श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चाश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणं मत्वा वानराणां पलायनम्, सुग्रीवस्याज्ञया जांबवता तेभ्यः सांत्वनाप्रदानं, विभीषणस्य विलापः, सुग्रीवेण तस्य प्रबोधनं, गरुडस्यागमनं श्रीरामलक्ष्मणौ नागपाशतो मोचयित्वा तस्य पुनर्गमनं च - विभीषणाला इंद्रजित समजून वानरांचे पलायन आणि सुग्रीवाच्या आज्ञेने जांबवानाचे त्यांना सांत्वना देणे विभीषणांचा विलाप आणि सुग्रीवाचे त्यांना समजाविणे, गरूडाचे येणे आणि श्रीराम - लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त करून निघून जाणे -
अथोवाच महातेजा हरिराजो महाबलः ।
किमियं व्यथिता सेना मूढवातेव नौर्जले ॥ १ ॥
त्यासमयी महातेजस्वी महाबली वानरराज सुग्रीवाने विचारले - वानरांनो ! जलात ज्याप्रमाणे वादळाने झोडपलेली नौका डगमगू लागते त्या प्रकारे आमची ही सेना एकाएकी व्यथित झाली आहे, याचे कारण काय आहे ? ॥१॥
सुग्रीवस्य वचः श्रुत्वा वालिपुत्रोऽङ्‌गदोऽब्रवीत् ॥ २ ॥
न त्वं पश्यसि रामं च लक्ष्मणं च महाबलम् ।
सुग्रीवाचे हे बोलणे ऐकून वालिपुत्र अंगदाने म्हटले- काय आपण या रामलक्ष्मणांची दशा पहात नाही कां ? ॥२॥
शरजालाचितौ वीरौ उभौ दशरथात्मजौ ।
शरतल्पे महात्मानौ शयानौ रुधिरोक्षितौ ॥ ३ ॥
हे दोन्ही वीर महात्मा दशरथकुमार रक्तांत न्हाऊन बाणशय्येवर पडलेले आहेत आणि बाणांच्या समूहाने व्याप्त होत आहेत. ॥३॥
अथाब्रवीद् वानरेन्द्रः सुग्रीवः पुत्रमङ्‌गदम् ।
नानिमित्तमिदं मन्ये भवितव्यं भयेन तु ॥ ४ ॥
तेव्हा वानरराज सुग्रीवांनी पुत्र अंगदास म्हटले -पुत्रा ! मी असे मानत नाही की सेनेमध्ये अकारणच पळापळ उडाली आहे. कुठल्या ना कुठल्या भयानेच असे झाले असावे. ॥४॥
विषण्णवदना ह्येते त्यक्तप्रहरणा दिशः ।
पलायन्तेऽत्र हरयः त्रासादुत्फुल्ललोचनाः ॥ ५ ॥
हे वानर उदास मुखाने आपापली हत्यारे फेकून संपूर्ण दिशांमध्ये पळून जात आहेत आणि भयामुळे डोळे फाडफाडून बघत आहेत. ॥५॥
अन्योन्यस्य न लज्जन्ते न निरीक्षन्ति पृष्ठतः ।
विप्रकर्षन्ति चान्योन्यं पतितं लङ्‌घयन्ति च ॥ ६ ॥
पलायन करतांना त्यांना एक दुसर्‍यामुळे लाजही वाटत नाही. ते मागे वळूनही बघत नाही आहेत. एक दुसर्‍याला ओढत आहेत आणि जो कोणी पडतो त्याला ओलांडून निघून जात आहेत. (भयामुळे त्याला उठवत नाहीत.) ॥६॥
एतस्मिन्नन्तरे वीरो गदापाणिर्विभीषणः ।
सुग्रीवं वर्धयामास राघवं च जयाशिषा ॥ ७ ॥
इतक्यात वीर विभीषण हातात गदा घेऊन तेथे येऊन पोहोचले आणि त्यांनी विजयसूचक आशीर्वाद देऊन सुग्रीव तसेच राघवांच्या अभ्युदयाची कामना केली. ॥७॥
विभीषणं तं सुग्रीवो दृष्ट्‍वा वानरभीषणम् ।
ऋक्षराजं महात्मानं समीपस्थमुवाच ह ॥ ८ ॥
वानरांना भयभीत करणार्‍या विभीषणाला पाहून सुग्रीवांनी आपल्या जवळच असलेल्या महात्मा ऋक्षराज जांबवानास म्हटले- ॥८॥
विभीषणोऽयं संप्राप्तो यं दृष्ट्‍वा वानरर्षभाः ।
द्रवंत्यायतसंत्रासा रावणात्मजशङ्‌कया ॥ ९ ॥
हे विभीषण आले आहेत ज्यांना पाहून वानरशिरोमणींना हा संदेह झाला की रावणाचा पुत्र इंद्रजित आला आहे. म्हणून यांचे भय फारच वाढले आहे आणि ते पळून जात आहेत. ॥९॥
शीघ्रमेतान् सुसंत्रस्तान् बहुधा विप्रधावितान् ।
प्रर्यवस्थापयाख्याहि विभीषणमुपस्थितम् ॥ १० ॥
तुम्ही शीघ्र जाऊन हे सांगा की इंद्रजित नाही विभीषण आले आहेत. असे सांगून बहुधा भयभीत होऊन पलायन करणार्‍या या सर्व वानरांना सुस्थिर करा - पळण्यापासून आवरून धरा. ॥१०॥
सुग्रीवेणैवमुक्तस्तु जाम्बवान् ऋक्षपार्थिवः ।
वानरान् सान्त्वयामास सन्निरुध्य प्रधावतः ॥ ११ ॥
सुग्रीवांनी असे सांगितल्यावर ऋक्षराज जांबवानांनी पळून जाणार्‍या वानरांना परतवून सांत्वना दिली. ॥११॥
ते निवृत्ताः पुनः सर्वे वानरास्त्यक्तसाध्वसाः ।
ऋक्षराजवचः श्रुत्वा तं च दृष्ट्‍वा विभीषणम् ॥ १२ ॥
ऋक्षराजाचे म्हणणे ऐकून आणि विभीषणाला आपल्या डोळ्यांनी पाहून वानरांनी भयाचा त्याग केला आणि ते सर्वच्या सर्व पुन्हा परत आले. ॥१२॥
विभीषणस्तु रामस्य दृष्ट्‍वा गात्रं शरैश्चितम् ।
लक्ष्मणस्य च धर्मात्मा बभूव व्यथितस्तदा ॥ १३ ॥
श्रीराम आणि लक्ष्मणांच्या शरीरांना बाणांनी व्याप्त झालेले पाहून धर्मात्मा विभीषणांना त्या समयी फार व्यथा झाली. ॥१३॥
जलक्लिन्नेन हस्तेन तयोर्नेत्रे विमृज्य च ।
शोकसंपीडितमना रुरोद विललाप च ॥ १४ ॥
त्यांनी पाण्यांनी भिजलेले त्या दोन्ही भावांचे डोळे पुसले आणि मनातल्या मनात शोकाने पीडित होऊन ते रडू लागले आणि विलाप करु लागले- ॥१४॥
इमौ तौ सत्त्वसंपन्नौ विक्रान्तौ प्रियसंयुगौ ।
इमामवस्थां गमितौ राक्षसैः कूटयोधिभिः ॥ १५ ॥
हाय ! ज्यांना युद्ध अधिक प्रिय होते आणि जे बल-विक्रम यांनी संपन्न होते, तेच हे दोघे भाऊ राम आणि लक्ष्मण मायेने युद्ध करणार्‍या राक्षसांच्या द्वारा या अवस्थेला पोहोचविले गेले. ॥१५॥
भ्रातुः पुत्रेण चैतेन दुष्पुत्रेण दुरात्मना ।
राक्षस्या जिह्मया बुद्ध्या वंचितावृजुविक्रमौ ॥ १६ ॥
हे दोन्ही वीर सरलतापूर्वक पराक्रम प्रकट करत होते. परंतु भावाच्या त्या दुरात्मा कुपुत्राने आपल्या कुटिल राक्षसी बुद्धिच्या द्वारा या दोघांना धोका दिला. ॥१६॥
शरैरिमावलं विद्धौ रुधिरेण समुक्षितौ ।
वसुधायामिमौ सुप्तौ दृश्येते शल्यकाविव ॥ १७ ॥
या दोघांचे शरीर बाणांच्या द्वारे पूर्णत: विंधले गेले आहे. हे दोघे रक्ताने न्हाऊन निघाले आहेत आणि या अवस्थेत पृथ्वीवर झोपलेले हे दोन्ही राजकुमार काट्यांनी भरलेल्या साळिंदर नामक जंतु समान दिसत आहेत. ॥१७॥
ययोर्वीर्यमुपाश्रित्य प्रतिष्ठा काङ्‌क्षिता मया ।
ताविमौ देहनाशाय प्रसुप्तौ पुरुषर्षभौ ॥ १८ ॥
ज्यांच्या बलपराक्रमाचा आश्रय घेऊन मी लंकेच्या राज्यावर प्रतिष्ठित होण्याची अभिलाषा केली होती, तेच हे दोघे बंधु पुरूषश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मण देहत्यागासाठी झोपलेले आहेत. ॥१८॥
जीवन्नद्य विपन्नोऽस्मि नष्टराज्यमनोरथः ।
प्राप्तप्रतिज्ञश्च रिपुः सकामो रावणः कृतः ॥ १९ ॥
आज मी जिवंत असून मेलो आहे. माझा राज्यविषयक मनोरथ नष्ट होऊन गेला. शत्रु रावणाने जी सीतेला परत न करण्याची प्रतिज्ञा केली होती, ती पुरी झाली. त्याच्या पुत्राने त्याला सफल मनोरथ बनवले आहे. ॥१९॥
एवं विलपमानं तं परिष्वज्य विभीषणम् ।
सुग्रीवः सत्त्वसंपन्नो हरिराजोऽब्रवीदिदम् ॥ २० ॥
याप्रकारे विलाप करणार्‍या विभीषणाला हृदयाशी धरून शक्तिशाली वानरराज सुग्रीवांनी त्यांना असे म्हटले - ॥२०॥
राज्यं प्राप्स्यसि धर्मज्ञ लङ्‌कायां नेह संशयः ।
रावणः सह पुत्रेण स्वकामं नेह लप्स्यते ॥ २१ ॥
धर्मज्ञ ! तुम्हाला लंकेचे राज्य प्राप्त होईल, यात संशय नाही. पुत्रासहित रावण येथे आपली कामना पुरी करू शकणार नाही. ॥२१॥
न रुजा पीडि गरुडाधिष्ठितावेतौ उभौ राघवलक्ष्मणौ ।
त्यक्त्वा मोहं वधिष्येते सगणं रावणं रणे ॥ २२ ॥
हे दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण मूर्छेचा त्याग केल्यानंतर गरूडाच्या पाठीवर बसून रणभूमीमध्ये राक्षस गणांसहित रावणाचा वध करतील. ॥२२॥
तमेनं सान्त्वयित्वा तु समाश्वास्य तु राक्षसम् ।
सुषेणं श्वशुरं पार्श्वे सुग्रीवस्तमुवाच ह ॥ २३ ॥
राक्षस विभीषणाला याप्रकारे सांत्वना आणि आश्वासन देऊन सुग्रीवाने आपल्या बाजूला उभे असलेल्या श्वसुर सुषेणास म्हटले- ॥२३॥
सह शूरैर्हरिगणैः लब्धसंज्ञौ अरिन्दमौ ।
गच्छ त्वं भ्रातरौ गृह्य किष्किन्धां रामलक्ष्मणौ ॥ २४ ॥
हे दोघे रामलक्ष्मण शुद्धिवर आल्यावर आपण त्यांना बरोबर घेऊन शूरवीर वानरगणांसह किष्किंधेला निघून जा. ॥२४॥
अहं तु रावणं हत्वा सपुत्रं सहबांधवम् ।
मैथिलीमानयिष्यामि शक्रो नष्टामिव श्रियम् ॥ २५ ॥
मी रावणाला पुत्र आणि बंधु-बांधवांसहित मारून त्याच्या हातून जसे देवराज इंद्रांनी हरवलेली राजलक्ष्मी दैत्यांच्या येथून हरून आणली होती, तशी मी मैथिली सीतेला घेऊन येईन. ॥२५॥
श्रुत्वैतद् वानरेन्द्रस्य सुषेणो वाक्यमब्रवीत् ।
दैवासुरं महायुद्धं अनुभूतं पुरातनम् ॥ २६ ॥
वानरराज सुग्रीवाचे हे म्हणणे ऐकून सुषेणाने म्हटले- पूर्वकाळी देवासुरात जे महायुद्ध झाले होते ते आम्ही पाहिले होते. ॥२६॥
तदा स्म दानवा देवान् शरसंस्पर्शकोविदान् ।
निजघ्नुः शस्त्रविदुषः छादयन्तो मुहुर्मुहुः ॥ २७ ॥
त्यासमयी अस्त्रशस्त्रांचे ज्ञाते तसेच लक्ष्यवेधात कुशल देवतांना वारंवार बाणांनी आच्छादित करत दानवांनी फार घायाळ केले होते. ॥२७॥
तानार्तान्नष्टसंज्ञाश्च गतासूंश्च बृहस्पतिः ।
विद्याभिर्मन्त्रयुक्ताभिः ओषधीभिश्चिकित्सति ॥ २८ ॥
त्या युद्धात ज्या देवता अस्त्र-शस्त्रांनी पीडित, अचेत आणि प्राणशून्य होऊन जात, त्या सर्वांचे रक्षणासाठी बृहस्पति मंत्रयुक्त विद्या तसेच दिव्य औषधिंच्याद्वारा त्यांची चिकित्सा करीत होते. ॥२८॥
तान्यौषधान्यानयितुं क्षीरोदं यान्तु सागरम् ।
जवेन वानराः शीघ्रं संपातिपनसादयः ॥ २९ ॥
माझे असे मत आहे की त्या औषधि घेऊन येण्यासाठी संपाति आणि पनस आदि वानरांनी शीघ्रच वेगपूर्वक क्षीरसागराच्या तटावर जावे. ॥२९॥
हरयस्तु विजानन्ति पार्वती ते महौषधीः ।
सञ्जीवकरणीं दिव्यां विशल्यां देवनिर्मिताम् ॥ ३० ॥
संपाति आदि वानर तेथे पर्वतावर प्रतिष्ठित झालेल्या दोन प्रसिद्ध महौषधिंना जाणतात. त्यांतील एकीचे नाव आहे संजीवकरणी आणि दुसरीचे नाव आहे विशल्यकरणी. या दोन्ही दिव्य औषधिंची निर्मिती साक्षात्‌ ब्रह्मदेवांनी केली आहे. ॥३०॥
चन्द्रश्च नाम द्रोणश्च क्षीरोदे सागरोत्तमे ।
अमृतं यत्र मथितं तत्र ते परमौषधी ॥ ३१ ॥

तौ तत्र विहितो देवैः पर्वतौ तौ महोदधौ ।
अयं वायुसुतो राजन् हनुमांस्तत्र गच्छतु ॥ ३२ ॥
सागरांत उत्तम क्षीरसमुद्राच्या तटावर चंद्र आणि द्रोण नामक दोन पर्वत आहेत, जेथे पूर्वकाळी अमृतासाठी मंथन केले गेले होते. त्याच दोन पर्वतावर त्या श्रेष्ठ औषधि विद्यमान आहेत. महासागरात देवतांनीच त्या दोन्ही पर्वतांना प्रतिष्ठित केले होते. राजन्‌ ! हे वायुपुत्र हनुमान्‌ त्या दिव्य औषधिंना आणण्यासाठी तेथे जाऊ देत. ॥३१-३२॥
एतस्मिन् अंतरे वायुः मेघांश्चापि सविद्युतः ।
पर्यस्य सागरे तोयं कंपयन्निव पर्वतान् ॥ ३३ ॥
औषधिंना आणण्याची चर्चा तेथे चालूच होती की अत्यंत जोराने वायु प्रकट झाला, मेघांचा समुदाय घेरून आला आणि विजा चमकू लागल्या. तो वारा सागराच्या जलात खळबळ उडवून देऊन पर्वतांना जणु कंपित करू लागला. ॥३३॥
महता पक्षवातेन सर्वद्वीपमहाद्रुमाः ।
निपेतुर्भिन्नविटपाः समूला लवणाम्भसि ॥ ३४ ॥
गरुडाच्या पंखामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वायुने संपूर्ण द्वीपातील मोठ मोठ्‍या वृक्षांच्या फांद्या तोडून टाकल्या आणि त्यांना लवणसमुद्राच्या जलात पाडून टाकले. ॥३४॥
अभवन् पन्नगास्त्रस्ता भोगिनस्तत्र वासिनः ।
शीघ्रं सर्वाणि यादांसि जग्मुश्च लवणार्णवम् ॥ ३५ ॥
लंकावासी महाकाय सर्पांचा भयाने थरकाप उडाला. संपूर्ण जल-जंतु शीघ्रतापूर्वक जलात शिरून गेले. ॥३५॥
ततो मुहूर्ताद्‌गरुडं वैनतेयं महाबलम् ॥
वानरा ददृशुः सर्वे ज्वलन्तमिव पावकम् ॥ ३६ ॥
त्यानंतर एका मुहूर्तामध्येच समस्त वानरांनी प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी महाबली विनतानंदन गरूडाला तेथे उपस्थित पाहिले. ॥३६॥
तमागतमभिप्रेक्ष्य नागास्ते विप्रदुद्रुवुः ।
यैस्तु तौ पुरुषौ बद्धौ शरभूतैर्महाबलैः ॥ ३७ ॥
त्यांना आलेले पाहून ज्या महाबली नागांनी, बाणाच्या रूपात येऊन त्या दोन्ही महापुरूषांना बांधून ठेवले होते, ते सर्वच्या सर्व तेथून पळून गेले. ॥३७॥
ततः सुपर्णः काकुत्स्थौ दृष्ट्‍वा प्रत्यभिनंद्य च ।
विममर्श च पाणिभ्यां मुखे चंद्रसमप्रभे ॥ ३८ ॥
तत्पश्चात्‌ गरुडाने त्या दोन्ही काकुत्स्थांना स्पर्श करून अभिनंदन केले आणि आपल्या हाताने त्यांच्या चंद्रम्यासारख्या कांतिमान्‌ मुखांना पुसले. ॥३८॥
वैनतेयेन संस्पृष्टाः तयोः संरुरुहुर्व्रणाः ।
सुवर्णे च तनू स्निग्धे तयोराशु बभूवतुः ॥ ३९ ॥
गरूडाचा स्पर्श प्राप्त होताच श्रीराम लक्ष्मणांचे सारे घाव भरून आले आणि त्यांची शरीरे तात्काळच सुंदर कांतिने युक्त आणि स्निग्ध होऊन गेली. ॥३९॥
तेजो वीर्यं बलं चौज उत्साहश्च महागुणाः ।
प्रदर्शनं च बुद्धिश्च स्मृतिश्च द्विगुणं तयोः ॥ ४० ॥
त्यांच्यातील तेज, वीर्य, बल, ओज, उत्साह, वृष्टिशक्ती, बुद्धि आणि स्मरणशक्ती आदि महान्‌ गुण पहिल्यापेक्षा दुप्पट होऊन गेले. ॥४०॥
तावुत्थाप्य महातेजा गरुडो वासवोपमौ ।
उभौ तौ सस्वजे हृष्टौ रामश्चैनमुवाच ह ॥ ४१ ॥
नंतर महातेजस्वी गरुडांनी त्या दोघा भावांना, जे साक्षात्‌ इंद्रासमान होते, उठवून हृदयाशी धरले. तेव्हा श्रीरामांनी प्रसन्न होऊन त्यांना म्हटले- ॥४१॥
भवत्प्रसादाद् व्यसनं रावणिप्रभवं महत् ।
उपायेन व्यतिक्रान्तौ शीघ्रं च बलिनौ कृतौ ॥ ४२ ॥
इंद्रजितामुळे आमच्यावर जे महान्‌ संकट आले होते त्यांतून आम्ही तुमच्या कृपेने पार झालो आहोत. आपण विशिष्ट उपायाचे ज्ञाते आहात म्हणून आपण आम्हा दोघांना तात्काळच पूर्ववत्‌ बलसंपन्न केले आहे. ॥४२॥
यथा तातं दशरथं यथाजं च पितामहम् ।
तथा भवन्तमासाद्य हृदयं मे प्रसीदति ॥ ४३ ॥
जसे पिता दशरथ आणि पितामह अज यांच्याजवळ जाण्याने माझे मन प्रसन्न होऊ शकत होते, तसेच आपली प्राप्ती झाल्याने माझे हृदय हर्षाने प्रफुल्लित झाले आहे. ॥४३॥
को भवान् रूपसंपन्नो दिव्यस्रगनुलेपनः ।
वसानो विरजे वस्त्रे दिव्याभरणभूषितः ॥ ४४ ॥
आपण फार रूपवान्‌ आहात, दिव्य पुष्पांची माला आणि दिव्य अंगरागांनी विभूषित आहात. आपण दोन स्वच्छ वस्त्रे धारण केली आहेत तसेच दिव्य आभूषणे आपली शोभा वाढवीत आहेत. आपण कोण आहात हे आम्ही जाणू इच्छितो. (सर्वज्ञ असूनही भगवंतांनी मानवभावाचा आश्रय घेऊन गरुडाला असा प्रश्न केला.) ॥४४॥
तमुवाच महातेजा वैनतेयो महाबलः ।
पतत्रिराजः प्रीतात्मा हर्षपर्याकुलेक्षणः ॥ ४५ ॥
तेव्हा महातेजस्वी महाबली पक्षिराज विनतानंदन गरुडांनी मनातल्या मनांत प्रसन्न होऊन, आनंदाश्रुंनी ज्यांचे नेत्र भरून आले होते त्या श्रीरामांना म्हटले- ॥४५॥
अहं सखा ते काकुत्स्थ प्रियः प्राणो बहिश्चरः ।
गरुत्मानिह संप्राप्तो युवाभ्यां साह्यकारणात् ॥ ४६ ॥
काकुत्स्थ ! मी आपला प्रिय मित्र गरुड आहे. बाहेर विचरण करणारा आपला प्राण मी आहे. आपणा दोघांच्या मदतीसाठीच मी यासमयी येथे आलो आहे. ॥४६॥
असुरा वा महावीर्या दानवा वा महाबलाः ।
सुराश्चापि सगंधर्वाः पुरस्कृत्य शतक्रतुम् ॥ ४७ ॥

नेमं मोक्षयितुं शक्ताः शरबंधं सुदारुणम् ।
महापराक्रमी असुर, महाबली दानव, देवता तसेच गंधर्वही जरी इंद्रांना पुढे करून येथे आले असते तरी तेही या भयंकर सर्पाकार बाणाच्या बंधनातून आपल्याला सोडविण्यास समर्थ होऊ शकले नसते. ॥४७ १/२॥
मायाबलादिन्द्रजिता निर्मितं क्रूरकर्मणा ॥ ४८ ॥

एते नागाः काद्रवेया स्तीक्ष्णदंष्ट्रा विषोल्बणाः ।
रक्षोमायाप्रभावेण शरभूतास्त्वदाश्रयाः ॥ ४९ ॥
क्रूरकर्मा इंद्रजिताने मायेच्या बळाने ज्या नागरूपी बाणांचे बंधन तयार केले होते, ते नाग कद्रूचे पुत्रच होते. त्यांचे दात फार तीक्ष्ण असतात. या नागांचे विष फार भयंकर असते. हे राक्षसाच्या मायेच्या प्रभावाने बाण बनून आपल्या शरीरास चिकटून बसले होते. ॥४८-४९॥
सभाग्यश्चासि धर्मज्ञ राम सत्यपराक्रम ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा समरे रिपुघातिना ॥ ५० ॥
धर्माचे ज्ञाते सत्यपराक्रमी श्रीरामा ! समरांगणात शत्रुंचा संहार करणार्‍या आपल्या भावासह - लक्ष्मणासहच आपणही फार सौभाग्यशाली आहात. ( जे अनायासच या नागपाशांतून मुक्त झाला आहात.) ॥५०॥
इमं श्रुत्वा तु वृत्तान्तं त्वरमाणोऽहमागतः ।
सहसैवावयोः स्नेहात् सखित्वमनुपालयन् ॥ ५१ ॥
मी देवतांच्या मुखाने आपण लोक नागपाशात बद्ध झाल्याचा समाचार ऐकून मोठ्‍या उतावळेपणाने येथे आलो आहे. आपणा दोघात जो स्नेह आहे त्याने प्रेरित होऊन मित्रधर्माचे पालन करत मी एकाएकी येथे येऊन पोहोचलो आहे. ॥५१॥
मोक्षितौ च महाघोराद् अस्मात् सायकबंधनात् ।
अप्रमादश्च कर्तव्यो युवाभ्यां नित्यमेव हि ॥ ५२ ॥
येऊन मी या महाभयंकर बाण-बंधनातून आपणा दोघांना सोडविले आहे. आता आपल्याला सदाच सावधान राहावयास पाहिजे. ॥५२॥
प्रकृत्या राक्षसाः सर्वे संग्रामे कूटयोधिनः ।
शूराणां शुद्धभावानां भवतामार्जवं बलम् ॥ ५३ ॥
समस्त राक्षस स्वभावानेच संग्रामात कपटपूर्वक युद्ध करणारे असतात, परंतु शुद्धभाव असणार्‍या आपल्या सारख्या शूरवीरांचे सरलता हेच बळ आहे. ॥५३॥
तन्न विश्वसितव्यं वो राक्षसानां रणाजिरे ।
एतेनैवोपमानेन नित्यं जिह्मा हि राक्षसाः ॥ ५४ ॥
म्हणून याच दृष्टांतास समोर ठेवून आपण रणक्षेत्रात राक्षसांचा कधी विश्वास धरता कामा नये, कारण की राक्षस सदाच कुटिल असतात. ॥५४॥
एवमुक्त्वा ततो रामं सुपर्णः स महाबलः ।
परिष्वज्य च सुस्निग्धं आप्रष्टुमुपचक्रमे ॥ ५५ ॥
असे म्हणून महाबली गरुडाने त्यासमयी परमस्नेही श्रीरामांना हृदयाशी धरून त्यांच्याकडून जाण्याची आज्ञा घेण्याचा विचार केला. ॥५५॥
सखे राघव धर्मज्ञ रिपूणामपि वत्सल ।
अभ्यनुज्ञातुमिच्छामि गमिष्यामि यथासुखम् ॥ ५६ ॥
ते म्हणाले- शत्रुविषयींही वत्सल असणार्‍या धर्मज्ञ मित्रा राघवा ! आता मी सुखपूर्वक येथून प्रस्थान करीन. यासाठी आपली आज्ञा इच्छितो. ॥५६॥
न च कौतूहलं कार्यं सखित्वं प्रति राघव ।
कृतकर्मा रणे वीरः सखित्वं प्रतिवेत्स्यसि ॥ ५७ ॥
वीर राघवा ! मी जे मला स्वत:ला आपला सखा म्हणून सांगितले आहे, याविषयी आपण आपल्या मनात कुठलेही कौतूहल ठेवता कामा नये. आपण युद्धात सफलता प्राप्त केल्यानंतर माझ्या या सख्यभावाला स्वयं समजून घ्याल. ॥५७॥
बालवृद्धावशेषां तु लङ्‌कां कृत्वा शरोर्मिभिः ।
रावणं च रिपुं हत्वा सीतां त्वमुपलप्स्यसे ॥ ५८ ॥
आपण समुद्राच्या लहरींप्रमाणे आपल्या बाणांच्या परंपरेने लंकेची अशी दशा करून टाकाल की केवळ बालक आणि वृद्धच शेष राहातील. याप्रकारे आपल्या शत्रू रावणाचा संहार करून आपण सीतेला अवश्य प्राप्त कराल. ॥५८॥
इत्येवमुक्त्वा वचनं सुपर्णः शीघ्रविक्रमः ।
रामं च नीरुजं कृत्वा मध्ये तेषां वनौकसाम् ॥ ५९ ॥

प्रदक्षिणं ततः कृत्वा परिष्वज्य च वीर्यवान् ।
जगामाकाशमाविश्य सुपर्णः पवनो यथा ॥ ६० ॥
अशा गोष्टी सांगून शीघ्रगामी एवं शक्तिशाली गरुडाने रामांना निरोगी करून त्या वानरांच्या मध्ये त्यांची परिक्रमा केली आणि त्यांना हृदयाशी धरून ते वायुसमान गतिने आकाशात निघून गेले. ॥५९-६०॥
विरुजौ राघवौ दृष्ट्‍वा ततो वानरयूथपाः ।
सिंहनादांस्तदा नेदुः लाङ्‌गूलान् दुधुवुश्च ते ॥ ६१ ॥
दोन्ही राघवांना निरोगी झालेले पाहून त्यासमयी सारे वानर-यूथपति सिंहनाद करू लागले आणि पुच्छ हलवू लागले. ॥६१॥
ततो भेरीः समाजघ्नुः मृदङ्‌गांश्चाप्यवादयन् ।
दध्मुः शङ्‌खान् संप्रहृष्टाः क्ष्वेलन्त्यपि यथापुरम् ॥ ६२ ॥
नंतर तर वानरांनी डंके वाजविले, मृदुंग वाजविले, शंखनाद केले आणि हर्षोल्लासांने भरून पूर्वीप्रमाणे ते गर्जू लागले आणि दंड थोपटू लागले. ॥६२॥
आस्फोट्यास्फोट्य विक्रान्ता वानरा नगयोधिनः ।
द्रुमानुत्पाट्य विविधांन् तस्थुः शतसहस्रशः ॥ ६३ ॥
दुसरे पराक्रमी वानर जे वृक्ष आणि पर्वतशिखरांना हातात घेऊन युद्ध करत होते, ते नाना प्रकारचे वृक्ष उपटून लाखोंच्या संख्येने युद्धासाठी उभे राहिले. ॥६३॥
विसृजन्तो महानादान् त्रासयन्तो निशाचरान् ।
लङ्‌काद्वारण्युपाजग्मुः योद्धुकामाः प्लवंगमाः ॥ ६४ ॥
जोरजोराने गर्जना करत आणि निशाचरांना भयभीत करीत सारे वानर युद्धाच्या इच्छेने लंकेच्या दरवाजांवर येऊन उभे ठाकले. ॥६४॥
ततस्तु भीमस्तुमुलो निनादो
बभूव शाखामृगयूथपानाम् ।
क्षये निदाघस्य यथा घनानां
नादः सुभीमो नदतां निशीथे ॥ ६५ ॥
त्यासमयी त्या वानर यूथपतिंचा फार भयंकर तसेच तुमुल सिंहनाद सर्वत्र निनादू लागला, जणु ग्रीष्म ऋतुच्या अंती अर्ध्या रात्रीच्या समयी गरजणा‍र्‍या मेघांची गंभीर गर्जनाच सर्वत्र व्याप्त होऊन राहिली होती. ॥६५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चाशः सर्गः ॥ ५० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥५०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP