॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
   
॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
  
युद्धकांड 
  
॥  अध्याय दहावा ॥   
इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती
  
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ 
युद्ध चालू असता रात्र झाली : 
रणीं करितां द्वंद्वयुद्ध । इंद्रजित गांगिला सुबद्ध । 
त्याचे पोटीं अति विरुद्ध । रात्रीं शरबंध करावया ॥ १ ॥ 
प्रथम गांजिलें हनुमंते । तें बहु दुःख इंद्रजितातें । 
अंगदें गांजितां येथें । अति लज्जेतें पावला ॥ २ ॥ 
अपमानाचें अति विरुद्ध । रामलक्ष्मणादि वीर विविध । 
रणीं करावया शरबंध । रात्रीं युद्ध मांडिलें ॥ ३ ॥  
युद्ध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् । 
रविरस्तंगतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥१॥ 
अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् । 
संग्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥२॥ 
राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः । 
अन्योन्यं समरे जघ्नुस्तस्मिंस्तमसि दारुणे ॥३॥ 
हत दास्य चैहीति कथं विद्रवसीति च । 
एवं सुतुमुलः शब्दस्तस्मिस्तमासि शुश्रुवे ॥४॥ 
रात्रीचा फायदा घेऊन इंद्रजीताचा शरबंध प्रयोग : 
रणीं भिडतां वानरवीर । राक्षस गांजिले थोर थोर । 
निबिड पडावया अंधकार । निशा निशाचर इच्छिती ॥ ४ ॥ 
रात्रीं प्रबळ निशाचर । तेथें निर्बळ वानर । 
ऐसा करितां विचार । दिवाकरअस्त जाला ॥ ५ ॥ 
निजबळें सबळ रजनी । सुषुप्ति प्राण्यां प्राणहरणी । 
तें गुडुप पडतां रणीं । कोणी देखेना ॥ ६ ॥ 
अरे तूं काय होसी वानर । कपीसीं पुसती निशाचर । 
पडखळोनि येरयेर । रणीं सात्वर मारिती ॥ ७ ॥ 
राक्षसां वानरां बद्धवैर । राक्षसां साह्य अंधकार । 
वानरां साह्य श्रीरामचंद्र । युद्ध दुर्धर मांडलें ॥ ८ ॥ 
छेदीं भेदीं रणीं पाडीं । पायीं धरोनियां ओढीं । 
वेगीं । उपटा रे तांतडीं । वीर कडाडीं गर्जती ॥ ९ ॥ 
आमुचा अधिक पुरुषार्थ । इतर मशकें कायसीं येथ । 
ऐसें अंधारीं गर्जत । करीत घात येरयेरां ॥ १० ॥ 
पाडीं पाडीं म्हणती रणीं । मिसळल्या वीरश्रेणी । 
युद्ध होतसे झोंटधरणी । मागें कोणी न सरती ॥ ११ ॥  
तस्मिंस्तमसि दुःपारे राक्षसाः क्रोधमूर्च्छिताः । 
परिपेतुः सुसआंक्रुद्धा भक्षयंतौ वनेचरान्॥५॥ 
हयान्कांचनपीडांश्च ध्वजांश्चाभरणानि च । 
आप्लुत्य दशनैस्तीक्ष्णैर्नखैश्च विचकर्षिरे ॥६॥ 
कुंजरान्कुंजरारोहान्पताकाध्वजिनो रथान् । 
आप्लुत्य विचकर्षुस्ते दशनैः क्रोधमूर्च्छिताः॥७॥ 
लक्ष्मणस्त्वथ रामश्च शरैराशीविषोपमैः । 
आदिश्यादिश्य रक्षांसि प्रवराणि निजघ्नतुः॥८॥ 
तुरंगखुरविध्वस्तं रथनेमिसमुद्धतम् । 
रुरोध कर्णौ योधानां चक्षुंषि च महीरजः॥९॥  
आपणा न दिसे आपुलें शरीर । तेथें कोण देखे येरयेर । 
तमोबळें निशाचर । युद्धार्थदुर्धर पेटले ॥ १२ ॥ 
वानारांची प्रतिक्रिया आणि रावणास प्रधानांचे उत्तर : 
निशाबळें निशाचरीं । लावून आले निशाण भेरी । 
नाद ऐकोनि वानरीं । राक्षसभारीं मिसळले ॥ १३ ॥ 
वानर धरोनि अंधारांत । राक्षस मुखीं खावों घालित । 
दांती करांडून दांत । जिव्हां तोडित नखाग्रीं ॥ १४ ॥ 
कपि घालितां मुखांतरीं । रिघोनियां कर्णद्वारीं । 
लात हाणोनियां शिरीं । धरेवरी पाडिती ॥ १५ ॥ 
वानर खावों सुती पोटीं । उर्ध्व उडोनि जगजेठी । 
फोडून ब्रह्मांडकवटीं । राक्षसां सृष्टीं पाडिती ॥ १६ ॥ 
सुवर्णाभरणीं शोभती गाढे । रणीं पाखरिले पैं घोडे । 
त्यांवरी उडउडोनि माकडें । रणीं रोकडे पाडिती ॥ १७ ॥ 
नखीं चिरोनि उदर । मुखीं फाडोनि पाखर । 
रणीं पाडिती मुख्य धुर । असिवारासमवेत ॥ १८ ॥ 
पताका फाडोनियां दातीं । गजदंत उपटोनियां घेती । 
रणीं पाडोनि गजपती । मारिले हस्ती असंख्य ॥ १९ ॥ 
वानरी घालोनियां उडी । रथसारथीं सहित घोडीं । 
मोडिल्या रथांचिया कोडी । रणपरवडी रक्षसां ॥ २० ॥ 
राक्षसें हाणितां नाना शस्त्रीं । वानर उडाले अंबरी । 
वृथा घाय जाती अंधारीं । राम साहाकारी वानरां ॥ २१ ॥ 
श्रीराम तेजें निरंतर । अंधारीं देखणे वानर । 
तिहीं मारिले निशाचर । सैन्य समग्र रणमारें ॥ २२ ॥ 
रणीं पाडोनि निशाचर । सैन्य मारोनि समग्र । 
रामनामाचा गजर । केला भुभुःकार वानरीं ॥ २३ ॥ 
येरीकडे राम    सौमित्र । मुख्य धुरा थोर थोर । 
नावानिगे निशाचर । रणीं समग्र मारिले ॥ २४ ॥ 
सुवर्णपत्री कंकपत्री । बाण वर्षोनि बहुपत्री । 
मारिल्या राक्षसांच्या हारी । रणमहामारी श्रीराम ॥ २५ ॥ 
रथ छेदिले सचक्र । छेदिले अश्वांचे खुर । 
कंठनाळ छेदूनियां वीर । रणीं समग्र पाडिलें ॥ २६ ॥ 
शुंडादंड दांतेंसहित । छेदोनि पाडिले गजघट । 
वीरांचे छेदोनि नेत्रवाट । रणीं सुभट पाडिले ॥ २७ ॥ 
श्रीराम देखणा अंधारीं । वायकांड नाहीं करीं । 
पाचपाचारुनि धुरा थोरी । रणमहामारीं मारिल्या ॥ २८ ॥ 
श्रीराम वर्षोनि बाणजाळ । सैन्यासगट धुरा प्रबळ । 
क्षणें मारिल्या सकळ । हलकल्लोळ उठिला ॥ २९ ॥ 
रावण म्हणे प्रधानांसी । मारुं म्हणां श्रीरामासी । 
तो करितो रणकंदनासी । तुम्ही युद्धासी कां न वचां ॥ ३० ॥ 
सत्य बोलिला बिभीषण । त्याचे वचन अति प्रमाण । 
करावया श्रीरामासीं रण आंगवण नाहीं तुम्हां ॥ ३१ ॥ 
ऐकोनि रावणाचें वचन । स्वयें विनविती प्रधान । 
न होतें आज्ञापन । म्हणोनि रण नाहीं केलें ॥ ३२ ॥ 
रावणवचनें लज्जायमान । युद्धा निघाले प्रधान । 
नावानिगे साही जाण । रणप्रवीण ते ऐका ॥ ३३ ॥  
यज्ञशत्रुश्च दुर्घर्षो महापार्श्वमहोदरौ । 
वज्रदंष्ट्रो महाकायस्तौ चोभौ शुकसारणौ ॥१०॥ 
तेषां रामः शरैः षड्भिः षड् जघान निशाचरान् । 
निमेषांतरमात्रेण घोरैरग्निशिखोपमैः ॥११॥ 
ते तु रामेण बाणौघैर्लघुहस्तेन ताडिताः । 
युद्धादपसृतास्तत्र सावशेषायुषोऽभवन् ॥१२॥ 
सुवर्णपुंखैर्विशिखैः संपतद्भिः समततः । 
दिशश्चकार विमलाः प्रदिशश्च महाबलः ॥१३॥ 
ये त्वंन्ये राक्षसा वीरा रामस्याभिमुखे स्थिताः । 
तेऽपि नष्टाः समासाद्य पतंगा इव पावकम्॥१४॥  
श्रीरामासीं करावया रण । नावानिगे जे प्रधान । 
युद्धा आले सहाही जण । कोण कोण ते ऐका ॥ ३४ ॥ 
महापार्श्व महोदर । वज्रदंष्ट्र हमाकाय वीर । 
शुक सारण चतुर । सहाही दुर्धर युद्धार्थी ॥ ३५ ॥ 
रामाने केलेली दुर्दशा व त्यांचे पलायन : 
निजसैन्याचा कडकडाट । महारथाचा घडघडाट । 
श्रीरामासंमुख उद्भट । वीर वरिष्ठ पैं आले ॥ ३६ ॥ 
येतां देखोनि सहाही   जण । त्यांचा निःशेष घ्यावया प्राण । 
रामें सज्जिले सहा बाण । वेगविंदान तें ऐका     ॥ ३७ ॥ 
सहाही जणीं धनुष्यातें ।निर्वाणबाण सज्जिले तेथें । 
विधों जातां श्रीरामातें । तंव रघुनाथें विधिले ॥ ३८ ॥ 
त्यांचे छेदोनि चाप बाण । रथ सारथि करोनि चूर्ण । 
धुळी मेळवोनि सहाही जण । मुकुट छेदून पाडिले ॥ ३९ ॥ 
जरी ते रणीं न देत पाठी । राम मारिता जगजेठी । 
आयुष्य होतें अदृष्टीं । देवोनि पाठी पळाले ॥ ४० ॥ 
श्रीराम न मारी पळत्यातें । हें तिहीं पूर्वी ऐकिलें होतें । 
वांचवावया जीवितातें । रणीं रामातें विमुख झाले ॥ ४१ ॥ 
पळतां देखोनि प्रधान । स्वयें हांसती वानरगण । 
तरी ते पलायमान। रामबाणाभेण सलज्ज ॥ ४२ ॥ 
पळालिया ते प्रधान । त्यांचे सेनानी आणि सैन्य । 
रामें केलें रणकंदन । दुर्धर बाण वर्षोनी ॥ ४३ ॥ 
सुवर्णकवची वीरश्रेणी । खिळोनि सांडिले धरणी । 
असंख्य वीर शिरें छेदूनी । पाडिले रणीं हंबत ॥ ४४ ॥ 
जो रणीं मिरवी       हात । बाणीं होत शिरःपात । 
जो रणीं हाक देत । जिव्हा सदंत छेदी बाणें ॥ ४५ ॥ 
यापरी रामें रणांगणीं । धडमुंडांकित केली धरणीं । 
उरले ते जीव घेवोनी । गेले पळोनी लंडेसी   ॥ ४६ ॥  
ततःक्रोधसमाविष्टः शरवर्षेण रावणिः । 
अंगदस्य चमूं घोरां नाशयामास सर्वतः ॥१५॥ 
ततःक्रोधपरीतात्मा युवराजोंऽगदो बली । 
शिलामुत्पाटयामास बाहुभ्यां प्रणदन्मुहुः ॥१६॥ 
तां समुत्क्षिप्य तेजस्वी छादयानः शरोर्मिभिः। 
रथं बभंज वेगेन शिलया कपिकुंजरः ॥१७॥ 
वर्तमाने चातिरौदे संग्रामेऽतिभयंकरेः । 
अंगदो विरथं कर्तुं रावणिं समुपाद्रवत् ॥१८॥ 
इंद्रजित्तं रथं त्यक्त्वा हताश्वो हतसारथि । 
अंगदेन महामायस्तत्रैवांतरधीयत ॥१९॥ 
अंगदाकडून इंद्रजितावर शिळाप्रहार व त्याचे अंतःर्धान : 
प्रधान पळाले त्वरान्वित । सैन्य भंगलें समस्त । 
ते काळीं इंद्रजित । अंगदसैन्यांत मिसळला ॥ ४७ ॥ 
इंद्रजित हनुर्वाडा चपळ । रागें वर्षत बाणजाळ । 
अंगदसैन्या हलकल्लोळ । रणकल्लोळ मांडला   ॥ ४८ ॥ 
निजसैन्यासीं आवर्त । तेणें अंगद क्रोधान्वित । 
रणीं मर्दावया इंद्रजित । केला पुरुषार्थ तो ऐका ॥ ४९ ॥ 
पंचयोजनें सबळ शिळा । अंगद उचली बाहुबळा । 
त्याच्या छेदोनि बाणजाळा । सवेग शिळा सोडिली ॥ ५० ॥ 
इंद्रजित विंधी अमित शर । परी ते शिळा दुर्निवार । 
धाकें सांडूनि रहंवर । पळे सत्वर इंद्रजित ॥ ५१ ॥ 
त्या शिळेच्या निजघातीं । सहितरथाश्वसारथी । 
इंद्रजित रणांगणीं विरथी । लाविली ख्याती अंगदें     ॥ ५२ ॥ 
होतां शिळेचा संपात । तेणें मरावा इंद्रजित । 
परी तो राक्षस बुद्धिवंत । त्वरान्वित पळाला ॥ ५३ ॥ 
हताश्व हतसारथी । इंद्रजित रणांगणीं विरथी । 
धनुष्यबाणशस्त्रसंपातीं । शिळासंपातीं शतचूर्ण ॥ ५४ ॥ 
विरथी पळतां इंद्रजितासीं । अंगदें धावोनि धरिला केशीं । 
येरें कापून बुचड्यासी । लागवेगेंसी पळाला ॥ ५५ ॥ 
अंधारीं पळतां गुप्तगती । अंगदें उडोनि धरितां हातीं । 
तंव तो अंतर्धानस्थितीं  । खेचरगती तडकला   ॥ ५६ ॥ 
इंद्रजित पावतां अंतर्धान । अंगदें केलें गडगर्जन । 
निर्दाळून त्यांचें सैन्य । बळवाहन परतला ॥ ५७ ॥ 
द्वंद्वयुद्ध आणि आतांचें रण । दोहीं रणकाळीं आपण । 
अंगदापुढें पलायमान । अति उद्विग्न इंद्रजित ॥ ५८ ॥ 
प्रथम मज गांजी हनुमंत । अंगदें दोनी वेळां येथ । 
जळो जळो माझा पुरुषार्थ । केलों हताहत वानरीं ॥ ५९ ॥ 
रणीं न जिंकवती वानर । केंवी जिंकावे रामचंद्र । 
इंद्रजित स्वयें चिंतातुर । करी अभिचार शारबंधा ॥ ६० ॥ 
इंद्रजिताने शिववरदान जागृत करुन प्रयोग केला : 
इंद्रजितासीं शिववरदान । शिवाचें जें सर्पभूषण । 
तेंचि होवोनियां बाण । शरबंधन वीरांसी ॥ ६१ ॥ 
सर्प जे कां शिवभूषण । तेचि स्वयें होवोनि बाण । 
भलतैसा वीर विचक्षण । शरबंधीं जाण बांधिती  ॥ ६२ ॥ 
केल्या तदर्थ आभिचारिक । रणीं होय फलोन्मुख । 
येरवीं तें निरर्थक । ऐसें देख शिववरदान ॥ ६३ ॥ 
यालागीं इंद्रजित आपण । करावया अभिचारिक यज्ञ । 
करिता होय यज्ञसाधन । विधिविधान तें ऐका ॥ ६४ ॥  
स यज्ञभूम्यां विधिवत्पावकं जुहृतेऽस्त्रवित् ।  
जुहृतस्तस्य तत्राग्निं रक्तपीतांबरस्रजः ॥२०॥ 
आजहुस्तत्र सामग्रीं राक्षसा यत्र रावणिः ।  
शस्त्राणि शतपत्राणि समिधश्च विभीतकाः ॥२१॥ 
लोहितानि च वासांसि स्त्रुवं कार्ष्णायसं तथा ।  
सर्वतोऽग्निं समास्तीर्य शतपत्रैः सतोमरैः ॥२२॥ 
छगस्य चापि कृष्णस्य कंठं जग्राह जीवतः ।  
शोणितं तत्र विधिवत्स जुहाव रणोत्सुकः ॥२३॥  
आरक्त वस्त्र आरक्त माळा । आरक्त शेंदुराचा टिळा । 
गोरोचनमणींच्या पीत माळा । घातल्या गळां यज्ञसिद्ध्यर्थ ॥ ६५ ॥ 
अभिचारहोमविधानीं । शस्त्रें मंथोनि काढिला अग्नी । 
रक्तचंदनइंधनीं । पेटविला वन्ही लखलखित ॥ ६६ ॥ 
अग्नि पेटवितां धूम निघे । तैं कर्त्यासीं अपजयो लागे । 
विधूम ज्वाला निघतां वेगें । तैं लागवेगें रणविजय ॥ ६७ ॥ 
आणिक तेथील यागविधान । उलूकरक्तें परिसमूहन । 
शस्त्रांचे परिस्तरण । करी आपण इंद्रजित ॥ ६८ ॥ 
राक्षसीं आणिले शस्त्रसंभार । इंद्रजित प्रोक्षी जपोनि मंत्र । 
परिस्तरणाचा प्रकार । शास्त्रविचार तो ऐका ॥ ६९ ॥ 
शतपत्रा शतघ्नी । खड्ग त्रिशूळ तोमर बाणीं । 
गदा मुद्गल गुप्तघ्नी । परिस्तरणीं ही शस्त्रें ॥ ७० ॥ 
तिखें काढिलें लोह गाळोनि । त्याच्या स्त्रुवा होमविधानीं । 
इंद्रजित करीं धरोनी । होमा अवदानीं छागरक्ता ॥ ७१ ॥ 
ज्या छागासी पांढरा तिलक । तेणें यजमाना लागे सीक । 
निखळ कृष्णवर्ण देख । आवश्यक आणिला ॥ ७२ ॥ 
छाग मारोनि निघता रक्त । होमसिद्धी ते विपरीत । 
शस्त्रास्त्र निर्जीव होत । नव्हे सामर्थ्य रणमारा ॥ ७३ ॥ 
यालागीं छाग जीवें जीत । त्याचे कंठीचें घेवोनि रक्त । 
इंद्रजित स्वयें होम करित । जालें विपरीत तें ऐका   ॥ ७४ ॥ 
इंद्रजित जपतां मंत्रमेळीं । त्याची बैसली दांतखिळी । 
स्वयें क्षोभली कंकाळी । क्रोधानुमेळीं वाग्ददेवी ॥ ७५ ॥ 
रणीं मारावा श्रीरघुनाथ । उच्चारितां हा मंत्रार्थ । 
वाग्देवता चळीं कांपत । तेणें वचनार्थ खुंटला ॥ ७६ ॥ 
इंद्रजितास मंत्राचे विस्मरण : 
श्रीराम जगाचें जीवन । श्रीराम परमात्मा चिद्धन । 
त्यासीं नाहीं जन्ममरण । मंत्रोच्चारण खुंटलें ॥ ७७ ॥ 
श्रीराम जन्ममरणातीत । श्रीराम सबाह्य सदोदित । 
त्यासीं सर्वथा न चले घात । मंत्रीं मंत्रार्थ खुंटला ॥ ७८ ॥ 
मंत्रशक्ति जे कंकाळी । शिववरदानशक्ति शूळीं । 
दोघीं क्षोभोनि क्रोधनळीं । मंत्रार्थशैली खुंतली    ॥ ७९ ॥ 
मंत्र नाठवे हृदयकमळीं । शब्द नुच्चारी जिव्हामूळीं । 
होमसिद्धीच्या निजकाळीं । माझी वचनावळी खुंटली ॥ ८० ॥ 
नाठवे मंत्रार्थ ना मंत्र । मुखीं नुच्चारे अक्षर । 
तेव्हा रावणज्येष्ठकुमर । दुःखदुर्धर पावला ॥ ८१ ॥ 
शिववरदेंशीं समर्थ । शरीं बांधावया श्रीरघुनाथ । 
जो जो केला म्यां पुरुषार्थ । तो तो व्यर्थ मज माझा ॥ ८२ ॥ 
होमसिद्धिकाळ प्राप्त । माझा खुंटला वचनार्थ । 
जिंकणें ठेला रघुनाथ । दुःखाभिभूत इंद्रजित ॥ ८३ ॥ 
न जिंकवे रघुकुळ टिळक । इंद्रजितासीं परम दुःख । 
विलपतसे  अधोमुख । करी महाशंख अति दुःखें ॥ ८४ ॥ 
श्रीरामांची प्रतिक्रिया व वाग्देवतेची सुटका : 
तें जाणोनि श्रीरघुनाथ । म्हणे इंद्रजिताचा पुरुषार्थ । 
केंवी बांधील शरबंधात । तोही युद्धार्थ पाहूं पां ॥ ८५ ॥ 
स्वयें विचारी श्रीरघुनाथ । मी तंव जन्ममरणातीत । 
सौमित्र मरणेंसीं अलिप्त । शरबंधार्थभय काय ॥ ८६ ॥ 
शिववरद इंद्रजितासीं । मिथ्या न करीं मी शिवासी । 
अंगीं साहेन शरबंधासी । शिववरदासीं सत्यत्वा ॥ ८७ ॥ 
माझा गेलियाही प्राण । मिथ्या न करीं शिववरदान । 
शरबंधाचें भय कोण । साहतां कठिण मज नाहीं ॥ ८८ ॥ 
प्राकृतीं भ्यावें शरबंधासी । त्याचे भय काय आम्हांसीं । 
सत्य करीन शिववरदासी । शरबंधासी साहोनी    ॥ ८९ ॥ 
ऐसें विचारोनि तत्वतां । राम वाग्देवतेची देवता । 
इंद्रजिताच्या वचनार्था । निर्मुक्तता श्रीरामें ॥ ९० ॥ 
परिणामी अग्निराविष्कार : 
वाचा होतांचि निर्मुक्त । इंद्रजित जाला हर्षयुक्त । 
मंत्र आणि मंत्राबीजार्थ । हृदयीं समस्त प्रकटले ॥ ९१ ॥ 
कृष्णछागाचें घेवोनि रक्त । उग्रमंत्रीं मंत्रबीजार्थ । 
होम करितां विध्युक्त । साश्व रथ प्रकटला ॥ ९२ ॥ 
रथ देखतां सामग्रीसीं । अति उल्लास इंद्रजितासीं । 
युद्ध करावया श्रीरामासीं । अति आवेशीं चालला ॥ ९३ ॥  
आरुरोह रथं श्रेष्ठमंतर्धानचरं शुभम् ।  
अवध्यवाजिभिर्युक्तं शस्त्रैश्च विविधैर्युतम् ॥२४॥ 
समारोपितनेपथ्यं शस्त्रशक्तिसमन्वितम् ।  
भलैस्तथार्धवन्द्रैश्च तूणीरैः समुपस्थितम् ॥२५॥ 
जाज्वल्यमानं वपुषा तपनीयविभूषितम् ।  
जंबूनदमयो नागस्तरुणादित्य्सन्निभः ॥२६॥ 
बभूवेंद्रजितः केतौ वैडूर्यसमलंकृता ॥२७॥  
रथ होमीं नाहीं प्रकटला । कैंचा कैसा कोठूण आला । 
मेघनादें नाहीं लक्षिला । अवचट अला अभंग ॥ ९४ ॥ 
अभंग रथ अवध्य वारु । वरी दिव्यास्त्रसंभारु । 
ऐसा देखोनि रहंवरु । रावणकुमरु उल्लासे ॥ ९५ ॥ 
रथीं शस्त्रांचा संभार । शतघ्नी शक्ती सहस्र । 
भाले परिघ चंद्रार्ध शर । बाण तूणीर शूळशक्ति ॥ ९६ ॥ 
ऐशी शस्त्रास्त्रांची संपत्ती । जिये रथीं असे पुरती । 
त्यासी नेपथ्य म्हणती । शास्त्रप्रयुक्तीं अभिधान ॥ ९७ ॥ 
ऐसा देखोनियां रथ । इंद्रजित करी होम समाप्त । 
रथीं बैसला उल्हासित । हर्षन्वित तेजस्वी ॥ ९८ ॥ 
सुवर्णाभरणीं सुशोभित । रथीं झळकत गजेंद्रकेत । 
तोही वैडूर्यसालंकृत । रथीं शोभत अति शोभा ॥ ९९ ॥ 
अभिचाराचा पुरुषार्थ । साधूनि इंद्रजित उल्हासित । 
हाता आल्या अभंग रथ । मग गर्जत स्वानंदें ॥ १०० ॥ 
अंतर्धानरथगती । नये दुजियासी अभिव्यक्ती । 
निरालंब मार्गाप्रती । अतर्क्य शक्ती रथवेगा ॥ १ ॥  
हुत्वाग्नौ राक्षसैमैत्रैस्ततो वचनमब्रवीत् । 
अद्य हत्वा वधार्हौ तो मिथ्या संजल्पतौ रणे ॥२८॥ 
जयं पित्रे प्रदास्यामि रावणाय मन्ःप्रियम् ॥२९॥ 
निर्वाणबाणैर्विहतं राघवं सहलक्ष्मणम् । 
करिष्यामि ससुग्रीवमित्युक्त्वांतरधीयत ॥३०॥ 
इंद्रजिताची योजना व आकाशवाणी : 
राक्षसविजयाचे निजमंत्र । होम करोनि अभिचार । 
अभंग पावलों रहंवर । विजयी सर्वत्र मी एक ॥ २ ॥ 
मारीन कपिकुंजरकोटी । सुग्रीव पाडीन उठाउठीं । 
निर्वानर करीन सृष्टी । तरी मी हट्टी इंद्रजित ॥ ३ ॥ 
आतां माझ्या प्रतापापुढें । श्रीराम कायसें बापुडें । 
रणीं मारीन रोकडें । फोडीन हाडें सौमित्राची  ॥ ४ ॥ 
जटाधारी वल्कलपरिधान । कपटी दोघे राम लक्ष्मण । 
विंधोनियां वरद बाण । घेईन प्राण दोहींचा ॥ ५ ॥ 
घरींचा वैरी बिभीषण । त्याचें छेदीन नाक कान । 
एवढा करोनि अपमान । लंकाभुवन मग देखेन ॥ ६ ॥ 
श्रीरामाच्या संग्रामासीं । परम आधि रावणासीं । 
रणीं मारुन त्या दोघांसी । सुखी पित्यासी करीन ॥७॥ 
आभिचारिकवरदवाणी । तेणें मी विजयी त्रिभुवनीं । 
इंद्रजित गर्जतां आल्हादोनी । आकाशवाणी तंव जाली ॥ ८ ॥ 
शिववरदाच्या सर्पबाणीं । राम जिंतिला शरबंधनीं । 
परी तो तुम्हांसी मारील रणीं ।    दुर्धर बाणीं वर्षोनी ॥ ९ ॥ 
श्रीरामा साह्य शंकर । रामनाम जपे निरंतर । 
निजसर्पाचा बाणभार । स्वयें शंकर उखळील ॥ ११० ॥ 
मोकळे होवोनि राम सौमित्र । वर्षोनियां दुर्धर शर । 
रणीं पाडिती दशशिर । निशाचर निवटिती ॥ ११ ॥ 
विकट वर्षोनियां बाण । रणीं पाडील कुंभकर्ण । 
तुज मारील लक्ष्मण । कुळनिर्दळण श्रीरामें ॥ १२ ॥ 
कुमर सेनानी प्रधान । इतर चतुरंगसैन्य । 
श्रीराम करील रणकंदन । कुळनिर्दळण श्रीरामें ॥ १३ ॥ 
लंकाराज्यीं बिभीषण । श्रीराम स्थापील आपण । 
सीता श्रीरामें सुखसंपन्न । सत्य वचन हें मानीं ॥ १४ ॥ 
आकाशवाणीचा इंद्रजितावर परिणाम : 
ऐकोनि आकाशवाणीची मात । नळीं कांपे इंद्रजित । 
अंरर्धानामाजी लपत । झणीं रघुनाथ मज देखे ॥ १५ ॥ 
शिववरदें समर्थ । प्रत्यक्ष रथ झाला प्राप्त । 
आकाशवाणी मिथ्याभूत । भय कोण येथ तियेचें ॥ १६ ॥ 
अशरीरी आकाशवाणी । जिव्हा नाहीं तिजलागूनी । 
जे बोलती मिथ्या काहाणी । कोण मानी सत्यत्वें ॥ १७ ॥ 
शिववरदाचे सर्पबाण । वृथा न वचती जाण । 
बाणीं मारीन राम लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥ १८ ॥ 
क्षणां भ्याकड क्षणां धाकड । इंद्रजितासीं अति  सांकड । 
पुढील युद्धाचा पडिपाड । कथा अति गोड श्रीरामें ॥ १९ ॥ 
रामायणींचे गोडपण । स्वयें श्रीराम आपण । 
त्याचें चरित्र अति विंदान । परम पावन शिवप्रिय ॥ १२० ॥ 
एका जनार्दना शरण । श्रीराम पाळी शिववरदान । 
साहोनियां शरबंधन । करीन कंदन राक्षसां   ॥ १२१ ॥ 
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां  शरबंधहोमविधानं नाम दशमोध्यायः॥ १० ॥ 
ओव्या ॥ १२१ ॥ श्लोक ॥ ३० ॥ एवं ॥ १५१ ॥  
GO TOP 
  
 |