॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ 
   
॥ श्रीभावार्थरामायण ॥ 
  
उत्तरकांड 
  
॥  अध्याय एकूणसत्तरावा ॥   
श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट 
  
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥  
दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।  
जीत बांधिलें कित्येक मेदिनीं । गतप्राण होवोनि ठेलें ॥१॥  
अश्व गज वना आले । तेही गतप्राण होवोनि ठेले ।  
किंचित घायाळ उरले । ते प्रवेशले अयोध्यापुरीं ॥२॥  
भद्रासनीं जनकजामात । जैसा नभीं शोभे भास्वत ।  
भोंवते ऋषी परम ज्ञानवंत । सुमंतादिक प्रधान ॥३॥  
बैसले सभानायक । नगरपंडित पुराणिक ।  
चहूं वेदांचे वेदपाठक । ज्योतिषी गायक गंधर्व ॥४॥  
ऐसी सभा प्रसन्नवदन । एक करिती गायन ।  
एक करिती शास्त्रव्याख्यान । एक जन रंजविती ॥५॥  
घायाळ सैनिकांनी त्या कुमारांविषयी श्रीरामांन निवेदन केले :  
येरीकडे रणींचे वीर । अशुद्धें डवरिलें जैसे गिरिवर ।  
येवोनि श्रीरामासमोर । वृत्तांत सविस्तर सांगते झाले ॥६॥  
म्हणती जी स्वामिनाथा । संग्रामाची परिसा कथा ।  
शत्रुघ्नलक्ष्मणभरतां । दो कुमरीं बांधोनि नेलें ॥७॥  
कपिवीर थोर थोर । तेही बंधन पावले समग्र ।  
कित्येक घायीं झाले जर्जर । जिहीं रण सेविलें ॥८॥  
वज्रदेही वायुकुमरा । बाणें उडाविलें अंबरा ।  
मूर्च्छित पडतांचि फरफरां । पुच्छीं महावीरां ओढित नेलें ॥९॥  
उरले कण्हत कुंथत । कित्येक मार्गी झाले प्रेत ।  
किंचित उरले ते येथ । भाग्येंकरोनि पावलों ॥१०॥  
वयें तरी संख्या रविकळा । रुप तरी मदनपुतळा ।  
प्रतापें तरी या ब्रह्मगोळा । पालथें करिती स्वभावें ॥११॥    
ऐसें  दोघे वीरराणें । नेणों निर्माण  केलें  कोणें ।  
दातारा त्यांचेनि स्मरणें । जीवें प्राणें न उरिजे ॥१२॥  
धन्य धन्य त्यांची मातापिता । धन्य धन्य त्यांची प्रौढता ।  
धन्य तयांसी विद्यादाता । कोण तत्वतां कळेना ॥१३॥  
वय तरी दिसे लहान । करीं शोभती धनुष्यबाण ।  
गौर श्याम सुंदर सगुण । श्रीरामजानकींसारिखे ॥१४॥  
घायाळमुखींचि ऐकोनि कथा । हर्ष झाला श्रीरामचे चित्ता ।  
खुणावोनि सद्गुरुसी बोलता । म्हणे सैन्य समर्था मारिले ॥१५॥  
श्रीराम स्वतः युद्धाला निघाले :  
दाशरथीं म्हणे सद्गुरुसी ।  आट केला जी सैन्यासी ।  
आतां चलावें वेगेंसीं । म्हणोनो सभा विसर्जिली ॥१६॥  
प्रधानां केला हाकारा । म्हणे पालाणा रथकुंजरां ।  
आणि देशोदेशींचे नृपवरां । ऋषीश्वरां सवें घ्यावें ॥१७॥ 
रथीं आरुढोनि श्रीरघुपती । समीप वसिष्ठ दुसरे रथीं ।  
शस्त्रसामग्रीसी नाहीं मिती । वेगें भूपती निघाला ॥१८॥  
रथारुढ घनसावळां । दुसरे रथीं जवळा ।  
विश्वामित्र तोही भूपाळा । समीप पृथक् रथीं बैसे ॥१९॥  
आधींच राम घनसावळां । कोटिलावण्याचा पुतळा ।  
कांसे पीतांबर पिंवळा । कौस्तुभमाळा वैजयंती ॥२०॥  
अंगीं अहिप्रियांची उटी । तिलक मृगनाभींचा ललटीं ।  
कर्णी कुंडले अतिगोमटीं । रवी कोटी प्रकाशले ॥२१॥  
शुद्ध राजीवलोचन । मुकुटीं शोभती रत्नकिरण ।  
हिरे माणिकें तेजें पूर्ण । ठायीं ठायीं शोभती ॥२२॥  
ऐसा रथीं कौसल्यानंदन । करी घेतलें धनुष्यबाण ।  
मस्तकीं छत्र नीळवर्ण । कनकदंडें ढाळिती ॥२३॥  
पुढें तरी वेत्रपाणी । मदगज पुढारले आभारणीं ।  
सैन्य निघालें कोदंडपाणी । तयामध्ये शोभत ॥२४॥  
रथ चालिले घडघडाट । नादें तडडिलें अवनीचें पोट ।  
गिरी पर्वत होती एकवट । ऐसें नगराबाहेर आले ॥२५॥  
श्रीरामांना शुभशकुन :  
शकुन झाले ते अवसरीं । बळकें घेवोनि कडेवरी ।  
वनिता येत्या मानालंकारीं । पुढे देखिल्या ॥२६॥  
कागपक्षी दक्षिणे गेले । नकुळ भरद्वाजीं डावलिलें ।  
तास वामभागीं गेलें । उजवे झाले मृगगण ॥२७॥  
अपसव्य गेल्या कुरंगिणी । दोघे गुरु संतोषलें मनीं ।  
म्हणती स्तोत्रमंत्रध्वनीं । शब्द गगनीं न समाती ॥२८॥  
कनकमृगारी म्हणे स्वमी । नेत्र लवती उल्हासें दोनी ।  
दक्षिण बहु स्फुरत मनीं । आनंद थोर होतसे ॥२९॥  
तरी कवण लाभ होईल । कोण सखा भेटेल ।  
की युद्धीं जय होईल । हें मजप्रति सांगावे ॥३०॥  
तंव सद्गुरु म्हणे अवनिजापती । महिमा न कळे श्रुति नेति नेति म्हणती ।  
तो तूं सर्वात्मा मंगळमूर्तीं । आनंद चित्तीं अखंड तुझ्या ॥३१॥  
ऐसें पथीं चालत । मार्ग क्रमोनियां त्वरित ।  
आश्रम पावले वाल्मीक जेथ । तया स्थळासि पावले ॥३२॥  
लवकुशांची प्रतिज्ञा व गुरुंचा आशीर्वाद :  
येरीकडे कथानुसंधान । लहु कुश दोघे जण ।  
मातेप्रति प्रतापवन । काय बोलते पैं झालें ॥३३॥  
मातेसी म्हणती दोघे कुमर । युद्धा आला श्रीरघुवीर ।  
सैन्य सज्जोनि अपार । बंधु सोडविण्याकारणें ॥३४॥  
आतां यासीं युद्ध करुं । श्रीरामातें जीत धरुं ।  
वरकड सैन्य जीवें मारुं । हाचि आमुचा निश्चय ॥३५॥  
ऐसी प्रतिज्ञा करुन । शृंगारिले दोघे जण ।  
करीं घेवोनि धनुष्य बाण । जानकीस प्रदक्षिण पैं केलें ॥३६॥  
वंदोनियां श्रीगुरुसी । आज्ञा पुसोनी मातेसी ।  
वाल्मीक म्हणे तयांसी । निर्वाण येथें करावें ॥३७॥  
शंभु म्हणे दाक्षायणीसी । अपूर्व कथा परियेसीं ।  
जें वर्तलें नाहीं सृष्टीसी । देखिलें ना ऐकिलें ॥३८॥  
युद्ध पित्यापुत्रांसी जाण । सूर्यवंशीं होईल दारुण ।  
तें पाहूं चला हो विंदान । वाल्मीकाचे आश्रमीं ॥३९॥  
पुढें श्रीरामा पुत्रां होईल भेटी । ऐसी हे कथा सुरस मोठी ।  
तव पार्वती म्हणे जी धूर्जटी । कोणे समयीं स्वामिया ॥४०॥  
श्रीराम कोण कैंचा पुत्र । कोण वंश कोण गोत्र ।  
तुम्ही जपतसां जो श्रीराममंत्र । तोचि कीं काय स्वामिया ॥४१॥  
त्रिपुरारी म्हणे तोचि जाण । जयाचें आम्हीं अखंड ध्यान ।  
तोचि श्रीराम ब्रह्म पूर्ण । कार्याकारणें अवतरला ॥४२॥  
याहूनि सार दुसरें । नाहीं म्हणोनि म्यां धरिलें हरें ।  
तंव गिरिजा म्हणे दातारें । पुढें कथा सांगावी ॥४३॥  
पार्वती म्हणे महादेवो । चला विमानीं बैसों पाहों ।  
मग तो योगियांचा रावो । चरित्र पाहूं तेथें आला ॥४४॥  
श्रीरामा पुत्रां कैसी भेटी । पुत्रांसहित सीता गोरटी ।  
श्रीरामीं ऐक्य ते कथाकसवटी । मजप्रती सांगावी ॥४५॥  
तंव येरीकडे लहुकुश चालिले । सिंहनादें गर्जिन्नलें ।  
शरकार्मुक टणत्कारिलें । तंव दोघे देखिले श्रीरामें ॥४६॥  
अवलोकोनि दोघां जणां । विस्मित झाला रामराणा ।  
कैसे धरिलें इतुकिया सैन्या । हे तरी दोघे बाळक ॥४७॥  
सुंदर अति राजसे । याचें बाण रुतले कैसे ।  
बंधु धरिले ते सरसे । हें आश्चर्य वाटतसे ॥४८॥  
यांसी युद्ध आपण करणें । तें होय लौकिकीं लाजिरवाणें ।  
युद्धीं आपण विमुख होणें । तरी सुटका नव्हे बंधूंसीं ॥४९॥  
मग रथ प्रेरिला सामोरा । वेगळें केलें येरां वीरां ।  
कोप आला श्रीरामचंद्रा । भेणें वसुंधरा थरारिली ॥५०॥  
वरोनि सुधापानी पाहती । एकमेकां परस्परें बोलती ।  
कोपलिया अवनिजापती । कैसे वांचती दोघे कुमर ॥५१॥  
तंव गुरु बृहस्पती बोलत । दोघां भय नाहीं निभ्रांत ।  
राया राघवाचे सुत । अति महाबळियाढे ॥५२॥  
घटश्रोत्रारीनें धनुष्य वाहिलें । म्हणे सावध व्हा रे वहिले ।  
तुम्हीं पुरुषार्थ थोर दाखविले । ते आतां कळले रणरंगीं ॥५३॥  
कपटी वाल्मीक ऋषीश्वर । येणेंचि महा चालविलें वैर ।  
येरवीं कैचें कोठील वीर । यांसी कोण गणिताहे ॥५४॥  
सहोदर माझे धरोनि जाण । आणि वानरां केलें बंधन ।  
यासी मूळ वाल्मीक ब्राह्मण । आतां लुटीन आश्रम याचा ॥५५॥  
वाल्मीकीनें हे संग्रहिले । शस्त्रास्त्रविद्ये निपुण केले ।  
चेष्टवोनि बंधू धरविले । या बाळकांकरोनी ॥५६॥  
आतां बंधूंचे उसणें घेईन । तुम्हां दोघां धरुन नेईन ।  
ऋषिआश्रम भंगीन । अवघे करीन निष्कंटक ॥५७॥  
चापशरपाणीचें ऐकोनि वचन । कुश बोलता झाला जाण ।  
तुमचा प्रताप दारुण । आम्हां श्रुत झालासे ॥५८॥  
तो ऐकावा रघुराजें । घरच्या सांडोनियां भाजे ।  
लोकीं यश मिरविजे । हेंचि आश्चर्य वाटतें ॥५९॥  
बापुडी ताटका मारिली । रावणभगिनी विटंबिली ।  
ऐसी तुमची कीर्ति ऐकिली । जगामध्यें प्रसिद्ध ॥६०॥  
ऐसें तुम्हीं वडील दारुण । आम्हां दिसतसां पित्यासमान ।  
यालागीं राखितों महिमान । आतां वाल्मीका शरण तुम्हीं यावें ॥६१॥  
सद्गुरुसी न रिघतां शरण । कदा न तुटें देहबंधन ।  
तया नरा अधःपतन । पापिया पूर्ण तो सृष्टीं ॥६२॥ 
माझा सद्गुरु प्रसिद्ध । जो कां विबुधादिकां वंद्य ।  
तयाचा प्राप्त प्रसाद । त्याचेनि युद्ध करितो आम्ही ॥६३॥  
मग बोलिला दूषणारी । आतां माझा यावा सांवरीं ।  
नाहींतरी पळसी ऋषींभीतरीं । सांडोनियां धनुष्यबाण ॥६४॥  
श्रीराम-कुश अस्त्र युद्ध :  
ऐसें बोले श्रीरघुपती । धनुष्य चढवोनियां सीतीं ।  
बाण सोडिले अमित क्षितीं । शर शरांतें प्रसवले ॥६५॥        
बाणमय झालें भूमंडळ । अष्ट दिशा कुळाचळ ।  
आणि जेवढा ब्रह्मांडगोळ । बाणें जळस्थळ कोंदलें ॥६६॥  
ऐसें अद्भूत येतां बाण । वरचेवरी तोडिले कुशें जाण ।  
उदय होतां रविकिरण । उडुगण लोपती आपसया ॥६७॥  
बाण तोडिले देखोनि श्रीरामें । विष्णुशस्त्रा घेतलें नेमें ।  
जपोनियां बीजें उत्तमें । कुशावरी मोकलिलें ॥६८॥  
पृथ्वी झाली विष्णुमय । विष्णुमय झालें भुवनत्रय ।  
शंख गदा चक्र अभय । चतुर्भुज प्रगटलें ॥६९॥  
विष्णुमय देखोनि अवनी । कुशवीरें तये क्षणीं ।  
लक्ष्मीअस्त्र लाविलें गुणीं । रमामय मेदिनीं पैं केली ॥७०॥  
कमलामय अवघी सृष्टी ।  कमलामय नभाचें पोटीं ।  
कमलामय पर्वतांच्या पृष्ठीं । कनकताटीं आरतिया ॥७१॥  
त्या ओवांळिती विष्णूसी । शंभूसि पार्वती जैसी ।  
कीं शची ओंवाळी वृत्रारीसी । ऐसें तेथें वर्तलें ॥७२॥  
ओंवाळोनियां विष्णूसी । रमेसहित वैकुंठासी ।  
गेले विष्णू देखोनि रामासी । अति आश्चर्य वाटलें ॥७३॥  
मग बोले श्रीरामराणा । धन्य धन्य तुझा पुरुषार्थपणा ।  
जेणें विद्या शिकवली तोही धन्य । यो भूगोळामाझारीं ॥७४॥ 
श्रीराम म्हणे कुशासी । मज निवविलें करोनि युद्धासी ।  
नमस्कार तुझिया गुरुसी । तूं ब्रह्मबीज नव्हेसी निर्धारें ॥७५॥  
कोण तुझा जनक जननी । हें मज सांगें त्वरेंकरोनी ।  
तूं क्षत्रियाचा निश्चयोनी । मज मानसीं गमताहे ॥७६॥  
तंव कुश बोले तये वेळीं । आम्ही काय जाणों कुळवल्ली ।  
आणि सांगों नये काळीं । युद्धामाजी विचरतां ॥७७॥  
जातिकुळी काय चाड तुम्हां । युद्ध करावें जी श्रीरामा ।  
आतां पहा आमच्या पराक्रमा । आणि विद्या वाल्मीकाची ॥७८॥  
तुमचा पराक्रम अति प्रसिद्ध । ठकोनि वाळीचा केला वध ।  
सुग्रीवा देवोनि राजपद । अपकीर्तीतें जोडिलें ॥७९॥  
सिद्धी नेला गुरुचा याग । तुमचा सहोदर निसुग ।  
क्षणें क्षत्रीं  क्षणें जोग । क्षणें तापसी जटाधारी ॥८०॥  
तुमचा होता भरंवसा । त्या वीरीं धरिल होती आशा ।  
युद्ध करितां झाली निराशा । श्रीराम सोडवी ना म्हणोनी ॥८१॥  
आम्ही म्हणतो क्षत्री श्रीराम । तंव हा फिटला अवघा भ्रम ।  
मागील यशाचा वीरधर्म । याचपरी कळला जी ॥८२॥  
ऐसें कुश बोलतां । हासें आलें श्रीरघुनाथा ।  
निका क्षत्री होसील आतां । तरी हा बाण सांभाळीं ॥८३॥  
वीजाक्षर जपोनि राजीवनयनें । व्याघ्रास्त्र सोडिलें कोपें दारुणें ।  
येरें सिंहास्त्र सोडोनि तत्क्षणें । व्याघ्रास्त्र अवघें निवारिलें ॥८४॥  
सवेंचि क्कोपोनि श्रीरघुपती । शर सोडिले नेणों किती ।  
कुशा आलिंगोनि रघुनाथभाती । प्रवेशती ते काळीं ॥८५ ॥  
कुशाचे करींचे सुटती बाण । श्रीरामासी करिती नमन ।  
सवेंचि येती परतोन । कुशाचे भातीं रिघती ॥८६॥  
शर सोडी रामचंद्र । तयांचे कुशास अलंकार ।  
पुत्राचे शर श्रीरघुवीर । ओंवाळीन नमस्कारिती ॥८७॥  
युद्ध थांबविण्याचा ऋषींचा रामांना आदेश :  
ऐसें देखोनि सकळ ऋषी । आश्चर्य करिती मानसीं ।  
ते समयीं विश्वामित्र रायसी । बोलता झाला कांहींएक ॥८८॥  
ऋषि म्हणे श्रीरघुनाथा । संग्राम नको करुं आतां ।  
येरु म्हणे जी ताता । बंधू कैसेनि सुटतील ॥८९॥  
बंधु आणि अश्व वानर । त्यांचें सुटकेचा कोण प्रकार ।  
तंव वसिष्ठ ऋषीश्वर । हास्यवदनें बोलला ॥९०॥  
वसिष्ठ म्हणे वाल्मीकासी । बोलवोनि आणा या ठायासी ।  
तो सांगेल निश्चयेंसीं । त्या कार्यासी करावें ॥९१॥  
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । श्रीरामें ठेविलें धनुष्यबाण ।  
वाल्मीक ऋषि पाचारुन । सभास्थानीं बैसविला ॥९२॥  
वाल्मीकींचें आगमन आणि सर्वांची मुक्तता :  
वाल्मीकें खुणाविलें कुमरा । सोडविलें भरत शत्रुघ्नादि वीरां ।  
अश्व सोडोनियां वनचरां । समस्तांतें मुक्त केलें ॥९३॥  
वाल्मीक ऋषि म्हणे श्रीरामासी । हे तुह्जें दोघे पुत्र परियेसी ।  
येरु म्हणे ठाव नाहीं भार्येसी । पुत्र कोणाचे ॥९४॥  
आधीं असलिया स्त्रीरत्न । तंव देखावें पुत्रनिधान ।  
ते समयीं ब्रह्मनंदन । नारद जाण तेथे आला ॥९५॥ 
हांसोनिया नारद मुनी । लटिकें वैराग्य चापशरपाणी ।  
म्हणे श्रीरामालागूनी । आम्हां मूढांसी दाविसी ॥९६॥ 
तंव कुंभोद्भव म्हणे श्रीरामा । पुराणपुरुषा मेघश्यामा ।  
पुत्र तुझें हे पुरुषोत्तमा । हें सौमित्रा पुसावें ॥९७॥  
राजीवनेत्रें सौमित्रातें । पुसों आदरिलें भावार्थे ।  
तंव येरु गहिंवरोनि चित्तें । सद्गदकंठ दाटला ॥९८॥  
सौमित्र होवोनि सावधान । बोलता झाला पूर्वकथन ।  
स्वामीनें आज्ञा देवोन । सीता वना पाठविली ॥९९॥  
ते नेवोनियां वनवासीं । सोडितां जानकी मजसीं ।  
बोलिली गर्भिणी तीनमासी । सौमित्रा तुम्हीं जाणावें ॥१००॥  
अवनिजेचें ऐकोनि वचन । मग राखिलें तिचे प्राण ।  
हृदयीं थोर दुःख पावोन । स्वामिचरणाजवळी आलों ॥१॥  
याउपरी वाल्मीकें बोललें । माझे शिष्य वनफळां गेले ।  
तिहीं सीतेसी देखिलें । आक्रंदता वनवासीं ॥२॥  
तदुपरी आश्रमा आणिली । आम्ही जानकी ओळखिली ।  
सवेंचि मजसीं बोलिली । म्हणे मुनि मी गर्भवती ॥३॥  
माझे आश्रमीं पूर्ण दिवस । क्रमोनि भरले नवमास ।  
प्रसूतिकाळीं लहु कुश । पुत्र दोघे जन्मले ॥४॥  
पुत्र झाले सुलक्षण । दिवसेंदिवस थोर होवोन ।  
धनुर्विद्या अभ्यासून । सीतेसहित होते येथें ॥५॥  
वाल्मीकींनी श्रीरामांची लव-कुश,सीतेची भेट करवून दिली :  
सीतेसहित पुत्र निपुण केले । आतां सांभाळिजे आपुले ।  
म्हणोनि दोघां भेटविलें । श्रीरामासी ते समयीं ॥६॥  
श्रीराघवें दिधलें आलिंगन । सजळ दोनी झाले नयन ।  
क्षण एक तटस्थ होवोन । मग मांडिये बैसविलें ॥७॥  
आनंद झाला श्रीरामासी । देखोनियां लहुकुशांसी ।  
पुनरपि चंबन देवोनि त्यांसी । करें कुरवाळी मस्तक ॥८॥  
भरत शत्रुघ्न लक्ष्मण । आणि सकल वानरसैन्य ।  
लंकाधिपती बिभीषण ।  समस्त तयांसि भेटविले ॥९॥  
हनुमंत सुग्रीव जांबवंत । आनंदें लहुकुश भेटत ।  
आणि ऋषी वसिष्ठासि महंत । तयां नमस्कार केला पुत्रीं ॥११०॥  
नारद म्हणें वाल्मीकासी । वेगीं आणवीं जानकीसी ।  
मोतियांचा चौक वसिष्ठ ऋषी । घालिता झाला ते वेळीं ॥११॥  
आणविली जनकबाळा । आसवें आलीं तिच्या डोळां ।  
येरी लागली चरणकमळा । वसिष्ठादि ऋषींचें ॥१२॥  
मग नमस्कारोनि श्रीरघुपती । वामांगीं बैसली सीता सती ।  
ऋषी जयजयकारें गर्जती । विजयी रघुपती तिहीं लोकीं ॥१३॥  
जैसा कैलासीं त्रिपुरारी । अर्धांगीं घेवोनियां बैसे गौरी ।  
गणेश आणि तारकारी । दक्षिणांगीं शोभत ॥१४॥  
ऐसा झाला महोत्सव । भार्यापुत्रांसहित देवाधिदेव ।  
विजयी झाला ऋषिसमुदाव । जयजयकारें गर्जिन्नलें ॥१५॥  
देव करिताती स्तुती । नानापरींची वाद्यें वाजती ।  
विमानी होत्या सुरांच्या पंक्ती । पुष्पवर्षाव तिहीं केला ॥१६॥  
मग लक्ष्मणभरतशत्रुघ्नांसी । गहिंवर न धरवे मानसीं ।  
सत्वर उठोनि जानकीसी । साष्टांगेंसीं नमस्कारिलें ॥१७॥  
मग पाहोनियां सुमुहूर्त । रथ पालाणिले त्वरित ।  
रथीं बैसोनि ऋषी समस्त । अयोध्यापंथें निघाले ॥१८॥  
समस्त परिवारेंसीं जाण । रथीं आरुढलें श्रीराम जाण ।  
एके दिवशीं अयोध्याभवन । निजसैन्येसीं प्रवेशले ॥१९॥  
भवनीं प्रवेशली सीता । कौसल्यादिकरोनि समस्ता ।  
जानकीस आलिंगन झाल्या देत्या । म्हणती कष्टली सीता वनवासीं ॥१२०॥      
कौसल्या आरती घेवोनि करीं । तिघां जणातें लोण उतरी ।  
हर्ष न समाये अंबरीं । लहुकुशातें देखोनी ॥२१॥  
येरीकडे श्रीरामराणा । आज्ञा देवोनि समस्त जनां ।  
पाठविले निजस्थानां । ऋषी राजे सकळिक ॥२२॥  
आज्ञा देवोनि कपिगणांतें । पाठविले निजस्थानांतें ।  
बिभीषणें नमस्कारोनि राघवातें । निजनगरातें निघाला ॥२३॥   
बंधुभार्यापुत्रांसहित । अयोध्येसी श्रीरघुनाथ ।  
राज्य करितां सुखें स्वस्थ । पुढील चरित्र अवधारा ॥२४॥  
एका जनार्दना शरण । पुढील कथा अति पावन ।  
जिचें करितां स्मरण । भवबंधन स्वप्नीं नाहीं ॥१२५॥  
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां  श्रीरामजानकीपुत्रदर्शनं नाम एकोनसप्ततितमोऽध्यायः ॥६९॥ ओंव्या ॥१२५॥  
GO TOP 
  
 |