श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ नवमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण श्रीरामं प्रति वालिना सह स्वकीयवैरसंबंधी कारणस्य कथनम् - सुग्रीवांनी श्रीरामांना वालीबरोबर आपले वैर उत्पन्न होण्याचे कारण सांगणे -
वाली नाम मम भ्राता ज्येष्ठः शत्रुनिषूदनः ।
पितुर्बहुमतो नित्यं ममापि च तथा पुरा ॥ १ ॥
’रघुनंदना ! वाली माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यात शत्रुंचा संहार करण्याची शक्ती आहे. माझे पिता ऋक्षरजा त्यांना फार मानत असत आणि वैर करण्यापूर्वी माझ्याही मनात त्यांच्या प्रति आदराचा भाव होता. ॥१॥
पितर्युपरते ऽस्माकं ज्येष्ठो ऽयमिति मंत्रिभिः ।
कपीनामीश्वरो राज्ये कृतः परमसम्मतः ॥ २ ॥
 ’पित्याच्या मृत्युच्या पश्चात् मंत्र्यांनी त्यांना ज्येष्ठ समजून वानरांचा राजा बनविले. ते सर्वांना फार प्रिय होते म्हणून किष्किंधेच्या राज्यावर प्रतिष्ठित केले गेले होते. ॥२॥
राज्यं प्रशासतस्तस्य पितृपैतामहं महत् ।
अहं सर्वेषु कालेषु प्रणतः प्रेष्यवत्स्थितः ॥ ३ ॥
’ते पिता-पितामहांच्या विशाल राज्याचे शासन करू लागले आणि मी सतत विनीतभावाने दासाप्रमाणे त्यांच्या सेवेत राहू लागलो. ॥३॥
मायावी नाम तेजस्वी पूर्वजो दुंदुभेः सुतः ।
तेन तस्य महद्वैरं स्त्रीकृतं विश्रुतं पुरा ॥ ४ ॥
’त्या दिवसात मायावी नामक एक तेजस्वी दानव राहात होता, जो मय दानवाचा पुत्र आणि दुंदुभिचा मोठा भाऊ होता. त्याच्या बरोबर वालीचे स्त्रीच्या कारणामुळे फार मोठे वैर उत्पन्न झालेले होते. ॥४॥
स तु सुप्तजने रात्रै किष्किंधाद्वारमागतः ।
नर्दति स्म सुसंरब्धो वालिनं चाह्वयद्रणे ॥ ५ ॥
’एक दिवस अर्ध्या रात्रीच्या समयी जेव्हा सर्व लोक झोपलेले होते, मायावी किष्किंधापुरीच्या दरवाजावर आला आणि क्रोधाविष्ट होऊन वालीला युद्धासाठी ललकारू लागला. ॥५॥
प्रसुप्तस्तु मम भ्राता नर्दितं भैरवस्वनम् ।
श्रुत्वा न ममृषे वाली निष्पपात जवात्तदा ॥ ६ ॥
’त्यासमयी माझे भाऊ झोपलेले होते. त्याचा भैरवनाद ऐकून त्यांची झोप उडाली. त्यांनी त्या राक्षसाचे ललकारणे सहन झाले नाही; म्हणून ते वेगपूर्वक घरांतून निघाले. ॥६॥
स तु वै निःसृतः क्रोधात्तं हंतुमसुरोत्तमम् ।
वार्यमाणस्ततः स्त्रीभिर्मया च प्रणतात्मना ॥ ७ ॥
’ज्यावेळी ते क्रोधाने त्या श्रेष्ठ असुरास मारण्यासाठी निघाले, त्या समयी मीही तसेच अंतःपुरातील स्त्रीयांनी पाय पडून त्यांना जाण्यापासून अडविले. ॥७॥
स तु निर्धूय सर्वान्नो निर्जगाम महाबलः ।
ततो ऽहमपि सौहार्दान्निःसृतो वालिना सह ॥ ८ ॥
’परंतु महाबली वाली आम्हा सर्वांना दूर सारून निघून गेले, तेव्हा मीही स्नेहवश वालींच्या बरोबरच बाहेर पडलो. ॥८॥
स तु मे भ्रातरं दृष्ट्‍वा मां च दूरादवस्थिम् ।
असुरो जातसंत्रासः प्रदुद्राव तदा भृशम् ॥ ९ ॥
’त्या असुराने माझ्या भावाला पाहिले तसेच काही अंतरावर उभा असलेल्या माझ्यावरही त्याची दृष्टी पडली, मग तर तो भयाने त्रस्त झाला आणि अत्यंत जोराने पळला. ॥९॥
तस्मिन् द्रवति संत्रस्ते ह्यावां द्रुततरं गतौ ।
प्रकाशश्च कृतो मार्गश्चंद्रेणोद्ग्च्छता तदा ॥ १० ॥
’तो भयभीत होऊन पळाल्यावर आम्ही दोघा भावांनी अत्यंत त्वरेने त्याचा पाठलाग केला. त्या समयी उगवलेल्या चंद्राम्याने आमचा मार्गही प्रकाशित केला होता. ॥१०॥
स तृणैरावृतं दुर्गं धरण्या विवरं महत् ।
प्रविवेशासुरो वेगादावामासाद्य विष्ठितौ ॥ ११ ॥
’पुढे गेल्यावर धरणीवर एक गवताने झाकले गेलेले एक मोठे विवर (बिळ) होते; त्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. तो असुर मोठ्या वेगाने त्या विवरात घुसला. तेथे पोहोचल्यावर आम्ही दोघें तेथेच थांबलो. ॥११॥
तं प्रविष्टं रिपुं दृष्ट्‍वा बिलं रोषवशंगतः ।
मामुवाच तदा वाली वचनं क्षुभितेंद्रियः ॥ १२ ॥
’शत्रुला विवरात घुसलेला पाहून क्रोधाने वाली भडकला. त्यांची सर्व इंद्रिये क्षुब्ध झाली आणि त्यांनी मला याप्रकारे सांगितले- ॥१२॥
इह त्वं तिष्ठ सुग्रीव बिलद्वारि समाहितः ।
यावत्तत्र प्रविश्याहं निहन्मि समरे रिपुम् ॥ १३ ॥
’सुग्रीवा ! जो पर्यंत मी या विवरात प्रवेश करून युद्धात शत्रूला मारीत आहे तो पर्यंत आज याच्या द्वारावर तू सावधपणे उभा रहा. ॥१३॥
मया त्वेतद्वचः श्रुत्वा याचितः स परंतपः ।
शापयित्वा तु मां पद्‌भ्यां प्रविवेश बिलं महत् ॥ १४ ॥
’ही गोष्ट ऐकून मी शत्रुला संताप देणार्‍या वालीची स्वतःबरोबर मलाही घेऊन जाण्याविषयी प्रार्थना केली; परंतु त्यांनी आपल्या चरणांची शपथ देऊन ते एकटेच बिळात घुसले. ॥१४॥
तस्य प्रविष्टस्य बिलं साग्रः संवत्सरो गतः ।
स्थितस्य च मम द्वारि स कालो व्यत्यवर्तत ॥ १५ ॥
’बिळाच्या आत जाऊन त्यांना एका वर्षाहून अधिक काळ लोटला आणि बिळाच्या दरवाजाशी उभा राहून राहून माझाही इतका काळ लोटला. ॥१५॥
अहं तु नष्टं ज्ञात्वा तं स्नेहादागतसंभ्रमः ।
भ्रातरं न च पश्यामि पापाशङ्‌किद च मे मनः ॥ १६ ॥
’जेव्हा इतक्या दिवसापर्यंत मला भावाचे दर्शन झाले नाही तेव्हा मी समजलो की माझा भाऊ गुफेतच कोठे तरी हरवला (चुकला) आहे. त्यासमयी भ्रातृस्नेहाने माझे हृदय व्याकुळ झाले. माझ्या मनात ते मारले गेले असावेत अशी शंका उत्पन्न होऊ लागली. ॥१६॥
अथ दीर्घस्य कालस्य बिलात्तस्माद्विनिस्सृतम् ।
सफेनं रुधिरं दृष्ट्‍वा ततोऽहं भृशदुःखितः ॥ १७ ॥
त्यानंतर दीर्घकाळानंतर त्या बिळातून एकाएकी फेसासहित रक्ताची धार वाहू लागली. ती पाहून मी फारच दुःखी झालो. ॥१७॥
नर्दतामसुराणां च ध्वनिर्मे श्रोत्रमागतः ।
निरस्तस्य च संग्रामे क्रोशतो निस्वनो गुरोः ॥ १८ ॥
इतक्यातच गर्जणार्‍या असुरांचा आवाजही माझ्या कानांवर पडला. युद्धात गुंतलेले माझे मोठे बंधुही गर्जना करीत होते, परंतु त्यांचा आवाज मी ऐकू शकलो नाही. ॥१८॥
अहं त्ववगतो बुद्ध्या चिह्नैस्तैर्भ्रातरं हतम् ।
पिधाय च बिलद्वारं शिलया गिरिमात्रया ॥ १९ ॥

शोकार्तश्चोदकं कृत्वा किष्किंधामागतः सखे ।
गूहमानस्य मे तत्त्वं यत्‍नातो मंत्रिभिः श्रुतम् ॥ २० ॥
’या सर्व चिन्हांना पाहून बुद्धिद्वारा विचार केल्यावर मी या निश्चयावर पोहोचलो की माझे मोठे बंधु मारले गेले आहेत. मग तर त्या गुफेच्या दरवाजावर मी पर्वतासमान एक दगडाची शिळा ठेवून दिली आणि ती गुफा बंद करून भावाला जलाञ्जलि देऊन शोकाने व्याकुळ झालेला मी किष्किंधापुरीत परत आलो. सख्या ! यद्यपि मीही यथार्थ गोष्ट लपवून ठेवीत होतो तथापि मंत्र्यांनी प्रयत्‍न करून ती ऐकली. ॥१९-२०॥
ततोऽहं तैः समागम्य समेतैरभिषेचितः ।
राज्यं प्रशासतस्तस्य न्यायतो मम राघव ॥ २१ ॥

आजगाम रिपुं हत्वा वाली तमसुरोत्तमम् ।
अभिषिक्तं तु मां दृष्ट्‍वा वाली संरक्तलोचनः ॥ २२ ॥
’तेव्हा त्या सर्वांनी मिळून मला राज्यावर अभिषिक्त केले. राघवा ! मी न्यायपूर्वक राज्याचे संचालन करू लागलो. याच वेळी आपल्या शत्रुभूत त्या दानवास मारून वानरराज वाली घरी परतले. परतल्यावर मला राज्यावर अभिषिक्त झालेला पाहून त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले. ॥२१-२२॥
मदीयान् मंत्रिणो बद्ध्वा परुषं वाक्यमब्रवीत् ।
निग्रहे ऽपि समर्थस्य तं पापं प्रति राघव ॥ २३ ॥

न प्रावर्तत मे बुद्धिर्भ्रातुर्गौरवयंत्रिता ।
’माझ्या मंत्र्यांना त्यांनी कैद केले आणि त्यांना कठोर वचने ऐकविली. यद्यपि मीही त्या पापीला कैद करण्यास समर्थ होतो तरीही भावाप्रति गुरूभाव असल्यामुळे माझ्या बुद्धित असा विचार आला नाही. ॥२३ १/२॥
हत्वा शत्रुं स मे भ्राता प्रविवेश पुरं तदा ॥ २४ ॥

मानयंस्तं महात्मानं यथावच्चाभ्यवादयम् ।
उक्ताश्च नाशिषस्तेन प्रहृष्टेनांतरात्माना ॥ २५ ॥
 ’या प्रकारे शत्रुचा वध करून माझ्या भावाने त्या समयी नगरात प्रवेश केला. त्या महात्म्याचा सन्मान करून मी यथोचित रूपाने त्यांच्या चरणी मस्तक नमविले तरीही त्यांनी प्रसन्नचित्ताने मला आशिर्वाद दिला नाही. ॥२४-२५॥
नत्वा पादावहं तस्य मुकुटेनास्पृशं प्रभो ।
अपि वाली मम क्रोधान्न प्रसादं चकार सः ॥ २६ ॥
’प्रभो ! मी माझ्या भावाच्या समोर वाकून आपल्या मस्तकावरील मुकुटाने त्यांच्या दोन्ही चरणांना स्पर्श केला तरी ही क्रोधामुळे वाली माझ्यावर प्रसन्न झाले नाहीत. ’॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा नववा सर्ग पूरा झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP