श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ पंचमः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणांतःपुरे प्रतिग्रहं सीताया अन्वेषणं कुर्वतो हनुमतस्तामदृष्ट्वा दुःखम् -
हनुमंताने रावणाच्या अंतपुरातील घरा-घरामधून जाऊन सीतेचा शोध घेणे आणि ती न दिसल्याने दुःखी होणे -
ततः स मध्यं गतमंशुमन्तं
ज्योत्स्नावितानं मुहुरुद्वमन्तम् ।
ददर्श धीमान् दिवि भानुमन्तं
गोष्ठे वृषं मत्तमिव भ्रमन्तम् ॥ १ ॥
त्यानंतर आकाशाच्या आणि तारकागणांच्या मध्यभागी आलेला, एकसारखी चंद्रिका प्रगट करणारा आणि सूर्याच्या प्रकाशमय किरणांनी संपन्न झालेला चंद्र, गाईंच्या समुदायात गोठ्‍यामध्ये इच्छेनुसार फिरणार्‍या मत्त वृषभाप्रमाणे विचरण करतांना त्या बुद्धिमान हनुमानांनी पाहिला. ॥१॥
लोकस्य पापानि विनाशयन्तं
महोदधिं चापि समेधयन्तम् ।
भूतानि सर्वाणि विराजयन्तं
ददर्श शीतांशुमथाभियान्तम् ॥ २ ॥
तो शीतरश्मी चंद्रमा लोकांच्या पाप-तापांचा नाश करीत, महासागराला वृद्धिगत करीत आणि सर्व प्राणीमात्रांना दीप्ती आणि प्रकाश देत आकाशाच्या मध्यभागी येत असलेला त्यांनी पाहिला. ॥२॥
या भाति लक्ष्मीर्भुवि मन्दरस्था
तथा प्रदोषेषु च सागरस्था ।
तथैव तोयेषु च पुष्करस्था
रराज सा चारुनिशाकरस्था ॥ ३ ॥
भूतलावर मंदार पर्वाताच्या ठिकाणी जी शोभा दिसते, महासागरांत प्रदोषकाळी जी शोभा दिसते आणि जलामध्ये कमळांच्या ठिकाणी लक्ष्मी ज्याप्रमाणे शोभून दिसते, तशी शोभा त्या मनोहर चंद्रम्याच्या ठिकाणी दिसू लागली. ॥३॥
हंसो यथा राजतपञ्जरस्थः
सिंहो यथा मन्दरकन्दरस्थः ।
वीरो यथा गर्वितकृञ्जरस्थः
चंद्रोऽपि बभ्राज तथाम्बरस्थः ॥ ४ ॥
चांदीच्या पिंजर्‍यात असलेला हंस जसा सुंदर दिसतो, मंदराचळाच्या गुहेतील सिंह जसा दिसतो किंवा मदमत्त हत्तीवर आरूढ झालेला वीर पुरूष जसा शोभून दिसतो तसा आकाशांत असलेला चंद्र शोभू लागला. ॥४॥
स्थितः ककुद्मानिव तीक्ष्णश्रृङ्गो
महाचलः श्वेत इवोर्ध्वश्रृंगः ।
हस्तीव जाम्बूनदबद्धश्रृंगो
रराज चन्द्रः परिपूर्णश्रृंगः ॥ ५ ॥
तीक्ष्ण शिंगांनी युक्त असलेला मोठ्‍या वशिंडाचा बैल, किंवा उन्नत शिखरांनी युक्त असलेला पांढरा शुभ्र महापर्वत आणि दंतांना सुवर्णभूषणे घातलेला गजराज जसा सुशोभित होतो तसा परिपूर्ण आणि कलंकरूप हरिणश्रृंगांनी युक्त चंद्रमा शोभू लागला. ॥५॥
विनष्टशीताम्बुतुषारपङ्को
महाग्रहग्राहविनष्टपङ्कः ।
प्रकाशलक्ष्म्याश्रयनिर्मलाङ्को
रराज चन्द्रो भगवान् शशाङ्कः ॥ ६ ॥
शीतोदक बिंदुरूप पंक म्हणजे धुके ज्यात नाही, सूर्य किरणांना ग्रहण करून ज्याने आपल्या अंधःकाररूपी पंक नाहिंसा केला आहे आणि प्रकाशरूपी लक्ष्मीचे आश्रयस्थान झाल्याने ज्याच्या ठिकाणची काळिमाही निर्मळ भासत आहे तो भगवान शशांक चंद्रदेव आकाशांत चमकत होता. ॥६॥
शिलातलं प्राप्य यथा मृगेन्द्रो
महारणं प्राप्य यथा गजेन्द्रः ।
राज्य समासाद्य यथा नरेन्द्रः
तथा प्रकाशो विरराज चन्द्रः ॥ ७ ॥
गुहेच्या बाहेरील शिळातलावर बसलेला सिंह जसा शोभू लागतो, विस्तीर्ण महारणात उभा असलेला गजेन्द्र जसा शोभतो, आणि विस्तीर्ण राज्य प्राप्त झाल्यावर नरेन्द्र जसा अधिक शोभा संपन्न होतो, त्याप्रमाणे निर्मळ प्रकाशाने युक्त होऊन चंद्र शोभू लागला. ॥७॥
प्रकाशचन्द्रोदयनष्टदोषः
प्रवृद्धरक्षः पिशिताशदोषः ।
रामाभिरामेरितचित्तदोषः
स्वर्गप्रकाशो भगवान् प्रदोषः ॥ ८ ॥
प्रकाशयुक्त चंद्र वर आल्यामुळे गृहांतील अंधःकाररूपी दोष नाहींसा झाला, ज्यायोगे राक्षसांचे जीव हिंसा आणि मांसभक्षण रूपी दोष वृद्धिगत झाले तथा रमणींचे रमणविषयक चित्तदोष (प्रणयकलह) निवृत्त झाले आहेत असा पूजनीय प्रदोषकाळ सुखसाधनभूत होऊन फार मनोहर भासू लागला. स्वर्गसदृश्य सुखरूपी प्रकाश देऊ लागला. ॥८॥
तन्त्रीस्वराः कर्णसुखाः प्रवृत्ताः
स्वपन्ति नार्यः पतिभिः सुवृत्ताः ।
नक्तञ्चराश्चापि तथा प्रवृत्ता
विहर्तुमत्यद्‌भुतरौद्रवृत्ताः ॥ ९ ॥
श्रवणसुखद असे वीणा झंकार ऐकू येऊ लागले, सदाचारिणी स्त्रिया पतिसमवेत निद्रा घेऊ लागल्या आणि अत्यंत आश्चर्यकारक आणि भयंकर वर्तन करणारे निशाचर ही निशीथ कालात विहार करण्यास प्रवृत्त झाले. ॥९॥
मत्तप्रमत्तानि समाकुलानि
रथाश्वभद्रासनसङ्कुलानि ।
वीरश्रिया चापि समाकुलानि
ददर्श धीमान् स कपिः कुलानि ॥ १० ॥
ऐश्वर्याने आणि मद्यपानाने मत्त झालेल्या राक्षसांनी भरलेली, रथ, अश्व आणि चांगल्या चांगल्या बैठकीनी संपन्न असलेली, लोकांची ज्यात गर्दी झालेली आहे आणि जी वीरश्रींनी गजबजून गेली आहेत, अशी राक्षसांची जवळ-जवळ असलेली घरे बुद्धिमान वानर हनुमानांनी पाहिली. ॥१०॥
परस्परं चाधिकमाक्षिपन्ति
भुजांश्च पीनानधिनिक्षिपन्ति ।
मत्तप्रलापानधिविक्षिपन्ति
मत्तानि चान्योन्यमधिक्षिपन्ति ॥ ११ ॥
मत्त झालेले राक्षस एकमेकावर जोरजोराने उत्तरे-प्रत्त्युत्तरे करू लागले, आपले लठ्‍ठ, दंड एकमेकासमोर थोपटू लागले, उन्मत्त भाषणे करू लागले आणि मदिरेने उन्मत्त होऊन एकमेकाची निर्भत्सनाही करू लागले. ॥११॥
रक्षंसि वक्षांसि च विक्षिपन्ति
गात्राणि कान्तासु च विक्षिपन्ति ।
रूपाणि चित्राणि च विक्षिपन्ति
दृढानि चापानि च विक्षिपन्ति ॥ १२ ॥
इतकेच नव्हे तर ते उन्मत्त राक्षस एकमेकांच्या वक्षःस्थळावर प्रहार करू लागले. आपले हात आदि अवयव प्रिय पत्‍नींच्यावर ठेवू लागले, चित्रविचित्र रूपे धारण करू लागले आणि आपल्या सुदृढ धनुष्यांना आकर्ण खेचू लागले. ॥१२॥
ददर्श कान्ताश्च समालभन्त्यः
तथापरास्तत्र पुनः स्वपन्त्यः ।
सुरूपवक्त्राश्च तता हसन्त्यः
क्रुद्धाः पराश्चापि विनिःश्वसन्त्यः ॥ १३ ॥
हनुमंतांनी हेही पाहिले की काही नायिका आपल्या अंगांना चंदनादिच्या उट्‍या लावीत होत्या तर दुसर्‍या काही झोपल्या होत्या, तिसर्‍या सुंदर रूप आणि मनोहर मुख ललना हंसत होत्या तथा अन्य काही स्त्रिया प्रणय-कळहाच्या योगे क्रुद्ध होऊन सुस्कारे टाकीत होत्या. ॥१३॥
महागजैश्चापि तथा नदद्‌भिः
सुपूजितैश्चापि तथा सुसद्‌भिः ।
रराज वीरैश्च विनःश्वसद्‌भिः
ह्रदा भुजङ्गैरिव निःश्वसद्‌भिः ॥ १४ ॥
चित्कार करणार्‍या महान गजराजांच्या योगे, अत्यंत सन्माननीय श्रेष्ठ सभासदांच्या योगे आणि दीर्घ श्वास सोडणार्‍या वीरांच्या योगे, ती लंकानगरी फुत्कार टाकणार्‍या सर्पांच्या योगे शोभणार्‍या सरोवरांप्रमाणे शोभत होती. ॥१४॥
बुद्धिप्रधानान् रुचिराभिधानान्
संश्रद्धधानान् जगतः प्रधानान् ।
नानाविधानान् रुचिराभिधानान्
ददर्श तस्यां पुरि यातुधानान् ॥ १५ ॥
हनुमंतांनी त्या लंकानगरी मध्ये अनेक उत्कृष्ट बुद्धिने युक्त, मनोहर भाषण करणारे, सम्यक श्रद्धा ठेवणारे अनेक प्रकारचे रंग-रूपे असणारे आणि मनोहर नाम धारण करणारे विश्वविख्यात राक्षस पाहिले. ॥१५॥
ननन्द दृष्ट्वा स च तान् सुरूपान्
नानागुणानात्मगुणानुरूपान् ।
विद्योतमानान् स च तान् सुरूपान्
ददर्श कांश्चिच्च पुनर्विरूपान् ॥ १६॥
ते सुस्वरूप, नाना गुणांनी संपन्न, आपल्या गुणांस अनुरूप व्यवहार करणारे आणि तेजस्वी होते. त्यांना पाहून हनुमान अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी अनेक राक्षस सुंदर रूपाने संपन्न असलेले पाहिले आणि काही काही त्याला अत्यंत कुरूपही दिसून आले. ॥१६॥
ततो वरार्हाः सुविशुद्धभावाः
तेषां स्त्रियस्तत्र महानुभावाः ।
प्रियेषु पानेषु च सक्तभावा
ददर्श तारा इव सुस्वभावाः ॥ १७॥
त्यानंतर उत्कृष्ट अलंकार वगैरे धारण करण्यास योग्य, नेत्राकटाक्षादि विशुद्धभावांनी युक्त, अंतःकरणाने उदार, नक्षत्रांप्रमाणे सुस्वरूप आणि प्रियकरांचे ठिकाणी आणि मद्याचे ठिकाणी आसक्त अत्यंत प्रभावशाली अशा त्या राक्षसांच्या स्त्रियाही हनुमंतांनी पाहिल्या. ॥१७॥
स्त्रियो ज्वलन्तीस्त्रयोपगूढा
निशीथकाले रमणोपगूढाः ।
ददर्शकाश्चित् प्रमदोपगूढा
यथा विहंगा विहगोपगूढाः ॥ १८ ॥
ज्या आपल्या रूप-सौंदर्याने प्रकाशित होत होत्या अशा काही स्त्रियाही हनुमंतांच्या दृष्टीस पडल्या. त्या अत्यंत लज्जायुक्त होत्या आणि मध्यरात्रीच्या समयी पतींनी गाढ आलिंगन दिलेल्या आणि हर्षित झालेल्या त्या स्त्रिया पक्ष्यांच्या द्वारा आलिंगित पक्षीणींप्रमाणे त्या सर्वच्या सर्व आनंदात अगदी मग्न झाल्या होत्या. ॥१८॥
अन्याः पुनर्हर्म्यतलोपविष्टाः
तत्र प्रियाङ्केषु सुखोपविष्टाः ।
भर्तुः प्रिया धर्मपरा निविष्टा
ददर्श धीमान् मदनोपविष्टाः ॥ १९ ॥
आपापल्या महालांच्या गच्च्यावर बसलेल्या, इतकेच नव्हे तर पतीला अत्यंत प्रिय असल्याने अत्यंत सुखाने त्यांच्या अंकावर बसलेल्या, पतिसेवारूप धर्माचरणात तत्पर आणि कामवासनेने व्याकुळ झालेल्या अशा दुसर्‍याही काही विवाहित स्त्रिया त्या बुद्धिमान्‌ हनुमंतांनी तेथे पाहिल्या. ॥१९॥
अप्रावृत्ताः काञ्चनराजिवर्णाः
काश्चित्परार्ध्यास्तपनीयवर्णाः ।
पुनश्च काश्चिच्छशलक्ष्मवर्णाः
कान्तप्रहीणा रुचिराङ्गवर्णाः ॥ २० ॥
काही स्त्रिया वरचे अंग उघडे टाकलेल्या, काही स्त्रिया सुवर्ण रेखे प्रमाणे तेजस्वी आणि सडपातळ असलेल्या, काही स्वरूपाने उत्तम असलेल्या, काही सुवर्णाप्रमाणे कांतिमान तर कित्येक पति वियोगी बाला चंद्रम्याप्रमाणे श्वेत वर्णाच्या दिसत होत्या. त्यांची अंगकांती फारच मनोहर होती. ॥२०॥
ततः प्रियान् प्राप्य मनोऽभिरामान्
सुप्रीतियुक्ताः सुमनोऽभिरामाः ।
गृहेषु हृष्टाः परमाभिरामा
हरिप्रवीरः स ददर्श रामाः ॥ २१॥
त्यानंतर अगदी मनाप्रमाणे सुंदर पति मिळाल्यामुळे अत्यंत प्रीतियुक्त होऊन आपापल्या पतीशी रममाण होणार्‍या, पुष्पांमुळे अधिक रमणीय दिसणार्‍या आणि घरांमध्ये आनंदात असणार्‍या आणि आपापल्या पतीना मनोहर वाटणार्‍या अशाही काही स्त्रिया त्या कपिश्रेष्ठ हनुमानाने पाहिल्या. ॥२१॥
चन्द्रप्रकाशाश्च हि वक्त्रमाला
वक्राः सुपक्ष्माश्च सुनेत्रमालाः ।
विभूषणानां च ददर्श मालाः
शतह्रदानामिव चारुमालाः ॥ २२॥
चंद्राप्रमाणे तेजस्वी मुखपंक्ति, उत्कृष्ट पापण्यांनी युक्त असलेल्या, मनोहर वक्र नेत्रांच्या पंक्ति आणि विद्युल्लताच्या मनोहर समुदायाप्रमाणे झगमगणार्‍या भूषणांच्या मनोहर मुखपंक्तिही त्यांने पाहिल्या. ॥२२॥
न त्वेव सीतां परमाभिजातां
पथि स्थिते राजकुले प्रजाताम् ।
लतां प्रफुल्लामिव साधुजातां
ददर्श तन्वीं मनसाभिजाताम् ॥ २३॥
परंतु परमात्म्याच्या मानसिक संकल्पाने धर्ममार्गामध्ये स्थिर राहाणार्‍या राजकुलात प्रकट झालेली, जिचा प्रादुर्भाव परम ऐश्वर्याची प्राप्ति करून देणारा आहे आणि जी परम सुंदर रूपात अविर्भूत होऊन प्रफुल्ल लतेसमान शोभत होती, त्या कृशांगी सीतेस तो कोठेही पाहू शकला नाही. ॥२३॥
सनातने वर्त्मनि संनिविष्टां
रामेक्षणीं तां मदनाभिविष्टाम् ।
भर्तुर्मनः श्रीमदनुप्रविष्टां
स्त्रीभ्यः पराभ्यश्च सदा विशिष्टाम् ॥ २४॥

उष्णार्दितां सानुसृतास्रकण्ठीं
पुरा वरार्होत्तमनिष्ककण्ठीम् ।
सुजातपक्ष्मामभिरक्तकण्ठीं
वने प्रनृत्तामिव नीलकण्ठीम् ॥ २५॥

अव्यक्तरेखामिव चन्द्रलेखां
पांसुप्रदिग्धामिव हेमरेखाम् ।
क्षतप्ररूढामिव वर्णरेखां
वायुप्रभिन्नामिव मेघरेखाम् ॥ २६॥

सीतामपश्यन् मनुजेश्वरस्य
रामस्य पत्‍नीं वदतां वरस्य ।
बभूव दुःखोपहतश्चिरस्य
प्लवङ्गमो मन्द इवाचिरस्य ॥ २७॥
सनातन पतिव्रत्यधर्माने चालणारी, श्रीरामाचेच चिंतन करणारी, श्रीरामविषयक काम अथवा प्रेमाने परिपूर्ण, आपल्या पतिच्या तेजस्वी मनात खिळून राहिलेली, उत्कृष्ट स्त्रियांमध्येही नेहमी श्रेष्ठ असणारी, जिला विरहजनित ताप सदा पीडा देत असे, जिच्या नेत्रांतून निरंतर अश्रू ओघळत असत, आणि त्या अश्रूंच्या योगे जिचा कंठ सद्‍गदित होत असे, प्रथम संयोग काळात जिचा कंठ श्रेष्ठ आणि बहूमूल्य पदकाने विभूषित राहात असे, जिच्या पापण्या अत्यंत सुंदर होत्या आणि कण्ठस्वर अत्यंत मधुर होता आणि जी वनात नृत्य करणार्‍या मयूरीसमान मनोहर भासत होती; जी मेघ आदिनी आच्छादित झाल्याने अव्यक्त रेखायुक्त चंद्रलेखेप्रमाणे दिसत होती, धूलि-धूसर सुवर्ण रेखेसमान प्रतीत होत होती आणि बाणांच्या आघातांनी उत्पन्न रेखेसारखी दिसून येत होती, त्या वक्त्यांमध्ये श्रेष्ठ नरेश्वर श्रीरामचंद्रांच्या पत्‍नीला, त्या सीतेला, बराच वेळ शोधल्यानंतरही हनुमान पाहू शकले नाहीत, तेव्हा तत्क्षणी ते अत्यंत दुःखी आणि शिथिल झाले (त्यांचा उत्साह मावळला). ॥२४-२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा पाचवा सर्ग पूरा झाला. ॥५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP