श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुर्थः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामप्रभृतिभिः सह वानरसैन्यस्य प्रस्थानं; सागरतटे निवेशश्च -
श्रीराम आदिंच्यासह वानरसेनेचे प्रस्थान आणि समुद्राच्या तटावर तिचे तळ ठोकणे -
श्रुत्वा हनुमतो वाक्यं यथावदनुपूर्वशः ।
ततोऽब्रवीन्महातेजा रामः सत्यपराक्रमः ॥ १ ॥
हनुमानांची वचने क्रमश: यथावत्‌ रूपात ऐकून सत्यपराक्रमी महातेजस्वी भगवान्‌ श्रीरामांनी म्हटले- ॥१॥
यन्निवेदयसे लङ्‌कां पुरीं भीमस्य रक्षसः ।
क्षिप्रमेनां वधिष्यामि सत्यमेतद् ब्रवीमि ते ॥ २ ॥
हनुमान ! मी खरेच सांगतो की तुम्ही त्या भयानक राक्षसाच्या ज्या लंकापुरीचे वर्णन केले आहे तिला मी लवकरच नष्ट करून टाकीन. ॥२॥
अस्मिन् मुहूर्ते सुग्रीव प्रयाणमभिरोचय ।
युक्तो मुहूर्ते विजये प्राप्तो मध्यं दिवाकरः ॥ ३ ॥
सुग्रीवा ! तू याच मुहूर्तावर प्रस्थानाची तयारी कर. सूर्यदेव दिवसाच्या मध्यभागी जाऊन पोहोचले आहेत, म्हणून या विजया(*) नामक मुहुर्तावरच आपली यात्रा उपयुक्त ठरेल. ॥३॥
(*- दिवसा दुपारच्या वेळी अभिजित्‌ मुहूर्त असतो, यालाच विजय मुहूर्तही म्हणतात. हा यात्रेसाठी (प्रवासासाठी) फार उत्तम मानला गेला आहे. "यद्यपि भुक्तौ दक्षिणयात्रायां स्थान्‌ सदाभिजित्‌ ।" या ज्योतिष रत्‍नाकरांतील वचनानुसार उक्त मुहूर्तावर दक्षिणयात्रा निषिद्ध आहे, तथापि किष्किंधेपासून लंका दक्षिणपूर्वेच्या कोनात असल्याने हा दोष येथे प्राप्त होत नाही. )
सीतां हृत्वा तु तद् यातु क्वासौ यास्यति जीवितः ।
सीता श्रुत्वाभियानं मे आशामेष्यति जीविते ।
जीवितान्तेऽमृतं स्पृष्ट्‍वा पीत्वामृतमिवातुरः ॥ ४ ॥
रावण सीतेचे हरण करून घेऊन गेला असेल परंतु ती जिवंत वाचून कोठे जाईल ? सिद्ध आदिंच्या मुखाने लंकेवर माझ्या चढाईचा समाचार ऐकून सीतेला आपल्या जीवनाची आशा वाटू लागेल. ज्याप्रमाणे जीवनाचा अंत उपस्थित झाला असता जर रोगी अमृतास स्पर्श करेल (अथवा अमृततुल्य साधनभूत दिव्य औषधीस स्पर्श करील) अथवा अमृतोपम द्रवभूत औषधीला पिऊन टाकील तर त्याच्या जिवंत राहण्याची आशा निर्माण होते, त्याप्रमाणे तिची स्थिती होईल. ॥४॥
उत्तराफल्गुनी ह्यद्य श्वस्तु हस्तेन योक्ष्यते ।
अभिप्रयाम सुग्रीव सर्वानीकसमावृताः ॥ ५ ॥
आज उत्तरा फाल्गुनी नामक नक्षत्र आहे. उद्या चंद्राचा हस्त नक्षत्रासी योग होईल, म्हणून सुग्रीवा ! आपण आजच सर्व सेनेसह यात्रा करू या. ॥५॥
निमित्तानि च पश्यामि यानि प्रादुर्भवन्ति च ।
निहत्य रावणं सीतां आनयिष्यामि जानकीम् ॥ ६ ॥
या समयी जे शकुन प्रकट होत आहेत आणि जे मी पहात आहे, त्यांवरून असा विश्वास वाटत आहे की मी अवश्यच रावणाचा वध करून जानकी सीतेला घेऊन येईन. ॥६॥
उपरिष्टाद्धि नयनं स्फुरमाणमिदं मम ।
विजयं समनुप्राप्तं शंसतीव मनोरथम् ॥ ७ ॥
याशिवाय माझ्या उजव्या डोळ्याचा वरचा भाग लवत आहे. हाही जणु माझी विजय प्राप्ति आणि मनोरथ-सिद्धिच सूचित करीत आहे. ॥७॥
ततो वानरराजेन लक्ष्मणेन च पूजितः ।
उवाच रामो धर्मात्मा पुनरप्यर्थकोविदः ॥ ८ ॥
हे ऐकून वानरराज सुग्रीव तसेच लक्ष्मणांनी त्यांचा फार आदर केला. तत्पश्चात्‌ अर्थवेत्ता (नीतिनिपुण) धर्मात्मा श्रीरामांनी पुन्हा म्हटले- ॥८॥
अग्रे यातु बलस्यास्य नीलो मार्गमवेक्षितुम् ।
वृतः शतसहस्रेण वानराणां तरस्विनाम् ॥ ९ ॥
या सेनेच्या पुढे एक लाख वेगवान्‌ वानरांनी घेरलेले सेनापति नील मार्ग पहाण्यासाठी जातील. ॥९॥
फलमूलवता नील शीतकाननवारिणा ।
पथा मधुमता चाशु सेनां सेनापते नय ॥ १० ॥
सेनापति नील ! तुम्ही सर्व सेनेला अशा मार्गाने शीघ्रतापूर्वक घेऊन चला, ज्यामध्ये फळ-मूळाची विपुलता असेल, शीतल छायेने युक्त सघन वन असेल, थंड पाणी मिळू शकेल आणि मधु देखील उपलब्ध होऊ शकेल. ॥१०॥
दूषयेयुर्दुरात्मनः पथि मूलफलोदकम् ।
राक्षसाः परिरक्षेथाः तेभ्यस्त्वं नित्यमुद्यतः ॥ ११ ॥
संभव आहे की दुरात्मा राक्षस रस्त्यातील फळे-मुळे आणि जलास विष आदिने दूषित करेल, म्हणून तू मार्गात सतत सावधान राहून त्यांच्यापासून या वस्तूंचे रक्षण करावे. ॥११॥
निम्नेषु वनदुर्गेषु वनेषु च वनौकसः ।
अभिप्लुत्याभिपश्येयुः परेषां निहितं बलम् ॥ १२ ॥
वानरांनी जेथे खड्डे, दुर्गम वने आणि साधारण जंगल असेल, तेथे सर्व बाजूस उड्‍या मारून हिंडून, कोठे शत्रुची सेना तर लपून राहिलेली नाही ना हे पाहात राहिले पाहिजे (असे न व्हावे की आपण पुढे निघून जावे आणि अकस्मात्‌ शत्रुने पाठीमागून आक्रमण करावे) ॥१२॥
यत्तु फल्गु बलं किञ्चित् तदत्रैवोपपद्यताम् ।
एतद्धि कृत्यं घोरं नो विक्रमेण प्रयुज्यताम् ॥ १३ ॥
ज्या सेनेत बाल, वृद्ध आदिंच्या कारणाने दुर्बलता असेल ते येथे किष्किंधेतच राहोत, कारण आपले हे युद्धरूपी कृत्य फार भयंकर आहे, म्हणून यासाठी बल-विक्रम संपन्न सेनेनेच यात्रा करणे आवश्यक आहे. ॥१३॥
सागरौघनिभं भीमं अग्रानीकं महाबलाः ।
कपिसिंहाः प्रकर्षन्तु शतशोऽथ सहस्रशः ॥ १४ ॥
शेकडो आणि हजारो महाबली कपिकेसरीवीर महासागराच्या जलराशीसमान भयंकर आणि अपार वानरसेनेच्या अग्रभागाला आपल्या बरोबर पुढे घेऊन जावोत. ॥१४॥
गजश्च गिरिसंकाशो गवयश्च महाबलः ।
गवाक्षश्चाग्रतो यान्तु गवां दृप्त इवर्षभः ॥ १५ ॥
पर्वतासमान विशालकाय गज, महाबली गवय तसेच मदमत्त वळूप्रमाणे पराक्रमी गवाक्ष सेनेच्या पुढे पुढे चालोत. ॥१५॥
यातु वानरवाहिन्या वानरः प्लवतां वरः ।
पालयन् दक्षिणं पार्श्वं ऋषभो वानरर्षभः ॥ १६ ॥
उड्‍या मारीत मारीत चालणार्‍या कपिंचे पालक वानरशिरोमणि ऋषभ या वानरसेनेच्या उजव्या भागाचे रक्षण करीत चालोत. ॥१६॥
गंधहस्तीव दुर्धर्षः तरस्वी गंधमादनः ।
यातु वानरवाहिन्याः सव्यं पार्श्वमधिष्ठितः ॥ १७ ॥
गंधहस्ती प्रमाणे दुर्जय आणि वेगवान्‌ गंधमादन या वानरवाहिनीच्या डाव्या बाजूस राहून तिचे रक्षण करीत करीत पुढे चालोत. ॥१७॥
यास्यामि बलमध्येऽहं बलैघमभिहर्षयन् ।
अधिरुह्य हनूमंतं ऐरावतमिवेश्वरः ॥ १८ ॥
ज्याप्रमाणे देवराज इंद्र ऐरावत हत्तीवर आरूढ होतात, त्याप्रकारे मी हनुमानांच्या खाद्यांवर चढून सैन्याच्या मध्ये राहून सर्व सेनेचा हर्ष वाढवीत चलेन. ॥१८॥
अङ्‌गदेनैष संयातु लक्ष्मणश्चान्तकोपमः ।
सार्वभौमेन भूतेशो द्रविणाधिपतिर्यथा ॥ १९ ॥
ज्याप्रमाणे धनाध्यक्ष कुबेर सार्वभौम नामक दिग्गजाच्या पाठीवर बसून यात्रा करतात त्याप्रमाणे काळासमान पराक्रमी लक्ष्मण अंगदावर आरूढ होऊन यात्रा करतील. ॥१९॥
जाम्बवांश्च सुषेणश्च वेगदर्शी च वानरः ।
ऋक्षराजो महाबाहुः कुक्षिं रक्षन्तु ते त्रयः ॥ २० ॥
महाबाहु ऋक्षराज जांबवान्‌, सुषेण आणि वानर वेगदर्शी हे तीन्ही वानर सेनेच्या पृष्ठभागाचे रक्षण करोत. ॥२०॥
राघवस्य वचः श्रुत्वा सुग्रीवो वाहिनीपतिः ।
व्यादिदेश महावीर्यो वानरान् वानरर्षभः ॥ २१ ॥
राघवांचे हे वचन ऐकून महापराक्रमी वानरशिरोमणि सुग्रीवांनी त्या वानरांना यथोचित आज्ञा दिली. ॥२१॥
ते वानरगणाः सर्वे समुत्पत्य महौजसः ।
गुहाभ्यः शिखरेभ्यश्च आशु पुप्लुविरे तदा ॥ २२ ॥
तेव्हां ते समस्त महाबली वानरगण आपल्या गुफांमधून आणि शिखरांवरून तात्काळच निघून उड्‍या मारीत मारीत चालू लागले. ॥२२॥
ततो वानरराजेन लक्ष्मणेन च पूजितः ।
जगाम रामो धर्मात्मा ससैन्यो दक्षिणां दिशम् ॥ २३ ॥
तत्पश्चात वानरराज सुग्रीव आणि लक्ष्मणांनी सादर अनुरोध केल्यावर सेनेसहित धर्मात्मा श्रीराम दक्षिण दिशेकडे प्रस्थित झाले. ॥२३॥
शतैः शतसहस्रैश्च कोटिभिश्चायुतैरपि ।
वारणाभैश्च हरिभिः ययौ परिवृतस्तदा ॥ २४ ॥
त्यासमयी शेकडो, हजारो, लाखो आणि कोट्‍यावधी वानर जे हत्तीप्रमाणे विशालकाय होते, त्यांनी घेरलेले श्रीरघुनाथ पुढे पुढे जाऊ लागले. ॥२४॥
तं यान्तमनुयांती सा महती हरिवाहिनी ।
दृप्ताः प्रमुदिताः सर्वे सुग्रीवेणापि पालिताः ॥ २५ ॥
यात्रा करीत असणार्‍या श्रीरामांच्या मागे ती विशाल वानरवाहिनी चालू लागली. त्या सेनेतील सर्व वीर सुग्रीवद्वारा पालित असल्यामुळे हृष्टपुष्ट आणि प्रसन्न होते. ॥२५॥
आप्लवन्तः प्लवन्तश्च गर्जन्तश्च प्लवङ्‌गमाः ।
क्ष्वेलन्तो निनदन्तश्च जग्मुर्वै दक्षिणां दिशम् ॥ २६ ॥
त्यांतील काही वानर त्या सेनेच्या रक्षणासाठी उड्‍या मारीत मारीत चारी बाजूस चक्कर मारीत होते, काही मार्ग शोधनासाठी उड्‍या मारीत पुढे निघून जात होते. काही वानर मेघासमान गर्जत होते, काही सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडीत होते आणि काही किलकार्‍या मारीत दक्षिण दिशेकडे अग्रेसर होत होते. ॥२६॥
भक्षयन्तः सुगंधीनि मधूनि च फलानि च ।
उद्‌वहन्तो महावृक्षान् मञ्जरीपुञ्जधारिणः ॥ २७ ॥
ते सुगंधित मधु पीत होते आणि मधुर फळे खात खात मंजरीपुंज धारण करणार्‍या विशाल वृक्षांना उपटून खांद्यावर घेऊन चालले होते. ॥२७॥
अन्योन्यं सहसा दृप्ता निर्वहन्ति क्षिपन्ति च ।
पतंतश्चोत्पन्त्यन्ये पातयन्त्यपरे परान् ॥ २८ ॥
काही मदमत्त वानर विनोदासाठी एक दुसर्‍याला ओढत होते. काही आपल्यावर चढलेल्या वानराला झटकून दूर फेकून देत होते. काही काही चालता चालता एकदम वर उडी मारीत होते आणि दुसरे काही वानर दुसर्‍या वानरांना वरून धक्के मारून खाली पाडत होते. ॥२८॥
रावणो नो निहन्तव्यः सर्वे च रजनीचराः ।
इति गर्जन्ति हरयो राघवस्य समीपतः ॥ २९ ॥
राघवांच्या जवळून जात असतां ते वानर याप्रमाणे बोलून गर्जना करीत होते की आपण रावणाला ठार मारले पाहिजे, समस्त निशाचरांचा संहार केला पाहिजे. ॥२९॥
पुरस्ताद् ऋषभो नीलः वीरः कुमुद एव च ।
पन्थानं शोधयन्ति स्म वानरैर्बहुभिः सह ॥ ३० ॥
सर्वात पुढे ऋषभ, नील आणि वीर कुमुद - हे बहुसंख्य वानरांसह रस्ता चांगला करीत जात होते. ॥३०॥
मध्ये तु राजा सुग्रीवो रामो लक्ष्मण एव च ।
बलिभिर्बहुभिर्भीमैः वृतः शत्रुनिबर्हणः ॥ ३१ ॥
सेनेच्या मध्यभागी राजा सुग्रीव, श्रीराम आणि लक्ष्मण - हे तीन्ही शत्रुसूदन वीर अनेक बलशाली आणि भयंकर वानरांनी घेरलेले चालत होते. ॥३१॥
हरिः शतबलिर्वीरः कोटिभिर्दशभिर्वृतः ।
सर्वामेको ह्यवष्टभ्य ररक्ष हरिवाहिनीम् ॥ ३२ ॥
शतबली नामक एक वीर वानर दहा कोटी वानरांसह एकटाच सार्‍या सेनेला आपल्या नियंत्रणाखाली ठेवून तिचे रक्षण करत होता. ॥३२॥
कोटीशतपरीवारः केसरी पनसो गजः ।
अर्कश्च बहुभिः पार्श्वं एकं तस्याभिरक्षति ॥ ३३ ॥
शंभर कोटी वानरांनी घेरलेले केसरी आणि पनस - हे सेनेच्या एका (दक्षिण) भागाचे, तसेच बर्‍याचशा वानर सैनिकांना बरोबर घेऊन गज आणि अर्क- हे त्या वानर सेनेच्या दुसर्‍या (डाव्या) भागाचे रक्षण करत होते. ॥३३॥
सुषेणो जाम्बवांश्चैव ऋक्षैः बहुभिरावृतौ ।
सुग्रीवं पुरतः कृत्वा जघनं संररक्षतुः ॥ ३४ ॥
बहुसंख्य अस्वलांनी घेरलेले सुषेण आणि जांबवान्‌ - हे दोघे सुग्रीवास पुढे करून सेनेच्या मागील भागाचे रक्षण करत होते. ॥३४॥
तेषां सेनापतिर्वीरो नीलो वानरपुङ्‌गवः ।
संपतन् प्लवतां श्रेष्ठः तद् बलं पर्यवारयत् ॥ ३५ ॥
त्या सर्वांचे सेनापति कपिश्रेष्ठ वानरशिरोमणी वीर नील त्या सेनेचे सर्व बाजूनी रक्षण आणि नियंत्रण करत होते. ॥३५॥
दरीमुखः प्रजङ्‌घश्च जम्भोऽथ रभसः कपिः ।
सर्वतश्च ययुर्वीराः त्वरयन्तः प्लवङ्‌गमान् ॥ ३६ ॥
दधिमुख, प्रजंघ, जंभ आणि रभस - हे वीर सर्व बाजूनी वानरांना शीघ्र पुढे जाण्याची प्रेरणा देत चालत राहिले होते. ॥३६॥
एवं ते हरिशार्दूला गच्छन्तो बलदर्पिताः ।
अपश्यंस्ते गिरिश्रेष्ठं सह्यं गिरिशतायुतम् ॥ ३७ ॥
या प्रकारे ते बलोन्मत्त कपि-केसरीवीर बरोबर पुढे चालत गेले. चालता चालता त्यांनी पर्वतश्रेष्ठ सह्यगिरिला पाहिले, ज्याच्या आसपास आणखीही शेकडो पर्वत होते. ॥३७॥
सरांसि च सुफुल्लानि तटाकानि वराणि च ।
रामस्य शासनं ज्ञात्वा भीमकोपस्य भीतवत् ॥ ३८ ॥

वर्जयन् नागराभ्याशान् तथा जनपदानपि ।
सागरौघनिभं भीमं तद् वानरबलं महत् ॥ ३९ ॥

निःससर्प महाघोरं भीमघोषमिवार्णवम् ।
रस्त्यात त्यांना बरीचशी सुंदर सरोवरे आणि तलाव दिसले ज्यामध्ये मनोहर कमळे फुललेली होती. श्रीरामांची आज्ञा होती की रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपद्रव करू नये. भयंकर कोप असणार्‍या श्रीरामांचा हा आदेश जाणून समुद्राच्या जलप्रवाहाप्रमाणे अपार आणि भयंकर दिसणारी ती विशाल वानरसेना भयभीत झाल्यासारखी नगरांच्या समीपवर्ती स्थाने आणि जनपदांना दूरच ठेवून चालत राहिली होती, विकट गर्जना करण्यामुळे भयानक शब्द करणार्‍या समुद्राप्रमाणे ती महाघोर वाटत होती. ॥३८-३९ १/२॥
तस्य दाशरथेः पार्श्वे शूरास्ते कपिकुञ्जराः ॥ ४० ॥

तूर्णमापुप्लुवुः सर्वे सदश्वा इव चोदिताः ।
ते सर्व शूरवीर कपिकुंजर हांकल्या जाणार्‍या उत्तम घोड्‍यांप्रमाणे उड्‍या मारीत मारीत तात्काळच दशरथनंदन रामांजवळ पोहोचत होते. ॥४० १/२॥
कपिभ्यामुह्यमानौ तौ शुशुभाते नरर्षभौ ॥ ४१ ॥

महद्‌भ्यामिव संस्पृष्टौ ग्रहाभ्यां चन्द्रभास्करौ ।
हनुमान्‌ आणि अंगद - या दोन वानरवीरांच्या द्वारा वाहून नेले जात असलेले ते नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मण शुक्र आणि बृहस्पति - या दोन महाग्रहांनी संयुक्त झालेल्या चंद्र आणि सूर्याप्रमाणे शोभत होते. ॥४१ १/२॥
ततो वानरराजेन लक्ष्मणेन सुपूजितः ॥ ४२ ॥

जगाम रामो धर्मात्मा ससैन्यो दक्षिणां दिशम् ।
त्या समयी वानरराज सुग्रीव आणि लक्ष्मणांनी सन्मानित झालेले धर्मात्मा श्रीराम सेनेसहित दक्षिण दिशेकडे पुढे पुढे जात होते. ॥४२ १/२॥
तमङ्‌गदगतो रामं लक्ष्मणः शुभया गिरा ॥ ४३ ॥

उवाच परिपूर्णार्थं पूर्णार्थ प्रतिभानवान् ।
लक्ष्मण अंगदांच्या खाद्यांवर बसलेले होते. ते शकुनांच्या द्वारा कार्यसिद्धिची गोष्ट उत्तम प्रकारे जाणत होते. त्यांनी पूर्णकाम भगवान्‌ श्रीरामांना मंगलमय वाणीमध्ये म्हटले- ॥४३ १/२॥
हृतामवाप्य वैदेहीं क्षिप्रं हत्वा च रावणम् ॥ ४४ ॥

समृद्धार्थः समृद्धार्थां अयोध्यां प्रतियास्यसि ।
महान्ति च निमित्तानि दिवि भूमौ च राघव ॥ ४५ ॥

शुभानि तव पश्यामि सर्वाण्येवार्थसिद्धये ।
राघवा ! मला पृथ्वी आणि आकाशात बरेचसे चांगले चांगले शकुन दिसून येत आहेत. हे सर्व आपल्या मनोरथांच्या सिद्धिला सूचित करीत आहेत. यावरून निश्चय होत आहे की आपण लवकरच रावणाला मारून हरण केल्या गेलेल्या सीतेला प्राप्त कराल आणि सफल मनोरथ होऊन समृद्धिशालिनी अयोध्येला जाल. ॥४४-४५ १/२॥
अनुवाति शिवो वायुः सेनां मृदुहितः सुखः ॥ ४६ ॥

पूर्णवल्गुस्वराश्चेमे प्रवदन्ति मृगद्विजाः ।
प्रसन्नाश्च दिशः सर्वा विमलश्च दिवाकरः ॥ ४७ ॥

उशनाश्च प्रसन्नार्चिः अनु त्वां भार्गवो गतः ।
ब्रह्मराशिर्विशुद्धश्च शुद्धाश्च परमर्षयः ।
अर्चिष्मन्तः प्रकाशन्ते ध्रुवं सर्वे प्रदक्षिणम् ॥ ४८ ॥
पहा, सेनेच्या मागील बाजूस शीतल, मंद, हितकर आणि सुखमय वारा वहात आहे. हे पशु आणि पक्षी पूर्ण मधुर स्वरात आपली आपली बोली बोलत आहेत. सर्व दिशा प्रसन्न आहेत. सूर्यदेव ही निर्मल दिसून येत आहेत. भृगुनंदन शुक आपल्या उज्ज्वळ प्रभेने प्रकाशित होऊन आपल्या मागील दिशेमध्ये प्रकाशित होऊन राहिला आहे. जेथे सप्तर्षिंचा समुदाय शोभून दिसत आहे, तो ध्रुवतारा ही निर्मल दिसत आहे. शुद्ध आणि प्रकाशमान समस्त सप्तर्षिगण ध्रुवाला आपल्या उजव्या बाजूस ठेवून त्याची परिक्रमा करत आहेत. ॥४६-४८॥
त्रिशङ्‌कुर्विमलो भाति राजर्षिः सपुरोहितः ।
पितामहवरोऽस्माकं इक्ष्वाकूणां महात्मनाम् ॥ ४९ ॥
आमच्याच बरोबर महामना इक्ष्वाकुवंशीयांचे पितामह राजर्षि त्रिशंकु आपले पुरोहित वसिष्ठ यांचे बरोबर आम्हा लोकांसमोरच निर्मल कांतिने प्रकाशित होत आहेत. ॥४९॥
विमले च प्रकाशेते विशाखे निरुपद्रवे ।
नक्षत्रवरमस्माकं इक्ष्वाकूणां महात्मनाम् ॥ ५० ॥
आम्हा महामनस्वी इक्ष्वाकुवंशियांसाठी जे सर्वात उत्तम आहे, ते विशाखा नामक युगल नक्षत्र निर्मल आणि उपद्रवशून्य (मंगल आदि दुष्ट ग्रहांच्या आक्रांतिरहित) होऊन प्रकाशित होत आहे. ॥५०॥
नैर्ऋतं नैर्ऋतानां च नक्षत्रमतिपीड्यते ।
मूलो मूलवता स्पृष्टो धूप्यते धूमकेतुना ॥ ५१ ॥
राक्षसांचे नक्षत्र मूळ, ज्याची देवता निर्‌ऋति आहे, अत्यंत पीडित होत आहे. त्या मूळाच्या नियामक धूमकेतुने आक्रांत होऊन ते संतापाचे भागी होत आहे. ॥५१॥
सर्वं चैतद् विनाशाय राक्षसानामुपस्थितम् ।
काले कालगृहीतानां नक्षत्रं ग्रहपीडितम् ॥ ५२ ॥
हे सर्व काही राक्षसांच्या विनाशासाठीच उपस्थित झाले आहे, कारण जे लोक काळपाशात बद्ध होतात त्यांचेच नक्षत्र समयानुसार ग्रहांनी पीडित होत असते. ॥५२॥
प्रसन्नाः सुरसाश्चापो वनानि फलवन्ति च ।
प्रवान्ति नाधिका गंधा यथर्तुकुसुमा द्रुमाः ॥ ५३ ॥
जल स्वच्छ आणि उत्तम रसाने पूर्ण दिसून येत आहे. जंगलामध्ये पर्याप्त फळे उपलब्ध होत आहेत, सुगंधित वायु अधिक तीव्रगतिने वहात नाही आहे आणि वृक्ष्यांमध्ये ऋतुंना अनुसरून फुले लागलेली आहेत. ॥५३॥
व्यूढानि कपिसैन्यानि प्रकाशन्तेऽधिकं प्रभो ।
देवानामिव सैन्यानि सङ्‌ग्रामे तारकामये ।
एवमार्य समीक्ष्यैतान् प्रीतो भवितुमर्हिसि ॥ ५४ ॥
प्रभो ! व्यूहबद्ध वानरसेना फार शोभा संपन्न वाटत आहे. तारकामय संग्रामाच्या अवसरी देवतांच्या सेना ज्याप्रकारे उत्साहाने संपन्न होत्या, त्याच प्रकारे आज या वानरसेनाही आहेत. आर्य ! अशी शुभ लक्षणे पाहून आपण प्रसन्न झाले पाहिजे. ॥५४॥
इति भ्रातरमाश्वास्य हृष्टः सौमित्रिरब्रवीत् ।
अथावृत्य महीं कृत्स्नां जगाम हरिवाहिनी ॥ ५५ ॥
आपले भाऊ श्रीराम यांना आश्वासन देऊन हर्षाने भरलेले सौमित्र लक्ष्मण ज्यावेळी याप्रकारे बोलत होते त्यासमयी वानरसेना तेथील सार्‍या भूमिला घेरून पुढे पुढे जाऊ लागली. ॥५५॥
ऋक्षवानरशार्दूलैः नखदंष्ट्रायुधैरपि ।
कराग्रैश्चरणाग्रैश्च वानरैरुद्धतं रजः ॥ ५६ ॥
त्या सेनेत काही अस्वले होती आणि काही सिंहासमान पराक्रमी वानर. नखे आणि दांत हीच त्यांची (आयुधे) शस्त्रे होती. ते सर्व वानर सैनिक हातांच्या आणि पायांच्या बोटांनी खूपच धूळ उडवित चालले होते. ॥५६॥
भीमं अन्तर्दधे लोकं निवार्य सवितुः प्रभाम् ।
सपर्वतवनाकाशं दक्षिणां हरिवाहिनी ॥ ५७ ॥

छादयन्ती ययौ भीमा द्यामिवाम्बुदसंततिः ।
त्यांनी उडविलेल्या त्या भयंकर धुळीने सूर्याच्या प्रभेला झाकून संपूर्ण जगाला जणु लपवून टाकले. ती भयानक वानर सेना पर्वत, वने आणि आकाशासहित दक्षिण दिशेला जणु आच्छादित करीत मेघांचा समुदाय आकाशाला झाकून टाकून पुढे सरकतो त्याप्रमाणे पुढे पुढे सरकत होती. ॥५७ १/२॥
उत्तरन्त्याश्च सेनायां सततं बहुयोजनम् ॥ ५८ ॥

नदीस्रोतांसि सर्वाणि सस्यन्दुर्विपरीतवत् ।
ती वानरसेना जेव्हा एखाद्या नदीला पार करीत होती त्यासमयी सतत काही योजनांपर्यंत तिच्या समस्त धारा उलट्‍या वाहू लागत होत्या. ॥५८ १/२॥
सरांसि विमलाम्भांसि द्रुमाकीर्णांश्च पर्वतान् ॥ ५९ ॥

समान् भूमिप्रदेशांश्च वनानि फलवन्ति च ।
मध्येन च समन्ताच्च तिर्यक्चाधश्च साविशत् ॥ ६० ॥

समावृत्य महीं कृत्स्नां जगाम महती चमूः ।
ती विशाल सेना निर्मल जलाचे सरोवर, वृक्षांनी झाकलेले पर्वत, भूमीचे समतल प्रदेश आणि फळांनी भरलेली वने - या सर्व स्थानांच्या मध्ये इकडे-तिकडे तसेच वर-खाली सर्व बाजूनी सर्व भूमिला घेरून चालत होती. ॥५९-६० १/२॥
ते हृष्टवदनाः सर्वे जग्मुर्मारुतरंहसः ॥ ६१ ॥

हरयो राघवस्यार्थे समारोपितविक्रमाः ।
त्या सेनेचे सर्व वानर प्रसन्नमुख तसेच वायुच्या समान वेग असणारे होते. राघवांच्या कार्यसिद्धिसाठी त्यांचा पराक्रम उसळ्या मारत होता. ॥६१ १/२॥
हर्षवीर्यबलोद्रेकान् दर्शयन्तः परस्परम् ॥ ६२ ॥

यौवनोत्सेकजाद् दर्पाद् विविधांश्चक्रुरध्वनि ।
ते तारूण्याचा आवेश आणि अभिमानजनित दर्पामुळे रस्त्यात एक दुसर्‍याला उत्साह, पराक्रम तसेच नानाप्रकारच्या बळासंबंधी उत्कर्ष दाखवीत होते. ॥६२ १/२॥
तत्र केचिद् द्रुतं जग्मुः उत्पेतुश्च तथापरे ॥ ६३ ॥

केचित् किलकिलां चक्रुः वानरा वनगोचराः ।
प्रास्फोटयंश्च पुच्छानि सन्निजघ्नुः पदान्यपि ॥ ६४ ॥
त्यांच्यापैकी काही तर अत्यंत वेगाने जमिनावरून चालत होते आणि दुसरे काही उडी मारून आकाशांत उडून जात होते. कित्येक वनवासी वानर तर खदखदून हसून पृथ्वीवर आपली शेपटी आपटत होते, आणि पाय आपटत होते. ॥६३-६४॥
भुजान् विक्षिप्य शैलांश्च द्रुमानन्ये बभञ्जिरे ।
आरोहन्तश्च शृङ्‌गाणि गिरीणां गिरिगोचराः ॥ ६५ ॥
कित्येक तर आपले बाहु पसरून पर्वत-शिखरे आणि वृक्षांना तोडून टाकत होते तसेच पर्वतावर विचरणारे बरेचसे वानर डोंगरांच्या शिखरावर चढून जात होते. ॥६५॥
महानादान् प्रमुञ्चन्ति क्ष्वेडामन्ये प्रचक्रिरे ।
ऊरुवेगैश्च ममृदुः लताजालान्यनेकशः ॥ ६६ ॥
कोणी खूप मोठ्‍याने गर्जना करीत आणि कोणी सिंहनाद करत होते. कित्येक तर आपल्या मांड्‍यांच्या वेगाने अनेकानेक लतासमूहांना रगडून चुरगळून टाकत होते. ॥६६॥
जृम्भमाणाश्च विक्रान्ता विचिक्रीडुः शिलाद्रुमैः ।
शतैः शतसहस्रैश्च कोटीभिश्च सहस्रशः ॥ ६७ ॥

वानराणां सुघोराणां श्रीमत्परिवृता मही ।
ते सर्व वानर फार पराक्रमी होते. जांभई देतांना ते दगडांच्या शिळांशी आणि मोठमोठ्‍या वृक्षांशी खेळ करत होते. त्या हजारो, लाखो आणि कोट्‍यावधि वानरांनी घेरलेली सर्व पृथ्वी फार शोभून दिसत होती. ॥६७ १/२॥
सा स्म याति दिवारात्रं महती हरिवाहिनी ॥ ६८ ॥

प्रहृष्टमुदिता सर्वे सुग्रीवेणाभिपालिताः ।
वानरास्त्वरिता यान्ति सर्वे युद्धाभिनन्दिनः ।
प्रमोक्षयिषवः सीतां मुहूर्तं क्वापि नावसन् ॥ ६९ ॥
याप्रकारे ती विशाल वानरसेना दिवस-रात्र चालत राहिली होती. सुग्रीवद्वारा सुरक्षित सर्व वानर हृष्ट-पुष्ट आणि प्रसन्न होते. सर्व मोठ्‍या उतावळेपणाने चालत होते. सर्व युद्धाचे अभिनंदन करणारे होते आणि सर्व सीतेला रावणाच्या कैदेतून सोडविण्याची इच्छा करत होते, म्हणून त्यांनी रस्त्यात कोठे दोन घटिका विश्रांतीही घेतली नाही. ॥६८-६९॥
ततः पादपसंबाधं नानावनसमायुतम् ।
सह्यपर्वतमासाद्य वानरास्ते समारुहन् ॥ ७० ॥
चालता चालता घनदाट वृक्षांनी व्याप्त आणि अनेकानेक काननांनी युक्त सह्य पर्वताच्या जवळ पोहोचून ते सर्व वानर त्याच्यावर चढून गेले. ॥७०॥
काननानि विचित्राणि नदीप्रस्रवणानि च ।
पश्यन्नपि ययौ रामः सह्यस्य मलयस्य च ॥ ७१ ॥
श्रीराम, सह्य आणि मलयाच्या विचित्र कानने, नद्या आणि निर्झरांची शोभा पहात यात्रा करत होते. ॥७१॥
चंपकांस्तिलकांश्चूतान् अशोकान् सिंदुवारकान् ।
तिनिशान् करवीरांश्च भञ्जन्ति स्म प्लवङ्‌गमाः ॥ ७२ ॥
ते वानर मार्गांत लागलेल्या चंपा, तिलक, आम्र, अशोक, सिंदुवार, तिनिश आणि करवीर आदि वृक्षांना तोडून टाकत होते. ॥७२॥
अङ्‌कोलांश्च करञ्जांश्च प्लक्षन्यग्रोधपादपान् ।
जम्बूकामलकान् नीपान् भञ्जन्ति स्म प्लवंगमाः ॥ ७३ ॥
उड्‍या मारीत मारीत चालणारे ते वानर सैनिक रस्त्यांतील अकोळ, करंज, पाकर, वड, जांभूळ, आंवळे आणि कडुलिंब आदि वृक्षांना ही तोडून टाकत होते. ॥७३॥
प्रस्तरेषु च रम्येषु विविधाः काननद्रुमाः ।
वायुवेगप्रचलिताः पुष्पैरवकिरन्ति तान् ॥ ७४ ॥
रमणीय दगडांवर उगवलेले नाना प्रकारचे जंगली वृक्ष वायुच्या झुळुकेने डोलत असता त्या वानरांवर फुलांची वृष्टी करत होते. ॥७४॥
मारुतः सुखसंस्पर्शो वाति चन्दनशीतलः ।
षट्पदैरनुकूजद्‌भिः वनेषु मधुगंधिषु ॥ ७५ ॥
मधुच्या योगे सुगंधित वनांमध्ये गुणगुणणार्‍या भुंग्याच्या बरोबर चंदनासारखा शीतल, मंद आणि सुगंधी वाराही वहात होता. ॥७५॥
अधिकं शैलराजस्तु धातुभिस्तु विभूषितः ।
धातुभ्यः प्रसृतो रेणुः वायुवेगेन घट्टितः ॥ ७६ ॥

सुमहद् वानरानीकं छादयामास सर्वतः ।
तो पर्वतराज गैरिक आदि धातुनी विभूषित होऊन फारच शोभून दिसत होता. त्या धातुंमुळे पसरलेली धूळ वायुच्या वेगाने उडून त्या विशाल वानरसेनेला सर्व बाजूनी आच्छदित करून टाकत होती. ॥७६ १/२॥
गिरिप्रस्थेषु रम्येषु सर्वतः संप्रपुष्पिता॥ ७७ ॥

केतक्यः सिंदुवाराश्च वासन्त्यश्च मनोरमाः ।
माधव्यो गंधपूर्णाश्च कुन्दगुल्माश्च पुष्पिताः ॥ ७८ ॥
रमणीय पर्वताशिखरांवर सर्व बाजूला फुललेल्या केतकी, सिंदुवार आणि वासंती लता फारच मनोरम दिसत होत्या. प्रफुल्ल माधवी लता सुगंधाने भरलेल्या होत्या आणि कुन्दाच्या लताही फुलांनी लगडलेल्या होत्या. ॥७७-७८॥
चिरिबिल्वा मधूकाश्च वञ्जुलाः बकुलास्तथा ।
रञ्जकास्तिलकाश्चैव नागवृक्षाश्च पुष्पिताः ॥ ७९ ॥
चिरिबिल्व, मधूक (मोह), वञ्जुल, बकुळ, रंजक, तिलक आणि नागकेसराचे वृक्षही तेथे बहरलेले होते. ॥७९॥
चूताः पाटलिकाश्चैव कोविदाराश्च पुष्पिताः ।
मुचुलिन्दार्जुनाश्चैव शिंशपाः कुटजास्तथा ॥ ८० ॥

हिन्तालास्तिनिशाश्चैव चूर्णका नीपकास्तथा ।
नीलाशोकाश्च सरला अङ्‌कोलाः पद्मकास्तथा ॥ ८१ ॥
आम्र, पाडर आणि कोविदार फुलांनी लगडलेले होते. मुचुलिंद, अर्जुन, शिंशपा, कुटज, हिंताळ, तिनिश, चूर्णक, कदंब, नीलाशोक, सरळ, अंकोळ आणि पद्मकही सुंदर फुलांनी सुशोभित होते. ॥८०-८१॥
प्लवमानैः प्लवङ्‌गैस्तु सर्वे पर्याकुलीकृताः ।
वाप्यस्तस्मिन् गिरौ रम्याः पल्वलानि तथैव च ॥ ८२ ॥

चक्रवाकानुचरिताः कारण्डवनिषेविताः ।
प्लवैः क्रौञ्चैश्च सङ्‌कीर्णा वराहमृगसेविताः ॥ ८३ ॥
प्रसन्नतेने भरलेल्या त्या वानरांनी त्या सर्व वृक्षांना घेरून टाकले होते. त्या पर्वतावर बर्‍याचशा रमणीय विहिरी आणि लहान लहान जलाशय होते, जेथे चक्रवाक विचरत होते आणि जलकुक्कुट निवास करत होते. जलकाक आणि क्रौंच तेथे भरलेले होते आणि डुकरे आणि हरणे त्यांतील पाणी पीत होते. ॥८२-८३॥
ऋक्षैस्तरक्षुभिः सिंहैः शार्दूलैश्च भयावहैः ।
व्यालैश्च बहुभिर्भीमैः सेव्यमानाः समन्ततः ॥ ८४ ॥
अस्वले, तरस (खोकड), सिंह, भयंकर वाघ तसेच बहुसंख्य दुष्ट हत्ती जे फार भीषण होते, सर्व बाजूनी येऊन येऊन त्या जलाशयांचे सेवन करत होते. ॥८४॥
पद्मैः सौगंधिकैः फुल्लैः कुमुदैश्चोत्पलैस्तथा ।
वारिजैर्विविधैः पुष्पै रम्यास्तत्र जलाशयाः ॥ ८५ ॥
फुललेली सुगंधित कमळे, कुमुदे, उत्पल तसेच जलात होणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या अन्य पुष्पांनी तेथील जलाशय फार रमणीय दिसून येत होते. ॥८५॥
तस्य सानुषु कूजन्ति नानाद्विजगणास्तथा ।
स्नात्वा पीत्वोदकान्यत्र जले क्रीडन्ति वानराः॥ ८६ ॥
त्या पर्वतांच्या शिखरांवर नाना प्रकारचे पक्षी कलरव करत होते. वानर त्या जलाशयात नहात होते, पाणी पीत होते आणि जलात क्रीडा करत होते. ॥८६॥
अन्योन्यं प्लावयन्ति स्म शैलमारुह्य वानराः ।
फलान्यमृतगंधीनि मूलानि कुसुमानि च ॥ ८७ ॥

बभञ्जुर्वानरास्तत्र पादपानां मदोत्कटाः ।
द्रोणमात्रप्रमाणानि लम्बमानानि वानराः ॥ ८८ ॥

ययुः पिबंतः स्वस्थास्ते मधूनि मधुपिङ्‌गलाः ।
ते आपसात एक दुसर्‍यावर पाणी उडवत होते. काही वानर पर्वतावर चढून तेथील वृक्षांची अमृततुल्य गोड फळे, मुळे आणि फुले तोडत होते. मधुसमान वर्णाचे कित्येक मदमत्त वानर वृक्षांवर लटकणारी आणि एक-एक द्रोण मधांनी भरलेली मधाची पोवळी तोडून त्यांतील मध पिऊन टाकीत होते आणि स्वस्थ (संतुष्ट) होऊन चालू लागत होते. ॥८७-८८ १/२॥
पादपानवभञ्जन्तो विकर्षन्तस्तथा लताः ॥ ८९ ॥

विधमन्तो गिरिवरान् प्रययुः प्लवगर्षभाः ।
वृक्षांना तोडत, लतांना खेचून काढत आणि मोठमोठ्‍या पर्वतांना प्रतिध्वनित करत ते श्रेष्ठ वानर तीव्र गतिने पुढे जात होते. ॥८९ १/२॥
वृक्षेभ्योऽन्ये तु कपयो नदन्तो मधु दर्पिताः ॥ ९० ॥

अन्ये वृक्षान् प्रपद्यन्ते प्रपिबन्त्यपि चापरे ।
दुसरे वानर हर्षाने भरून मधाची पोवळी उतरवून घेत होते आणि जोरजोराने गर्जना करत होते. काही वानर वृक्षांवर चढून जात तर कांही मध पिऊ लागत. ॥९० १/२॥
बभूव वसुधा तैस्तु संपूर्णा हरिपुंगवैः ।
यथा कलमकेदारैः पक्वैरिव वसुंधरा ॥ ९१ ॥
त्या वानरश्रेष्ठांनी भरलेली तेथील भूमी पिकलेल्या केसाच्या कलमी धान्यांच्या रांगानी झाकल्या गेलेल्या धरतीप्रमाणे सुशोभित होत होती. ॥९१॥
महेन्द्रमथ संप्राप्य रामो राजीवलोचनः।
आरुरोह महाबाहुः शिखरं द्रुमभूषितम् ॥ ९२ ॥
कमलनयन महाबाहु श्रीराम महेन्द्र पर्वताच्या जवळ पोहोचून तर्‍हेतर्‍हेच्या वृक्षांनी सुशोभित त्याच्या शिखरावर चढून गेले. ॥९२॥
ततः शिखरमारुह्य रामो दशरथात्मजः ।
कूर्ममीनसमाकीर्णं अपश्यत् सलिलाशयम् ॥ ९३ ॥
महेन्द्र पर्वताच्या शिखरावर आरूढ होऊन दशरथनंदन भगवान्‌ श्रीरामांनी कासवे आणि माशांनी भरलेल्या समुद्रास पाहिले. ॥९३॥
ते सह्यं समतिक्रम्य मलयं च महागिरिम् ।
आसेदुरानुपूर्व्येण समुद्रं भीमनिःस्वनम् ॥ ९४ ॥
याप्रकारे ते सह्य आणि मलय पर्वतांना ओलांडून क्रमश: महेन्द्र पर्वताच्या समीपवर्ती समुद्राच्या तटावर जाऊन पोहोचले, जेथे फार भयंकर शब्द उत्पन्न होत होता. ॥९४॥
अवरुह्य जगामाशु वेलावनमनुत्तमम् ।
रामो रमयतां श्रेष्ठः ससुग्रीवः सलक्ष्मणः ॥ ९५ ॥
त्या पर्वतावरून उतरून भक्तांच्या मनाला रमविणार्‍यांमध्ये श्रेष्ठ भगवान्‌ श्रीराम, सुग्रीव आणि लक्ष्मणासह शीघ्रच सागर तटवर्ती परम उत्तम वनात जाऊन पोहोचले. ॥९५॥
अथ धौतोपलतलां तोयौघैः सहसोत्थितैः ।
वेलामासाद्य विपुलां रामो वचनमब्रवीत् ॥ ९६ ॥
जेथे एकाएकी उठणार्‍या जलाच्या तरंगानी प्रस्तराच्या शिळा धुतल्या गेल्या होत्या, त्या विस्तृत सिंधुतटावर पोहोचून श्रीरामांनी म्हटले- ॥९६॥
एते वयमनुप्राप्ताः सुग्रीव वरुणालयम् ।
इहेदानीं विचिन्ता सा या नः पूर्वं उपस्थिता ॥ ९७ ॥
सुग्रीवा ! हो, आपण सर्व लोक समुद्राच्या किनार्‍यावर तर आलो आहोत. आता येथे मनात परत तीच चिंता उत्पन्न झाली आहे, जी आपल्या समोर प्रथमही उपस्थित होती. ॥९७॥
अतः परमतीरोऽयं सागरः सरितां पतिः ।
न चायमनुपायेन शक्यस्तरितुमर्णवः ॥ ९८ ॥
या पुढे तर हा सरितांचा स्वामी महासागरच विद्यमान्‌ आहे, ज्याचा कुठे पारच दिसून येत नाही. आता कुठल्याही समुचित उपायाशिवाय सागराला पार करणे असंभव आहे. ॥९८॥
तदिहैव निवेशोऽस्तु मंत्रः प्रस्तूयतामिह ।
यथेदं वानरबलं परं पारमवाप्नुयात् ॥ ९९ ॥
म्हणून येथे सेनेचा तळ पडू दे आणि आम्ही सर्व येथे बसून कशा प्रकारे ही वानरसेना समुद्राच्या त्या तीरास पोहोचू शकेल याचा विचार करण्यास आरंभ करू या. ॥९९॥
इतीव स महाबाहुः सीताहरणकर्शितः ।
रामः सागरमासाद्य वासमाज्ञापयत् तदा ॥ १०० ॥
याप्रकारे सीताहरणाच्या शोकाने दुर्बल झालेल्या महाबाहु श्रीरामांनी समुद्राच्या किनार्‍यावर पोहोचून त्यासमयी सर्व सेनेला तेथेच तळ ठोकून राहाण्याची आज्ञा दिली. ॥१००॥
सर्वाः सेना निवेश्यन्तां वेलायां हरिपुङ्‌गव ।
संप्राप्तो मंत्रकालो नः सागरस्यास्य लङ्‌घने ॥ १०१ ॥
ते म्हणाले- कपिश्रेष्ठ हो ! समस्त सेनांना समुद्राच्या तटावर थांबविले जावे. आता येथे आपल्यासाठी समुद्र-लंघनासाठी उपाय काय करावा यासंबंधी विचार करण्याचा अवसर आला आहे. ॥१०१॥
स्वां स्वां सेनां समुत्सृज्य मा च कश्चित् कुतो व्रजेत् ।
गच्छन्तु वानराः शूरा ज्ञेयं छन्नं भयं च नः ॥ १०२ ॥
यासमयी कोणीही सेनापति कुठल्याही कारणाने आपली आपली सेना सोडून अन्यत्र जाता कामा नये. समस्त शूर-वीर वानर सेनेच्या रक्षणासाठी यथास्थान निघून जावोत. सर्वांनी हे जाणून घेतले पाहिजे की आम्हां लोकांवर राक्षसांच्या मायेने गुप्त भय येणे शक्य आहे. ॥१०२॥
रामस्य वचनं श्रुत्वा सुग्रीवः सहलक्ष्मणः ।
सेनां निवेशयत् तीरे सागरस्य द्रुमायुते ॥ १०३ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून लक्ष्मणासहित सुग्रीवांनी वृक्षांच्या रांगांनी सुशोभित सागर तटावर सेनेला थांबविले. ॥१०३॥
विरराज समीपस्थं सागरस्य च तद् बलम् ।
मधुपाण्डुजलः श्रीमान् द्वितीय इव सागरः ॥ १०४ ॥
समुद्राजवळ थांबलेली ती विशाल वानरसेना मधाप्रमाणे पिंगट वर्णाच्या जलांनी भरलेल्या दुसर्‍या सागराप्रमाणे शोभा धारण करत होती. ॥१०४॥
वेलावनमुपागम्य ततस्ते हरिपुङ्‌गवाः ।
विनिविष्टाः परं पारं काङ्‌क्षमाणा महोदधेः ॥ १०५ ॥
सागर तटवर्ती वनात पोहोचून ते सर्व श्रेष्ठ वानर समुद्राच्या पार जाण्याची अभिलाषा मनात धरून तेथेच थांबून राहिले. ॥१०५॥
तेषां निविशमानानां सैन्यसन्नाहनिःस्वनः ।
अन्तर्धाय महानादं अर्णवस्य प्रशुश्रुवे ॥ १०६ ॥
तेथे तळ ठोकून असता त्या श्रीराम आदिंच्या सेनांच्या संचरणाने जो महान्‌ कोलाहल झाला तो महासागराच्या गंभीर गर्जनेलाही दाबून ऐकू येऊ लागला. ॥१०६॥
सा वानराणां ध्वजिनी सुग्रीवेणाभिपालिता ।
त्रिधा निविष्टा महती रामस्यार्थपराभवत् ॥ १०७ ॥
सुग्रीवद्वारा सुरक्षित ती वानरांची विशाल सेना श्रीरामांचे कार्य साधण्यासाठी तत्पर होऊन अस्वले, लंगूर आणि वानरांच्या भेदाने तीन भागात विभक्त होऊन तेथे राहिली. ॥१०७॥
सा महार्णवमासाद्य हृष्टा वानरवाहिनी ।
वायुवेगसमाधूतं पश्यमाना महार्णवम् ॥ १०८ ॥
महासागराच्या तटावर पोहोचून ती वानरसेना वायुच्या वेगाने कंपित झालेल्या समुद्राची शोभा पहात असता फारच हर्षाचा अनुभव करत होती. ॥१०८॥
दूरपारमसम्बाधं रक्षोगणनिषेवितम् ।
पश्यन्तो वरुणावासं निषेदुर्हरियूथपाः ॥ १०९ ॥
ज्याचा दुसरा तट फारच दूर होता आणि मध्ये काही आश्रय नव्हता, तसेच ज्यामध्ये राक्षसांचे समुदाय निवास करत होते त्या वरूणालय समुद्राला पहात ते वानर यूथपति त्याच्या तटावर बसून राहिले. ॥१०९॥
चण्डनक्रग्राहघोरं क्षपादौ दिवसक्षये ।
हसन्तमिव फेनौघैः नृत्यन्तमिव चोर्मिभिः ॥ ११० ॥

चन्द्रोदयसमुद्‌भूतं प्रतिचन्द्रसमाकुलम् ।
चण्डानिलमहाग्राहैः कीर्णं तिमितिमिंगिलैः ॥ १११ ॥
क्रोधाविष्ट झालेल्या नक्रांमुळे समुद्र फार भयंकर दिसत होता. दिवसाच्या शेवटी आणि रात्रीच्या आरंभी- प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर त्याच्यात भरती आली, त्यासमयी तो फेन-समूहाने जणु हसतांना आणि उन्ताल तरंगांमुळे जणु नाचत असल्यासारखा प्रतीत होत होता. चंद्रम्याच्या प्रतिबिंबानी भरल्यासारखा वाटत होता. प्रचंड वायुसमान वेगवान्‌ मोठ मोठ्‍या ग्राहांनी आणि तिमि नामक महामत्स्यांनाही गिळून टाकणार्‍या महाभयंकर जलजंतुंनी व्याप्त दिसून येत होता. ॥११०-१११॥
दीप्तभोगैरिवाकीर्णं भुजङ्‌गैर्वरुणालयम् ।
अवगाढं महासत्त्वैः नानाशैलसमाकुलम् ॥ ११२ ॥
तो वरूणालय प्रदीप्त फणा असणार्‍या सर्पांनी, विशालकाय जलचरांनी आणि नाना पर्वतांनी व्याप्त दिसून येत होता. ॥११२॥
सुदुर्गं दुर्गमार्गं तं अगाधं असुरालयम् ।
मकरैर्नागभोगैश्च विगाढा वातलोलिताः ।
उत्पेतुश्च निपेतुश्च प्रवृद्धा जलराशयः ॥ ११३ ॥
राक्षसांचा निवासभूत तो अगाध महासागर अत्यंत दुर्गम होता. त्याला पार करण्याचा कुठलाही मार्ग अथवा साधन दुर्लभ होते. त्यामध्ये वायुच्या प्रेरणेने उठणार्‍या चंचल लाटा, ज्या मगरीनी आणि विशालकाय सर्पांनी व्याप्त होत्या, मोठ्‍या उल्हासाने वर उसळत होत्या आणि खाली उतरत होत्या. ॥११३॥
अग्निचूर्णमिवाविद्धं भास्वराम्बु महोरगम् ।
सुरारिनिलयं घोरं पातालविषयं सदा ॥ ११४ ॥

सागरं चाम्बरप्रख्यं अम्बरं सागरोपमम् ।
सागरं चाम्बरं चेति निर्विशेषं अदृश्यत ॥ ११५ ॥
समुद्राचे जलकण खूपच चमकत होते; त्यांना पाहून असे वाटत होते की जणु सागरात आगीच्या ठिणग्याच विखरून टाकल्या आहेत. (पसरलेल्या नक्षत्रांमुळे आकाश ही तसेच दिसत होते) समुद्रात मोठे मोठे सर्प होते (आकाशातही राहु आदि सर्पाकारच दिसत होते.) समुद्र देवद्रोही दैत्य आणि राक्षसांचे आवास-स्थान होता. (आकाशही तसेच होते कारण की तेथेही त्यांचे संचरण दिसून येत होते) दोन्हीही दिसण्यात भयंकर आणि पाताळाप्रमाणे गंभीर होती. याप्रकारे समुद्र आकाशाप्रमाणे आणि आकाश समुद्रासमान भासत होते. समुद्र आणि आकाशात काहीही अंतर दिसून येत नव्हते. ॥११४-११५॥
संपृक्तं नभसाप्यम्भः संपृक्तं च नभोऽम्भसा ।
तादृग् रूपे स्म दृश्येते तारारत्‍न॥समाकुले ॥ ११६ ॥
जल आकाशाला भिडले होते आणि आकाश जलाला भिडले होते. आकाशात तारे चमकत होते तर समुद्रात मोती; त्यामुळे दोन्ही एकसारखेच दिसत होते. ॥११६॥
समुत्पतितमेघस्य वीचिमालाकुलस्य च ।
विशेषो न द्वयोरासीत् सागरस्याम्बरस्य च ॥ ११७ ॥
आकाशांत मेघांचे समुदाय दाटून आले होते तर समुद्र तरंगमालांनी व्याप्त झाला होता. म्हणून समुद्र आणि आकाश दोन्हीमध्ये काही अंतरच राहिले नव्हते. ॥११७॥
अन्योन्यैरहताः सक्ताः सस्वनुर्भीमनिःस्वनाः ।
ऊर्मयः सिन्धुराजस्य महाभेर्य इवांबरे ॥ ११८ ॥
परस्परांशी भिडून आणि धडकून सिंधुराजाच्या लाटा, आकाशात वाजणार्‍या देवतांच्या मोठ मोठ्‍या भेरींच्या प्रमाणे भयानक शब्द करत होत्या. ॥११८॥
रत्‍नौनघजलसन्नादं विषक्तमिव वायुना ।
उत्पतन्तमिव क्रुद्धं यादोगणसमाकुलम् ॥ ११९ ॥
वायुने प्रेरित होऊन रत्‍नांना उडवणार्‍या जलाच्या तरंगांच्या नादाने युक्त आणि जलजंतुंनी भरलेला समुद्र अशा प्रकारे वर उसळत होता की जणु रोषाने भरलेला आहे. ॥११९॥
ददृशुस्ते महात्मानो वाताहतजलाशयम् ।
अनिलोद्धूतमाकाशे प्रवल्गन्तमिवोर्मिभिः ॥ १२० ॥
त्या महामनस्वी वानरवीरांनी पाहिले की समुद्र वायुच्या थपडा खाऊन पवनाच्या प्रेरणेने आकाशात उंच उसळून उत्ताल तरंगांच्या द्वारे जणु नृत्यच करत होता. ॥१२०॥
ततो विस्मयमापन्ना हरयो ददृशुः स्थिताः ।
भ्रान्तोर्मिजलसंनादं प्रलोलमिव सागरम् ॥ १२१ ॥
त्यानंतर तेथे उभे असलेल्या वानरांनी हेही पाहिले की चकरा मारणार्‍या तरंग-समूहांच्या कलकल नादाने युक्त महासागर जणु अत्यंत चंचल झाला आहे. हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. ॥१२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौथा सर्ग पूर्ण झाला. ॥४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP