श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षोडश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणेन विभीषणस्य तिरस्करणं; विभीषणेनापि रावणं निर्भ्र्त्स्य तत्स्थानान् निर्गमनम् - रावणद्वारा विभीषणाचा तिरस्कार आणि विभीषणांनीही त्यास खडसावून निघून जाणे -
सुनिविष्टं हितं वाक्यं उक्तवन्तं विभीषणम् ।
अब्रवीत् परुषं वाक्यं रावणः कालचोदितः ॥ १ ॥
रावणाच्या मस्तकावर काळ घिरट्‍या घालत होता म्हणून त्याने सुंदर अर्थाने युक्त आणि हितकारक गोष्ट सांगितली असून विभीषणाला कठोर वाणीने म्हटले- ॥१॥
वसेत् सह सपत्‍ने्न क्रुद्धेनाशीविषेण वा ।
न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ॥ २ ॥
बंधो ! शत्रु आणि रागावलेला विषधर सर्प यांच्या बरोबर राहण्याचा प्रसंग आला तर राहावे, परंतु जो मित्र म्हणवून घेऊन शत्रुची सेवा करत आहे त्याच्या बरोबर कदापि राहू नये. ॥२॥
जानामि शीलं ज्ञातीनां सर्वलोकेषु राक्षस ।
हृष्यन्ति व्यसनेष्वेते ज्ञातीनां ज्ञातयः सदा ॥ ३ ॥
राक्षसा ! संपूर्ण लोकात सजातीय बंधुंचा जो स्वभाव असतो तो मी उत्तम प्रकारे जाणतो. जातवाले सर्वदा आपल्या अन्य सजातीयाच्या आपत्तीतच हर्ष मानतात. ॥३॥
प्रधानं साधनं वैद्यं धर्मशीलं च राक्षस ।
ज्ञातयोऽप्यवमन्यन्ते शूरं परिभवन्ति च ॥ ४ ॥
निशाचरा ! जो श्रेष्ठ असल्या कारणाने राज्य प्राप्त करून सर्वांमध्ये प्रधान झालेला असतो, राज्यकार्यही उत्तम प्रकारे चालवीत असतो आणि विद्वान्‌, धर्मशील तसेच शूरवीर असतो त्याला ही कुटुंबीजन अपमानित करतात आणि अवसर मिळताच त्याला तुच्छ लेखण्याचा (त्याचा कमीपणा दाखविण्याचा) प्रयत्‍न करतात. ॥४॥
नित्यमन्योन्यसंहृष्टा व्यसनेष्वाततायिनः ।
प्रच्छन्नहृदया घोरा ज्ञातयस्तु भयावहाः ॥ ५ ॥
जातवाले सदा एक दुसर्‍यावर संकट आले असता हर्षाचा अनिभव करतात. ते फार आततायी असतात- संधि मिळताच आग लावणे, विष देणे, शस्त्र चालविणे, धन हडपणे आणि क्षेत्र तसेच स्त्रीचे अपहरण करण्यास मागे पुढे पहात नाहीत. आपला मनोभाव लपवून ठेवतात, थोडक्यात क्रूर आणि भयंकर असतात. ॥५॥
श्रूयन्ते हस्तिभिर्गीताः श्लोकाः पद्मवने पुरा ।
पाशहस्तान् नरान् दृष्ट्‍वा शृणुष्व गदतो मम ॥ ६ ॥
पूर्वकाळातील गोष्ट आहे. पद्मवनात हत्तींनी आपल्या हृदयांतील उदार हृदगद प्रकट केले होते, जे आज ही श्लोकांच्या रूपात गायले आणि ऐकले जातात. एकदा काही लोकांना हातात पाश घेऊन येतांना पाहून हत्तीनीं जी गोष्ट सांगितली होती तीच मी सांगतो आहे, तू माझ्या कडून ऐक. ॥६॥
नाग्निर्नान्यानि शस्त्राणि न नः पाशा भयावहाः ।
घोराः स्वार्थप्रयुक्तास्तु ज्ञातयो नो भयावहाः ॥ ७ ॥
आम्हांला अग्नि, इतर दुसरी शस्त्रे तसेच पाश भय उत्पन्न करू शकत नाहीत. आमच्यासाठी तर आपले स्वार्थी जातीय बंधुच भयानक आणि धोक्याची वस्तु आहेत. ॥७॥
उपायमेते वक्ष्यन्ति ग्रहणे नात्र संशयः ।
कृत्स्नाद् भयात् ज्ञातिभयं कुकष्टं विहितं च नः ॥ ८ ॥
हेच आम्ही पकडले जाण्याचा उपाय सांगतील यात संशय नाही. म्हणून संपूर्ण भयांपेक्षा आम्हांला आपल्या जातिबांधवांकडून प्राप्त होणारे भयच अधिक कष्ट्दायक वाटते. ॥८॥
विद्यते गोषु संपन्नं विद्यते ज्ञातितो भयम् ।
विद्यते स्त्रीषु चापल्यं विद्यते ब्राह्मणे तपः ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे गायींच्या मध्ये हव्यकव्याची समाप्ति दूध असते, स्त्रियांमध्ये चपळता असते आणि ब्राह्मणांमध्ये तपस्या राहात असते त्याप्रमाणेच जाति बांधवांपासून भय अवश्य प्राप्त होत असते. ॥९॥
ततो नेष्टमिदं सौम्य यदहं लोकसत्कृतः ।
ऐश्वर्यं अभिजातश्च रिपूणां मूर्ध्नि च स्थितः ॥ १० ॥
म्हणून सौम्य ! आज सारे जग माझा जो सन्मान करत आहे आणि मी जो ऐश्वर्यवान, कुलीन आणि शत्रुंच्या शिरांवर स्थित आहे, हे सर्व तुम्हांला अभीष्ट नाही. ॥१०॥
यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः ।
न श्लेषमभिगच्छन्ति तथानार्येषु सौहृदम् ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर पडलेले पाण्याचे थेंब त्यावर टिकून राहात नाहीत, त्याप्रकारे अनार्यांच्या हृदयात सौहार्द टिकत नाही. ॥११॥
यथा शरदि मेघानां सिञ्चतामपि गर्जताम् ।
न भवत्यम्बुसंक्लेदः तथानार्येषु सौहृदम् ॥ १२ ॥
जसे शरद- ऋतुमध्ये गर्जणार्‍या आणि पाऊस पाडणार्‍या मेघांच्या जलाने धरती ओली होत नाही त्याप्रकारे अनार्यांच्या हृदयात स्नेहजनित आर्द्रता असत नाही. ॥१२॥
यथा मधुकरस्तर्षाद् रसं विंदन्न तिष्ठति ।
तथा त्वमपि तत्रैव तथानार्येषु सौहृदम् ॥ १३ ॥
ज्याप्रमाणे भ्रमर अत्यंत आवडीने फुलांचा रस पिऊनही तेथे टिकून राहात नाही त्याप्रकारे अनार्यांत सुहृदजनोचित स्नेह टिकून रहात नाही. तुम्ही ही असेच अनार्य आहात. ॥१३॥
यथा मधुकरस्तर्षात् काशपुष्पं पिबन्नपि ।
रसमत्र न विंदेत तथानार्येषु सौहृदम् ॥ १४ ॥
ज्याप्रमाणे भ्रमर रसाच्या इच्छेने काशाचा फुलाचे पान करील तर त्यात त्याला रस मिळू शकत नाही, त्याप्रकारे अनार्यांमध्ये जो स्नेह असतो, तो कुणालाही लाभदायक होत नाही. ॥१४॥
यथा पूर्वं गजः स्नात्वा गृह्य हस्तेन वै रजः ।
दूषयत्यात्मनो देहं तथाऽनार्येषु सौहृदम् ॥ १५ ॥
जसा हत्ती प्रथम स्नान करून नंतर सोंडेने धूळ उडवून आपल्या शरीरास मलीन करून घेतो, त्याप्रकारे दुर्जनांची मैत्री दूषित असते. ॥१५॥
योऽन्यस्त्वेवंविधं ब्रूयाद् वाक्यमेतन्निशाचर ।
अस्मिन् मुहूर्ते न भवेत् त्वां तु धिक् कुलपांसन ॥ १६ ॥
कुळकलंक निशाचरा ! तुझा धिक्कार आहे. जर तुझ्या खेरिज दुसरा कोणी अशा गोष्टी बोलला असता तर त्याला याच मुहूर्ताला आपले प्राण गमवावे लागले असते. ॥१६॥
इत्युक्तः परुषं वाक्यं न्यायवादी विभीषणः ।
उत्पपात गदापाणिः चतुर्भिः सह राक्षसैः ॥ १७ ॥
विभीषण न्यायानुकूल गोष्टी सांगत होते तरीही रावण जेव्हा त्यांना अशी कठोर वचने बोलला, तेव्हा ते हातात गदा घेऊन अन्य चार राक्षसांसह त्याच समयी उडी मारून आकाशात निघून गेले. ॥१७॥
अब्रवीच्च तदा वाक्यं जातक्रोधो विभीषणः ।
अन्तरिक्षगतः श्रीमान् भ्राता वै राक्षसाधिपम् ॥ १८ ॥
त्या समयी अंतरिक्षात उभे राहिलेल्या तेजस्वी भ्राता विभीषणाने कुपित होऊन राक्षसराज रावणास म्हटले- ॥१८॥
स त्वं भ्रांतोऽसि मे राजन् ब्रूहि मां यद् यदिच्छसि ।
ज्येष्ठो मान्यः पितृसमो न च धर्मपथे स्थितः ।
इदं हि परुषं वाक्यं न क्षमाम्यग्रजस्य ते ॥ १९ ॥
राजन्‌ ! तुमची बुद्धि भ्रमात पडली आहे. तुम्ही धर्माच्या मार्गावर नाही आहात. तसे तर माझे मोठे बंधु असल्या कारणाने तुम्ही पित्यासमान आदरणीय आहात. म्हणून मला जे हवे असेल तसे बोला, परंतु अग्रज असून ही तुमच्या या कठोर वचनांना मी कदापि सहन करू शकत नाही. ॥१९॥
सुनीतं हितकामेन वाक्यमुक्तं दशानन ।
न गृह्णन्त्यकृतात्मानः कालस्य वशमागताः ॥ २० ॥
दशानन ! जो अजितेन्द्रिय पुरूष काळाच्या वशीभूत होऊन जातो तो हिताच्या कामनेने सांगितलेली सुंदर नीतियुक्त वचनेही ग्रहण करत नाही. ॥२०॥
सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः ॥ २१ ॥
राजन्‌ ! सदा प्रिय वाटणारी गोड गोड वचने बोलणारे लोक तर सुगमतेने मिळतात; परंतु ऐकण्यात अप्रिय परंतु परिणामी हितकर असतील अशी वचने सांगणारे आणि ऐकणारे दुर्लभ असतात. ॥२१॥
बद्धं कालस्य पाशेन सर्वभूतापहारिणः ।
न नश्यन्तमुपेक्षे त्वां प्रदीप्तं शरणं यथा ॥ २२ ॥
तुम्ही समस्त प्राण्यांचा संहार करणार्‍या काळाच्या पाशात बांधले गेलेले आहात. ज्यास आग लागलेली आहे अशा घराप्रमाणे नष्ट होत आहात. अशा दशेत मी तुमची उपेक्षा करू शकत नव्हतो, म्हणून मी तुमच्या हिताची गोष्ट सुचविलेली होती. ॥२२॥
दीप्तपावकसंकाशैः शितैः काञ्चनभूषणैः ।
न त्वामिच्छाम्यहं द्रष्टुं रामेण निहतं शरैः ॥ २३ ॥
श्रीरामांचे सुवर्णभूषित बाण प्रज्वलित अग्निच्या प्रमाणे तेजस्वी आणि तीक्ष्ण आहेत. मी श्रीरामांच्या द्वारा त्या बाणांनी तुमचा मृत्यु पाहू इच्छित नव्हतो, म्हणून तुम्हांला समजाविण्याचा प्रयत्‍न केला होता. ॥२३॥
शूराश्च बलवन्तश्च कृतास्त्राश्च नरा रणे ।
कालाभिपन्नाः सीदन्ति यथा वालुकसेतवः ॥ २४ ॥
काळाच्या वशीभूत झाल्यावर मोठ मोठे शूर-वीर, बलवान्‌ आणि अस्त्रवेत्तेही वाळू प्रमाणे अथवा बांधा प्रमाणे नष्ट होऊन जातात. ॥२४॥
तन्मर्षयतु यच्चोक्तं गुरुत्वाद्धितमिच्छता ।
आत्मानं सर्वथा रक्ष पुरीं चेमां सराक्षसाम् ।
स्वस्ति तेऽस्तु गमिष्यामि सुखी भव मया विना ॥ २५ ॥
राक्षसराज ! मी तुमच्या हिताची इच्छा करतो, म्हणून जे काही सांगितले आहे, ते जरी तुम्हांला चांगले वाटत नसेल तरी त्यासाठी आपण मला क्षमा करावी, कारण तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. आता तुम्ही आपले तसेच राक्षसांसहित या समस्त लंकापुरीचे सर्व प्रकारे रक्षण करा. तुमचे कल्याण होवो. आता मी येथून निघून जाईन. माझ्या शिवाय तुम्ही सूखी होऊन जा. ॥२५॥
निवार्यमाणस्य मया हितैषिणा
न रोचते ते वचनं निशाचर ।
परीतकाला हि गतायुषो नरा
हितं न गृह्णन्ति सुहृद्‌भिरीरितम् ॥ २६ ॥
निशाचरराज ! मी तुमचा हितैषी आहे, म्हणून मी तुम्हांला वारंवार अनुचित मार्गावर जाण्यापासून रोखले आहे, परंतु तुम्हांला माझे म्हणणे चांगले वाटत नाही. वास्तविक ज्या लोकांचे आयुष्य समाप्त होऊ लागते ते जीवनाच्या अंत:काळी आपल्या सुहृदांनी सांगितलेली हितकर गोष्टही मानत नाहीत. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सोळावा सर्ग पूर्ण झाला. ॥१६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP