[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षोडशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणेन हेमन्त-ऋतोर्वर्णनं, भरतस्य प्रशंसनं श्रीरामस्य लक्ष्मणेन सीतया च सह गोदावर्यां स्नानम् -
लक्ष्मण द्वारा हेमंत ऋतुचे वर्णन आणि भरताची प्रशंसा तसेच श्रीरामांचे त्या दोघांसह गोदावरी नदी मध्ये स्नान -
वसतस्तस्य तु सुखं राघवस्य महात्मनः ।
शरद्व्यपाये हेमन्त ऋतुरिष्टः प्रवर्तत ॥ १ ॥
महात्मा राघवाला त्या आश्रमात राहून शरद ऋतु निघून गेला आणि प्रिय हेमंताचे आगमन झाले. ॥१॥
स कदाचित्प्रभातायां शर्वर्यां रघुनन्दनः ।
प्रययावभिषेकार्थं रम्यां गोदावरीं नदीम् ॥ २ ॥
एक दिवस प्रातःकाळी रघुनंदन श्रीराम स्नान करण्यासाठी परम रमणीय गोदावरी नदीच्या तटावर गेले. ॥२॥
प्रह्वः कलशहस्तस्तु सीतया सह वीर्यवान् ।
पृष्ठतोऽनुव्रजन् भ्राता सौमित्रिमिदमब्रवीत् ॥ ३ ॥
त्यांचे लहान भाऊ ही जे अत्यंत विनीत आणि पराक्रमी होते, सीतेच्या बरोबरच हातात घडा घेऊन त्यांच्या पाठोपाठ गेले. जाता जाताच ते श्रीरामचंद्रांना या प्रकारे बोलले- ॥३॥
अयं स कालः सम्प्राप्तः प्रियो यस्ते प्रियंवद ।
अलङ्‌कृत इवाभाति येन संवत्सरः शुभः ॥ ४ ॥
’प्रिय वचन बोलणार्‍या बंधु श्रीरामा ! हा तोच हेमंतकाळ येऊन पोहोंचला आहे जो आपल्याला अधिक प्रिय आहे आणि ज्याच्या योगे हा शुभ संवत्सर अलंकृत झाल्याप्रमाणे प्रतीत होत आहे. ॥४॥
नीहारपरुषो लोकः पृथिवी सस्यमालिनी ।
जलान्यनुपभोग्यानि सुभगो हव्यवाहनः ॥ ५ ॥
’या ऋतुमध्ये अधिक थंडीमुळे किंवा धुक्यामुळे लोकांचे शरीर कोरडे होऊन जाते. पृथ्वीवर रब्बीची शेती बहरू लागते. जल अधिक शीतल असल्याने पिण्यायोग्य राहात नाही आणि अग्नि (उष्णता) फार प्रिय वाटू लागते. ॥५॥
नवाग्रयणपूजाभिरभ्यर्च्य पितृदेवताः ।
कृताग्रयणकाः काले सन्तो विगतकल्मषाः ॥ ६ ॥
’नवसस्येष्टि कर्माच्या या वेळेमध्ये नूतन अन्न ग्रहण करण्यासाठी केल्या जाणार्‍या आग्रयण कर्मरूपी पूजांच्या द्वारे देवता आणि पितर यांना संतुष्ट करून उक्त आग्रयण कर्माचे संपादन करणारे सत्पुरुष निष्पाप झाले आहेत. ॥६॥
प्राज्यकामा जनपदाः सम्पन्नतरगोरसाः ।
विचरन्ति महीपाला यात्रार्थं विजिगीषवः ॥ ७ ॥
या ऋतुमध्ये प्रायः सर्व जनपदांच्या निवासी लोकांच्या अन्न प्राप्तिविषयक कामना प्रचुररूपाने पूर्ण होऊन जातात. गोरसाचीही विपुलता असते तसेच विजयाची इच्छा ठेवणारे भूपालगण युद्ध-यात्रेसाठी विचरत राहातात. ॥७॥
सेवमाने दृढं सूर्ये दिशमन्तकसेविताम् ।
विहीनतिलकेव स्त्री नोत्तरा दिक् प्रकाशते ॥ ८ ॥
’सूर्यदेव या दिवसात यमसेवित दक्षिणदिशेचे दृढतापूर्वक सेवन करू लागले आहेत. म्हणून उत्तरदिशा सिंदुरबिंदु पासून वञ्चित झालेल्या नारीप्रमाणे सुशोभित अथवा प्रकाशित होत नाही आहे. ॥८॥
प्रकृत्या हिमकोशाढ्यो दूरसूर्यश्च साम्प्रतम् ।
यथार्थनामा सुव्यक्तं हिमवान् हिमवान् गिरिः ॥ ९ ॥
’हिमालय पर्वत तर स्वभावानेच घनीभूत हिमाच्या खजिन्याने भरलेला असतो परंतु या समयी सूर्यदेवही दक्षिणायनामध्ये निघून गेल्याने त्याच्या पासून दूर झालेले आहेत म्हणून आता अधिक हिमाच्या संचयाने संपन्न होऊन हिमवान गिरि स्पष्टच आपल्या नामास सार्थक करीत आहे. ॥९॥
अत्यन्तसुखसंचारा मध्याह्ने स्पर्शतः सुखाः ।
दिवसाः सुभगादित्याश्छायासलिलदुर्भगाः ॥ १० ॥
’मध्याह्नकाळी ऊन्हाचा स्पर्श झाल्याने हेमंताचे सुखमय दिवस अत्यंत सुखाने इकडे तिकडे विचरण करण्यास योग्य होतात. या दिवसात सुसेव्य होण्यामुळे सूर्यदेव सौभाग्यशाली वाटू लागतात आणि सेवन करण्यास योग्य न होण्यामुळे छाया आणि जल अभागी प्रतीत होतात. ॥१०॥
मृदुसूर्याः सुनीहाराः पटुशीताः समारुताः ।
शून्यारण्या हिमध्वस्ता दिवसा भान्ति साम्प्रतम् ॥ ११ ॥
’आजकालचे दिवस असे आहेत की सूर्याच्या किरणांचा स्पर्श कोमल (प्रिय वाटतो आहे. धुके फार पडत आहे; थंडी जोराची पडत आहे; सर्दी सबल होत आहे. याच बरोबर थंड वारे वहात आहेत. धुके पडण्यामुळे पाने गळून पडत आहेत त्यामुळे जंगल ओसाड दिसत आहे, आणि हिमाच्या स्पर्शाने कमळे कोमजून जात आहेत. ॥११॥
निवृत्ताकाशशयनाः पुष्यनीता हिमारुणाः ।
शीता वृद्धतरायामास्त्रियामा यान्ति साम्प्रतम् ॥ १२ ॥
’या हेमंत कालात रात्री मोठ्या होत आहेत. यात सरदी फारच वाढत आहे. खुल्या आकाशाखाली कुणी झोपत नाही. पौष महिन्यातील या रात्री हिमपातामुळे धूसर प्रतीत होत आहेत. ॥१२॥
रविसङ्‌क्रान्तसौभाग्यस्तुषारारुणमण्डलः ।
निःश्वासान्ध इवादर्शश्चन्द्रमा न प्रकाशते ॥ १३ ॥
’हेमंतकाळात चंद्रम्याने सौभाग्य सूर्यदेवाकडे निघून गेले आहे. (चंद्रमा गारठ्यामुळे असेव्य आणि सूर्य मंद रश्मिमुळे सेव्य झाला आहे.) चंद्रमण्डल हिमकणांनी आच्छन्न होऊन धूमिळ भासत आहे; म्हणून चंद्रदेव निःश्वास वायुने मलिन झालेल्या दर्पणा प्रमाणे प्रकाशित होत नाही आहे. ॥१३॥
ज्योत्स्ना तुषारमलिना पौर्णमास्यां न राजते ।
सीतेव चातपश्यामा लक्ष्यते न तु शोभते ॥ १४ ॥
’या दिवसात पौर्णिमेंची चांदणी रात्र ही दवबिंदुंमुळे मलिन दिसत आहे- प्रकाशित होत नाही. ज्याप्रमाणे सीता ही अधिक उन्हामुळे सांवळीशी दिसत आहे - पूर्वी प्रमाणे शोभून दिसत नाही. ॥१४॥
प्रकृत्या शीतलस्पर्शो हिमविद्धश्च साम्प्रतम् ।
प्रवाति पश्चिमो वायुः काले द्विगुणशीतलः ॥ १५ ॥
’स्वभावाने जिच्या स्पर्श शीतल आहे ती पश्चिमेकडील हवा या समयी हिमकणांनी व्याप्त झाल्यामुळे दुप्पट गारव्यासह अति वेगाने वहात आहे. ॥१५॥
बाष्पच्छन्नान्यरण्यानि यवगोधूमवन्ति च ।
शोभन्तेऽभ्युदिते सूर्ये नदद्‌भिः क्रौञ्चसारसैः ॥ १६ ॥
’जव आणि गव्हाच्या शेतांनी युक्त ही बहुसंख्य वने वाफेने (वाष्पाने) झाकली गेली आहेत. तसेच क्रौंच आणि सारस त्यांच्यात कलरव करीत आहेत. सूर्योदयाच्या वेळी या वनांची मोठी शोभा दिसून येत आहे. ॥१६॥
खर्जूरपुष्पाकृतिभिः शिरोभिः पूर्णतण्डुलैः ।
शोभन्ते किञ्चिदालम्बाः शालयः कनकप्रभाः ॥ १७ ॥
’ही सोनेरी रंगाची पूर्ण भरलेली धान्याची कणसे खजूराच्या फुलाच्या आकाराच्या त्यांच्या तुर्‍यांनी, ज्यात तांदूळ भरलेले आहेत. काहींशी लोंबत आहेत. या तुर्‍यांमुळे त्यांची फार शोभा दिसत आहे. ॥१७॥
मयूखैरुपसर्पद्‌भिर्हिमनीहारसंवृतैः ।
दूरमभ्युदितः सूर्यः शशाङ्‌क इव लक्ष्यते ॥ १८ ॥
’धुक्यात लपलेला आणि पसरणार्‍या किरणांनी उपलक्षित होणारा दूरोदित सूर्य चंद्रम्या प्रमाणे दिसून येत आहे. ॥१८॥
अग्राह्यवीर्यः पूर्वाह्णे मध्याह्ने स्पर्शतः सुखः ।
संरक्तः किञ्चिदापाण्डुरातपः शोभते क्षितौ ॥ १९ ॥
’या समयी अधिक लाल आणि काहीसे श्वेत, पीत वर्णाचे ऊन पृथ्वीवर पसरून फार शोभून दिसत आहे. पूर्वाह्न कालात तर त्याचे काहीच बल दिसून येत नाही. परंतु मध्याह्नकालात त्याच्या स्पर्शाने सुखाचा अनुभव येतो. ॥१९॥
अवश्यायनिपातेन किञ्चित्प्रक्लिन्नशाद्‌वला ।
वनानां शोभते भूमिर्निविष्टतरुणातपा ॥ २० ॥
’दवबिंदु पडल्याने काही काही ठिकाणचे गवत जरा जरा भिजलेले दिसून येत आहे. ही वनभूमि नवोदित सूर्याचे ऊन्हाचा प्रवेश झाल्यावर अद्‍भुत शोभा प्राप्त करीत आहे. ॥२०॥
स्पृशन् सुविपुलं शीतमुदकं द्विरदः सुखम् ।
अत्यन्ततृषितो वन्यः प्रतिसंहरते करम् ॥ २१ ॥
’हा जंगली हत्ती खूप तहानलेला आहे. तो सुखपूर्वक तहान शमविण्यासाठी अत्यंत शीतल जलाचा स्पर्श तर करतो आहे परंतु त्या पाण्याचा गारठा असह्य होण्यामुळे आपली सोंड तात्काळ संकुचित करून घेत आहे. ॥२१॥
एते हि समुपासीना विहगा जलचारिणः ।
नावगाहन्ति सलिलमप्रगल्भा इवाहवम् ॥ २२ ॥
’हे जलचर पक्षी जलाच्या जवळच बसले आहेत परंतु ज्यांप्रमाणे भित्रा मनुष्य युद्धभूमीत प्रवेश करीत नाही त्याप्रमाणेच ते पाण्यात उतरत नाही आहेत.’ ॥२२॥
अवश्यायतमोनद्धा नीहारतमसावृताः ।
प्रसुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः ॥ २३ ॥
’रात्री दवबिंदुनी आणि अंधकाराने आच्छादित तसेच प्रातःकाळी धुक्याच्या अंधाराने झाकल्या गेलेल्या या पुष्पहीन वनश्रेणी जणु झोपी गेल्या प्रमाणे दिसून येत आहे. ’ ॥२३॥
बाष्पसञ्छन्नसलिला रुतविज्ञेयसारसाः ।
हिमार्द्रवालुकैस्तीरैः सरितो भान्ति साम्प्रतम् ॥ २४ ॥
’या समयी नद्यांचे जल वाफेने झांकले गेले आहे. यात विचरणारे सारस केवळ आपल्या कलरवाने ओळखले जात आहेत. तसेच या नद्या ही दवांनी भिजलेल्या वाळूनी युक्त आपल्या तटांमुळे ही प्रकाशात येत आहेत. (त्यांच्या जलामुळे नाही.)’ ॥२४॥
तुषारपतनाच्चैव मृदुत्वाद् भास्करस्य च ।
शैत्यादगाग्रस्थमपि प्रायेण रसवज्जलम् ॥ २५ ॥
बर्फ पडल्यामुळे आणि सूर्य किरणांच्या मंद होण्यामुळे, अधिक गारठ्यामुळे या दिवसात पर्वताच्या शिखरावर पडलेले जलही प्रायः स्वादिष्ट प्रतीत होत आहे. ॥२५॥
जराजर्जरितैः पत्रैः शीर्णकेसरकर्णिकैः ।
नालशेषा हिमध्वस्त्वा न भान्ति कमलाकराः ॥ २६ ॥
’जी जुनी झाल्याने जर्जर झाली आहेत, ज्यांच्या कर्णिका आणि केसर जीर्ण शीर्ण होऊन गेले आहेत असे दलांनी उपलक्षित होणारे कमलांचे समूह धुके पडल्यामुळे गळून गेले आहेत त्यांच्या मधील देठ तेवढे शेष (शिल्लक) राहिले आहेत. त्यामुळे त्यांची शोभा नष्ट झाली आहे. ॥२६॥
अस्मिंस्तु पुरुषव्याघ्रः काले दुःखसमन्वितः ।
तपश्चरति धर्मात्मा त्वद्‌भक्त्या भरतः पुरे ॥ २७ ॥
’पुरुषसिंह श्रीराम ! या समयी धर्मात्मा भरत आपल्यासाठी फार दुःखी आहे आणि आपल्या ठिकाणी भक्ती ठेवून नगरातच तपस्या करीत आहे. ॥२७॥
त्यक्त्वा राज्यं च मानं च भोगांश्च विविधान् बहून् ।
तपस्वी नियताहारः शेते शीते महीतले ॥ २८ ॥
’ते राज्य, मान तसेच नाना प्रकारचे बहुसंख्य भोगांचा परित्याग करुन तपस्येत संलग्न आहेत. तसेच नियमित आहार करीत राहून या शीतल महीतलावर बिछान्या शिवायच (अंथरूणाशिवायच) शयन करीत आहेत. ॥२८॥
सोऽपि वेलामिमां नूनं अभिषेकार्थमुद्यतः ।
वृतः प्रकृतिभिर्नित्यं प्रयाति सरयूं नदीम् ॥ २९ ॥
’निश्चितच भरतही या वेळी स्नानासाठी उद्यत होऊन मंत्री आणि प्रजाजनांसह प्रतिदिन शरयू नदीच्या तटावर जात असतील. ’॥२९॥
अत्यन्तसुखसंवृद्धः सुकुमारः हिमार्दितः ।
कथं त्वपररात्रेषु सरयूमवगाहते ॥ ३० ॥
’अत्यंत सुखात वाढलेले सुकुमार भरत थंडीचे कष्ट सहन करीत रात्रीच्या शेवटच्या प्रहरात कसे शरयूच्या जलात डुबकी मारत असतील ?’ ॥३०॥
पद्मपत्रेक्षणः श्यामः श्रीमान् निरुदरो महान् ।
धर्मज्ञः सत्यवादी च ह्रीनिषेवो जितेन्द्रियः ॥ ३१ ॥

प्रियाभिभाषी मधुरो दीर्घबाहुररिंदमः ।
सन्त्यज्य विविधान् सौख्यानार्यं सर्वात्मनाश्रितः ॥ ३२ ॥
’ज्यांचे नेत्र कमलदला प्रमाणे शोभून दिसतात, ज्यांची अङ्‌गकांती श्याम आहे आणि ज्यांच्या उदराचा तर काही पत्ताच लागत नाही, असे महान धर्मज्ञ, सत्यवादी, लज्जाशील, जितेन्द्रिय, प्रिय वचन बोलणारे, मृदुल स्वभावाचे महाबाहु शत्रुदमन श्रीमान् भरत नाना प्रकारच्या सुखांचा त्याग करून सर्वथा आपलाच आश्रय ग्रहण करून राहिले आहेत. ’॥३१-३२॥
जितः स्वर्गस्तव भ्रात्रा भरतेन महात्मना ।
वनस्थमपि तापस्ये यस्त्वामनुविधीयते ॥ ३३ ॥
आपले बंधु महात्मा भरत यांनी निश्चितच परलोकावर विजय प्राप्त केला आहे. कारण ते देखील तपस्येत स्थित असून आपल्यासारखेच वनवासी जीवन व्यतीत करीत आहेत. ॥ ३३ ॥
न पित्र्यमनुवर्तन्ते मातृकं द्विपदा इति ।
ख्यातो लोकप्रवादोऽयं भरतेनान्यथा कृतः ॥ ३४ ॥
’मनुष्य प्रातः मातेच्या गुणांचेच अनुवर्तन करतो, पित्याच्या नाही, या लौकिक उक्तिला भरतांनी आपल्या वर्तनाने मिथ्या प्रमाणित केले आहे. ॥ ३४ ॥
भर्ता दशरथो यस्याः साधुश्च भरतः सुतः ।
कथं नु साम्बा कैकेयी तादृशी क्रूरदर्शिनी ॥ ३५ ॥
’महाराज दशरथ जिचे पती आहेत आणि भरता सारखा साधु जिचा पुत्र आहे ती माता कैकेयी क्रूरतापूर्ण दृष्टीवाली कशी झाली ?’ ॥३५॥
इत्येवं लक्ष्मणे वाक्यं स्नेहाद् वदति धार्मिके ।
परिवादं जनन्यास्तमसहन् राघवोऽब्रवीत् ॥ ३६ ॥
धर्मपरायण लक्ष्मण जेव्हा स्नेहवश याप्रकारे सांगत होते त्यासमयी श्रीरामचंद्रांना माता कैकेयीची निंदा सहन झाली नाही. त्यांनी लक्ष्मणास म्हटले- ॥३६॥
न तेऽम्बा मध्यमा तात गर्हितव्या कदाचन ।
तामेवेक्ष्वाकुनाथस्य भरतस्य कथां कुरु ॥ ३७ ॥
’तात ! तुम्ही मधली माता कैकेयीची निंदा करता कामा नये. (जर काही बोलायचेच असेल तर) पहिल्या प्रमाणे इक्ष्वाकुवंशाचे स्वामी भरत यांचीच चर्चा करा.’ ॥३७॥
निश्चितैव हि मे बुद्धिर्वनवासे दृढव्रता ।
भरतस्नेहसन्तप्ता बालिशीक्रियते पुनः ॥ ३८ ॥
’यद्यपि माझी बुद्धि दृढतापूर्वक व्रताचे पालन करीत वनात राहाण्याचाच निश्चय करून चुकली आहे’ तथापि भरताच्या स्नेहाने संतप्त होऊन पुन्हा चञ्चल होत आहे. ॥३८॥
संस्मराम्यस्य वाक्यानि प्रियाणि मधुराणि च ।
हृद्यान्यमृतकल्पानि मनः प्रह्लादनानि च ॥ ३९ ॥
’मला भरताच्या त्या परम प्रिय, मधुर, मनाला आवडणार्‍या आणि अमृतासमान हृदयाला आल्हाद प्रदान करणार्‍या गोष्टी आठवत आहेत.’ ॥३९॥
कदा ह्यहं समेष्यामि भरतेन महात्मना ।
शत्रुघ्नेन च वीरेण त्वया च रघुनन्दन ॥ ४० ॥
’रघुनंदन लक्ष्मणा ! तो दिवस कधी येईल, की जेव्हा मी तुझ्यासह जाऊन महात्मा भरत आणि वीरवर शत्रुघ्नास भेटेन ?’ ॥४०॥
इत्येवं विलपंस्तत्र प्राप्य गोदावरीं नदीम् ।
चक्रेऽभिषेकं काकुत्स्थः सानुजः सह सीतया ॥ ४१ ॥
या प्रकारे विलाप करीत असलेल्या काकुत्स्थकुलभूषण भगवान श्रीरामानी लक्ष्मण आणि सीतेसह गोदावरी नदीच्या तटावर जाऊन स्नान केले. ॥४१॥
तर्पयित्वाथ सलिलैस्तैः पितॄन् दैवतानपि ।
स्तुवन्ति स्मोदितं सूर्यं देवताश्च तथानघाः ॥ ४२ ॥
तेथे स्नान करून त्यांनी गोदावरीच्या जलाने देवता आणि पितरांचे तर्पण केले. त्यानंतर जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा त्या तीन्ही निष्पाप व्यक्ती भगवान सूर्याचे उपस्थान करून अन्य देवतांची ही स्तुती करू लागल्या. ॥४२॥
कृताभिषेकः स रराज रामः
सीताद्वितीयः सह लक्ष्मणेन ।
कृताभिषेकस्त्वगरापुत्र्या
रुद्रः सनन्दिर्भगवानिवेशः ॥ ४३ ॥
सीता आणि लक्ष्मणासह स्नान करून भगवान श्रीराम, पर्वतराज कन्या उमा आणि नंदीसह गङ्‌गेत अवगाहन करून भगवान रूद्र जसे सुशोभित होतात तसे शोभू लागले. ॥४३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP