[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकचत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमता प्रमदावनस्य विध्वंसः -
हनुमन्ताच्या द्वारे प्रमदवनाचा (अशोकवाटिकेचा) विध्वंस -
स च वाग्भिः प्रशन्ताभिर्गमिष्यन् पूजितस्तया ।
तस्माद् देशादपक्रम्य चिन्तयामास वानरः ॥ १ ॥
तो वानरवीर हनुमान जावयास निघाला असता सीतेने त्याची योग्य शब्दात प्रशंसा केली. अशा प्रकारे समादर प्राप्त झाल्यावर त्या स्थानातून निघून तो याप्रकारे मनात विचार करू लागला- ॥१॥
अल्पशेषमिदं कार्यं दृष्टेयमसितेक्षणा ।
त्रीन् उपायानतिक्रम्य चतुर्थ इह दृश्यते ॥ २ ॥
कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त असलेली सीता तर माझ्या दृष्टीस पडली आहे (तिचे दर्शन मला घडले आहे) आता माझ्या या कार्याचा थोडासा अंश शत्रूच्या शक्तीचा अन्दाज घेणे बाकी राहिलेला आहे. यासाठी चार उपाय आहेत (साम, दाम, भेद आणि दण्ड). येथे पहिले तीन उपाय न योजता चवथ्याचाच (दण्डाचाच) प्रयोग करणे मला हितावह वाटत आहे. ॥२॥
न साम रक्षःसु गुणाय कल्पते
    न दानमर्थोपचितेषु युज्यते ।
न भेदसाध्या बलदर्पिता जनाः
    पराक्रमस्त्वेव ममेह रोचते ॥ ३ ॥
कारण राक्षसांच्या ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. ते द्रव्यसंपन्न आहेत म्हणून त्यांना दान देणेही योग्य नाही. शिवाय त्यांना बळाचा गर्व झालेला असल्याने भेदाने काम साध्य होणार नाही. म्हणून केवळ चौथ्या उपायाचा, दण्डाचा प्रयोग करणे हाच उपाय मला ठीक वाटत आहे. येथे पराक्रम करून दाखविणेच मला उचित वाटते आहे. ॥३॥
न चास्य कार्यस्य पराक्रमादृते
    विनिश्चयः कश्चिदिहोपपद्यते ।
हतप्रवीराश्च रणे तु राक्षसाः
    कथंचिदीयुर्यदिहाद्य मार्दवम् ॥ ४ ॥
या कार्याच्या सिद्धिसाठी पराक्रमाशिवाय येथे दुसर्‍या कुठल्याही उपायाचे अवलंबन करणे ठीक वाटत नाही. जर युद्धात राक्षसांमधील मुख्य मुख्य वीर मारले गेले तरच हे राक्षस कसे तरी नरम पडतील. ॥४॥
कार्ये कर्मणि निर्दिष्टे यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्यं कर्तुमर्हति ॥ ५ ॥
मुख्य कार्य पार पडल्यावर, पहिल्या कार्याला बाधा न येऊ देता, जो अनेक कार्ये पार पाडतो तोच हाती घेतलेले कार्य उत्तम प्रकारे शेवटास नेण्यास समर्थ होतो. ॥५॥
न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥ ६ ॥
लहान लहान कार्ये असली तरीही एकाच उपायाne पार पडतील असे नाही. जो पुरुष कुठलेही कार्य अथवा प्रयोजन अनेक प्रकारांनी सिद्ध करण्याची कला जाणतो तोच कार्य सिद्धिस नेण्यास समर्थ होऊ शकतो. ॥६॥
इहैव तावत् कृतनिश्चयो ह्यहं
    व्रजेयमद्य प्लवगेश्वरालयम् ।
परात्मसंमर्दविशेषतत्त्ववित्
    ततः कृतं स्यान्मम भर्तृशासनम् ॥ ७ ॥
म्हणून जरी सीतेचा शोध लावणे एकढेच कार्य करण्याचा माझा प्रथम निश्चय होता, तरी शत्रूशी आपल्या पक्षाला युद्ध करण्याचा प्रसंग आला तर कोण प्रबळ होईल आणि कोण कमजोर ठरेल, शत्रूमध्ये आणि आपल्यामध्ये विशेष काय आहे, हे समजून आल्यानन्तर जर मी वानराधिपती सुग्रीवाकडे गेलो तर माझ्याकडून स्वामीच्या आज्ञेचे पूर्णरूपाने पालन झाले असे समजले जाईल. ॥७॥
कथं नु खल्वद्य भवेत् सुखागतं
    प्रसह्य युद्धं मम राक्षसैः सह ।
तथैव खल्वात्मबलं च सारवत्
    समानयेन्मां च रणे दशाननः ॥ ८ ॥
परन्तु आज माझे येथपर्यन्त येणे सुखद अथवा शुभ परिणामकारक कसे होईल ? राक्षसांबरोबर हट्टाने युद्ध करण्याची सन्धि मला कशी प्राप्त होईल ? तसेच दशमुख रावण युद्धात आपल्या स्वतःच्या सेनेला आणि मलाही तुलनात्मक दृष्टीने पाहून कोण अधिक बलवान आहे, हे कसे बरे समजू शकेल ? ॥८॥
ततः समासाद्य रणे दशाननं
    समन्त्रिवर्गं सबलं सयायिनम् ।
हृदि स्थितं तस्य मतं बलं च वै
    सुखेन मत्वाहमितः पुनर्व्रजे ॥ ९ ॥
त्या युद्धात मी मन्त्री, सेना आणि सहायकांसह रावणाचा सामना करून त्याच्या अन्तःकरणातील भाव तसेच, सैनिकांची शक्ती याची माहिती करून घेईन आणि त्यानन्तरच येथून परत जाईन. ॥९॥
इदमस्य नृशंसस्य नन्दनोपममुत्तमम् ।
वनं नेत्रमनःकान्तं नानाद्रुमलतायुतम् ॥ १० ॥
या निर्दयी रावणाचे हे सुन्दर उपवन नेत्रांना आनन्द देणारे आणि मनोरम आहे. नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि लतांनी व्याप्त असल्याने हे नन्दनवनाप्रमाणे उत्तम वाटत आहे. ॥१०॥
इदं विध्वंसयिष्यामि शुष्कं वनमिवानलः ।
अस्मिन् भग्ने ततः कोपं करिष्यति दशाननः ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे वाळलेल्या वनाला अग्नि जाळून टाकतो, त्याप्रमाणे मी ही या उपवनाचा आज विध्वंस करून टाकीन. हे उपवन भग्न झाल्यानन्तर रावण माझ्यावर निश्चितच रागवेल. ॥११॥
ततो महत्साश्वमहारथद्विपं
    बलं समानेष्यति राक्षसाधिपः ।
त्रिशूलकालायसपट्टिशायुधं
    ततो महद्युद्धमिदं भविष्यति ॥ १२ ॥
त्यानन्तर तो राक्षसराजा हत्ती, घोडे आणि विशाल रथांनी युक्त आणि त्रिशूल, कालायस आणि पट्टिश (पोलादी पट्टे) आदि शस्त्रास्त्रांनी सुसज्जित अत्यन्त मोठी सेना घेऊन येईल. मग तर येथे फार भयंकर युद्ध सुरू होईल. ॥१२॥
अहं तु तैः संयति चण्डविक्रमैः
    समेत्य रक्षोभिरसह्यविक्रमः ।
निहत्य तद् रावणचोदितं बलं
    सुखं गमिष्यामि हरीश्वरालयम् ॥ १३ ॥
त्या युद्धात माझी गति रोखली जाऊ शकणार नाही. माझा पराक्रम कुंठित होऊ शकणार नाही. प्रचण्ड पराक्रम दाखविणार्‍या त्या राक्षसांशी युद्धान्त मी भिडलो की रावणाने धाडलेल्या त्या सर्व सेनेचा वध करून सुखपूर्वक सुग्रीवाच्या निवासस्थानास (किष्किन्धापुरीस) परत जाईन. ॥१३॥
ततो मारुतवत् क्रुद्धो मारुतिर्भीमविक्रमः ।
उरुवेगेन महता द्रुमान् क्षेप्तुमथारभत् ॥ १४ ॥
असा विचार करून वायूप्रमाणे भयंकर पराक्रम करणारा तो मारूती क्रुद्ध झाला आणि आपल्या मांड्‍याच्या मोठ्‍या वेगाने तो मोठ मोठ्‍या वृक्षांना उलथे पालथे करू लागला, उखडून उखडून इतःस्ततः फेकू लागला. ॥१४॥
ततस्तु हनुमान् वीरो बभञ्ज प्रमदावनम् ।
मत्तद्विजसमाघुष्टं नानाद्रुमलतायुतम् ॥ १५ ॥
नन्तर मत्त पक्ष्यांनी गजबजलेल्या, नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि लतांनी भरलेल्या (अन्तःपुरातील स्त्रियांना विहार करण्यास योग्य अशा) प्रमदवनाला त्याने उध्वस्त करून टाकले. ॥१५॥
तद्वनं मथितैर्वृक्षैर्भिन्नैश्च सलिलाशयैः ।
चूर्णितैः पर्वताग्रैश्च बभूवाप्रियदर्शनम् ॥ १६ ॥
त्या वनान्तील वृक्षांना त्याने छिन्न भिन्न करून टाकले, जलाशय फोडून टाकले, मनोहर पर्वत शिखरांचे नाना प्रकाराचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यामुळे ते सुन्दर वन काही क्षणातच अशोभनीय दिसू लागले. त्याची सर्व शोभा नष्ट झाली. ॥१६॥
नानाशकुन्तविरुतैः प्रभिन्नसलिलाशयैः ।
ताम्रैः किसलयैः क्लान्तैः क्लान्तद्रुमलतायुतैः ॥ १७ ॥

न बभौ तद् वनं तत्र दावानलहतं यथा ।
व्याकुलावरणा रेजुर्विह्वला इव ता लताः ॥ १८ ॥
नाना प्रकारचे पक्षी तेथे भयाने चींचीं करू लागले. जलाशयाचे घाट तुटून फुटून गेले. तांब्या प्रमाणे लाल लाल असणारी वृक्षांची पालवी त्याने चुरगळून टाकली आणि तेथील शिल्लक राहिलेले वृक्ष आणि लताही त्याने तुडवून टाकल्या. या सर्व कारणामुळे ते वन वणवा लागून जळून गेल्यासारखे दिसू लागले आणि ते अस्ताव्यस्त होऊन, शोकाकुल झालेल्या स्त्रियांप्रमाणे भासू लागल्या. ॥१७-१८॥
लतागृहैश्चित्रगृहैश्च नाशितै-
    र्व्यालैर्मृगैरार्तरवैश्च पक्षिभिः ।
शिलागृहैरुन्मथितैस्तथा गृहैः
    प्रनष्टरूपं तदभून्महद्‌ वनम् ॥ १९ ॥
उध्वस्त झालेली लतागृहे आणि धूळधाण झालेली क्रीडागृहे, आक्रोश करू लागलेले व्याघ्र-मृग आणि पक्षी, उखडून टाकलेले दगडी प्रासाद आणि सामान्य घरे, यामुळे त्या महान प्रमदवनाचे सर्व रूप-सौन्दर्य नष्ट होऊन गेले. ॥१९॥
सा विह्वलाशोकलताप्रताना
    वनस्थली शोकलताप्रताना ।
जाता दशास्यप्रमदावनस्य
    कपेर्बलाद्धि प्रमदावनस्य ॥ २० ॥
रावणाच्या स्त्रियांचे ज्यात रक्षण होत असे, अशा या प्रमदवनान्तील चंचल अशोक लतांच्या समुदायांनी युक्त असलेल्या, त्या वनभूमीतील लतासमुदायाची स्थिती कपिवर हनुमन्तांच्या बळप्रयोगाने श्रीहीन होऊन, शोचनीय लतांच्या विस्ताराने युक्त झाली (त्याची दुर्दशा पाहून दर्शकांच्या मनाला दुःख होत होते). ॥२०॥
ततः स कृत्वा जगतीपतेर्महान्
    महद् व्यलीकं मनसो महात्मनः ।
युयुत्सुरेको बहुभिर्महाबलैः
    श्रियाज्वलंस्तोरणमास्थितः कपिः ॥ २१ ॥
याप्रमाणे पृथ्वीपती महात्मा रावणाच्या मनाला अतिशय अप्रिय लागणारी गोष्ट केल्यानन्तर कान्तीने देदीप्यमान असलेले ते प्रचंड कपिवर अनेक महाबलाढ्‍य राक्षसांशी एकाकी (एकट्‍याने) युद्ध करण्याच्या इच्छेने प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एक्केचाळीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥४१॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP