श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चनवतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

स्वामात्यानाहूय रावणेन स्वशत्रुवध विषयकोत्साहस्य प्रकटनं सर्वैः सह रणभूमिमागत्य पराक्रमस्य प्रदर्शनं च -
रावणाने आपल्या मंत्र्यांना बोलावून शत्रुवध विषयक आपला उत्साह प्रकट करणे आणि सर्वांच्यासह रणभूमीमध्ये येऊन पराक्रम दाखविणे -
आर्तानां राक्षसीनां तु लङ्‌कायां वै कुले कुले ।
रावणः करुणं शब्दं शुश्राव परिदेवितम् ॥ १ ॥
रावणाने लंकेच्या घराघरांतून शोकमग्न राक्षसींनी केलेला करूणाजनक विलाप ऐकला. ॥१॥
स तु दीर्घं विनिश्वस्य मुहूर्तं ध्यानमास्थितः ।
बभूव परमक्रुद्धो रावणो भीमदर्शनः ॥ २ ॥
तो दीर्घ श्वास घेऊन एक मुहूर्तपर्यंत ध्यानमग्न राहून काही विचार करीत राहिला. त्यानंतर रावण अत्यंत कुपित होऊन फारच भयानक दिसू लागला. ॥२॥
सन्दश्य दशनैरोष्ठं क्रोधसंरक्तलोचनः ।
राक्षसैरपि दुर्दर्शः कालाग्निरिव मूर्तिमान् ॥ ३ ॥
त्याने दातांनी ओठ चावले. त्याचे डोळे रोषाने लाल झाले. तो मूर्तीमंत प्रलयाग्निसमान दिसून येऊ लागला. राक्षसांसाठी ही त्याच्याकडे पहाणे कठीण झाले. ॥३॥
उवाच च समीपस्थान् राक्षसान् राक्षसेश्वरः ।
भयाव्यक्तकथस्तत्र निर्दहन्निव चक्षुषा ॥ ४ ॥
त्या राक्षसराजाने आपल्या जवळ उभ्या असलेल्या राक्षसांशी अस्पष्ट शब्दात वार्तालाप करण्यास आरंभ केला. त्यासमयी तेथे तो अशा रीतीने पहात होता की जणु आपल्या डोळ्यांनी दग्ध करून टाकील. ॥४॥
महोदरमाहपार्श्वं विरूपाक्षं च राक्षसम् ।
शीघ्रं वदत सैन्यानि निर्यातेति ममाज्ञया ॥ ५ ॥
त्याने म्हटले - निशाचरांनो ! महोदर, महापार्श्व तसेच राक्षस विरूपाक्ष यांना शीघ्र जाऊन सांगा - तुम्ही लोक माझ्या आज्ञेने शीघ्रच सेनांना कूच करण्याचा आदेश द्या. ॥५॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा राक्षसास्ते भयार्दिताः ।
चोदयामासुरव्यग्रान् राक्षसांस्तान् नृपाज्ञया ॥ ६ ॥
रावणाचे हे वचन ऐकून भयाने पीडित झालेल्या त्या राक्षसांनी राजाच्या आज्ञेनुसार त्या निर्भीक निशाचरांना पूर्वोक्त कार्य करण्यासाठी प्रेरित केले. ॥६॥
ते तु सर्वे तथेत्युक्त्वा राक्षसा घोरदर्शनाः ।
कृतस्वस्त्ययनाः सर्वे रणायाभिमुखा ययुः ॥ ७ ॥
तेव्हा तथास्तु म्हणून भयानक दिसणार्‍या त्या सर्व राक्षसांनी आपल्यासाठी स्वास्तिवाचन करविले आणि युद्धासाठी प्रस्थान केले. ॥७॥
प्रतिपूज्य यथान्यायं रावणं ते महारथाः ।
तस्थुः प्राञ्जलयः सर्वे भर्तुर्विजयकाङ्‌क्षिणः ॥ ८ ॥
स्वामीच्या विजयाची इच्छा करणारे ते सर्व महारथी वीर यथोचित रीतिने रावणाचा आदर-सन्मान करून त्याच्या समोर हात जोडून उभे राहिले. ॥८॥
ततोवाच प्रहस्यैतान् रावणः क्रोधमूर्च्छितः ।
महोदरमहापार्श्वौ विरूपाक्षं च राक्षसम् ॥ ९ ॥
त्यानंतर रावण क्रोधाने जणु मूर्च्छितसा होऊन मोठ्‍या जोराने हसू लागला आणि महोदर, महापार्श्व आणि राक्षस विरूपाक्ष यांना म्हणाला - ॥९॥
अद्य बाणैर्धनुर्मुक्तैः युगान्तादित्यसन्निभैः ।
राघवं लक्ष्मणं चैव नेष्यामि यमसादनम् ॥ १० ॥
आज आपल्या धनुष्यापासून सुटलेल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा मी, जे प्रलयकाळच्या सूर्यासदृश्य तेजस्वी आहेत, त्या राघव आणि लक्ष्मण यांना यमसदनात पोहोचवून देईन. ॥१०॥
खरस्य कुम्भकर्णस्य प्रहस्तेन्द्रजितोस्तथा ।
करिष्यामि प्रतीकारं अद्य शत्रुवधादहम् ॥ ११ ॥
आज शत्रुचा वध करून खर, कुंभकर्ण, प्रहस्त तसेच इंद्रजित मारले गेले त्याचा भरपूर बदला घेईन. ॥११॥
नैवान्तरिक्षं न दिशो न नद्यो नापि सागराः ।
प्रकाशत्वं गमिष्यन्ति मद्‌बाणजलदावृताः ॥ १२ ॥
माझे बाण मेघांच्या समुदायाप्रमाणे सर्वत्र पसरतील, म्हणून अंतरिक्ष, दिशा, आकाश तसेच समुद्र - काहीच दिसून येणार नाही. ॥१२॥
अद्य वानरमुख्यानां तानि यूथानि भागशः ।
धनुषा शरजालेन वधिष्यामि पतत्रिणा ॥ १३ ॥
आज आपल्या धनुष्यांतून पंख असलेल्या बाणांचे जणु जाळे पसरून टाकीन आणि वानरांच्या मुख्य मुख्य यूथांचा पृथक पृथक वध करीन. ॥१३॥
अद्य वानरसैन्यानि रथेन पवनौजसा ।
धनुःसमुद्रादुद्‌भूतैर्मथिष्यामि शरोर्मिभिः ॥ १४ ॥
आज वायुसमान वेगशाली रथावर आरूढ होऊन मी आपल्या धनुष्यरूपी समुद्रापासून उठलेल्या बाणमय तरंगांनी वानरसेनांना मथून टाकीन. ॥१४॥
व्याकोशपद्मवक्त्राणि पद्मकेसरवर्चसाम् ।
अद्य यूथतटाकानि गजवत् प्रमथाम्यहम् ॥ १५ ॥
कमल-केसरासारखी कांति असलेले वानरांचे यूथ सरोवरांप्रमाणे आहेत. त्यांची मुखे हीच त्या सरोवरामध्ये फुललेल्या कमलाप्रमाणे सुशोभित होत आहेत. आज मी हत्तीप्रमाणे त्यांच्यात प्रवेश करून त्या वानर-यूथरूपी सरोवरांना मथून टाकीन. ॥१५॥
सशरैरद्य वदनैः सङ्‌ख्ये वानरयूथपाः ।
मण्डयिष्यन्ति वसुधां सनालैरिव पङ्‌कजैः ॥ १६ ॥
आज युद्धस्थळी पडलेले वानर-यूथपति आपल्या बाणविद्ध मुखांच्या द्वारा नालयुक्त कमलांचा भ्रम उत्पन्न करीत रणभूमीची शोभा वाढवतील. ॥१६॥
अद्य युद्धप्रचण्डानां हरीणां द्रुमयोधिनाम् ।
मुक्तेनैकेषुणा युद्धे भेत्स्यामि च शतं शतम् ॥ १७ ॥
आज युद्धभूमीमध्ये धनुष्यातून सुटलेल्या एका एका बाणांनी मी वृक्ष घेऊन झुंजणार्‍या शंभर शंभर प्रचण्ड वानरांना विदीर्ण करीन. ॥१७॥
हतो भ्राता च येषां वै येषां च तनयो हतः ।
वधेनाद्य रिपोस्तेषां करोम्यस्रप्रमार्जनम् ॥ १८ ॥
ज्यांचे बंधू आणि पुत्र या युद्धात मारले गेले आहेत, त्या सार्‍यांचे आज मी अश्रु पुशीन. ॥ १८ ॥
अद्य मद्‌बाणनिर्भिन्नैः प्रकीर्णैर्गतचेतनैः ।
करोमि वानरैर्युद्धे यत्‍नावेक्ष्यतलां महीम् ॥ १९ ॥
आज युद्धात माझ्या बाणांनी विदीर्ण तसेच निर्जीव झालेले वानर या तर्‍हेने पसरले जातील की तेथील भूमी मोठ्‍या यत्‍नाने दिसू शकेल. ॥१९॥
अद्य काकाश्च गृध्राश्च ये च मांसाशिनोऽपरे ।
सर्वांस्तांस्तर्पयिष्यामि शत्रुमांसैः शराहतैः ॥ २० ॥
आज आपल्या बाणांच्या द्वारा मारल्या गेलेल्या शत्रूंच्या मांसांनी मी कावळे, गिधाडे तसेच दुसरे जे मांसभक्षी जंतु आहेत, त्या सर्वांना ही तृप्त करीन. ॥२०॥
कल्प्यतां मे रथः शीघ्रं क्षिप्रमानीयतां धनुः ।
अनुप्रयान्तु मां युद्धे येऽत्र शिष्टा निशाचराः ॥ २१ ॥
लवकर माझा रथ तयार केला जाऊ दे, तात्काळ धनुष्य आणले जावो, तसेच मरण्यापासून वाचलेल्या निशाचरांनी युद्धात माझ्या पाठोपाठ यावे. ॥२१॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा महापार्श्वोऽब्रवीद् वचः ।
बलाध्यक्षान् स्थितांस्तत्र बलं सन्त्वर्यतामिति ॥ २२ ॥
रावणाचे हे वचन ऐकून महापार्श्वने तेथे उभे असलेल्या सेनापतिंना म्हटले- सेनेला शीघ्रच कूच करण्याची आज्ञा द्या. ॥२२॥
बलाध्यक्षास्तु संरब्धा राक्षसांस्तान् गृहे गृहे ।
चोदयन्तः परिययुः लंकां लघुपराक्रमाः ॥ २३ ॥
ही आज्ञा मिळताच ते शीघ्रपराक्रमी सेनाध्यक्ष घरोघर जाऊन त्या राक्षसांना तयार होण्याचा आदेश देत सार्‍या लंकेमध्ये फिरू लागले. ॥२३॥
ततो मुहूर्तान्निष्पेतू राक्षसा भीमदर्शनाः ।
नर्दन्तो भीमवदना नानाप्रहरणैर्भुजैः ॥ २४ ॥
थोड्‍याच वेळात भयंकर मुख आणि आकार असणारे राक्षस गर्जना करीत तेथे येऊन पोहोचले. त्यांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे होती. ॥२४॥
असिभिः पट्टिशैः शूलैः गर्गदाभिर्मुसलैर्हलैः ।
शक्तिभिस्तीक्ष्णधाराभिः महद्‌भिः कूटमुद्‌गरैः ॥ २५ ॥

यष्टिभिर्विविधैः चक्रैः निशितैश्च परश्वधैः ।
भिन्दिपालैः शतघ्नीभिः अन्यैश्चापि वरायुधैः ॥ २६ ॥
तलवार, पट्‍टिश, शूल, गदा, मुसळ, ढाल, तीक्ष्ण धार असणारी शक्ति, मोठ-मोठे कूटमुद्‍गर, काठ्‍या, तर्‍हेतर्‍हेची चक्रे, तीक्ष्ण परशु, भिंदिपाल, शतघ्नी तसेच अन्य प्रकारच्या उत्तमोत्तम अस्त्र-शस्त्रांनी ते संपन्न होते. ॥२५-२६॥
अथानयद् बलाध्यक्षाः चत्वारो रावणाज्ञया ।
रथानां नियुतं साग्रं नागानां नियुतत्रयम् ॥ २७ ॥

अश्वानां षष्टिकोट्यस्तु खरोष्ट्राणां तथैव च ।
पदातयस्तु असंख्याता जग्मुस्ते राजशासनात् ॥ २८ ॥
रावणाच्या आज्ञेने चार सेनापति एक लाखाहून काही अधिक रथ, तीन लाख हत्ती, साठ कोटि घोडे, तितकीच गाढवे तसेच ऊंट आणि असंख्य पायदळ योद्धांना घेऊन येऊन पोहोचले. ते सर्व सैनिक राजाच्या आदेशाने तेथे गेले. ॥२७-२८॥
बलाध्यक्षाश्च संस्थाप्य राज्ञः सेनां पुरःस्थितम् ।
एतस्मिन्नन्तरे सूतः स्थापयामास तं रथम् ॥ २९ ॥
याप्रकारे विशाल सेना आणून सेनाध्यक्षांनी राक्षसराज रावणाच्या समोर उभी केली. यामध्येच सारथ्याने एक रथ आणून उपस्थित केला. ॥२९॥
दिव्यास्त्रवरसंपन्नं नानालंकारभूषितम् ।
नानायुधसमाकीर्णं किङ्‌किणीजालसंयुतम् ॥ ३० ॥
त्यामध्ये उत्तम दिव्यास्त्रे ठेवली होती. अनेक प्रकारच्या अलंकारांनी तो रथ सजविला गेला होता. त्यात नाना प्रकारची हत्यारे होती आणि तो रथ घुंगरू असलेल्या झालरींनी सुशोभित होता. ॥३०॥
नानारत्‍नतपरिक्षिप्तं रत्‍निस्तंभैर्विराजितम् ।
जाम्बूनदमयैश्चैव सहस्रकलशैर्वृतम् ॥ ३१ ॥
त्यात नाना प्रकारची रत्‍ने जडविलेली होती. रत्‍नमय खांब त्याची शोभा वाढवीत होते आणि सोन्याच्या बनविलेल्या हजारो कलशांनी तो अलंकृत होता. ॥३१॥
तं दृष्ट्‍वा राक्षसाः सर्वे विस्मयं परमं गताः ।
तं दृष्ट्‍वा सहसोत्थाय रावणो राक्षसेश्वरः ॥ ३२ ॥

कोटिसूर्यप्रतीकाशं ज्वलंतमिव पावकम् ।
द्रुतं सूतसमायुक्तं युक्ताष्टतुरगं रथम् ।
आरुरोह तदा भीमं दीप्यमानं स्वतेजसा ॥ ३३ ॥
तो रथ पाहून सर्व राक्षस अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्याच्यावर दृष्टि पडताच राक्षसराज रावण एकाएकी उठून उभा राहिला. तो रथ कोट्‍यावधि सूर्यांच्यासमान तेजस्वी तसेच प्रज्वलित अग्निसदृश्य दीप्तिमान्‌ होता. त्याला आठ घोडे जुंपलेले होते. रावण तात्काळ त्या भयंकर रथावर आरूढ झाला. ॥३२-३३॥
ततः प्रयातः सहसा राक्षसैर्बहुभिर्वृतः ।
रावणः सत्त्वगाम्भीर्याद् दरयन्निव मेदिनीम् ॥ ३४ ॥
त्यानंतर बर्‍याचशा राक्षसांनी घेरलेला रावण एकाएकी युद्धासाठी प्रस्थित झाला. तो आपल्या बळाच्या अधिकतेमुळे पृथ्वीला विदीर्ण करीत असल्याप्रमाणे जात होता. ॥३४॥
ततश्चासीन् महानादः तूर्याणां च ततस्ततः ।
मृदङ्‌गैः पटहैः शंखैः कलहैः सह रक्षसाम् ॥ ३५ ॥
मग तर जिकडे तिकडे सर्वत्र वाद्यांचा महानाद निनादून राहिला. मृदंङ्‌ग, पट्‍टह, शंख तसेच राक्षसांच्या कलहाचा ध्वनिही त्यात मिसळला होता. ॥३५॥
आगतो रक्षसां राजा छत्रचामरसंयुतः ।
सीतापहारी दुर्वृत्तो ब्रह्मघ्नो देवकण्टकः ।
योद्धुं रघुवरेणेति शुश्रुवे कलहध्वनिः ॥ ३६ ॥
सीतेला चोरून आणणारा, दुराचारी, ब्रह्महत्यारा तसेच देवतांसाठी कण्टकरूप राक्षसराज रावण छत्र आणि चामरे ढाळत रघुवरांशी युद्ध करण्यासाठी येत आहे अशा प्रकारचा कलह ध्वनि कानांवर पडत होता. ॥३६॥
तेन नादेन महता पृथिवी समकम्पत ।
तं शब्दं सहसा श्रुत्वा वानरा दुद्रुवुर्भयात् ॥ ३७ ॥
त्या महानादाने पृथ्वी कापू लागली. त्या भयानक शब्दास ऐकून सर्व वानर एकाएकी भयाने पळू लागले. ॥३७॥
रावणस्तु महाबाहुः सचिवैः परिवारितः ।
आजगाम महातेजा जयाय विजयं प्रति ॥ ३८ ॥
मंत्र्यांनी घेरलेला महातेजस्वी महाबाहु रावण युद्धात विजय प्राप्तीचा उद्देश ठेवून तेथे आला. ॥३८॥
रावणेनाभ्यनुज्ञातौ महापार्श्वमहोदरौ ।
विरूपाक्षश्च दुर्धर्षो रथानारुरुहुस्तदा ॥ ३९ ॥
रावणाची आज्ञा मिळताच त्या समयी महापार्श्व, महोदर तसेच दुर्जय वीर विरूपाक्ष - तीघेही रथांवर आरूढ झाले. ॥३९॥
ते तु हृष्टाभिनर्दन्तो भिन्दन्त इव मेदिनीम् ।
नादं घोरं विमुञ्जन्तो निर्ययुर्जयकांक्षिणः ॥ ४० ॥
ते हर्षपूर्वक जोरजोराने अशा डरकाळ्या फोडत होते की जणु पृथ्वीला विदीर्ण करून टाकतील. ते विजयाची इच्छा मनांत धरून घोर सिंहनाद करीत पुरीतून बाहेर पडले. ॥४०॥
ततो युद्धाय तेजस्वी रक्षोगणबलैर्वृतः ।
निर्ययावुद्यतधनुः कालान्तकयमोपमः ॥ ४१ ॥
त्यानंतर काळ, मृत्यु आणि यमराजाप्रमाणे भयंकर तेजस्वी रावण हातात धनुष्य घेऊन राक्षसांच्या सेनेने घेरलेला युद्धासाठी पुढे निघाला. ॥४१॥
ततः प्रजवनाश्वेन रथेन स महारथः ।
द्वारेण निर्ययौ तेन यत्र तौ रामलक्ष्मणौ ॥ ४२ ॥
त्याच्या रथाचे घोडे अत्यंत वेगाने चालणारे होते. त्याच्या द्वारा तो महारथी वीर लंकेच्या त्याच द्वाराने बाहेर पडला, जेथे रामलक्ष्मण विद्यमान होते. ॥४२॥
ततो नष्टप्रभः सूर्यो दिशश्च तिमिरावृताः ।
द्विजाश्च नेदुर्घोराश्च सञ्चचाल च मेदिनी ॥ ४३ ॥
त्यासमयी सूर्याची प्रभा फिकी पडली. समस्त दिशांमध्ये अंधकार पसरला, भयंकर पक्षी अशुभ बोली बोलू लागले आणि पृथ्वी डोलू लागली. ॥४३॥
ववर्ष रुधिरं देवः चस्खलुश्च तुरंगमाः ।
ध्वजाग्रे न्यपतद् गृध्रो विनेदुश्चाशिवं शिवाः ॥ ४४ ॥
मेघ रक्ताची वृष्टि करू लागले. घोडे अडखळून पडू लागले. ध्वजेच्या अग्रभागावर गिधाड येऊन बसले आणि कोल्हीणी अमंगल सूचक बोली बोलू लागल्या. ॥४४॥
नयनं चास्फुरद् वामं वामो बाहुरकम्पत ।
विवर्णवदनश्चासीत् किञ्चिदभ्रश्यत स्वनः ॥ ४५ ॥
डावा डोळा लवू लागला. डावी भुजा एकाएकी कापू लागली. त्याच्या चेहर्‍याच्या रंग फिका पडला आणि आवाज काहीसा बसला. ॥४५॥
ततो निष्पततो युद्धे दशग्रीवस्य रक्षसः ।
रणे निधनशंसीनि रूपाण्येतानि जज्ञिरे ॥ ४६ ॥
राक्षस दशग्रीव जसा युद्धासाठी निघाला तशीच रणभूमीवर त्याच्या मृत्युची सूचक लक्षणे प्रकट होऊ लागली. ॥४६॥
अन्तरिक्षात् पपातोल्का निर्घातसमनिःस्वना ।
विनेदुरशिवा गृध्रा वायसैरभिमिश्रिताः ॥ ४७ ॥
आकाशातून उल्कापात झाला. त्यापासून वज्रपाताप्रमाणे गडगडाट उत्पन्न झाला. अमंगलसूचक पक्षी-गिधाडे कावळ्यांबरोबर अशुभ बोली बोलू लागली. ॥४७॥
एतानचिन्तयन् घोरान् उत्पातान् समुपस्थितान् ।
निर्ययौ रावणो मोहाद्वधार्थी कालचोदितः ॥ ४८ ॥
हे भयंकर उत्पात समोर उपस्थित झालेले पाहूनही रावणाने त्यांची काही पर्वा केली नाही. तो काळाने प्रेरित होऊन मोहवश आपल्याच वधासाठी बाहेर पडला. ॥४८॥
तेषां तु रथघोषेण राक्षसानां महात्मनाम् ।
वानराणामपि चमूः युद्धायैवाभ्यवर्तत ॥ ४९ ॥
त्या महाकाय राक्षसांच्या रथाचा गंभीर घोष ऐकून वानरांची सेनाही युद्धासाठी त्यांच्या समोर येऊन खिळून उभी राहिली. ॥४९॥
तेषां तु तुमुलं युद्धं बभूव कपिरक्षसाम् ।
अन्योन्यमाह्वयानानां क्रुद्धानां जयमिच्छताम् ॥ ५० ॥
नंतर तर आपला विजय इच्छिणार्‍या रोषपूर्वक एक दुसर्‍यास ललकारणार्‍या वानरात आणि राक्षसात तुमुल युद्ध सुरू झाले. ॥५०॥
ततः क्रुद्धो दशग्रीवः शरैः काञ्चनभूषणैः ।
वानराणामनीकेषु चकार कदनं महत् ॥ ५१ ॥
त्यासमयी दशमुख रावण आपल्या सुवर्णभूषित बाणांच्या द्वारे वानरांच्या सेनांमध्ये रोषपूर्वक फारच मोठे क्रंदन करू लागला. ॥५१॥
निकृत्तशिरसः केचिद्रावणेन बलीमुखाः ।
केचिद्विच्छिन्न हृदयाः केचिच्छ्रोत्रविवर्जिताः ॥ ५२ ॥
रावणाने कित्येक वानरांची मस्तके छाटली, कित्येकांची छाती भेदून टाकली आणि बर्‍याच जणांचे कान उडवून दिले. ॥५२॥
निरुच्छ्वासा हताः केचित् केचित् पार्श्वेषु दारिताः ।
केचिद् विभिन्नशिरसः केचिद् चक्षुर्विवर्जिताः ॥ ५३ ॥
कित्येकांनी घायाळ होऊन प्राणत्याग केला. रावणाने कित्येक वानरांच्या बरगड्‍या फोडून टाकल्या, कित्येकांची मस्तके चिरडून टाकली आणि कित्येकांची डोळे फोडले. ॥५३॥
दशाननः क्रोधविवृत्तनेत्रो
यतो यतोऽभ्येति रथेन सङ्‌ख्ये ।
ततस्ततस्तस्य शरप्रवेगं
सोढुं न शेकुर्हरियूथपास्ते ॥ ५४ ॥
दशमुख रावणाचे डोळे क्रोधाने गरगर फिरत होते. तो आपल्या रथाद्वारा युद्धस्थळी जेथे जेथे गेला तेथे तेथे ते वानर यूथपति त्याच्या बाणांचा वेग सहन करू शकले नाहीत. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षण्णवतितमः सर्गः ॥ ९६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा पंच्याणवावा सर्ग पूरा झाला. ॥९५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP