श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षडशीतितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

वानररक्षसां युद्धं हनुमता रक्षःसैन्यस्य संहार, इन्द्रजितो युद्धाय आह्वानं च लक्ष्मणकर्तृकं इन्द्रजितो दर्शनम् -
वानरांचे आणि राक्षसांचे युद्ध, हनुमानांच्या द्वारे राक्षससेनेचा संहार, आणि त्यांनी इन्द्रजिताला द्वन्दयुद्धासाठी आव्हान देणे तसेच लक्ष्मणांनी त्यास पाहाणे -
अथ तस्यामवस्थायां लक्ष्मणं रावणानुजः ।
परेषामहितं वाक्यं अर्थसाधकमब्रवीत् ॥ १ ॥
त्या अवस्थेमध्ये रावणाचे लहान भाऊ विभीषणांनी लक्ष्मणांना अशी गोष्ट सांगितली, जी त्यांच्या अभीष्ट अर्थाला सिद्ध करणारी तसेच शत्रूंच्या साठी अहितकारक होती. ॥१॥
यदेतद् राक्षसानीकं मेघश्यामं विलोक्यते ।
एतदायोध्यतां शीघ्रं कपिभिश्च शिलायुधैः ॥ २ ॥

तस्यानीकस्य महतो भेदने यत लक्ष्मण ।
राक्षसेन्द्रसुतोऽप्यत्र भिन्ने दृश्यो भविष्यति ॥ ३ ॥
ते म्हणाले - ’लक्ष्मणा ! ही समोर मेघांच्या काळ्या समुदायाप्रमाणे राक्षसांची सेना दिसून येत आहे, तिच्याशी शिलारूपी आयुधे धारण करणारे वानरवीर शीघ्रच युद्ध सुरू करू देत आणि आपणही या विशाल वाहिनीच्या व्यूहाचे भेदन करण्याचा प्रयत्‍न करावा. तिचा मोर्चा तुटल्यावर राक्षसराजाचा पुत्र इन्द्रजितही आम्हांला येथे दिसून येईल. ॥२-३॥
स त्वमिन्द्राशनिप्रख्यैः शरैरवकिरन् परान् ।
अभिद्रवाशु यावद् वै नैतत् कर्म समाप्यते ॥ ४ ॥
म्हणून आपण या हवन-कर्माची समाप्ति होण्यापूर्वीच वज्रतुल्य बाणांची वृष्टि करून शत्रूंवर शीघ्र हल्ला करावा. ॥४॥
जहि वीर दुरात्मानं मायापरमधार्मिकम् ।
रावणिं क्रूरकर्माणं सर्वलोकभयावहम् ॥ ५ ॥
वीरा ! तो दुरात्मा रावणकुमार फारच मायावी, अधर्मी, क्रूरकर्मे करणारा आणि संपूर्ण लोकासाठी भयंकर आहे म्हणून त्याचा वध करावा. ॥५॥
विभीषणवचः श्रुत्वा लक्ष्मणः शुभलक्षणः ।
ववर्ष शरवर्षाणि राक्षसेन्द्रसुतं प्रति ॥ ६ ॥
विभीषणाचे हे वचन ऐकून शुभलक्षण संपन्न लक्ष्मणांनी राक्षसराजाच्या पुत्राला लक्ष्य करून बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥६॥
ऋक्षाः शाखामृगाश्चैव द्रुमप्रवरयोधिनः ।
अभ्यधावन्त सहिताः तदनीकमवस्थितम् ॥ ७ ॥
त्याच बरोबर मोठ मोठे वृक्ष घेऊन युद्ध करणारे वानर आणि अस्वलेही तेथे उभ्या असलेल्या राक्षससेनेवर एकाच वेळी तुटून पडले. ॥७॥
राक्षसाश्च शितैर्बाणैः असिभिः शक्तितोमरैः ।
अभ्यवर्तन्त समरे कपिसैन्यजिघांसवः ॥ ८ ॥
तिकडून राक्षसही वानरसेनेला नष्ट करण्याच्या इच्छेने समरांगणात तीक्ष्ण बाण, तलवारी, शक्ति आणि तोमरांचा प्रहार करीत त्यांचा सामना करू लागले. ॥८॥
स सम्प्रहारस्तुमुलः संजज्ञे कपिराक्षसाम् ।
शब्देन महता लङ्‌कां नादयन् वै समन्ततः ॥ ९ ॥
याप्रकारे वानर आणि राक्षसांमध्ये घनघोर युद्ध होऊ लागले. त्याच्या महान्‌ कोलाहलाने सर्व लंकापुरी सर्व बाजूनी निनादित झाली. ॥९॥
शस्त्रैश्च बहुधाकारैः शितैर्बाणैश्च पादपैः ।
उद्यतैर्गिरिशृङ्‌गैश्च घोरैराकाशमावृतम् ॥ १० ॥
नाना प्रकारची अस्त्रे, तीक्ष्ण बाण, उचललेले वृक्ष आणि भयानक पर्वत शिखरांनी तेथील आकाश आच्छादित झाले. ॥१०॥
राक्षसा वानरेन्द्रेषु विकृताननबाहवः ।
निवेशयन्तः शस्त्राणि चक्रुस्ते सुमहद् भयम् ॥ ११ ॥
विकट मुख आणि बाहु असलेल्या राक्षसांनी वानर-यूथपतिंवर (नाना प्रकारच्या) शस्त्रांनी प्रहार करत त्यांच्यासाठी महान्‌ भय उपस्थित केले. ॥११॥
तथैव सकलैर्वृक्षैः गिर्गिरिशृङ्‌गैश्च वानराः ।
अभिजघ्नुर्निजघ्नुश्च समरे सर्वराक्षसान् ॥ १२ ॥
त्याच प्रकारे वानरही समरांगणात संपूर्ण वृक्ष आणि पर्वत शिखरांच्याद्वारे समस्त राक्षसांना मारू आणि हताहत करू लागले. ॥१२॥
ऋक्षवानरमुख्यैश्च महाकायैर्महाबलैः ।
रक्षसां युध्यमानानां महद्‌भुयमजायत ॥ १३ ॥
मुख्य-मुख्य महाकाय महाबली अस्वले आणि वानर यांच्याशी झुंजत असणार्‍या राक्षसांना महान्‌ भय वाटू लागले. ॥१३॥
स्वमनीकं विषण्णं तु श्रुत्वा शत्रुभिरर्दितम् ।
उदतिष्ठत दुर्धर्षः स कर्मण्यननुष्ठिते ॥ १४ ॥
रावणकुमार इन्द्रजित फार दुर्धर्ष वीर होता. त्याने जेव्हा ऐकले की माझी सेना शत्रूंच्या द्वारा पीडित होऊन फार दु:खात पडली आहे, तेव्हा अनुष्ठान समाप्त होण्यापूर्वीच तो युद्धासाठी उठून उभा राहिला. ॥१४॥
वृक्षान्धकारान्निर्गत्य जातक्रोधः स रावणिः ।
आरुरोह रथं सज्जं पूर्वयुक्तं सुसंयतम् ॥ १५ ॥
त्यासमयी त्याच्या मनात फार क्रोध उत्पन्न झाला होता. तो वृक्षांच्या अंधारातून निघून एका सुसज्जित रथावर आरूढ झाला जो प्रथमपासून जुंपून तयार ठेवला गेला होता. तो रथ फारच सुदृढ होता. ॥१५॥
स भीमकार्मुकशरः कृष्णाञ्जनचयोपमः ।
रक्तास्यनयनो भिइमौ बभौ मृत्युरिवान्तकः ॥ १६ ॥
इन्द्रजिताच्या हातात भयंकर धनुष्य आणि बाण होते. तो काळ्या कोळश्याच्या ढीगाप्रमाणे भासत होता. त्याचे तोंड आणि डोळे लाल होते. तो भयंकर राक्षस विनाशकारी मृत्युसमान प्रतीत होत होता. ॥१६॥
दृष्ट्‍वैव तु रथस्थं तं पर्यवर्तत तद्बलम् ।
रक्षसां भीमवेगानां लक्ष्मणेन युयुत्सताम् ॥ १७ ॥
इन्द्रजित रथावर बसला हे पहाताच लक्ष्मणाशी युद्ध करण्याची इच्छा बाळगणारी भयंकर वेगशाली राक्षसांची ती सेना त्याच्या आसपास सर्व बाजूस उभी राहिली. ॥१७॥
तस्मिन् तु काले हनुमान् उरुजत् स दुरासदम् ।
धरणीधरसङ्‌काशो महावृक्षमरिन्दमः ॥ १८ ॥
त्या समयी शत्रूंचे दमन करणारे पर्वतासमान विशालकाय हनुमान्‌ यांनी एक फारच मोठ्‍या वृक्षाला, ज्यास तोडणे किंवा उपटणे कठीण होते उपटून घेतले. ॥१८॥
स राक्षसानां तत्सैन्यं कालाग्निरिव निर्दहन् ।
चकार बहुभिर्वृक्षैः निःसंज्ञं युधि वानरः ॥ १९ ॥
नंतर तर ते वानरवीर प्रलयाग्निसमान प्रज्वलित होऊन उठले आणि युद्धस्थळामध्ये राक्षसांच्या त्या सेनेला दग्ध करीत बहुसंख्य वृक्षांचा मारा करून अचेत करू लागले. ॥१९॥
विध्वंसयन्तं तरसा दृष्ट्‍वैव पवनात्मजम् ।
राक्षसानां सहस्राणि हनुमन्तमवाकिरन् ॥ २० ॥
पवनकुमार हनुमान्‌ अत्यंत वेगाने सेनेचा विध्वंस करत होते, हे पाहूनच हजारो राक्षस त्यांच्यावर अस्त्र-शस्त्रांची वृष्टि करू लागले. ॥२०॥
शितशूलधराः शूलैः असिभिश्चासिपाणयः ।
शक्तिभिः शक्तिहस्ताश्च पट्टिशैः पट्टिशायुधाः ॥ २१ ॥
चमकणारे शूळ धारण करणारे राक्षस शूलांनी, ज्यांच्या हातात तलवारी होत्या ते तलवारीने, शक्तिधारी शक्तिनी आणि पट्‍टिशधारी राक्षस पट्‍टिशांनी त्यांच्यावर प्रहार करू लागले. ॥२१॥
परिधैश्च गदाभिश्च कुन्तैश्च शुभदर्शनैः ।
शतशश्च शतघ्नीभिः आयसैरपि मुद्गरैः ॥ २२ ॥

घौरैः परशुभिश्चैव भिन्दिपालैश्च राक्षसाः ।
मुष्टिभिर्वज्रकल्पैश्च तलैरशनिसन्निभैः ॥ २३ ॥

अभिजघ्नुः समासाद्य समन्तात् पर्वतोपमम् ।
तेषामपि च सङ्‌क्रुद्धः चकार कदनं महत् ॥ २४ ॥
बरेचसे परिघ, गदा, सुंदर भाले, शेकडो शतघ्नि, लोखंडाचे बनलेले मुद्‍गर, भयानक परशु, भिन्दिपाल, वज्रासमान मुष्टि आणि अशनितुल्य थप्पडांनी ते समस्त राक्षस जवळ येऊन सर्व बाजूनी पर्वताकार हनुमानावर प्रहार करू लागले. हनुमानांनी कुपित होऊन त्यांचाही महान्‌ संहार केला. ॥२२-२४॥
स ददर्श कपिश्रेष्ठं अचलोपममिन्द्रजित् ।
सूदमानमसंत्रस्तं अमित्रान् पवनात्मजम् ॥ २५ ॥
इन्द्रजिताने पाहिले, कपिवर पवनकुमार हनुमान्‌ पर्वताप्रमाणे अचल होऊन नि:शंकभावाने आपल्या शत्रुंचा संहार करीत आहेत. ॥२५॥
स सारथिमुवाचेदं याहि यत्रैष वानरः ।
क्षयमेष हि नः कुर्याद् राक्षसानामुपेक्षितः ॥ २६ ॥
हे पाहून त्याने आपल्या सारथ्याला म्हटले - ’जेथे हा वानर युद्ध करत आहे तेथे चल ! जर त्याची उपेक्षा केली गेली तर हा आपणा सर्व राक्षसांचा विनाशच करून टाकील. ॥२६॥
इत्युक्तः सारथिस्तेन ययौ यत्र स मारुतिः ।
वहन् परमदुर्धर्षं स्थितमिन्द्रजितं रथे ॥ २७ ॥
त्याने असे म्हटल्यावर सारथी रथावर बसलेल्या अत्यंत दुर्जय वीर इन्द्रजितास वाहून जेथे पवनपुत्र हनुमान विराजमान होते त्या स्थानी घेऊन गेला. ॥२७॥
सोऽभ्युपेत्य शरान् खड्गान् पट्टिशांश्च परश्वधान् ।
अभ्यवर्षत दुर्द्धर्षः कपिमूर्धनि राक्षसः ॥ २८ ॥
तेथे पोहोचून त्या दुर्जय राक्षसाने हनुमानांच्या मस्तकावर बाण, तलवारी, पट्‍टिश आणि परशु यांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥२८॥
तानि शस्त्राणि घोराणि प्रतिगृह्य स मारुतिः ।
रोषेण महताविष्टो वाक्यं चेदमुवाच ह ॥ २९ ॥
त्या भयानक शस्त्रांना आपल्या शरीरावर झेलून पवनपुत्र हनुमान्‌ महान रोषाने भरून गेले आणि याप्रकारे बोलले - ॥२९॥
युद्ध्यस्व यदि शूरोऽसि रावणात्मज दुर्मते ।
वायुपुत्रं समासाद्य न जीवन प्रतियास्यसि ॥ ३० ॥
दुर्बुद्धि रावणकुमारा ! जर मोठा शूरवीर असशील तर ये, माझ्याशी मल्लयुद्ध कर. या वायुपुत्राशी भिडून जीवित परत जाऊ शकणार नाहीस. ॥३०॥
बाहुभ्यां संप्रयुध्यस्व यदि मे द्वन्द्वमाहवे ।
वेगं सहस्व दुर्बुद्धे ततस्त्वं रक्षसां वरः ॥ ३१ ॥
दुर्मते ! आपल्या भुजांच्या द्वारा माझ्याशी द्वन्द युद्ध कर. या बाहुयुद्धात जर माझा वेग सहन करशील तर तू राक्षसांमध्ये श्रेष्ठ वीर समजला जाशील. ॥३१॥
हनुमन्तं जिघांसन्तं समुद्यतशरासनम् ।
रावणात्मजमाचष्टे लक्ष्मणाय विभीषणः ॥ ३२ ॥
रावणकुमार इन्द्रजित धनुष्य उचलून हनुमानांचा वध करू इच्छित होता. या अवस्थेत विभीषणांनी लक्ष्मणास त्याचा परिचय करून दिला - ॥३२॥
यः स वासवनिर्जेता रावणस्यात्मसम्भवः ।
स एष रथमास्थाय हनुमन्तं जिघांसति ॥ ३३ ॥

तमप्रतिमसंस्थानैः शरैः शत्रुविदारणैः ।
जीवितान्तकरैर्घोरैः सौमित्रे रावणिं जहि ॥ ३४ ॥
सौमित्र ! रावणाचा जो पुत्र इन्द्रांनाही जिंकून चुकला होता तोच हा रथावर बसून हनुमानांचा वध करू इच्छित आहे. म्हणून आपण शत्रूंचे विदारण करणारे, अनुपम आकार-प्रकाराने युक्त तसेच प्राणान्तकारी भयंकर बाणांच्या द्वारा त्या रावणकुमारास मारून टाका. ॥३३-३४॥
इत्येवमुक्तस्तु तदा महात्मा
विभीषणेनारिविभीषणेन ।
ददर्श तं पर्वतसन्निकाशं
रणे स्थितं भीमबलं दुरासदम् ॥ ३५ ॥
शत्रूंना भयभीत करणार्‍या विभीषणांनी असे म्हटल्यावर त्यासमयी महात्मा लक्ष्मणांनी रथावर बसलेल्या त्या भयंकर बलशाली पर्वताकार दुर्जय राक्षसास पाहिले. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षडशीतितमः सर्गः ॥ ८६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सहाऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP