॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ पंचमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]शुकाचे पूर्वचरित्र, माल्यवानाने रावणाला समजावणे आणि वानर व राक्षस यांचे युद्ध


श्रीमहादेव उवाच
श्रुत्वा शुकमुखोद्‍गीतं वाक्यमज्ञाननाशनम् ।
रावणः क्रोधताम्राक्षो दहन्निव तमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, शुकाच्या मुखातून बाहेर पडलेले, अज्ञानाचा नाश करणारे ते वचन ऐकल्यावर, क्रोधाने जणू जळणारा आणि रागाने डोळे लाल झालेला रावण शुकाला म्हणाला. (१)

अनुजीव्य सुदुर्बुद्धे गुरुवद्‌भाषसे कथम् ।
शासिताहं त्रिजगतां त्वं मां शिक्षन्न लज्जसे ॥ २ ॥
"अतिशय दुष्ट बुद्धी असणाऱ्या हे शुका, माझ्या तुकड्यांवर वाढलेला तू माझा सेवक असून, एखाद्या गुरूप्रमाणे माझ्याशी कसे बोलतोस ? मी तिन्ही लोकांचे शासन करणारा आहे. मला उपदेश करताना तुला लाज कशी वाटत नाही ? (२)

इदानीमेव हन्मि त्वां किन्तु पूर्वकृतं तव ।
स्मरामि तेन रक्षामि त्वां यद्यपि वधोचितम् ॥ ३ ॥
खरे म्हणजे आत्ताच मी तुझा वध केला असता. तथापि तू पूर्वी माझ्यासाठी जे काही चांगले केले आहेस ते माझ्या लक्षात आहे. म्हणून जरी तू वध करण्यास योग्य आहेस तरी मी तुला जीवदान देत आहे. (३)

इतो गच्छ विमूढ त्वं एवं श्रोतुं न मे क्षमम् ।
महाप्रसाद इत्युक्‍त्वा वेपमानो गृहं ययौ ॥ ४ ॥
शुकोऽपि ब्राह्मणः पूर्वं ब्रह्मिष्ठो ब्रह्मवित्तमः ।
वानप्रस्थाविधानेन वने तिष्ठन् स्वकर्मकृत् ॥ ५ ॥
अरे मूर्खा, तू आता येथून चालता हो. अशा प्रकारचे तुझे भाषण मला ऐकवत नाही." तेव्हा "आपली मोठी कृपा आहे," असे बोलून शुक हा भीतीने कापत कापत आपल्या घरी गेला. पूर्वजन्मी शुक हा सुद्धा वेद जाणणारा आणि श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असा ब्राह्मण होता. तो वानप्रस्थाश्रमाच्या नियमांना धरून आपली धर्म-कर्मे करीत एका वनामध्ये राहात होता. (४-५)

देवानां अभिवृद्ध्यर्थं विनाशाय सुरद्विषाम् ।
चकार यज्ञविततिं अविच्छिन्नां महामतिः ॥ ६ ॥
देवांच्या अभिवृद्धीसाठी आणि देवांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांच्या नाशासाठी, त्या महाबुद्धिमान शुकाने अखंडितपणे अनेक यज्ञ केले होते. (६)

राक्षसानां विरोधोऽभूत् शुको देवहितोद्यतः ।
वज्रदंष्ट्र इति ख्यातः तत्रैको राक्षसो महान् ॥ ७ ॥
देवांचे हित करण्यात तत्पर असणाऱ्या शुकाला राक्षसांचा विरोध होऊ लागला. त्या वेळी तेथे वज्रदंष्ट्र नावाचा एक प्रख्यात असा महान राक्षस होता. (७)

अन्तरं प्रेप्सुरातिष्ठत् शुकापकरणोद्यतः ।
कदाचित् आगतोऽगस्त्यः तस्याश्रमपदं मुनेः ॥ ८ ॥
शुकाचा अपकार करण्याकरत उत्सुक असणारा वज्रदंष्ट्र योग्य संधीची वाट पाहात थांबला होता. एकदा त्या शुक मुनीच्या आ श्रमस्थानी अगस्त्य नावाचे ऋषी आले. (८)

तेन सम्पूजितोऽगस्त्य भोजनार्थं निमंत्रितः ।
गते स्नातुं मुनौ कुम्भ-सम्भवे प्राप्य चान्तरम् ॥ ९ ॥
आगस्त्यरूपधृक् सोऽपि राक्षसः शुकमब्रवीत् ।
यदि दास्यसि मे ब्रह्मन् भोजनं देहि सामिषम् ॥ १० ॥
शुकाने अगस्तीची पूजा केली आणि त्यांना भोजनासाठी आमंत्रण दिले. नंतर अगस्त्य स्नानासाठी गेले. ती संधी साधून, त्या राक्षसाने सुद्धा अगस्त्याचे रूप धारण करू न शुकाला म्हटले, " हे ब्राह्मणा, जर तू मला भोजन देणार असशील, तर मला मांसयुक्त भोजन दे. (९-१०)

बहुकालं न भुक्तं मे मांसं छागाङ्‌गसम्भवम् ।
तथेति कारयामास मांसभोज्यं सविस्तरम् ॥ ११ ॥
बरेच दिवस झाले मी बोकडाच्या शरीरातील मांस खाल्लेले नाही." 'ठीक आहे' असे म्हणून शुकाने पुष्कळ मासयुक्त पदार्थ तयार करवून घेतले. (११)

उपविष्टे मुनौ भोक्तुं राक्षसोऽतीव सुन्दरम् ।
शुकभार्यावपुर्धृत्वा तां चान्तर्मोहयन् खलः ॥ १२ ॥
वरमांसं ददौ तस्मै सुपक्वं बहुविस्तरम् ।
दत्त्वैवान्तर्दधे रक्षः ततो दृष्ट्वा चुकोप सः ॥ १३ ॥
अमेध्यं मानुषं मांसं अगस्त्यः शुकमब्रवीत् ।
अभक्ष्यं मानुषं मांसं दत्तवानसि दुर्मते ॥ १४ ॥
मह्यं त्वं राक्षसो भूत्वा तिष्ठ त्वं मानुषाशनः ।
इति शप्तः शुको भीत्या प्राहागस्त्यं मुने त्वया ॥ १५ ॥
इदानीं भाषितं मेऽद्य मांसं देहीति विस्तरम् ।
तथैव दत्तं भो देव किं मे शापं प्रदास्यसि ॥ १६ ॥
नंतर खरे अगस्त्य मुनी जेवावयास बसले असता, त्या दुष्ट राक्षसाने शुकाच्या पत्नीला आश्रमाच्या आतल्या बाजूला मूर्च्छित केले आणि त्या शुक पत्नीचे अतिशय सुंदर रूप धारण करून, चांगले शिजविलेले, नाना प्रकारचे नरमांसाचे पदार्थ त्याने अगस्त्यांना वाढले. ते पदार्थ वाढून तो राक्षस अंतर्धान पावला. आपल्यापुढे वाढलेले ते अपवित्र व अभक्ष्य असे मानवाचे मांस पाहून अगस्त्य अत्यंत कुद्ध झाले. ते शुकाला म्हणाले, "अरे दुष्ट बुद्धीच्या मुने, तू मला अभक्ष्य असे मानवाचे मांस दिले आहेस. म्हणून तू माणसांना खाणारा राक्षस होऊन राहा." अशा प्रकारे अगस्त्यांचा शाप मिळालेला शुक घाबरून जाऊन त्यांना म्हणाला,"हे मुनी, तुम्हीच मला आत्ता सांगितले होते की, आज मला नाना प्रकारचे मांस भोजनास दे. त्याप्रमाणे मी ते दिले आहे. तेव्हा हे देवा, तुम्ही मला का बरे शाप देत आहात ?" (१२-१६)

श्रुत्वा शुकस्य वचनं मुहूर्तं ध्यानमास्थितः ।
ज्ञात्वा रक्षःकृतं सर्वं ततः प्राह शुकं सुधीः ॥ १७ ॥
शुकाचे वचन ऐकल्यावर महाबुद्धिमान अगस्त्यांनी थोडा वेळ ध्यान केले, तेव्हा त्यांना कळून आले की ते सर्व एका राक्षसाचे कृत्य होते. मग अतिशय बुद्धिवान अगस्त्य शुकाला म्हणाले. (१७)

तवापकारिणा सर्वं राक्षसेन कृतं त्विदम् ।
अविचार्यैव मे दत्तः शापस्ते मुनिसत्तम ॥ १८ ॥
"हे मुनिश्रेष्ठा, तुझ्यावर अपकार करू इच्छिणाऱ्या एका राक्षसाने हे सर्व केले आहे आणि मी विचार न करताच तुला शाप दिला. (१८)

तथापि मे वचोऽमोघं एवमेव भविष्यति ।
राक्षसं वपुरास्थाय रावणस्य सहायकृत् ॥ १९ ॥
तिष्ठ तावद्यदा रामो दशाननवधाय हि ।
आगमिष्यति लङ्‌कायाः समीपं वानरैः सह ॥ २० ॥
प्रेषितो रावणेन त्वं चारो भूत्वा रघूत्तमम् ।
दृष्ट्वा शापात् विनिर्मुक्तो बोधयित्वा च रावणम् ॥ २१ ॥
तत्त्वज्ञानं ततो मुक्त परं पदमवाप्स्यसि ।
इत्युक्तोऽगस्त्यमुनिना शुको ब्रह्मणसत्तम ॥ २२ ॥
बभूव राक्षसः सद्यो रावणं प्राप्य संस्थितः ।
इदानीं चाररूपेण दृष्ट्वा रामं सहानुजम् ॥ २३ ॥
रावणं तत्त्वविज्ञानं बोधयित्वा पुनर्द्रुतम् ।
पूर्ववद्‌ब्राह्मणो भूत्वा स्थितो वैखानसैः सह ॥ २४ ॥
तरीसुद्धा माझे वचन खोटे ठरणार नाही. तेव्हा हे असेच होईल. राक्षसाचे शरीर धारण करून तू रावणाला साहाय्य करीत राहा. तसे तू करीत असताना श्रीराम रावणाच्या वधासाठी वानरांसह लंकेजवळ येतील. तत्पूर्वी रावणाने पाठविल्यामुळे त्याचा दूत होऊन जेव्हा तू रघूत्तमांना पाहाशील, तेव्हा तू शापातून मुक्त होशील. त्याच वेळी रावणाला तत्त्वज्ञानाचा उपदेश केल्यानंतर, तू मुक्त होऊन परमपद प्राप्त करून घेशील." अगस्त्य मुनींनी असे म्हटल्यावर, तो ब्राह्मणश्रेष्ठ शुक राक्षस झाला आणि लगेच रावणाकडे जाऊन तो त्याच्या आश्रयाने राहू लागला. आता या वेळी तो दूत रूपात असताना लक्ष्मणासह रामांचे दर्शन शुकाला झाले आणि रावणाला तत्त्वज्ञानाचा उपदेश केल्यावर, तो चट्दिशी पूर्वी प्रमाणे ब्राह्मण झाला आणि इतर वानप्रस्थी लोकांबरोबर राहूं लागला. (१९-२४)

ततः समागमद्‍वृद्धो माल्यवान् राक्षसो महान् ।
बुद्धिमान् नीतिनिपुणो राज्ञो मातुः प्रियः पिता ॥ २५ ॥
नंतर इकडे रावणाच्या आईचा प्रिय पिता, बुद्धिमान, नीतिनिपुण आणि वृद्ध असा माल्यवान नावाचा राक्षस रावणाजवळ आला. (२५)

प्राह तं राक्षसं वीरं प्रशान्तेनान्तरात्मना ।
शृणु राजन्वचो मेऽद्य श्रुत्वा कुरु यथेप्सितम् ॥ २६ ॥
राक्षस वीर रावणाला तो अतिशय शांत चित्ताने म्हणाला, "हे राजा, तू माझे म्हणणे अतिशय शांत चित्ताने ऐकून घे आणि मग तुझी जशी इच्छा अबोल तसे तू कर. (२६)

यदा प्रविष्टा नगरीं जानकी रामवल्लभा ।
तदादि पुर्यां दृश्यन्ते निमित्तनि दशानन ॥ २७ ॥
घोराणि नाशहेतूनि तानि मे वदतः शृणु ।
खरस्तनितनिर्घोषा मेघा अतिभयङ्‌कराः ॥ २८ ॥
शोणितेनाभिवर्षन्ति लङ्‌कां उष्णेन सर्वदा ।
रुदन्ति देवलिङ्‌गानि स्विद्यन्ति प्रचलन्ति च ॥ २९ ॥
हे रावणा, जेव्हापासून रामांची पत्नी जानकी या नगरीत प्रविष्ट झाली आहे, तेव्हापासून नगरीत जे भयंकर व नाशाचे कारण असणारे शकुन दिसू लागले आहेत, ते मी सांगतो ऐक. अत्यंत भयानक मेघ विजेच्या कडकडाटासह गर्जना करीत आहेत आणि ते सर्वकाळ लंकेवर गरम रक्ताची वृष्टी करीत आहेत. देवतांच्या मूर्ती रडत आहेत. त्या घामेजून जात आहेत आणि आपल्या जागेवरून हलत आहेत. (२७-२९)

कालिका पाण्डुरैर्दन्तैः प्रहसत्यग्रतः स्थिता ।
खरा गोषु प्रजायन्ते मूषका नकुलैः सह ॥ ३० ॥
मार्जारेण तु युद्ध्यन्ति पन्नगा गरुडेन तु ।
करालो विकटो मुण्डः पुरुषः कृष्णपिङ्‌गलः ॥ ३१ ॥
कालो गृहाणि सर्वेषां काले काले त्ववेक्षते ।
एतान्यन्यानि दृश्यन्ते निमित्तान्युद्‌भवन्ति च ॥ ३२ ॥
कालिका देवी ही राक्षसांच्या पुढे उभी राहून आपले पांढरे दात विचकीत भेसूर हसते. गाईच्या पोटी गाढव जन्म घेत आहेत. उंदीर हे मुंगुस व मांजरे यांच्याबरोबर, आणि साप हे गरुडाबरोबर युद्ध करीत आहेत. एक भयानक विक्राळ, मुंडन केलेला, काळसर पिंगट रंगाचा, पुरुषाचा आकार धारण केलेला असा काल पुरुष वेळोवेळी सर्व राक्षसांच्या घरांमध्ये डोकावून पाहात आहे. अशा प्रकारचे तसेच अन्य काही अपशकुन निर्माण होत आहेत आणि ते दिसून येत आहेत. (३०-३२)

अतः कुलस्य रक्षार्थं शान्तिं कुरु दशानन ।
सीतां सत्कृत्य सधनां रमायाशु प्रयच्छः भोः ॥ ३३ ॥
म्हणून हे रावणा, कुळाच्या रक्षणासाठी शांती कर. अरे रावणा, सीतेचा सत्कार करून तिला द्रव्यासह ताबडतोब रामांना परत देऊन टाक. (३३)

रामं नारायणं विद्धि विद्वेषं त्यज राघवे ।
यत्पादपोतमाश्रित्य ज्ञानिनो भवसागरम् ॥ ३४ ॥
तरन्ति भक्तिपूतान्ताः ततो रामो न मानुषः ।
भजस्व भक्तिभावेन रामं सर्वहृदालयम् ॥ ३५ ॥
श्रीराम हे प्रत्यक्ष नारायण आहेत, हे तू जाणून घे. राघवांच्या बाबतीतील तुझा द्वेषभाव सोडून दे. ज्या अर्थी या रघुनाथांच्या चरणरूपी नावेचा आधार घेऊन भक्तीमुळे पवित्र अंतःकरण झालेले ज्ञानीजन भवसागर पार करून जातात, त्या अर्थी ते श्रीराम हे कोणी सामान्य माणूस नाहीत. म्हणून सर्वांच्या हृदयांत वास करणाऱ्या श्रीरामांचे तू भक्तिभावाने भजन कर. (३४-३५)

यद्यपि त्वं दुराचारो भक्त्या पुतो भविष्यसि ।
मद्वाक्यं कुरु राजेन्द्र कुलकौशलहेतवे ॥ ३६ ॥
जरी तू दुराचारी असलास, तरी रामांच्या भक्तीने तू पवित्र होशील. तेव्हा हे राजेंद्रा, आपल्या कुळाचे कुशल व्हावे, या हेतूने तू माझे वचन मान्य कर." (३६)

तत्तु माल्यवतो वाक्यं हितमुक्तं दशाननः ।
न मर्षयति दुष्टात्मा कालस्य वशमागतः ॥ ३७ ॥
तथापि माल्यवानाने सांगितले ते हितकारक बोलणे दशाननाला सहन झाले नाही; कारण तो दुष्ट मनाचा राक्षस काळाच्या अधीन झाला होता. (३७)

मानवं कृपणं रामं एकं शाखामृगाश्रयम् ।
समर्थं मन्यसे केन हीनं पित्रा मुनिप्रियम् ॥ ३८ ॥
(रावण म्हणाला,) "ज्याने वानरांचा आधार घेतला आहे, ज्याला बापाने टाकले आहे, जो मुनिजनांना प्रिय आहे, अशा एकट्या दीन मानव रामाला, हे माल्यवाना, तू कोणत्या कारणाने इतका समर्थ समजत आहेस ? (३८)

रामेण प्रेषितो नूनं भाषसे त्वमनर्गलम् ।
गच्छ वृद्धोऽसि बन्धुस्त्वं सोढं सर्वं त्वयोदितम् ॥ ३९ ॥
मला वाटते, रामाने तुला माझ्याकडे पाठविले आहे, म्हणून तू असे निरर्गल बोलत आहेस. जा, जा, तू वृद्ध आहेस आणि माझा नातेवाईक आहेस. म्हणून तू बोललेले सर्व काही मी सहन केले आहे. (३९)

इतो मत्कर्णपदवीं दहत्येतद्वचस्तव ।
इत्युक्‍त्वा सर्वसचिवैः सहितः प्रस्थितस्तदा ॥ ४० ॥
खरे तर इकडे हे तुझे वचन माझ्या कानांना जाळत आहे." असे बोलून सर्व सचिवांसह रावण तेव्हा तेधून निघून गेला. (४०)

प्रासादग्रे समासीनः पश्यन्वानरसैनिकान् ।
युद्धायायोजयत् सर्व राक्षसान् समुपस्थितान् ॥ ४१ ॥
नंतर आपल्या राजप्रासादाच्या गद्यीवर बसून, वानर सैनिकांना पाहात आपल्याजवळ उपस्थित असणाऱ्या सर्व राक्षसांना त्याने युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा केली. (४१)

रामोऽपि धनुरादाय लक्ष्मणेन समाहृतम् ।
दृष्ट्वा रावणमासीनं कोपेन कलुषीकृतः ॥ ४२ ॥
गच्चीवर बसलेल्या रावणाला पाहून, क्रोधाने क्षुब्ध झालेल्या रामांनीसुद्धा लक्ष्मणाने आणून दिलेले धनुष्य हातात घेतले. (४२)

किरीटिनं समासीनं मंत्रिभिः परिवेष्टितम् ।
शशाङ्‌कार्धनिभेनैव बाणेनैकेन राघवः ॥ ४३ ॥
श्वेतच्छत्रसहस्राणि किरीटदशकं तथा ।
चिच्छेद निमिषार्धेन तदद्‌भुतमिवाभवत् ॥ ४४ ॥
मंत्र्यांनी सर्व बाजूंनी वे ढलेला असा रावण मस्तकावर मुकुट धारण करून बसलेला होता. त्या वेळी अर्ध चंद्राप्रमाणे आकार आणि तेज असणाऱ्या एका बाणाने रामांनी अर्ध्या निमिषात हजारो शुभ्र छत्रे तसेच रावणाचे दहा किरीट तोडून टाकले. ते एखाद्या अद्‌भुत गोष्टीप्रमाणे झाले. (४३-४४)

लज्जितो रावणस्तूर्णं विवेश भवनं स्वकम् ।
आहूय राक्षसान् सर्वान् प्रहस्तप्रमुखान् खलः ॥ ४५ ॥
वानरैः सह युद्धाय नोदयामास सत्वरः ।
ततो भेरीमृदङ्‌गाद्यैः पणवानकगोमुखैः ॥ ४६ ॥
महिषौष्ट्रैः खरैः सिंहैः द्वीपिभिः कृतवाहनाः ।
खड्गशूलधनुःपाश यष्टितोमरशक्तिभिः ॥४७ ॥
लक्षिताः सर्वतो लङ्‌कां प्रतिद्वारमुपाययुः ।
तत्पूर्वमेव रामेण नोदिता वानरर्षभाः ॥ ४८ ॥
तेव्हा लज्जित झालेला रावण चट्दिशी उठून स्वतःच्या महालात निघून गेला. त्यानंतर प्रहस्तादी सर्व राक्षसांना बोलावून, त्यांना त्या दुष्टाने वानरांबरोबर सत्वर युद्ध सुरू करण्याची आज्ञा केली. तेव्हा भेरी, मृदुंग, पणव, आनक, गोमुख इत्यादी वाद्यांच्या गजरात, रेडे, उंट, गाढवे, सिंह, वाघ, हत्ती इत्यादी वाहनांवर आरूढ होऊन, खड्‌ग, शूल, धनुष्य, पाश, सोटे, तोमर आणि शक्ती अशी आयुधे घेऊन, ते सर्व राक्षस सर्व बाजूंनी लंकेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ गेले. तत्पूर्वीच श्रीरामांनी वानरश्रेष्ठांना युद्धाला निघण्याची आज्ञा दिली होती. (४५-४८)

उद्यम गिरिशृङ्‌गाणि शिखराणि महान्ति च ।
तरूंश्च उत्पाट्य विविधान् युद्धाय हरियूथपाः ॥ ४९ ॥
प्रेक्षमाणा रावणस्य तान्यनीकानि भागशः ।
राघवप्रियमाकार्थं लङ्‌कामारुरुहुस्तदा ॥ ५० ॥
त्यानुसार पर्वतांचे शिखरे, मोठमोठे शिलाखंड, आणि नाना प्रकारचे वृक्ष उपटून घेऊन, ते वानर सेनापती युद्धासाठी निघाले होते. रावणाच्या अनेक तुकड्या तुकड्यांनी येणाऱ्या सैन्याला पाहून, रामांचे प्रिय कार्य करण्याच्या इच्छेने त्या वानरांनी लंकेवर चाल केली. (४९-५०)

ते द्रुमैः पर्वताग्रैश्च मुष्टिभिश्च प्लवङ्‌गमाः ।
ततः सहस्रयूथाश्च कोटियूथाश्च यूथपाः ॥ ५१ ॥
कोटिशतयुताश्चान्ये रुरुधुर्नगरं भृशम् ।
आप्लवन्तः प्लवन्तश्च गर्जन्तश्च प्लवङ्‌गमाः ॥ ५२ ॥
काही वानरांनी हातात वृक्ष आणि पर्वत शिखरे घेतली होती. तर काहींनी मुठी वळवून ठेवल्या होत्या. त्यातील काही वानर हे हजार वानरांचा समूह, काही कोटी समूह, काही शतकोटी वानरांचा समूह यांचे सेनापती होते. वर-खाली उड्या मारीत व गर्जना करीत त्या वानरांनी सर्व लंका नगरीला संपूर्ण वेढा घातला. (५१-५२)

रामो जयत्यतिबलो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवो राघवेणानुपालितः ॥ ५३ ॥
इत्येवं घोषयन्तश्च समं युयुधिरेऽरिभिः ।
हनूमान् अं‌गदश्चैव कुमुदो नील एव च ॥ ५४ ॥
नलश्च शरभश्चैव मैन्दो द्विविद एव च ।
जाम्बवान् दधिवक्‍त्रश्च केसरी तार एव च ॥ ५५ ॥
अन्ये च बलिनः सर्वे यूथपाश्च प्लवङ्‌गमाः ।
द्वाराण्युत्प्लुत्य लङ्‌कायाः सर्वतो रुरुधुर्भृशम् ।
तदा वृक्षैर्महाकायाः पर्वताग्रैश्च वानराः ॥ ५६ ॥
निजघ्नुस्तानि रक्षांसि नखैर्दन्तैश्च वेगिताः ।
राक्षसाश्च तदा भीमा द्वारेभ्यः सर्वतो रुषा ॥ ५७ ॥
निर्गत्य भिन्दिपालैश्च खड्गैः शूलैः परश्वधैः ।
निजघ्नुर्वानरानीकं महाकाया महाबलाः ॥ ५८ ॥
राक्षसांश्च तथा जघ्नुः वानरा जितकाशिनः ।
तदा बभूव समरो मांसशोणितकर्दमः ॥ ५९ ॥
रक्षसां वानराणां च सम्बभूवाद्‌भुतोपमः ।
ते हयैश्च गजैश्चैव रथैः काञ्चनसन्निभैः ॥ ६० ॥
रक्षो व्याघ्रा युयुधिरे नादयन्तो दिशो दश ।
राक्षसाश्च कपीन्द्राश्च परस्परजयैषिणः ॥ ६१ ॥
'अतिशय बलवान अशा रामांचा विजय असो; महाबलवान लक्ष्मणाचा विजय असो; आणि राघवाने रक्षिलेल्या सुग्रीवाचा विजय असो', अशा घोषणा करीत ते वानर शत्रूबरोबर लढू लागले. हनुमान, अंगद, कुमुद, नील, नल, शरभ, मैंद, द्विविद, जांबवान, दधिमुख, केसरी, तार तसेच अन्य सर्व बलवान वानर आणि सेनापती यांनी लंकेच्या सर्व द्वारांवर उड्या मारल्या. त्यांनी सर्व बाजूंनी लंकेला वेढून टाकले. त्या वेळी प्रचंड देहाच्या वानरांनी वृक्ष, पर्वतांची शिखरे, नखे आणि दांत यांच्याद्वारा राक्षसांवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. तेव्हां लंकेच्या सर्व द्वारांतून वेगाने बाहेर पडून भयंकर राक्षसांनी रागारागानें गोफणी, खड्ग, शूल, परशू यांचेद्वारा वानर सैन्यावर प्रहार केले. उलट प्रचंड शरीर असणार्‍या, महाबलवान आणि जयशील वानरांनी राक्षसांवर हल्ला केला. अशा प्रकारे तेव्हां राक्षस आणि वानर यांच्यामध्ये ज्याला अद्‌भुत म्हणता येईल युद्ध झाले आणि त्यांत मांस आणि रक्त यांचा चिखल झाला. गर्जनांनी दाही दिशा निनादून टाकीत, ते राक्षस श्रेष्ठ घोडे, हत्ती यांवर बसून आणि सोन्यासारख्या तेजस्वी रथांत बसून युद्ध करीत होते. त्यावेळी राक्षस तसेच वानरश्रेष्ठ हे परस्परांवर विजय मिळवू इच्छित होते. (५३-६१)

राक्षसान् वानरा जघ्नुः वानरांश्चैव राक्षसां ।
रामेण विष्णुना दृष्टा हरयो दिविजांशजाः ॥ ६२ ॥
बभूवुर्बलिनो हृष्टाः तदा पीतामृता इव ।
सीताभिमर्शपापेन रावणेनाभिपालितान् ॥ ६३ ॥
हतश्रीकान् हतबलान् राक्षसान् जघ्नुरोजसा ।
चतुर्थांशावशेषेण निहतं राक्षसं बलम् ॥ ६४ ॥
वानर राक्षसांना मारीत होते, तर राक्षस वानरांना मारीत होते. देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेले ते वानर विष्णूरूपी रामांची दृष्टी पडल्याने अतिशय बलवान झाले होते आणि जणू अमृताचे पान केल्याप्रमाणे ते आनंदित झाले होते. सीतेचे हरण करताना तिला स्पर्श केल्यामुळे ज्याला पाप लागले होते, अशा रावणाकडून पालन केल्या गेलेल्या, निस्तेज आणि बलहीन झालेल्या राक्षसांना ते वानर आपल्या पराक्रमाने ठार करत होते. हळू हळू राक्षसांचे बहुतेक सैन्य नष्ट झाले; फक्त त्या सैन्याचा चौथा भाग शिलक राहिला. (६२-६४)

स्वसैन्य निहतं दृष्ट्वा मेघनादोऽथ दुष्टधीः ।
ब्रह्मदत्तवरः श्रीमान् अन्तर्धानं गतोऽसुरः ॥ ६५ ॥
आपले सैन्य ठार केले जात आहे, हे पाहिल्यानंतर, ब्रह्मदेवांनी ज्याला वर दिला होता, जो वीरश्रीने संपन्न होता, असा मेघनाद नावाचा दुष्टबुद्धी राक्षस युद्धभूमीवरून अंतर्धान पावला. (६५)

सर्वास्त्रकुशलो व्योम्नि ब्रह्मास्त्रेण समन्ततः ।
नानाविधानि शस्त्राणि वानरानीकमर्दयन् ॥ ६६ ॥
ववर्ष शरजालानि तदद्‌भुतमिवाभवत् ।
रामोऽपि मानयन्ब्राह्मं अस्त्रं अस्त्रविदां वरः ॥ ६७ ॥
क्षणं तूष्णीमुवासाथ ददर्श पतितं बलम् ।
वानराणां रघुश्रेष्ठश्चुकोपानलसन्निभः ॥ ६८ ॥
तो सर्व प्रकारची अस्त्रे चालविण्यात कुशल होता. आकाशात जाऊन ब्रह्मास्त्राच्या द्वारा वानर सैन्याला पीडा देत, तो सर्व बाजूंनी नाना प्रकारची शस्त्रे आणि बाणांची जाळी यांचा वर्षाव करू लागला. ते एखाद्या अद्‌भुत गोष्टीप्रमाणे झाले. त्या वेळी अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असे श्रीरामसुद्धा ब्रह्मास्त्राला मान देण्यासाठी क्षणभर स्वस्थ राहिले. जेव्हा ब्रह्मास्त्रामुळे वानरांचे सैन्य मरत आहे हे रघुश्रेष्ठांनी पाहिले तेव्हा ते रागाने अग्रीप्रमाणे लाल झाले. (६६-६८)

चापमानय सौमित्रे ब्रह्मास्त्रेणासुरं क्षणात् ।
भस्मीकरोमि मे पश्य बलमद्य रघूत्तम ॥ ६९ ॥
ते म्हणाले, "हे लक्ष्मणा, माझे धनुष्य आण. माझ्या ब्रह्मास्त्राने मी या राक्षसाला क्षणात भस्मसात करून टाकतो. हे रघूत्तम लक्ष्मणा, तू आज माझे सामर्थ्य पाहा." (६९)

मेघनादोऽपि तच्छ्रुत्वा रामवाक्यमतन्द्रितः ।
तूर्णं जगाम नगरं मायया मायिकोऽसुरः ॥ ७० ॥
ते रामांचे वचन ऐकल्यावर, मेघनादसुद्धा सावध झाला आणि तो कपटी असुर मायेने चटदिशी लंका नगरीत निघून गेला. (७०)

पतितं वानरानीकं दृष्ट्वा रामोऽतिदुःखितः ।
उवाच मारुतिं शीघ्रं गत्वा क्षीरमहोदधिम् ॥ ७१ ॥
तत्र द्रोणगिरिर्नाम दिव्यौषधिसमुद्‌भवः ।
तमानय द्रुतं गत्वा सञ्जीवय महामते ॥ ७२ ॥
वानरौघान् महासत्त्वान् कीर्तिस्ते सुस्थिरा भवेत् ।
आज्ञा प्रमाणमित्युक्‍त्वा जगामानिलनन्दनः ॥ ७३ ॥
वानरांचे सैन्य मरून पडलेले पाहून, अतिशय दुःखी होऊन, श्रीराम मारुतीला म्हणाले, " तू त्वरित क्षीरसागराकडे जा. तेथे अनेक दिव्य औषधी ज्याच्यावर उत्पन्न झाल्या आहेत असा द्रोणगिरी नावाचा पर्वत आहे. पटकन जाऊन तो पर्वत घेऊन ये आणि हे महाबुद्धिमंता, या महासामर्थ्यसंपन्न वानरसमूहांना तू जिवंत कर. असे केल्याने तुझी कीर्ती कायमची राहील." "तुमची आज्ञा प्रमाण." असे बोलून वायुपुत्र मारुती तेधून निघून गेला. (७१-७३)

आनीय च गिरिं सर्वान् वानरान्वानरर्षभः ।
जीवयित्वा पुनस्तत्र स्थापयित्वाययौ द्रुतम् ॥ ७४ ॥
द्रोणगिरी पर्वत आणून, सर्व वानरांना जिवंत करून, पुनः पूर्ववत तो पर्वत जागच्या जागी ठेवून, वानरश्रेष्ठ मारुती त्वरेने परत आला. (७४)

पूर्ववद्‌भैरवं नादं वानराणां बलौघतः ।
श्रुत्वा विस्मयमापन्नो रावणो वाक्यमब्रवीत् ॥ ७५ ॥
पुनः पूर्वीप्रमाणेच वानरांच्या सैन्यसमूहातून येऊ लागलेला भयानक नाद ऐकून, विस्मयचकित झालेला रावण म्हणाला, (७५)

राघवो मे महान् शत्रुः प्राप्तो देवविनिर्मितः ।
हन्तुं तं समरे शीघ्रं गच्छन्तु मम यूथपाः ॥ ७६ ॥
"देवांनी निर्माण केलेला माझा मोठा शत्रू राघव येथे आला आहे. त्याला युद्धात ठार करण्यास माझ्या सेनापतींनी शीघ कूच करावे. (७६)

मंत्रिणो बान्धवाः शूरा ये च मत्‌प्रियकाङ्‍क्षिणः ।
सर्वे गच्छन्तु युद्धाय त्वरितं मम शासनात् ॥ ७७ ॥
तसेच जे कोणी माझे मंत्री, बांधव असतील, आणि जे कोणी माझे प्रिय करू इच्छिणारे शूरवीर असतील, त्या सर्वांनी माझी आज्ञा मान्य करून युद्ध करण्यास त्वरित जावे. (७७)

ये न गच्छन्ति युद्धाय भीरवः प्राणविप्लवात् ।
तान् हनिष्याम्यहं सर्वान् मच्छासनपराङ्‌मुखान् ॥ ७८ ॥
जे कोणी भित्रे राक्षस भीतीने युद्ध करण्यास जाणार नाहीत, त्या माझी आज्ञा मोडणाऱ्या सर्वांना मी ठार करीन." (७८)

तच्छ्रुत्वा भयसन्त्रस्ता निर्जग्मू रणकोविदाः ।
अतिकायः प्रहस्तश्च महानादमहोदरौ ॥ ७९ ॥
देवशत्रुर्निकुम्भश्च देवान्तक नरान्तकौ ।
अपरे बलिनः सर्वे ययुः युद्धाय वानरैः ॥ ८० ॥
ते रावणाचे वचन ऐकल्यावर, भीतीने त्रस्त झालेले, युद्धनिपुण राक्षस युद्ध करण्यास बाहेर पडले. अतिकाय, प्रहस्त, महानाद, महोदर, देवशत्रू निकुंभ, देवांतक व नरांतक तसेच अन्य सर्व बलवान राक्षस वानरांबरोबर युद्ध करण्यास निघाले. (७९-८०)

एते चान्ये च बहवः शूराः शतसहस्रशः ।
प्रविश्य वानरं सैन्य ममन्थुर्बलदर्पिताः ॥ ८१ ॥
हे राक्षस तसेच इतर पुष्कळ शूर आणि बलाने उन्मत्त झालेले शेकडो-हजारो राक्षस वानर-सैन्यात घुसून वानरांचा नाश करू लागले. (८१)

भुशुण्डिभिन्दिपालैश्च बाणैः खड्गैः परश्वधैः ।
अन्यैश्च विविधैः अस्त्रैः निजघ्नुर्हरियूथपान् ॥ ८२ ॥
भुशुंडी, गोफणी, बाण, खड्गे, परशू, तसेच अन्य विविध अस्त्रे यांच्या द्वारा वानर-सेनापतींना ते मारू लागले. (८२)

ते पादपैः पर्वताग्रैः नखदंष्ट्रैश्च मुष्टिभिः ।
प्राणैर्विमोचयामासुः सर्वराक्षसयूथपान् ॥ ८३ ॥
तर वृक्ष, पर्वत शिखरे, नखे, दात, बुक्या यांच्या द्वारा ते वानर सर्व राक्षस नायकांना ठार करू लागले. (८३)

रामेण निहताः केचित् सुग्रीवेण तथापरे ।
हनूमता चाङ्‌गदेन लक्ष्मणेन महात्मना ।
यूथपैर्वानराणां ते निहताः सर्वराक्षसाः ॥ ८४ ॥
काही राक्षसांना रामांनी ठार केले. काहींना सुग्रीवाने मारून टाकले, तर इतर राक्षसांना हनुमान, अंगद आणि महात्मा लक्ष्मण यांनी ठार केले. इतर काही राक्षसांना वानरसेनापतींनी ठार केले. अशा प्रकारे ते सर्व राक्षस मारले गेले. (८४)

रामतेजः समाविश्य वानरा बलिनोऽभवन् ।
रामशक्तिविहीनानां एवं शक्तिः कुतो भवेत् ॥ ८५ ॥
रामांचे तेज अंगात भरल्याने ते वानर अतिशय बलिष्ठ झाले होते. रामाच्या शक्तीने रहित असणाऱ्या प्राण्याच्या ठिकाणी असली शक्ती कोठून बरे असणार ? (८५)

सर्वेश्वरः सर्वमयो विधाता
    मायामनुष्यत्वविडम्बनेन ।
सदा चिदानन्दमयोऽपि रामो
    युद्धादिलीलां वितनोति मायाम् ॥ ८६ ॥
जरी राम हे सदा सर्वांचा ईश्वर, सर्वमय, सर्वांचे विधाते आणि नेहमी चिदानंदमय आहेत, तरीसुद्धा मायेमुळे मनुष्याप्रमाणे आचरण करीत, आपली युद्ध इत्यादी लीला करीत ते आपल्या मायेचा विस्तार करीत असतात. (८६)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे पंचमः सर्गः ॥ ५ ॥


GO TOP