॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय पंचाऐंशीवा ॥
राज्याविषयी लक्ष्मणाची विरक्ती -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा आनंदसोहळा :


श्रीरामाचें अभिषिंचन । आनंदमय त्रिभुवन ।
भक्तवृंद सुखैकघन । आनंदें पूर्ण गर्जती ॥ १ ॥
भद्रीं बैसला रघुनाथ । ब्रह्मांड सुखें दुमदुमित ।
विनोदें श्रीरामाचे भक्त । रामसुखार्थ दाविती क्रिया ॥ २ ॥
श्रीरामसुखें संपन्न । संतोषावया रघुनंदन ।
अग्निक्रीडा मांडिली पूर्ण । औषध भरून रज तम ॥ ३ ॥


दारूकामाचे रूपकात्मक अनुपम सुंदर वर्णन :


तीव्ररजतमांची औषधे । करोनि अग्नियंत्रें सन्नद्धें ।
श्रीरामभक्तिआनंदें । क्रीडा विनोर्दे मांडिली ॥४ ॥
सूक्ष्म ममतेची हवाई । पहिली आणियेली पाही ।
वैराग्यवाती लावितां ठायीं । चिद्‌गगनीं तेही उसळली ॥ ५ ॥
गुरुवाक्यें प्रज्याळिली । सद्विवेकें आंबुथिली ।
लागतां हवाई जळाली । क्षणें उडाली चिद्‌गगनीं ॥ ६ ॥
अहंकाराचा बाण कठिण । गुरुवचनें प्रज्याळितां पूर्ण ।
उततला न लागतां क्षण । आब्रह्मभुवन प्रकाशलें ॥ ७ ॥
सुटतां अहंकाराचा बाण । सोहं जाळिलें चिद्‌गगन ।
देखोनियां रघुनंदन । सुखैकघन स्वयें झाला ॥ ८ ॥
तंव आणिक नवलपरी । आशातृष्णेच्या चिचुंदरी ।
भरून आणिल्या झडकरी । पीडिले भारी लोक तिन्हीं ॥ ९ ॥
विसरोनि रघुकुळटिळक । पाहूं लागले कौतुक ।
त्यांसी जाळित उठल्या देख । एक एक शोधूं शोधूं ॥ १० ॥
वेगें जाळित उरी शिरीं । भडका उठला हृदयावरी ।
खांडमिशा तोंडावरी । वस्त्रामाझारीं घुसती ॥ ११ ॥
श्रीरामविमुख विषयेंकरोनी । त्यांची होतसे भंगाणी ।
सोवळ्या धोत्रां दाणादाणी । उघडी पाडोनी जाळिती ॥ १२ ॥
देखोनि तयांचे कौतुक । भक्त हासती अलोलिक ।
सात्विक उपहासिती देख । रघुकुळटिळक तटस्थ ॥ १३ ॥
विचित्र संकल्पाच्या फुलवाती । रम्यसुमनाकार भासती ।
निर्धार करितां निगुतीं । रक्षा निश्चिती प्रत्यक्ष ॥ १४ ॥
रामभक्ताच्या निरीक्षणयुक्ती । लावोनि अनुसंधानाच्या वाती ।
श्रीरामदृष्टीं भस्म करिती । क्षणही निश्चिती न लागतां ॥ १५ ॥
कामक्रोधांचे अति उद्‌भट । भुईनळे पै घनदाट ।
माजी अभिनव काळकर्कोट धूम निघत मदमत्सरांचा ॥ १६ ॥
व्यापीत चालिला गगन । आच्छादित जननयन ।
अविवेक्यापीडा गहन । खवट घाण घसां भरे ॥ १७ ॥
देखोनयां श्रीरामभक्त । खवळले अत्यद्‌भुत ।
अनुभवाचा हत्ती मस्त । रवंदळित सोडिला ॥ १८ ॥
अहंममतेचा नाद क्रूर । त्यातें आच्छादोनि सत्वर ।
स्वानंदें गर्जोनियां थोर । केला चूर तयाचा ॥ १९ ॥
निजबोधचंद्रज्योति पूर्ण । तेणें उजळिलें त्रिभुवन ।
प्रकाश दाटला पूर्ण । मीतूंपण असेना ॥ २० ॥
ऐसा निजभक्ताचा अद्‌भुत । देखोनियां पुरुषार्थ ।
संतोषला श्रीरघुनाथ । आलिंगित हदयेसीं ॥ २१ ॥
श्रीरामहृदया हृदय मिनलें । तेणें रामहृद्‌गत सगळें ।
निजहृदया तत्काळ आलें । सुख कोंदलें अगाध ॥ २२ ॥
निजराज्यें सुखैकघन । स्वयें होवोनि रघुनंदन ।
मिनले जे ऋषिजन । मांडिलें संभावन तयांचें ॥ २३ ॥


सहस्त्रशतमश्वानां धेनूनां च गवां शतम् ।
ददौ शतवृषान् पूर्वद्विजेभ्यो मनुजेश्वरः ॥ १ ॥
त्रिंशत्‌कोटिहिरण्यस्य ब्राह्मणेभ्यो ददौ पुनः ।
ननभरणवस्त्राणि महार्हाणि च राघव: ॥ २ ॥


श्रीरामांनी वसिष्ठादिकांची पूजा करून त्यांना सहस्रशः गोदाने व द्रव्यदाने दिली :


वसिष्ठादि प्रमुख । क्रषिमंडळीं अलोलिक ।
श्रीरामासी अभिषेक । मंत्रोक्त देख जिहीं केला ॥ २४ ॥
वेदोक्त विधिपाळण । करोनि होम प्रधान ।
लोकपाळां संतोषवून । रघुनंदन अभिषेकिला ॥ २५ ॥
तयां क्रषीश्वरांची पूजा । करिता झाला रघुराजा ।
वसिष्ठ निजगुरू वोजा । प्रथम पूजा तयाची ॥ २६ ॥
कामधेनूचीं शतसहस्रें । सुवर्णशृंगी रौप्यखुरे ।
सवृषभ युग्में परिकरें । द्रव्यें अपारें कोटिसंख्या ॥ २७ ॥
धान्यकोठारें असंख्य पूर्ण । श्रीरामें सद्‌गुरु पूजिला जाण ।
तैसेचि ऋषी इतर जन । श्रीरामें आपण पूजिले ॥ २८ ॥
रोड दुर्बळ दीन याचक । श्रीरामदर्शनें सकळां सुख ।
सांगणें मागणें ठेलें निःशेख । मनोवृत्ति देख नित्यतृप्त ॥ २९ ॥
देखतां श्रीराम श्रीमुख । याचकासी झालें परम सुख ।
तृप्तीची दोंदे पेलली देख । हरिखें हरिख दाटला ॥ ३० ॥
श्रीराम दानें देतां प्रबळ । नगरी मागत्यांचा दुकाळ ।
सकळां स्वसुखाचा कल्लोळ । निजानंद केवळ श्रीरामें ॥ ३१ ॥
निष्ठा देखोनि अद्‌भुत । कृपेनें वोळला श्रीरघुनाथ ।
नमागतांचि अभर करित । द्वारीं वोळंगत महासिद्धि ॥ ३२ ॥
वस्त्रें भूषणें सुमन चंदन । सुवासित माळा गहन ।
वसिष्ठा सद्‌गुरुसहित जाण । रामें ब्राह्मण सुखी केले ॥ ३३ ॥


देव-दानव-मानव यांचा श्रीरामांकडून सत्कार :


ऐसें ब्राह्मणांचे पूजन । श्रीरामें केलें आपण ।
मंडळवर्ती राजे जाण । त्याचेंही पूजन तैसेंचि ॥ ३४ ॥
वस्त्रें भूषणें टिळेमाळा । मंडळवर्ती भूपाळां ।
पूजिता झाला घनसांवळा । सन्मान सकळां देवोनी ॥ ३५ ॥
ब्रह्मा इंद्र ईशान । मरुद्‌गणेंसीं' अमरेंद्र जाण ।
दानव मानव पन्नग पूर्ण । स्वयें रघुनंदन पूजित ॥ ३६ ॥
सकळीं आणिलीं उपायनें । त्याहूनि अधिक कोटिगुणें ।
स्वयें देवोनि रघुनंदनें । सकळ सुरगण गौरविले ॥ ३७ ॥
त्याहूनि अनंत अधिक । श्रीरामें देवोनि निजसुख ।
सुखी केले सकळ लोक । द्वंद्वदुःख जेथें न रिघत ॥ ३८ ॥
जेथें न रिघे मीतूंपण । पावों न शके देहाभिमान ।
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । त्रिपुटीचें भान जेथ नाहीं ॥ ३९ ॥
देखतां श्रीराममुख । एवढें पावले निजसुख ।
राम कृपाळू नेटक । आत्मत्वें देख निवविले ॥ ४० ॥
निकटवर्ती निजगण । सुग्रीवादि बिभीषण ।
त्यांची पूजा रघुनंदन । स्वयें आपण करितां झाला ॥ ४१ ॥
पूजावया निजगण । स्वयें बोलवी रघुनंदन ।
तेणें काळें भरत जाण । स्वयें आपण पुढें झाला ॥ ४२ ॥
बिभीषण सुग्रीव हनुमंत । अंगदेसीं अति विनवीत ।
भरतें विनविला रघुनाथ । धर्मयुक्त नीतिवचनें ॥ ४३ ॥
पितृआज्ञा निज नेमस्त । चौदा वर्षे वनवासव्रत ।
स्वामींनी संपादिलें यथार्थ । बंधूसहित स्त्रियेंसी ॥ ४४ ॥
तैसें निजराज्याचें शासन । तुझे आज्ञेकरोनि जाण ।
केलें राज्यपरिपालन । किंकर' दीन मी तुझे ॥ ४५ ॥


आपल्याप्रमाणेच लक्ष्मणाला अभिषेक करण्याची रामांना भरताची विनंती :


पितृआज्ञानिजनेमांतीं । राज्याभिषेक जया रीतीं ।
तुम्हीं अंगाकारिला रघुपती । सौमित्र त्या स्थितीं अभिषेका ॥ ४६ ॥
सांडोनि आहार विहार । तुच्छ करोनियां शरीर ।
श्रीरामसेवे नित्य तत्पर । आठी प्रहर सावध ॥ ४७ ॥
श्रीरामसेवेचें महिमान । ख्याति वर्णी त्रिभुवन ।
सौमित्रें जग पावन । सौमित्रें व्रत साच केलें ॥ ४८ ॥
देहावरी आल्या आघात । श्रीरामभजनीं नव्हे च्युत ।
ऐसें शास्त्र गर्जत । तें केलें यथार्थ सौमित्रें ॥ ४९ ॥
सांडोनि क्षुधेतृषेची आस । कळिकाळावरी घालोनि कांस ।
श्रीराम सेविला सावकाश । भाग्य असोस सौमित्राचें ॥ ५० ॥
यौवराज्यभिषिंचन । त्यासी करावें आपण ।
करोनि श्रमाचें परिहरण । सुखसंपन्न निजराज्यें ॥ ५१ ॥
जैसे भरताचें विनवण । तैसें सुग्रीव बिभीषण ।
अंगदासहित वानरगण । हनुमान आपण विनवीत ॥ ५२ ॥
जिंकोनियां निद्रातंद्रा । निःशेष त्यजोनियां आहार ।
सौमित्रें सेविलें रामभद्रा । जन्मोद्धारालागोनी ॥ ५३ ॥
श्रीरामभजनाची पदवी । आचार्यत्व निजगौरवीं ।
दीक्षा दाखविली बरवी । ख्याति देवीं वानिजे ॥ ५४ ॥
त्या सौमित्राचे अभिषिंचना । यौवराज्य देवोनियां जाणा ।
संतोषवावें रघुनंदना । तूंचि निजजनां कृपाळू ॥ ५५ ॥
भरतआदि निजगण । ऐकोनि तयांचें वचन ।
संतोषला रघुनंदन । सौमित्र आपण बोलाविला ॥ ५६ ॥
कृपापूर्ण रामरावो । सौमित्र बोलावोनि पहाहो ।
सांगता झाला अन्वयो । श्लोकपर्यायो अवधारा ॥ ५७ ॥


नित्यानुरक्तं मेधावी लक्ष्मणं वाक्यमब्रवीत् ॥ ३ ॥
आतिष्ट धर्मज्ञ मया सहेमां गां पूर्वराजाध्युषितां बलेन ।
तुल्यं यथा त्वं पितृभिःपुरस्तात्तैयौवराज्ये धुरमुद्‌वहश्च ॥ ४ ॥


श्रीरामकृत लक्ष्मण प्रशंसा व त्याला यौवराज्यपद स्वीकारण्याची आज्ञा :


सौमित्र सुमित्रानंदना । निजमैत्रीच्या अधिष्ठाना ।
बंधुपणाची अवज्ञा । अगुमात्र जाण तुज नाहीं ॥ ५८ ॥
मी एक बंधु अंतरंग । ऐसा अणमात्र नाहीं दाघ ।
नीचसेवेसी सर्वांग । तुवा सांग वेंचिलें ॥ ५९ ॥
सांडोनि बंधुत्व अभिमान । नीच दासाचेपरी जाण ।
माझे सेवेसीं वेंचिला प्राण । अंगीं बाण साहोनी ॥ ६० ॥
सांडोनि आहारविहार । श्रीरामभजनीं नित्य तत्यर ।
निद्रा नाहीं अहोरात्र । निरंतर सावध ॥ ६१ ॥
मस्तकीं काष्ठाचे संभार । जीवन! वाहिलें निरंतर ।
बांधोनियां निजउदर । आम्हां फळाहार पुरविला ॥ ६२ ॥
त्रिकाळीं चरणक्षाळण । दोघांचें चरणसंवाहन ।
उसंत नाहीं क्षण । तत्प्रवीण अहर्निशीं ॥ ६३ ॥
एक एक दिवसींची सेवा । आठवितां बंधुदेवा ।
कांप येतसे जीवा । देहभावा उरी कैंची ॥ ६४ ॥
सीतेलागीं होवोनि भ्रांत । आप आपणा विसरत ।
तुज मारूं धावे लात । ते तूं निवांत साहिली ॥ ६५ ॥
मी भ्रांत तैं सावध करिसी । मज भागल्या श्रम हरिसी ।
मज शोकाकुलिताचा फेडिसी । सावकाशीं सकळ श्रम ॥ ६६ ॥
तो आठवितां पाहें । हदय फुटोनि ठिकरिया होये ।
बहुत बोलावें म्यां काये । शिवतले पाहें चरण तुझे ॥ ६७ ॥
तुझिया भजनाचें अंकिलें । जीवें सर्वस्व विकिलें ।
यावरी तें काय बोले । मौन पडिलें चहूं वाचां ॥ ६८ ॥
निजपित्याचें राज्य आहे । तें दोघे चालवूं समन्ययें ।
पितृआज्ञा ऐसीच आहे । ते तूं स्वयें अंगीकारीं ॥ ६९ ॥
चौदा वर्षे नेमस्त । पितृआज्ञा राज्यीं भरत ।
तैसेंचि आम्हां नेमस्त । वनवासप्रत तितुकेंचि ॥ ७० ॥
पाळोनि पितृआज्ञेसी । आम्ही आलो निजराज्यासी ।
वसिष्ठें अभिषेकिलें आम्हांसी । तूं यौवराज्यासी अंगीकारीं ॥ ७१ ॥
म्हणोनि निजकृपापूर्वक । आज्ञापिता रघुकुळटिळक ।
येरू झाला पै साशंक । विघ्न अलोलिक मज आलें ॥ ७२ ॥
यौवराज्यभिषिंचन । करावया रघुनंदन ।
स्वयें करी आज्ञापन । येरू उद्विग्न स्वयें झाला ॥ ७३ ॥


ते ऐकताच लक्ष्मणाला दुःख होऊन तो मानसी उद्विग्न झाला :


सौमित्र मर्यादेसी मंडन । स्वामीसी न देववे प्रतिवचन ।
अति संकोचित झालें मन । घाली लोटांगण हरिचरणी ॥ ७४ ॥
अश्रु पूर्ण आले नयनीं । कंठ दाटला बाष्पेंकरोनी ।
भ्रमित झाला हृदयभुवनीं । गिरा' वचनीं पांगुळली ॥ ७५ ॥
प्रेमें उकसाबुकसीं रडे । स्फुंदस्फुंदोनि पायां पडे ।
विघ्न आले मज रोकडे । कोणीकडे जाऊं आता ॥ ७६ ॥
कां क्षोभला रघुनंदन । कांही अपराध घडला पूर्ण ।
त्याचें हेंचि दिसे चिन्ह । राज्याभिषिंचन सौमित्र ॥ ७७ ॥
श्रीरामासी सकळ सुमित्र । तेणें तो सकळांचा कुमित्र ।
मजसीं मांडिला वैराकार । राज्यभार देऊं पाहती ॥ ७८ ॥
श्रीरामराज्यें सकळां सुख । तेंचि मज ओढवलें दुःख ।
पूर्ण क्षोभला रघुकुळटिळक । गिळिलों अशेख महापापें ॥ ७९ ॥
वनवासी एकाएकी असतां । अपराध घडला न कळतां ।
तेणें क्षोभ आला रघुनाथा । राज्याभिषेक मज करी ॥ ८० ॥
राज्यामाजी परम सुख । ऐसा जनवाद असे देख ।
पुण्यफळ अलोलिक । ऐसें लोक बोलती ॥ ८१ ॥
पुण्य नव्हे पातक । माझी प्रतीति निष्टंक ।
ग ऐक तयाचा विवेक । मतिविशेष सांगेन ॥ ८२ ॥


राज्यमदाचे दुष्यरिणाम :


राज्यमद चढल्या देहीं । राम सर्वथा नाठवे पाहीं ।
सर्वेद्रियें अंध पाहीं । कार्यकारण कांहीं स्मरेना ॥ ८३ ॥
अंतरीं संचरल्या भोगकाम' । कोणाची सेचा कैंचा राम ।
सर्वथा नाठवे धर्माधर्म । पडे भ्रमें अति अंध ॥ ८४ ॥
सर्प लागलिया जाणा । बुद्धि पालटे तत्क्षणां ।
कटुमधुराचिया ज्ञाना । विंवचना कळेना ॥ ८५ ॥
अत्यंक कदु निंब कैसा । गोड म्हणोनि खाये घसघसां ।
गूळ टाकी निंब जैसा । भ्रम मानसा दृढत्वें ॥ ८६ ॥
भ्रम चढत अंतःकरणीं । तेचि इंद्रियां विपरीत करणी ।
विषयसेवन अनुदिनीं । आणिक मनीं नाठवे ॥ ८७ ॥
विषय म्हणों विषासमान । यांसंगें अधःपतन ।
ऐका तयाचें लक्षण । निजचिन्ह नित्यत्वें ॥ ८८ ॥


विषं समानं विषयो यकाराद्‌विषयोऽधिकः ।
विषमेकाकिनं हन्ति विषयाश्च पुनःपुनः ॥ ४ ॥


विषयसंगतीचे परिणाम :


विषय म्हणों विषासमान । तरी विषाहूनि विषय गहन ।
विषभक्षणें एकदां मरण । पुनः पुन्हां पतन विषयार्थीं ॥ ८९ ॥
स्वभावें विषय दृष्टी पडतां । तत्काळ मोह उपजे चित्ता ।
ऐका त्याचीही व्यवस्था । घातकता वृत्तीची ॥ ९० ॥
लसुणाचे संगतीं जाण । कस्तूरीचे आच्छादे सुवासपण ।
दुर्गंधीचे बळ दारुण । सुवास जाण गिळोनि जाय ॥ ९१ ॥
राज्यभोगविषयो पूर्ण । अखंड भोगाचें अधिष्ठान ।
स्रकचंदनादि गहन । भोग दाटून पुढें येती ॥ ९२ ॥
भोग आदळल्या अंगेंसी । दाटोनि प्रवेशती मानसीं ।
क्षणें मुलविती प्राण्यासी । सावधानतेसी ठाच कैंचा ॥ ९३ ॥
अणुमात्र विषयस्थिती । हिताहित कोण चिंती ।
विषय तो परमघाती । नरकप्राप्ती आकल्प ॥ ९४ ॥
तेथें कैंचा रघुनंदन । कोण स्मरे श्रीरामभजन ।
कैंचा परमार्थ कैंचें ज्ञान । भ्रमित मन होवोनि ठाके ॥ ९५ ॥
कैंचा जप कैंचें ध्यान । कैंचा यज्ञ केचें ज्ञान ।
कोण स्मरे रघुनंदन । विषयबंधन अनिवार ॥ ९६ ॥
विसरोनियां रघुनाथा । नरकी बुडिजे तत्वतां ।
एवढी अंगी वाजे अवस्था । अति बाधकता विषयांची ॥ ९७ ॥


लक्ष्मणाची वनवासातील रामसेवा :


वनवासी असतां पूर्ण । अखंडता रामानुसंधान ।
वना जाय फळांलागून । तेथेही ध्यान खंडेना ॥ ९८ ॥
आसनी भोजनीं शयनीं । स्तानी दानीं गमनागमनी ।
जागृतिसुषुप्तिस्वप्नीं । अखंड चिंतनीं श्रीराम ॥ ९९ ॥
श्रवणीं राम नयन राम । वाचेसी वदनीं नित्य राम ।
अखंड हृदयीं चिंतनीं राम । ध्यानीं राम सर्वदा ॥ १०० ॥
करी चरणसंवाहन । चरणी नित्य प्रदक्षिण ।
आलोडोनियां सकळ वन । फळभोजना फळे आणी ॥ १०१ ॥
रात्री होवोनि जागारी । फेरे घालीं निरंतरीं ।
ऐसी श्रीरामसेवा अहोरात्री । सर्वोपरी करितसें ॥ १०२ ॥
चरणक्षाळणा आणीं जीवन । त्रिकाळ करीं पादक्षाळण ।
त्रिकाळ करी नीराजन । मुखावलोन त्रिकाळ ॥ १०३ ॥
श्रीरामहोमालागून । नित्य माथा वाहें इंधन ।
तेणें मी सुखैकघन । आनंदमग्न सर्वदा ॥ १०४ ॥
श्रीरामसेवा करितां पूर्ण । जिंतोनिया मानाभिमान ।
छेदिलें मी देहबंधन । स्वरूप चिद्धन पावावया ॥ १०५ ॥
तेथें अंगीकारितां राज्यासी । अत्यंत होईन विषयविलासी ।
राम नाठवे मानसी । अधःपातासी जाईन तेणें ॥ १०६ ॥
म्हणाल राज्यी श्रीरघुनाथ । असतां होई न विषयासक्त ।
तरी विषयबाधा अद्‌भुत । तुजही निश्चित न होईल ॥ १०७ ॥
राम निर्विषय तुज कां विषय । ऐसा सुचला जरी अन्वय ।
तेही विषयींचा अभिप्राय । सावधान परिसावा ॥ १०८ ॥


श्रीरामांची निर्विषयता :


राम अवतारा अवतारी । राम व्यापक चराचरीं ।
रामीं मिथ्या नरनारी । विषयउरी तेथें कैची ॥ १०९ ॥
पूर्णब्रह्म रघुनंदन । तेथें मिथ्या राज्यभान ।
राम नित्य सावधान । ऐका चिन्ह सांगेन ॥ ११० ॥
विश्वामित्रयागाप्रती । अनिद्र राहोनि सात रातीं ।
राक्षसांची जाति व्यक्ती । केली शांत श्रीरामें ॥ १११ ॥
सुबाहु वधिला बाणधारा । मारीच उडविला अंबरा ।
साह्य व्हावया दशवक्त्रा । ठेविला पुरा तद्वध ॥ ११२ ॥
देखता ऋषिवरांचा पाळा । चरणी उद्धरली शिळा ।
पर्णावया जनकबाळा । यागा आला जनकाच्या ॥ ११३ ॥
धनुष्य चढवितां गुण । धुळीं मेळविला रावण ।
तें भंगिलें न लागतां क्षण । जनकनंदिनी पर्णिली ॥ ११४ ॥
वडवानळ क्षात्रकुळासी । एकवीस वेळां धरित्रीसी ।
केलें निःक्षत्री वेगेंसीं । त्या भार्गवासी गांजिलें ॥ ११५ ॥
सांडोनियां क्षात्रदर्पा । वना धाडियेलें तपा ।
त्या श्रीरामप्रतापा । वाग्जल्पा केंवी वर्णवे ॥ ११६ ॥
त्यागोनियां निजराज्यासी । झाला वनस्थ वनवासी ।
विषयलोभ श्रीरामासी । नाही मानसीं सर्वथा ॥ ११७ ॥
स्वयें वर्जिता दशरथ । न सांडी वनवासव्रत ।
येवोनियां भरत । अति निघात मांडिला ॥ ११८ ॥
त्याचा न करोनि अंगीकार । बोळविला भरत त्रीर ।
होवोनियां वनवासी वनचर । ख्यातिचरित्रें पै केलीं ॥ ११९ ॥
म्हणाल असेल प्रतिष्ठाकाम । अथवा विषयी असेल राम ।
सुखें वनीं विषयाराम । होत असे परम सीतेसी ॥ १२० ॥
दशग्रीवें नेता सीता । स्वयें दाविली तेचि अवस्था ।
झाडा खोडा खेंव देता । होय गर्जता सीते सीते ॥ १२१ ॥
आम्ही म्हणों विषयी राम । सीतेसाठी चढला भ्रम ।
तंव तो सर्वथा निष्काम । परब्रह्म श्रीराम ॥ १२२ ॥
भ्रांत देखोनि रघुनाथा । छळू आली शिवकांता ।
अति सुंदर होवोनि सीता । श्रीरघुनाथापुढें ठेली ॥ १२३ ॥
राम बोभाये सीता सीता । उमा ओ दे रघुनाथा ।
तीतें सांडोनि तत्वतां । होय आळविता आनौतें ॥ १२४ ॥
राम धांवे आणिकीकडे । उमा राहे येवोनि पुढें ।
रामें ओळखिली निवाडें । आम्ही पुढें जाणां ना ॥ १२५ ॥
मी सांगे पुढे सीता । राम न मानी सर्वथा ।
करूं धांवे माझ्या घाता । कैंची सीता म्हणोनी ॥ १२६ ॥
टक देवांदानवांसी । टक पडली सुरसिद्धांसी ।
पुढे देखतां सीतेसी । राम तिसी नोळखे ॥ १२७ ॥
हातीं धरितां श्रीरामासी । राम निखंदी तियेसी ।
आई कां वो झोंबसी । शंकरासी त्यजुनियां ॥ १२८ ॥
स्वामी सांडोनि कैलासीं । परपुरुषा का हो छळिसी ।
तुझ्या लागतों चरणांसी । सोडी आम्हांसी जननिये ॥ १२९ ॥
नाही कामाचा अंकुर । क्रोध नाहीं अणुमात्र ।
नित्य सावध श्रीरामचंद्र । उमा सत्वर नमियेली ॥ १३० ॥
तेणें खोंचली जिव्हारी । उमा श्रीरामचरण धरी ।
वृथा भ्रमसी कामाचारी । कोणेपरी श्रीरामा ॥ १३१ ॥
राम म्हणे शिवापासीं । पुसों जाये वो वेगेंसीं ।
स्वमुखें पै निजकीर्तीसी । कोणासीही नये सांगू ॥ १३२ ॥
सांडोनियां कपटच्छळण । उमा झाली अनन्य शरण ।
तिसी देवोनि समाधान । केली बोळवण कैलासा ॥ १३३ ॥
ऐसा श्रीराम निष्काम । तेथें कैचा रिघे काम ।
ऐकतां श्रीरामाचें नाम । होय भस्म कामाचें ॥ १३४ ॥
श्रीरामाची सावधानता । श्रीरामचि जाणे तत्वतां ।
तें नये आणिकाचे हाता । अवतारसामर्थ्यता रामाची ॥ १३५ ॥
श्रीरामे अवतारा अवतारसत्ता । श्रीराम प्रकृतिपुरुषांचा कर्ता ।
त्या श्रीरामाची सामर्थ्यता । नये हाता आणिकांच्या ॥ १३६ ॥
असो श्रीरामाची कथा । अनुसरोनि भरतव्रता ।
अंगीकारुनी युवराजता । आला रघुनाथाची पाळावी ॥ १३७ ॥
तेहि विषयींचा वृत्तांत । सावध ऐका सुनिश्चित ।
संपादावया वनवासव्रत । केलें अद्‌भुत श्रीरामें ॥ १३८ ॥
वधोनियां लंकानाथ । संस्थापिला शरणागत ।
बंदी सोडवोनि देव समस्त । स्थापिले निश्चित स्वपदीं ॥ १३९ ॥
मुक्त करोनि जनस्थान । ब्राह्मणांसी द्यावें दान ।
म्हणोनियां रघुनंदन । भरत आपण अनुग्रहिला ॥ १४० ॥
राज्यी असोनि निर्लोभता । देहीं असोनि विदेहता ।
भोगी असोनि अभोक्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्मे ॥ १४१ ॥
मिष करोनि पादुकांचें । अंतरी प्रवेशला त्याचे ।
तेणें सामर्थ्य भरताचें । वंदी साचें त्रैलोक्य ॥ १४२ ॥
श्रीराम आणि रावण । अलौकिक युद्धत्राण ।
आणिका गोष्टी न करवे जाण । थरकांप पूर्ण चित्तासी ॥ १४३ ॥
तैसा राम देव भरत भक्त । हें त्याचें त्यासीच साजे व्रत ।
येर शब्दावरी श्लाघत । परी शब्दार्थ लाभेना ॥ १४४ ॥
म्हणोनि देवपण रघुनाथीं । भक्तपण साजे भरतीं ।
येरां न साथेचि युक्ती । विषयगतीं आदळिजे ॥ १४५ ॥
स्मरता श्रीरामनाम । विषय होती भस्म ।
तेथें करितां भजनधर्म । विषय दुर्गम कोणासी ॥ १४६ ॥


मला यौवराज्यपद नको, ते भरताला द्यावे अशी लक्ष्मणाची वसिष्ठांना प्रार्थना :


ऐसा आहे निश्चितार्थ । श्रुतिशास्त्रें साक्षी वेदांत ।
तरी राज्य। शिवेना माझें चित्त । आण निश्चित श्रीरामाची ॥ १४७ ॥
स्वामी वसिष्ठा सत्य जाण । शिवितले जी तुझे चरण ।
राज्य न शिवें आपण । श्रीरामचरण सांडूनी ॥ १४८ ॥
मनसा वाचा कर्मणा । राज्यलोभ नाही जाणा ।
संदेह न धरावा आपणा । सत्य प्रमाण हें माझें ॥ १४९ ॥
राज्यीं असोनि भरत । तपें कष्टला अद्‌भुत ।
सकळ भोगविरक्त । होवोनि रघुनाथ सेविला ॥ १५० ॥
त्यासी करोनि अभिषिंचन । भरत सुखावी पूर्ण ।
तेणें मज सुख गहन । भरता अभिषिंचन देखिलिया ॥ १५१ ॥
आणि राज्यभारहस्तक्रिया । मज नाही जी गुरुवर्या ।
भरत युक्ति राज्याचिया । निःसंदेह जाणत ॥ १५२ ॥
चौदा वर्षे अलिप्तपणें । श्रीरामाहूनि अधिकगुणें ।
राज्यपाळण भरतें येणें । सुखसंपन्नें नांदती प्रजा ॥ १५३ ॥
श्रीरामें सुख सकळांसी । त्याहूनि भरता विशेषीं ।
वर्णितां श्रीरामगुणासीं । सुखैकराशी समस्तां ॥ १५४ ॥
देशोदेशींचे भूपती । भरतमुखें श्रीराम कीर्ती ।
ऐकावया अति प्रीतीं । भरता येती लोटांगणीं ॥ १५५ ॥
असो भूपाळांचें वृत्त । महाऋषि जे विख्यात ।
सदा ब्रह्मानंदे तृप्त । तेही येत भरता पै ॥ १५६ ॥
सांडोनिया निजाश्रम । श्रीरामकीर्तीसी सप्रेम ।
येवोनियां ऋषिसत्तम । आल्हादें परम श्रवण करिती ॥ १५७ ॥
श्रीरामकीर्तीचिया प्रीतीं । अयोध्येसीं अद्‌भुत वस्ती ।
धन्य भरताची संगती । श्रीरामकीर्ती सुख सर्वां ॥ १५८ ॥
म्हणोनि भरतासी आपण । यौवराज्यीं अभिषिंचून ।
सुखी करावे सकळ जन । कीर्ति पावन श्रीरामें ॥ १५९ ॥
म्हणोनि सौमित्रें आपण । घालोनि गुरूसी लोटांगण ।
धरिले श्रीरामाचे चरण । करावें अभिषिंचन भरतासी ॥ १६० ॥


लक्ष्मणाची विरक्ती पाहून सर्वजण विस्मयचकित :


गुरूचे शिवोनियां चरण । सौमित्रें वाहिली आण ।
देखोनि त्याचें निर्वाण । श्रीरघुनंदन तटस्थ ॥ १६१ ॥
सभा झाली तटस्थभूत । सुर सिद्ध अति विस्मित ।
ब्रह्मादिक चाकाटत । लोकपाळ तेथ वेडावले ॥ १६२ ॥
देखोनियां सौमित्राची विरक्ती । सुमनें वर्षल्या सुरपंक्ती ।
जय जय गर्जे त्रिजगती । सभाग्य निश्चितीं सौमित्र ॥ १६३ ॥
सर्वस्व त्यजोनि वहिला । श्रीरामसेवे वना गेला ।
सर्वभावें राम सेविला । त्यजूनि दादुला आहारातें ॥ १६४ ॥
परतोनि आलिया राज्यासी । राज्यलोभ नाहीं मानसी ।
सौमित्राच्या भाग्यासी । सीमा वेदांसी न करवे ॥ १६५ ॥


कोणाला यौवराज्याभिषेक करावा असा प्रश्न रामांनी विचारल्यावरून
भरतालाच अभिषेक करावा असे वसिष्ठांचे रामांना उत्तर :


सौमित्र न घे अभिषेकासी । यौवराज्यासी स्थिती कैसी ।
अभिषेक करावा कोणासी । श्रीवसिष्ठासी राम पुसे ॥ १६६ ॥
सौमित्राची निर्विषयता । येणें संतोष वसिष्ठचित्ता ।
सौमित्र आलिंगोनि तत्वतां । होय बोलता रामासी ॥ १६७ ॥
तूं अंतर्यामी रघुवीर । जाणसी सकळांचे अंतर ।
आम्हांसि पुसणे विचार । हा वृद्धाचार राखिसी ॥ १६८ ॥
तुझें नाम अंतर्यामी । अंतर जाणता तूं स्वामी ।
काय विचार सांगणें आम्हीं । तुमचें तुम्ही विचारा ॥ १६९ ॥
ज्याची जैसी अंतर्वृत्ती । जो भजे जैसिया रीतीं ।
त्याचिया मनोरथाप्रती । निजविश्रांती तूं दाता ॥ १७० ॥
सांडोनि तुझें चरणसेवन । सौमित्रासी राज्याभिषिंचन ।
सर्वथा नाहीं नाही जाण । वाहून आण सांगतसे ॥ १७१ ॥
ज्यासी तुझ्या चरणीं प्रीती । त्यासी बळेंचि रघुपती ।
राज्य देणें न घडे निश्चिती । नये वृत्तीसी खेद करूं ॥ १७२ ॥
आण राज्यनीतिविचार । ज्यासी जेथें नाहीं आदर ।
त्यावरी करितां बलात्कार । विकळ समग्र होऊं पाहे ॥ १७३ ॥
सौमित्र राज्यीं उदासीन । तो केवीं करी राज्यशासन ।
तूं श्रीराम सर्वज्ञ । योग्यायोग्य पूर्ण जाणसी ॥ १७४ ॥
भरत सर्वाथीं सावधान । ज्ञानें विरक्ती श्रीरामभजन ।
सकळाथीं कुशल पूर्ण । करीं अभिषिंचन भरतासी ॥ १७५ ॥
ऐकोनि श्रीवसिष्ठवचन । श्रीराम झाला सुखैकघन ।
स्वयें उठोनि आपण । सौमित्र धरोनि आलिंगिला ॥ १७६ ॥
श्रीरामहृदया हृदय मिनलें । दुणे वैराग्यपुट झालें ।
सबाह्य स्वरूप कोंदलें । अहाळबहाळ रामाचें ॥ १७७ ॥
d
मनोरथ पूर्ण केल्याबद्दल लक्ष्मणाचे रामांना वंदन व रामस्तुती :
q
चरणांवरी ठेवोनि माथा । सौमित्र विनवी रघुनाथा ।
मनोरथ पूर्ण करितां । कृपावंता श्रीरामा ॥ १७८ ॥
तूं अनाथाची माउली । आर्त श्रांतांची साउली ।
निजजनां कल्पवल्ली । शृतीची बोली ऐकिजे ॥ १७९ ॥
तें आजि आले फळा । प्रसन्न झालासी घननीळा ।
सोडविलें सकळां । घोर दुःखापासूनी ॥ १८० ॥
आजि भाग्य आलें फळासी । चुकोनियां राज्यभ्रमासी ।
अधिकार लाधलों सेवेसी । निजहरिखेंसीं नाचत ॥ १८१ ॥
यौवराज्याभिषिंचन । भरता करील रघुनंदन ।
शत्रुघ्ना सेनानीपण । सकळ जन सुखमय ॥ १८२ ॥
ते कथा अति गहन । श्रोतीं द्यावें अवधान ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ १८३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौमित्रविरक्तिकथनं नाम पंचाशीतितमोऽध्यायः ॥ ८५ ॥
ओंव्या ॥ १८३ ॥ श्लोक ॥ ५ ॥ एवं ॥ १८८ ॥

GO TOP