श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुंदरकाण्डे
॥ अष्टपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जाम्बवता प्ष्टेन स्वकीय लंकायात्रासंबंधि संपूर्णवृत्तस्य श्रावणम् -
जाम्बवानानी विचारल्यावरून हनुमंतांनी आपल्या लंकायात्रेचा सर्व वृत्तांत ऐकविणे -
ततस्तस्य गिरेः श्रृङ्‍गे महेंद्रस्य महाबलाः ।
हनुमत्प्रमुखाः प्रीतिं हरयो जग्मुरुत्तमाम् ॥ १ ॥
त्यानंतर हनुमान आदि महाबलाढ्‍य वानर महेंद्रगिरीच्या शिखरावर परस्परांना भेटून अत्यंत प्रसन्न झाले. ॥१॥
प्रीतिमत् सूपविष्टेषु वानरेषु महात्मसु ।
तं ततः प्रीतिसंहृष्टः प्रीतियुक्तं महाकपिम् ॥ २ ॥

जांबवान् कार्यवृत्तांतं अपृच्छदनिलात्मजम् ।
कथं दृष्टा त्वया देवी कथं वा तत्र वर्तते ॥ ३ ॥

तस्यां वा स कथं वृत्तः क्रूरकर्मा दशाननः ।
तत्त्वतः सर्वमेतन्नः प्रबूहि त्वं महाकपे ॥ ४ ॥
ज्यावेळी सर्व महामनस्वी वानर प्रसन्नतापूर्वक तेथे बसले, त्यावेळी अत्यंत हर्षित झालेल्या जाम्बवानाने अत्यंत प्रेमाने महाकपि हनुमानांस कार्यसिद्धि संबंधी वृत्तांत विचारला. तो म्हणाला- हे महाकपि ! तू देवी सीतेला कसे पाहिलेस ? ती तेथे कशा प्रकारे राहात आहे ? आणि क्रूरकर्मा दशानन तिच्याशी कशा प्रकारे वागत आहे ? या सर्व गोष्टी तू आम्हांला चांगल्याप्रकारे सांग. ॥२-४॥
सम्मार्गिता कथं देवी किं च सा प्रत्यभाषत ।
श्रुतार्थाश्चिन्तयिष्यामो भूयः कार्यविनिश्चयम् ॥ ५ ॥
तू सीतादेवीला कशा रीतीने शोधून काढलेस ? आणि तिने तुला काय सांगितले ? या सर्व गोष्टी ऐकल्यावर आपण सर्व मिळून पुढे काय करावयाचे या संबंधी निश्चितपणे विचार करू. ॥५॥
यश्चार्थस्तत्र वक्तव्यो गतैरस्माभिरात्मवान् ।
रक्षितव्यं च यत्तत्र तद् भवान् व्याकरोतु नः ॥ ६ ॥
तेथे किष्किंधामध्ये गेल्यावर आपण कुठली गोष्ट सांगितली पाहिजे आणि कुठली गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे ? तू बुद्धिमान आहेस म्हणून तूच या सर्व गोष्टींवर प्रकाश टाक. या सर्व गोष्टी उघड करून सांग. ॥६॥
स नियुक्तस्ततस्तेन संप्रहृष्टतनूरुहः ।
नमस्यन् शिरसा देव्यै सीतायै प्रत्यभाषत ॥ ७ ॥
जाम्बवानाने याप्रकारे विचारल्यावर हनुमंताच्या शरीरावर रोमांच आले. त्यांनी मनातल्या मनात सीतादेवीला मस्तक नमवून प्रणाम केला आणि ते या प्रकारे म्हणाले - ॥७॥
प्रत्यक्षमेव भवतां महेंद्राग्रात् खमाप्लुतः ।
उदधेर्दक्षिणं पारं कांक्षमाणः समाहितः ॥ ८ ॥
मी आपल्या समक्षच समुद्राच्या दक्षिण तीरावर जाण्याच्या इच्छेने सावध होऊन महेंद्र पर्वताच्या शिखरावरून आकाशात उड्डाण केले होते. ॥८॥
गच्छतश्च हि मे घोरं विघ्नरूपमिवाभवत् ।
काञ्चनं शिखरं दिव्यं पश्यामि सुमनोहरम् ॥ ९॥

स्थितं पंथानमावृत्य मेने विघ्नं च तं नगम् ।
पुढे जाताच माझा मार्गात एक अत्यंत मनोहर दिव्य असे सुवर्णमय शिखर प्रकट झाले असून त्याने माझा मार्ग अडविला आहे असे मला दिसले. माझ्या प्रवासात हे भयानक विघ्नच उपस्थित झाले आहे असेच मला वाटले. मी त्याला मूर्तिमंत विघ्नच समजलो. ॥९ १/२॥
उपसंगम्य तं दिव्यं काञ्चनं नगमुत्तमम् ॥ १० ॥

कृता मे मनसा बुद्धिः भेत्तव्योऽयं मयेति च ।
त्या दिव्य उत्तम सुवर्णमय पर्वताजवळ पोहोंचल्यावर मी मनातल्या मनात विचार केला की मी या पर्वतास विदीर्णच करून टाकतो. ॥१० १/२॥
प्रहतस्य च मया तस्य लांगूलेन महागिरेः ॥ ११ ॥

शिखरं सूर्यसङ्‍काशं व्यशीर्यत सहस्रधा ।
मग तर मी माझ्या पुच्छाने त्याच्यावर प्रहार केला. त्या पुच्छाचा तडाखा बसताच त्या महान पर्वताच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी शिखराचे हजारो तुकडे झाले. ॥११ १/२॥
व्यवसायं च तं बुद्ध्वा स होवाच महागिरिः ॥ १२ ॥

पुत्रेति मधुरां वाणीं मनः प्रह्लादयन्निव ।
पितृव्यं चापि मां विद्धि सखायं मातरिश्वनः ॥ १३ ॥
माझा तो निश्चय जाणून महागिरी मैनाकाने मनाला आल्हाद देणार्‍या मधुर वाणीमध्ये मला पुत्र म्हणून संबोधले आणि तो म्हणाला - हे पुत्रा ! मी तुझा पिता वायुदेव याचा मित्र असल्यामुळे मी तुझा चुलता आहे, असेच समज. ॥१२-१३॥
मैनाकमिति विख्यातं निवसंतं महोदधौ ।
पक्षवंतः पुरा पुत्र बभूवुः पर्वतोत्तमाः ॥ १४ ॥
माझे नाव मैनाक आहे आणि मी येथे महासागरात निवास करीत असतो. पूर्वी सर्व श्रेष्ठ पर्वतांना पंख होते. ॥१४॥
छंदतः पृथिवीं चेरुः बाधमानाः समंततः ।
श्रुत्वा नगानां चरितं महेंद्रः पाकशासनः ॥ १५ ॥

वज्रेण भगवान् पक्षौ चिच्छेदै सहस्रशः ।
अहं तु मोक्षितस्तस्मात् तव पित्रा महात्मना ॥ १६ ॥
ते आपल्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असत आणि संचार करता करता जे काही त्यांच्या मार्गात येईल त्याला पीडा देत असत. हे पर्वतांचे वर्तन पाहून पाकशासन भगवान इंद्रांनी वज्राने त्या हजारो पर्वतांचे पंख छाटून टाकले. त्यावेळी तुझ्या महात्मा पित्याने मला इंद्रापासून वाचविले. ॥१५-१६॥
मारुतेन तदा वत्स प्रक्षिप्तो वरुणालये ।
रामस्य च मया साह्ये वर्तितव्यमरिंदम ॥ १७ ॥

रामो धर्मभृतां श्रेष्ठो महेंद्रसमविक्रमः ।
वत्सा ! वायूने त्यावेळी मला उचलून सागरामध्ये फेकून दिले आणि त्यामुळे माझे पंख वाचले. म्हणून हे शत्रूदमन वीरा ! मला रघुवंशीय रामाला अवश्य साह्य केले पाहिजे, कारण भगवान श्रीराम धर्मनिष्ठामध्ये श्रेष्ठ असून महेंद्रासारखे पराक्रमी आहेत. ॥१७ १/२॥
एतच्छ्रुत्वा वचमया तस्य मैनाकस्य महात्मनः ॥ १८ ॥

कार्यमावेद्य तु गिरेः उद्धतं च मनो मम ।
तेन चाहमनुज्ञातो मैनाकेन महात्मना ॥ १९ ॥
महात्मा मैनाकाचे हे भाषण ऐकून मी माझे कार्य त्यास सांगितले आणि त्याची आज्ञा घेऊन पुढे जाण्यासाठी माझे मन परत उत्साहित झाले. महाकाय मैनाकाने त्यावेळी मला जाण्याची आज्ञा दिली. ॥१८-१९॥
स चाप्यंतर्हितः शैलो मानुषेण वपुष्मता ।
शरीरेण महाशैलः शैलेन च महोदधौ ॥ २० ॥
तो महान पर्वतही आपल्या मानवरूपास परत अंतर्हित करून पुन्हा पर्वतरूपाने महासागरात स्थित झाला. ॥२०॥
उत्तमं जवमास्थाय शेषं पंथानमास्थितः ।
ततोऽहं सुचिरं कालं वेगेनाभ्यगमं पथि ॥ २१ ॥
नंतर मी आपला वेग पराकाष्ठेचा वाढवून अवशिष्ट राहिलेला मार्ग उल्लंघन करू लागलो आणि दीर्घकाळपर्यंत अत्यंत वेगाने मार्गावर जात राहिलो. ॥२१॥
ततः पश्याम्यहं देवीं सुरसां नागमातरम् ।
समुद्रमध्ये सा देवी वचनं चेदमब्रवीत ॥ २२ ॥
नंतर समुद्रामध्ये मला नागमाता सुरसादेवीचे दर्शन झाले. देवी सुरसा मला याप्रकारे म्हणाली- ॥२२॥
मम भक्षः प्रदिष्टस्त्वं अमरैर्हरिसत्तम ।
अतस्त्वां भक्षयिष्यामि विहितस्त्वं हि मे सुरैः ॥ २३ ॥
हे वानरश्रेष्ठा ! देवांनी तुला माझे भक्ष्य ठरविले आहे. यासाठी मी तुला भक्षण करते कारण सर्व देवतांनी आज तुझीच माझा आहार म्हणून योजना केली आहे. ॥२३॥
एवमुक्तः सुरसया प्राञ्जलिः प्रणतः स्थितः ।
विवर्णवदनो भूत्वा वाक्यं चेदमुदीरयम् ॥ २४ ॥
सुरसेने असे सांगितल्यावर मी हात जोडून नम्रपणे तिच्या समोर उभा राहिलो आणि निस्तेज चेहर्‍याने तिला म्हणालो- ॥२४॥
रामो दाशरथिः श्रीमान् प्रविष्टो दण्डकावनम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया च परंतपः ॥ २५ ॥
हे देवी ! शत्रूंना संताप देणारे दशरथनंदन श्रीमान राम, आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्‍नी सीता यांच्यासह दंडकारण्यात आले होते. ॥२५॥
तस्य सीता हृता भार्या रावणेन दुरात्मना ।
तस्याः सकाशं दूतोऽहं गमिष्ये रामशासनात् ॥ २६ ॥
तेथे दुरात्मा रावणाने त्यांची भार्या सीता हिचे हरण करून तिला घेऊन गेला आहे आणि या वेळी श्रीरामचंद्रांच्या आज्ञेवरून मी दूत म्हणून तिच्याकडे जात आहे. ॥२६॥
कर्तुमर्हसि रामस्य साहाय्यं विषये सती ।
अथवा मैथिलीं दृष्ट्वा रामं चाक्लिष्टकारिणम् ॥ २७ ॥

आगमिष्यामि ते वक्त्रं सत्यं प्रतिश्रृणोमि ते ।
यासाठी हा प्रदेश जर रामचंद्रांच्या राज्यातील असेल तर तू श्रीरामांना सहाय्य केले पाहिजेस, तसे नसेल तर मी मैथिली सीतेचा शोध लावून आणि तो वृत्तांत निवेदन करण्याकरितां, पापापासून परावृत्त असलेल्या अथवा महान कर्म करणार्‍या श्रीरामांचे दर्शन घेऊन मी पुन्हा तुझ्या मुखांत जाण्यासाठी परत येईन हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सत्य सांगतो. ॥२७ १/२॥
एवमुक्ता मया सा तु सुरसा कामरूपिणी ॥ २८ ॥

अब्रवीन्नातिवर्तेत कश्चिदेष वरो मम ।
मी असे सांगितल्यावर इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी सुरसा म्हणाली- मला असा वर मिळालेला आहे की माझ्या आहाराच्या रूपात माझ्या जवळ आलेला कुठलाही प्राणी मला टाळून पुढे जाऊ शकत नाही. ॥२८ १/२॥
एवमुक्तः सुरसया दशयोजनमायतः ॥ २९ ॥

ततोऽर्धगुणविस्तारो बभूवाहं क्षणेन तु ।
मत्प्रमाणाधिकं चैव व्यादितं तु मुखं तया ॥ ३० ॥
जेव्हा सुरसेने असे सांगितले तेव्हा माझे शरीर दहा योजने मोठे होते परंतु एका क्षणात मी त्याच्या दीडपट मोठा झालो. तेव्हा सुरसेनेही आपले मुख माझ्या शरीरापेक्षा अधिक पसरले. ॥२९-३०॥
तद् दृष्ट्वा व्यादितं त्वास्यं ह्रस्वं ह्यकरवं पुनः ।
तस्मिन् मुहूर्ते च पुनर्बभूवाङ्‍गुष्ठसम्मितः ॥ ३१ ॥
तिचे पसरलेले मुख पाहून मी परत आपले स्वरूप लहान केले. त्या मुहूर्तामध्ये माझे शरीर अंगुष्ठमात्र झाले होते. ॥३१॥
अभिपत्याशु तद्वक्रं निर्गतोऽहं ततः क्षणात् ।
अब्रवीत् सुरसा देवी स्वेन रूपेण मां पुनः ॥ ३२ ॥
नंतर सत्वर मी सुरसेच्या मुखात प्रवेश करून तत्क्षणीच बाहेर पडलो. त्यावेळी सुरसादेवीने आपले स्वाभाविक दिव्य रूप धारण केले आणि मला म्हणाली- ॥३२॥
अर्थसिद्ध्यै हरिश्रेष्ठ गच्छ सौम्य यथासुखम् ।
समानय च वैदेहीं राघवेण महात्मना ॥ ३३ ॥
हे सौम्या वानरश्रेष्ठा ! आता तू खुशाल कार्यसिद्धिसाठी सुखाने जा आणि वैदेहीची महात्मा राघवाशी भेट करवून दे. ॥३३॥
सुखी भव महाबाहो प्रीताऽस्मि तव वानर ।
ततोऽहं साधु साध्वीति सर्वभूतैः प्रशंसितः ॥ ३४ ॥
हे महाबाहु वानरा ! तू सुखी रहा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. त्यानंतर सर्व प्राण्यांनी साधु, साधु (शाबास ! शाबास !) असे म्हणून माझी फारच प्रशंसा केली. ॥३४॥
ततोऽन्तरिक्षं विपुलं प्लुतोऽहं गरुडो यथा ।
छाया मे निगृहीता च न च पश्यामि किंचन ॥ ३५ ॥
नंतर विस्तिर्ण अंतरिक्षामध्ये मी गरूडाप्रमाणे उड्डाण केले, तोच छायेच्या योगाने मला कुणी तरी पकडले, मला ओढू लागले, पण मला कोण आकर्षण करीत आहे हे मात्र काहीच दिसेना. ॥३५॥
सोऽहं विगतवेगस्तु दिशो दश विलोकयन् ।
न किंचित् तत्र पश्यामि येन मे विहता गतिः ॥ ३६ ॥
छाया पकडली गेल्याने माझी गती, माझा वेग कुंठित झाला म्हणून मी दाही दिशांना पाहू लागलो. परंतु ज्याने माझी गती रोखून धरली होती असा कुणीही प्राणी मला तेथे दिसला नाही. ॥३६॥
ततो मे बुद्धिरुत्पन्ना किं नाम गगने मम ।
ईदृशो विघ्न उत्पन्नो रूपं यत्र न दृश्यते ॥ ३७ ॥
ते पाहून मी मनामध्ये म्हणालो -अरे ! आकाशामध्ये अशा प्रकारचे मोठे विघ्न उत्पन्न झाले आहे आणि विघ्न उत्पन्न करणाराचे प्रत्यक्ष रूप तर मला काहीच दिसत नाही, याचा अर्थ काय ? ॥३७॥
अधोभागे तु मे दृष्टिः शोचतः पातिता मया ।
तत्राद्राक्षमहं भीमां राक्षसीं सलिलेशयाम् ॥ ३८ ॥
अशा प्रकारे चिंता करीत असता माझी दृष्टी खालच्या बाजूस गेली तेव्हां उदकामध्येच वास्तव्य करणारी एक भयंकर राक्षसी मला दिसली. ॥३८॥
प्रहस्य च महानादं उक्तोऽहं भीमया तया ।
अवस्थितमसंभ्रांतं इदं वाक्यमशोभनम् ॥ ३९ ॥
त्या भयंकर राक्षसीने मोठ्‍या जोराने अट्टाहास (हास्य करून) करून निर्भय उभा असलेल्या मला जोरजोराने गर्जना करीत, ही अमंगळकारक गोष्ट बोलली- ॥३९॥
क्वासि गंता महाकाय क्षुधिताया ममेप्सितः ।
भक्षः प्रीणय मे देहं चिरमाहारवर्जितम् ॥ ४० ॥
हे विशालदेही वानरा ! कोठे चाललास ? मी भुकेलेली आहे. तू माझ्यासाठी मनोवांछित भोजन आहेस. ते इकडे आणि दीर्घकाळ निराहार पडून राहिलेल्या माझ्या शरीराला आणि प्राणांना तृप्त कर. ॥४०॥
बाढमित्येव तां वाणीं प्रत्यगृह्णामहं ततः ।
आस्य प्रमाणादधिकं तस्याः कायमपूरयम् ॥ ४१ ॥
तेव्हां मी फारच छान (चांगले) असे म्हणून तिच्या म्हणण्याला मान दिला आणि तिच्या मुखापेक्षाही आपले शरीर मोठे केले. ॥४१॥
तस्याश्चास्यं महद् भीमं वर्धते मम भक्षणे ।
न तु मां सा नु बुबुधे मम वा विकृतं कृतम् ॥ ४२ ॥
परंतु मला भक्षण करण्याकरितां तिचे भयंकर मुखही फारच वाढू लागले. तिने मला अथवा माझ्या प्रभावाला जाणले नव्हते आणि मी जी युक्ती केली होती, ती ही तिला कळली नाही. ॥४२॥
ततोऽहं विपुलं रूपं संक्षिप्य निमिषांतरात् ।
तस्या हृदयमादाय प्रपतामि नभःस्थलम् ॥ ४३ ॥
नंतर आपले विशाल रूप एका निमिषात मी संकुचित केले आणि तिचे काळीज काढूनच मी आकाशात उड्डाण केले. ॥४३॥
सा विसृष्टभुजा भीमा पपात लवणांभसि ।
मया पर्वतसङ्‍काशा निकृत्तहृदया सती ॥ ४४ ॥
मी तिचे काळीजच तोडून नेल्यामुळे पर्वतप्राय भयंकर देह असणारी ती भयंकर राक्षसी हातपाय आपटीत समुद्राच्या खार्‍या पाण्यामध्ये पडली. ॥४४॥
श्रृणोमि खगतानां च वाचः सौम्यां महात्मनाम् ।
राक्षसी सिंहिका भीमा क्षिप्रं हनुमता हता ॥ ४५ ॥
त्यावेळी अंतरिक्षात संचार करणार्‍या सिद्ध महात्म्यांचे हे सौम्य शब्द माझ्या कानी आले की - अहो ! या सिंहिका नावाच्या भयानक राक्षसीचा हनुमानाने तडका फडकी वध करून टाकिला. ॥४५॥
तां हत्वा पुनरेवाहं कृत्यमात्ययिकं स्मरन् ।
गत्वा चाहं महदध्वानं पश्यामि नगमण्डितम् ॥ ४६ ॥

दक्षिणं तीरमुदधेः लङ्‍का यत्र गता पुरी ।
याप्रमाणे सिंहिकेचा वध केल्यावर आपल्या कार्याला फार विलंब होत आहे हे जाणून मी त्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्या विशाल मार्गाचे उल्लंघन करून पर्वताने मण्डित असे समुद्राचे दक्षिण तीर मी पाहिले. त्याच तीरावर लंकानगरी वसलेली आहे. ॥४६ १/२॥
अस्तं दिनकरे याते रक्षसां निलयं पुरम् ॥ ४७ ॥

प्रविष्टोऽहमविज्ञातो रक्षोभिर्भीमविक्रमैः ।
पुढे सूर्यास्त झाल्यानंतर मी राक्षसांचे निवासस्थान असलेल्या लंकापुरीमध्ये प्रवेश केला परंतु ते भयानक पराक्रमी राक्षस माझ्या विषयी काहीही जाणू शकले नाहीत. ॥४७ १/२॥
तत्र प्रविशतश्चापि कल्पांतघनसप्रभा ॥ ४८ ॥

अट्टहासं विमुञ्चंती नारी काप्युत्थिता पुरः ।
परंतु मी प्रवेश करीत असतांनाच प्रलयकाळच्या मेघाप्रमाणे जिची कांति होती अशी एक स्त्री अट्टहास करीत माझ्यासमोर उभी राहिली. ॥४८ १/२॥
जिघांसंतीं ततस्तां तु ज्वलदग्निशिरोरुहाम् ॥ ४९ ॥

सव्यमुष्टिप्रहारेण पराजित्य सुभैरवाम् ।
प्रदोषकाले प्रविशं भीतयाहं तयोदितः ॥ ५० ॥
तिच्या मस्तकावरील केस प्रज्वलित अग्निप्रमाणे दिसत होते आणि ती मला ठार मारण्याची इच्छा करीत होती. हे पाहून मी त्या भयंकर राक्षसीला डाव्या हाताच्या मुष्टीप्रहारानेच परास्त केले आणि प्रदोषकाळीच लंकानगरीत प्रवेश केला. तेव्हा ती भयभीत निशाचरी मला म्हणाली - ॥४९-५०॥
अहं लङ्‍कापुरी वीर निर्जिता विक्रमेण ते ।
यस्मात् तत्तस्माद् विजेतासि सर्व रक्षांस्यशेषतः ॥ ५१ ॥
हे वीरा ! मी साक्षात लंकापुरी आहे. तू आपल्या पराक्रमाने मला जिंकले आहेस म्हणून तू सर्व राक्षसांचा पूर्णपणे पराभव करशील हे निश्चित आहे. ॥५१॥
तत्राहं सर्वरात्रं तु विचरन् जनकात्मजाम् ।
रावणांतःपुरगतो न चापश्यं सुमध्यमाम् ॥ ५२ ॥
तेथे सारी रात्र मी नगरात घराघरात फिरलो आणि रावणाच्या अंतःपुरातही पोंहोचलो. तरीही सुमध्यमा जनकात्मजा सीता माझ्या दृष्टीस पडली नाही. ॥५२॥
ततः सीतामपश्यंस्तु रावणस्य निवेशने ।
शोकसागरमासाद्य न पारमुपलक्षये ॥ ५३ ॥
रावणाच्या महालातही सीता न दिसल्याने मी शोकसागरात बुडून गेलो आणि त्यातून तरून जाण्याचा काही एक उपाय मला सुचेना. ॥५३॥
शोचता च मया दृष्टं प्राकारेणाभिसंवृतम् ।
काञ्चनेन विकृष्टेन गृहोपवनमुत्तमम् ॥ ५४ ॥
शोकमग्न होऊन फिरत असताच, सभोवती सुवर्णमय उंच कोट असलेले एक उत्कृष्ट उद्यान माझ्या दृष्टीस पडले. ॥५४॥
स प्राकारमवप्लुत्य पश्यामि बहुपादपम् ।
अशोकवनिकामध्ये शिंशुपापादपो महान् ॥ ५५ ॥
नंतर तटबंदीला ओलांडून मी त्या गृहोद्यानात गेलो असता, असंख्य वृक्षांनी भरलेल्या त्या अशोकवाटिकेमध्ये मला एक अत्यंत उंच शिंशपावृक्ष दृष्टीस पडला. ॥५५॥
तमारुह्य च पश्यामि काञ्चनं कदलीवनम् ।
अदूरात् शिंशुपावृक्षात् पश्यामि वरवर्णिनीम् ॥ ५६ ॥
त्या वृक्षावर चढून मी पाहू लागलो तेव्हा सुवर्णमय कदलीवन माझ्या दृष्टीस पडले आणि त्या अशोक वृक्षापाशीच (शिंशपावृक्षापाशीच) मला सर्वांगसुंदरी सीतेचे दर्शन झाले. ॥५६॥
श्यामां कमलपत्राक्षीं उपवासकृशाननाम् ।
तदेकवासःसंवीतां रजोध्वस्तशिरोरुहाम् ॥ ५७ ॥
ती सदा षोडश वर्षाची असलेल्या अवस्थेने युक्त आहे. तिचे नेत्र प्रफुल्ल कमळदलाप्रमाणे विशाल आणि सुंदर आहेत. उपवास केल्याने ती अत्यंत दुर्बळ झाली असून तिची ती दुर्बळता तिचे मुखावरून स्पष्ट दिसून येत आहे. तिने एकच वस्त्र परिधान केले आहे. (नेसलेली आहे) आणि तिचे केस धुळीने धूसर झाले आहेत. ॥५७॥
शोकसंतापदीनाङ्‍गीं सीतां भर्तृहिते स्थिताम् ।
राक्षसीभिर्विरूपाभिः क्रूराभिरभिसंवृताम् ॥ ५८ ॥

मांसशोणितभक्षाभिः व्याघ्रीभिर्हरिणीं यथा ।
शोक आणि संताप यांनी तिचे सर्व अंग अगदी जर्जर झाले होते. ती आपल्या स्वामीच्या हित-चिंतनात तत्पर होती. रक्त-मांसाचे भोजन करणार्‍या क्रूर आणि कुरूप राक्षसींनी ती चहूबाजूनी वेढलेली होती आणि त्या तिचे रक्षण करीत होत्या. रक्तमांस भक्षण करणार्‍या अनेक वाघिणींनी घेरून टाकलेल्या हरिणीप्रमाणे ती भासत होती. ॥५८ १/२॥
सा मया राक्षसीमध्ये तर्ज्यमाना मुहुर्मुहुः ॥ ५९ ॥

एकवेणीधरा दीना भर्तृचिन्तापरायणा ।
भूमिशय्या विवर्णाङ्‍गी पद्मिनीव हिमागमे ॥ ६० ॥
मी पाहिले की ती राक्षसींच्या मध्ये बसलेली होती आणि त्या तिला वारंवार धमकावीत होत्या. तिने मस्तकावर एकच वेणी धारण केली होती आणि दीनभावाने आपल्या पतीच्या चिंतनात तल्लीन झालेली होती. धरती हीच तिची शय्या होती. ज्याप्रमाणे हेमंत-ऋतु आल्यावर कमळिनी सुकून श्रीहीन होऊन जाते त्याप्रमाणे सीतेचे सर्व अंग कांतिहीन झाले होते. ॥५९-६०॥
रावणाद् विनिवृत्तार्था मर्तव्ये कृतनिश्चया ।
कथंचिन्मृगशावाक्षी तूर्णमासादिता मया ॥ ६१ ॥
रावणासंबंधी तिचा हार्दीक भाव सर्वथा दूर आहे. रावणामुळे तिचे सर्व सुख नाहीसे झाले आहे. त्यामुळे ती मनातून मरण्याविषयी निश्चय करून बसली होती. त्या दीन अवस्थेमध्ये असलेल्या त्या मृगनयना सीतेजवळ मी ताबडतोब जाऊन पोहोंचलो. ॥६१॥
तां दृष्ट्वा तादृशीं नारीं रामपत्‍नीं यशस्विनीम् ।
तत्रैव शिंशुपावृक्षे पश्यन्नहमवस्थितः ॥ ६२ ॥
तशा प्रकारची ती स्त्री म्हणजे यशस्विनी रामपत्‍नी सीता आहे, हे पाहून ती ज्या शिंशपा वृक्षाखाली बसलेली होती मी ही त्याच वृक्षावर जाऊन बसलो आणि तेथून तिला न्याहाळून पाहू लागलो. ॥६२।
ततो हलहलाशब्दं काञ्चीनूपुरमिश्रितम् ।
श्रृणोम्यधिकगंभीरं रावणस्य निवेशने ॥ ६३ ॥
इतक्यात कमरपट्टा आणि तोरड्‍या यांचा ध्वनि ज्यात मिसळलेला आहे, असा अधिक गंभीर कोलाहल मला रावणाच्या महालाजवळ ऐकू आला. ॥६३॥
ततोऽहं परमोद्विग्नः स्वरूपं प्रतिसंहरम् ।
अहं तु शिंशुपावृक्षे पक्षीव गहने स्थितः ॥ ६४ ॥
मग तर मी अत्यंत उद्विग्न झालो आणि आपल्या स्वरूपाचा संकोच केला- लहान रूप धारण केले - आणि एखाद्या पक्ष्याप्रमाणे त्या गहन शिंशपा वृक्षामध्ये दडून बसलो. ॥६४॥
ततो रावणदाराश्च रावणश्च महाबलः ।
तं देशं अनुसंप्राप्तो यत्र सीताभवत् स्थिता ॥ ६५ ॥
नंतर ज्या ठिकाणी सीतादेवी विराजमान झालेली होती तेथे तो महाबली रावण आणि रावणाच्या सर्वच्या सर्व स्त्रियाही येऊन पोहोचल्या. ॥६५॥
तद् दृष्ट्वाथ वरारोहा सीता रक्षोगणेश्वरम् ।
संकुच्योरू स्तनौ पीनौ बाहुभ्यां परिरभ्य च ॥ ६६ ॥
राक्षसगणाधिपति रावण आल्याचे दिसताच सुंदर कटिप्रदेश असणार्‍या त्या सीतेने आपले पाय वस्त्राच्या आत सावरून घेतले आणि दोन्ही पुष्ट स्तन आपल्या बाहूंनी अगदी झाकून टाकले. ॥६६॥
वित्रस्तां परमोद्विग्नां वीक्षमाणां इतस्ततः ।
त्राणं किंचिदपश्यंतीं वेपमानां तपस्विनीम् ॥ ६७ ॥

तामुवाच दशग्रीवः सीतां परमदुःखिताम् ।
अवाक्छिराः प्रपतितो बहुमन्यस्व मामिति ॥ ६८ ॥
ती अत्यंत भयभीत आणि उद्विग्न होऊन इकडे तिकडे पाहू लागली. आपले रक्षण करणारा तिला कोणीही दिसून येत नव्हता. भयाने थरथर कापणार्‍या त्या दुःखी तपस्विनी सीतेच्या समोर जाऊन दशमुख रावण मान खाली घालून तिच्या पाया पडू लागला आणि म्हणाला- हे वैदेही ! मी तुझा सेवक आहे. तूं मला अधिक आदर दे. ॥६७-६८॥
यदि चेत्त्वं तु मां दर्पान् नाभिनंदसि गर्विते ।
द्वौ मासानंतरं सीते पास्यामि रुधिरं तव ॥ ६९ ॥
इतके करूनही आपली ती उपेक्षाच करीत आहे, हे पाहून तो संतापला आणि म्हणू लागला- गर्विष्ठ सीते ! गर्वाने जर तू माझे अभिनंदन केले नाहीस तर आजपासून दोन महिन्यानंतर मी तुझे रक्त प्राशन करीन. ॥६९॥
एतच्छ्रुत्वा वचस्तस्य रावणस्य दुरात्मनः ।
उवाच परमक्रुद्धा सीता वचनमुत्तमम् ॥ ७० ॥
दुरात्मा रावणाचे हे शब्द ऐकून अत्यंत क्रुद्ध झालेली सीता त्याला उद्देशून पुढील उत्तम वचन बोलली- ॥७०॥
राक्षसाधम रामस्य भार्यममिततेजसः ।
इक्ष्वाकुवंशनाथस्य स्नुषां दशरथस्य च ॥ ७१ ॥

अवाच्यं वदतो जिह्वा कथं न पतिता तव ।
हे अधम राक्षसा ! अमित तेजस्वी भगवान श्रीरामांच्या भार्येशी आणि इक्ष्वाकुकुलाचे महाराज दशरथांच्या सुनेशी असे अनुचित भाषण करतांना तुझी जिव्हा झडून कशी पडली नाही ? ॥७१ १/२॥
किंचिद्वीर्यं तवानार्य यो मां भर्तुरसन्निधौ ॥ ७२ ॥

अपहृत्यागतः पाप तेनादृष्टो महात्मना ।
हे दुष्टा ! हे पाप्या ! तुझ्यात काय पराक्रम आहे ? माझे पतिदेव ज्यावेळी निकट नव्हते त्यावेळी त्या महात्म्यांच्या दृष्टीस न पडतां तू मला लबाडीने हरण करून इकडे घेऊन आला आहेस. ॥७२ १/२॥
न त्वं रामस्य सदृशो दास्येऽप्यस्य न युज्यसे ॥ ७३ ॥

अजेयः सत्यवाक् शूरो रणश्लाघी च राघवः ।
तू भगवान श्रीरामांची बरोबरी करू शकत नाहीस. तू तर त्यांचा दास होण्यासही योग्य नाहीस. श्रीरघुनाथ सर्वथा अजिंक्य, सत्यवचनी, शूरवीर युद्धाचे अभिलाषी आणि प्रशंसक आहेत. ॥७३ १/२॥
जानक्या परुषं वाक्यं एवमुक्तो दशाननः ॥ ७४ ॥

जज्वाल सहसा कोपात् चितास्थ इव पावकः ।
विवृत्य नयने क्रूरे मुष्टिमुद्यम्य दक्षिणम् ॥ ७५ ॥

मैथिलीं हंतुमारब्धः स्त्रीभिर्हाहाकृतं तदा ।
स्त्रीणां मध्यात् समुत्पत्य तस्य भार्या दुरात्मनः ॥ ७६ ॥

वरा मन्दोदरी नाम तया स प्रतिषेधितः ।
उक्तश्च मधुरां वाणीं तया स मदनार्दितः ॥ ७७ ॥
याप्रमाणे जानकीने रावणाला उद्देशून असे कठोर भाषण केले. सीतेचे ते शब्द ऐकून तो रावण चितेवरील अग्नीप्रमाणे एकाएकी क्रोधाने जळफळू लागला. आपले क्रूर डोळे वटारून आणि उजव्या हाताची मूठ उगारून तो त्या सीतेला मारण्यास धावला. तेव्हा त्याच्या भोवतालच्या स्त्रियांनी हाहाकार केला. इतक्यात त्या स्त्रियांमधून त्या दुरात्म्याची मंदोदरी नामक श्रेष्ठ भार्या लगबगीने पुढे आली आणि तिने त्याला आवरून धरले. नंतर त्या कामपीडित निशाचराला ती मधुर वाणीने म्हणाली - ॥७४-७७॥
सीतया तव किं कार्यं महेंद्रसमविक्रम ।
मया सह रमस्वाद्य मद्विशिष्टा न जानकी ॥ ७८ ॥
हे महेंद्रतुल्य पराक्रमी नाथ ! आपणाला सीतेशी काय कर्तव्य आहे ? आज आपण माझ्याशी रममाण व्हा. जानकी काही माझ्यापेक्षा अधिक सुंदर नाही. ॥७८॥
देवगंदर्वकान्याभिः यक्षकन्याभिरेव च ।
सार्धं प्रभो रमस्वेह सीतया किं करिष्यसि ॥ ७९ ॥
हे प्रभो ! देव, गंधर्व आणि यक्ष यांच्या कन्या आहेत. त्यांच्याशी रममाण व्हा. सीतेशी आपल्याला काय करावयाचे आहे ? ॥७९॥
ततस्ताभिः समेताभिः नारीभिः स महाबलः ।
प्रसाद्य सहसा नीतो भवनं स्वं निशाचरः ॥ ८० ॥
इतके झाल्यावर त्या सर्व स्त्रिया मिळून त्या महाबलाढ्‍य रावणाला एकदम तेथून उठवून आपल्या महालात घेऊन गेल्या. ॥८०॥
याते तस्मिन् दशग्रीवे राक्षस्यो विकृताननाः ।
सीतां निर्भर्त्सयामासुः वाक्यैः क्रूरैः सुदारुणैः ॥ ८१ ॥
दशमुख रावण निघून गेल्यानंतर आक्राळ विक्राळ मुद्रेच्या त्या राक्षसी सीतेला अत्यंत क्रूर, दारूण भयंकर शब्दांनी निर्भत्सना करून भिती दाखवून धमकावू लागल्या. ॥८१॥
तृणवद् भाषितं तासां गणयामास जानकी ।
गर्जितं च तथा तासां सीतां प्राप्य निरर्थकम् ॥ ८२ ॥
परंतु सीतेने त्यांचे भाषण कस्पटाप्रमाणे तुच्छ मानले, त्यामुळे सीतेवरची त्यांची ती गर्जना-तर्जना फोल ठरली. ॥८२॥
वृथा गर्जितनिश्चेष्टा राक्षस्यः पिशिताशनाः ।
रावणाय शशंसुस्ताः सीता व्यवसितं महत् ॥ ८३ ॥
याप्रमाणे त्या मांसभक्षक स्त्रियांची गर्जना आणि सर्व प्रयत्‍न व्यर्थ झालेली पाहून त्यांनी सीतेने मरण्याविषयी केलेला महान निश्चय रावणाला कळविला. ॥८३॥
ततस्ताः सहिताः सर्वा विहताशा निरुद्यमाः ।
परिक्षिप्य समस्तास्ता निद्रावशमुपागताः ॥ ८४ ॥
मग हताश झालेल्या आणि म्हणूनच सीतेचे मन वळविण्याचा प्रयत्‍न सोडून दिलेल्या त्या सर्वही राक्षसी दमून गेल्यामुळे एकदम गाढ झोपी गेल्या. ॥८४॥
तासु चैव प्रसुप्तासु सीता भर्तृहिते रता ।
विलप्य करुणं दीना प्रशुशोच सुदुःखिता ॥ ८५ ॥
याप्रमाणे त्या गाढ झोपी गेल्यावर पतिच्या हिताविषयी तत्पर राहाणारी सीता अत्यंत दुःखी आणि दीन होऊन करूण स्वराने विलाप करून शोक करू लागली. ॥८५॥
तासां मध्यात् समुत्थाय त्रिजटा वाक्यमब्रवीत् ।
आत्मानं खादत क्षिप्रं न सीतामसितेक्षणातम् ॥ ८६ ॥

जनकस्यात्मजा साध्वीं स्नुषां दशरथस्य च ।
तेव्हा त्या राक्षसींच्या मधून एक त्रिजटा नामक राक्षसी उठली आणि त्या राक्षसींना म्हणाली - अग ! तुम्ही सर्व आता स्वतःलाच सत्वर खाऊन टाका. काळेभोर डोळे असलेली ही जनकाची कन्या आणि दशरथांची सून साध्वी सीता हिला तुम्ही भक्षण करू शकणार नाही. ॥८६ १/२॥
स्वप्नो ह्यद्य मया दृष्टो दारुणो रोमहर्षणः ॥ ८७ ॥

रक्षसां च विनाशाय भर्तुरस्या जयाय च ।
कारण आज मला अंगावर काटे येण्याजोगे एक भयंकर स्वप्न पडले आहे. ते राक्षसांचा नाश आणि या सीतादेवीच्या पतिच्या विजयाचे सूचक आहे. ॥८७ १/२॥
अलमस्मात् परित्रातुं राघवाद् राक्षसीगणम् ॥ ८८ ॥

अभियाचाम वैदेहीं एतद्धि मम रोचते ।
ही सीताच फक्त आपल्या या राक्षसींच्या समुदायाचे राघवाच्या रोषापासून रक्षण करण्यास समर्थ आहे. यासाठी आपण या वैदेहीची आपल्या अपराधांसाठी क्षमायाचना करावी हेच मला आपल्या हिताचे दिसत आहे. ॥८८ १/२॥
यस्या ह्येवंविधः स्वप्नो दुःखितायाः प्रदृश्यते ॥ ८९ ॥

सा दुःखैर्विविधैर्मुक्ता सुखमाप्नोत्यनुत्तमम् ।
जर कुणा दुःखाविषयी असे स्वप्न पाहिले गेले तर ती अनेक प्रकारच्या दुःखांतून मुक्त होऊन तिला परम उत्तम सुख प्राप्त होते. ॥८९ १/२॥
प्रणिपातप्रसन्ना हि मैथिली जनकात्मजा ॥ ९० ॥

अलमेषा परित्रातुं राक्षस्यो महतो भयात् ।
म्हणून हे राक्षसस्त्रियांनो ! आपण जर नुसता प्रणिपात करूनही या मैथिली जनकात्मजेला प्रसन्न केली तर ती पुढील महाभयापासून आपले रक्षण करण्यास समर्थ आहे. ॥९० १/२॥
ततः सा ह्रीमती बाला भर्तुर्विजयहर्षिता ॥ ९१ ॥

अवोचद् यदि तत् तथ्यं भवेयं शरणं हि वः ।
हे त्रिजटेचे हे भाषण ऐकून आपल्या विजयाच्या संभावनेमुळे प्रसन्न झालेली ती विनयसंपन्न लाजाळू बाला सीता म्हणाली - तुम्ही म्हणता हे जर सत्य असेल, तर मी अवश्य तुमचे रक्षण करीन. ॥९१ १/२॥
तां चाहं तादृशीं दृष्ट्वा सीताया दारुणां दशाम् ॥ ९२ ॥

चिन्तयामास विक्रांतो न च मे निर्वृतं मनः ।
संभाषणार्थे च मया जानक्याश्चिन्तितो विधिः ॥ ९३ ॥
थोडा विश्राम केल्यावर सीतेची ती दारूण दशा पाहून मी चिंतित झालो. माझ्या मनाला शांति मिळेना. सीतेशी वार्तालाप करण्याचा उपाय मी शोधून काढला. ॥९२-९३॥
इक्ष्वाकुकुलवंशस्तु स्तुतो मम पुरस्कृतः ।
श्रुत्वा तु गदितां वाचं राजर्षिगणभूषिताम् ॥ ९४ ॥

प्रत्यभाषत मां देवी बाष्पैः पिहितलोचना ।
प्रथम मी माझ्या डोळ्यापुढे असलेल्या इक्ष्वाकुकुल-वंशाची प्रशंसा केली. राजर्षि लोकांच्या स्तुतिने विभूषित अशी माझी ती वाणी ऐकून सीतादेवीच्या डोळ्यात अश्रु आले आणि ती मला म्हणाली- ॥९४ १/२॥
कस्त्वं केन कथं चेह प्राप्तो वानरपुङ्‍गव ॥ ९५ ॥

का च रामेण ते प्रीतिः तन्मे शंसितुमर्हसि ।
हे वानरश्रेष्ठा ! तू कोण आहेस ? तुला कोणी धाडले आहे ? तू येथे कसा आलास ? आणि भगवान श्रीरामांशी तुझे प्रेम कसे झाले ? हे सर्व मला नीट सांग. ॥९५ १/२॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा अहमप्यब्रुवं वचः ॥ ९६ ॥

देवि रामस्य भर्तुस्ते सहायो भीमविक्रमः ।
सुग्रीवो नाम विक्रांतो वानरेंद्रो महाबलः ॥ ९७ ॥
हे तिचे भाषण ऐकून मी तिला म्हणालो- हे देवी ! तुझे पतिदेव श्रीराम यांचा सहाय्यकर्ता एक महापराक्रमी बळ-विक्रम संपन्न वानरराज आहे. त्याचे नाव सुग्रीव आहे. ॥९६-९७॥
तस्य मां विद्धि भृत्यं त्वं हनुमंतमिहागतम् ।
भर्त्रा संप्रहितस्तुभ्यं रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ९८॥
त्याचा मी सेवक असून माझे नाव हनुमान आहे. अनायासे महान कर्म करणारे (अथवा पापकर्मापासून सदा परावृत्त असणारे) तुझे पति श्रीराम यांनी मला धाडले आहे. म्हणून मी येथे आलो आहे. ॥९८॥
इदं च पुरुषव्याघ्रः श्रीमान् दाशरथिः स्वयम् ।
अङ्‍गुलीयमभिज्ञानं अदात् तुभ्यं यशस्विनि ॥ ९९ ॥
हे यशस्विनी ! पुरुषसिंह दशरथनंदन साक्षात श्रीमान रामांनी खुणेकरितां ओळख पटावी म्हणून ही अंगठीही तुला दिली आहे. ॥९९॥
तदिच्छामि त्वयाज्ञप्तं देवि किं करवाण्यहम् ।
रामलक्ष्मणयोः पार्श्वं नयामि त्वां किमुत्तरम् ॥ १०० ॥
हे देवी ! माझी इच्छा आहे की मी तुझी काय सेवा करू या विषयी तू मला आज्ञा द्यावीस. तू जर सांगितलेस तर मी तुला आत्ता श्रीराम आणि लक्ष्मणाजवळ घेऊन जाईन. याविषयी आपले काय मत आहे ? ॥१००॥
एतच्छ्रुत्वा विदित्वा च सीता जनकनंदिनी ।
आह रावणमुत्पाट्य राघवो मां नयत्विति ॥ १०१ ॥
हे माझे भाषण ऐकून आणि ती खूण ओळखून जनकनंदिनी विचारपूर्वक सीता म्हणाली - माझी इच्छा आहे की राघवाने रावणाचा संहार करून स्वतः मला येथून घेऊन जावे. ॥१०१॥
प्रणम्य शिरसा देवीं अहमार्यामनिंदिताम् ।
राघवस्य मनोह्लादं अभिज्ञानमयाचिषम् ॥ १०२ ॥
तिने असे सांगितल्यावर त्या सती-साध्वी निर्दोष सीतेला, आर्येला मी मस्तक नमवून प्रणाम केला आणि जी पाहून राघवाच्या मनाला आनंद होईल अशी खूणही मी तिच्याजवळ मागितली. ॥१०२॥
अथ मामब्रवीत् सीता गृह्यतामयमुत्तमः ।
मणिर्येन महाबाहू रामस्त्वां बहु मन्यते ॥ १०३ ॥
मी याप्रमाणे खूण मागितल्यावर सीता मला म्हणाली - हा उत्कृष्ट चूडामणि घे. या मण्याच्या योगाने महापराक्रमी राम तुझा विशेष आदर सत्कार करतील. ॥१०३॥
इत्युक्त्वा तु वरारोहा मणिप्रवरमुत्तमम् ।
प्रायच्छत् परमोद्विग्ना वाचा मां संदिदेश ह ॥ १०४ ॥
असे बोलून त्या सुंदरीने ते उत्कृष्ट आणि श्रेष्ठ रत्‍न (तो चूडामणि) माझ्या स्वाधीन केले आणि अत्यंत उद्विग्न होऊन वाणीद्वारा आपला संदेशही सांगितला. (तिने रामाला खूण पटण्यासारखा काही वृत्तांतही मला सविस्तर सांगितला.) ॥१०४॥
ततस्तस्यै प्रणम्याहं राजपुत्र्यैः समाहितः ।
प्रदक्षिणं परिक्रामं इहाभ्युद्‍गतमानसः ॥ १०५ ॥
नंतर मी मनांतल्या मनात इकडे येण्यासाठी उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून राजकुमारी सीतेला प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घातली. ॥१०५॥
उत्तरं पुनरेवाह निश्चित्य मनसा तदा ।
हनुमन् मम वृत्तांतं वक्तुमर्हसि राघवे ॥ १०६ ॥

यथा श्रुत्वैव नचिरात् तावुभौ रामलक्ष्मणौ ।
सुग्रीवसहितौ वीरौ उपेयातां तथा कुरु ॥ १०७ ॥
हे पाहून मनाचा पूर्ण निश्चय करून पुनरपि ती मला म्हणाली - हे हनुमाना ! राघवाला तू माझा पूर्ण वृत्तांत निवेदन कर आणि असा प्रयत्‍न कर की ज्यायोगे सुग्रीवासहित ते दोघे वीरबंधु श्रीराम आणि लक्ष्मण माझी दशा ऐकताच तात्काळ येथे येतील. ॥१०६-१०७॥
यद्यन्यथा भवेद् एतद् द्वौ मासौ जीवितं मम ।
न मां द्रक्ष्यति काकुत्स्थो म्रिये साहमनाथवत् ॥ १०८ ॥
जर यांत अंतर पडेल अथवा काही विपरीत घडेल तर आता माझे जीवित दोनच महिने शेष राहिले आहे. त्यानंतर काकुत्स्थकुलोत्पन्न श्रीरामांच्या मी दृष्टीस पडणे शक्य नाही. एवढ्‍या मुदतीत ते आले नाहीत तर मी अनाथाप्रमाणे येथेच मरून जाईन. ॥१०८॥
तच्छ्रुत्वा करुणं वाक्यं क्रोधो मामभ्यवर्तत ।
उत्तरं च मया दृष्टं कार्यशेषमनंतरम् ॥ १०९ ॥
तिचे हे करूणाजनक वचन ऐकून राक्षसांच्या वरील माझा क्रोध खूपच वाढला आणि आपले अवशिष्ट भावी कार्य काय राहिले आहे या संबंधी मी विचार केला. ॥१०९॥
ततोऽवर्धत मे कायः तदा पर्वतसन्निभः ।
युद्धकाङ्‍क्षी वनं तच्च विनाशयितुमारभे ॥ ११० ॥
तेव्हा माझा देह पर्वतासारखा वाढू लागला आणि मनात युद्धाची इच्छा धरून मी रावणाच्या त्या वनाचा विध्वंस करण्यास आरंभ केला. ॥११०॥
तद्‍भग्नं वनखण्डं तु भ्रांतत्रस्तमृगद्विजम् ।
प्रतिबुद्ध्य निरीक्षंते राक्षस्यो विकृताननाः ॥ १११ ॥
त्या वनाचा विध्वंस होताच तेथे असणारे पशु पक्षी भयभीत झाले आणि तेथील आक्राळ विक्राळ मुद्रा असलेल्या राक्षसस्त्रिया जाग्या होऊन त्या उध्वस्त वनाकडे सैरभैर होऊन पाहू लागल्या. ॥१११॥
मां च दृष्ट्वा वने तस्मिन् समागम्य ततस्ततः ।
ताः समभ्यागताः क्षिप्रं रावणायाचचक्षिरे ॥ ११२ ॥
त्या वनामध्ये मला पाहिल्यावर त्या चोहोकडून जमल्या आणि त्या सर्वांनी मिळून रावणाला वनविध्वंसाचा सर्व वृत्तांत सत्वर निवेदन केला. ॥११२॥
राजन् वनमिदं दुर्गं तव भग्नं दुरात्मना ।
वानरेण ह्यविज्ञाय तव वीर्यं महाबल ॥ ११३ ॥
त्या म्हणाल्या - हे महाबलाढ्‍य राक्षसराजा ! आपल्या सामर्थ्याचा विचार न करता एका दुरात्मा वानराने या दुर्गम प्रमदावनाचा विध्वंस केला आहे. ते उजाड केले आहे. ॥११३॥
तस्य दुर्बुद्धिता राजन् तव विप्रियकारिणः ।
वधमाज्ञापय क्षिप्रं यथासौ न पुनर्व्रजेत् ॥ ११४ ॥
हे महाराज ! ही त्याची दुर्बुद्धि आहे की त्याने आपला अपराध केला आहे. आपण अगदी लवकर त्याच्या वधाची आज्ञा द्यावी. म्हणजे तो परत जीव वाचवून येथून निघून जाणार नाही. ॥११४॥
तच्छ्रुत्वा राक्षसेंद्रेण विसृष्टा बहुदुर्जयाः ।
राक्षसाः किङ्‍करा नाम रावणस्य मनोऽनुगाः ॥ ११५ ॥
हे भाषण ऐकून त्या राक्षसाधिपतीने आपल्या मर्जी प्रमाणे वागणारे असे किंकर नावाचे राक्षस धाडले, ज्यांच्यावर विजय मिळविणे अत्यंत कठीण होते. ॥११५॥
तेषामशीतिसाहस्रं शूलमुद्‍गरपाणिनाम् ।
मया तस्मिन् वनोद्देशे परिघेण निषूदितम् ॥ ११६ ॥
परंतु शूल आणि मुद्‍गर हातात घेऊन आलेल्या त्या ऐंशी हजार राक्षसांचा मी त्या वनप्रदेशात एक परिघाच्या योगाने संहार केला. ॥११६॥
तेषां तु हतशिष्टा ये ते गता लघुविक्रमाः ।
निहतं च मया सैन्यं रावणायाचचक्षिरे ॥ ११७ ॥
त्यांच्यापैकी जे राक्षस वाचले ते सत्वर तेथून पळून गेले. त्यांनी रावणाला माझ्याकडून सर्व सैन्य मारले गेल्याचा वृत्तांत ऐकविला. ॥११७॥
ततो मे बुद्धिरुत्पन्ना चैत्यप्रासादमुत्तमम् ।
तत्रस्थान् राक्षसान् हत्वा शतं स्तंभेन वै पुनः ॥ ११८ ॥

ललामभूतो लङ्‍कायाः स वै विध्वंसितो रुषा ।
नंतर माझ्या मनात एक नवा विचार आला आणि मी रागारागाने लंकेतील सर्वात उत्तम सुंदर भवन असलेल्या, ज्यांत शंभर खांब होते त्या उत्कष्ट चैत्यप्रासादाचा विध्वंस केला आणि तेथील राक्षसांचाही संहार केला. ॥११८ १/२॥
ततः प्रहस्तस्य सुतं जंबुमालिनमादिशत् ॥ ११९ ॥

राक्षसैर्बहुभिः सार्धं घोररूपैर्भयानकैः ।
तेव्हां रावणाने घोर रूप असणार्‍या भयानक अशा असंख्य राक्षसांसह प्रहस्त पुत्र जंबुमाळी याला युद्ध करण्यासाठी जाण्यास आज्ञा दिली. ॥११९ १/२॥
तमहं बलसंपन्नं राक्षसं रणकोविदम् ॥ १२० ॥

परिघेणातिघोरेण सूदयामि सहानुगम् ।
तो राक्षस फारच बलवान आणि युद्धकलेत कुशल होता तरीही मी अत्यंत घोर परिघाने त्याला सेवकांसह यमसदनास धाडले. ॥१२० १/२॥
तच्छ्रुत्वा राक्षसेंद्रस्तु मंत्रिपुत्रान् महाबलान् ॥ १२१ ॥

पदातिबलसंपन्नान् प्रेषयामास रावणः ।
परिघेणैव तान् सर्वान् नयामि यमसादनम् ॥ १२२ ॥
हे ऐकून राक्षसराज रावणाने पायदळ सैन्यासह आपल्या मंत्र्यांच्या पुत्रांना धाडले. ते फार बलवान होते परंतु मी परिघाने त्या सर्वांनाही यमसदनास धाडले. ॥१२१-१२२॥
मंत्रिपुत्रान् हतान् श्रुत्वा समरे लघुविक्रमान् ।
पञ्च सेनाग्रगाञ्छूरान् प्रेषयमास रावणः ॥ १२३ ॥
याप्रमाणे युद्धामध्ये झटपट पराक्रम प्रकट करणार्‍या मंत्री पुत्रांचा वध झाल्याचे एकून रावणाने पाच शूरवीर सेनापतींना धाडले. ॥१२३॥
तानहं सहसैन्यान् वै सर्वानेवाभ्यसूदयम् ।
ततः पुनर्दशग्रीवः पुत्रमक्षं महाबलम् ॥ १२४ ॥

बहुभी राक्षसैः सार्धं प्रेषयामास संयुगे ।
त्या सर्वांनाही मी सैन्यासह ठार मारले तेव्हा दशमुख रावणाने आपला महाबलाढ्‍य पुत्र अक्षकुमार यास पुष्कळ राक्षसांसह युद्धासाठी धाडले. ॥१२४ १/२॥
तं तु मंदोदरीपुत्रं कुमारं रणपण्डितम् ॥ १२५ ॥

सहसा खं समुद्यन्तं पादयोश्च गृहीतवान् ।
तमासीनं शतगुणं भ्रामयित्वा व्यपेषयम् ॥ १२६ ॥
मंदोदरीचा तो पुत्र युद्धकलेत अत्यंत प्रवीण होता. तो एकएकी आकाशात आला तेव्हा मी अचानक त्याचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला शंभर वेळा गरगर फिरवून जमिनीवर आपटले. याप्रमाणे तेथे पडलेल्या अक्षाचे मी चूर्ण करून टाकले. ॥१२५-१२६॥
तमक्षमागतं भग्नं निशम्य स दशाननः ।
ततश्चेंद्रजितं नाम द्वितीयं रावणः सुतम् ॥ १२७ ॥

व्यादिदेश सुसंक्रुद्धो बलिनं युद्धदुर्मदम् ।
अक्षकुमार युद्धभूमीवर आला आणि मारला गेला हे ऐकून दशानन रावण अत्यंत संतापला त्याने आपला दुसरा पुत्र इंद्रजित जो युद्धामध्ये दुर्मद आणि अत्यंत बलवान होता, त्यास (युद्धासाठी) धाडले. ॥१२७ १/२॥
तच्चाप्यहं बलं सर्वं तं च राक्षसपुङ्‍गवम् ॥ १२८ ॥

नष्टौजसं रणे कृत्वा परं हर्षमुपागतः ।
त्याच्या बरोबर आलेल्या सर्व सैन्यासह त्या राक्षसश्रेष्ठाला संग्रामामध्ये सामर्थ्यहीन केल्यावर मला पराकाष्ठेचा हर्ष झाला. ॥१२८ १/२॥
महतापि महाबाहुः प्रत्ययेन महाबलः ॥ १२९ ॥

प्रेषितो रावणेनैष सह वीरैर्मदोद्धतैः ।
रावणाने त्या महापराक्रमी आणि महाबलाढ्‍य वीराला अनेक मदमत्त वीरांसह मोठ्‍या विश्वासाने मजकडे धाडले होते. ॥१२९ १/२॥
सोऽविषह्यं हि मां बुद्ध्वा स्वबलं चावमर्दितम् ॥ १३० ॥

ब्राह्मणोस्त्रेण स तु मां प्रबध्वा चातिवेगिनः ।
रज्जुभिश्चापि बध्नंति ततो मां तत्र राक्षसाः ॥ १३१ ॥
इंद्रजिताने पाहिले की आपली सर्व सेना मारली गेली आहे तेव्हा त्याने जाणले की या वानराचा सामना करणे असंभव आहे. म्हणून त्याने अत्यंत वेगाने ब्रह्मास्त्राने मला बांधून टाकले आणि नंतर इतर राक्षसांनी मला दोर्‍यांनीही जखडून टाकले. ॥१३०-१३१॥
रावणस्य समीपं च गृहीत्वा मामुपागमन् ।
दृष्ट्वा संभाषितश्चाहं रावणेन दुरात्मना ॥ १३२ ॥

पृष्टश्च लङ्‍कागमनं राक्षसानां च तं वधम् ।
तत्सर्वं च रणेया तत्र सीतार्थमुपजल्पितम् ॥ १३३ ॥
याप्रकारे मला पकडून ते सर्व मला रावणासमीप घेऊन गेले. मला पाहिल्यावर त्या दुरात्मा रावणाने संभाषण करण्यास प्रारंभ केला. त्याने विचारले- तू लंकेमध्ये का आलास ? तसेच राक्षसांचा वध तू कां केलास ? तेव्हां तेथे मी उत्तर दिले की हे सर्व काही मी सीतेकरिता केले आहे. ॥१३२-१३३॥
तस्यास्तु दर्शनाकांक्षी प्राप्तस्त्वद्‍भवनं विभो ।
मारुतस्यौरसः पुत्रो वानरो हनुमानहम् ॥ १३४ ॥

रामदूतं च मां विद्धि सुग्रीवसचिवं कपिम् ।
सोऽहं दौत्येन रामस्य त्वत्सकाशमिहागतः ॥ १३५ ॥
हे विभो (प्रभो) ! त्या जनकनंदिनी सीतेच्या दर्शनाच्या इच्छेनेच मी तुझ्या महालात आलो आहे. मी वायुदेवतेचा औरस पुत्र असून जातीने वानर आहे आणि हनुमान हे माझे नाव आहे. मला श्रीरामचंद्रांचा दूत आणि सुग्रीवाचा मंत्री असे तू समज. श्रीरामचंद्रांचे दूतकार्य करण्यासाठी मी येथे तुझ्याकडे आलो आहे. ॥१३४-१३५॥
श्रृणु चापि समादेशं यदहं प्रब्रवीमि ते ।
राक्षसेश हरीशस्त्वां वाक्यमाह समाहितम् ॥ १३६ ॥
हे राक्षसाधिपते ! मी तुला माझ्या स्वामींचा जो संदेश सांगत आहे, तो तू ऐक. वानरराज सुग्रीवाने तुला एकाग्रतापूर्वक (स्वस्थ चित्ताने) जी गोष्ट सांगितली आहे, तिच्याकडे तू लक्ष दे. ॥१३६॥
सुग्रीवश्च महाभागः स त्वां कौशलमब्रवीत् ।
धर्मार्थकामसहितं हितं पथ्यमुवाच ह ॥ १३७ ॥
महाभाग्यवान सुग्रीवाने तुझे कुशल विचारले आहे आणि धर्म, अर्थ आणि काम यांना अनुसरून असलेला आणि तुला हितावह आणि पथ्यकारक निरोप सांगितला आहे. तो असा- ॥१३७॥
वसतो ऋष्यमूके मे पर्वते विपुलद्रुमे ।
राघवो रणविक्रांतो मित्रत्वं समुपागतः ॥ १३८ ॥
जेव्हा मी विपुल वृक्ष असलेल्या ऋष्यमूक पर्वतावर निवास करीत होतो तेव्हा रणात महान पराक्रम प्रकट करणार्‍या राघवाने माझ्याशी मैत्री स्थापित केली आहे. ॥१३८॥
तेन मे कथितं राजन् भार्या मे रक्षसा हृता ।
तत्र साहाय्यहेतोर्मे समयं कर्तुमर्हसि ॥ १३९ ॥
राजन ! तेव्हा त्यांनी मला सांगितले की राक्षस रावणाने माझ्या पत्‍नीचे हरण केले आहे. तिच्या सुटकेच्या (उद्धाराच्या) कार्यात सहाय्य करण्याची तू माझ्या समक्ष प्रतिज्ञा कर. ॥१३९॥
वालिना हृतराज्येन सुग्रीवेण सह प्रभुः ।
चक्रेऽग्निसाक्षिकं सख्यं राघवः सहलक्ष्मणः ॥ १४० ॥
वालीने ज्याचे राज्यहरण केले होते त्या सुग्रीवा बरोबर (अर्थात माझ्याही बरोबर) लक्ष्मणासह भगवान श्रीरामांनी अग्निला साक्ष ठेवून मैत्री केली आहे. ॥१४०॥
तेन वालिनमाहत्य शरेणैकेन संयुगे ।
वानराणां महाराजः कृतः संप्लवतां प्रभुः ॥ १४१ ॥
नंतर संग्रामामध्ये एकाच बाणाने वालीचा वध करून महाराज सुग्रीवाला त्या श्रीरामांनी उड्डाण करणार्‍या वानरांचे महाराज केले आहे. (वानरांचे प्रभुत्व बहाल केले आहे) ॥१४१॥
तस्य साहाय्यमस्माभिः कार्यं सर्वात्मना त्विह ।
तेन प्रस्थापितस्तुभ्यं समीपमिह धर्मतः ॥ १४२ ॥
यामुळे आता आम्हां सर्वांना संपूर्ण अंतःकरणपूर्वक श्रीरामांची सहायता करावयाची आहे. (ते आमचे कर्तव्य जाणून) सुग्रीवाने धर्मानुसार मला तुझ्याकडे पाठविले आहे. ॥१४२॥
क्षिप्रमानीयतां सीता दीयतां राघवस्य च ।
यावन्न हरयो वीरा विधमंति बलं तव ॥ १४३ ॥
त्यांचे सांगणे आहे की या वीर वानरांनी तुझ्या सैन्याचा नाश केला नाही तोपर्यंतच तू सीतेला लवकर परत आणून तिला राघवाच्या स्वाधीन कर. ॥१४३॥
वानराणां प्रभावोऽयं न केन विदितः पुरा ।
देवतानां सकाशं च ये गच्छंति निमंत्रिताः ॥ १४४ ॥
कोण असा वीर आहे की ज्याला वानरांचा हा प्रभाव पूर्वीपासूनच माहीत नाही ? हे तेच वानर आहेत की जे युद्धासाठी निमंत्रित होऊन देवतांजवळही त्यांची सहायता करण्यसाठी जात असतात. ॥१४४॥
इति वानरराजस्त्वां आहेत्यभिहितो मया ।
मामैक्षत ततः रुष्टः चक्षुषा प्रदहन्निव ॥ १४५ ॥
याप्रकारे वानरराज सुग्रीवाने तुला संदेश धाडला आहे. मी इतके सांगताच तो रावण क्रुद्ध होऊन अशा तर्‍हेने माझ्याकडे पाहू लागला की जणु काही आपल्या दृष्टीने मला दग्ध करून टाकत आहे. ॥१४५॥
तेन वध्योऽहमाज्ञप्तो रक्षसा रौद्रकर्मणा ।
मत्प्रभावमविज्ञाय रावणेन दुरात्मना ॥ १४६ ॥
माझा प्रभाव न जाणून भयंकर कर्म करणार्‍या त्या दुरात्मा रावणाने आपल्या सेवकांना माझा वध करण्याविषयी आज्ञा दिली. ॥१४६॥
ततो विभीषणो नाम तस्य भ्राता महामतिः ।
तेन राक्षसराजश्च याचितो मम कारणात् ॥ १४७ ॥
तेव्हा त्याचा परम बुद्धिमान बंधु विभीषण याने माझ्यासाठी राक्षसराज रावणाची प्रार्थना करीत असे म्हटले - ॥१४७॥
नैवं राक्षसशार्दूल त्यज्यतामेष निश्चयः ।
राजशास्त्रव्यपेतो हि मार्गः संलक्ष्यते त्वया ॥ १४८ ॥
हे राक्षसशिरोमणी ! असे करणे उचित नाही आहे. आपण आपला आग्रह सोडा. आपण यावेळी राजनीतिला सोडून विरूद्ध मार्गाने जात आहात. ॥१४८॥
दूतवध्या न दृष्टा हि राजशास्त्रेषु राक्षस ।
दूतेन वेदितव्यं च यथाभिहितवादिना ॥ १४९ ॥
हे राक्षसराज ! राजनीति संबंधी शास्त्रात कोठेही दूताच्या वधाचे विधान नाही आहे. दूत तर तेच सांगत असतो की जसे सांगण्याविषयी त्याला सांगितले जाते. त्याचे कर्तव्यच असते की आपल्या स्वामीच्या अभिप्रायाचे ज्ञान करून द्यावे. ॥१४९॥
सुमहत्यपराधेऽपि दूतस्यातुलविक्रम ।
विरूपकरणं दृष्टं न वधोऽस्ति हि शास्त्रतः ॥ १५० ॥
हे अतुल पराक्रमी रावणा (वीरा) ! दूताने महान अपराध केला तरीही त्याच्या वधाचे विधान शास्त्रात कुठेही आढळत नाही. त्याच्या एखाद्या अंगाचे विरूपीकरण एवढेच फार तर शास्त्रामध्ये सांगितले आहे. ॥१५०॥
विभीषणेनैवमुक्तो रावणः संदिदेश तान् ।
राक्षसानेतदेवाद्य लाङ्‍गूलं दह्यतामिति ॥ १५१ ॥
विभीषणाने असे सांगितल्यावर रावणाने त्या राक्षसांना आज्ञा दिली की ठीक आहे, तर मग आज याचे हे पुच्छ जाळून टाका. ॥१५१॥
ततस्तस्य वचः श्रुत्वा मम पुच्छं समंततः ।
वेष्टितं शणवल्कैश्च पट्टैः कार्पासकैस्तथा ॥ १५२ ॥
त्याची ही आज्ञा ऐकून राक्षसांनी माझ्या पुच्छाला कापसाची चिरगुटे, सुतळीच्या दोर्‍या आणि रेशमी आणि सूती कापडे गुंडाळले. ॥१५२॥
राक्षसाः सिद्धसन्नाहाः ततस्ते चण्डविक्रमाः ।
तदादीप्यन्त मे पुच्छं हनन्तः काष्ठमुष्टिभिः ॥ १५३ ॥
याप्रकारे बांधल्यानंतर त्या प्रचंड पराक्रमी राक्षसांनी काठ्‍या आणि बुक्क्यांचे प्रहार करीत करीत माझे पुच्छ पेटवून दिले. ॥१५३॥
बद्धस्य बहुभिः पाशैः यंत्रितस्य च राक्षसैः ।
न मे पीडाभवत् काचिद् दिदृक्षोर्नगरीं दिवा ॥ १५४ ॥
मला दिवसा लंकापुरी चांगल्या प्रकारे पहाण्याची इच्छा होती म्हणून राक्षसांनी अनेक दोर्‍यांनी मला आवळून बांधलेले असूनही मला काहीही पीडा झाली नाही. ॥१५४॥
ततस्ते राक्षसाः शूरा बद्धं मामग्निसंवृतम् ।
अघोषयन् राजमार्गे नगरद्वारमागताः ॥ १५५ ॥
नंतर त्या शूरवीर राक्षसांनी मला बांधून, अग्नीने प्रदीप्त झालेल्या माझ्या पुच्छासह मला फिरवीत, माझ्या अपराधासंबंधी दवंडी पिटविली आणि नगराच्या द्वाराशी मला ते घेऊन आले. ॥१५५॥
ततोऽहं सुमहद्‍रूपं संक्षिप्य पुनरात्मनः ।
विमोचयित्वा तं बंधं प्रकृतिस्थः स्थितः पुनः ॥ १५६ ॥
तेव्हा आपले ते विशाल रूप संकुचित करून मी आपल्या स्वतःला त्या बंधनातून सोडवून घेतले आणि नंतर आपल्या स्वाभाविक रूपात मी तेथे उभा राहिलो. ॥१५६॥
आयसं परिघं गृह्य तानि रक्षांस्यसूदयम् ।
ततस्तन् नगरद्वारं वेगेन प्लुतवानहम् ॥ १५७ ॥
नंतर त्या द्वारावर ठेवलेला लोखंडी परिघ उचलून मी त्या सर्व राक्षसांना त्याने ठार केले आणि मोठ्‍या वेगाने मी त्या नगराच्या द्वारावर उडी मा रून चढलो. ॥१५७॥
पुच्छेन च प्रदीप्तेन तां पुरीं साट्टगोपुराम् ।
दहाम्यहमसंभ्रांतो युगांताग्निरिव प्रजाः ॥ १५८ ॥
त्यानंतर समस्त प्रजेला दग्ध करणार्‍या प्रलयाग्नी प्रमाणे मी अत्यंत निर्भयतेने अट्टालिका, गच्च्या आणि गोपुरे यांसह त्या नगरीला आपल्या पेटलेल्या पुच्छाच्या आगीने दग्ध करू लागलो. ॥१५८॥
विनष्टा जानकी व्यक्तं न ह्यदग्धः प्रदृश्यते ।
लङ्‍कायाः कश्चिदुद्देशः सर्वा भस्मीकृता पुरी ॥ १५९ ॥

दहता च मया लङ्‍कां दग्धा सीता न संशयः ।
रामस्य हि महत् कार्यं मयेदं विफलीकृतम् ॥ १६० ॥
नंतर मी विचार करू लागलो की सर्व लंकानगरी जळून खाक झाली आहे. लंकेतील कोणताही प्रदेश न जळलेला शिल्लक राहिलेला नाही. तेव्हा अवश्यच जानकीचाही नाश झालाच असणार. यात जराही संशय नाही की लंकेला जाळता जाळता माझ्याकडून सीताही दग्ध झाली आहे आणि यामुळे भगवान श्रीरामाच्या या महान कार्याला मी निष्फळ केले आहे. ॥१५९-१६०॥
इति शोकसमाविष्टः चिन्तामहमुपागतः ।
ततोऽहंहं वाचमश्रौषं चारणानां शुभाक्षराम् ॥ १६१ ॥

जानकी न च दग्धेति विस्मयोदंतभाषिणाम् ।
याप्रमाणे शोकाकुल होऊन मी काळजीत पडलो, इतक्यात आश्चर्ययुक्त वृत्तांताचे वर्णन करणार्‍या चारणांची शुभ अक्षरांनी विभूषित ही वाणी माझ्या कानावर पडली की जानकी या आगीत दग्ध झाली नाही. ॥१६१ १/२॥
ततो मे बुद्धिरुत्पन्ना श्रुत्वा तामद्‍भुतां गिरम् ॥ १६२ ॥

अदग्धा जानकीत्येवं निमित्तैश्चोपलक्षितम् ।
दीप्यमाने तु लाङ्‍गूले न मां दहति पावकः ॥ १६३ ॥

हृदयं च प्रहृष्टं मे वाताः सुरभिगंधिनः ।
ही अद्‍भुत वाणी ऐकून माझ्या मनात असा विचार उत्पन्न झाला - शुभ शकुनांवरून ही असेच वाटत आहे की जानकी दग्ध झालेली नाही. कारण पुच्छाला आग लावली जाऊन ही अग्निदेव मला जाळीत नाहीत. माझ्या हृदयात अत्यंत हर्ष भरून राहिला आहे आणि उत्तम सुगंधानेयुक्त मंद मंद वारा वहात आहे. ॥१६२-१६३ १/२॥
तैर्निमित्तैश्च दृष्टार्थैः कारणैश्च महागुणैः ॥ १६४ ॥

ऋषिवाक्यैश्च सिद्धार्थैः अभवं हृष्टमानसः ।
ज्या शकुनांच्या फळाचा मला पूर्वी प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे त्या उत्तम शकुनांच्यामुळे, महान गुणशाली कारणांमुळे आणि ऋषींनी (चारणांनी) प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींच्यामुळे ही सीता सकुशल आहे असा विश्वास उत्पन्न होऊन माझे मन हर्षाने भरून गेले. ॥१६४ १/२॥
पुनर्दृष्ट्वा च वैदेहीं विसृष्टश्च तया पुनः ॥ १६५ ॥

ततः पर्वतमासाद्य तत्रारिष्टमहं पुनः ।
प्रतिप्लवनमारेभे युष्मद्दर्शनकाङ्‍क्षया ॥ १६६ ॥
त्यानंतर मी पुन्हा वैदेहीचे दर्शन घेतले आणि परत तिचा निरोप घेऊन मी अरिष्ट पर्वतावर आलो. तेथून तुम्हा सर्वांच्या दर्शनाच्या इच्छेने मी परत उलट उड्डाण करण्यास प्रारंभ केला. ॥१६५-१६६॥
ततः श्वसनचंद्रार्क सिद्धगंधर्वसेवितम् ।
पंथानमहमाक्रम्य भवतो दृष्टवानिह ॥ १६७ ॥
त्यानंतर वायु, चंद्र, सूर्य, सिद्ध आणि गंधर्व यांनी सेवित आकाशमार्गाचा आश्रय घेऊन मी येथे येऊन आपले सर्वांचे दर्शन घेतले आहे. ॥१६७॥
राघवस्य प्रसादेन भवतां चैव तेजसा ।
सुग्रीवस्य च कार्यार्थं मया सर्वमनुष्टितम् ॥ १६८ ॥
श्रीरामचंद्रांच्या कृपेने आणि तुम्हां सर्वांच्या प्रभावाने सुग्रीवाच्या कार्यसिद्धिसाठी मी हे सर्व कार्य केले आहे. ॥१६८॥
एतत् सर्वं मया तत्र यथावदुपपादितम् ।
अत्र यन्न कृतं शेषं तत् सर्वं क्रियतामिति ॥ १६९ ॥
हे सर्व कार्य मी तेथे यथोचित रूपाने संपन्न केले आहे. आता जे कार्य केलेले नाही अथवा शेष राहिले आहे, ते सर्व कार्य आपण सर्वजण पूर्ण करा. ॥१६९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुंदरकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील सुंदरकाण्डाचा अठ्‍ठावन्नावा सर्ग पूर्ण झाला. ॥५८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP