श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। एकषष्टीतमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रस्य पुष्करतीर्थे तपस्या, राजर्षिणाम्बरीषेणर्चीकमध्यमपुत्रं शुनःशेपं यज्ञपशूकर्तुं क्रीत्वा स्वगृहे तस्य समायनम् - विश्वामित्रांची पुष्कर तीर्थात तपस्या, तथा राजर्षि अंबरीषाने ऋचीकाचा मधला पुत्र शुनःशेप याला यज्ञ पशु बनविण्यासाठी मोल देऊन आणणे -
विश्वामित्रो महातेजाः प्रस्थितान् वीक्ष्य तानृषीन् ।
अब्रवीन्नरशार्दूल सर्वांस्तान् वनवासिनः ॥ १ ॥
[शतानन्द सांगत आहेत - ] पुरुषसिंह श्रीरामा ! यज्ञात आलेल्या सर्व वनवासी ऋषिंना जाताना पाहून महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांना म्हटले - ॥ १ ॥
महाविघ्नः प्रवृत्तोऽयं दक्षिणामास्थितो दिशम् ।
दिशमन्यां प्रपत्स्यामस्तत्र तप्स्यामहे तपः ॥ २ ॥
'महर्षिंनो ! या दक्षिण दिशेमध्ये राहून आपल्या तपस्येत महान् विघ्न येत आहे. म्हणून आता आपण दुसर्‍या दिशेला निघून जाऊ आणि तेथे तपस्या करू. ॥ २ ॥
पश्चिमायां विशालायां पुष्करेषु महात्मनः ।
सुखं तपश्चरिष्यामः सुखं तद्धि तपोवनम् ॥ ३ ॥
विशाल पश्चिम दिशेला जी महात्मा ब्रह्मदेवांची तीन पुष्कर क्षेत्रे आहेत, त्यांच्या जवळ राहून आपण सुखपूर्वक तपस्या करू या. कारण ते तपोवन फारच सुखद आहे.' ॥ ३ ॥
एवमुक्त्वा महातेजाः पुष्करेषु महामुनिः ।
तप उग्रं दुराधर्षं तेपे मूलफलाशनः ॥ ४ ॥
असे म्हणून ते महातेजस्वी महामुनि पुष्करमध्ये निघून गेले आणि तेथे फल-मूलांचे भोजन करीत उग्र आणि दुर्जय तपस्या करू लागले. ॥ ४ ॥
एतस्मिन्नेव काले तु अयोध्याधिपतिर्महान् ।
अम्बरीष इति ख्यातो यष्टुं समुपचक्रमे ॥ ५ ॥
याच काळात अयोध्येमध्ये महाराज अंबरीष एका यज्ञाची तयारी करू लागले. ॥ ५ ॥
तस्य वै यजमानस्य पशुमिन्द्रो जहार ह ।
प्रणष्टे तु पशौ विप्रो राजानमिदमब्रवीत् ॥ ६ ॥
ज्यावेळी ते यज्ञ करण्यात गुंतले होते, त्यासमयी इंद्राने त्यांच्या यज्ञपशुला चोरून नेले. पशु हरवल्यावर पुरोहितांनी राजाला सांगितले - ॥ ६ ॥
पशुरभ्याहृतो राजन् प्रणष्टस्तव दुर्नयात् ।
अरक्षितारं राजानं घ्नन्ति दोषा नरेश्वर ॥ ७ ॥
'राजन् ! जो पशु येथे आणला गेला होता तो आपल्या दुर्नीतिमुळे हरवला आहे. नरेश्वर ! जो राजा यज्ञपशुचे रक्षण करीत नाही त्याला अनेक प्रकारचे दोष नष्ट करून टाकतात. ॥ ७ ॥
प्रायश्चित्तं महद्ध्येतन्नरं वा पुरुषर्षभ ।
आनयस्व पशुं शीघ्रं यावत् कर्म प्रवर्तते ॥ ८ ॥
'पुरुषप्रवर ! जो पर्यंत हे यज्ञकर्म चालू आहे तो पर्यंतच (समाप्तीच्या आधीच) हरवलेल्या पशुचा शोध करवून त्यास शीघ्र येथे घेऊन यावे. अथवा त्याच्या प्रतिनिधिरूपाने कुणा पुरुष-पशुला विकत घेऊन आणावे. हेच त्या पापाचे महान् प्रायश्चित्त आहे.' ॥ ८ ॥
उपाध्यायवचः श्रुत्वा स राजा पुरुषर्षभः ।
अन्वियेष महाबुद्धिः पशुं गोभिः सहस्रशः ॥ ९ ॥
पुरोहितांचे असे म्हणणे ऐकून महाबुद्धिमान् राजा अंबरीषाने हजारो गायींचे मूल्य ठरवून खरेदी करण्याकरता एका पुरुषाचे अन्वेषण केले. ॥ ९ ॥
देशाञ्जनपदांस्तांस्तान् नगराणि वनानि च ।
आश्रमाणि च पुण्यानि मार्गमाणो महीपतिः ॥ १० ॥

स पुत्रसहितं तात सभार्यं रघुनन्दन ।
भृगुतुङ्‌गे समासीनमृचीकं संददर्श ह ॥ ११ ॥
'तात रघुनन्दन ! विभिन्न देश, जनपदे, नगरे, वने तथ पवित्र आश्रमात शोध करीत करीत राजा अंबरीष भृगतुङ्‍ग पर्वतावर पोहोंचले आणि तेथे त्यांनी पत्‍नी आणि पुत्रांसह बसलेल्या ऋचीक मुनिंचे दर्शन केले. ॥ १०-११ ॥
तमुवाच महातेजाः प्रणम्याभिप्रसाद्य च ।
महर्षिं तपसा दीप्तं राजर्षिरमितप्रभः ॥ १२ ॥
अमित कान्तिमान आणि महातेजस्वी राजर्षि अंबरीषाने तपस्येने उद्दीप्त होणार्‍या महर्षि ऋचीकांना प्रणाम केला आणि त्यांना प्रसन्न करून म्हटले - ॥ १२ ॥
पृष्ट्‍वा सर्वत्र कुशलमृचीकं तमिदं वचः ।
गवां शतसहस्रेण विक्रीणीषे सुतं यदि ॥ १३ ॥

पशोरर्थे महाभाग कृतकृत्योऽस्मि भार्गव ।
प्रथम तर त्यांनी ऋचीक मुनिंना त्यांच्या सर्व वस्तुंच्या विषयी कुशल समाचार विचारला. त्यानंतर म्हणाले - 'महाभाग भृगुनन्दन ! जर आपण एक लाख गायी घेऊन आपल्या एका पुत्राला यज्ञपशु बनविण्यासाठी विकाल तर मी कृतकृत्य होईन. ॥ १३ १/२ ॥
सर्वे परिगता देशा यज्ञीयं न लभे पशुम् ॥ १४ ॥

दातुमर्हसि मूल्येन सुतमेकमितो मम ।
'मी सर्व देशांमध्ये फिरून आलो. परंतु कोठेही यज्ञोपयोगी पशु मला मिळू शकला नाही म्हणून आपण उचित मूल्य घेऊन मला आपला एक पुत्र द्यावा.' ॥ १४ १/२ ॥
एवमुक्तो महातेजा ऋचीकस्त्वब्रवीद् वचः ॥ १५ ॥

नाहं ज्येष्ठं नरश्रेष्ठ विक्रीणीयां कथञ्चन ।
त्यांनी असे म्हटल्यावर महातेजस्वी ऋचीक म्हणाले - 'नरश्रेष्ठ ! मी आपल्या ज्येष्ठ पुत्राला तर कुठलाही प्रकारे विकणार नाही.' ॥ १५ १/२ ॥
ऋचीकस्य वचः श्रुत्वा तेषां माता महात्मनाम् ॥ १६ ॥

उवाच नरशार्दूलमम्बरीषमिदं वचः ।
ऋचीक मुनिंचे हे म्हणणे ऐकून त्या महात्मा पुत्रांच्या मातेने पुरुषसिंह अंबरीषांना या प्रकारे म्हटले - ॥ १६ १/२ ॥
अविक्रेयं सुतं ज्येष्ठं भगवानाह भार्गवः ॥ १७ ॥

ममापि दयितं विद्धि कनिष्ठं शुनकं प्रभो ।
तस्मात् कनीयसं पुत्रं न दास्ये तव पार्थिव ॥ १८ ॥
'प्रभो ! भगवान् भार्गव म्हणत आहेत की ज्येष्ठ पुत्र कदापि विकण्यायोग्य नाही, परंतु आपल्याला माहीत असले पाहिजे की जो सर्वांत लहान शुनक आहे, तो मलाही फारच प्रिय आहे. म्हणून पृथ्वीनाथ ! मी आपल्याला लहान पुत्र कदापि देणार नाही. ॥ १७-१८ ॥
प्रायेण हि नरश्रेष्ठ ज्येष्ठाः पितृषु वल्लभाः ।
मातॄणां च कनीयांसस्तस्माद् रक्षे कनीयसम् ॥ १९ ॥
'नरश्रेष्ठ ! प्रायः ज्येष्ठ पुत्र पित्याला प्रिय असतो आणि कनिष्ठ मातांना प्रिय असतो. म्हणून मी आपल्या कनिष्ठ पुत्राचे अवश्य रक्षण करीन. ॥ १९ ॥
उक्तवाक्ये मुनौ तस्मिन् मुनिपत्‍न्यां तथैव च ।
शुनःशेपः स्वयं राम मध्यमो वाक्यमब्रवीत् ॥ २० ॥
'श्रीरामा ! मुनि आणि त्यांच्या पत्‍नीने असे सांगितल्यावर मधल्या पुत्राने - शुनःशेपाने - स्वतः म्हटले - ॥ २० ॥
पिता ज्येष्ठमविक्रेयं माता चाह कनीयसम् ।
विक्रीतं मध्यमं मन्ये राजपुत्र नयस्व माम् ॥ २१ ॥
'राजपुत्रा ! पित्याने ज्येष्ठाला आणि मातेने कनिष्ठ पुत्राला विक्रय करण्यास अयोग्य सांगितले आहे. म्हणून मी असे समजतो की या दोघांच्या दृष्टीने मधला पुत्रच विक्रयास योग्य आहे. म्हणून तुम्ही मलाच घेऊन चला. ॥ २१ ॥
अथ राजा महाबाहो वाक्यान्ते ब्रह्मवादिनः ।
हिरण्यस्य सुवर्णस्य कोटिभी रत्‍नराशिभिः ॥ २२ ॥

गवां शतसहस्रेण शुनःशेपं नरेश्वरः ।
गृहीत्वा परमप्रीतो जगाम रघुनन्दन ॥ २३ ॥
'महाबाहु रघुनन्दना ! ब्रह्मवादी मधल्या पुत्राने असे म्हटल्यावर राजा अंबरीष फार प्रसन्न झाले आणि एक कोटी सुवर्ण मुद्रा, रत्‍नांचा ढीग आणि एक लाख गायींच्या बदल्यात शुनःशेपास घेऊन ते आपल्या स्थानी जावयास निघाले. ॥ २२-२३ ॥
अम्बरीषस्तु राजर्षी रथमारोप्य सत्वरः ।
शुनःशेपं महातेजा जगामाशु महायशाः ॥ २४ ॥
महातेजस्वी, महायशस्वी राजर्षि अंबरीष, शुनःशेपास रथात बसवून अत्यंत उतावेळपणाने, तीव्र गतिने निघाले. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा एकसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६१ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP