[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चत्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुमन्त्रेण प्रबोधिताया भर्त्सितायाश्च कैकेय्या अक्षोभः - सुमंत्रांनी समजाविल्यावर आणि फटकारल्यावरही कैकेयीचे जराही विचलित न होणे -
ततो निधूय सहसा शिरो निःश्वस्य चासकृत् ।
पाणिं पाणौ विनिष्पिष्य दन्तान् कटकटाप्य च ॥ १ ॥

लोचने कोपसंरक्ते वर्णं पूर्वोचितं जहत् ।
कोपाभिभूतः सहसा सन्तापमशुभं गतः ॥ २ ॥

मनः समीक्षमाणश्च सूतो दशरथस्य च ।
कम्पयन्निव कैकेय्या हृदयं वाक्शरैः शितैः ॥ ३ ॥
त्यानंतर शुद्धिवर आल्यावर सारथि सुमंत्र एकाएकी उठून उभे राहिले. त्यांच्या मनात अत्यंत संताप झाला होता जो फार अमंगलकारी होता. ते क्रोधाच्या आवेशाने कापू लागले. त्यांच्या शरीराची आणि मुखाची पहिली स्वाभाविक कांति बदलून गेली. ते क्रोधाने डोळे लाल करून दोन्ही हातानी डोके बडवून घेऊ लागले आणि वारंवार दीर्घ श्वास घेऊन, हातावर हात चोळून, दात कटकटून राजा दशरथांच्या मनाची वास्तविक अवस्था पहात आपल्या वचनरूपी तीक्ष्ण बाणांनी कैकेयीच्या हृदयाला कंपितसे करू लागली- ॥१-३॥
वाक्यवज्रैरनुपमैर्निर्भिन्दन्निव चाशुभैः ।
कैकेय्याः सर्वमर्माणि सुमन्त्रः प्रत्यभाषत ॥ ४ ॥
आपल्या अशुभ एवमनुपम वचनरूपी वज्रांनी कैकेयीच्या सार्‍या मर्मस्थानांना विदीर्ण से करीत सुमंत्राने तिला या प्रकारे बोलावयास आरंभ केला - ॥४॥
यस्यास्तव पतिस्त्यक्तो राजा दशरथः स्वयम् ।
भर्त्ता सर्वस्य जगतः स्थावरस्य चरस्य च ॥ ५ ॥

न ह्यकार्यतमं किञ्चित्तव देवीह विद्यते ।
पतिघ्नीं त्वामहं मन्ये कुलघ्नीमपि चान्ततः ॥ ६ ॥
'देवी ! जर तू संपूर्ण चराचर जगताचे स्वामी स्वयं आपल्या पति महाराज दशरथांचाही त्याग केला आहेस, तर या जगतात असे कुठलेही कुकर्म नाही की जे तू करू शकणार नाहीस, मी तर समजत आहे की तू पतिची हत्या करणारी तर आहेसच अंततः कुलघातिनी आहेस. ॥५-६॥
यन्महेन्द्रमिवाजय्यं दुष्प्रकम्प्यमिवाचलम् ।
महोदधिमिवाक्षोभ्यं संतापयसि कर्मभिः ॥ ७ ॥
'ओह ! जे देवराज इंद्रासमान अजेय, पर्वता प्रमाणे अकंपनीय आणि महासागरा समान क्षोभरहित आहेत त्या महाराज दशरथांनाही तू आपल्या कर्मांनी संतप्त करीत आहेस. ॥७॥
मावमंस्था दशरथं भर्तारं वरदं पतिम् ।
भर्तुरिच्छा हि नारीणां पुत्रकोट्या विशिष्यते ॥ ८ ॥
राजा दशरथ तुझे पति, पालक आणि वरदाता आहेत, तू त्यांचा अपमान करू नको. नारीसाठी पतिच्या इच्छेचे महत्व (करोडो) कोट्यावधि पुत्रांहूनही अधिक आहे. ॥८॥
यथावयो हि राज्यानि प्राप्नुवन्ति नृपक्षये ।
इक्ष्वाकुकुलनाथेऽस्मिंस्तं लोपयितुमिच्छसि ॥ ९ ॥
या कुळात राजाचा परलोकवास झाल्यावर त्याच्या पुत्रांचा अवस्थेचा विचार करून जो ज्येष्ठ पुत्र असतो त्यालाच राज्य मिळते. राजकुलाच्या या परंपरागत आचाराला तू या इक्ष्वाकुवंशाचे स्वामी महाराज दशरथ हयात असतांनाच नष्ट करू इच्छित आहेस. ॥९॥
राजा भवतु ते पुत्रो भरतः शास्तु मेदिनीम् ।
वयं तत्र गमिष्यामो यत्र रामो गमिष्यति ॥ १० ॥
'तुझा पुत्र राजा होवो आणि या पृथ्वीचे शासन करो परंतु आम्ही सर्व लोक तर जेथे श्रीराम जातील तिकडेच निघून जाऊ. ॥१०॥
न च ते विषये कश्चिद् ब्राह्मणो वस्तुमर्हति ।
तादृशं त्वममर्यादमद्य कर्म करिष्यसि ॥ ११ ॥

नूनं सर्वे गमिष्यामो मार्गं रामनिषेवितम् ।
'तुझ्या राज्यात कोणीही ब्राह्मण निवास करणार नाही. जर तू आजच्या सारखेच मर्यादाहीन कर्म करशील तर निश्चितच आम्ही सर्व लोकही ज्या मार्गाचे सेवन श्रीरामांनी केले आहे त्याच मार्गावर निघून जाऊ. ॥११ १/२॥
त्यक्ता या बान्धवैः सर्वैर्ब्राह्मणैः साधुभिः सदा ॥ १२ ॥

का प्रीती राज्यलाभेन तव देवि भविष्यति ।
तादृशं त्वममर्यादं कर्म कर्तुं चिकीर्षसि ॥ १३ ॥
'संपूर्ण बंधु-बांधव आणि सदाचारी ब्राह्मणही तुझा त्याग करतील, मग देवी ! हे राज्य मिळून तुला काय आनंद मिळेल ? ओह ! तू असे मर्यादाहीन कर्म करू इच्छित आहेस. ॥१२-१३॥
आश्चर्यमिव पश्यामि यस्यास्ते वृत्तमीदृशम् ।
आचरन्त्या न विदृता सद्यो भवति मेदिनी ॥ १४ ॥
मला तर हेच पाहून आश्चर्य वाटत आहे की तू इतका मोठा अत्याचार करूनही पृथ्वी तात्कळ दुभंगत कशी नाही ? ॥१४॥
महाब्रह्मर्षिसृष्टा वा ज्वलन्तो भीमदर्शनाः ।
धिग्वाग्दण्डा न हिंसन्ति रामप्रव्राजने स्थिताम् ॥ १५ ॥
अथवा मोठमोठ्या ब्रह्मर्षिचे धिक्कारपूर्ण वाग्दण्ड (शाप) जे दिसण्यात भयंकर आणि जाळून भस्म करून टाकणारे असतात, श्रीरामाला घरातून घालवून देण्यास तयार झालेल्या तुझ्या सारख्या पाषाण हृदयीचा सर्वनाश का करून टाकत नाहीत ? ॥१५॥
आम्रं छित्त्वा कुठारेण निम्बं परिचरेत् तु कः ।
यश्चैनं पयसा सिञ्चेन्नैवास्य मधुरो भवेत् ॥ १६ ॥
'भले, आम्रवृक्षाला कुर्‍हाडीने कापून टाकून तेथे कडुलिंबाचे सेवन कोण करील ? जो आम्रवृक्षाचा जागी कडुलिंबालाच दूधाने शिंपतो त्याच्यासाठीही तो मधुर फळ देणारा होऊ शकत नाही. (म्हणून वरदानाच्या बहाण्याने श्रीरामास वनवास देऊन कैकेयीच्या चित्ताला संतुष्ट करणे राजासाठी कधी सुखद परिणामाचे जनक होऊ शकत नाही.) ॥१६॥
अभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च ।
न हि निम्बात् स्रवेत् क्षौद्रं लोके निगदितं वचः ॥ १७ ॥
'कैकेयी ! मी समजतो की तुझ्या मातेचा आपल्या कुलाला अनुसरुन जसा स्वभाव होता, तसाच तुझाही आहे. लोकात जी म्हण आहे की कडुलिंबातून मधु कधी ठिबकत नाही' ती सत्यच आहे. ॥१७॥
तव मातुरसद्‌ग्राहं विद्म पूर्वं यथा श्रुतम् ।
पितुस्ते वरदः कश्चिद् ददौ वरमनुत्तमम् ॥ १८ ॥
'तुझ्या मातेच्या दुराग्रहाची गोष्टही आम्ही जाणतो. या संबंधी पूर्वी जे ऐकले गेले आहे ते सांगितले जात आहे. एक समयी कुणी एका वर देण्यार्‍या साधुने तुझ्या पित्याला अत्यंत उत्तम वर दिला होता. ॥१८॥
सर्वभूतरुतं तस्मात् संजज्ञे वसुधाधिपः ।
तेन तिर्यग्गतानां च भूतानां विदितं वचः ॥ १९ ॥
'त्या वराच्या प्रभावाने केकय नरेश समस्त प्राण्यांची बोली समजू लागले. तिर्यक योनित पडलेल्या प्राण्यांचे बोलणेही त्यांना समजू लागले होते. ॥१९॥
ततो जृम्भस्य शयने विरुताद् भूरिवर्चसः ।
पितुस्ते विदितो भावः स तत्र बहुधाहसत् ॥ २० ॥
'एक दिवस तुझे महातेजस्वी पिता शय्येवर पडलेले होते त्यासमयीच जृम्भ नामक पक्ष्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्याचा बोलीच्या अभिप्राय त्यांना समजून आला, म्हणून ते अनेक वेळा हसले. ॥२०॥
तत्र ते जननी क्रुद्धा मृत्युपाशमभीप्सती ।
हासं ते नृपते सौम्य जिज्ञासामीति चाब्रवीत् ॥ २१ ॥
'त्याच शय्येवर तुझी माताही झोपलेली होती. ती असे समजली की राजा मलाच हसत आहेत, आणि कुपित झाली आणि गळ्यात मरणाचा फांस लावण्याची इच्छा धरून म्हणाली - 'सौम्य ! नरेश्वर ! तुमच्या हसण्याचे काय कारण आहे हे मी जाणू इच्छित आहे.' ॥२१॥
नृपश्चोवाच तां देवीं हासं शंसामि ते यदि ।
ततो मे मरणं सद्यो भविष्यति न संशयः ॥ २२ ॥
'तेव्हा राजाने त्या देवीला म्हटले- 'राणी ! जर मी आपल्या हंसण्याचे कारण सांगीन तर त्या क्षणी माझा मृत्यु होईल. यात संशय नाही. ॥२२॥
माता ते पितरं देवि पुनः केकयमब्रवीत् ।
शंस मे जीव वा मा वा न मां त्वं प्रहसिष्यसि ॥ २३ ॥
'देवी ! हे ऐकून तुझ्या राणी मातेने तुझा पिता केकयराज याला परत म्हटले- 'तुम्ही जगा अथवा मरा, पण मला कारण समजले पाहिजे. भविष्यात तुम्ही परत अशा तर्‍हेने माझे हसे करणार नाही. ( मला हसणार नाही). ॥२३॥
प्रियया च तथोक्तः सन् केकयः पृथिवीपतिः ।
तस्मै तं वरदायार्थं कथयामास तत्त्वतः ॥ २४ ॥
आपल्या प्रिय राणीने असे म्हटल्यावर केकयनरेशाने त्यावर देणार्‍या साधुजवळ जाऊन सर्व समाचार त्यांना यथातथ्य (ठीक ठीक) ऐकविला. ॥२४॥
ततः स वरदः साधू राजानं प्रत्यभाषत ।
म्रियतां ध्वंसतां वेयं मा शंसीस्त्वं महीपते ॥ २५ ॥
तेव्हा त्या वर देणार्‍या साधुने राजाला उत्तर दिले - 'महाराज ! राणी मरो अथवा तिला घरातून हाकलून दिले जावो, तुम्ही कदापिही ही गोष्ट तिला सांगता कामा नये.' ॥२५॥
स तच्छ्रुत्वा वचस्तस्य प्रसन्नमनसो नृपः ।
मातरं ते निरस्याशु विजहार कुबेरवत् ॥ २६ ॥
'प्रसन्न चित्ताच्या त्या साधुचे हे वचन ऐकून केकयनरेशाने तुझ्या मातेला तात्काळ घरातून हाकलून लावले आणि स्वतः कुबेराप्रमाणे विहार करू लागले. ॥२६॥
तथा त्वमपि राजानं दुर्जनाचरिते पथि ।
असद्‌ग्राहमिमं मोहात् कुरुषे पापदर्शिनि ॥ २७ ॥
'तूही या प्रकारे दुर्जनांच्या मार्गावर स्थित होऊन पापावरच दृष्टि ठेवून मोहवश राजाला हा अनुचित आग्रह करित आहेस. ॥२७॥
सत्यश्चात्र प्रवादोऽयं लौकिकः प्रतिभाति मा ।
पितॄन् समनुजायन्ते नरा मातरमङ्‌गनाः ॥ २८ ॥
'आज मला ही लोकोक्ती सोळा आणे खरी वाटत आहे की पुत्र पित्या समान होतात आणि कन्या माते समान होतात. ॥२८॥
नैवं भव गृहाणेदं यदाह वसुधाधिपः ।
भर्तुरिच्छामुपास्वेह जनस्यास्य गतिर्भव ॥ २९ ॥
'तू अशी बनू नको, या लोकोक्तीला आपल्या जीवनात चरितार्थ करू नको. राजांनी जे काही सांगितले आहे ते स्वीकार कर. ( श्रीरामाचा अभिषेक होऊन दे) आपल्या पतिच्या इच्छेचे अनुसरण करून या जन- समुदायाला येथे शरण देणारी बन. ॥२९॥
मा त्वं प्रोत्साहिता पापैर्देवराजसमप्रभम् ।
भर्त्तारं लोकभर्तारमसद्धर्ममुपादध ॥ ३० ॥
'पापपूर्ण विचार ठेवणार्‍या लोकांच्या नादी लागून तू देवराज इंद्रतुल्य तेजस्वी आपल्या लोक-प्रतिपालक स्वामीला अनुचित कर्म करण्यास लावू नको. ॥३०॥
न हि मिथ्या प्रतिज्ञातं करिष्यति तवानघः ।
श्रीमान् दशरथो राजा देवि राजीवलोचनः ॥ ३१ ॥
'देवि ! कमलनयन श्रीमान राजा दशरथ पापापासून दूर राहातात. ते आपली प्रतिज्ञा खोटी करणार नाहीत. ॥३१॥
ज्येष्ठो वदान्यः कर्मण्यः स्वधर्मस्यापि रक्षिता ।
रक्षिता जीवलोकस्य बली रामोऽभिषिच्यताम् ॥ ३२ ॥
'श्रीराम आपल्या भावात ज्येष्ठ, उदार, कर्मठ, स्वधर्माचे पालक, जीव-जगताचे रक्षक आणि बलवान आहेत. त्यांचा या राज्यावर अभिषेक होऊ दे. ॥३२॥
परिवादो हि ते देवि महाँलोके चरिष्यति ।
यदि रामो वनं याति विहाय पितरं नृपम् ॥ ३३ ॥
'देवि ! जर श्रीराम आपल्या पिता राजा दशरथ यांना सोडून वनांत निघून जातील तर संसारात तुझी फार निंदा होईल. ॥३३॥
स्वराज्यं राघवः पातु भव त्वं विगतज्वरा ।
न हि ते राघवादन्यः क्षमः पुरवरे वसन् ॥ ३४ ॥
'म्हणून राघवच आपल्या राज्याचे पालन करोत आणि तू निश्चिंत होऊन बसून रहा. राघवाशिवाय दुसरा कुणीही राजा या श्रेष्ठ नगरात राहून तुला अनुकूल आचरण करू शकणार नाही. ॥३४॥
रामे हि यौवराज्यस्थे राजा दशरथो वनम् ।
प्रवेक्ष्यति महेष्वासः पूर्ववृत्तमनुस्मरन् ॥ ३५ ॥
'श्रीराम युवराज पदावर प्रतिष्ठित झाल्यानंतर महाधनुर्धर राजा दशरथ पूर्वजांच्या वृत्तांत्तांचे स्मरण करून स्वतः वनात प्रवेश करतील'. ॥३५॥
इति सान्त्वैश्च तीक्ष्णैश्च कैकेयीं राजसंसदि ।
भूयः संक्षोभयामास सुमन्त्रस्तु कृताञ्जलिः ॥ ३६ ॥

नैव सा क्षुभ्यते देवी न च स्म परिदूयते ।
न चास्या मुखवर्णस्य लक्ष्यते विक्रिया तदा ॥ ३७ ॥
याप्रकारे सुमंत्रांनी हात जोडून कैकेयीला त्या राजभवनात सांत्वनापूर्ण तथा तीक्ष्ण वचनांनी वारंवार विचलित करण्याचा प्रयत्‍न केला परंतु ती जराही विचलित झाली नाही. (तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही.) देवी कैकेयीच्या मनात क्षोभही झाला नाही आणि दुःखही झाले नाही. त्या समयी तिच्या चेहर्‍यावरील रंगात काहीही फरक पडलेला आढळून आला नाही. ॥३६-३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा पस्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP