॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ सप्तमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]मारीचाचा वध आणि सीतेचे अपहरण -


श्रीमहादेव उवाच
अथ रामोऽपि तत्सर्वं ज्ञात्वा रावणचेष्टितम् ।
उवाच सीतामेकान्ते शृणु जानकि मे वचः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, नंतर इकडे रावणाचे ते सर्व कृत्य जाणून, श्रीरामसुद्धा एकान्तात सीतेला म्हणाले, "हे जानकी, मी सांगतो ते ऐक." (१)

रावणो भिक्षुरूपेण आगमिष्यति तेऽन्तिकम् ।
त्वं तु छायां त्वदाकारां स्थापयित्वोटजे विश ॥ २ ॥
अग्नावदृश्यरूपेण वर्षं तिष्ठ ममाज्ञया ।
रावणस्य वधान्ते मां पूर्ववत्प्राप्स्यसे शुभे ॥ ३ ॥
"हे कल्याणी, भिक्षूचे रूप धारण करून रावण तुझ्याजवळ येईल. तत्पूर्वी तुझ्याच आकाराची छाया कुटीमध्ये सोडून देऊन तू अग्नीमध्ये प्रवेश कर. आणि माझ्या आज्ञेनुसार एक वर्षभर अदृश्य रूपाने तेथे अग्नीत राहा. पुढे रावणाचा वध झाल्यावर तू पूर्वीप्रमाणे मला प्राप्त करून घेशील." (२- ३)

श्रुत्वा रामोदितं वाक्यं सापि तत्र तथाकरोत् ।
मायासीतां बहिः स्थाप्य स्वयमन्तर्दधेऽनले ॥ ४ ॥
श्रीरामांच्या आज्ञेनुसार सीतेनेसुद्धा त्या्प्रमाणे केले. बाहेर कुटीमध्ये मायासीतेला ठेवून सीता स्वतः अग्नीमध्ये अंतर्धान पावली. (४)

मायासीता तदापश्यन्मृगं मायाविनिर्मितम् ।
हसन्ती राममभ्येत्य प्रोवाच विनयान्विता ॥ ५ ॥
मग त्या वेळी माया-सीतेने मायेमुळे उत्पन्न झालेला मृग पाहिला. तेव्हा हसत हसत श्रीरामांजवळ येऊन ती विनयपूर्वक म्हणाली. (५)

पश्य राम मृगं चित्रं कानकं रत्‍नभूषितम् ।
विचित्रबिन्दुभिर्युक्तं चरन्तमकुतोभयम् ।
बद्ध्वा देहि मम क्रीडामृगो भवतु सुन्दरः ॥ ६ ॥
"अहो श्रीरामा, रत्‍नांनी विभूषित, विचित्र, सुवर्णवर्णी, निरनिराळ्या रंगाचे ठिपके असणारा आणि निर्भयपणे हिंडणारा हा मृग बघा. तो पकडून मला आणून द्या. हा सुंदर हरिण माझा क्रीडा- मृग बनू दे. " (६)

तथेति धनुरादाय गच्छन् लक्ष्मणमब्रवीत् ।
रक्ष त्वमतियत्‍नेन सीतां मत्प्राणवल्लभाम् ॥ ७ ॥
"ठीक आहे" असे म्हणून धनुष्य घेऊन जाताना श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले "अरे लक्ष्मणा, मला प्राणाप्रमाणे प्रिय असणार्‍या सीतेचे तू अतिशय प्रयत्‍नपूर्वकरक्षण कर. (७)

मायिनः सन्ति विपिने राक्षसा घोरदर्शनाः ।
अतोऽत्रावहितः साध्वीं रक्ष सीतामनिन्दिताम् ॥ ८ ॥
या अरण्यात भयंकर दिसणारे पुष्कळ मायावी राक्षस आहेत. म्हणून सती-साध्वी अशा सीतेचे तू येथे सावधपणाने रक्षण कर." (८)

लक्ष्मणो राममाहेदं देवायं मृगरूपधृक् ।
मारीचोऽत्र न सन्देह एवंभूतो मृगः कुतः ॥ ९ ॥
तेव्हा लक्ष्मण असे म्हणाला, "देवा, मृगाचे रूप धारण करणारा हा मारीच येथे आला आहे, यात शंका नाही. नाही तर असला मृग कुठे असेल बरे ?" (९)

श्रीराम उवाच
यदि मारीच एवायं तदा हन्मि न संशयः ।
मृगश्चेदानयिष्यामि सीताविश्रमहेतवे ॥ १० ॥
श्रीराम म्हणाले- "जर हा मारीच असेल तर मी त्याला ठार करीन, यात संशय नाही. तो जर खराखुरा मृग असेल तर सीतेची करमणूक करण्यासाठी मी त्याला पकडून घेऊन येईन. (१०)

गमिष्यामि मृगं बद्ध्वा ह्यानयिष्यामि सत्वरः ।
त्वं प्रयत्‍नेन सन्तिष्ठ सीतासंरक्षणोद्यतः ॥ ११ ॥
तेव्हा मी आता जातो आणि मृगाला पकडून सत्वर घेऊन येतो. दरम्यान सीतेचे प्रयत्‍नपूर्वक रक्षण करण्यासाठी तू सावध राहा." (११)

इत्युक्त्वा प्रययौ रामो मायामृगमनुद्रुतः ।
माया यदाश्रया लोकमोहिनी जगदाकृतिः ॥ १२ ॥
या जगाच्या रूपाने असणारी आणि लोकांना मोहित करणारी माया ज्यांच्या आश्रयाने राहाते असे श्रीराम लक्ष्मणाला असे सांगून माया-मृगाच्या मागे पळत गेले. (१२)

निर्विकारश्चिदात्मापि पूर्णोऽपि मृगमन्वगात् ।
भक्तानुकम्पी भगवानिति सत्यं वचो हरिः ॥ १३ ॥
कर्तुं सीताप्रियार्थाय जानन्नपि मृगं ययौ ।
अन्यथा पूर्णकामस्य रामस्य विदितात्मनः ॥ १४ ॥
मृगेण वा स्त्रिया वापि किं कार्यं परमात्मनः ।
कदाचिद्दृश्यतेऽभ्याशे क्षणं धावति लीयते ॥ १५ ॥
ते श्रीराम निर्विकार, चिदात्मा, आणि सर्वव्यापक असूनसुद्धा त्या माया-मृगाच्या मागे गेले. भगवान हरी हे भक्तवत्सल आहेत, हे वचन संपूर्णपणे सत्य आहे. श्रीराम सर्व काही जाणत होते. म्हणून मारीचाच्या भक्तीचे फल देण्यासाठी ते स्वतः त्याच्या मागे गेले. आणि सीतेचे आवडीचे काम करण्यासाठी ते माया-मृगाच्या मागे गेले. नाही तर पूर्णकाम आणि स्वतःच स्वतःला जाणणार्‍या अशा परमात्म्या श्रीरामांना मृगाशी अथवा स्त्रीशी काय प्रयोजन होते ? तो मृग कधी जवळ दिसत असे तर कधी क्षणात तो पळून जाई आणि लपून बसे. (१३-१५)

दृश्यते च ततो दूरादेवं राममपाहरत् ।
ततो रामोऽपि विज्ञाय राक्षसोऽयमिति स्फुटम् ॥ १६ ॥
विव्याध शरमादाय राक्षसं मृगरूपिणम् ।
पपात रुधिराक्तास्यो मारीचः पूर्वरूपधृक् ॥ १७ ॥
आणि नंतर पुनः तो दूरवर दिसून येत असे. अशा प्रकारे त्या मृगाने श्रीरामांना खूप दूरवर नेले. तेव्हा हा नक्कीच राक्षस आहे असे जाणून श्रीरामांनीसुद्धा बाण घेऊन मृगरूपी राक्षसाला घायाळ केले. बाण लागताच तो मारीच पूर्वीचे रूप धारण करून रक्ताने तोंड माखलेल्या स्थितीत जमिनीवर पडला. (१६-१७)

हा हतोऽस्मि महाबाहो त्राहि लक्ष्मण मां द्रुतम् ।
इत्युक्त्वा रामवद्वाचा पपात रुधिराशनः ॥ १८ ॥
"हाय ! मी मेलो. महाबाहू लक्ष्मणा, माझे त्वरित रक्षण कर." असे श्रीरामांच्या आवाजाप्रमाणे शब्द उचारून तो जमिनीवर पडला. (१८)

यन्नामाज्ञोऽपि मरणे स्मृत्वा तत्साम्यमाप्नुयात् ।
किमुताग्रे हरिं पश्यंस्तेनैव निहतोऽसुरः ॥ १९ ॥
मरणसमयी ज्या हरींच्या नामाचे स्मरण केल्याने अज्ञानी माणूससुद्धा हरीचे साम्य प्राप्त करून घेतो, त्या हरीकडूनच समोर साक्षात हरींना पाहात पाहात मारल्या गेलेल्या असुराबद्दल काय सांगावे ? (१९)

तद्देहादुत्थितं तेजः सर्वलोकस्य पश्यतः ।
राममेवाविशद्देवा विस्मयं परमं ययुः ॥ २० ॥
सर्व लोक पाहात असतानाच त्या मारीचाच्या देहातून बाहेर पडलेले तेज श्रीरामांमध्येच प्रविष्ट झाले. ते पाहून देवांना फारच विस्मय वाटला. (२०)

किं कर्म कृत्वा किं प्राप्तः पातकी मुनिहिंसकः ।
अथवा राघवस्यायं महिमा नात्र संशयः ॥ २१ ॥
ते म्हणू लागले "(अहो) मुनींची हिंसा करणार्‍या या पातकी मारीचाने किती पापकर्म केले आणि त्याला काय चांगले फळ प्राप्त झाले. किंबहुना हा राघवांचा महिमा आहे, यात संशय नाही. (२१)

रामबाणेन संविद्धः पूर्वं राममनुस्मरन् ।
भयात्सर्वं परित्यज्य गृहवित्तादिकं च यत् ॥ २२ ॥
श्रीरामांच्या बाणाने पूर्वी विद्ध झालेल्या मारीचाने भीतीमुळे घर, धन इत्यादी सर्व काही टाकले होते, आणि तो रामांचे सतत स्मरण करू लागला होता. (२२)

हृदि रामं सदा ध्यात्वा निर्धूताशेषकल्मषः ।
अन्ते रामेण निहतः पश्यन् राममवाप सः ॥ २३ ॥
हृदयामध्ये सदा श्रीरामांचे ध्यान केल्यानंतर त्याची सर्व पापे नष्ट झाली होती. शेवटी श्रीरामांकडून मारला गेल्यावर रामांना पाहात पाहातच त्याने रामांना प्राप्त करून घेतले. (२३)

द्विजो वा राक्षसो वापि पापी वा धार्मिकोऽपि वा ।
त्यजन्कलेवरं रामं स्मृत्वा याति परं पदम् ॥ २४ ॥
याचा अर्थ असा की ब्राह्मण असो की राक्षस किंवा पापी असो की धार्मिक, जो कुणी श्रीरामांचे स्मरण करीत देहाचा त्याग करतो तो परम पदाप्रत जातो." (२४)

इति तेऽन्योन्यमाभाष्य ततो देवा दिवं ययुः ।
रामस्तच्चिन्तयामास म्रियमाणोऽसुराधमः ॥ २५ ॥
हा लक्ष्मणेति मद्वाक्यमनुकुर्वन्ममार किम् ।
श्रुत्वा मद्वाक्यसदृशं वाक्यं सीतापि किं भवेत् ॥ २६ ॥
अशा प्रकारे आपापसात बोलत ते देव नंतर स्वर्गात गेले. इकडे श्रीरामांनी विचार केला की मरताना या नीच असुराने "हा लक्ष्मण" असा माझ्यासारखा आवाज काढून का बरे प्राण सोडला ? माझ्या बोलण्यासारखे शब्द ऐकल्यावर, सीतेची काय दशा झाली असेल ? (२५-२६)

इति चिन्तापरीतात्मा रामो दूरान्न्यवर्तत ।
सीता तद्‌भाषितं श्रुत्वा मारीचस्य दुरात्मनः ॥ २७ ॥
भीतातिदुःखसंविग्ना लक्ष्मणं त्विदमब्रवीत् ।
गच्छ लक्ष्मण वेगेन भ्राता तेऽसुरपीडितः ॥ २८ ॥
अशा प्रकारच्या काळजीने भरलेल्या मनाने, श्रीराम खूप दूरून परत निघाले. इकडे असे झाले होते की त्या दुष्टाच्या मारीचाचे ते शब्द ऐकून भ्यालेली आणि अतिशय दुःखाने व्याकूळ झालेली सीता लक्ष्मणाला म्हणाली, "हे लक्ष्मणा, तू वेगाने जा. तुझा भाऊ कोणत्या तरी असुराकडून त्रस्त झाला आहे. (२७-२८)

हा लक्ष्मणेति वचनं भ्रातुस्ते न शृणोषि किम् ।
तामाह लक्ष्मणो देवि रामवाक्यं न तद्‌भवेत् ॥ २९ ॥
यः कश्चिद्‌राक्षसो देवि म्रियमाणोऽब्रवीद्वचः ।
रामस्त्रैलोक्यमपि यः क्रुद्धो नाशयति क्षणात् ॥ ३० ॥
स कथं दीनवचनं भाषितेऽमरपूजितः ।
क्रुद्धा लक्ष्मणमालोक्य सीता बाष्पविलोचना ॥ ३१ ॥
'हा लक्ष्मणा' हे तुझ्या भावाचे शब्द तू ऐकले नाहीस काय ?" तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला, "हे देवी, ते वाक्य श्रीरामांचे असणार नाही. हे देवी, जो कुणी राक्षस मरत होता, त्याने ते शब्द उच्चारले असणार. जे श्रीराम रागावल्यावर एका क्षणात त्रैलौक्यसुद्धा नष्ट करून टाकतील, ते देवपूज्य राम असले दीन वचन कसे बरे उच्चारतील ?" तेव्हा डोळ्यांत पाणी आणून लक्ष्मणाकडे पाहात रागावलेली सीता म्हणाली. (२९-३१)

प्राह लक्ष्मण दुर्बुद्धे भ्रातुर्व्यसनमिच्छसि ।
प्रेषितो भरतेनैव रामनाशाभिकाङ्‌क्षिणा ॥ ३२ ॥
"अरे वाईट बुद्धी असणार्‍या लक्ष्मणा, भावावर संकट यावे अशी तुझी इच्छा दिसते आहे. मला वाटते, श्रीरामाचा नाश करू इच्छिणार्‍या भरतानेच तुला आमच्याबरोबर पाठविले आहे. (३२)

मां नेतुमागतोऽसि त्वं रामनाश उपस्थिते ।
न प्राप्स्यसे त्वं मामद्य पश्य प्राणांस्त्यजाम्यहम् ॥ ३३ ॥
श्रीराम नाहीसे झाल्यावर मला पळवून नेण्यासाठी तू आलेला दिसतो आहेस. परंतु आज मी तुला प्राप्त होणार नाही. बघ, आत्ताच मी प्राणांचा त्याग करते. (३३)

न जानातीदृशं रामस्त्वां भार्याहरणोद्यतम् ।
रामादन्यं न स्पृशामि त्वां वा भरतमेव वा ॥ ३४ ॥
आपल्या पत्‍नीचे हरण करण्यास तू तयार आहेस, हे श्रीरामांना माहीत नव्हते. रामांखेरीज अन्य कुणालाही - तुला किंवा भरतालासुद्धा - मी स्पर्श करणार नाही." (३४)

इत्युक्त्वा वध्यमाना सा स्वबाहुभ्यां रुरोद ह ।
तच्छ्रुत्वा लक्ष्मणः कर्णौ पिधायातीव दुःखितः ॥ ३५ ॥
असे बोलून आणि स्वतःच्या हातांनी आपली छाती बडवीत सीता रडू लागली. ते ऐकून अतिशय दुःखी झालेल्या लक्ष्मणाने आपले कान झाकून घेतले आणि तो म्हणाला. (३५)

मामेवं भाषसे चण्डि धिक् त्वां नाशमुपैष्यसि ।
इत्युक्त्वा वनदेवीभ्यः समर्प्य जनकात्मजाम् ॥ ३६ ॥
ययौ दुःखातिसंविग्नो राममेव शनैः शनैः ।
ततोऽन्तरं समालोक्य रावणो भिक्षुवेषधृक् ॥ ३७ ॥
सीतासमीपमगमत्स्फुरद्दण्डकमण्डलुः ।
सीता तमवलोक्याशु नत्वा सम्पूज्य भक्तितः ॥ ३८ ॥
कन्दमूलफलादीनि दत्त्वा स्वागतमब्रवीत् ।
मुने भुङ्‌क्ष्व फलादीनि विश्रमस्व यथासुखम् ॥ ३९ ॥
इदानीमेव भर्ता मे ह्यागमिष्यति ते प्रियम् ।
करिष्यति विशेषेण तिष्ठ त्वं यदि रोचते ॥ ४० ॥
"अग चंडिके, तू मला अशा प्रकारे बोलतेस ? तुझा धिक्कार असो ! अशा बोलण्याने तू नाश पावशील." असे बोलून आणि वनदेवींच्याकडे जनककन्येला सोपवून, दुःखाने अतिशय खिन्न झालेला लक्ष्मण हळू हळू रामांकडेच जाण्यास निघाला. इकडे बरोबर त्याच वेळी संधी पाहून, भिक्षूचा वेष धारण केलेला रावण दंड व कमंडलू घेऊन सीतेजवळ गेला. त्याला पाहून सीतेने चटदिशी नमरकार केला, भक्तीने त्याचे पूजन केले आणि त्याला कंद, मुळे, फळे इत्यादी देऊन तिने त्याचे स्वागत करीत म्हटले "हे मुने, ही फळे इत्यादी खा आणि सुखाने विश्रांती घ्या. थोड्याच वेळात माझे पती येतील. ते तुमचा विशेष करून सत्कार करतील. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा." (३६-४०)

भिक्षुरुवाच
का त्वं कमलपत्राक्षि को वा भर्ता तवानघे ।
किमर्थमत्र ते वासो वनि राक्षससेविते ।
ब्रूहि भद्रे ततः सर्वं स्ववृत्तान्तं निवेदये ॥ ४१ ॥
भिक्षू म्हणाला- " हे कमलनयने, तू कोण आहेस ? हे निष्पाप स्त्रिये, तुझा पती कोण आहे ? राक्षसांनी सेवन केलेल्या या अरण्यामध्ये इथे तू कशासाठी निवारा केला आहेस ? हे भद्रे, सर्व सांग. मग मी माझी सर्व हकीगत तुला सांगेन." (४१)

सीतोवाच
अयोध्याधिपतिः श्रीमान् राजा दशरथो महान् ।
तस्य ज्येष्ठः सुतो रामः सर्वलक्षणलक्षितः ॥ ४२ ॥
सीता म्हणाली-"हे भिक्षू, श्रीमान व महान् असे महाराज दशरथ अयोध्येचे अधिपती होते. सर्व शुभ लक्षणांनी युक्त असे श्रीराम हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. (४२)

तस्याहं धर्मतः पत्‍नी सीता जनकनन्दिनी ।
तस्य भ्राता कनीयांश्च लक्ष्मणो भ्रातृवत्सलः ॥ ४३ ॥
त्या श्रीरामांची धर्मपत्‍नी मी सीता आहे. मी जनकाची कन्या आहे. भ्रातृवत्सल लक्ष्मण हा रामांचा धाकटा भाऊ आहे. (४३)

पितुराज्ञां पुरस्कृत्य दण्डके वस्तुमागतः ।
चतुर्दश समास्त्वां तु ज्ञातुमिच्छामि मे वद ॥ ४४ ॥
पित्याच्या आज्ञे प्रमाणे श्रीराम चौदा वर्षे दंडकारण्यात आम्हा दोघांबरोबर राहावयास आले आहेत. आता तुम्ही कोण आहात हे मी जाणून घेऊ इच्छिते. ते तुम्ही मला सांगा." (४४)

भिक्षुरुवाच
पौलस्त्यतनयोऽहं तु रावणो राक्षसाधिपः ।
त्वत्कामपरितप्तोऽहं त्वां नेतुं पुरमागतः ॥ ४५ ॥
भिक्षू म्हणाला-" मी पुलकनंदन विश्रवाचा पुत्र व राक्षसांचा राजा रावण आहे. तुला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने मी बेचैन झालो आहे आणि तुला माझ्या नगरीला नेण्यास येथे आलो आहे. (४५)

मुनिवेषेण रामेण किं करिष्यसि मां भज ।
भुङ्‌क्ष्व भोगान्मया सार्धं त्यज दुःखं वनोद्‌भवम् ॥४६
मुनिवेषातील रामाचा तुला काय उपयोग ? तू माझा आश्रय घे. वनात राहण्यामुळे होणारे दुःख सोडून दे आणि माझ्याबरोबर नाना प्रकारचे भोग घे." (४६)

श्रुत्वा तद्वचनं सीता भीता किञ्चिदुवाच तम् ।
यद्येवं भाषसे मां त्वं नाशमेष्यसि राघवात् ॥ ४७ ॥
त्याचे ते वचन ऐकून भ्यालेली सीता त्याला म्हणाली, "असे जर तू बोलशील, तर श्रीराघवांकडून तुझा नाश होईल. (४७)

आगमिष्यति रामोऽपि क्षणं तिष्ठ सहानुजः ।
मां को धर्षयितुं शक्तो हरेर्भार्यां शशो यथा ॥ ४८ ॥
क्षणभर थांब. धाकट्या भावासह माझे पती श्रीरामसुद्धा आत्ता येतीलच. ज्या प्रमाणे ससा सिंहिणीवर बळाचा प्रयोग करू शकत नाही, त्या प्रमाणे माझ्यावर बळजबरी करण्यास कोण समर्थ आहे ? (४८)

रामबाणैर्विभिन्नस्त्वं पतिष्यसि महीतले ।
इति सीतावचः श्रुत्वा रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ ४९ ॥
स्वरूपं दर्शयामास महापर्वतसन्निभम् ।
दशास्यं विंशतिभुजं कालमेघसमद्युतिम् ॥ ५० ॥
श्रीरामांच्या बाणांनी छिन्न भिन्न होऊन तू धरणीवर पडशील." असे सीतेचे वचन ऐकल्यावर, क्रुद्ध होऊन रावणाने आपले स्वतःचे खरे रूप तिला दाखविले. ते रूप प्रचंड पर्वताप्रमाणे होते; त्या रूपाला दहा तोंडे व वीस बाहू होते. काळ्या मेघाप्रमाणे तो काळाकुट्ट होता. (४९-५०)

तद्दृष्ट्‍वा वनदेव्यश्च भूतानि च वितत्रसुः ।
ततो विदार्य धरणीं नखैरुद्धृत्य बाहुभिः ॥ ५१ ॥
तोलयित्वा रथे क्षिप्त्वा ययौ क्षिप्रं विहायसा ।
हा राम हा लक्ष्मणेति रुदती जनकात्मजा ॥ ५२ ॥
भयोद्विग्नमना दीना पश्यन्ती भुवमेव सा ।
श्रुत्वा तत्क्रन्दितं दीनं सीतायाः पक्षिसत्तमः ॥ ५३ ॥
जटायुरुत्थितः शीघ्रं नगाग्रात्तीक्ष्णतुण्डकः ।
तिष्ठ तिष्ठेति तं प्राह को गच्छति ममाग्रतः ॥ ५४ ॥
मुषित्वा लोकनाथस्य भार्यां शून्याद्वनालयात् ।
शुनको मंत्रपूतं त्वं पुरोडाशमिवाध्वरे ॥ ५५ ॥
ते भयंकर रूप पाहून वनदेवी आणि वनातील प्राणी भयभीत झाले. नंतर सीतेच्या पायाखालची जमीन आपल्या नखांनी उकरून,* त्याने ती जमीन बाहूंनी उचलली व जमिनीसकट तिला उचलून रथात टाकली आणि तो आकाश मार्गाने त्वरित निघून गेला. तेव्हा भयाने मन उद्विग्न झालेली, दीनवाणी सीता जमिनीकडे पाहात "हाय रामा ! हाय लक्ष्मणा !" असे ओरडत रडू लागली. सीतेचे ते दीन रडणे ऐकून तीक्ष्ण चोच असणारा पक्षिश्रेष्ठ जटायू त्वरित पर्वताच्या शिखरावरून उडाला आणि तो रावणाला म्हणाला "थांब थांब. मंत्राने पवित्र झालेला पुरोडाश यज्ञातून पळवणार्‍या कुत्र्याप्रमाणे निर्जन वनातील आश्रमातून लोकनाथ श्रीरामांची पत्‍नी चोरून माझ्या देखत पळवून नेणारा तू कोण आहेस ?" (५१-५५)

इत्युक्त्वा तीक्ष्णतुण्डेन चूर्णयामास तद्‌रथम् ।
वाहान्बिभेद पादाभ्यां चूर्णयामास तद्धनुः ॥ ५६ ॥
[* वाल्पीकिरामायण, युद्धकांड, सर्गः १३ मध्ये रावण सांगतोः-"एके काळी पुंजिकस्थला नावाची अप्सरा आकाशमार्गाने ब्रह्मदेवांकडे जाताना मी पाहिली. त्या वेळी मी तिला बळजबरीने विवस्त्र केले आणि तिच्याशी संभोग केला. ही गोष्ट ब्रह्मदेवांना कळल्यावर, त्यांनी मला शाप दिला की आजपासून जर तू कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करशील तर तुझ्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील." या शापाच्या भयाने रावणाने सीतेला स्पर्श केला नाही. रंभा नावाच्या अप्सरेवर बलात्कार केल्यामुळे रावणाला अशा प्रकारचा शाप कुबेरपुत्र नलकूबरानेसुद्धा दिला होता. (वा. रा. उकां. २६ सर्गः) परंतु तो शाप प्रथम होता आणि आपल्या तपोबलामुळे रावण त्या शापाला भीत नव्हता. म्हणूनच त्यानंतर त्याने पुंजिकस्थला अप्सरेवर बलात्कार करण्याचे साहस केले होते (वा. रा. युद्धकांड. १३-१४) ] असे बोलून जटायूने आपल्या तीश्ण चोचीने त्या रावणाच्या रथाचे चूर्ण केले, आपल्या पंज्यांनी त्याने रथाचे घोडे छिन्न भिन्न केले, आणि रावणाच्या धनुष्याचे तुकडे करून टाकले. ५६

ततः सीतां परित्यज्य रावणः खड्गमाददे ।
चिच्छेद पक्षौ सामर्षः पक्षिराजस्य धीमतः ॥ ५७ ॥
तेव्हा सीतेला सोडून देऊन रावणाने आपली तलवार हातात घेतली आणि त्वेषाने त्याने बुद्धिमान अशा त्या पक्षिराज जटायूचे दोन्ही पंख तोडून टाकले. (५७)

पपात किञ्चिच्छेषेण प्राणेन भुवि पक्षिराट् ।
पुनरन्यरथेनाशु सीतामादाय रावणः ॥ ५८ ॥
तेव्हा अर्धमेला पक्षिराज जटायू जमिनीवर पडला. पुनः दुसरा रथ वापरून व सीतेला घेऊन रावण त्वरित निघाला. (५८)

क्रोशन्ती रामरामेति त्रातारं नाधिगच्छति ।
हा राम हा जगन्नाथ मां न पश्यसि दुःखिताम् ॥ ५९ ॥
ज्या वेळी अन्य कोणीही रक्षणकर्ता सीतेला दिसला नाही. तेव्हा 'रामा, रामा' असा आक्रोश करणारी सीता विलाप करू लागली. "हाय रामा, हाय जगन्नाथा, दुःखी झालेली मी तुम्हांला दिसत नाही काय ?" (५९)

रक्षसा नीयमानां स्वां भार्यां मोचय राघव ।
हा लक्ष्मण महाभाग त्राहि मामपराधिनीम् ॥ ६० ॥
हे राघवा, राक्षस तुमच्या बायकोला नेत आहे. मला सोडवा. हाय महाभाग लक्ष्मणा, मी अपराध केला; माझे तू रक्षण कर. (६०)

वाक्‌शरेण हतस्त्वं मे क्षन्तुमर्हसि देवर ।
इत्येवं क्रोशमानां तां रामागमनशङ्‌कया ॥ ६१ ॥
जगाम वायुवेगेन सीतामादाय सत्वरः ।
विहायसा नीयमाना सीतापश्यदधोमुखी ॥ ६२ ॥
पर्वताग्रे स्थितान्पञ्च वानरान्वारिजानना ।
उत्तरीयार्धखण्डेन विमुच्याभरणादिकम् ॥ ६३ ॥
बद्ध्वा चिक्षेप रामाय कथयन्त्विति पर्वते ।
ततः समुद्रमुल्लङ्‌घ्य लङ्‌कां गत्वा स रावणः ॥ ६४ ॥
स्वान्तःपुरे रहस्येतामशोकविपिनेऽक्षिपत् ।
राक्षसीभिः परिवृतां मातृबुद्ध्यान्वपालयत् ॥ ६५ ॥
अहो भाऊजी, माझ्या वाग्बाणांनी मी तुम्हांला विद्ध केले. तरी तुम्ही मला क्षमा करा." अशा प्रकारे सीता आक्रोश करीत असताना, श्रीरामाचे आगमन होईल या शंकेने, रावण सीतेला घेऊन वायुवेगाने सत्वर जाऊ लागला. अशा प्रकारे आकामार्गाने नेल्या जाणार्‍या सीतेने खाली तोंड करून पाहिले. तेव्हा कमलनयन सीतेला एका पर्वताच्या शिखरावर बसलेले पाच वानर दिसले. तिने आपल्या अंगावरील अलंकार इत्यादी उतरवून ते आपल्या उत्तरीय वस्त्राच्या अर्ध्या तुकड्यात बांधले आणि 'हे अलंकार माझी वार्ता श्रीरामांना सांगू देत,' असा विचार करून तिने ते त्या पर्वतावर फेकून दिले. नंतर इकडे समुद्र ओलांडून आणि लंकेत जाऊन रावणाने आपल्या अंतःपुराजवळ एकान्त प्रदेशातील अशोक वनात तिला ठेवले. आणि तिला राक्षसींच्या वेढ्यात ठेवून, तो रावण मातृबुद्धीने तिचे रक्षण करू लागला. (६१-६५)

कृशातिदीना परिकर्मवर्जिता
     दुःखेन शुष्यद्वदनातिविह्वला ।
हा राम रामेति विलप्यमाना
     सीता स्थिता राक्षसवृन्दमध्ये ॥ ६६ ॥
त्या वेळी कृश व अतिशय दीन अशा सीतेने साजशृंगार सोडून दिला, आणि दुःखाने तोंड कोरडे पडलेली आणि अतिशय विव्हळ झालेली ती सीता, ' हा रामा ! हा रामा ! ' असा विलाप करीत राक्षसींच्या वेढ्यात राहू लागली. (६६)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डातील सातवा सर्गः समाप्त ॥ ७ ॥


GO TOP