श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ अष्टादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वालिनो वचनस्योत्तरं ददता श्रीरामेण तस्मै दत्तस्य दण्डस्य यथौचित्यं सिद्ध्येत्तथा प्रतिपादनं स्वापराध क्षमामभ्यर्थयता निरुत्तरेण वालिनाङ्‌गद रक्षार्थं प्रार्थनाकरणं श्रीरामेण तस्मै सांत्वना प्रदानं च - श्रीरामांनी वालीच्या बोलण्यावर उत्तर देतांना त्याला दिला गेलेल्या दण्डाचे औचित्य सांगणे, वालीचे निरूत्तर होऊन भगवंताकडे आपल्या अपराधासाठी क्षमा मागून अंगदाच्या रक्षणासाठी प्रार्थना करणे आणि श्रीरामांनी त्यास आश्वासन देणे -
इत्युक्तः प्रश्रितं वाक्यं धर्मार्थसहितं हितम् ।
परुषं वालिना रामो निहतेन विचेतसा ॥ १ ॥

तं निष्प्रभमिवादित्यं मुक्ततोयमिवांबुदम् ।
उक्तवाक्यं हरिश्रेष्ठमुपशांतमिवानलम् ॥ २ ॥

धर्मार्थगुणसंपन्नं हरीश्वरमनुत्तमम् ।
अधिक्षिप्तस्तदा रामः पश्चाद्वालिमब्रवीत् ॥ ३ ॥
तेथे मारला जाऊन अचेत होणार्‍या वालीने जेव्हा या प्रकारे विनयाभास, धर्माभास, अर्थाभास आणि हिताभासांनी युक्त कठोर गोष्टी सांगितल्या, आक्षेप घेतले तेव्हा त्या गोष्टी सांगून मौन झालेल्या वानरश्रेष्ठ वालीला श्रीरामांनी धर्म, अर्थ आणि श्रेष्ठ गुणांनी युक्त परम उत्तम गोष्ट सांगितली. त्या समयी वाली प्रभावहीन सूर्य, जलहीन ढग आणि विझलेल्या आगीप्रमाणे श्रीहीन प्रतीत होत होता. ॥१-३॥
धर्ममथ च कामं च समयं चापि लौकिकम् ।
अविज्ञाय कथं बाल्यान्मामिहाद्य विगर्हसे ॥ ४ ॥
(श्रीराम म्हणाले- ) ’वानरा ! धर्म, अर्थ, काम आणि लौकिक सदाचाराला तर तू स्वतः सुद्धा जाणत नाहीस, मग बालोचित अविवेकामुळे आज येथे माझी निंदा का करीत आहेस ? ॥४॥
अपृष्ट्‍वा बुद्धिसंपन्नान् वृद्धानाचार्यसम्मतान् ।
सौम्य वानरचापल्यात्किं मां वक्तुमिहेच्छसि ॥ ५ ॥
’सौम्य ! तू आचार्यांच्या द्वारा सन्मानित बुद्धिमान् वृद्ध पुरुषांना न विचारतांच - त्यांच्याकडून धर्माचे स्वरूप उत्तम प्रकारे समजावून न घेताच वानरोचित चपलतावश मला येथे उपदेश करू इच्छित आहेस ? अथवा माझ्यावर आक्षेप करण्याची इच्छा ठेवत आहेस. ॥५॥
इक्ष्वाकूणामियं भूमिः सशैलवनकानना ।
मृगपक्षिमनुष्याणां निग्रहानुग्रहेष्वपि ॥ ६ ॥
’पर्वत, वन आणि काननांनी युक्त ही सारी पृथ्वी इक्ष्वाकुवंशी राजांची आहे. म्हणून ते तेथील पशु-पक्षी आणि मनुष्यांवर दया करण्यास अगर त्यांना दण्ड देण्यासही अधिकारी आहेत. ॥६॥
तां पालयति धर्मात्मा भरतः सत्यवागृजुः ।
धर्मकामार्थतत्त्वज्ञो निग्रहानुग्रहे रतः ॥ ७ ॥
’धर्मात्मा राजा भरत या पृथ्वीचे पालन करीत आहेत. ते सत्यवादी, सरळ तसेच धर्म, अर्थ आणि काम यांच्या तत्वाला जाणणारे आहेत, म्हणून दुष्टांचा निग्रह तसेच साधु पुरुषांच्या प्रति अनुग्रह करण्यात तत्पर राहातात. ॥७॥
नयश्च विनयश्चोभौ यस्मिन् सत्यं च सुस्थितम् ।
विक्रमश्च यथादृष्टः स राजा देशकालवित् ॥ ८ ॥
ज्याच्या ठिकाणी नीति, विनय, सत्य आणि पराक्रम आदि सर्व राजोचित गुण यथावत्-रूपामध्ये स्थित असलेले दिसतात, तोच देश-काल तत्त्व जाणणारा राजा होत असतो. (भरतामध्ये हे सर्व गुण विद्यमान आहेत.) ॥८॥
तस्य धर्मकृतादेशा वयमन्ये च पार्थिवाः ।
चरामो वसुधां कृत्स्नां धर्मसंतानमिच्छवः ॥ ९ ॥
’भरताकडून आम्हाला तसेच दुसर्‍या राजांनाही हा आदेश प्राप्त आहे की जगतात धर्माच्या पालनासाठी आणि प्रसारासाठी यत्‍न केले जावेत. म्हणून आम्ही लोक धर्माचा प्रसार करण्याच्या इच्छेने सर्व पृथ्वीवर विचरत राहातो. ॥९॥
तस्मिन्नृपतिशार्दूले भरते धर्मवत्सले ।
पालयत्यखिलां भूमिं कश्चरेद् धर्मविप्रियम् ॥ १० ॥
’राजांमध्ये श्रेष्ठ भरत धर्मावर अनुराग ठेवणारे आहेत. ते संपूर्ण पृथ्वीचे पालन करीत आहेत. ते असतांना या पृथ्वीवर कुठला प्राणी धर्माच्या विरूद्ध आचरण करू शकतो ? ॥१०॥
ते वयं धर्मविभ्रष्टं स्वधर्मे परमे स्थिताः ।
भरताज्ञां पुरस्कृत्य निगृह्णीमो यथाविधि ॥ ११ ॥
’आम्ही सर्व लोक आपल्या श्रेष्ठ धर्मात दृढतापूर्वक स्थित राहून भरताच्या आज्ञेला समोर ठेवून धर्ममार्गापासून भ्रष्ट पुरुषाला विधिपूर्वक दण्ड देतो. ॥११॥
त्वं तु सङ्‌क्लि्ष्टधर्मा च कर्मणा च विगर्हितः ।
कामतंत्रप्रधानश्च न स्थितो राजवर्त्मनि ॥ १२ ॥
तुम्ही आपल्या जीवनात कामालाच प्राधान्य दिले आहे. राजोचित मार्गावर तुम्ही कधी स्थिर राहिला नाही. तुम्ही सदाच धर्माला बाधा पोहोचविली आहे आणि वाईट कर्मामुळे सत्पुरुषांच्या द्वारा सदा तुमची निंदा केली गेली आहे. ॥१२॥
ज्येष्ठो भ्राता पिता चैव यश्च विद्यां प्रयच्छति ।
त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मे पथि हि वर्तिनः ॥ १३ ॥
’मोठा भाऊ, पिता तसेच जो विधि देतो तो गुरू- हे तिन्ही धर्ममार्गावर स्थित राहाणार्‍या पुरुषांसाठी पित्याच्या तुल्य माननीय आहेत असे समजले पाहिजे. ॥१३॥
यवीयानात्मनः पुत्रः शिष्यश्चापि गुणोदितः ।
पुत्रवत्ते त्रयश्चिंत्या धर्मश्चेदत्र कारणम् ॥ १४ ॥
त्याच प्रकारे लहान भाऊ, पुत्र आणि गुणवान् शिष्य हे तीन्ही पुत्राच्या तुल्य समजणे योग्य आहे, त्यांच्या प्रति असा भाव ठेवण्यात धर्मच कारण आहे. ॥१४॥
सूक्ष्मः परमदुर्ज्ञेयः सतां धर्मः प्लवंगम ।
हृदिस्थः सर्वभूतानामात्मा वेद शुभाशुभम् ॥ १५ ॥
’वानरा ! सज्जनांचा धर्म सूक्ष्म असतो, तो परम दुर्ज्ञेय आहे; त्याला समजणे अत्यंत कठीण आहे. समस्त प्राण्यांच्या अंतःकरणात विराजमान जो परमात्मा आहे तोच सर्वांच्या शुभ आणि अशुभास जाणतो. ॥१५॥
चपलश्चपलैः साध वानरैरकृतात्मभिः ।
जात्यंध इव जात्यंधैर्मंत्रयन् द्रक्ष्यसे नु किम् ॥ १६ ॥
’तू स्वतःही चपल आहेस आणि चंचल चित्त असणार्‍या अजितात्मा वानरांच्या बरोबर राहात आहेस. म्हणून जसा कोणी जन्मांध पुरुष जन्मांधालाच रस्ता विचारील, त्याप्रकारे तुम्ही त्या चपल वानरांशी (विचार) परामर्श करता, मग तुम्ही धर्माचा विचार काय करू शकाल ?- त्याचे स्वरूप कसे समजू शकता ? ॥१६॥
अहं तु व्यक्ततामस्य वचनस्य ब्रवीमि ते ।
न हि मां केवलं रोषात्त्वं विगर्हितुमर्हसि ॥ १७ ॥
’मी येथे जे काही सांगितले आहे, त्याचा अभिप्राय तुम्हांला स्पष्ट करून सांगतो. तू केवळ रोषाला वश होऊन माझी निंदा करता कामा नये. ॥१७॥
तदेतत्कारणं पश्य यदथ त्वं मया हतः ।
भ्रातुर्वर्तसि भार्यायां त्यक्त्वा धर्मं सनातनम् ॥ १८ ॥
’मी तुला का मारले आहे, याचे कारण ऐक आणि समजून घे. तू सनातन धर्माचा त्याग करून आपल्या लहान भावाच्या स्त्रीशी सहवास करीत आहेस. ॥१८॥
अस्य त्वं धरमाणस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
रुमायां वर्तसे कामात् स्नुषायां पापकर्मकृत् ॥ १९ ॥
या महात्मा सुग्रीवाच्या हयातीतच त्यांची पत्‍नी रूमा, जी तुझ्या पुत्रवधुप्रमाणे आहे, तिचा कामवश उपभोग करीत आहेस; म्हणून पापाचारी आहेस. ॥१९॥
तद्व्यतीतस्य ते धर्मात्कामवृत्तस्य वानर ।
भ्रातृभार्यावमर्शे ऽस्मिन् दण्डो ऽयं प्रतिपादितः ॥ २० ॥
’वानरा ! याप्रकारे तू धर्मभ्रष्ट होऊन स्वेच्छाचारी झाला आहेस आणि आपल्या भावाच्या स्त्रीला हृदयाशी धरीत आहेस. तुझ्या या अपराधासाठीच तुला हा दंड देण्यात आला आहे. ॥२०॥
नहि धर्मविरुद्धस्य लोकवृत्तादपेयुषः ।
दण्डादन्यत्र पश्यामि निग्रहं हरियूथप ॥ २१ ॥
’वानरराज ! जो लोकाचारापासून भ्रष्ट होऊन लोकविरूद्ध आचरण करतो, त्याला रोखण्यासाठी मी दंडाशिवाय दुसरा कुठला उपाय पाहात नाही. ॥२१॥
न हि ते मर्षये पापं क्षइत्रयो ऽहं कुलोद्‌भावः ।
औरसीं भगिनीं वापि भार्यां वाप्यनुजस्य यः ॥ २२ ॥

प्रचरेत नरः कामात्तस्य दण्डो वधः स्मृतः ।
’मी उत्तम कुळात उत्पन्न क्षत्रिय आहे, म्हणून मी तुझ्या पापाची क्षमा करू शकत नाही. जो पुरुष आपली कन्या, बहीण अथवा लहान भावाची पत्‍नी यांच्याजवळ कामबुद्धिने जातो त्याचा वध करणे हाच त्याच्यासाठी उपयुक्त दंड मानला गेला आहे. ॥२२ १/२॥
भरतस्तु महीपालो वयं त्वादेशवर्तिनः ॥ २३ ॥

त्वं तु धर्मादतिक्रांतः कथं शक्य उपेक्षितुम् ।
’आमचे राजे भरत आहेत. आम्ही लोक तर केवळ त्यांच्या आदेशाचे पालन करणारे आहोत. तू धर्मापासून च्युत झाला आहेस म्हणून तुझी उपेक्षा कशी केली जाईल ? ॥२३ १/२॥
गुरुर्धर्मव्यतिक्रांतं प्राज्ञो धर्मेण पालयन् ॥ २४ ॥

भरतः कामवृत्तानां निग्रहे पर्यवस्थितः ।
’विद्वान् राजा भरत महान् धर्मापासून भ्रष्ट झालेल्या पुरुषाला दण्ड देतात आणि धर्मात्मा पुरुषाचे धर्मपूर्वक पालन करीत असता कामासक्त स्वेच्छाचारी पुरुषांच्या निग्रहात तत्पर राहात असतात. ॥२४ १/२॥
वयं तु भरतादेशं विधिं कृत्वा हरीश्वर ।
त्वद्विधान् भिन्नमर्यादान् निग्रहितुं व्यवस्थिताः ॥ २५ ॥
’हरीश्वर ! आम्ही लोक तर भरताची आज्ञाच प्रमाण मानून धर्ममर्यादेचे उल्लंघन करणार्‍या तुमच्या सारख्या लोकांना दंड देण्यासाठी उद्यत राहतो. ॥२५॥
सुग्रीवेण च मे सख्यं लक्ष्मणेन यथा तथा ।
दारराज्यनिमित्तं च निःश्रेयसि रतः स मे ॥ २६ ॥

प्रतिज्ञा च मया दत्ता तदा वानरसंनिधौ ।
प्रतिज्ञा च कथं शक्या मद्विधेनानवेक्षितुम् ॥ २७ ॥
’सुग्रीवाबरोबर माझी मैत्री झाली आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनांत तोच भाव आहे जो लक्ष्मणाप्रति आहे. ते आपली स्त्री आणि राज्यप्राप्तीसाठी, माझे हित करण्यासाठी कटिबद्ध आहेत. मी वानरांच्या सान्निध्यात त्यांना स्त्री आणि राज्य देण्यासाठी प्रतिज्ञा केली आहे. अशा स्थितित माझ्या सारखा मनुष्य आपल्या प्रतिज्ञेवरून दृष्टि कशी ढळू देऊ शकेल ? ॥२६-२७॥
तदेभिः कारणैः सर्वैर्महद्‌भिदर्धर्मसंहितैः ।
शासनं तव यद्युक्तं तद् भवाननुमन्यताम् ॥ २८ ॥
’ही सर्व धर्मानुकूल महान् कारणे एकाच वेळी उपस्थित झाली आहेत ज्या योगे विवश होऊन तुला उचित दंड द्यावा लागला आहे. तूही याचे अनुमोदन कर. ॥२८॥
सर्वथा धर्म इत्येव द्रष्टव्यस्तव निग्रहः ।
वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता ॥ २९ ॥
’धर्मावर दृष्टि ठेवणार्‍या मनुष्यासाठी मित्रावर उपकार करणे धर्म मानला गेला आहे, म्हणून तुला जो दंड दिला गेला आहे, तो धर्माच्या अनुकूल आहे; असेच तू समजले पाहिजेस. ॥२९॥
शक्यं त्वयापि तत्कार्यं धर्ममेवानुपश्यता ।
श्रूयते मनुना गीतौ श्लोकौ चारित्रवत्सलौ ।
गृहीतौ धर्मकुशलैः तथा तच्चरितं मया ॥ ३० ॥
’जर राजा होऊन तू धर्माचे अनुसरण करीत असतास तर तुलाही तेच काम करावे लागले असते, जे मी केले आहे. मनुने राजोचित सदाचाराचे प्रतिपादन करणारे दोन श्व्लोक सांगितले आहेत, जे स्मृतीमध्ये ऐकण्यात येतात आणि ज्यांचा धर्मपालनात कुशल पुरुषांनी सादर स्वीकार केला. त्यांच्या अनुसार या समयी हे माझे आचरण झाले आहे. ते श्व्लोक याप्रकारे आहेत- ॥३०॥
राजभिर्धृतदण्डास्तु कृत्वा प्रापानि मानवाः ।
निर्मलाः स्वर्गमायांति संतः सुकृतिनो यथा ॥ ३१ ॥

शासनाद्वा विमोक्षाद्वा स्तेनः स्तेयाद्विमुच्यते ।
राजा त्वशासनात् पापं तदवाप्नोति किल्बिषम् ॥ ३२ ॥
’मनुष्ये पाप करून जर राजांनी दिलेला दंड भोगत असेल तर तो शुद्ध होऊन पुण्यात्मा साधु पुरुषांच्या प्रमाणे स्वर्गलोकात जातात. चोर आदि पापी जेव्हा राजाच्या समोर उपस्थित होतात त्यावेळी त्यांना राजाने दंड करावा अथवा दया करून सोडून द्यावे. चोर आदि पापी पुरुष आपल्या पापांतून मुक्त होऊन जातात परंतु जर राजाने पाप्याला उचित दंड दिला नाही तर त्याला स्वतःला त्याच्या पापाचे फळ भोगावे लागते. ॥**॥ ॥३१-३२॥
(॥**॥- मनुस्मृतिमध्ये हे दोन श्व्लोक किंचित पाठभेदाने याप्रकारे मिळतात -
राजाभिः कृतदण्डास्तु कृत्वा पापानि मानवाः ।
निर्मलाः स्वर्गमायान्ति संतः सुकृतिनो यथा ॥
शासनाद वा विमोक्षाद वा स्तनः स्तेयात्विमुच्यते।
अशासित्वा तु तं राजा स्तेतस्याप्नोति किल्विषम्॥ (८/३१८, ३१६)
आर्येण मम मांधात्रा व्यसनं घोरमीप्सितम् ।
श्रमणेन कृते पापे यथा पापं कृतं त्वया ॥ ३३ ॥
’तू जसे पाप केले आहेस तसेच पाप प्राचीन काळी एका श्रमणाने केले होते. त्याला माझे पूर्वज महाराज मांधातानी मोठा कठोर दण्ड दिला होता जो शास्त्रास अनुसरून अभिष्ट होता. ॥३३॥
अन्यैरपि कृतं पापं प्रमत्तैर्वसुधाधिपैः ।
प्रायश्चित्तं च कुर्वंति तेन तच्छाम्यते रजः ॥ ३४ ॥
’जर राजांनी दंड देण्यात प्रमाद केला तर त्यांना दुसर्‍यांनी केलेले पापही भोगावे लागते तसेच त्यासाठी जेव्हा ते प्रायश्चित्त करतात तेव्हाच त्यांचा दोष शांत होतो. ॥३४॥
तदलं परितापेन धर्मतः परिकल्पितः ।
वधो वानरशार्दूल न वयं स्ववशे स्थिताः ॥ ३५ ॥
’म्हणून वानरश्रेष्ठा ! पश्चात्ताप करून काही लाभ नाही. सर्वथा धर्मास अनुसरूनच तुझा वध केला गेला आहे; कारण आम्ही लोक स्वतःच्या वश नाही, शास्त्राच्या अधीन आहोत. ॥३५॥
शृणु चाप्यपरं भूयः कारणं हरिपुङ्‌व ।
यच्छ्रुत्वा हेतुमद्वीर न मन्युं कर्तुमर्हसि ॥ ३६ ॥
’वानरश्रेष्ठा ! तुझ्या वधाचे जे दुसरे कारण आहे तेही ऐक. वीरा ! ते महान् कारण ऐकून तू माझ्या प्रति क्रोध करता उपयोगी नाही. ॥३६॥
न मे तत्र मनस्तापो न मन्युर्हरियूथप ।
वागुराभिश्च पाशैश्च कूटैश्च विविधैर्नराः ॥ ३७ ॥

प्रतिच्छन्नाश्च दृश्याश्च गृह्णंति सुबहून् मृगान् ।
प्रधावितान्वा वित्रस्तान् विस्रब्धांश्चापि निष्ठितान् ॥ ३८ ॥
’वानरश्रेष्ठा ! या कार्यामुळे माझ्या मनांत संतापही येत नाही अथवा मला खेदही होत नाही. मनुष्य (राजा आदि) मोठमोठी जाळी पसरून सांपळे रचून आणि नाना प्रकारचे कूट उपाय (गुप्त खड्डे निर्माण करणे आदि) करून लपून राहून नंतर समोर येऊन बर्‍याचशा मृगांना पकडतात. मग भलेही ते भयभीत होऊन पळून जात असोत अथवा विश्वस्त होऊन अत्यंत निकट बसलेले असोत. ॥३७-३८॥
प्रमत्तानप्रमत्तान्वा नरा मांसार्थिनो भृशम् ।
विध्यंति विमुखांश्चापि न च दोषो ऽत्र विद्यते ॥ ३९ ॥
’मांसाहारी मनुष्य (क्षत्रिय) सावधान, असावधान अथवा विमुख होऊन पळून जाणार्‍या पशुंनाही अत्यंत घायाळ करून टाकतो; परंतु त्यांच्यासाठी या मृगयेमध्ये दोष होत नाही. ॥३९॥
यांति राजर्षयश्चात्र मृगयां धर्मकोविदाः ।
तस्मात्त्वं निहतो यद्धे मया बाणेन वानर ।
अयुध्यन्प्रतुयुध्यन्वा यस्माच्छाखामृगो ह्यसि ॥ ४० ॥
’वानरा ! धर्मज्ञ राजर्षिही या जगतात मृगयेसाठी जातात आणि विविध जंतुंचा वध करतात. म्हणून मीही तुला युद्धात आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे. तू माझ्याशी युद्ध करीत होतास की करीत नव्हतास, यामुळे तुझ्या वध्यतेमध्ये काही अंतर पडत नाही; कारण की तू शाखामृग आहेस (आणि मृगया करण्याचा क्षत्रियाला अधिकार आहे.) ॥४०॥
दुर्लभस्य च धर्मस्य जीवितस्य शुभस्य च ।
राजानो वानरश्रेष्ठ प्रदातारो न संशयः ॥ ४१ ॥
’वानरश्रेष्ठा ! राजे लोक दुर्लभ धर्म, जीवन आणि लौकिक अभ्युदय देणारे असतात यात संशय नाही. ॥४१॥
तान्न हिंस्यान्न चाक्रोशेन्नाक्षिपेन्नाप्रियं वदेत् ।
देवा मनुष्यरूपेण चरंत्येते महीतले ॥ ४२ ॥
’म्हणून त्यांची हिंसा करू नये, त्यांची निंदा करू नये, त्यांच्या प्रति आक्षेपही करू नये आणि त्यांना अप्रिय वचनही बोलू नये कारण की वास्तविक ते देवता आहेत जे मनुष्य रूपाने या पृथ्वीवर विचरत राहातात. ॥४२॥
त्वं तु धर्ममविज्ञाय केवलं रोषमास्थितः ।
प्रदूषयसि मां धर्मे पितृपैतामहे स्थितम् ॥ ४३ ॥
 ’तू तर धर्माचे स्वरूप न समजता केवळ रोषाच्या वशीभूत झालेला आहेस म्हणून पिता- पितामहांच्या धर्मावर स्थित राहणार्‍या माझी निंदा करीत आहेस.’ ॥४३॥
एवमुक्तस्तु रामेण वाली प्रव्यथितो भृशम् ।
न दोषं राघवे दध्यौ धर्मे ऽधिगतनिश्चयः ॥ ४४ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर वालीच्या मनात फार व्यथा झाली. त्याचा धर्माच्या तत्त्वासंबंधी निश्चय झाला. त्याने राघवाच्या दोषाच्या चिंतनाचा त्याग केला. ॥४४॥
प्रत्युवाच ततो रामं प्राञ्जलिर्वानरेश्वरः ।
यत्त्वमात्थ नरश्रेष्ठ तत् तथैव न संशयः ॥ ४५ ॥
यानंतर वानरराज वालीने श्रीरामांना हात जोडून म्हटले- ’नरश्रेष्ठ ! आपण जे काही सांगत आहात ते सर्वथा ठीक आहे यात संशय नाही. ॥४५॥
प्रतिवक्तुं प्रकृष्टे हि नाप्रकृष्टस्तु शक्नुयात् ।
यदयुक्तं मया पूर्वं प्रमादाद् वाक्यमप्रियम् ॥ ४६ ॥

तत्रापि खलु मे दोषं कर्तुं नार्हसि राघव ।
त्वं हि दृष्टार्थतत्त्वज्ञः प्रजानां च हिते रतः ।
कार्यकारणसिद्धौ ते प्रसन्ना बुद्धिरव्यया ॥ ४७ ॥
’आपल्या सारख्या श्रेष्ठ पुरुषाला माझ्या सारखा निम्न श्रेणीचा प्राणी उचित उत्तर देऊ शकत नाही, म्हणून मी प्रमादवश प्रथम ज्या अनुचित गोष्टी बोललो आहे, त्यातही आपण माझा अपराध मानता कामा नये. राघवा ! आपण परमार्थ तत्त्वाचे यथार्थ ज्ञाते आणि प्रजाजनांच्या हितामध्ये तत्पर राहाणारे आहात. आपली बुद्धि कार्य - कारणाच्या निश्चयात निभ्रांत आणि निर्मल आहे. ॥४६-४७॥
मामप्यगतधर्माणं व्यतिक्रांतपुरस्कृतम् ।
धर्मसंहितया वाचा धर्मज्ञ परिपालय ॥ ४८ ॥
’धर्मज्ञा ! मी धर्मभ्रष्ट प्राण्यांमध्ये अग्रगण्य आहे आणि याच रूपाने माझी सर्वत्र प्रसिद्धि आहे तरी आज आपल्याला शरण आलो आहे. आपल्या धर्मतत्त्वाच्या वाणीने आज माझे रक्षण करावे.’ ॥४८॥
बाष्पसंरुद्ध कण्ठस्तु वाली सार्तरवः शनैः ।
उवाच रामं संप्रेक्ष्य पङ्‌कलग्न इव द्विपः ॥ ४९ ॥
इतके बोलता बोलता अश्रूंनी वालीचा गळा दाटून आला आणि तो चिखलात फसलेल्या हत्तीप्रमाणे आर्तनाद करून श्रीरामांकडे पहात हळू हळू बोलला- ॥४९॥
न चात्मानमहं शोचे न तारां न च बांधवान् ।
यथा पुत्रं गुणश्रेष्ठं अङ्‌गददं कनकाङ्‌गेदम् ॥ ५० ॥
’भगवन् ! मला स्वतःसाठी, तारेसाठी तसेच बंधुबांधवांसाठी इतका शोक होत नाही जितका सुवर्णाचे बाजूबंद धारण करणार्‍या श्रेष्ठ गुणसंपन्न पुत्र अंगदासाठी होत आहे. ॥५०॥
स ममादर्शनाद्दीनो बाल्यात् प्रभृति लालितः ।
तटाक इव पीतांबुरुपशोषं गमिष्यति ॥ ५१ ॥
’मी लहानपणापासून त्याचे फार लाड केलेले आहेत. आता मी न दिसल्याने तो फार दुःखी होईल आणि ज्याचे जल पिऊन टाकलेले आहे अशा तलावाप्रमाणे सुकून जाईल. ॥५१॥
बालश्चाकृतबुद्धिश्च एकपुत्रश्च मे प्रियः ।
तारेयो राम भवता रक्षणीयो महाबलः ॥ ५२ ॥
’श्रीरामा ! तो अद्याप बालक आहे त्याची बुद्धि परिपक्व झालेली नाही. माझा एकुलता एक मुलगा असल्याने तारापुत्र अंगद मला अत्यंत प्रिय आहे. आपण माझ्या महाबली पुत्राचे रक्षण करावे. ॥५२॥
सुग्रीवे चाङ्‌गनदे चैव विधत्स्व मतिमुत्तमाम् ।
त्वं हि शास्ता च गोप्ता च कार्याकार्यविधौ स्थितः ॥ ५३ ॥
’सुग्रीव आणि अंगद दोघांविषयी आपण सद्‌भाव ठेवावा. आता आपणच या लोकांचे रक्षक तसेच त्यांना कर्तव्य- अकर्तव्याचे शिक्षण देणारे आहात. ॥५३॥
या ते नरपते वृत्तिर्भरते लक्ष्मणे च या ।
सुग्रीवे चाङ्‌गपदे राजन् तां चिंतयितुमर्हसि ॥ ५४ ॥
’राजन ! नरेश्वर ! भरत आणि लक्ष्मणाप्रति आपले जसे आचरण आहे तेच सुग्रीव तसेच अंगदाच्या प्रतिही असायला हवे. आपण त्याच भावाने या दोघांचे स्मरण करावे. ॥५४॥
मद्दोषकृतदोषां तां यथा तारां तपस्विनीम् ।
सुग्रीवो नावमन्येत तथावस्थातुमर्हसि ॥ ५५ ॥
’बिचार्‍या तारेची फारच शोचनीय अवस्था झालेली आहे. माझ्याच अपराधामुळे तिलाही अपराधिनी समजून सुग्रीवाने तिचा तिरस्कार करू नये, या गोष्टीचीही व्यवस्था करावी. ॥५५॥
त्वया ह्यनुगृहीतेन राज्यं शक्यमुपासितुम् ।
त्वद्वशे वर्तमानेन तव चित्तानुवर्तिना ॥ ५६ ॥

शक्यं दिवं चार्जयितुं वसुधां चापि शासितुम् ।
’सुग्रीव आपला कृपापात्र होऊनच या राज्याचे यथार्थ रूपाने पालन करू शकतो. आपल्या अधीन होऊन आपल्या चित्ताचे अनुसरण करणारा पुरुष स्वर्ग आणि पृथ्वीचेही राज्य प्राप्त करू शकतो आणि त्याचे उत्तम प्रकारे पालन करू शकतो. ॥५६ १/२॥
त्वत्तोहं वधमाकाङ्‌क्षवन्वार्यमाणोपि तारया ॥ ५७ ॥

सुग्रीवेण सह भ्रात्रा द्वंद्वयुद्धमुपागतः ।
’माझी इच्छा होती की आपल्या हाताने माझा वध व्हावा, म्हणून तारेने अडविले असताही मी आपला भाऊ सुग्रीव याच्याशी द्वंद युद्ध करण्यासाठी निघून आलो.’ ॥५७ १/२॥
इत्युक्त्वा सन्नतो रामं विरराम हरीश्वरः ॥ ५८ ॥

स तमाश्वासयद्रामो वालिनं व्यक्तदर्शनम् ।
सामसंपन्नया वाचा धर्मतत्त्वार्थयुक्तया ॥ ५९ ॥

न संतापस्त्वया कार्य एतदर्थं प्लवंगम ।
न वयं भवता चिंत्या नाप्यात्मा हरिसत्तम ।
वयं भवद्विशेषेण धर्मतः कृतनिश्चयाः ॥ ६० ॥
श्रीरामांना असे सांगून वानरराज वाली गप्प झाले. त्या समयी त्यांच्या ज्ञानशक्तीचा विकास झालेला होता. श्रीरामांनी धर्माचे यथार्थ स्वरूप प्रकट करणार्‍या साधु- पुरुषांच्या द्वारे प्रशंसित वाणीमध्ये त्यास म्हटले- ’वानरश्रेष्ठ ! तुम्ही यासाठी संताप करता कामा नये. कपिप्रवर ! तुम्हांला आमच्यासाठी आणि स्वतःसाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण की आम्ही लोक तुमच्यापेक्षा विशेषज्ञ आहोत म्हणून आम्ही धर्मानुकूल कार्य करण्याचाच निश्चय केलेला आहे. ॥५८-६०॥
दण्ड्ये यः पातयेद्दण्डं दण्ड्यो यश्चापि दण्ड्यते ।
कार्यकारणसिद्धार्थावुभौ तौ नावसीदतः ॥ ६१ ॥
जो दण्डनीय पुरुषाला दंड देतो तसेच जो दंडाचा अधिकारी होऊन दंड भोगतो, यापैकी दण्डनीय व्यक्ती आपल्या अपराधाच्या फलस्वरूपामध्ये शासकाने दिलेला दण्ड भोगून तसेच दण्ड देणारा शासक त्याच्या त्या फलभोगांमध्ये निमित्त बनून कृतार्थ होऊन जातात. म्हणून ते दुःखी होत नाहीत. ॥६१॥
तद्‌भ्वान् दण्डसंयोगादस्माद्विगतकल्मषः ।
गतः स्वां प्रकृतिं धर्म्यां धर्मदृष्टेन वर्त्मना ॥ ६२ ॥
तू हा दण्ड मिळाल्याने पापरहित झालास आणि या दण्डाचे विधान करणार्‍या शास्त्रद्वारे कथित दण्डग्रहणरूप मार्गानेच चालून तुला धर्मानुकूल शुद्ध स्वरूपाची प्राप्ति झाली आहे. ॥६२॥
त्यज शोकं च मोहं च भयं च हृदये स्थितम् ।
त्वया विधानं हर्यग्र्य न शक्यमतिवर्तितुम् ॥ ६३ ॥
’आता तू आपल्या हृदयात स्थित शोक, मोह आणि भयाचा त्याग करून टाक. वानरश्रेष्ठा ! तू दैवाच्या विधानाला उल्लंघू शकत नाहीस. ॥६३॥
यथा त्वय्यङ्‌गमदो नित्यं वर्तते वानरेश्वर ।
तथा वर्तेत सुग्रीवे मयि चापि न संशयः ॥ ६४ ॥
’वानरेश्वर ! कुमार अंगद तुम्ही जीवित असतांना जसा होता, त्याच प्रकारे सुग्रीवाच्या आणि माझ्या जवळही सुखात राहील, यात संशय नाही.’ ॥६४॥
स तस्य वाक्यं मधुरं महात्मनः
समाहितं धर्मपथानुवर्तिनः ।
निशम्य रामस्य रणावमर्दिनो
वचः सुयुक्तं निजगाद वानरः ॥ ६५ ॥
युद्धात शत्रूचा मान मर्दन करणारे महात्मा श्रीराम यांचे धर्ममार्गास अनुकूल आणि मानसिक शंकांचे समाधान करणारे मधुर वचन ऐकून वानर वालीने हे सुंदर युक्तीयुक्त वचन उच्चारले- ॥६५॥
शराभितप्तेन विचेतसा मया
प्रदूषितस्त्वं यदजानता प्रभो ।
इदं महेंद्रोपम भीमविक्रम
प्रसादितस्त्वं क्षम मे नरेश्वर ॥ ६६ ॥
’प्रभो ! देवराज इंद्राप्रमाणे भयंकर पराक्रम प्रकट करणार्‍या नरेश्वरा ! मी आपल्या बाणाने पीडित झाल्यामुळे अचेत झालेला होतो म्हणून अजाणता मी आपल्या प्रति कठोर गोष्टी बोललो, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. त्यासाठी मी प्रार्थनापूर्वक आपल्याला प्रसन्न करू इच्छितो.’ ॥६६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टादशः सर्गः ॥ १८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षारामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अठरावा सर्ग पूरा झाला. ॥१८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP