श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
लक्ष्मणेन श्रीरामस्य प्रबोधनं तदीयशोकस्य प्रशमनं च -
लक्ष्मणांचे श्रीरामांना समजावून शांत करणे -
तप्यमानं तदा रामं सीताहरणकर्शितम् ।
लोकानामभवे युक्तं संवर्तकमिवानलम् ॥ १ ॥

वीक्षमाणं धनुः सज्यं निःश्वसन्तं पुनः पुनः ।
दग्धुकामं जगत् सर्वं युगान्ते तु यथा हरम् ॥ २ ॥

अदृष्टपूर्वं संक्रुद्धं दृष्ट्वा रामं तु लक्ष्मणः ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं मुखेन परिशुष्यता ॥ ३ ॥
सीताहरणाच्या शोकाने पीडित झालेले श्रीराम जेव्हा त्या समयी संतप्त होऊन प्रलयकालीन अग्निप्रमाणे समस्त लोकांचा संहार करण्यास उद्यत झाले आणि धनुष्याची दोरी चढवून वारंवार त्याच्याकडे पाहू लागले, दीर्घश्वास घेऊ लागले आणि त्याच बरोबर कल्पान्तकालीन रूद्रदेवाप्रमाणे समस्त संसारास दग्ध करून टाकण्याची इच्छा करू लागले, तेव्हा ज्यांना पूर्वी अशा रूपात कधी ही पाहिले गेले नव्हते, अशा त्या अत्यंत कुपित झालेल्या रामांकडे पाहून लक्ष्मण हात जोडून कोरड पडलेल्या मुखाने याप्रकारे म्हणाले- ॥१-३॥
पुरा भूत्वा मृदुर्दान्तः सर्वभूतहिते रतः ।
न क्रोधवशमापन्नः प्रकृतिं हातुमर्हसि ॥ ४ ॥
आर्य ! आपण प्रथमपासून कोमल स्वभावाने युक्त, जितेन्द्रिय आणि सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर राहात असता. आता क्रोधाला वश होऊन आपल्या प्रकृतिचा (स्वभावाचा) परित्याग करू नये. ॥४॥
चन्द्रे लक्ष्मीः प्रभा सूर्ये गतिर्वायौ भुवि क्षमा ।
एतच्च नियतं सर्वं त्वयि चानुत्तमं यशः ॥ ५ ॥
चंद्रम्यामध्ये शोभा, सूर्यामध्ये प्रभा, वायुमध्ये गति आणि पृथ्वीमध्ये क्षमा ज्याप्रमाणे विराजमान राहातात, त्याच प्रकारे आपल्या ठिकाणी सर्वोत्तम यश सदा प्रकाशित होत असते. ॥५॥
एकस्य नापराधेन लोकान् हन्तुं त्वमर्हसि ।
न तु जानामि कस्यायं भग्नः सङग्रामिको रथः ॥ ६ ॥
आपण कुणा एकाच्या अपराधामुळे समस्त लोकांचा संहार करु नये. मी हा तुटलेला युध्दोपयोगी रथ कोणाचा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्‍न करतो. ॥६॥
केन वा कस्य वा हेतोः सायुधः सपरिच्छदः ।
खुरनेमिक्षतश्चायं सिक्तो रुधिरबिन्दुभिः ॥ ७ ॥

देशो निर्वृत्तसङ्ग्रामः सुघोरः पार्थिवात्मज ।
एकस्य तु विमर्दोऽयं न द्वयोर्वदतां वर ॥ ८ ॥

न हि वृत्तं हि पश्यामि बलस्य महतः पदम् ।
नैकस्य तु कृते लोकान् विनाशयितुमर्हसि ॥ ९ ॥
अथवा कुणी कोठल्या उद्देश्याने जू आणि अन्य उपकरणासहित या रथास मोडून टाकले आहे ? याचाही पत्ता लावायला हवा आहे. राजकुमार ! हे स्थान घोड्‍यांच्या खुरांनी आणि थकलेल्या चाकांनी उखडले गेले आहे, त्याच बरोबर रक्ताच्या बिंदुनीही ओले झालेले आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की येथे फार भयंकर संग्राम झाला होता. परंतु हा संग्राम कुणा एकाच रथीचा आहे, दोघांचा नाही. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ श्रीरामा ! मला येथे कुठल्या विशाल सेनेचे पदचिन्ह दिसून येत नाही, म्हणून कुणा एकाच्याच अपराधामुळे आपण समस्त लोकांचा विनाश करता कामा नये. ॥ ७-९॥
युक्तदण्डा हि मृदवः प्रशान्ता वसुधाधिपाः ।
सदा त्वं सर्वभूतानां शरण्यः परमा गतिः ॥ १० ॥
कारण राजेलोक अपराधास अनुसरूनच उचित दण्ड देणारे कोमल स्वभावाचे आणि शांत असतात. आपण तर सदाच समस्त प्राण्यांना शरण देणारे आणि त्यांची परम गति आहात. ॥१०॥
को नु दारप्रणाशं ते साधु मन्येत राघव ।
सरितः सागराः शैला देवगन्धर्वदानवाः ॥ ११ ॥

नालं ते विप्रियं कर्तुं दीक्षितस्येव साधवः ।
रघुनंदन ! आपल्या स्त्रीचा विनाश अथवा अपहरण कोण चांगले समजेल ? जसे यज्ञात दीक्षित झालेल्या पुरुषाचे साधु स्वभावाचे ऋत्विज कधी अप्रिय करू शकत नाहीत, त्याच प्रकारे सरिता, समुद्र, पर्वत, देवता, गंधर्व आणि दानव- हे कुणीही आपल्या प्रतिकूल आचरण करू शकत नाहीत. ॥११ १/२॥
येन राजन् हृता सीता तमन्वेषितुमर्हसि ॥ १२ ॥

मद्‌द्वितीयो धनुष्पाणिः सहायैः परमर्षिभिः ।
राजन्‌ ! ज्याने सीतेचे अपहरण केले आहे त्याचे अन्वेषण केले पाहिजे. आपण माझ्यासह हातात धनुष्य घेऊन मोठ मोठ्‍या ऋषिंच्या मदतीने त्याचा पत्ता लावावा. ॥१२ १/२॥
समुद्रं च विचेष्यामः पर्वतांश्च वनानि च ॥ १३ ॥

गुहाश्च विविधा घोरा पद्मिन्यो विविधास्तथा ।
देवगन्धर्वलोकांश्च विचेष्यामः समाहिताः ॥ १४ ॥

यावन्नाधिगमिष्यामः तव भार्यापहारिणम् ।
न चेत् साम्ना प्रदास्यन्ति पत्‍नीं ते त्रिदशेश्वराः ।
कोसलेन्द्र ततः पश्चात् प्राप्तकालं करिष्यसि ॥ १५ ॥
आपण सर्व लोक एकाग्रचित्त होऊन समुद्रात शोधू, पर्वत आणि वनात शोधू, नाना प्रकारच्या भयंकर गुफा आणि निरनिराळ्या सरोवरांत शोध घेऊ तसेच देवता आणि गंधर्वांच्या लोकामध्येही तपास करू. जो पर्यंत आपल्या पत्‍नीचे अपहरण करणार्‍या दुरात्म्याचा पत्ता लागणार नाही तोपर्यंत आपण आपला हा प्रयत्‍न सुरूच ठेवू. कोसल नरेश ! जर आपल्या शान्तिपूर्ण आचरणाने देवेश्वर गणांनी आपल्या पत्‍नीचा पत्ता दिला नाही तर मग त्यावेळी त्या समयास अनुरूप ते कार्य आपण करावे. ॥१३-१५॥
शीलेन साम्ना विनयेन सीतां
     नयेन न प्राप्स्यसि चेन्नरेन्द्र ।
ततः समुत्पादय हेमपुङ्खै-
     र्महेन्द्रवज्रप्रतिमैः शरौघैः ॥ १६ ॥
नरेन्द्र ! जर चांगल्या शीलस्वभाव, सामनीति, विनय आणि न्याय यांस अनुसरून प्रयत्‍न करूनही आपल्याला सीतेचा पत्ता मिळाला नाही तर आपण सुवर्णमय पंख असलेल्या महेन्द्राच्या वज्रतुल्य बाणसमूहांनी समस्त लोकांचा संहार करून टाकावा. ॥१६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा पासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP