श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वीये पुत्रशतेऽखिले सैन्ये च विनष्टे विश्वामित्रेण तपः कृत्वा शिवं संतोष्य ततो दिव्यास्त्राण्युपलभ्य तेषां वसिष्ठाश्रमे प्रयोगकरणं तदस्त्राणि वारयितुं ब्रह्मदण्डमुद्यम्य वसिष्ठस्य विश्वामित्रसमक्षेऽवस्थानम् - आपले शंभर पुत्र आणि सारी सेना नष्ट झाल्यावर विश्वामित्रांनी तपस्या करून महादेवांपासून दिव्यास्त्रे मिळविणे तथा त्यांचा वसिष्ठांच्या आश्रमावर प्रयोग करणे आणि वसिष्ठांनी ब्रह्मदण्ड घेऊन त्यांच्या समोर उभे राहणे -
ततस्तानाकुलान् दृष्ट्‍वा विश्वामित्रास्त्रमोहितान् ।
वसिष्ठश्चोदयामास कामधुक् सृज योगतः ॥ १ ॥
विश्वामित्रांच्या अस्त्रांनी घायाळ होऊन त्यांना व्याकुळ झालेले पाहून वसिष्ठांनी परत आज्ञा दिली - 'कामधेनु ! आता योगबलाने दुसर्‍या सैनिकांची सृष्टि कर.' ॥ १ ॥
तस्या हुंकारतो जाताः काम्बोजा रविसन्निभाः ।
ऊधसश्चाथ सम्भूता बर्बरा शस्त्रपाणयः ॥ २ ॥
तेव्हां त्या गायीने परत हुंकार केला. तिच्या हुंकाराने सूर्यासमान तेजस्वी काम्बोज उत्पन्न झाले. स्तनापासून शस्त्रधारी बर्बर प्रकट झाले. ॥ २ ॥
योनिदेशाच्च यवनाः शकृद्देशाच्छका स्मृताः ।
रोमकूपेषु म्लेच्छाश्च हारीताः सकिरातकाः ॥ ३ ॥
योनिदेशापासून यवन आणि शकृद्देशापासून (शेणाच्या स्थानापासून) शक उत्पन्न झाले. रोमकूपांपासून म्लेंच्छ, हारित आणि किरात प्रकट झाले. ॥ ३ ॥
तैस्तन्निषूदितं सर्वं विश्वामित्रस्य तत्क्षणात् ।
सपदातिगजं साश्वं सरथं रघुनन्दन ॥ ४ ॥
'हे रघुनन्दना ! त्या सर्व वीरांनी पायदळ, हत्ती, घोडे आणि रथासहित विश्वामित्रांच्या सार्‍या सेनेचा तात्काळ संहार करून टाकला. ॥ ४ ॥
दृष्ट्‍वा निषूदितं सैन्यं वसिष्ठेन महात्मना ।
विश्वामित्रसुतानां तु शतं नानाविधायुधम् ॥ ५ ॥

अभ्यधावत् सुसंक्रुद्धं वसिष्ठं जपतां वरम् ।
हुङ्‍कारेणैव तान् सर्वान् निर्ददाह महानृषिः ॥ ६ ॥
'महात्मा वसिष्ठांच्या द्वारे आपल्या सेनेचा संहार झालेला पाहून विश्वामित्रांचे शंभर पुत्र अत्यंत क्रोधाने संतप्त झाले आणि नाना प्रकारची अस्त्रे शस्त्रे घेऊन जप करणारात श्रेष्ठ वसिष्ठ मुनिंच्यावर तुटून पडले. तेव्हां त्या महर्षिंनी हुंकारमात्रे त्या सर्वांना जाळून भस्म करून टाकले. ॥ ५-६ ॥
ते साश्वरथपादाता वसिष्ठेन महात्मना ।
भस्मीकृता मुहूर्तेन विश्वामित्रसुतास्तथा ॥ ७ ॥
महात्मा वसिष्ठद्वारे विश्वामित्रांचे सर्व पुत्र दोनच घटकेत घोडे, रथ आणि पायदळांतील सैनिकांसहित जळून भस्म केले गेले. ॥ ७ ॥
दृष्ट्‍वा विनाशितान् सर्वान् बलं च सुमहायशाः ।
सव्रीडं चिन्तयाविष्टो विश्वामित्रोऽभवत् तदा ॥ ८ ॥
आपल्या सर्व पुत्रांचा आणि सार्‍या सेनेचा विनाश झालेला पाहून महायशस्वी विश्वामित्र लज्जित होऊन फार चिंतेत पडले. ॥ ८ ॥
समुद्र इव निर्वेगो भग्नदंष्ट्र इवोरगः ।
उपरक्त इवादित्यः सद्यो निष्प्रभतां गतः ॥ ९ ॥
समुद्रासमान असलेला त्यांचा सारा वेग शांत झाला. ज्याचे दात काढले गेले आहेत अशा सर्पाप्रमाणे तथा राहूग्रस्त सूर्याप्रमाणे ते तात्काळ निस्तेज झाले. ॥ ९ ॥
हतपुत्रबलो दीनो लूनपक्ष इव द्विजः ।
हतसर्वबलोत्साहो निर्वेदं समपद्यत ॥ १० ॥
पुत्र आणि सेना दोन्ही मारले गेल्याने ते पंख छाटलेल्या पक्ष्याप्रमाणे दीन झाले. त्यांचे सरे बळ आणि उत्साह नष्ट झाले. ते मनांतल्या मनात अत्यंत खिन्न होऊन गेले. ॥ १० ॥
स पुत्रमेकं राज्याय पालयेति नियुज्य च ।
पृथिवीं क्षत्रधर्मेण वनमेवाभ्यपद्यत ॥ ११ ॥
त्यांचा एकच पुत्र वाचला होता. त्याला त्यांनी राजाच्या पदावर अभिषिक्त करून राज्याच्या रक्षणासाठी नियुक्त केले आणि क्षत्रिय धर्मास अनुसरून पृथ्वीचे पालन करण्याची आज्ञा देऊन ते वनात निघून गेले. ॥ ११ ॥
स गत्वा हिमवत्पार्श्वे किन्नरोरगसेवितम् ।
महादेवप्रसादार्थं तपस्तेपे महातपाः ॥ १२ ॥
हिमालयाच्या पार्श्वभागी, जो किन्नर आणि नागांचा आश्रय असलेला प्रदेश आहे, तेथे जाऊन महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी महान तपस्येचा आश्रय घेतला आणि ते तपसाधनेत संलग्न झाले. ॥ १२ ॥
केनचित् त्वथ कालेन देवेशो वृषभध्वजः ।
दर्शयामास वरदो विश्वामित्रं महामुनिम् ॥ १३ ॥
काही काळानंतर वरदायक देवेश्वर भगवान वृषभध्वजाने महामुनि विश्वामित्रांना दर्शन दिले आणि म्हणाले - ॥ १३ ॥
किमर्थं तप्यसे राजन् ब्रूहि यत् ते विवक्षितम् ।
वरदोऽस्मि वरो यस्ते काङ्‌क्षितः सोऽभिधीयताम् ॥ १४ ॥
'राजन ! कशासाठी तप करीत आहां, सांगा ? काय सांगू इच्छित आहां ? मी तुम्हाला वर देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला जो वर प्राप्त करणे अभीष्ट असेल ते सांगा.' ॥ १४ ॥
एवमुक्तस्तु देवेन विश्वामित्रो महातपाः ।
प्रणिपत्य महादेवं विश्वामित्रोऽब्रवीदिदम् ॥ १५ ॥
महादेवांनी असे म्हटल्यावर महातपस्वी विश्वामित्रांनी त्यांना प्रणाम करून या प्रकारे सांगितले - ॥ १५ ॥
यदि तुष्टो महादेव धनुर्वेदो ममानघ ।
साङ्‍गोपाङ्‍गोपनिषदः सरहस्यः प्रदीयताम् ॥ १६ ॥
'निष्पाप महादेव ! जर आपण संतुष्ट झाला आहात तर अंग, उपांग, उपनिषद आणि रहस्यांसहित मला धनुर्वेद प्रदान करावा. ॥ १६ ॥
यानि देवेषु चास्त्राणि दानवेषु महर्षिषु ।
गंधर्वयक्षरक्षःसु प्रतिभान्तु ममानघ ॥ १७ ॥

तव प्रसादाद् भवतु देवदेव ममेप्सितम् ।
'अनघ ! देवता, दानव, महर्षि, गंधर्व, यक्ष आणि राक्षस या सर्वांपाशी जी जी अस्त्रे असतील ती सर्व आपल्या कृपेने माझ्या हृदयात स्फुरित होऊन जावित. देवदेव ! हाच माझा मनोरथ आहे, जो मला प्राप्त व्हावयास पाहिजे. ॥ १७ १/२ ॥
एवमस्त्विति देवेशो वाक्यमुक्त्वा गतस्तदा ॥ १८ ॥

प्राप्य चास्त्राणि देवेशाद् विश्वामित्रो महाबलः ।
दर्पेण महता युक्तो दर्पपूर्णोऽभवत् तदा ॥ १९ ॥
तेव्हां 'एवमस्तु' असे म्हणून देवेश्वर भगवान शंकर तेथून निघून गेले. देवेश्वर महादेवांपासून ती अस्त्रे मिळाल्यावर महाबली विश्वामित्रांना फार गर्व झाला. ते अभिमानाने फुगून गेले. ॥ १८-१९ ॥
विवर्धमानो वीर्येण समुद्र इव पर्वणि ।
हतं मेने तदा राम वसिष्ठमृषिसत्तमम् ॥ २० ॥
ज्याप्रमाणे पौर्णिमेस समुद्रास भरती येऊ लागते, त्याचप्रकारे ते पराक्रमात आपल्याला फारच श्रेष्ठ मानू लागले. श्रीरामा ! त्यांनी मुनिश्रेष्ठ वसिष्ठांना त्यावेळी मृतच मानले. ॥ २० ॥
ततो गत्वाऽऽश्रमपदं मुमोचास्त्राणि पार्थिवः ।
यैस्तत् तपोवनं नाम निर्दग्धं चास्त्रतेजसा ॥ २१ ॥

उदीर्यमाणमस्त्रं तद् विश्वामित्रस्य धीमतः ।
दृष्ट्‍वा विप्रद्रुता भीता मुनयः शतशो दिशः ॥ २२ ॥
नंतर तर ते पृथ्वीपति विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात जाऊन नाना प्रकारे अस्त्रांचे प्रयोग करू लागले, ज्यांच्या तेजामुळे ते सर्व तपोवन दग्ध होऊ लागले. बुद्धिमान विश्वामित्रांच्या त्या वाढत जाणार्‍या अस्त्र तेजाला पाहून तेथे राहणारे शेकडो मुनि भयभीत होऊन सर्व दिशांना पळून जाऊ लागले. ॥ २१-२२ ॥
वसिष्ठस्य च ये शिष्या ते च वै मृगपक्षिणः ।
विद्रवन्ति भयाद् भीता नानादिग्भ्यः सहस्रशः ॥ २३ ॥
वसिष्ठांचे जे शिष्य होते ते, तसेच तेथील पशु आणि पक्षी होते, ते हजारो प्राणी भयभीत होऊन नाना दिशांना पळून गेले. ॥ २३ ॥
वसिष्ठस्याश्रमपदं शून्यमासीन्महात्मनः ।
मुहूर्तमिव निःशब्दमासीदीरिणसंनिभम् ॥ २४ ॥
'महात्मा वसिष्ठांच्या आश्रमात शुकशुकाट झाला. दोन घटकेतच पडीक जमिनीप्रमाणे त्या स्थानी सामसूम, निःस्तब्धता पसरली. ॥ २४ ॥
वदतो वै वसिष्ठस्य मा भैरिति मुहुर्मुहुः ।
नाशयाम्यद्य गाधेयं नीहारमिव भास्करः ॥ २५ ॥
वसिष्ठ वारंवार सांगत होते की, 'घाबरू नका, मी आत्ता या गाधिपुत्राला नष्ट करून टाकतो, सूर्य जसे धुके नष्ट करतो त्याप्रमाणेच.' ॥ २५ ॥
एवमुक्त्वा महातेजा वसिष्ठो जपतां वरः ।
विश्वामित्रं तदा वाक्यं सरोषमिदमब्रवीत् ॥ २६ ॥
जप करण्यात श्रेष्ठ महातेजस्वी वसिष्ठ असे म्हणून त्या समयी विश्वामित्रास रोषपूर्वक म्हणाले - ॥ २६ ॥
आश्रमं चिरसंवृद्धं यद् विनाशितवानसि ।
दुराचारो हि यन्मूढस्तस्मात् त्वं न भविष्यसि ॥ २७ ॥
'अरे ! तू दीर्घकाळपर्यंत पालन पोषण केलेल्या आणि हिरव्यागार केले गेलेल्या या आश्रमाला उधस्त करून टाकलेस, उजाड केले आहेस म्हणून तू दुराचारी आणि विवेकशून्य आहेस आणि या पापामुळे तू कुशल राहू शकत नाहीस. ॥ २७ ॥
इत्युक्त्वा परमक्रुद्धो दण्डमुद्यम्य सत्वरः ।
विधूम इव कालाग्निर्यमदण्डमिवापरम् ॥ २८ ॥
असे म्हणून ते अत्यंत क्रुद्ध होऊन धूमरहित कालाग्निप्रमाणे उद्दीप्त झाले आणि जणु दुसरा यमदण्डच असा भयंकर दण्ड हातात घेऊन तात्काळ विश्वामित्रांचा सामना करण्यास तयार झाले. ॥ २८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पंच्चावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP