[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । सप्तत्रिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सलक्ष्मणेन श्रीरामेण वल्कलवस्त्रस्य धारणं सीताया वल्कलधारणेनान्तःपुरस्त्रीणां खेदो गुरुणा वसिष्ठेन कैकेयां निर्भर्त्स्य सीताकर्तृकवल्कलधारणस्य विरोधश्च - श्रीराम आदिंचे वल्कल वस्त्र धारण, सीतेच्या वल्कल धारणाने राणीवशातील स्त्रियांना खेद तथा गुरू वसिष्ठांनी कैकेयीला फटकारून सीतेच्या वल्कल धारणाचे अनौचित्य दाखवून देणे -
महामात्रवचः श्रुत्वा रामो दशरथं तदा ।
अभ्यभाषत वाक्यं तु विनयज्ञो विनीतवत् ॥ १ ॥
प्रधान मंत्र्याचे पूर्वोक्त भाषण ऐकून विनयाचे ज्ञाता श्रीराम त्यावेळी राजा दशरथांना विनीत होऊन म्हणाले - ॥१॥
त्यक्तभोगस्य मे राजन् वने वन्येन जीवतः ।
किं कार्यमनुयात्रेण त्यक्तसङ्‌गस्य सर्वतः ॥ २ ॥
'राजन् ! मी भोगांचा परित्याग करून चुकलो आहे. मला जंगलातील फल-मूलांनी जीवन-निर्वाह करावयाचा आहे. जर मी सर्व प्रकारे आपली आसक्ती सोडली आहे तर मला सेनेशी काय प्रयोजन आहे ? ॥२॥
यो हि दत्त्वा द्विपश्रेष्ठं कक्ष्यायां कुरुते मनः ।
रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुञ्जरोत्तमम् ॥ ३ ॥
'जो श्रेष्ठ गजराजाचे दान करून त्याच्या मोठ्या दोरखंडात मन लावतो - लोभवश त्या दोरखंडाला ठेवून घेण्याची इच्छा करतो, तो चांगले करीत नाही. कारण की उत्तम हत्तीचा त्याग करणार्‍या पुरूषाला त्याच्या दोरखंडाची आसक्ती ठेवण्याची काय आवश्यकता आहे ? ॥३॥
तथा मम सतां श्रेष्ठ किं ध्वजिन्या जगत्पते ।
सर्वाण्येवानुजानामि चीराण्येवानयन्तु मे ॥ ४ ॥
'सत्पुरूषात श्रेष्ठ महाराज ! याप्रमाणे मला सेना घेऊन काय करायचे आहे ? मी या सार्‍या वस्तू भरताला अर्पित करण्यास अनुमती देत आहे. माझ्यासाठी तर (माता कैकेयीच्या दासी) चीर (चिंध्या किंवा वल्कल वस्त्र) आणून देवोत. ॥४॥
खनित्रपिटके चोभे समानयत गच्छत ।
चतुर्दश वने वासं वर्षाणि वसतो मम ॥ ५ ॥
'दासींनो ! जा , खोरे आणि पेटारा अथवा कुदळ आणि फावडे या दोन्ही वस्तु आणा. चौदा वर्षापर्यंत राहण्यासाठी या वस्तु उपयोगी येऊ शकतात. ॥५॥
अथ चीराणि कैकेयी स्वयमाहृत्य राघवम् ।
उवाच परिधत्स्वेति जनौघे निरपत्रपा ॥ ६ ॥
कैकेयीने तर लाज, संकोच सर्व सोडून दिले होते. ती स्वतःच जाऊन बरीचशी वल्कले घेऊन आली आणि जनसमुदायात राघवास म्हणाली - घ्या, नेसा.' ॥६॥
स चीरे पुरुषव्याघ्रः कैकेय्याः प्रतिगृह्य ते ।
सूक्ष्मवस्त्रमवक्षिप्य मुनिवस्त्राण्यवस्त ह ॥ ७ ॥
पुरूषसिंह रामांनी कैकेयीच्या हातांतून दोन (चीर) वल्कले घेतली आणि आपले तलम वस्त्र उतरवून मुनिंसारखी वस्त्रे धारण केली. ॥७॥
लक्ष्मणश्चापि तत्रैव विहाय वसने शुभे ।
तापसाच्छादने चैव जग्राह पितुरग्रतः ॥ ८ ॥
याच प्रमाणे लक्ष्मणानेही आपल्या पित्याच्या देखतच दोन्ही सुंदर वस्त्रे उतरवून तपस्व्यांसारखी वल्कल-वस्त्रे धारण केली. ॥८॥
अथात्मपरिधानार्थं सीता कौशेयवासिनी ।
सम्प्रेक्ष्य चीरं सन्त्रस्ता पृषती वागुरामिव ॥ ९ ॥

सा व्यपत्रपमाणेव प्रगृह्य च सुदुर्मनाः ।
कैकेय्याः कुशचीरे ते जानकी शुभलक्षणा ॥ १० ॥

अश्रुसम्पूर्णनेत्रा च धर्मज्ञा धर्मदर्शिनी ।
गन्धर्वराजप्रतिमं भर्तारमिदमब्रवीत् ॥ ११ ॥

कथं नु चीरं बध्नन्ति मुनयो वनवासिनः ।
इति ह्यकुशला सीता सा मुमोह मुहुर्मुहुः ॥ १२ ॥
त्यानंतर रेशमी वस्त्र नेसण्यावर आणि धर्मावर दृष्टी ठेवणारी धर्मज्ञा शुभलक्षणा सीता आपणासाठीही चीर वस्त्र प्रस्तुत केले गेलेले पाहून, मृगी जशी पसरलेले जाळे पाहून भयभीत होऊन जाते त्याप्रमाणे घाबरून गेली. कैकेयीच्या हातातून दोन वल्कल-वस्त्रे घेऊन ती लज्जित झाली. तिच्या मनाला फार दुःख झाले आणि डोळ्यातून अश्रु दाटले. त्या समयी तिने गंधर्व राजासमान तेजस्वी पतिला याप्रकारे विचारले - 'नाथ ! वनवासी मुनिलोक चीर कसे बांधतात ? असे म्हणून ते धारण करण्यात कुशल नसल्यामुळे सीता वारंवार चिंतेत पडू लागली- चूक करू लागली.' ॥९-१२॥
कृत्वा कण्ठे स्म सा चीरमेकमादाय पाणिना ।
तस्थौ ह्यकुशला तत्र व्रीडिता जनकात्मजा ॥ १३ ॥
चीर धारणात कुशल नसल्याने जनकात्मजा सीता लज्जित होऊनच एक वल्कल गळ्यात घालून आणि दुसरे हातात घेऊन चुपचाप उभी राहिली. ॥१३॥
तस्यास्तत् क्षिप्रमागत्य रामो धर्मभृतां वरः ।
चीरं बबन्ध सीतायाः कौशेयस्योपरि स्वयम् ॥ १४ ॥
तेव्हा धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ श्रीराम त्वरेने तिच्या जवळ आले आणि स्वयं आपल्या हाताने तिच्या रेशमी वस्त्रावर वल्कल-वस्त्र बांधू लागले. ॥१४॥
रामं प्रेक्ष्य तु सीताया बध्नन्तं चीरमुत्तमम् ।
अंतःपुरचरा नार्यो मुमुचुर्वारि नेत्रजम् ॥ १५ ॥
सीतेला उत्तम चीरवस्त्र नेसविणार्‍या रामाकडे पाहून राणीवशातील स्त्रिया आपल्या नेत्रातून अश्रु ढाळू लागल्या. ॥१५॥
ऊचुश्च परमायत्ता रामं ज्वलिततेजसम् ।
वत्स नैवं नियुक्तेयं वनवासे मनस्विनी ॥ १६ ॥
त्या सर्व अत्यंत खिन्न होऊन उद्दीप्त असणार्‍या रामास म्हणू लागल्या- 'वत्स ! मनस्विनी सीतेला याप्रकारे वनवासाची आज्ञा दिली गेलेली नाही.' ॥१६॥
पितुर्वाक्यानुरोधेन गतस्य विजनं वनम् ।
तावद् दर्शनमस्यां नः सफलं भवतु प्रभो ॥ १७ ॥
'प्रभो ! तुम्ही पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी जोपर्यंत निर्जन वनात जाऊन रहाल, तोपर्यंत हिला पाहून आमचे जीवन सफल होऊ दे. ॥१७॥
लक्ष्मणेन सहायेन वनं गच्छस्व पुत्रक ।
नेयमर्हति कल्याणी वस्तुं तापसवद् वने ॥ १८ ॥
'मुला ! तू लक्ष्मणाला आपला सांगाती बनवून त्याच्यासह वनात जा परंतु ही कल्याणी सीता तपस्वी मुनी प्रमाणे वनात निवास करण्यास योग्य नाही. ॥१८॥
कुरु नो याचनां पुत्र सीता तिष्ठतु भामिनी ।
धर्मनित्यः स्वयं स्थातुं न हीदानीं त्वमिच्छसि ॥ १९ ॥
'पुत्रा ! तू आमची याचना सफल कर. भामिनी सीता येथेच राहावी. तू तर नित्य धर्मपरायण आहेस म्हणून स्वतः या समयी येथे राहू इच्छित नाहीस. (परंतु सीतेला तर राहू दे.) ॥१९॥
तासामेवंविधा वाचः शृण्वन् दशरथात्मजः ।
बबन्धैव तदा चीरं सीतया तुल्यशीलया ॥ २० ॥

चीरे गृहीते तु तया सबाष्पो नृपतेर्गुरुः ।
निवार्य सीतां कैकेयीं वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ॥ २१ ॥
मातांचे असे म्हणणे ऐकत असतांना दशरथनंदन रामांनी सीतेला वल्कल-वस्त्र नेसवलेही. पतिच्या समान शीलस्वभाव असणार्‍या सीतेने वल्कल-वस्त्र धारण केल्यावर राजाचे गुरु वसिष्ठ यांच्या नेत्रातही अश्रु आले. त्यांनी सीतेला अडवून कैकेयीला म्हटले- ॥२०-२१॥
अतिप्रवृत्ते दुर्मेधे कैकेयि कुलपांसनि ।
वञ्चयित्वा च राजानं न प्रमाणेऽवतिष्ठसि ॥ २२ ॥
'मर्यादेचे उल्लंघन करून अधर्माकडे पाऊल वळविणार्‍या दुर्बुद्धि कैकेयी ! तू केकय राजाच्या कुळाचा साक्षात कलंक आहेस. अग ! राजाला धोका देऊन आता तू मर्यादेतही राहू इच्छित नाहीस ? ॥२२॥
न गन्तव्यं वनं देव्या सीतया शीलवर्जिते ।
अनुष्ठास्यति रामस्य सीता प्रकृतमासनम् ॥ २३ ॥
'शीलाचा परित्याग करणार्‍या दुष्टे ! देवी सीता वनात जाणार नाही. रामासाठी प्रस्तुत सिंहासनावर तीच बसेल. ॥२३॥
आत्मा हि दाराः सर्वेषां दारसङ्‌ग्रहवर्तिनाम् ।
आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनीम् ॥ २४ ॥
संपूर्ण गृहस्थांच्या पत्‍नी त्याचे अर्धे अंग असतात. या प्रकारे सीता ही पण रामाचा आत्मा आहे; म्हणून त्यांच्या जागी हीच आता या राज्याचे पालन करील. ॥२४॥
अथ यास्यति वैदेही वनं रामेण सङ्‌गता ।
वयमत्रानुयास्यामः पुरं चेदं गमिष्यति ॥ २५ ॥

अन्तपालाश्च यास्यन्ति सदारो यत्र राघवः ।
सहोपजीव्यं राष्ट्रं च पुरं च सपरिच्छदम् ॥ २६ ॥
जर वैदेही सीता श्रीरामाबरोबर वनात जाईल तर आम्ही लोकही हिच्या बरोबर निघून जाऊ. हे सर्व नगरही निघून जाईल आणि अंतःपुरातील रक्षकही निघून जातील. आपल्या पत्‍नीसह राघव जेथे निवास करतील तेथे हे राज्य आणि नगरातील लोकही धन-दौलत आणि आवश्यक सामान घेऊन निघून जातील. ॥२५-२६॥
भरतश्च सशत्रुघ्नश्चीरवासा वनेचरः ।
वने वसन्तं काकुत्स्थमनुवत्स्यति पूर्वजम् ॥ २७ ॥
'भरत आणि शत्रुघ्नही चीरवस्त्र धारण करून वनात राहतील आणि तेथे निवास करणार्‍या आपल्या मोठ्या भावाची, काकुत्स्थ रामाची सेवा करतील. ॥२७॥
ततः शून्यां गतजनां वसुधां पादपैः सह ।
त्वमेका शाधि दुर्वृत्ता प्रजानामहिते स्थिता ॥ २८ ॥
नंतर तू वृक्षांच्या सह एकटी राहून या निर्जन आणि शून्य पृथ्वीचे राज्य कर. तू अत्यंत दुराचारिणी आहेस आणि प्रजेचे अहित करण्यास तत्पर झाली आहेस. ॥२८॥
न हि तद् भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।
तद् वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥ २९ ॥
'याद राख, राम जेथे राजा होणार नाहीत ते राज्य राज्य राहाणार नाही - जंगल बनून जाईल आणि राम जेथे निवास करतील ते वनही एक स्वतंत्र राष्ट्र बनून जाईल. ॥२९॥
न ह्यदत्तां महीं पित्रा भरतः शास्तुमर्हति ।
त्वयि वा पुत्रवद् वस्तुं यदि जातो महीपतेः ॥ ३० ॥
'जर भरत राजा दशरथांपासून उत्पन्न झालेले असतील तर ते पित्याने प्रसन्नतापूर्वक दिल्याखेरीज राज्य स्वीकारू इच्छिणार नाहीत, तसेच तुझ्याशी पुत्रवत व्यवहार करण्यासाठीही येथे बसून राहाण्याची इच्छा करणार नाहीत. ॥३०॥
यद्यपि त्वं क्षितितलाद् गगनं चोत्पतिष्यसि ।
पितृवंशचरित्रज्ञः सोऽन्यथा न करिष्यति ॥ ३१ ॥
'तू पृथ्वी सोडून आकाशात उडून गेलीस तरीही आपल्या पितृकुलाच्या आचार व्यवहाराला जाणणारे भरत त्याविरूद्ध काहीही करणार नाहीत. ॥३१॥
तत् त्वया पुत्रगर्धिन्या पुत्रस्य कृतमप्रियम् ।
लोके नहि स विद्येत यो न राममनुव्रतः ॥ ३२ ॥
'तू पुत्राचे प्रिय करण्याच्या इच्छेने वास्तविक त्याचे अप्रियच केले आहेस, कारण संसारात असा एकही पुरूष नाही की जो रामाचा भक्त नाही. ॥३२॥
द्रक्ष्यस्यद्यैव कैकेयि पशुव्यालमृगद्विजान् ।
गच्छतः सह रामेण पादपांश्च तदुन्मुखान् ॥ ३३ ॥
'कैकेयी ! तू आजच पहाशील कि रामांना वनात जातांना पाहून पशु, सर्प, मृग आणि पक्षीही त्यांचे बरोबर जात आहेत. दुसर्‍यांची तर गोष्टच कशाला, वृक्षही त्यांच्या बरोबर जाण्यास उत्सुक आहेत. ॥३३॥
अथोत्तमान्याभरणानि देवि
     देहि स्नुषायै व्यपनीय चीरम् ।
न चीरमस्याः प्रविधीयतेति
     न्यवारयत् तद् वसनं वसिष्ठः ॥ ३४ ॥
तू तिला परिधान करण्याकरिता उत्तमोत्तम वस्त्रे आणि आभूषण दे. तिच्यासाठी वल्कल वस्त्र देणे कदापि उचित नाही. असे म्हणून वसिष्ठांनी तिला जानकीला वल्कल वस्त्रे नेसविण्यापासून परावृत्त केले. ॥३४॥
एकस्य रामस्य वने निवास-
     स्त्वया वृतः केकयराजपुत्रि ।
विभूषितेयं प्रतिकर्मनित्या
     वसत्वरण्ये सह राघवेण ॥ ३५ ॥
ते परत म्हणाले- 'केकयराजकुमारी ! तू एकट्या रामांसाठीच वनवासाचा वर मागितला आहेस. (सीतेसाठी नाही.) म्हणून ही राजकुमारी वस्त्राभूषणांनी विभूषित होऊन सदा शृंगार धारण करून वनात राघवासह निवास करील. ॥३५॥
यानैश्च मुख्यैः परिचारकैश्च
     सुसंवृता गच्छतु राजपुत्री ।
वस्त्रैश्च सर्वैः सहितैर्विधानै-
     र्नेयं वृता ते वरसम्प्रदाने ॥ ३६ ॥
राजकुमारी सीता मुख्य मुख्य सेवक तथा वाहनांसह सर्व प्रकारच्या वस्त्रांनी आणि आवश्यक उपकरणांनी संपन्न होऊन वनाची यात्रा करेल. तू वर मागतांना प्रथम सीतेच्या वनवासाची काहीही चर्चा केली नव्हतीस, म्हणून तिला वल्कल वस्त्रे नेसविली जाऊ शकत नाहीत. ॥३६॥
तस्मिंस्तथा जल्पति विप्रमुख्ये
     गुरौ नृपस्याप्रतिमप्रभावे ।
नैव स्म सीता विनिवृत्तभावा
     प्रियस्य भर्तुः प्रतिकारकामा ॥ ३७ ॥
ब्राह्मणशिरोमणी अप्रतिम प्रभावशाली राजगुरु महर्षि वसिष्ठांनी असे म्हटलावरही सीता आपल्या प्रियतम पतिच्या समानच वेशभूषा धारण करण्याची इच्छा ठेवून त्या चीर-धारणापासून विरत झाली नाही. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सदतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP