[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुर्विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विलपन्त्या कौसल्याया आत्मानमपि वनं नेतुं श्रीरामं प्रत्याग्रहः, पत्युः सेवैव नारीणां धर्म इति प्रतिपाद्य श्रीरामेण तस्या निवारणं स्वकीयवनगमने तस्या अनुमतिग्रहणं च - विलाप करणार्‍या कौसल्येने श्रीरामाला आपल्याला बरोबर घेऊन चलण्यासाठी आग्रह करणे तथा पतिची सेवाच नारीचा धर्म आहे हे सांगून श्रीरामांनी तिला रोखणे आणि वनात जाण्यासाठी तिची अनुमति प्राप्त करणे -
तं समीक्ष्य व्यवसितं पितुर्निर्देशपालने ।
कौसल्या बाष्पसंरुद्धा वचो धर्मिष्ठमब्रवीत् ॥ १ ॥
कौसल्येने जेव्हा पाहिले की रामांनी आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचाच दृढ निश्चय केला आहे, तेव्हा ती अश्रूंनी रूद्ध झालेल्या गदगद वाणीने धर्मात्मा रामाला याप्रकारे म्हणाली - ॥१॥
अदृष्टदुःखो धर्मात्मा सर्वभूतप्रियंवदः ।
मयि जातो दशरथात् कथमुञ्छेन वर्तयेत् ॥ २ ॥
'हाय ! ज्याने जीवनात कधी दुःख पाहिलेले नाही, जो समस्त प्राण्यांशी सदा प्रिय वचन बोलतो, ज्याचा जन्म महाराज दशरथांपासून माझ्या द्वारे झाला आहे, तो माझा धर्मात्मा पुत्र उञ्छवृत्तिने - शेतात पडलेले धान्याचे एकेक दाण्यास गोळा करून -कसा जीवन निर्वाह करू शकेल ? ॥२॥
यस्य भृत्याश्च दासाश्च मृष्टान्यन्नानि भुञ्जते ।
कथं स भोक्ष्यते रामो वने मूलफलान्ययम् ॥ ३ ॥
ज्याचे भृत्य आणि दासही स्वादिष्ट अन्न खातात, तेच राम वनात फल- मूलाचा आहार कसा करतील ? ॥३॥
क एतच्छ्रद्दधेच्छ्रुत्वा कस्य वा न भेवद् भयम् ।
गुणवान् दयितो राज्ञः काकुत्स्थो यद् विवास्यते ॥ ४ ॥
जो सदगुणसंपन्न आणि महाराज दशरथांना प्रिय आहे त्या काकुत्स्थ रामाला जो वनवास दिला जात आहे, तो ऐकून कोण यावर विश्वास करेल ? अथवा अशी वार्ता ऐकून कुणाला भय वाटणार नाही ? ॥४॥
नूनं तु बलवाँल्लोके कृतान्तः सर्वमादिशन् ।
लोके रामाभिरामस्त्वं वनं यत्र गमिष्यसि ॥ ५ ॥
'श्रीरामा ! निश्चितच या जगात दैव सर्वात बलवान आहे. त्याची आज्ञा सर्वांवर चालते. तेच सर्वांना सुख-दुखांशी संयुक्त करते. कारण की त्याच्या प्रभावाने तुमच्या सारखा लोकप्रिय मनुष्यही वनात जाण्यास उद्यत झाला आहे.' ॥५॥
अयं तु मामात्मभवस्तवादर्शनमारुतः ।
विलापदुःखसमिधो रुदिताश्रुहुताहुतिः ॥ ६ ॥

चिन्ताबाष्पमहाधूमस्तवादर्शनचिन्तजः ।
कर्शयित्वाधिकं पुत्र निःश्वासायाससम्भवः ॥ ७ ॥

त्वया विहीनामिह मां शोकाग्निरतुलो महान् ।
प्रधक्ष्यति यथा कक्ष्यं चित्रभानुर्हिमात्यये ॥ ८ ॥
'परंतु मुला ! तुझा वियोग झाल्यावर येथे मला शोकाची अनुपम आणि अत्यंत वाढलेली आग, ग्रीष्म ऋतूत (सुकलेल्या) वाळलेल्या लाकडांना आणि गवताला वगैरे दावानल ज्याप्रमाणे जाळून टाकतो, त्याप्रमाणे मला जाळून भस्म करून टाकेल. शोकाचीही आग माझ्या स्वतःच्याच मनात प्रकट झालेली आहे. तुला न पाहू शकण्याची संभावनाच वायु बनून य अग्नीला उद्दीप्त करत आहे. विलापजनित दुःखही यात इंधनाचे काम करीत आहे. रडण्याने जो अश्रुपात होत आहे तोच जणु यात दिलेली तुपाची आहुति आहे. चिन्तेमुळे जो उष्ण उष्ण उच्छवास चालू झाला आहे तो हिचा महान धूर आहे. तू दूर देशात जाऊन कशा प्रकारे परत येशील - या प्रकारची चिंताच या शोकाग्निला जन्म देत आहे. श्वास घेण्याचा जो प्रयत्‍न आहे त्यायोगे या आगीची प्रतिक्षण वृद्धि होत आहे. तूच हिला विझविण्याचे जल आहेस. तुझ्याशिवाय ही आग मला अधिकच सुकवून जाळून टाकील. ॥६-८॥
कथं हि धेनुः स्वं वत्सं गच्छन्तमनुगच्छति ।
अहं त्वानुगमिष्यामि पुत्र यत्र गमिष्यसि ॥ ९ ॥
'वत्सा ! धेनु आपल्या पुढे जाणार्‍या आपल्या वासराच्या पाठोपाठ कशी निघून जाते, त्या प्रकारेच मीही तू जेथे कोठे जाशील, तेथे तुझ्या पाठोपाठ चालू लागेन." ॥९॥
यथा निगदितं मात्रा तद् वाक्यं पुरुषर्षभः ।
श्रुत्वा रामोऽब्रवीद् वाक्यं मातरं भृशदुःखिताम् ॥ १० ॥
माता कौसल्याने जसे जे काही सांगितले, ते वचन ऐकून पुरुषोत्तम रामाने अत्यंत दुःखात बुडालेल्या आपल्या मातेला पुन्हा या प्रकारे म्हटले- ॥१०॥
कैकेय्या वञ्चितो राजा मयि चारण्यमाश्रिते ।
भवत्या च परित्यक्तो न नूनं वर्तयिष्यति ॥ ११ ॥
'माते ! कैकेयीने राजाला धोका दिला आहे. इकडे मी वनात निघून जात आहे. या दशेत (स्थितिमध्ये) तूही त्यांचा परित्याग केलास तर निश्चितच ते जीवित राहू शकणार नाहीत. ॥११॥
भर्तुः किल परित्यागो नृशंसः केवलं स्त्रियाः ।
स भवत्या न कर्तव्यो मनसापि विगर्हितः ॥ १२ ॥
पतिचा परित्याग नारीसाठी फारच क्रूरतापूर्ण कर्म आहे. सत्पुरुषांनी याची अत्यंत निन्दा केली आहे; म्हणून तू तरी अशी गोष्ट कधी मनातही आणता कामा नये. ॥१२॥
यावज्जीवति काकुत्स्थः पिता मे जगतीपतिः ।
शुश्रूषा क्रियतां तावत् स हि धर्मः सनातनः ॥ १३ ॥
'माझे पिता काकुस्थ- कुलभूषण महाराज दशरथ जो पर्यत जीवित आहेत, तो पर्यंत तू त्यांचीच सेवा कर . पतिची सेवा हाच स्त्री साठी सनातन धर्म आहे.' ॥१३॥
एवमुक्ता तु रामेण कौसल्या शुभदर्शना ।
तथेत्युवाच सुप्रीता राममक्लिष्टकारिणम् ॥ १४ ॥
रामांनी असे म्हटल्यावर शुभ कर्मांवर दृष्टी ठेवणारी देवी कौसल्या हिने अत्यंत प्रसन्न होऊन असायासच महान कर्म करणार्‍या श्रीरामांना म्हटले- 'ठीक आहे, मुला ! मी असेच करीन.' ॥१४॥
एवमुक्तस्तु वचनं रामो धर्मभृतां वरः ।
भूयस्तामब्रवीद् वाक्यं मातरं भृशदुःखिताम् ॥ १५ ॥
मातेने याप्रकारे स्वीकृति सूचक वचन बोलल्यावर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ रामांनी अत्यंत दुःखात पडलेल्या आपल्या मातेला पुन्हा याप्रकारे म्हटले- ॥१५॥
मया चैव भवत्या च कर्तव्यं वचनं पितुः ।
राजा भर्त्ता गुरुः श्रेष्ठः सर्वेषामीश्वरः प्रभुः ॥ १६ ॥
'माते ! पित्याच्या आज्ञेचे पालन करणे माझे आणि तुझे - दोघांचे कर्तव्य आहे; कारण राजे आपले स्वामी, श्रेष्ठ गुरू, ईश्वर आणि प्रभु आहेत. ॥१६॥
इमानि तु महारण्ये विहृत्य नव पञ्च च ।
वर्षाणि परमप्रीत्या स्थास्यामि वचने तव ॥ १७ ॥
'या चौदा वर्षा पर्यंत मी विशाल वनात हिंडून- फिरून परत येईन आणि मोठ्या प्रेमाने तुझ्या आज्ञेचे पालन करीत राहीन." ॥१७॥
एवमुक्ता प्रियं पुत्रं बाष्पपूर्णानना तदा ।
उवाच परमार्ता तु कौसल्या सुतवत्सला ॥ १८ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर पुत्रवत्सला कौसल्येच्या मुखावरून पुन्हा अश्रूंची धार वाहू लागली. ती त्या समयी अत्यंत आर्त होऊन आपल्या प्रिय पुत्रास म्हणाली - ॥१८॥
आसां राम सपत्‍नीनां वस्तुं मध्ये न मे क्षमम् ।
नय मामपि काकुत्स्थ वनं वन्यां मृगीमिव ॥ १९ ॥

यदि ते गमने बुद्धिः कृता पितुरपेक्षया ।
'पुत्रा रामा ! आता माझ्याने या सवतींच्या मध्ये राहणे जमणार नाही. काकुत्स्थ ! जरी पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याच्या इच्छेने तू वनात जाण्याचाच निश्चय केला आहेस तर मलाही वनवासी हरिणी प्रमाणे वनातच घेऊन चला. ॥१९ १/२॥
तां तथा रुदतीं रामो रुदन् वचनमब्रवीत् ॥ २० ॥

जीवंत्या हि स्त्रिया भर्ता दैवतं प्रभुरेव च ।
भवत्या मम चैवाद्य राजा प्रभवति प्रभुः ॥ २१ ॥
असे म्हणून माता कौसल्या रडू लागली. तिला अशा प्रकारे रडतांना पाहून रामही रडू लागले आणि तिला सान्त्वना देत म्हणाले- 'माते ! स्त्रीच्या जीवात जीव असे पर्यंत तिचा पतीच तिच्यासाठी देवता आणि ईश्वरासमान आहे. महाराज तुझे आणि माझे, दोघांचे प्रभु आहेत. ॥२०-२१॥
न ह्यनाथा वयं राज्ञा लोकनाथेन धीमता ।
भरतश्चापि धर्मात्मा सर्वभूतप्रियंवदः ॥ २२ ॥

भवतीमनुवर्तेत स हि धर्मरतः सदा ।
जोपर्यंत बुद्धिमान जगदीश्वर (लोकनाथ) जीवित आहेत तो पर्यंत आपण आपल्याला अनाथ समजता उपयोगी नाही. भरतही फार धर्मात्मा आहे. ते समस्त प्राण्यांच्या प्रति प्रिय वचन बोलणारे आणि सदाच धर्मात तत्पर राहाणारे आहेत म्हणून ते तुझे अनुसरण- तुझी सेवा करतील. ॥२२ १/२॥
यथा मयि तु निष्क्रान्ते पुत्रशोकेन पार्थिवः ॥ २३ ॥

श्रमं नावाप्नुयात् किंचिदप्रमत्ता तथा कुरु ।
'मी निघून गेल्यावर ज्या प्रकारांनी महाराजांना पुत्रशोकाच्या कारणाने कुठलेही विशेष कष्ट न होतील यासाठी तू सावधपणे तसाच प्रयत्‍न कर. ॥२३ १/२॥
दारुणश्चाप्ययं शोको यथैनं न विनाशयेत् ॥ २४ ॥

राज्ञो वृद्धस्य सततं हितं चर समाहिता ।
असे न व्हावे की ह्या दारूण शोकामुळे त्यांची जीवनलीलाच समाप्त होईल. जसे संभव असेल तसे तू सदा सावधान राहून वृद्ध महाराजांच्या हितसाधनांत तत्पर रहा. ॥२४ १/२॥
व्रतोपवासनिरता या नारी परमोत्तमा ॥ २५ ॥

भर्तारं नानुवर्तेत सा च पापगतिर्भवेत् ।
'उत्कृष्ट गुण आणि जाति आदिंच्या दृष्टीने परम उत्तम तथा व्रत-उपवासात तत्पर असूनही जी नारी पतिची सेवा करत नाही, तिला पाप्यांना मिळणार्‍या गति ( नरक आदि) ची प्राप्ती होते. ॥२५ १/२॥
भर्तृशुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् ॥। २६ ॥
'जी अन्यान्य देवतांची वंदना आणि पूजा आदिपासून दूर राहाते, ती नारीही केवळ पतिच्या सेवेनेच स्वर्गलोकाची प्राप्ती करून घेते. ॥२६॥
अपि या निर्नमस्कारा निवृत्ता देवपूजनात् ।
शुश्रूषामेव कुर्वीत भर्तुः प्रियहिते रता ॥ २७ ॥

एष धर्मः स्त्रिया नित्यो वेदे लोके श्रुतः स्मृतः ।
'म्हणून स्त्रीला आवश्यक आहे की तिने पतीचे प्रिय तसेच हितसाधनात तत्पर राहून सदा पतीची सेवाच करीत राहावी. हाच स्त्रीचा वेद आणि लोकात प्रसिद्ध नित्य सनातन धर्म आहे. याचेच वर्णन श्रुति आणि स्मृति यामध्येही केले आहे. ॥२७ १/२॥
अग्निकार्येषु च सदा सुमनोभिश्च देवताः ॥ २८ ॥

पूज्यास्ते मत्कृते देवि ब्राह्मणाश्चैव सत्कृताः ।
'देवि ! तुला माझ्या मंगलकामनेने सदा अग्निहोत्राच्या अवसरावर पुष्पांनी देवतांचे तथा सत्कारपूर्वक ब्राह्मणांचेही पूजन करीत राहिले पाहिजे. ॥२८ १/२॥
एवं कालं प्रतीक्षस्व ममागमनकाङ्‌क्षिणी ॥ २९ ॥

नियता नियताहारा भर्तृशुश्रूषणे रता ।
'यप्रकारे तू नियमित आहार करून नियमांचे पालन करीत स्वामीच्या सेवेत तत्पर राहा आणि माझ्या आगमनाची इच्छा ठेवून समयाची प्रतिक्षा कर. ॥२९ १/२॥
प्राप्स्यसे परमं कामं मयि पर्यागते सति ॥ ३० ॥

यदि धर्मभृतां श्रेष्ठो धारयिष्यति जीवितम् ।
'जर धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ महाराज जीवित राहतील तर मी परत आल्यावर तुझी ही शुभ कामना पूर्ण होईल.' ॥३० १/२॥
एवमुक्ता तु रामेण बाष्पपर्याकुलेक्षणा ॥ ३१ ॥

कौसल्या पुत्रशोकार्ता रामं वचनमब्रवीत् ।
श्रीरामांनी असे म्हटल्यावर कौसल्येच्या नेत्रांतून अश्रु दाटून आले. पुत्रशोकाने पीडित होऊन ती श्रीरामचंद्रांना म्हणाली - ॥३१ १/२॥
गमने सुकृतां बुद्धिं न ते शक्नोमि पुत्रक ॥ ३२ ॥

विनिवर्तयितुं वीर नूनं कालो दुरत्ययः ।
'पुत्रा ! मी तुझ्या वनात जाण्याच्या निश्चित विचारास बदलू शकत नाही. वीर ! निश्चितच कालाच्या आज्ञेचे उल्लंघन करणे अत्यंत कठीण आहे. ॥३२ १/२॥
गच्छ पुत्र त्वमेकाग्रो भद्रं तेऽस्तु सदा विभो ॥ ३३ ॥

पुनस्त्वयि निवृत्ते तु भविष्यामि गतक्लमा ।
'सामर्थ्यशाली पुत्रा ! आता तू निश्चिन्त होऊन वनात जा. तुझे सदा कल्याण होवो. जेव्हां तु वनातून परत येशील त्यावेळी माझे सर्व क्लेश- सर्व संताप दूर होतील. ॥३३ १/२॥
प्रत्यागते महाभागे कृतार्थे चरितव्रते ।
पितुरानृण्यतां प्राप्ते स्वपिष्ये परमं सुखम् ॥ ३४ ॥
मुला ! ज्यावेळी तू वनवासाचे महान व्रत पूर्ण करून कृतार्थ एवं महान सौभाग्यशाली होऊन परत येशील आणि असे करून पित्याच्या ऋणांतून उऋण (मुक्त) होऊन जाशील तेव्हाच मी उत्तम सुखाची निद्रा घेऊ शकेन. ॥३४॥
कृतान्तस्य गतिः पुत्र दुर्विभाव्या सदा भुवि ।
यस्त्वां संचोदयति मे वच आविध्य राघव ॥ ३५ ॥
'मुला, राघवा ! या भूतलावर दैवाची गति समजणे फारच कठीण आहे. जी माझे वचन मोडून तुला वनात जाण्यासाठी प्रेरित करीत आहे. ॥३५॥
गच्छेदानीं महाबाहो क्षेमेण पुनरागतः ।
नन्दयिष्यसि मां पुत्र साम्ना श्लक्ष्णेन चारुणा ॥ ३६ ॥
'पुत्रा ! महाबाहो या समयी जा, नंतर कुशलपूर्वक परत येऊन सान्त्वनापूर्ण मधुर आणि मनोहर वचनांनी मला आनंदित कर. ॥३६॥
अपीदानीं स कालः स्यात् वनात् प्रत्यागतं पुनः ।
यत्त्वां पुत्रक पश्येयं जटावल्कलधारिणम् ॥ ३७ ॥
'वत्स ! काय तो समय आता येऊ शकेल की जेव्हा जटा-वत्कले धारण केलेल्या वनातून परत आलेल्या तुला मी परत पाहू शकेन ?' ॥३७॥
तथा हि रामं वनवासनिश्चितं
     समीक्ष्य देवी परमेण चेतसा ।
उवाच रामं शुभलक्षणं वचो
     बभूव च स्वस्त्ययनाभिकाङ्‌क्षिणी ॥ ३८ ॥
देवी कौसल्येने जेव्हा पाहिले की या प्रकारे राम वनवासाचा दढ निश्चिय करून चुकला आहे तेव्हा ती आदरयुक्त ह्र्दयाने त्याला शुभसूचक आशिर्वाद देण्याची आणि त्यांचे साठी स्वस्तिवाचन करविणेची इच्छा करू लागली. ॥३८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चौविसावा सर्ग पूरा झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP