॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ द्वितीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]शरभंग तसेच सुतीक्ष्ण इत्यादी मुनीश्वरांची भेट -


श्रीमहादेव उवाच
विराधे स्वर्गते रामो लक्ष्मणेन च सीतया ।
जगाम शरभङ्‌गस्य वनं सर्वसुखावहम् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, विराध स्वर्गाला गेल्यानंतर, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीरामचंद्र सर्व सुखे देणार्‍या शरभंगाच्या तपोवनात गेले. (१)

शरभङ्‌गस्ततो दृष्ट्‍वा रामं सौमित्रिणा सह ।
आयान्तं सीतया सार्धं सम्भ्रमादुत्थितः सुधीः ॥ २ ॥
तेव्हा लक्ष्मण आणि सीता यांच्यासह येणार्‍या श्रीरामांना पाहून, फार बुद्धिमान असणारे शरभंग मुनी लगबगीने उठून उभे राहिले. (२)

अभिगम्य सुसम्पूज्य विष्टरेषूपवेशयत् ।
आतिथ्यमकरोत्तेषां कन्दमूलफलादिभिः ॥ ३ ॥
त्यांच्या स्वागतासाठी पुढे जाऊन आणि त्यांची चांगल्याप्रकारे पूजा करून मुनींनी त्यांना आसनांवर बसविले. मग कंद, मुळे, फळे, इत्यादींच्या द्वारा त्यांनी त्यांचे आतिथ्य केले. (३)

प्रीत्याह शरभङ्‌गोऽपि रामं भक्तिपरायणम् ।
बहुकालमिहैवासं तपसे कृतनिश्चयः ॥ ४ ॥
तव सन्दर्शनाकाङ्‌क्षी राम त्वं परमेश्वरः ।
अद्य मत्तपसा सिद्धं यत्पुण्यं बहु विद्यते ।
तत्सर्वं तव दास्यामि ततो मुक्तिं व्रजाम्यहं ॥ ५ ॥
नंतर भक्तपरायण रामाला शरभंग प्रेमाने म्हणाले, "हे रामा, तुमच्या दर्शनाची इच्छा करीत, तपस्या करण्याचा निश्चय करून, मी पुष्कळ काळ येथेच राहिलो आहे. हे रामा, तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. माझ्या तपस्येने जे पुष्कळ पुण्य मला प्राप्त झाले आहे, ते सगळे आज मी तुम्हांला अर्पण करून, मोक्षाप्रत जातो." (४-५)

समर्प्य रामस्य महत्सुपुण्य-
     फलं विरक्तः शरभङ्‌गयोगी ।
चितिं समारोहयदप्रमेयं
     रामं ससीतं सहसा प्रणम्य ॥ ६ ॥
असे बोलून महाविरक्त असणार्‍या योगिश्रेष्ठ शरभंगांनी आपल्या उत्कृष्ट पुण्याचे महान फळ श्रीरामचंद्रांना अर्पण करून, सीतेसहित असणार्‍या अप्रमेय भगवान रामांना प्रणाम केला व ते लगेच चितेवर चढले. (६)

ध्यायंश्चिरं राममशेषहृत्स्थं
     दूर्वादलश्यामलमम्बुजाक्षम् ।
चीराम्बरं स्निग्धजटाकलापं
     सीतासहायं सहलक्ष्मणं तम् ॥ ७ ॥
त्या वेळी सर्वांतर्यामी, दूर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण, कमलनयन, वल्कल धारण करणार्‍या, कोमल जटाकलाप असणार्‍या, सीता व लक्ष्मण यांच्यासह असणार्‍या श्रीरामचंद्रांचे शरभंगांनी बराच वेळ ध्यान केले. (७)

को वा दयालुः स्मृतकामधेनु-
     रन्यो जगत्यां रघुनायकादहो ।
स्मृतो मया नित्यमनन्यभाजा
     ज्ञात्वा स्मृतिं मे स्वयमेव यातः ॥ ८ ॥
ते म्हणाले "अहो ! या जगात श्रीरघुनाथाशिवाय, स्मरण केल्यावर कामधेनूप्रमाणे असणारा दुसरा कोण दयाळू पुरुष आहे ? अनन्य भावाने मी त्यांचे नित्य स्मरण केलेले होते. माझे स्मरण जाणून ते स्वतःच येथे आले. (८)

पश्यत्विदानीं देवेशो रामो दाशरथिः प्रभुः ।
दग्ध्वा स्वदेहं गच्छामि ब्रह्मलोकमकल्मषः ॥ ९ ॥
देवांचा ईश्वर, अशा दशरथनंदन श्रीरामांची दृष्टी आता मजकडे राहू दे. त्यांच्या देखत मी स्वतःचा देह जाळून घेऊन आणि निष्पाप होऊन ब्रह्मलोकी जातो. (९)

अयोध्याधिपतिर्मेऽस्तु हृदये राघवः सदा ।
यद्वामाङ्‌के स्थिता सीता मेघस्येव तडिल्लता ॥ १० ॥
मेघातील विजेप्रमाणे ज्यांच्या डाव्या माडीवर सीता विराजमान आहे असे अयोध्येचे स्वामी श्रीराम सदा माझ्या हृदयात राहू देत." (१०)

इति रामं चिरं ध्यात्वा दृष्ट्‍वा च पुरतः स्थितम् ।
प्रज्वाल्य सहसा वह्निं दग्ध्वा पञ्चात्मकं वपुः ॥ ११ ॥
अशा प्रकारे पुष्कळ वेळ रामांचे ध्यान करून तसेच पुढे उभे असणार्‍या श्रीरामांना पाहात पाहात मुनिश्रेष्ठ शरभंगांनी तत्काळ अग्नी प्रज्वलित करून, आपले पांचभौतिक शरीर जाळून टाकले. (११)

दिव्यदेहधरः साक्षाद्ययौ लोकपतेः पदम् ।
ततो मुनिगणाः सर्वे दण्डकारण्यवासिनः ।
आजग्मू राघवं द्रष्टुं शरभङ्‌गनिवेशनम् ॥ १२ ॥
आणि दिव्य देह धारण करून, श्रीरामांच्या देखत ते साक्षात प्रजापती ब्रह्मदेवांच्या स्थानी गेले. त्या वेळी दंडकारण्यात राहाणारे मुनिगण श्रीरामांना भेटण्यासाठी शरभंगमुनींच्या आश्रमस्थानी आले. (१२)

दृष्ट्‍वा मुनिसमूहं तं जानकीरामलक्ष्मणाः ।
प्रणेमुः सहसा भूमौ मायामानुषरूपिणः ॥१३ ॥
त्या मुनिसमूहाला पाहून, माया-मानव-रूप धारण करणार्‍या सीता, श्रीराम व लक्ष्मण यांनी जमिनीवर मस्तक ठेवून त्यांना आदराने प्रणाम केला. (१३)

आशीर्भिरभिनन्द्याथ रामं सर्वहृदि स्थितम् ।
ऊचुः प्राञ्जलयः सर्वे धनुर्बाणधरं हरिम् ॥ १४ ॥
तेव्हा सर्वांच्या अंतर्यामी श्रीरामांचे आशीर्वादपूर्वक अभिनंदन करून, ते मुनी हात जोडून, धनुष्य व बाण धारण करणार्‍या श्रीहरीला म्हणाले. (१४)

भूमेर्भारावताराय जातोऽसि ब्रह्मणार्थितः ।
जानीमस्त्वां हरिं लक्ष्मीं जानकीं लक्ष्मणं तथा ॥ १५ ॥
शेषांशं शङ्‌खचक्रे द्वे भरतं सानुजं तथा ।
अतश्चादौ ऋषीणां त्वं दुःखं भोक्तुमिहार्हसि ॥ १६ ॥
"ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावर भूमीचा भार उतरविण्यासाठी तुम्ही अवतार धारण केला आहे. आम्हास माहीत आहे की तुम्ही साक्षात् विष्णू आहात, जानकी ही लक्ष्मी आहे, लक्ष्मण शेषाचा अंश आहे, तसेच भरत व त्याचा भाऊ शत्रुघ्न हे दोघे शंख व चक्र आहेत. आणि म्हणून प्रथम तुम्ही ऋषींचे दुःख दूर करा. (१५-१६)

आगच्छ यामो मुनिसेवितानि
     वनानि सर्वाणि रघूत्तम क्रमात् ।
द्रष्टुं सुमित्रासुतजानकीभ्यां
     तदा दयास्मासु दृढा भविष्यति ॥ १७ ॥
हे रघुश्रेष्ठा, या. लक्ष्मण व जानकी यांच्यासह तुम्ही आणि आम्ही मुनींनी सेवन केलेली सर्व वने पाहाण्यास क्रमाक्रमाने जाऊ या. या वेळी असे केल्याने आमच्यावर मोठी दया होईल." (१७)

इति विज्ञापितो रामः कृताञ्जलिपुटैर्विभुः ।
जगाम मुनिभिः सार्धं द्रष्टुं मुनिवनानि सः ॥ १८ ॥
अशा प्रकारे हात जोडून मुनींनी विनंती केल्यावर, सर्वव्यापक भगवान् श्रीराम मुनींची तपोवने पाहाण्यास निघाले (१८)

ददर्श तत्र पतितान्यनेकानि शरांसि सः ।
अस्थिभूतानि सर्वत्र रामो वचनमब्रवीत् ॥ १९ ॥
सगळीकडे अस्थिरूप होऊन पडलेली अनेक मस्तके त्यांनी पाहिली. तेव्हा श्रीरामांनी विचारले. (१९)

अस्थीनि केषामेतानि किमर्थं पतितानि वै ।
तमूचुर्मुनयो राम ऋषीणां मस्तकानि हि ॥ २० ॥
"कुणाची हाडे आहेत ही ? ती येथे का पडलेली आहेत ?" तेव्हा मुनी त्यांना म्हणाले, " हे श्रीरामा, या ऋषींच्या कवट्या आहेत. (२०)

राक्षसैर्भक्षितानीश प्रमत्तानां समाधितः ॥
अन्तरायं मुनीनां ते पश्यन्तोऽनुचरन्ति हि ॥ २१ ॥
हे ईश्वरा, ती मस्तके राक्षसांनी खाल्लेली आहेत. मुनींना समाधीमध्ये जेव्हा बाह्य भान नसते. तेव्हा संधी मिळताच त्यांना भक्षण करण्यासाठी राक्षस इकडे फिरत असतात." (२१)

श्रुत्वा वाक्यं मुनीनां स भयदैन्यसमन्वितम् ।
प्रतिज्ञामकरोद्‍रामो वधायाशेषरक्षसाम् ॥ २२ ॥
भय आणि दीनपणा यांनी युक्त असे मुनींचे वाक्य ऐकल्यावर, संपूर्ण राक्षसांचा वध करण्याची प्रतिज्ञा श्रीरामांनी केली. (२२)

पूज्यमानः सदा तत्र मुनिभिर्वनवासिभिः ।
जानक्या सहितो रामो लक्ष्मणेन समन्वितः ॥ २३ ॥
उवास कतिचित्तत्र वर्षाणि रघुनन्दनः ।
एवं क्रमेण संपश्यनृषीणामाश्रमान्विभुः ॥ २४ ॥
तेथे वनात राहाणार्‍या मुनींचेकडून पूजा स्वीकारत, श्रीराम हे जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह क्रमाक्रमाने ऋषींचे आश्रम पाहात पाहात काही वर्षे तेथेच राहिले. (२३-२४)

सुतीक्ष्णस्याश्रमं प्रागात्प्रख्यातमृषिसङ्‌कुलम् ।
सर्वर्तुगुणसम्पन्नं सर्वकालसुखावहम् ॥ २५ ॥
त्यानंतर श्रीराम सुतीक्ष्णाच्या प्रख्यात आश्रमात गेले. तो आश्रम ऋषींनी गजबजलेला, सर्व ऋतूंच्या गुणांनी संपन्न आणि सर्व काळी सुखकारक होता. (२५)

राममागतमाकर्ण्य सुतीक्ष्णः स्वयमागतः ।
अगस्त्यशिष्यो रामस्य मंत्रोपासनतत्परः ।
विधिवत्पूजयामास भक्त्युत्कण्ठितलोचनः ॥ २६ ॥
श्रीराम आले आहेत हे ऐकल्यावर, श्रीराममत्राची उपासना रण्यात तत्पर असणारे, अगस्ती ऋषींचे शिष्य, सुतीक्श्ण स्वतःच श्रीरामांकडे आले आणि भक्तीने उत्कंठित नेत्रांनी त्यांनी श्रीरामांची विधिवत पूजा केली. (२६)

सुतीक्ष्ण उवाच
त्वन्मंत्रजाप्यहमनन्तगुणाप्रमेय
     सीतापते शिवविरिञ्चिसमाश्रिताङ्‌घ्रे ।
संसारसिन्धुतरणामलपोतपाद
     रामाभिराम सततं तव दासदासः ॥ २७ ॥
सुतीक्ष्ण म्हणाले-"अनंत गुण असणार्‍या आणि अप्रमेय अशा हे सीतापते, मी तुमच्या नामाचा मंत्र जपत असतो. ज्यांच्या चरणांचा शिव आणि ब्रह्मदेव यांनी आश्रय घेतला आहे आणि ज्याचे पाय संसार-सागर तरून जाण्यास सुदृढ नौका आहेत, अशा मनोहर, श्यामसुंदर श्रीरामा, मी सतत तुमच्या दासांचा दास आहे. (२७)

मामद्य सर्वजगतामविगोचरस्त्वं
     त्वन्मायया सुतकलत्रगृहान्धकूपे ।
मग्नं निरीक्ष्य मलपुद्‍गलपिण्डमोह-
     पाशानुबद्धहृदयं स्वयमागतोऽसि ॥ २८ ॥
संपूर्ण जगातील प्राण्यांच्या इंद्रियांना तुम्ही गोचर नाही. तुमच्या मायेमुळे मोहित होऊन पुत्र, पत्‍नी, घर इत्यादी रूपात असणार्‍या काळ्याकुट्ट कूपात पडलेल्या, आणि मल, मत्र इत्यादींचा गोळा असणार्‍या शरीराच्या मोहपाशाने ज्यांचे मन बद्ध झाले आहे अशा या मला पाहून, हे श्री रामा, आज तुम्ही आपणहूनच (तुमचे पुण्यदर्शन देण्यास) माझ्याकडे आला आहात. (२८)

त्वं सर्वभूतहृदयेषु कृतालयोऽपि
     त्वन्मंत्रजाप्यविमुखेषु तनोषि मायाम् ।
त्वन्मंत्रसाधनपरेष्वपयाति माया
     सेवानुरूपफलदोऽसि यथा महीपः ॥२९ ॥
सर्व भूतांच्या हृदयांत तुमचे निवासस्थान आहे. तथापि तुमच्या नावाच्या मंत्राचा जप करण्यापासून जे विमुख आहेत त्यांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या मायेने मोह निर्माण करता. तुमच्या नामाच्या मंत्राचा जप करण्याच्या साधनात तत्पर असणार्‍या प्राण्यांपासून तुमची माया दूर पळते. अशा प्रकारे एखाद्या राजाप्रमाणे सेवेला अनुसरून सर्वांना असे फळ देणारे तुम्ही आहात. (२९)

विश्वस्य सृष्टिलयसंस्थितिहेतुरेक-
     स्त्वं मायया त्रिगुणया विधिरीशविष्णू ।
भासीश मोहितधियां विविधाकृतिस्त्वं
     यद्वद्‌‍रविः सलिलपात्रगतो ह्यनेकः ॥ ३० ॥
हे ईश्वरा, या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांचे एक मात्र कारण तुम्हीच आहात. तथापि स्वतःच्या त्रिगुणात्मक मायेमुळे तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या रूपांनी भासता. ज्याप्रमाणे अनेक भांड्यातील पाण्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य अनेक वाटतो, त्या प्रमाणे ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे अशा पुरुषांना तुम्ही (मनुष्य, पशू पक्षी इत्यादी) नाना प्रकारच्या आकृती रूपांत प्रचीतीस येता. (३०)

प्रत्यक्षतोऽद्य भवतश्चरणारविन्दं
     पश्यामि राम तमसः परतः स्थितस्य ।
दृग्‌रूपतस्त्वमसतामविगोचरोऽपि
     त्वन्मंत्रपूतहृदयेषु सदा प्रसन्नः ॥ ३१ ॥
हे श्रीरामा, अंधकाराच्या - अज्ञानाच्या - पलीकडे असणार्‍या तुमचे चरणकमल मी आज प्रत्यक्षच पाहात आहे. सर्वाचा द्रष्टा हे जरी तुमचे रूप आहे तरी दुराचारी पुरुषांना तुम्ही गोचर नाही. या उलट तुमच्या नामाच्या मंत्राच्या जपाने ज्यांचे मन शुद्ध झाले आहे, त्यांच्या ठिकाणी तुम्ही सदा प्रसन्नरूपाने असता. (३१)

पश्यामि राम तव रूपमरूपिणोऽपि
     मायाविडम्बनकृतं सुमनुष्यवेषम् ।
कन्दर्पकोटिसुभगं कमनीयचाप-
     बाणं दयार्द्रहृदयं स्मितचारुवक्त्रं ॥ ३२ ॥
हे श्रीरामा, जरी तुम्ही रूपरहित आहात तरी मायेच्या विलासाने निर्माण झालेले, माणसाचा सुंदर वेष धारण केलेले तुमचे रूप मी पाहात आहे. हे रूप कोट्यवधी मदनाप्रमाणे कांतिमान आहे. या तुमच्या रूपाने सुंदर धनुष्य आणि बाण धारण केले आहेत. या रूपाच्या हृदयात दयेचा ओलावा आहे, आणि स्मितामुळे मुख सुंदर दिसत आहे. (३२)

सीतासमेतमजिनाम्बरमप्रधृष्यं
     सौमित्रिणा नियतसेवितपादपद्मम् ।
नीलोत्पलद्युतिमनन्तगुणं प्रशान्तं
     मद्‌भागधेयमनिशं प्रणमामि रामं ॥ ३३ ॥
जे सीतेसहित आहेत, ज्यांनी मृगाजिन धारण केले आहे, जे नेहमी अजेय आहेत, ज्यांचे चरणकमळ लक्ष्मणाकडून नियमितपणे सेविले जातात, नीलकमलाप्रमाणे ज्यांची प्रभा आहे, ज्यांच्याजवळ अनंत गुण आहेत, जे अत्यंत शांत आहेत, आणि जे माझे सौभाग्यच आहे, अशा त्या श्रीरामांना मी नेहमी प्रणाम करतो. (३३)

जानन्तु राम तव रूपमशेषदेश-
     कालाद्युपाधिरहितं घनचित्प्रकाशं ।
प्रत्यक्षतोऽद्य मम गोचरमेतदेव
     रूपं विभातु हृदये न परं विकाङ्‌क्षे ॥ ३४ ॥
"हे श्रीराम, सर्व देश आणि काल यांच्या उपाधींनी रहित आणि चिद्‌घन प्रकाश असणारे तुमचे रूप जाणणारे जे आहेत ते तसेच जाणोत. परंतु आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांपुढे जे हे तुमचे रूप आहे तेच माझ्या हृदयात प्रकाशित होऊन राहो. याशिवाय माझी अन्य कोणतीही इच्छा नाही. " (३४)

इत्येवं स्तुवस्तस्य रामः सुस्मितमब्रवीत् ।
मुने जानामि ते चित्तं निर्मलं मदुपासनात् ॥ ३५ ॥
अशा प्रकारे तो सुतीक्ष्ण स्तुती करीत असताना श्रीरामचंद्र स्मितपूर्वक त्यांना म्हणाले, "हे मुने, माझ्या उपासनेमुळे तुमचे चित्त निर्मळ झाले आहे, हे मला माहीत आहे. (३५)

अतोऽहमागतो द्रष्टुं मदृते नान्यसाधनम् ।
मन्मंत्रोपासका लोके मामेव शरणं गताः ॥ ३६ ॥
निरपेक्षा नान्यगताः तेषां दृश्योऽहमन्वहम् ।
स्तोत्रमेतत्पठेद्यस्तु त्वत्कृतं मत्प्रियं सदा ॥ ३७ ॥
सद्‌भक्तिर्मे भवेत्तस्य ज्ञानं च विमलं भवेत् ।
त्वं मामोपासनादेव विमुक्तोऽसीह सर्वतः ॥ ३८ ॥
तुमची माझ्यावर अनन्य भक्ती आहे आणि माझ्याखेरीज तुम्हांला अन्य कोणतेही साधन नाही. म्हणून तुम्हांला भेटण्यास मी आलो आहे. या जगात जे पुरुष माझ्या नाममंत्राचे उपासक आहेत, जे मलाच शरण आलेले आहेत, जे निरपेक्ष आणि अनन्यगतिक आहेत त्यांना मी दररोज दिसतो. तुम्ही केलेले आणि मला प्रिय असणारे हे स्तोत्र जो माणूस सदा पठण करील, त्याची माझ्या ठिकाणी शुद्ध भक्ती निर्माण होईल. आणि त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. केवळ माझ्या उपासनेमुळेच तुम्ही या जगात संपूर्णपणे मुक्त होऊन गेला आहात. (३६-३८)

देहान्ते मम सायुज्यं लप्स्यसे नात्र संशयः ।
गुरुं ते द्रष्टुमिच्छामि ह्यगस्त्यं मुनिनायकम् ।
किञ्चित्कालं तत्र वस्तुं मनो मे त्वरयत्यलम् ॥ ३९ ॥
तुमचा देहान्त झाल्यावर तुम्हाला माझे सायुज्य पद प्राप्त होईल, यात संशय नाही. आता तुमचे गुरू व मुनिश्रेष्ठ असे जे अगस्त्य ऋषी त्यांना भेटण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्याजवळ काही काळ राहाण्यास माझे मन फारच उत्सुक आहे." (३९)

सुतीक्ष्णोऽपि तथेत्याह श्वो गमिष्यसि राघव ।
अहमप्यागमिष्यामि चिराद् दृष्टो महामुनिः ॥ ४० ॥
सुतीक्ष्ण म्हणाले, "ठीक आहे. हे राघवा, उद्या तुम्ही त्यांच्याजवळ जा. मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन. कारण त्या महामुनींना पाहून बराच काळ झाला." (४०)

अथ प्रभाते मुनिना समेतो
     रामः ससीतः सह लक्ष्मणेन ।
अगस्त्यसम्भाषणलोलमानसः
     शनैरगस्त्यानुजमन्दिरं ययौ ॥ ४१ ॥
नंतर दुसरे दिवशी प्रभात काळी, सीता व लक्ष्मण यांना बरोबर घेऊन, त्या सुतीक्ष्ण मुनीसह, अगस्त्यांशी संभाषण करण्यास उत्सुक असलेल्या मनाने, श्रीराम सावकाशपणे अगस्त्याच्या धाकट्या भावाच्या ( अग्निजिव्हाच्या) आश्रमाकडे निघाले. (४१)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकांडे द्वितीय सर्गः ॥ २ ॥


GO TOP