॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीरामविजय ॥

॥ अध्याय एकविसावा ॥

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
क्षीराब्धितटीं बैसला सर्वकाळ ॥ त्यासी क्षुधा कासया बाधील ॥
दीपाची चिंता कां लागेल ॥ दिनमणि समीप असतां पैं ॥१॥
राहतां कल्पतरुतळीं ॥ कां डंखील कामनाव्याळी ॥
गंगाजळीं शेज केली ॥ त्यासी वणवा करील काय ॥२॥
वारणाविदारकाचे संगतीं ॥ जो बैसला अहोरात्रीं ॥
त्यासी जंबूक बाधा करिती ॥ हें कल्पांतींही घडेना ॥३॥
जो नित्य करी सुधारसपान ॥ त्यासी विष बाधील काय दारुण ॥
स्वरूपीं जो सदा सावधान ॥ दुष्कृतें कैंचीं त्यापाशीं ॥४॥
कामधेनु घरीं असतां ॥ कल्पना न बाधी तत्वतां ॥
हुताशन तेज धडकतां ॥ शीत कैंचें उरेल ॥५॥
तैसी रघुवीरकृपा ज्यासी पूर्ण ॥ त्यासी न बाधी विषयहुताशन ॥
रामचरित्रीं गुंतलें मन ॥ इतर श्रवण नावडे तया ॥६॥
असो विसावा अध्याय संपतां तेथें ॥ आसाळी विदारिली हनुमंतें ॥
यावरी इंद्रजितासी लंकानाथें ॥ आज्ञा केली सत्वर ॥७॥
तों नग्न कुमारी शिंके पाठीसी ॥ रावण शकुन पुसे ब्रह्मयासी ॥
विधी म्हणे दोघांतून एकासी ॥ अपयश येईल दिसतसे ॥८॥
रावण पाहे क्रोधायुक्त ॥ विधी म्हणे वानर होईल हस्तगत ॥
तैसाचि चालला इंद्रजित ॥ अशोकवना ते वेळे ॥९॥
सवें घेऊनि चतुरंग सेना ॥ शक्रारि निघाला अशोकवना ॥
शयशीं अयुतें गज जाणा ॥ रथतुरंगमां गणना नाहीं ॥१०॥
देव बैसोनी विमानीं ॥ कौतुक पाहती तेच क्षणीं ॥
अशोकवनांत रावणी ॥ निजभारेंसी पातला ॥११॥
तों पाठमोरा हनुमंत ॥ बैसलासे फळें झेलित ॥
असुर गर्जती बहुत ॥ परी तो तिकडे न पाहे ॥१२॥
क्षणक्षणां पाठी कुरवाळित ॥ मागें परतोन वांकुल्या दावित ॥
राक्षस शस्त्रें असंख्यात ॥ वर्षते जाहले कपीवरी ॥१३॥
इंद्रजितें शर टाकिले ॥ हनुमंतें वरचेवर झेलिले ॥
मुष्टीमाजी जमा केले ॥ बहुसाल तेधवां ॥१४॥
अकस्मात पुच्छ सोडिलें ॥ रावणाचे धनुष्य हरिलें ॥
हनुमंतें आकर्ण ओढिलें ॥ बाण लावून ते समयीं ॥१५॥
अचुक मारुतीचें संधान ॥ सोडिता जाहला असंख्यात बाण ॥
जैसे शब्दामागें शब्द पूर्ण ॥ मुखांतून निघती पैं ॥१६॥
तों विमानरूढ सुधापानी ॥ पुष्पें वर्षती क्षणक्षणीं ॥
म्हणती मारुति धन्य अंजनी ॥ तुजचि एक प्रसवली ॥१७॥
राक्षसांची शिरें ते काळीं ॥ हनुमंतें असंभाव्य उडविलीं ॥
रावणीचा मुकुट तळीं ॥ छेदोनियां पाडिला ॥१८॥
बाण सरले तये वेळां ॥ सवेंच घेतली लोहार्गळा ॥
वायुवेगें धांविन्नला ॥ शक्रारीचे रथापाशीं ॥१९॥
अर्गळा घालोनि ते वेळां ॥ अश्वांसहित रथ भंगिला ॥
इंद्रजित विरथ जाहला ॥ घाबरला पहातसे ॥२०॥
लोहार्गळेचे घाय सबळ ॥ झोडिलें इंद्रजिताचें दळ ॥
वाहती रक्ताचे खळाळ ॥ समुद्रा जाती भेटावया ॥२१॥
जैसें अलातचक्र फिरे ॥ तैसा हनुमंत असुरांत वावरे ॥
रावणीस अर्गळाप्रहारें ॥ झोडिता जाहला तेधवां ॥२२॥
रावणात्मजें ते अवसरीं ॥ पाश टाकिला हनुमंतावरी ॥
तों मारुति होय मोहरी ॥ उडोनि जाय एकीकडे ॥२३॥
मागुती लहान पाश करून ॥ कपीवरी टाकी आणून ॥
पर्वतकार सीताशोकहरण ॥ होऊन पाश तोडितसे ॥२४॥
शस्त्रास्त्रें बहुसाल ॥ टाकितां नाटोपि कपि सबळ ॥
यावरी अंजनीचा बाळ ॥ इंद्रजितावरी लोटला ॥२५॥
मल्लयुद्धासी प्रवर्तला ॥ इंद्रजित बळें आपटिला ॥
नग्न करून भिकाविला ॥ चरणीं धरून हनुमंतें ॥२६॥
इंद्रजित तेव्हां रडत ॥ म्हणे मज आला काय मृत्य ॥
दळही संहारिलें समस्त ॥ न दिसे येथें कोणीही ॥२७॥
म्हणे मज निराहारियाचे हातें मरण ॥ हा तों करी फळभक्षण ॥
परी रामापाशीं नेईल धरून ॥ विटंबील नाना परी ॥२८॥
सुटे जों जनकनंदिनी ॥ तों मज घालील बंदिखानीं ॥
जैसें रावणासी धरूनि ॥ पांच पाट काढिले ॥२९॥
मग नग्न इंद्रजित पळाला ॥ विवरामाजी तो दडाला ॥
कपीनें द्वारीं पाषाण लाविला ॥ विवरीं कोंडिला राक्षस ॥३०॥
इंद्रजित कासावीस होये ॥ म्हणे कां मरण मज नये ॥
शस्त्र जवळी नाहीं करूं काय ॥ प्राणत्याग करावा ॥३१॥
विवरीं कोंडिला इंद्रजित ॥ हें दशकंठासी जाहलें श्रुत ॥
परम जाहला भयभीत ॥ विनवीतसे विरंचीतें ॥३२॥
म्हणे तुझे वचन साचार ॥ हस्तगत नव्हे कां वानर ॥
तरी तुवां जाऊनि सत्वर ॥ धरून कपि देईं आम्हां ॥३३॥
तरी तूं तेथवरी जाऊन ॥ मज द्यावें पुत्रदान ॥
काळरूप तो वानर जाण ॥ तुजविण कोणा नाटोपे ॥३४॥
मग कमलोद्‌भव पातला तेथ ॥ तंव तो नग्नचि इंद्रजित ॥
दडला असे विवरांत ॥ भयभीत मुसमुसी ॥३५॥
मग रावणी बोले करुणा वचन ॥ आतां मज सोडवीं येथून ॥
त्या वानरासी धरिल्याविण ॥ मी विवराबाहेर न येंचि ॥३६॥
कमळासन म्हणे ते अवसरीं ॥ आतां निघें विवराबाहेरी ॥
ब्रह्मपाश घालोनि झडकरी ॥ कपिबळिया धरावा ॥३७॥
रावणी देत प्रत्युत्तर ॥ ब्रह्मपाशास नावरे वानर ॥
विरिंचि म्हणे तूं अपवित्र ॥ तुज अस्त्र हें न चाले ॥३८॥
मग विष्णुसुतें ते वेळीं ॥ राघवप्रियाची स्तुति केली ॥
तूं वज्रशरीरी महाबळी ॥ निशाचर कांपती तूतें ॥३९॥
आमुचे वचन साचे करावें ॥ ब्रह्मपाशी त्वां सांपडावें ॥
सभेपर्यंत उगेंचि यावें ॥ मग दावावें पराक्रमा ॥४०॥
ऐसें कमलोद्‌भवें विनविलें ॥ समीरात्मजें मान्य केलें ॥
मग विरिंचीनें पाश पेरिले ॥ माजी बांधीलें हनुमंता ॥४१॥
हनुमंत बांधिला पाशीं ॥ शक्रारि धांवला वेगेंसी ॥
दृढ बांधितां जाहला कपीसी ॥ निजहस्तेंकरूनियां ॥४२॥
एक तृणवेंटीनें पाय बांधिती ॥ एक वृक्षसालीनें आंवळिती ॥
एक दोर आणावया धांवती ॥ नगरामाजी सत्वर ॥४३॥
हनुमंत दिसे बांधिला ॥ परी तो सर्वदाही मोकळा ॥
जैसा ज्ञानी संसारीं गुंतला ॥ परी तो सर्वदाही मुक्त असे ॥४४॥
नलिनीपत्र जळीं खेळे ॥ परी त्यावरी बिंदु नातळे ॥
कीं शीतोष्ण धुळीनें न मळे ॥ निराळ जैसें सर्वदा ॥४५॥
कीं समीर सर्वांवरून जात ॥ परी कोठेंचि नव्हे लिप्त ॥
तैसाचि वीर हनुमंत ॥ बंधमोक्षातीत जो ॥४६॥
असो परमेष्ठी आणि इंद्रजित ॥ सभेंसी आणिती हनुमंत ॥
वाटेसी राक्षस टोंचित ॥ नाना शस्त्रें घेऊनियां ॥४७॥
शस्त्रें भंगली समग्न ॥ वज्रशरीरी तो वानर ॥
असुरीं उचलोनी तो सत्वर ॥ सभेसमोर आणिला ॥४८॥
दृष्टीं देखतां हनुमंत ॥ रावण करकरां दांत खात ॥
याउपरी रघुनाथदूत ॥ काय करिता जाहला ॥४९॥
बंधनें तोडूनि समस्त ॥ पुच्छासनीं बैसला हनुमंत ॥
रावणाहून एक हस्त ॥ उंच आसन मारुतीचें ॥५०॥
मग पुसे प्रधान प्रहस्त ॥ तूं कोणाचा आहेस दूत ॥
परी तो न बोले हनुमंत ॥ पाहे चकित उगाचि ॥५१॥
मग पुसे द्विपंचवदन ॥ मर्कटा तूं कोणाचा कोण ॥
यावरी जनकजाशोकहरण ॥ काय वचन बोलत ॥५२॥
म्हणे रे मशका रजनीचरा ॥ महामळिणा दुर्जना पामरा ॥
मी कोण आहे तुज तस्करा ॥ कळलें नाहीं अद्यापि ॥५३॥
जेणें स्वयंवरीं तुज वांचविलें ॥ उरावरोनि चाप काढिलें ॥
त्याचा दास मी जाण वहिलें ॥ शिरकमळें छेदीन तुझीं ॥५४॥
जेणें ताटिका सुबाहु मारून ॥ केलें कौशिकमखपाळण ॥
मूढा त्याचा दास मी आहे पूर्ण ॥ करीन दहन लंकेचें ॥५५॥
तुझे भगिनीचें नासिक छेदिलें ॥ खर दूषण त्रिशिरा मारिले ॥
त्याचा दूत मी आलों बळें ॥ शिक्षा तुज लावावया ॥५६॥
जैसें अन्नसदनी रिघे श्वान ॥ तैसा पंचवटीस येऊन ॥
चोरिलें जानकी चिद्रत्‍न ॥ महामलिना अपवित्रा ॥५७॥
रामपंचानानची वस्तु ॥ कैसा ठेविशील तूं बस्तु ॥
पाडून वासुकीचा दांतु ॥ मंडूक वांचेल कैसा पां ॥५८॥
व्याघ्र असतां निद्रिस्त ॥ बाहेर जिव्हा लळलळित ॥
ती तोडोनि जंबुक यथार्थ ॥ कैसा वांचेल सांग पां ॥५९॥
तुझा अखया मारून ॥ विध्वंसिलें म्यां अशोकवन ॥
तुझें दळ अवघें मर्दून ॥ इंद्रजित गांजिला ॥६०॥
राक्षसकुळवैश्वानर ॥ अयोध्याप्रभु कौसल्याकुमार ॥
तुझें छेदावया शिर ॥ समरधीर येत आतां ॥६१॥
तो विषयकंठवंद्य रघुनंदन ॥ तुझे दश कंठ छेदून ॥
दशदिशांसि वळी देऊन ॥ सीता घेऊन जाईल ॥६२॥
ऐसें ऐकतां द्विपंचवदन ॥ जाहला परम क्रोधायमान ॥
म्हणे यांचें पुच्छ नासिक कर्ण ॥ जिव्हा छेदून टाका रे ॥६३॥
ऐसें बोलता लंकेश ॥ चौताळले महाराक्षस ॥
पुच्छावरी आसमास ॥ शस्त्रघाय मारिती ॥६४॥
धांपा दाटती हाणतां वैभवें ॥ परी त्याचे रोमही वक्र नोहे ॥
भय घेतलें दशग्रीवें ॥ म्हणे बरवें दिसेना ॥६५॥
मग विचारी निजमनीं ॥ हा रामउपासक सत्यवचनी ॥
तरी याचा मृत्यु कैसेनि ॥ आण घालूनि विचारूं ॥६६॥
मग म्हणे तुज रघुपतीची आण ॥ सत्य सांग तुझें मृत्यांग कोण ॥
येरू म्हणे मज नाहीं मरण ॥ ऐकोनि रावण हांसत ॥६७॥
ब्रह्म्य़ासही आहे मरण ॥ तेथें तुझा कीटका पाड कोण ॥
येरू म्हणे पुच्छा होईल दहन ॥ तैंच मरण आम्हांसी ॥६८॥
तैलें वस्त्रें भिजवून ॥ पुच्छ गुंडाळूनि लावा अग्न ॥
क्षणामाजी भस्म होऊन ॥ सर्व जाईल निर्धारें ॥६९॥
वस्त्रें गुंडाळा बहुत ॥ तेणें अग्नि चेतेल अद्‌भुत ॥
क्षणामध्यें होईल अंत ॥ उशीर येथें न लगेचि ॥७०॥
रावण म्हणे हें साचार ॥ मग स्नेहेंसहित वस्त्रभार ॥
पुच्छा गुडाळिती समग्र ॥ वायुकुमर काय बोले ॥७१॥
म्हणे पुच्छ उघडें राहतां ॥ मग मज नाटज्ञेपे हे तत्वतां ॥
राक्षस भागले वस्त्रें गुंडाळितां ॥ पुच्छ सर्वथा न सरेचि ॥७२॥
वस्त्रराशी आटल्या समग्र ॥ अधिकाधिक वाढें पुच्छाग्र ॥
जैसें पंडितबुद्धीचा प्रसर ॥ बोलतां बहु न सरेचि ॥७३॥
कीं महाकवीची पद्यरचना ॥ अपार लिहितां ते सरेना ॥
रामगुणांची वर्णना ॥ वर्णितां शेषा नाटोपे ॥७४॥
तैसें मारुतीचें पुच्छ अद्‌भुत ॥ राक्षसांसि नव्हे गणित ॥
जैसा अजारक्षकांसी निश्चित ॥ वेदार्थपार समजेना ॥७५॥
असो सरल्या वस्त्रांच्या राशी ॥ शेवटीं नग्न केले नगरवासी ॥
कोठें न मिळे एक दशी ॥ बहुत प्रयासें शोधितां ॥७६॥
रावणीवसा नग्न केला ॥ तरी पुच्छाग्र उघडा राहिला ॥
निःशेष तंतुमात्र उरला ॥ नाहीं कोठें नगरांत ॥७७॥
हनुमंत म्हणे अणुमात्र रितें ॥ राहतां बोले नाहीं मातें ॥
एक काढूनि यज्ञोपवीतें ॥ भयें पुच्छासी गुंडाळिती ॥७८॥
तैल घृत नवनीत ॥ शोधितां न मिळे निश्चित ॥
विंशतिचक्षूसी सांगती दूत ॥ स्नेह वस्त्रें न मिळती कोठें ॥७९॥
राजसेवक फिरती नग्न ॥ उभयद्वारें मुक्त सोडून ॥
नगरींचे लज्जेनें जन ॥ कपाटें झांकून बैसले ॥८०॥
एक बैसले अंधारीं ॥ एक निघाले विवरीं ॥
एक नेत्र लावून निशा थोरी ॥ दिवस असतां केली हो ॥८१॥
वृद्ध वृद्ध एक बोलती ॥ पुढें दिसे बरवी गति ॥
हें लंकानगर अंती ॥ भस्म होईल दिसतसे ॥८२॥
असो वस्त्रें न मिळती निश्चित ॥ पुच्छ उघडें एक हस्त ॥
रावण म्हणे अशोकवनांत ॥ वस्त्रें असती सीतेपाशीं ॥८३॥
ऐकतां तयाच्या उत्तरा ॥ हनुमंत आवरी पुच्छाग्रा ॥
दूत सांगती दशकंधरा ॥ अणुमात्र पुच्छ उरलें नसे ॥८४॥
तेथें कासया पाहिजे वस्त्र ॥ लंकेश म्हणे लावा रे वैश्वानर ॥
चुडी लाविती रजनीचर ॥ अनळ साचार स्पर्शेना ॥८५॥
नाना उपाय योजिती ॥ परी न लागेचि अग्निज्योति ॥
रावण पुसे मारुती ॥ अनळ कां रे स्पर्शेना ॥८६॥
मग बोले अशोकवनारी ॥ पुच्छयज्ञ होती तुझे घरीं ॥
तरी सेवकाहातीं निर्धारीं ॥ मूर्खा किमर्थ फुंकविसी ॥८७॥
तरी तूं स्वमुखेंकरून ॥ चेतवी सत्वर कृशान ॥
न लागतां एक क्षण ॥ ज्वाळा येथें उठती ॥८८॥
ऐसें बोलतां अंजनींसुतें ॥ तें मानलें दशमुखातें ॥
परी अंतरीं पावला भयातें ॥ मग धैर्य धरूनि उठियेला ॥८९॥
ते वेळे निजमुखें दाहक ॥ बळें फुंकी लंकानायक ॥
हनुमंतें बंधु आणि जनक ॥ अनळ अनिळ स्मरियेला ॥९०॥
तों एकाएकीं अग्न धडकला ॥ दाही मुखीं झोंबती ज्वाळा ॥
दाढ्या मिशा तेव्हां सकळा ॥ भस्म केल्या जाळूनि ॥९१॥
रावणें पाप केले बहुत ॥ पुढें रामबाणें यासी देहांत ॥
यालागीं अगोदर प्रायश्चित्त ॥ राघवप्रियें दिधलें कीं ॥९२॥
दशमुखीं पोळला दशकंधर ॥ दिसे दग्धकांतार ॥
असो मुखासी लावूनियां वस्त्र ॥ निजासनीं बैसला ॥९३॥
तंव धडकला पुच्छवन्हि ॥ हनुमंत गडबडां लोळे धरणीं ॥
काकुळती ये म्हणे सोडी कोणी ॥ असुर मनीं आनंदले ॥९४॥
म्हणती हे बरवें जाहलें ॥ अखयादिकांसी येणें मारिलें ॥
मर्कटें बहुतांसी संहारिलें ॥ विटंबिलें इंद्रजिता ॥९५॥
मग विरिंचीनें धरिला युक्तीं ॥ दशमुखें योजिली बरवी गती ॥
अग्न लाविला पुच्छाप्रति ॥ मरेल निश्चितीं आतांचि ॥९६॥
येरू चडफडी तडफडी ॥ उडे पडे भूमीसी गडबडी ॥
आपली मांडी थापटोनि दाढी ॥ रावणाची गेला धरावया ॥९७॥
तों दाढीच नाहीं निःशेष ॥ तेणें रावणासी बसला दचक ॥
देखोन करी हास्यमुख ॥ म्हणे अनर्थ दिसता पुढें ॥९८॥
हनुमंत म्हणे असुरांप्रति ॥ मज सोडवावें समस्तीं ॥
ऐका माझी एक विनंति ॥ धांवे मारुती पुढेंचि ॥९९॥
तंव ते पळती दूरदूर ॥ पुच्छें आकर्षूनि असुर ॥
दाढ्या जाळियेल्या समग्र ॥ प्रळय थोर मांडला ॥१००॥
गरगरां पुच्छ तये वेळां ॥ भवंडितां झळकती प्रळयज्वाळा ॥
राक्षस करूनियां गोळा ॥ पुच्छाग्नींत भस्म करी ॥१॥
सभा सांडोनि पळती असुर ॥ हनुमंत म्हणे उभे स्थिर ॥
मज सोडवा तुम्ही समग्र ॥ म्हणोनि भेटे तयांतें ॥२॥
शतांचीं शतें ते क्षणीं ॥ यामिनीचर पुच्छें बांधोनी ॥
रावणापाशीं आणी ओढोनी ॥ म्हणे कां हे पळताती ॥३॥
असो सीतेसी राक्षसी सांगत ॥ तुझा वानर मेला गे यथार्थ ॥
ऐकतां जानकी शोक करीत ॥ म्हणे विपरीत केवीं घडे ॥४॥
मशकें सागर शोषिला ॥ जंबुकांनीं सिंह केवीं धरिला ॥
खद्योतांनी सूर्य पाडिला ॥ खालीं कैसा आसडोनी ॥५॥
वज्र भंगलें लागतां कमळ ॥ पतंगें ग्रासिला वडवानळ ॥
भोगींद्राचें फणिमंडळ ॥ वटबीजभारें दडपलें ॥६॥
मक्षिकेच्या पक्षवातेंकरूनी ॥ प्रळयमेघ गेला विदारूनी ॥
पिपीलिकाभारें कोसळोनी ॥ कनकाद्रि कैसा पडियेला ॥७॥
पुष्पहार पडतां सृष्टीं ॥ केवीं दणाणे कूर्मपृष्ठी ॥
चित्रींच्या लेपें उठाउठी ॥ प्रळयचपळा ग्रासिली ॥८॥
असो रुद्रावतार हनुमंत ॥ तो राक्षसीं जाळिला अग्नींत ॥
कैसी घडली ही मात ॥ विचारीत राघवप्रिया ॥९॥
जठराग्नीस सीता पुसत ॥ तो म्हणे क्षेम आहे हनुमंत ॥
नगर मी जाळीन समस्त ॥ बंधुसाह्याकारणें ॥११०॥
असो इकडे समस्त असुर ॥ हनुमंतावरी करिती शस्त्रमार ॥
तों पुच्छग्नि धडकला थोर ॥ पळती असुर चहूंकडे ॥११॥
नानाशस्त्रें बाण शक्ती ॥ दुरोनि कपींद्रावरी टकिती ॥
मग मिष घेऊन मारुती ॥ गतप्राण पडियेला ॥१२॥
मूर्च्छित पडतांचि वानर ॥ जवळी धांविन्नले असुर ॥
जो तो म्हणे म्यां घाय थोर ॥ वर्मीं पाहून दीधला ॥१३॥
म्हणोनि मेला हा वानर ॥ जो तो म्हणे हा प्रचंड वीर ॥
सांगती रावणासी बडिवार ॥ सुखें निद्रा करीं आतां ॥१४॥
मेलिया सारिखें मिष घेऊनी ॥ दोन घटिका पडिला मेदिनीं ॥
राक्षस बहुत मिळोनी ॥ सभोंवते विलोकिती ॥१५॥
फेंस वाहतसे वदनीं ॥ वैद्य नाडी पाहती विलोकुनी ॥
म्हणती केवढा पुरुषार्थ करूनी ॥ वानर शेवटीं मेला हो ॥१६॥
ऐसें समस्त जों पाहत ॥ तों हनुमंत उडाला अकस्मात ॥
पुच्छें बांधिले समस्त ॥ राक्षस जळत धडधडां ॥१७॥
कित्येक पळाले असुर ॥ एकला उरला दशकंधर ॥
त्यासी म्हणे रक्षणार ॥ तुज कोण असे आतां ॥१८॥
शक्रारीस म्हणे रावण ॥ यावरी लोहपाश घालून ॥
ग्रीवा हस्त बांधून ॥ लंकेमाजीं फिरविजें ॥१९॥
मग इंद्रजितें पाश घालून ॥ बांधिला तेव्हां वायुनंदन ॥
नगरामाजीं नेऊन ॥ हिंडविती हनुमंता ॥१२०॥
जैसें पुटीं पडतां सुवर्ण ॥ तेजस्वी दिसे दैदीप्यमान ॥
त्यापरी सीताशोकहरण ॥ अग्निसंगें शुद्ध दिसे ॥२१॥
आळोआळीं फिरवित ॥ हनुमंत सहज पाळती घेत ॥
निंदकांचीं तोंडें लासित ॥ लोक पळती बिदोबिदीं ॥२२॥
जाहला एकचि हाहाकार ॥ भलती स्त्री म्हणे तूं माझा भ्रातार ॥
मज येथून काढीं बाहेर ॥ लावील वानर अग्नि आतां ॥२३॥
हनुमंत म्हणे समस्त असुरां ॥ मज तुम्ही आतां दृढ धरा ॥
सर्षप्राय होऊनि सत्वरां ॥ निघोनि गेला क्षणमात्रें ॥२४॥
हनुमंत गदागदां हांसत ॥ राक्षसांसी वांकुल्या दावित ॥
लंकेसी अग्नि लावित ॥ सुटला अद्‌भुत प्रभंजन ॥२५॥
माड्या गोपुरें धवळारें ॥ राणिवसाचीं सुंदर मंदिरें ॥
सकळ नगर महाद्वारें ॥ एकसरें धडकलीं ॥२६॥
कपीनें मांडिलें लंकादहन ॥ त्यासी साह्य झाला पवन ॥
नग्न होऊनि नगरजन ॥ सदनें सोडून पळाले ॥२७॥
थोर विषय संसारीं धन ॥ त्याहून आगळें अपत्य पूर्ण ॥
त्याहून दारा विशेष जाण ॥ त्याहून आस्था प्राणांची ॥२८॥
त्याहून विशेष निजप्राणत्याग ॥ इंद्रियांवरी उदास मग ॥
देहममता धरी निःसंग ॥ विषयभोग सांडिलिया ॥२९॥
त्यासी न झगटे मोह ममतां ॥ मग इतर जनांची काय कथा ॥
न करी कोण कोणाची आस्था ॥ पळती जीव घेऊनियां ॥१३०॥
पुरुषाविण मोहें अत्यंत नारी ॥ उडी घालिती जळते घरीं ॥
बळें ओढून काढितां बाहेरी ॥ जीवित्वावरी उदास त्या ॥३१॥
असंभाव्य दाटल्या ज्वाळा ॥ ग्रासूं इच्छिती नभमंडळा ॥
कीं कल्पांतरुद्र क्षोभला ॥ रावणावरी ते काळीं ॥३२॥
धूम्र दशदिशांतें दाटी ॥ कोण कोणास न दिसे दृष्टीं ॥
वंशनळे नभाच्या पोटीं ॥ असंख्यात उडती पैं ॥३३॥
आतां असो बहुत बोली ॥ तृतीयभाग लंका जाळिली ॥
परी ते सुवर्णमय जाहली ॥ श्रीरामभक्तप्रतापें ॥३४॥
लोहघणें परिस फोडिला ॥ परी तो अवघाचि सुवर्ण जाहला ॥
तेवीं लंकानगर ते वेळां ॥ हेममय ओतिलें ॥३५॥
हनुमंतें लंकादहन केलियावरी ॥ निजमानसीं विचार करी ॥
श्रीराम दर्शनासी झडकरी ॥ जावें आतां त्वरेनें ॥३६॥
मग उडाला वायुकुमर ॥ समुद्रातीरा आला सत्वर ॥
पुच्छ विझवितां नदीश्वर ॥ काकुळती बहु आला ॥३७॥
जलचरें उकडोनि मरती ॥ तूं कडसे बैसें गा मारुती ॥
याउपरी अवनिजापती दास ॥ तीरीं बैसला ॥३८॥
सरितापतीनें निजबळें ॥ निजलाटेनें पुच्छ विझविलें ॥
कीं याजकें अग्नीस आच्छादिलें ॥ कुंडमंडपामाझारीं ॥३९॥
कपाळींचा स्वेद पुसोनि टाकिला ॥ तो पुढें मकरध्वज जन्मला ॥
असो कपि मागें पाहूं लागला ॥ तों लंका भडभडां जळतसे ॥१४०॥
असंभाव्य चेतला अग्न ॥ म्हणे जनकजा जाईल भस्म होऊन ॥
कार्य नासेल म्हणून ॥ वायुनंदन शोक करी ॥४१॥
मग म्हणे करितां रामस्मरण ॥ मज न बाधी प्रळयाग्न ॥
माझे जगन्मातेसी विघ्न ॥ केवीं कृशान करूं शके ॥४२॥
स्मरतां रघुवीर नाम निर्मळ ॥ शिवकंठींचें हाळाहळ ॥
शीतळ जाहलें तात्काळ ॥ नामामृतें करूनियां ॥४३॥
तों वायुदेव सांगे ते वेळां ॥ सुखी आहे जनकबाळा ॥
ते त्रिभुवनपतीची चित्कळा ॥ ब्रह्मांडमाळा घडी मोडी ॥४४॥
यावरी लोकप्राणेशनंदन ॥ म्हणे क्षुधित जाहले नयन ॥
मित्रकुळभूषणाचे चरण ॥ पाहावयालागी उदित ॥४५॥
तो मंगळजननीजा जीवन ॥ मज पुसेल वर्तमान ॥
तरी कीर्ति स्वमुखेंकरून ॥ वर्णितां दूषण लागेल ॥४६॥
यश धर्म विद्या पुरुषार्थ ॥ बळ पराक्रम आणि तीर्थ ॥
हें स्वमुखें जो वर्णित ॥ तरी हानि सत्य शास्त्र म्हणे ॥४७॥
मग गुप्तरूपें वायुनंदन ॥ घेत परमेष्ठीचें दर्शन ॥
म्हणे मी अयोध्यापतीचे चरण ॥ पाहावया जातसें ॥४८॥
तरी येथें वर्तला जो वृत्तांत ॥ तो पत्रीं लिहावा साद्यंत ॥
ऐकतां विष्णुनाभसुत ॥ ब्रह्मानंदें उचंबळला ॥४९॥
म्हणे धन्य हनुमंता तुझें ज्ञान ॥ मजही त्वां केलें पावन ॥
मग तात्काळ पत्र लिहून ॥ हनुमंतापाशीं दिधलें ॥१५०॥
ब्रह्मायाची आज्ञा घेऊनी ॥ प्रवेशला अशोकवनीं ॥
साष्टांगेंसीं जनकनंदिनी ॥ सद्रद होऊनि नमियेली ॥५१॥
मग बोले जनकबाळा ॥ आतां कधीं येशील वेल्हाळा ॥
विमळांबुधारा ते वेळां ॥ नेत्रीं आल्या जानकीच्या ॥५२॥
जो दशरथाचा महापुण्यमेरू ॥ जो ब्रह्मांडनायक जगद्‌गुरु ॥
जो भक्तमंदिरांगणमांदारू ॥ तयाचे दर्शना जातों मी ॥५३॥
हनुमंत म्हणे जगन्माते ॥ राघववल्लभे गुणसरिते ॥
कमळप्रिये कमलो द्‌भूते ॥ चिंता न करी सर्वथा ॥५४॥
माते उदयिक जाण दोनप्रहरां ॥ राघव आणितों समुद्रतीरा ॥
तो राक्षसांसहित दैत्येंद्रा ॥ वधून तुज सोडवील ॥५५॥
मज कांही खूण द्यावी यथार्थ ॥ जेणें मज धन्य म्हणेल रघुनाथ ॥
मग वेणींचा मणी दैदीप्यवंत ॥ मारुतीचे हातीं ओपिला ॥५६॥
मागुती अंजनीहृदयरत्‍न ॥ म्हणे कांहीं सांग अंतरखूण ॥
तो ताटिकांतक मखपाळण ॥ जेणेंकरूनि संतोषे ॥५७॥
जानकी म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ आम्ही काळ क्रमिला जैं मारुती ॥
सुमित्रात्मज वनाप्रति ॥ गेला होतां एकदां ॥५८॥
एकांतींचे अवसरीं ॥ रघुपतीच्या अंकावरी ॥
शिर ठेवूनि निर्धारीं ॥ हनुमंता मी निजल्यें पैं ॥५९॥
प्रीतीकरून तमालनील ॥ परम सुवास जो मनसीळ ॥
तो उगाळून स्वकरें तत्काळ ॥ टिळक रेखिला भाळीं माझे ॥१६०॥
हे गोष्टी जाणे रघुनंदन ॥ मारुती सांग हे अंतरखूण ॥
ऐसें ऐकतां वायुनंदन ॥ परम हर्ष पावला ॥६१॥
जानकी म्हणे समुद्रजळ ॥ शतयोजनें भरलें तुंबळ ॥
असंख्यात वानरदळ ॥ कैसें येईल ऐलतीरा ॥६२॥
येरू म्हणे राघव शरीं ॥ सेतु बांधील समुद्रावरी ॥
अथवा माझिया पुच्छेंकरी ॥ सेतु बांधील अभंग ॥६३॥
ना तरी राघवबाण वडवानळ ॥ शोषून टाकील समुद्रजळ ॥
अथवा उड्डाण करून सकळ ॥ सुवेळेसी पैं येऊं ॥६४॥
जेणें स्तंभाविणें धरिलें नभ ॥ जीवनावरी पृथ्वी ठेवी स्ययंभ ॥
तो जानकी तुझा वल्लभ ॥ काय एक करूं न शके ॥६५॥
जननीचें जठरकुहरीं ॥ प्राणी वसे नवमासवरी ॥
तेथें रक्षी नानापरी ॥ तो काय एक करूं न शके ॥६६॥
बाहेर उजजतांच अवधारा ॥ मातेचें स्तनीं दुग्धधारा ॥
लावितो परात्पर सोयरा ॥ तो काय एक करूं न शके ॥६७॥
क्षणें एवढें ब्रह्मांड दावी ॥ सवेंच मागुतें लपवी ॥
तो राम त्रिभुवनगोसावी ॥ काय एक करूं न शके ॥६८॥
जैसा गगनीं एकचि मित्र ॥ परी प्रकाश करी सर्वत्र ॥
तैसा जगद्य्वापक रघुवीर ॥ काय एक करूं न शके ॥६९॥
वपु नवच्छिद्रमय भग्न ॥ परी मर्यादेवेगळा न जाय प्राण ॥
तैसा अयोध्यानाथ जगन्मोहन ॥ काय एक करूं न शके ॥१७०॥
गोष्टी असोत बहुत आतां ॥ वेद शिणले कीर्ति गातां ॥
उदयिक दोनप्रहरां रघुनाथा ॥ समुद्रतीरा आणितों ॥७१॥
तुज मी आतांच नेतों माते ॥ परी शुद्धि सांगितली रघुनाथें ॥
पुढील भविष्याची मतें ॥ ठाऊन नसती जननीये ॥७२॥
असो सीतेची आज्ञा घेऊन ॥ साष्टांगें नमी वायुनंदन ॥
यशस्वी रघुनाथ म्हणोन ॥ गगनपंथें उडाला ॥७३॥
सकळ देव म्हणती हनुमंता ॥ त्वरितगतीं आणावें रघुनाथा ॥
तूं आमुचा प्राणदाता ॥ सोडवीं येथून आम्हांसी ॥७४॥
हनुमंत म्हणे देवांसी ॥ नका चिंता करूं मानसीं ॥
उदयिक राम समुद्रतीरासी ॥ निर्धारेंसी आणितों ॥७५॥
यावरी लंकागिरीशिखरीं ॥ उभा राहिला वानरकेसरी ॥
भुभुःकार केला ऐलतीरीं ॥ सकळ वानरीं ऐकिला ॥७६॥
लंकागिरीहूनि उडाला ॥ योजनद्वय पाठार दडपिला ॥
उड्डाणासरसा समुद्र भ्याला ॥ मारुती आला ऐलतीरा ॥७७॥
निशांतीं उगवे चंडकिरण ॥ कीं वैकुंठींहून उतरे सुपर्ण ॥
कीं मानसतीर लक्षून ॥ राजहंस उतरला ॥७८॥
महेंद्रपर्वतावरी हनुमंत ॥ उभा ठाकला अकस्मात ॥
जांबुवंतादि वानर समस्त ॥ भेटावया धांविन्नले ॥७९॥
थोर थोर वानर भेटती ॥ एक जघनासी आलिंगिती ॥
एक जानु जंधा कवळिती ॥ एक लागती पायांतें ॥१८०॥
एक पुच्छासी देती आलिंगन ॥ एक पुच्छाग्रीं देती चुंबन ॥
एक मान घुलकावून ॥ वांकुल्या दाविती ऊर्ध्वपंथें ॥८१॥
एक टाळिया वाजवून कोंडें ॥ नृत्य करिती मारुतीपुढें ॥
एक चक्राकार उडे ॥ वर्णिती पवाडे श्रीरामाचे ॥८२॥
एक करिती थोर भुभुःकार ॥ एक साष्टांग घालिती नमस्कार ॥
एक म्हणती श्रीरामचंद्र ॥ तेथें सत्वर जाऊं चला ॥८३॥
पुष्पें आणुनी ते अवसरीं ॥ हनुमंत पूजिला वानरीं ॥
जैसा सकळ सुरवरीं ॥ अपर्णावर पूजियेला ॥८४॥
मारुतीचे आंगावरील मळ ॥ देखोन कपी पुसती सकळ ॥
लंकेत प्रताप केला समूळ ॥ सांग आम्हा हनुमंता ॥८५॥
परी कदा न सांगे मारुती ॥ ब्रह्मलिखित देत हातीं ॥
परी ते वानर न उकलिती ॥ विरिंचिमुद्रांकित जें ॥८६॥
मग म्हणती वानर ॥ कळेल किष्किंधेसी समाचार ॥
एथें उकलूनि पाहतां पत्र ॥ तरी चतुर हांसती ॥८७॥
असो मारुतीसह वानरगण ॥ किष्किंधेसी आले न लागतां क्षण ॥
सुग्रीवाचें मधुवन ॥ मोडिलें तेव्हां क्षणमात्रें ॥८८॥
सुग्रीवासी सांगती वानरगण ॥ वानरांसह आला वायुनंदन ॥
तुझें आवडतें क्रीडास्थान ॥ तें मधुवन मोडिलें ॥८९॥
ऐकतां सीतापति तारापति ॥ म्हणती विजयी झाला मारुति ॥
तरीच मधुवन मोडिती ॥ वानर आनंदेंकरूनियां ॥१९०॥
असो मधुवनींहून अंजनीसुत ॥ वानरांसह उडाला अकस्मात ॥
पंपासरोवरावरी असे रघुनाथ ॥ आला तेथें स्वानंदें ॥९१॥
सपक्ष उतरला पर्वत ॥ कीं भूमीवरी आला आदित्य ॥
कीं मायाचक्र निरसोनि पावत ॥ योगी जैसा स्वरूपातें ॥९२॥
लंकेमाजीं विजयी जाहला ॥ म्हणून दक्षिणबाहू उभारिला ॥
रघुनाथें हनुमंत देखिला ॥ प्रसन्नवदन ते काळीं ॥९३॥
साधक साधूनी महानिधान ॥ दिसे जैसा सुप्रसन्न ॥
कीं सुधारस हरिलिया सुपर्ण ॥ विराजमाल परत जैसा ॥९४॥
कीं अमृतसंजीवनी अद्‌भुत ॥ साधूनि आला गुरुसुत ॥
सहस्राक्ष जैसा आनंदत ॥ सीतानाथ तोषला तैसा ॥९५॥
अयोध्यापति किष्किंधापती ॥ आसन सोडून पुढें धांवती ॥
तों लोटांगण घाली मारुति ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥९६॥
परम स्नेहाळू रघुनंदन ॥ मारुतीतें हस्तें उचलोन ॥
देता जाहला क्षेमालिंगन ॥ भरलें गगन आनंदें ॥९७॥
प्राणसखा हनुमंत ॥ हृदयीं धरी रघुनाथ ॥
पुढतीं सोडावा हा हेत ॥ मनामाजी उपजेना ॥९८॥
असो हनुमंतासी क्षेम देऊनी ॥ सकळ कपींसी भेटे चापपाणी ॥
जांबुवंत अंगद प्रीतीकरूनी ॥ हृदयीं धरिलें रघुत्तमें ॥९९॥
सुग्रीवें धांवोनियां प्रीतीं ॥ हृदयीं धरिला मारुती ॥
कीं इंद्रासी भेटला बृहस्पती ॥ आलिंगन शोभलें तैसें ॥२००॥
मग राजाधिराज समर्थ ॥ सभा करूनि बैसला रघुनाथ ॥
तेव्हां मणि आणि ब्रह्मलिखित ॥ पुढें ठेविलें हनुमंतें ॥१॥
मग आनंदें सकळ वर्तमान ॥ दंडी ऋषिपुत्रापसून ॥
पुढें सुप्रभेचें उद्धरण ॥ तेंही कथिलें तेधवां ॥२॥
पुढें समुद्रतीरपर्यंत ॥ अंगदें कथिलें समस्त ॥
शुद्धि नव्हे म्हणोनि अद्‌भुत ॥ अग्न चेतविला वानरीं ॥३॥
प्राण देतां अग्नीमाझारी ॥ हनुमंतें रक्षिलें ते अवसरीं ॥
मग संपाती भेटला समुद्रतीरीं ॥ तेणें शुद्धि सांगितली ॥४॥
याउपरी वायुकुमर ॥ शतयोजनें उडाला सागर ॥
पुढें लंकेत झाला जो समाचार ॥ तो हनुमंत न सांगेचि ॥५॥
मग रामें हनुमंताकडे पाहिलें ॥ तंव येरू म्हणे जे वर्तमान जाहलें ॥
तें विरिंचीनें असे पत्रीं लिहिलें ॥ निजहस्तें करूनियां ॥६॥
जगद्वंद्या अयोध्यापति ॥ सुखरूप आहे सीता सती ॥
मणि खूण दिधला माझे हातीं ॥ परम सद्रद होऊनियां ॥७॥
अंतरखूण सांगितली ॥ मनसीळ लाविला माझिये भाळीं ॥
रघूत्तमें ऐकतां हृदयकमळीं ॥ तये काळीं गहिंवरला ॥८॥
मणि हृदयीं धरून रघुनाथ ॥ अत्यंत जाहला शोकाकुलित ॥
अहा सीता म्हणोनि बोलत ॥ देखतां अर्कज गहिंवरला ॥९॥
हनुमंत म्हणे रघुराजा ॥ सुखी आहे जनकात्मजा ॥
परी तुझ्या वियोगें भरताग्रजा ॥ अत्यंत कृश जाहली असे ॥२१०॥
म्यां मुद्रिका दिधली नेऊन ॥ ते मनगटीं खेळे जैसें कंकण ॥
मग म्हणे रघुनंदन ॥ केंवी प्राण उरला असे ॥११॥
रघुपति तुझें नामामृत ॥ तेणें जानकी वांचली सत्य ॥
जैसा शशांक राहुग्रस्त ॥ चिंतेनें तैसी झांकिली ॥१२॥
मग बोले तमालनीळ ॥ कैसा तरलासी समुद्रजळ ॥
यावरी अंजनीचा बाळ ॥ काय बोलता जाहला ॥१३॥
तुझिये मुद्रिकेचें अद्‌भुत बळ ॥ क्षणें जिंकवेल कळिकाळ ॥
नखाग्रीं समुद्रजळ ॥ सांठविजेल सर्वही ॥१४॥
मग विरिंचीचें लिखित पत्र ॥ सौमित्राजवळी देत राजीवनेत्र ॥
वाचिता जाहला भोगींद्र ॥ सावधान वानर ऐकती ॥१५॥
स्थिर राहिला समीर ॥ ऐकावया विरिंचिपत्र ॥
सौमित्रें उकलिलें साचार ॥ जेवीं चंद्र पौर्णिमेचा ॥१६॥
जो सरस्वतीचा जनिता ॥ त्याचिया अक्षराची कौशल्यता ॥
कोणासी न वर्णवे तत्वतां ॥ तें श्रोतीं आतां परिसावें ॥१७॥
परब्रह्म केवळ रघुवीर ॥ त्यासी ब्रह्मदेवें लिहिलें पत्र ॥
तें ब्रह्मांनंदकृपें श्रीधर ॥ अति पवित्र वर्णींल पैं ॥१८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥
सदा परिसोत भक्त चतुर ॥ एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२१९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥




GO TOP