावण युद्धातें ॥३३॥
प्रेतराज दंडपाणी । तयातें प्रार्थीन युद्धालागूनी ।
जयाचेनि धाकें प्राणी जनीं । श्रीहरिभजनीं प्रवेशती ॥३४॥
तरि आपला हाचि विचार । म्हणोनि उठिला ब्रह्मकुमर ।
चालिलासे अति सत्वर । मनोवेग टाकोनि मागें ॥३५॥

नारदांचे यमनगरीत आगमन :

ऐसा तो ब्रह्मर्षीं । आला प्रेतराजनगरासी ।
नगरी देखोनि हर्ष मानसीं । जैसी दुसरी अमरावती ॥३६॥
प्रेतराज रायाचें नाम । यमधर्म दुसरें परम ।
प्राणियांचे दोषधर्म । जाणोनि तैसें दंडित ॥३७॥
जयांसी भगवद्भजनीं नाहीं भक्तीं । अधर्मटोले माथां वाजती ।
ज्यांसी गृहाश्रमी अत्यासक्ती । ते दंड पावती प्रेतरायाचा ॥३८॥
ऐसा तो नारद महामुनी । आला प्रेतपुरीलागून ।
म्हणे कलहो पावोन पुरे धणी । म्हणोनि पाय अवनीं आफळित ॥३९॥
माथेची शेंडी तडाडी । कलहाची थोर आवडी ।
म्हणोनि तो लवडसवडीं । प्रेतराजनगरा पैं आला ॥४०॥
एका जनार्दना शरण । राक्षसां यमासीं युद्ध दारुण ।
होईल तें परसा सावधान । निज अवधान देवोन ॥४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
नारदप्रेतपुरीआगमनं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥२४॥ ओंव्या ॥४१॥

GO TOP