[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शूर्पणखया खरपार्श्वमुपगम्य राक्षवधवृत्तान्तं निवेद्य श्रीरामतो भयं प्रदर्श्य खरस्य युद्धार्थं प्रोत्साहनम् - शूर्पणखेने खराजवळ त्या राक्षसांच्या वधाचा समाचार सांगणे आणि रामाचे भय दाखवून त्याला युद्धासाठी उत्तेजित करणे -
स पुनः पतितां दृष्ट्‍वा क्रोधाच्छूर्पणखां खरः ।
उवाच व्यक्तया वाचा तामनर्थार्थमागताम् ॥ १ ॥
शूर्पणखेला पुन्हा पृथ्वीवर पडलेली पाहून अनर्थासाठीच आलेल्या त्या बहिणीला खराने क्रोधपूर्वक स्पष्ट वाणीमध्ये परत म्हटले- ॥१॥
मया त्विदानीं शूरास्ते राक्षसा पिशिताशनाः ।
त्वत्प्रियार्थं विनिर्दिष्टाः किमर्थं रुद्यते पुनः ॥ २ ॥
’भगिनी ! मी तुझे प्रिय करण्यासाठी त्यावेळी बरेचसे शूरवीर आणि मांसाहारी राक्षसांना जाण्याची आज्ञा दिली होती, आता परत तू कशासाठी रडत आहेस ?’ ॥२॥
भक्ताश्चैवानुरक्ताश्च हिताश्च मम नित्यशः ।
हन्यमाना न हन्यन्ते न न कुर्युर्वचो मम ॥ ३ ॥
’मी ज्या राक्षसांना धाडले होते, ते माझे भक्त, माझ्या ठिकाणी अनुराग ठेवणारे आणि सदा माझे हित इच्छिणारे आहेत. कुणी मारूनही ते मरू शकत नाहीत. त्यांच्या द्वारे माझ्या आज्ञेचे पालन होणार नाही असेही कधी संभव नाही. ॥३॥
किमेतच्छ्रोतुमिच्छामि कारणं यत्कृते पुनः ।
हा नाथेति विनर्दन्ती सर्पवच्चेष्टसे क्षितौ ॥ ४ ॥
’मग असे काय कारण उपस्थित झाले आहे की ज्यासाठी तू ’ हा नाथ’ असे ओरडत सापाप्रमाणे जमिनीवर लोळत आहेस. मी ते (कारण) ऐकू इच्छितो.’ ॥४॥
अनाथवद् विलपसि किं नु नाथे मयि स्थिते ।
उत्तिष्ठोत्तिष्ठ मा मैवं वैक्लव्यं त्यज्यतामिति ॥ ५ ॥
’माझ्या सारखा संरक्षक असतांना तू अनाथा सारखी विलाप का करीत आहेस ? उठ ! उठ ! या प्रमाणे लोळू नको. भीती टाकून दे.’ ॥५॥
इत्येवमुक्ता दुर्धर्षा खरेण परिसान्त्विता ।
विमृज्य नयने सास्त्रे खरं भ्रातरमब्रवीत् ॥ ६ ॥
खराने या प्रकारे सांत्वना दिल्यावर ती दुर्धषु राक्षसी आपले अश्रूनी भरलेले डोळे पुसून भाऊ खर यांस म्हणाली - ॥६॥
अस्मीदानीमहं प्राप्ता हतश्रवणनासिका ।
शोणितौघपरिक्लिन्ना त्वया च परिसान्त्विता ॥ ७ ॥
’भाऊ, मी या समयी परत तुझ्या जवळ का आले आहे - हे सांगते, ऐक. - माझे नाक- कान कापले गेले आणि मी रक्ताच्या धारेने न्हाऊन निघाले. या अवस्थेत जेव्हा पहिल्या वेळी मी आले होते, त्यावेळी तू माझे फारच सांत्वन केले होतेस. ॥७॥
प्रेषिताश्च त्वया शूरा राक्षसास्ते चतुर्दश ।
निहन्तुं राघवं घोरं मत्प्रियार्थं सलक्ष्मणम् ॥ ८ ॥

ते तु रामेण सामर्षाः शूलपट्टिशपाणयः ।
समरे निहताः सर्वे सायकैर्मर्मभेदिभिः ॥ ९ ॥
’तत्पश्चात माझे प्रिय करण्यासाठी लक्ष्मणासहित रामाचा वध करण्याच्या उद्देश्याने तू प्रथम जे ते चौदा शूरवीर राक्षस धाडले होतेस ते सर्वच्या सर्व अमर्षाने भरून हातात शूल आणि पट्टिश घेऊन तेथे जाऊन पोहोंचले, परंतु रामांनी आपल्या मर्मभेदी बाणांच्या द्वारा त्या सर्वांना समरंगणामध्ये ठार मारून टाकले. ॥८-९॥
तान् भूमौ पतितान् दृष्ट्‍वा क्षणेनैव महाजवान् ।
रामस्य च महत्कर्म महांस्त्रासोऽभवन्मम ॥ १० ॥
’त्या महान वेगवान निशाचरांना क्षणभरातच धराशायी झालेले पाहून रामाच्या त्या महान पराक्रमावर दृष्टिपात करून माझ्या मनांत फार मोठे भय उत्पन्न झाले.’ ॥१०॥
सास्मि भीता समुद्विग्ना विषण्णा च निशाचर ।
शरणं त्वां पुनः प्राप्ता सर्वतो भयदर्शिनी ॥ ११ ॥
’निशाचर राज ! मी भयभीत, उद्विग्न आणि विषादग्रस्त झाले आहे. मला सर्वत्र भयच भय दिसून येत आहे म्हणून मी परत तुला शरण आले आहे.’ ॥११॥
विषादनक्राध्युषिते परित्रासोर्मिमालिनि ।
किं मां न त्रायसे मग्नां विपुले शोकसागरे ॥ १२ ॥
’मी शोकाच्या या विशाल समुद्रात बुडून गेले आहे जेथे विषादरूपी मगरी निवास करीत आहेत आणि त्रासरूपी तरंग माला उठत आहे. तू त्या शोक सागरातून माझा उद्धार कां करीत नाहीस ?’ ॥१२॥
एते च निहता भूमौ रामेण निशितैः शरैः ।
ये च मे पदवीं प्राप्ता राक्षसाः पिशिताशनाः ॥ १३ ॥
’जे मांसभक्षी राक्षस माझ्या बरोबर गेले होते, ते सर्वच्या सर्व रामांच्या तीक्ष्ण बाणांनी मारले जाऊन पृथ्वीवर पडलेले आहेत. ॥१३॥
मयि ते यद्यनुक्रोशो यदि रक्षःसु तेषु च ।
रामेण यदि ते शक्तिस्ते तेजो वास्ति निशाचर ॥ १४ ॥

दण्डकारण्यनिलयं जहि राक्षसकण्टकम् ।
’राक्षसराज ! जर माझ्या विषयी आणि मेलेल्या राक्षसाविषयी तुला दया येत असेल तसेच जर रामांबरोबर युद्ध करण्याची तुझ्यात शक्ती आणि तेज असेल तर त्यांना मारून टाक कारण की दण्डकारण्यात घर बनवून राहाणारे राम राक्षसांसाठी कष्टक आहेत.’ ॥१४ १/२॥
यदि रामममित्रघ्नं न त्वमद्य वधिष्यसि ॥ १५ ॥

तव चैवाग्रतः प्राणांस्त्यक्ष्यामि निरपत्रपा ।
’जर तू आजच शत्रुघाती रामाचा वध केला नाहीस तर मी तुझ्या समोरच आपल्या प्राणांचा त्याग करीन कारण की माझी लाज लुटली गेली आहे.’ ॥१५ १/२॥
बुद्ध्याहमनुपश्यामि न त्वं रामस्य संयुगे ॥ १६ ॥

स्थातुं प्रतिमुखे शक्तः सबलोऽपि महारणे ।
’मी बुद्धिने वारंवार विचार करून पहात आहे की तू महासमरात सबल होऊन ही युद्धात रामांच्या समोर टिकू शकणार नाहीस.’ ॥१६ १/२॥
शूरमानी न शूरस्त्वं मिथ्यारोपितविक्रमः ॥ १७ ॥

अपयाहि जनस्थानात् त्वरितः सहबान्धवः ।
जहि तं समरे मूढान्यथा तु कुलपांसन ॥ १८ ॥
’तू आपल्याला शूरवीर मानीत आहेस, परंतु तुझ्यामध्ये शौर्य नाहीच आहे. तू खोटेच स्वतः स्वतःवर पराक्रमाचा आरोप करून घेतला आहेस. मूढा ! तू समरंगणात त्या दोघांना मारून टाक अन्यथा आपल्या कुळाला कलंक लावून बंधु-बांधवांसहित तात्काळच या जनस्थानांतून पळून जा.’ ॥१७-१८॥
मानुषौ तौ न शक्नोषि हन्तुं तौ रामलक्ष्मणौ ।
निःसत्त्वस्याल्पवीर्यस्य वासस्ते कीदृशस्त्विह ॥ १९ ॥
’राम आणि लक्ष्मण मनुष्य आहेत. जर त्यांनाही मारण्याची तुझ्यात शक्ती नसेल तर तुझ्या सारख्या निर्बल आणि पराक्रमशून्य राक्षसाचे येथे राहाणे कसे संभव असू शकते ?’ ॥१९॥
रामतेजोभिभूतो हि त्वं क्षिप्रं विनशिष्यसि ।
स हि तेजःसमायुक्तो रामो दशरथात्मजः ॥ २० ॥

भ्राता चास्य महावीर्यो येन चास्मि विरूपिता ।
’तू रामाच्या तेजाने पराजित होऊन शीघ्रच नष्ट होऊन जाशील, कारण की दशरथकुमार राम फारच तेजस्वी आहेत. त्यांचा भाऊ ही महान पराक्रमी आहे, ज्याने मला नाक- कान- हीन (रहित) करून अत्यंत कुरूप बनविले आहे.’ ॥२० १/२॥
एवं विलप्य बहुशो राक्षसी प्रदरोदरी ॥ २१ ॥

भ्रातुः समीपे दुःखार्ता नष्टसंज्ञा बभूव ह ।
कराभ्यामुदरं हत्वा रुरोद भृशदुःखिता ॥ २२ ॥
या प्रकारे बराच विलाप करून गुहेच्या समोर ती मोठे पोट असणारी राक्षसी शोकाने आतुर होऊन आपल्या भावाजवळ जाऊन जणु मूर्छित सारखी झाली आणि अत्यंत दुःखी होऊन हातांनी पोटावर मारून घेत स्फुंदून स्फुंदून रडू लागली. ॥२१-२२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकविंशः सर्गः ॥ २१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥२१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP