॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ अष्टमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



सीतेच्या वियोगामुळे रामांचा विलाप आणि त्यांची जटायूशी भेट -


श्रीमहादेव उवाच
रामो मायाविनं हत्वा राक्षसं कामरूपिणम् ।
प्रतस्थे स्वाश्रमं गन्तुं ततो दूराद्ददर्श तम् ॥ १ ॥
आयान्तं लक्ष्मणं दीनं मुखेन परिशुष्यता ।
राघवश्चिन्तयामास स्वात्मन्येव महामतिः ॥ २ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, "स्वेच्छेप्रमाणे रूप धारण करणार्‍या त्या मायावी मारीच राक्षसाला ठार करून, श्रीराम स्वतःच्या आश्रमाकडे जाण्यास निघाले. लक्ष्मणाला सुकलेल्या व दुःखी चेहर्‍याने येताना श्रीरामांनी दुरूनच पाहिले. तेव्हा महाबुद्धिमान राघव मनातल्या मनातच विचार करू लागले." (१-२)

लक्ष्मणस्तन्न जानाति माया सीतां मया कृताम् ।
ज्ञात्वाप्येनं वञ्चयित्वा शोचामि प्राकृतो यथा ॥ ३ ॥
"मी माया-सीता तयार केली आहे, हे लक्ष्मणाला माहीत नाही आणि हे मला माहीत असूनसुद्धा या लक्ष्मणाला कळू न देता मी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे आपण आता शोक सुरू करतो. (३)

यद्यहं विरतो भूत्वा तूष्णीं स्थास्यामि मन्दिरे ।
तदा राक्षसकोटीनां वधोपायः कथं भवेत् ॥ ४ ॥
जर मी शोक न करता माझ्या आश्रमात गप्प बसेन तर कोट्यवधी राक्षसांचा वध करण्याचा मार्ग मला कसा बरे प्राप्त होईल ? (४)

यदि शोचामि तां दुःखसन्तप्तः कामुको यथा ।
तदा क्रमेणानुचिन्वन्सीतां यास्येऽसुरालयम् ।
रावणं सकुलं हत्वा सीतामग्नौ स्थितां पुनः ॥ ५ ॥
मयैव स्थापितां नीत्वा यातायोध्यामतन्द्रितः ।
अहं मनुष्यभावेन जातोऽस्मि ब्रह्मणार्थितः ॥ ६ ॥
मनुष्यभावं आपन्नः किञ्चित्कालं वसामि कौ ।
ततो मायामनुष्यस्य चरितं मेऽनुशृण्वताम् ॥ ७ ॥
मुक्तिः स्यादप्रयासेन भक्तिमार्गानुवर्तिनाम् ।
निश्चित्यैवं तदा दृष्ट्‍वा लक्ष्मणं वाक्यमब्रवीत् ॥ ८ ॥
दुःखाने संत्रस्त होऊन मी जर एखाद्या कामुक माणसाप्रमाणे त्या सीतेविषयी शोक केला तरच सीतेचा शोध करीत मी असुरांच्या स्थानी जाऊ शकेन. आणि रावणाचा कुळासह वध करून, मीच अग्नीमध्ये स्थापन केलेल्या सीतेला पुनः बरोबर घेऊन नंतर तिला अयोध्येला त्वरित घेऊन जाईन. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे मी मनुष्यभावाने जन्माला आलो आहे. म्हणून मनुष्यभावात मी काही काळ या पृथ्वीवर राहीन. त्यामुळे मायामनुष्य झालेल्या माझे चरित्र ऐकणार्‍या आणि भक्तिमार्गाचे अनुसरण करणार्‍या भक्तांना विनासायास मुक्ती प्राप्त होईल." असा निश्चय करून, मग लक्ष्मणाला पाहून राम म्हणाला. (५-८)

किमर्थमागतोऽसि त्वं सीतां त्यक्त्वा मम प्रियाम् ।
नीता वा भक्षिता वापि राक्षसैर्जनकात्मजा ॥ ९ ॥
"अरे लक्ष्मणा, माझ्या प्रिय सीतेला सोडून तू का बरे इकडे आलास ? तिला राक्षसांनी तरी नेले असेल अथवा खाऊन टाकले असेल." (९)

लक्ष्मणः प्राञ्जलिः प्राह सीताया दुर्वचो रुदन् ।
ह्या लक्ष्मणेति वचनं राक्षसोक्तं श्रुतं तया ॥ १० ॥
त्वद्वाक्यसदृशं श्रुत्वा मां गच्छेति त्वराब्रवीत् ।
रुदन्ती सा मया प्रोक्ता देवि राक्षसभाषितम् ।
नेदं रामस्य वचनं स्वस्था भव शुचिस्मिते ॥ ११ ॥
इत्येवं सान्विता साध्वी मया प्रोवाच मां पुनः ।
यदुक्तं दुर्वचो राम न वाच्यं पुरतस्तव ॥ १२ ॥
तेव्हा हात जोडून, रडत रडत लक्ष्मणाने त्याला सीतेने उच्चारले वाईट शब्द सांगितले. "हाय लक्ष्मणा, इत्यादी राक्षसाने उच्चारलेले शब्द सीतेने ऐकले. तुमच्या शब्दाप्रमाणे असणारे ते शब्द ऐकून ती त्वरेने मला म्हणाली, 'तू ताबडतोब श्रीरामांकडे जा' ते व्हा रडणार्‍या सीते ला मी म्हटले ' अग देवी, हे राक्षसाचे शब्द आहेत. हे श्रीरामांचे शब्द नव्हेत. हे देवी, तू निश्चिंत राहा.' मी तिचे सांत्वन केले तरी ती साध्वी मला पुन्हा जे वाईट शब्द बोलली, ते हे रामा, मी तुमच्यापुढे उच्चारणे योग्य नाही. (१०-१२)

कर्णौ पिधाय निर्गत्य यातोऽहं त्वां समीक्षितुम् ।
रामस्तु लक्ष्मणं प्राह तथाप्यनुचितं कृतम् ॥ १३ ॥
त्या वेळी कानावर हात ठेवून मी तेथून निघून तुम्हाला पाहण्यास इकडे आलो." तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, "तथापि तू हे बरोबर केले नाहीस. (१३)

त्वया स्त्रीभाषितं सत्यं कृत्वा त्यक्ता शुभानना ।
नीता वा भक्षिता वापि राक्षसैर्नात्र संशयः ॥ १४ ॥
स्त्रीचे भाषण खरे माग्नून तू त्या सीतेला एकटीला सोडलेस. त्यामुळे राक्षसांनी तिला नेले असेल अगर खाऊन तरी टाकले असेल, यात शंका नाही." (१४)

इति चिन्तापरो रामः स्वाश्रमं त्वरितो ययौ ।
तत्रादृष्ट्‍वा जनकजां विललापातिदुःखितः ॥ १५ ॥
अशा प्रकारे चिंताग्रस्त झालेले राम त्वरित स्वतःच्या आश्रमाकडे गेले. तेथे जनककन्या सीता न दिसल्याने, ते अतिशय दुःखी हो ऊन विलाप क रू लागले. (१५)

हा प्रिये क्व गतासि त्वं नासि पूर्ववदाश्रमे ।
अथवा मद्विमोहार्थं लीलया क्व विलीयसे ॥ १६ ॥
"हा प्रिये, आता तू पूर्वीप्रमाणे आश्रमात दिसत नाहीस. तू कुठे गेली आहेस ? माझी थट्टा करण्यासाठी तू खोडकरपणाने कुठे लपून बसली आहेस का ?" (१६)

इत्याचिन्वन्वनं सर्वं नापश्यज्जानकीं तदा ।
वनदेव्यः कुतः सीतां ब्रुवन्तु मम वल्लभाम् ॥ १७ ॥
असे बोलून त्यांनी संपूर्ण वनात तिचा शोध घेतला. परंतु त्यांना कुठेही जानकी आढळली नाही. तेव्हा ते म्हणू लागले, "अहो वनदेवींनो, माझी लाडकी सीता कुठे आहे ते मला सांगा. (१७)

मृगाश्च पक्षिणो वृक्षा दर्शयन्तु मम प्रियाम् ।
इत्येवं विलपन्नेव रामः सीतां न कुत्रचित् ॥ १८ ॥
सर्वज्ञः सर्वथा क्वापि नापश्यद्‌रघुनन्दनः ।
आनन्दोऽप्यन्वशोचत्तामचलोऽप्यनुधावति ॥ १९ ॥
हे मृग, पक्षी आणि वृक्ष हो, तुम्ही माझी प्रिया मला दाखवा." अशा प्रकारे विलाप करीत असता त्या संपूर्ण, सर्वज्ञा रघुनंदनांना सीता कुठेही दिसली नाही. श्रीराम हे जरी आनंदस्वरूप होते तरी सीतेला शोधण्यासाठी शोक करीत होते. आणि स्वतः अचल असूनही ते तिला शोधण्यास इकडे तिकडे धावत होते. (१८-१९)

निर्ममो निरहङ्‌कारोऽप्यखण्डानन्दरूपवान् ।
मम जायेति सीतेति विललापातिदुःखितः ॥ २० ॥
श्रीराम हे स्वतः जरी ममत्वरहित, अहंकार-्रहित आणि अखंड आनंदस्वरूप होते तरी ते अतिशय दुःखी होऊन 'माझी भार्या, माझी सीता' असे बडबडत विलाप करीत होते. (२०)

एवं मायामनुचरनसक्तोऽपि रघूत्तमः ।
आसक्त एव मूढानां भाति तत्त्वविदां न हि ॥ २१ ॥
अशा प्रकारे मायेला अनुसरून वागणारे रघूत्तम हे जरी अनासक्त होते तरी ते आसक्त आहेत असे अज्ञानी माणसांना भासत होते, पण श्रीरामांचे खरे तत्त्व जाणार्‍या पुरुषांना मात्र असा भास होत नव्हता. (२१)

एवं विचिन्वन्सकलं वनं रामः सलक्ष्मणः ।
भग्नं रथं छत्रचापं कूबरं पतितं भुवि ॥ २२ ॥
दृष्ट्‍वा लक्ष्मणमाहेदं पश्य लक्ष्मण केनचित् ।
नीयमानां जनकजां तं जित्वान्यो जहार ताम् ॥ २३ ॥
अशा प्रकारे लक्षमणासह श्रीराम सीतेसाठी संपूर्ण वनाचा शोध घेत असताना, त्यांना जमिनीवर पडलेला एक मोडका रथ, भंगलेले छत्र आणि धनुष्य तसेच रथाचे जू दिसले. ते पाहिल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाले, "अरे लक्ष्मणा, पाहा, जनककन्येला नेताना तसे करणार्‍या पुरुषाला जिंकून दुसर्‍या कुणीतरी तिचे हरण केले आहे." (२२-२३)

ततः कञ्चिद्‌भुवो भागं गत्वा पर्वतसन्निभम् ।
रुधिराक्तवपुर्दृष्ट्‍वा रामो वाक्यमथाब्रवीत् ॥ २४ ॥
त्यानंतर जमिनीवर थोडे चालून गेल्यावर पर्वताप्रमाणे प्रचंड आणि रक्ताने लडबडलेले शरीर दिसल्यानंतर श्रीराम असे म्हणाले. (२४)

एष वै भक्षयित्वा तां जानकीं शुभदर्शनाम् ।
शेते विविक्तेऽतितृप्तः पश्य हन्मि निशाचरम् ॥ २५ ॥
चापमानय शीघ्रं मे बाणं च रघुनन्दन ।
तत्छ्रुत्वा रामवचनं जटायुः प्राह भीतवत् ॥ २६ ॥
"अरे लक्ष्मणा, पाहा. त्या सुंदर जानकीला खाऊन टाकल्यावर अतिशय तृप्त झालेला कुणीतरी राक्षस येथे एकांतस्थानी झोपला आहे. बघ, मी आत्ता या राक्षसाला ठार करतो. तेव्हा हे रघुनंदना लक्ष्मणा, चटदिशी माझे धनुष्य आणि बाण आण." ते रामाचे वचन ऐकल्यावर भ्यालेला जटायू बोलू लागला. (२५-२६)

मां न मारय भद्रं ते म्रियमाणं स्वकर्मणा ।
अहं जटायुस्ते भार्या हारिणं समनुद्रुतः ॥ २७ ॥
रावणं तत्र युद्धं मे बभूवारिविमर्दन ।
तस्य वाहान् रथं चापं छित्त्वाहं तेन घातितः ॥ २८ ॥
पतितोऽस्मि जगन्नाथ प्राणांस्त्यक्ष्यामि पश्य माम् ॥ २९ ॥
तच्छ्रुत्वा राघवो दीनं कण्ठप्राणं ददर्श ह ।
हस्ताभ्यां संस्पृशन् रामो दुःखाश्रुवृतलोचनः ॥ ३० ॥
"हे रामा, स्वतःच्या कर्मानेच मरणार्‍या मला मारू नकोस. तुझे कल्याण असो. मी जटायू आहे. तुझ्या भार्येचे हरण करणार्‍या रावणाच्यामागे मी गेलो होतो. हे शत्रुनाशका, तेथे माझे रावणाबरोबर युद्ध झाले. मी त्याच्या रथाचे घोडे, रथ आणि धनुष्य तोडून टाकले. परंतु मी त्याच्याकडून घायाळ झालो, आता येथे पडलो आहे. हे जगन्नाथा, मी आता प्राणत्याग करणार आहे. तू माझ्याकडे पाहा." ते ऐकल्यावर, अतिशय दीन अवस्थेत असणार्‍या आणि कंठाशी प्राण आलेल्या जटायूला रामांनी पाहिले. त्यांचे डोळे दुःखाश्रूंनी भरले होते. रामांनी दोन्ही हात त्याच्या अंगावरून फिरविले. मग ते म्हणाले. (२७-३०)

जटायो ब्रूहि मे भार्या केन नीता शुभानना ।
मत्कार्यार्थं हतोऽसि त्वमतो मे प्रियबान्धवः ॥ ३१ ॥
"हे जटायू, माझी सुमुखी भार्या कुणी पळवून नेली, ते सांग. माझ्या कार्यासाठी तू घायाळ झाला आहेस. म्हणून तू माझा प्रिय बांधव आहेस." (३१)

जटायुः सन्नया वाचा वक्त्राद्‌रक्तं समुद्वमन् ।
उवाच रावणो राम राक्षसो भीमविक्रमः ॥ ३२ ॥
आदाय मैथिलीं सीतां दक्षिणाभिमुखो ययौ ।
इतो वक्तुं न मे शक्तिः प्राणांस्त्यक्ष्यामि तेऽग्रतः ॥ ३३ ॥
तेव्हा तोडातून रक्त ओकीत अडखळत्या व क्षीण झालेल्या वाणीने जटायूने म्हटले, "हे रामा, भयंकर पराक्रम करणारा रावण नावाचा राक्षस मिथिल-राजकन्या सीतेला घेऊन, दक्षिण दिशेकडे गेला आहे. याहून अधिक सांगण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. मी तुझ्यासमोरच प्राणांचा त्याग करतो. (३२-३३)

दिष्ट्या दृष्टोऽसि राम त्वं म्रियमाणेन मेऽनघ ।
परमात्मासि विष्णुस्त्वं मायामनुजरूपधृक् ॥ ३४ ॥
हे रामा, भाग्याची गोष्ट अशी की मी मरत असताना तुला पाहात आहे. हे निष्पाप रामा, माया-मनुष्य-रूप धारण करणारा तू प्रत्यक्ष परमात्मा विष्णू आहेस. (३४)

अन्तकालेऽपि दृष्ट्‍वा त्वां मुक्तोऽहं रघुसत्तम ।
हस्ताभ्यां स्पृश मां राम पुनर्यास्यामि ते पदम् ॥ ३५ ॥
हे रघुश्रेष्ठा, माझ्या अंतकाळी तुला पाहिल्यामुळे मी मुक्त होऊन गेलो आहे. हे रामा, तू तुझ्या हातांनी मला स्पर्श कर. मग मी तुझ्या परमस्थानी जाईन." (३५)

तथेति रामः पस्पर्श तदङ्‌गं पाणिना स्मयन् ।
ततः प्राणान् परित्यज्य जटायुः पतितो भुवि ॥ ३६ ॥
"ठीक आहे " असे म्हणून आश्चर्याने रामांनी त्याच्या शरीराला स्पर्श केला. त्यानंतर प्राणत्याग करून जटायू जमिनीवर पडला. (३६)

रामस्तमनुशोचित्वा बन्धुवत्साश्रुलोचनः ।
लक्ष्मणेन समानाय्य काष्ठानि प्रददाह तम् ॥३७ ॥
जटायूला बंधूप्रमाणे मानून, डोळ्यांत अश्रू आणून रामांनी त्याच्याविषयी शोक केला आणि लक्ष्मणाकडून काष्टे आणवून घेऊन त्याचा दाहसंस्कार केला. (३७)

स्नात्वा दुःखेन रामोऽपि लक्ष्मणेन समन्वितः ।
हत्वा वने मृगं तत्र मांसखण्डान्समन्ततः ॥ ३८ ॥
शाद्वले प्राक्षिपद्‍रामः पृथक्‌पृथगनेकधा ।
भक्षन्तु पक्षिणः सर्वे तृप्तो भवतु पक्षिराट् ॥ ३९ ॥
दुःखी झालेल्या रामांनी लक्षमणासह स्नान केले. नंतर पक्षिराज जटायूसाठी तेथील हिरवळीवर पिंडदान केले. "हे पिंड खाऊन पक्षी तृप्त होऊ देत आणि त्यामुळे पक्षिराज जटायू तृप्त होऊ दे." असे म्हटले. (३८-३९)

इत्युक्त्वा राघवः प्राह जटायो गच्छ मत्पदम् ।
मत्सारूप्यं भजस्वाद्य सर्वलोकस्य पश्यतः ॥ ४० ॥
राघव म्हणाले, "हे जटायू, तू माझ्या पदी जा. आणि सर्व लोकांच्या देखत आज सरूपता मुक्ती प्राप्त करून घे." (४०)

ततोऽनन्तरमेवासौ दिव्यरूपधरः शुभः ।
विमानवरमारुह्य भास्वरं भानुसन्निभम् ॥ ४१ ॥
त्यानंतर त्या वेळी जटायू सुंदर व दिव्य रूप धारण करून, सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा एका उत्कृष्ट विमानात चढला. (४१)

शङ्‌खचक्रगदापद्मकिरीटवरभूषणैः ।
द्योतयन्स्वप्रकाशेन पीताम्बरधरोऽमलः ॥ ४२ ॥
तेथे तो स्वच्छ पीतांबर धारण केलेला शंख, चक्र, गदा, पद्म, उत्कृष्ट किरीट इत्यादी भूषणांनी युक्त होता. तो स्वतःव्या तेजाने सर्व दिशांना प्रकाशित करीत होता. (४२)

चतुर्भिः पार्षदैर्विष्णोस्तादृशैरभिपूजितः ।
स्तूयमानो योगिगणैः राममाभाष्य सत्वरः ।
कृताञ्जलिपुटो भूत्वा तुष्टाव रघुनन्दनम् ॥ ४३ ॥
तसाच वेष व भूषणे असणार्‍या विष्णूच्या चार पार्षदांनी पूजिलेल्या आणि योगी लोकांनी स्तुती केलेल्या जटायूने रामांना उद्देशून सत्वर हात जोडून, त्यांची स्तुती केली. (४३)

जटायु उवाच
अगणितगुणमप्रमेयमाद्यं
     सकलजगत्स्थितिसंयमादिहेतुम् ।
उपरमपरं परात्मभूतं
     सततमहं प्रणतोऽस्मि रामचन्द्रम् ॥ ४४ ॥
जटायू म्हणाला- "जे अगणित गुणांनी युक्त आहेत, जे अप्रमेय आहेत, जे जगाचे आदिकारण आहेत, जे सर्व जगाची स्थिती, नाश इत्यादींचा हेतू आहेत, जे श्रेष्ठ शांत स्वरूप आहेत आणि जे परमात्मा आहेत त्या रामचंद्रांना मी सतत प्रणाम करतो. (४४)

निरवधिसुखमिन्दिराकटाक्षं
     क्षपितसुरेन्द्रचतुर्मुखादिदुःखम् ।
नरवरमनिशं नतोऽस्मि रामं
     वरदमहं वरचापबाणहस्तम् ॥ ४५ ॥
जे अमर्याद आनंदस्वरूप आहेत, ज्यांच्याकडे लक्ष्मी प्रेमाने पाहात राहते, परंतु तृप्त होत नाही. ज्यांनी इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी देवांचे दुःख हरण केले आहे. जे नरश्रेष्ठ आहेत, जे वर देणारे आहेत, आणि ज्यांच्या हातात धनुष्य व बाण आहेत, अशा रामांपुढे मी रात्रंदिवस नतमस्तक आहे. (४५)

त्रिभुवनकमनीयरूपमीड्यं
     रविशतभासुरमीहितप्रदानम् ।
शरणदमनिशं सुरागमूले
     कृतनिलयं रघुनन्दनं प्रपद्ये ॥ ४६ ॥
तीनही भुवनांत ज्यांचे रूप सर्वात जास्त सुंदर आहे, जे स्तुती करण्यास पात्र आहेत, जे शेकडो सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहेत, जे इष्ट फळ देणारे आहेत, जे रक्षण करणारे आहेत आणि भक्तांच्या अतिशय भक्तिमूलक हृदयात जे वास करून राहातात, अशा रघुनंदनांना मी अहर्निश शरण जातो. (४६)

भवविपिनदवाग्निनामधेयं
     भवमुखदैवतदैवतं दयालुम् ।
दनुजपतिसहस्रकोटिनाशं
     रवितनयासदृशं हरिं प्रपद्ये ॥ ४७ ॥
ज्यांचे नाव हे संसाररूपी अरण्याला वणव्याप्रमाणे नष्ट करणारे आहे, जे शंकरादी दैवतांचे दैवत आहेत, जे दयाळू आहेत, कोट्यवधी दानव श्रेष्ठांचा ज्यांनी नाश केला आहे आणि सूर्यकन्या यमुनेप्रमाणे जे श्यामवर्ण आहेत, अशा हरींना मी शरण जातो. (४७)

अविरतभवभावनातिदूरं
     भवविमुखैर्मुनिभिः सदैव दृश्यम् ।
भवजलधिसुतारणाङ्‌घ्रिपोतं
     शरणमहं रघुनन्दनं प्रपद्ये ॥ ४८ ॥
संसारात सतत वासना ठेवणार्‍या माणसांपासून जे अतिशय दूर आहेत, या उलट संसाराला विमुख असणार्‍या मुनींना जे नेहमीच दृश्यमान असतात, संसारसागर चांगल्याप्रकारे तरून जाण्यास ज्यांचे चरण हे नौका आहेत, अशा रघुनंदनांना मी शरण जातो. (४८)

गिरिशगिरिसुतामनोनिवासं
     गिरिवरधारिणमीहिताभिरामम् ।
सुरवरदनुजेन्द्रसेविताङ्‌घ्रिं
     सुरवरदं रघुनायकं प्रपद्ये ॥ ४९ ॥
शंकर आणि पार्वती यांच्या मनांत ज्याचा निवास आहे, ज्यांनी श्रेष्ठ असा गोवर्धन पर्वत उचलून धरला होता, ज्यांचे चरित्र मनोवेधक आहे, श्रेष्ठ देव आणि दानवांचे राजे यांच्याकडून ज्यांचे चरणकमल सेविले जातात आणि जे देवांना वर देतात, अशा रघुनायकांना मी शरण जातो. (४९)

परधनपरदारवर्जितानां
     परगुणभूतिषु तुष्टमानसानाम् ।
परहितनिरतात्मनां सुसेव्यं
     रघुवरमम्बुजलोचनं प्रपद्ये ॥ ५० ॥
परद्रव्य आणि परस्त्री हे ज्यांनी वर्ज्य केले आहे, दुसर्‍याचे गुण आणि वैभव यांचे बाबतीत ज्यांचे मन प्रसन्न असते, दुसर्‍यांचे हित करण्यात ज्यांचे मन सदा तत्पर असते, अशा संतपुरुषांकडून ज्यांची उत्तम सेवा केली जाते, अशा कमलनयन रघुश्रेष्ठांना मी शरण आहे. (५०)

स्मितरुचिरविकासिताननाब्ज-
     मतिसुलभं सुरराजनीलनीलम् ।
सितजलरुहचारुनेत्रशोभं
     रघुपतिमीशगुरोर्गुरुं प्रपद्ये ॥ ५१ ॥
ज्यांचे मुखकमल मनोहर स्मिताने सुशोभित झाले आहे, जे भक्तांना प्राप्त होण्यास अतिशय सुलभ आहेत, जे इंद्रनील मण्याप्रमाणे नीलरंगाचे आहेत, श्वेत कमळाप्रमाणे ज्यांच्या सुंदर नेत्रांची शोभा आहे, जे शंकरांच्या गुरूंचे गुरू आहेत, अशा रघुनाथांना मी शरण आहे. (५१)

हरिकमलजशम्भुरूपभेदा-
     त्त्वमिह विभासि गुणात्रयानुवृत्तः ।
रविरिव जलपूरितोदपात्रे-
     ष्वमरपतिस्तुतिपात्रमीशमीडे ॥ ५२ ॥
हे श्रीराम, पाण्याने भरलेल्या जलपात्रांमध्ये ज्या प्रमाणे एकच सूर्य (अनेक प्रकारांनी) प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या समूहाशी संबंध असल्यामुळे तुम्हीच येथे या विश्वात विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर अशा भिन्न रूपांत भासता. देवराज इंद्राच्या स्तुतीबर पात्र असणार्‍या आणि ईश्वरस्वरूप असणार्‍या तुमची मी स्तुती करतो. (५२)

रतिपतिशतकोटिसुन्दराङ्‌गं
     शतपथगोचरभावनाविदूरम् ।
यतिपतिहृदये सदा विभातं
     रघुपतिमार्तिहरं प्रभुं प्रपद्ये ॥ ५३ ॥
कोट्यवधी मदनांपेक्षा ज्यांचे शरीर सुंदर आहे, शेकडो मार्गावर भरकटलेल्या लोकांपासून जे अतिशय दूर आहेत (किंवा शतपथ ब्राह्मणातील बृहदारण्यक उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे प्रेम भावनेने ज्यांची प्राप्ती दूर नाही), श्रेष्ठ यतीच्या हृदयात जे सदा प्रकाशित असतात आणि जे दुःख हरण करतात, अशा प्रभू रघुपतींना मी शरण जातो." (५३)

इत्येवं स्तुवतस्तस्य प्रसन्नोऽभूद्‌रघूत्तमः ।
उवाच गच्छ भद्रं ते मम विष्णोः परं पदम् ॥ ५४ ॥
अशी स्तुती करणार्‍या त्या जटायूवर रघूत्तम प्रसन्न झाले आणि म्हणाले "तुझे कल्याण असो. विष्णूलोकात तू जा. (५४)

शृणोति य इदं स्तोत्रं लिखेद्वा नियतः पठेत् ।
स याति मम सारूप्यं मरणे मत्स्मृतिं लभेत् ॥ ५५ ॥
जटायूने उच्चारलेले हे स्तोत्र जो कोणी ऐकतो, लिहून काढतो अथवा नियमितपणे पठण करतो, त्याला मरणकाळी माझी स्मृती येते आणि तो माझे सारूप्य प्राप्त करून घेतो." (५५)

इति राघवभाषितं तदा
     श्रुतवान् हर्षसमाकुलो द्विजः ।
रघुनन्दनसाम्यमास्थितः
     प्रययौ ब्रह्मसुपूजितं पदम् ॥ ५६ ॥
असे हे रामांचे भाषण त्या वेळी आनंदित झालेल्या जटायू पक्ष्यााने ऐकले आणि रघुनंदनांप्रमाणे समान रूप धारण केलेला तो जटायू ब्रह्मदेवाने उत्तम प्रकारे पूजिलेल्या विष्णूच्या परमधामात निघून गेला. (५६)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
अरण्यकाण्डातील आठवा सर्गः समाप्त ॥


GO TOP