[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रिपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतया रावणस्य धिक्कारणम् -
सीतेचे रावणास धिक्कारणे -
खमुत्पतन्तं तं दृष्ट्‍वा मैथिली जनकात्मजा ।
दुःखिता परमोद्विग्ना भये महति वर्तिनी ॥ १ ॥
रावणाला आकाशात उडताना पाहून मैथिली जानकी दुःखमग्न होऊन अत्यंत उद्विग्न होऊन गेली. ती फार मोठ्‍या भयात पडली होती. ॥१॥
रोषरोदनताम्राक्षी भीमाक्षं राक्षसाधिपम् ।
रुदन्ती करुणं सीता ह्रियमाणा तमब्रवीत् ॥ २ ॥
रोष आणि रडणे यामुळे तिचे डोळे लाल झाले होते. हरण केली जाणारी ती सीता करूणाजनक स्वरात रडत रडत त्या भयंकर नेत्र असणार्‍या राक्षसराजास याप्रमाणे म्हणली- ॥२॥
न व्यपत्रपसे नीच कर्मणानेन रावण ।
ज्ञात्वा विरहितां यो मां चोरयित्वा पलायसे ॥ ३ ॥
अरे नीच रावणा ! तुला आपल्या या कुकर्मामुळे जराही लाज वाटत नाही कां ? की ज्यायोगे तू मला स्वामींच्या विरहित एकटी आणि असहाय जाणूनही चोरून पळून जात आहेस ? ॥३॥
त्वयैव नूनं दुष्टात्मन् भीरुणा हर्तुमिच्छता ।
ममापवाहितो भर्ता मृगरूपेण मायया ॥ ४ ॥
दुष्टात्म्या ! तू फारच भ्याड आणि भित्रा आहेस. निश्चितच माझे हरण करून घेऊन जाण्याच्या इच्छेने तूच मायेच्या योगे मृगरूपास उपस्थित होऊन माझ्या स्वामींना आश्रमापासून दूर घेऊन गेलास. ॥४॥
यो हि मामुद्यतस्त्रातुं सोऽप्ययं विनिपातितः ।
गृध्रराजः पुराणोऽसौ श्वशुरस्य सखा मम ॥ ५ ॥
माझ्या श्वसुरांचे मित्र ते जे वृद्ध जटायु माझे रक्षण करण्यास उद्यत झाले होते, त्यांनाही तू मारून टाकलेस. ॥५॥
परमं खलु ते वीर्यं दृश्यते राक्षसाधम ।
विश्राव्य नामधेयं हि युद्धे नास्मि जिता त्वया ॥ ६ ॥

ईदृशं गर्हितं कर्म कथं कृत्वा न लज्जसे ।
स्त्रियाश्चाहरणं नीच रहिते च परस्य च ॥ ७ ॥
नीच राक्षसा ! अवश्यच तुझ्या ठिकाणी फार मोठे बळ दिसून येत आहे (कारण की - तू वृद्ध पक्ष्यास ठार मारून टाकले आहेस.) तू आपले नाव सांगून श्रीराम- लक्ष्मणां बरोबर युद्ध करून मला जिंकलेले नाहीस. अरे, नीचा ! जेथे कोणी राक्षस नसेल, अशा स्थानावर जाऊन परक्याच्या स्त्रीचे अपहरण करण्यासारखे निंद्य कर्म करून तू लज्जित कसा होत नाहीस ? ॥६-७॥
कथयिष्यन्ति लोकेषु पुरुषाः कर्म कुत्सितम् ।
सुनृशंसमधर्मिष्ठं तव शौटीर्यमानिनः ॥ ८ ॥
तू तर आपल्याला मोठा शूर-वीर मानतो आहेस; परंतु संसारांतील सर्व वीर पुरुष तर या कर्माला घृणित, क्रूरतापूर्ण, आणि पापरूपच म्हणतील. ॥८॥
धिक् ते शौर्यं च सत्त्वं च यत्त्वया कथितं तदा ।
कुलाक्रोशकरं लोके धिक् ते चारित्रमीदृशम् ॥ ९ ॥
तू प्रथमच स्वतः ज्याचे मोठ्‍या आवेशाने वर्णन केले होतेस, त्या तुझ्या शौर्याचा आणि बलाचा धिक्कार आहे. कुळाला कलंक लावणार्‍या तुझ्या अशा चरित्राचा संसारात सदा धिक्कारच केला जाईल. ॥९॥
किं शक्यं कर्तुमेवं हि यज्जवेनैव धावसि ।
मुहूर्तमपि तिष्ठ त्वं न जीवन् प्रतियास्यसि ॥ १० ॥
परंतु या समयी काय करता येणे शक्य आहे ? कारण की तू अत्यंत वेगाने पळून जात आहेस. अरे ! एक मुहूर्तपर्यंत तर थांबून राहा मग नंतर येथून तू जिवंत परत जाऊ शकणार नाहीस. ॥१०॥
न हि चक्षुःपथं प्राप्य तयोः पार्थिवपुत्रयोः ।
ससैन्योऽपि समर्थस्त्वं मुहूर्तमपि जीवितुम् ॥ ११ ॥
त्या दोन्ही राजकुमारांच्या दृष्टिपथात आल्यावर तू सेनेसहित असलास तरी मुहूर्तभरही जिवंत राहू शकणार नाहीस. ॥११॥
न त्वं तयोः शरस्पर्शं सोढुं शक्तः कथञ्चन ।
वने प्रज्वलितस्येव स्पर्शमग्नेर्विहंगमः ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे कुणी आकाशगामी पक्षी वनात प्रज्वलित झालेल्या दावानलाचा स्पर्श सहन करण्यास समर्थ होत नाही, त्याच प्रकारे तू माझे पति आणि त्यांचा भाऊ, दोघांच्याही बाणांचा स्पर्श कशाही प्रकारे सहन करू शकणार नाहीस. ॥१२॥
साधु कृत्वाऽऽत्मनः पथ्यं साधु मां मुञ्च रावण ।
मत्प्रधर्षणसंक्रुद्धो भ्रात्रा सह पतिर्मम ॥ १३ ॥

विधास्यति विनाशाय त्वं मां यदि न मुञ्चसि ।
रावणा ! जर तू मला सोडून देत नसशील तर माझ्या अपमानाने कुपित झालेले माझे पतिदेव आपल्या भावासह चढाई करून येतील आणि तुझ्या विनाशाचा उपाय करतील म्हणून तू स्वतःच्या हिताचा उत्तम प्रकारे विचार कर आणि मला सोडून दे. हेच तुझ्या हिताचे ठरेल. ॥१३ १/२॥
येन त्वं व्यवसायेन बलान्मां हर्तुमिच्छसि ॥ १४ ॥

व्यवसायस्तु ते नीच भविष्यति निरर्थकः ।
नीचा ! तू ज्या संकल्पाने अथवा अभिप्रायाने बलपूर्वक माझे हरण करू इच्छित आहेस, तुझा तो अभिप्राय व्यर्थ होईल. ॥१४ १/२॥
न ह्यहं तमपश्यन्ती भर्तारं विबुधोपमम् ॥ १५ ॥

उत्सहे शत्रुवशगा प्राणान् धारयितुं चिरम् ।
मी आपल्या देवोपम पतिचे दर्शन न मिळाल्याने शत्रूच्या अधीनतेत अधिक काळपर्यंत आपल्या प्राणांना धारण करू शकणार नाही. ॥१५ १/२॥
न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे ॥ १६ ॥

मृत्युकाले यथा मर्त्यो विपरीतानि सेवते ।
मुमूर्षूणां तु सर्वेषां यत् पथ्यं तन्न रोचते ॥ १७ ॥
निश्चितच तू आपल्या कल्याणाचा आणि हिताचा विचार करीत नाहीस. जसे मरणासमयी मनुष्य स्वास्थ्य विरोधी पदार्थांचे सेवन करू लागतो, तीच दशा तुझी आहे. प्रायः सर्व मरणासन्न पुरुषांना पथ्य रुचत नाही. ॥१६-१७॥
पश्यामीह हि कण्ठे त्वां कालपाशावपाशितम् ।
यथा चास्मिन् भयस्थाने न बिभेषि निशाचर ॥ १८ ॥
निशाचरा ! मी पहात आहे की तुझ्या गळ्यात काळाचा पाश पडला आहे, यामुळेच तू भयाच्या ठिकाणीही निर्भय बनला आहेस. ॥१८॥
व्यक्तं हिरण्मयांत्वं सम्पश्यसि महीरुहान् ।
नदीं वैतरणीं घोरां रुधिरौघविवाहिनीम् ॥ १९ ॥

खड्गपत्रवनं चैव भीमं पश्यसि रावण ।
तप्तकाञ्चनपुष्पां च वैदूर्यप्रवरच्छदाम् ॥ २० ॥

द्रक्ष्यसे शाल्मलीं तीक्ष्णामायसैः कण्टकैश्चिताम् ।
रावणा ! अवश्यच तू सुवर्णमय वृक्षांना पाहात आहेस, रक्ताचा स्त्रोत वाहवणारी भयंकर वैतरणी नदी हिचे दर्शन करीत आहेस, भयानक असिपत्र वनालाही पहाण्याची इच्छा करीत आहेस आणि ज्यात तापविलेल्या सुवर्णासमान फुले आणि श्रेष्ठ वैडूर्यमण्यासमान पाने आहेत आणि ज्यामध्ये लोखंडाचे काटे विणले गेले आहेत, त्या तीक्ष्ण शाल्मलिचेही तू शीघ्र दर्शन करशील. ॥१९-२० १/२॥
न हि त्वमीदृशं कृत्वा तस्यालीकं महात्मनः ॥ २१ ॥

धरितुं शक्ष्यसि चिरं विषं पीत्वेव निर्घृणः ।
बद्धस्त्वं कालपाशेन दुर्निवारेण रावण ॥ २२ ॥
निर्दय निशाचरा ! तू महात्मा श्रीरामांचा असा महान्‌ अपराध करून विषपान केलेल्या मनुष्याप्रमाणेच अधिक काळपर्यंत जीवन धारण करू शकणार नाहीस. रावणा ! तू अटळ कालपाशात बांधला गेला आहेस. ॥२१-२२॥
क्व गतो लप्स्यसे शर्म भर्तुर्महात्मनः ।
निमेषान्तरमात्रेण विना भ्रातरमाहवे ॥ २३ ॥

राक्षसा निहता येन सहस्राणि चतुर्दश ।
कथं स राघवो वीरः सर्वास्त्रकुशलो बली ॥ २४ ॥

न त्वां हन्याच्छरैस्तीक्ष्णैरिष्टभार्यापहारिणम् ।
माझ्या महात्मा पतिपासून वाचून तू कोठे जाऊन शान्ति प्राप्त करू शकशील ? ज्यांनी आपला भाऊ लक्ष्मण याच्या सहाय्याशिवायच युद्धात डोळ्याचे पाते लवते न लवते तोच चौदा हजार राक्षसांचा विनाश करून टाकला, ते संपूर्ण अस्त्रांचे प्रयोग करण्यात कुशल, बलवान्‌ वीर राघव आपल्या प्रिय पत्‍नीचे अपहरण करणार्‍या तुझ्या सारख्या पाप्याला तीक्ष्ण बाणांच्या द्वारे काळाच्या मुखात का धाडून देणार नाहीत ? ॥२३-२४ १/२॥
एतच्चान्यच्च परुषं वैदेही रावणाङ्‌कगा ।
भयशोकसमाविष्टा करुणं विललाप ह ॥ २५ ॥
रावणाच्या जाळ्यात फसलेली वैदेही सीता भय आणि शोकाने व्याकुळ होऊन तसेच या प्रमाणेच आणखीही बरीचशी कठोर वचने ऐकवून करूण स्वरात विलाप करू लागली. ॥२५॥
तथा भृशार्तां बहु चैव भाषिणीं
     विलापपूर्वं करुणं च भामिनीम् ।
जहार पापस्तरुणीं विचेष्टतीं
     नृपात्मजामागतगात्रवेपथुः ॥ २६ ॥
अत्यंत दुःखाने आतुर होऊन विलापपूर्वक बरीचशी करूणाजनक वचने बोलत आणि सुटण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्‍न करणार्‍या तरूण भामिनी राजकुमारी सीतेला तो पापी निशाचर हरण करून घेऊन गेला. त्यासमयी अधिक भारामुळे त्याचे शरीर कांपत होते. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP