श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुश्चत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रात्रौ वानराणां रक्षसां च घोरं युद्धं, अङ्‌गदेन इंद्रजित् पराजयो मायातो अदृष्यमानेन इंद्रजिता श्रीरामलक्ष्मणयोः नागपाशैर्बंधनम् - रात्री वानर आणि राक्षसांचे घोर युद्ध, अंगद द्वारा इंद्रजिताचा पराजय, मायेने अदृश्य झालेल्या इंद्रजिताने मायामय बाणांच्या द्वारा श्रीराम आणि लक्ष्मणास बांधणे -
युध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् ।
रविरस्तं गतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥ १ ॥
याप्रकारे त्या वानर आणि राक्षसांमध्ये युद्ध चालूच होते की सूर्याचा अस्त झाला आणि प्राणांचा संहार करणार्‍या रात्रीचे आगमन झाले. ॥१॥
अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् ।
संप्रम्प्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥ २ ॥
वानरे आणि राक्षसात परस्पर वैर बांधले गेले होते. दोन्ही पक्षांचे योद्धे फार भयंकर होते तसेच आपापल्या विजयाची इच्छा करत होते, म्हणून त्या समयी त्यांच्यात रात्रियुद्ध होऊ लागले. ॥२॥
राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः ।
अन्योन्यं समरे जघ्नुः तस्मिंस्तमसि दारुणे ॥ ३ ॥
त्या दारुण अंध:कारात वानरलोक आपल्या विपक्षीला विचारत होते काय तू राक्षस आहेस ? आणि राक्षसलोकही विचारत होते काय तू वानर आहेस ? याप्रमाणे विचारून विचारून समरांगणात ते एकमेक दुसर्‍यांवर प्रहार करत होते. ॥३॥
जहि दारय चैहीति कथं विद्रवसीति च ।
एवं सुतुमुलः शब्दः तस्मिंस्तमसि शुश्रुवे ॥ ४ ॥
सेनेमध्ये सर्वत्र मारा, कापा, ये तर खरा, पळून का जात आहेस ? हे भयंकर शब्द ऐकू येत होते. ॥४॥
कालाः काञ्चनसन्नाहाः तस्मिंस्तमसि राक्षसाः ।
संप्रदृश्यन्त शैलेन्द्रा दीप्तौषधिवना इव ॥ ५ ॥
काळे काळे राक्षस सुवर्णमय कवचांनी विभूषित होऊन त्या अंध:कारात जणु चमकणार्‍या औषधींच्या वनानी युक्त पर्वताप्रमाणे दिसत होते. ॥५॥
तस्मिंस्तमसि दुष्पारे राक्षसाः क्रोधमूर्च्छिताः ।
परिपेतुर्महावेगा भक्षयन्तः प्लवंगमान् ॥ ६ ॥
त्या अंध:कारातून पार जाणे कठीण होऊन राहिले होते. त्यात क्रोधामुळे अधीर झालेले महान्‌ वेगवान्‌ राक्षस वानरांना खात त्यांच्यावर सर्व बाजूनी तुटून पडले. ॥६॥
ते हयान् काञ्चनापीडान् ध्वजांश्चाशीविषोपमान् ।
आप्लुत्य दशनैस्तीक्ष्णैः भीमकोपा व्यदारयन् ॥ ७ ॥
तेव्हा वानरांच्या क्रोधाने फारच भयानक रूप धारण केले. ते उड्‍या मारमारून आपल्या तीक्ष्ण दातांच्या द्वारे सोनेरी साजाने सजलेल्या राक्षस दलाच्या घोड्‍यांना आणि विषधर सर्पासमान दिसणार्‍या त्यांच्या ध्वजांनाही विदीर्ण करून टाकत होते. ॥७॥
वानरा बलिनो युद्धे क्षोभयन् राक्षसीं चमूम् ।
कुञ्जरान् कुञ्जरारोहान् पताकाध्वजिनो रथान् ॥ ८ ॥

चकर्षुश्च ददंशुश्च दशनैः क्रोधमूर्च्छिताः ।
बलवान्‌ वानरांनी युद्धात राक्षस सेनेमध्ये खळबळ उडवून दिली. ते सर्वच्या सर्व क्रोधाने बेभान होत होते, म्हणून हत्ती आणि हत्तीवरील स्वारांना तसेच ध्वजा-पताकांनी सुशोभित रथांनाही खेचू लागले आणि दातांनी चावून चावून क्षत-विक्षत करू लागले. ॥८ १/२॥
लक्ष्मणश्चापि रामश्च शरैराशीविषोपमैः ॥ ९ ॥

दृश्यादृश्यानि रक्षांसि प्रवराणि निजघ्नतुः ।
मोठ मोठे राक्षस कधी प्रकट होऊन युद्ध करत होते आणि कधी अदृश्य होऊन जात होते, परंतु श्रीराम आणि लक्ष्मण विषधर सर्पांसमान आपल्या बाणांच्या द्वारे दृश्य आणि अदृश्य सर्व राक्षसांना मारून टाकत होते. ॥९ १/२॥
तुरङ्‌गखुरविध्वस्तं रथनेमिसमुत्थितम् ॥ १० ॥

रुरोध कर्णनेत्राणि युद्ध्यतां धरणीरजः ।
घोड्‍यांच्या टापांनी चूर्ण होऊन रथांच्या चाकांनी उडविली गेलेली पृथ्वीची धूळ योद्ध्‍यांच्या कान आणि डोळ्यांना बंद करून टाकत होती. ॥१० १/२॥
वर्तमाने तथा घोरे संग्रामे लोमहर्षणे ।
रुधिरौघा महाघोरा नद्यस्तत्र विसुस्रुवुः ॥ ११ ॥
याप्रकारे रोमांचकारी भयंकर संग्राम सुरू झाल्यावर तेथे रक्ताच्या प्रवाहास वहावणार्‍या रक्ताच्या भयंकर नद्या वाहू लागल्या. ॥११॥
ततो भेरीमृदङ्‌गानां पणवानां च निस्वनः ।
शङ्‌खनेमिस्वनोन्मिश्रः संबभूवाद्‌भुतोपमः ॥ १२ ॥
त्यानंतर भेरी, मृदुंग आणि पणव आदि वाद्यांचा ध्वनी होऊ लागला जो शंखांचे शब्द आणि रथांच्या चाकांच्या घडघडाटांत मिसळून फारच अद्‌भुत वाटत होता. ॥१२॥
हतानां स्तनमानानां राक्षसानां च निस्वनः ।
शस्तानां वानराणां च संबभूवात्र दारुणः ॥ १३ ॥
घायाळ होऊन कण्हणार्‍या राक्षसांचा आणि शस्त्राने क्षतविक्षत झालेल्या वानरांचा आर्तनाद तेथे फार भयंकर प्रतीत होत होता. ॥१३॥
हतैर्वानरमुख्यैश्च शक्तिशूलपरश्वधैः ।
निहतैः पर्वताकारै राक्षसैः कामरूपिभिः ॥ १४ ॥

शस्त्रपुष्पोपहारा च तत्रासीद् युद्धमेदिनी ।
दुर्ज्ञेया दुर्निवेशा च शोणितास्रावकर्दमा ॥ १५ ॥
शक्ति, शूल आणि परशु यांनी मारले गेलेल्या मुख्य मुख्य वानरांच्या आणि वानरांच्या द्वारा मृत्युमुखी पडलेल्या इच्छानुसार रूप धारण करण्यास समर्थ असणार्‍या पर्वताकार राक्षसांमुळे उपलक्षित त्या युद्धभूमीमध्ये रक्तप्रवाहामुळे चिखल झाला होता. तिला ओळखणे कठीण झाले होते तसेच तेथे थांबणे तर अधिकच कठीण झाले होते. त्या भूमीला शस्त्ररूपी पुष्पांचा उपहार अर्पित केला गेला आहे की काय असेच वाटत होते. ॥१४-१५॥
सा बभूव निशा घोरा हरिराक्षसहारिणी ।
कालरात्रीव भूतानां सर्वेषां दुरतिक्रमा ॥ १६ ॥
वानरांचा आणि राक्षसांचा संहार करणारी ती भयंकर रजनी काल रात्रीप्रमाणे समस्त प्राण्यांसाठी दुर्लंघ्य होऊन गेली होती. ॥१६॥
ततस्ते राक्षसास्तत्र तस्मिंस्तमसि दारुणे ।
राममेवाभ्यवर्तन्त संसृष्टाः शरवृष्टिभिः ॥ १७ ॥
त्यानंतर त्या दारूण अंध:कारात तेथे ते सर्व राक्षस हर्ष आणि उत्साहाने भरून बाणांची वृष्टि करत श्रीरामांवरच धावून गेले. ॥१७॥
तेषामापततां शब्दः क्रुद्धानामपि गर्जताम् ।
उद्वर्त इव सप्तानां समुद्राणां अभूत् स्व्नः ॥ १८ ॥
त्यासमयी कुपित होऊन गर्जना करत असलेल्या त्या आक्रमणकारी राक्षसांचा शब्द प्रलयाच्या समयी सात समुद्रांच्या महान कोलाहलाप्रमाणे जणु भासत होता. ॥१८॥
तेषां रामः शरैः षड्‌भिः षड् जघान निशाचरान् ।
निमेषान्तरमात्रेण शरैरग्निशिखोपमैः ॥ १९ ॥
तेव्हा श्रीरामांनी डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच अग्निज्वाळेप्रमाणे सहा भयानक बाणांनी (निम्नांकित) सहा निशाचरांना घायाळ करून टाकले. ॥१९॥
यमशत्रुश्च दुर्धर्षो महापार्श्वमहोदरौ ।
वज्रदंष्ट्रो महाकायः तौ चोभौ शुकसारणौ ॥ २० ॥
त्यांची नावे याप्रकारे आहेत - दुर्धर्ष वीर यज्ञशत्रु, महापार्श्व, महोदर, महाकाय, वज्रदंष्ट्र तसेच ते दोघे शुक आणि सारण. ॥२०॥
ते तु रामेण बाणौघैः सर्वे मर्मसु ताडिताः ।
युद्धादपसृतास्तत्र सावशेषायुषोऽभवन् ॥ २१ ॥
श्रीरामांच्या बाणसमूहांनी सार्‍या मर्मस्थानांवर आघात झाल्याने ते सहाही राक्षस युद्ध सोडून पळून गेले, म्हणून त्यांचे आयुष्य शेष राहिले- जीव वाचले. ॥२१॥
निमेषांतरमात्रेण घोरैरग्निशिखोपमैः ।
दिशश्चकार विमलाः प्रदिशश्च महारथः ॥ २२ ॥
महारथी श्रीरामांनी अग्निशिखेसमान प्रज्वलित भयंकर बाणांच्या द्वारे डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच संपूर्ण दिशांना आणि त्यांच्या कोनांना निर्मल (प्रकाशपूर्ण) करून टाकले. ॥२२॥
ये त्वन्ये राक्षसा भीमा रामस्याभिमुखे स्थिताः ।
तेऽपि नष्टाः समासाद्य पतङ्‌ग इव पावकम् ॥ २३ ॥
दुसरेही जे जे राक्षसवीर श्रीरामांच्या समोर उभे होते तेही आगीत पडून पतंग जळून नष्ट होतात त्याचप्रकारे नष्ट झाले. ॥२३॥
सुवर्णपुङ्‌खैर्विशिखैः संपतद्‌भिः समंततः ।
बभूव रजनी चित्रा खद्योतैरिव शारदी ॥ २४ ॥
चारी बाजूस सुवर्णमय पंख असलेले बाण पडत होते. त्यांच्या प्रभेने ती रजनी काजव्यांनी विचित्र दिसणार्‍या शरद ऋतुतील रात्रीप्रमाणे अद्‌भुत प्रतीत होत होती. ॥२४॥
राक्षसानां च निनदैः भेरीणां चापि निस्वनैः ।
सा बभूव निशा घोरा भूयो घोरतराभवत् ॥ २५ ॥
राक्षसांच्या सिंहनादांनी आणि भेरींच्या आवाजांनी ती भयानक रात्र अधिकच भयंकर वाटू लागली. ॥२५॥
तेन शब्देन महता प्रवृद्धेन समन्ततः ।
त्रिकूटः कंदन्दराकीर्णः प्रव्याहरदिवाचलः ॥ २६ ॥
सर्वत्र पसरलेल्या त्या महान्‌ शब्दाने प्रतिध्वनित होऊन कंदरांनी व्याप्त त्रिकूट पर्वत जणु कुणाच्या बोलण्याला उत्तर देत आहे असा भासू लागला. ॥२६॥
गोलाङ्‌गूला महाकायाः तमसा तुल्यवर्चसः ।
संपम्परिष्वज्य बाहुभ्यां भक्षयन् रजनीचरान् ॥ २७ ॥
लंगूर जातिचे विशालकाय वानर जे अंध:काराप्रमाणे काळे होते, निशाचरांना दोन्ही भुजांमध्ये आवळून धरून मारून टाकत होते आणि त्यांना कुत्र्या आदिंना खाऊ घालत होते. ॥२७॥
अङ्‌गदस्तु रणे शत्रून् निहन्तुं समुपस्थितः ।
रावणिं निजघानाशु सारथिं च हयानपि ॥ २८ ॥
दुसर्‍या बाजूने अंगद रणभूमीमध्ये शत्रूंचा संहार करण्यासाठी पुढे निघाले. त्यांनी रावणपुत्र इंद्रजिताला घायाळ करून टाकले तसेच त्याचा सारथी आणि घोड्‍यांनाही यमलोकात पोहोचविले. ॥२८॥
इन्द्रजित् तु रथं त्यक्त्वा हताश्वो हतसारथिः ।
अङ्‌गदेन महात्यस्तः तत्रैवान्तरधीयत ॥ २९ ॥
अंगदाच्या द्वारे घोडे आणि सारथी मारले गेल्यानंतर महान्‌ कष्टात पडलेला इंद्रजित रथ सोडून तेथून अंतर्धान झाला. ॥२९॥
तत्कर्म वालिपुत्रस्य सर्वे देवाः सहर्षिभिः ।
तुष्टुवुः पूजनार्हस्य तौ चोभौ रामलक्ष्मणौ ॥ ३० ॥
प्रशंसेस योग्य वालिकुमार अंगदाच्या त्या पराक्रमाची ऋषींसहित देवतांनी तसेच दोघे भाऊ रामलक्ष्मण यांनीही भूरि-भूरि प्रशंसा केली. ॥३०॥
प्रभावं सर्वभूतानि विदुरिन्द्रजितो युधि ।
तेन ते तं महात्मानं तुष्टा दृष्ट्‍वा प्रधर्षितम् ॥ ३१ ॥
संपूर्ण प्राणी युद्धात इंद्रजिताचा प्रभाव जाणत होते म्हणून अंगदद्वारा त्याला पराजित झालेला पाहून त्या महात्मा अंगदावर दृष्टिपात करून सर्वांना फार प्रसन्नता वाटली. ॥३१॥
ततः प्रहृष्टाः कपयः ससुग्रीवविभीषणाः ।
साधु साध्विति नेदुश्च दृष्ट्‍वा शत्रुं पराजितम् ॥ ३२ ॥
शत्रुला पराजित झालेला पाहून सुग्रीव आणि विभीषणासहित सर्व वानर फार प्रसन्न झाले आणि अंगदाला साधुवाद देऊ लागले. ॥३२॥
इन्द्रजित् तु तदानेन निर्जितो भीमकर्मणा ।
संयुगे वालिपुत्रेण क्रोधं चक्रे सुदारुणम् ॥ ३३ ॥
युद्धस्थळी भयानक कर्म करणार्‍या वालिपुत्र अंगदाकडून पराजित झाल्यावर इंद्रजिताने फार भयंकर क्रोध प्रकट केला. ॥३३॥
सोऽन्तर्धानगतः पापो रावणी रणकर्शितः ।
ब्रह्मदत्तवरो वीरो रावणिः क्रोधमूर्च्छितः ॥ ३४ ॥

अदृश्यो निशितान् बाणान् मुमोचाशनिवर्चसः ।
रावणकुमार वीर इंद्रजित ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून चुकला होता. युद्धात अधिक कष्ट प्राप्त झाल्याने तो पापी रावणपुत्र क्रोधाने बेभानसा होऊ लागला म्हणून अंतर्धान विद्येचा आश्रय घेऊन अदृश्य होऊन त्याने वज्रासमान तेजस्वी आणि तीक्ष्ण बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३४ १/२॥
रामं च लक्ष्मणं चैव घोरैर्नागमयैः शरैः ॥ ३५ ॥

बिभेद समरे क्रुद्धः सर्वगात्रेषु राक्षसः ।
समरांगणात कुपित झालेल्या इंद्रजिताने घोर सर्पमय बाणांच्या द्वारे श्रीराम आणि लक्ष्मण यांना घायाळ केले. ते दोन्ही रघुवंशी बंधु आपल्या सर्वांगावर जखमा झाल्याने क्षतविक्षत होत राहिले होते. ॥३५ १/२॥
मायया संवृतस्तत्र मोहयन् राघवौ युधि ॥ ३६ ॥

अदृश्यः सर्वभूतानां कूटयोधी निशाचरः ।
बबंध शरबंधेन भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ३७ ॥
मायेने आवृत्त होऊन समस्त प्राण्यांसाठी अदृश्य होऊन तेथे कूटयुद्ध करणार्‍या त्या निशाचराने युद्धस्थळी दोन्ही रघुवंशी बंधु श्रीराम आणि लक्ष्मणांना मोहात पाडून त्यांना सर्पाकार बाणांच्या बंधनांत बद्ध केले. ॥३६-३७॥
तौ तेन पुरुषव्याघ्रौ क्रुद्धेनाशीविषैः शरैः ।
सहसा निहतौ वीरौ तदा प्रैक्षन्त वानराः ॥ ३८ ॥
याप्रकारे क्रोधाविष्ट झालेल्या इंद्रजिताने त्या दोन्ही पुरूषप्रवर वीरांना एकाएकी सर्पाकार बाणांच्या द्वारा बांधून टाकले. त्यासमयी वानरांनी त्यांना नागपाशात बद्ध पाहिले. ॥३८॥
प्रकाशरूपस्तु यदा न शक्तः
तौ बाधितुं राक्षसराजपुत्रः ।
मायां प्रयोक्तुं समुपाजगाम
बबंध तौ राजसुतौ महात्मा ॥ ३९ ॥
प्रकटरूपाने युद्ध करते समयी जेव्हा राक्षसराजकुमार इंद्रजित त्या दोन्ही राजपुत्रांना बाधा देण्यास समर्थ झाला नाही, तेव्हा त्यांच्यावर मायेचे प्रयोग करण्यास तयार झाला आणि त्या दोन्ही भावांना त्या दुरात्म्याने बांधून टाकले. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा चौवेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP