॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चौतिसावा ॥
ब्रह्मदेवाचे लंकेला आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥


पूर्वप्रसंगीं दशाननपुत्रें । धरोनि नेले इंद्रातें ।
तें देखोनि सुरवर दुःखाते । पावले बहुत संग्रामीं ॥१॥
समस्त सुरवर मिळोन । येवोनि प्रार्थिला चतुरानन ।
म्हणती भ्रष्ट झालें अमरसदन । इंद्र धरून नेला लंकेसीं ॥२॥
तुझिये वरदें राक्षस । उन्मत्त झाले बहुवस ।
तेणें मेघनादें आम्हांसि देवोनि त्रास । लंके अमरेश शरून नेला ॥३॥
ऐकोनि देवांचें वचन । आश्चर्य पावला चतुरानन ।
मग समस्त देव मिळोन । लंकाभवन पावले ॥४॥
ब्रह्मा आला ऐकोन वाणी । राक्षसराज सामोरा येवोनि ।
पूजा अभिवंदने करोनि । मग ब्रह्मा मंदिरासी नेला ॥५॥
रावण म्हणे जी स्वाभिनाथा । कोणीकडे आलेती समर्था ।
येरू म्हणॆ तुझ्या पुत्राची प्रशंसता । ऐकोनि येथें पैं आलो ॥६॥
तुझिया पुत्राचा पराक्रम । ऐकोनि सुख झालें परम ।
याचे तुळणेसीं वीरीं विक्रम । ब्रह्मांडामजि पैं नाहीं ॥७॥
येणें जिंतोनि त्रिभुवन । केलें सर्व आपणाअधीन ।
प्रतिज्ञा येणें सत्य करुन । इंद्रा बांधोन आणिलें ॥८॥
याच्या देखोनि पुरुषार्थातें । मी प्रसन्न झालों जाण येथें ।
जो मागसी त्या वरातें । ये काळीं मी देईन ॥९॥
इंद्र आणिला जिंतोन । यास्तव इंद्रजीत हें अभिमान ।
मग म्हणे दशानन जाण । तुझा पुत्र परम भाग्याचा ॥१०॥
या इंद्रातें करोनि मुक्त । स्थापीं आपुला आज्ञांकित ।
देवांसहित हा अंकित । झाला असे समरांगणीं ॥११॥

अमरत्वाची मेघनादाची मागणी :

ऐकोनि प्रपितामाहाचें वचन । काय बोलिला मेघनाद आपण ।
म्हणे स्वामी झालासी प्रसन्न । तरी अमरपण मज देईं ॥१२॥
जरी मज अमरत्व देसी । तरी मी सोडीन इंद्रासी ।
मी आणिक तुजपासीं । मागत नाहीं पदार्थ ॥१३॥
मेघनादमुखींचे वचन । ऐकोनि ब्रह्मा हास्यवदन ।
काय बोलिला तें सावधान । श्रोतृजनीं परिसांवे ॥१४॥

ब्रह्मदेवाचे प्रतुत्तर :

ब्रह्मा म्हणे इंद्रजिता अवधारीं । जन्मला जननीजठरीं ।
तयासि काळ पैं मारी । अमरत्व कैसेनि लाधेल ॥१५॥
जो आकारातें आला । तो जाण नाशातें पावला ।
जो जननीजठरीं नाहीं आला । तो अमर झाला सर्वस्वें ॥१६॥
नादबिंदा होतां भेटी । तो गर्भ वाढे मातेच्या पोटीं ।
जातक वर्तविती शेवटीं । तो जाईल निश्चितीं जाणिजे ॥१७॥
मार्कंडेय भृशुंडी रोमहर्षक । हंस कूर्म बहु आयुष्य़ाचे जाण ।
परी ते काळे जर्जर करून । मरणमागीं लाविले ॥१८॥
आणि स्थावर जंगम चराचर भूतें । हींही पावती लयातें ।
मी सृष्टिस्रजिता परी मातें । काळ न सोडी जाणावें ॥१९॥
मरण चुकावें म्हणोन । हिरण्यकशिपें केला प्रयत्‍न ।
परी शेवटीं तो निधन । यथाकाळीं पावला ॥२०॥
याकारणें गा राजकुमारा । प्रारब्धी लिहिलें न चुके चतुरा ।
चतुष्पद द्विपद तेही मरणद्वारा । काळाच्या घरा जातील ॥२१॥

इंद्रजिताने वर मागून घेतला :

ऐकोनि चतुराननाचें वचन । इंद्रजित म्हणॆ ऐका विज्ञापन ।
तुमच्या बोलें इंद्रा सोडीन । परी मागेन ते द्यावे ॥२२॥
वैरियासीं युद्ध रितां समरांगणीं । संकट माडल्या मज रणीं ।
होम करीन मंत्र जपोनी । अवदानें अग्नि संतुष्ट ॥२३॥
होम करीन शत्रुविजयार्थ । तेथोनि निघावा अश्वासहित रथ ।
त्यावरी बैसतां मज अमरत्व । सहज होईल ते काळीं ॥२४॥
ऐसा माझा मनोरथु । सिद्धि पावावयां तूं समर्थु ।
ब्रह्मा म्हणॆ तथास्तु । चिंतिलें पावसी राजपुत्रा ॥२५॥

इंद्राची सुटका व त्याचे स्वलोकी गमन :

तदनंतरें मेघनादें । इंद्रा सोडिले अति आल्हादें ।
सकळ देवांसी सुरेंद्रें । अमरावतीस गमन केलें ॥२६॥
तयाउपरी श्रीरघुपती । शक्र येवोनि स्वलोकाप्रती ।
चिंतातुर होवोनि श्रमांतीं । मुख अत्यंत कोमाइलें ॥२७॥
लज्जान्वित चिंतातुर मन । ते समयीं चतुरानन ।
म्हणता झाला पूर्वदृष्कृतस्मरण । आठवी गा अमरेंद्रा ॥२८॥
म्यां विधात्यानें पुरंदरा । रचिलें या चराचरा ।
नरां सदृश केलें नरां । स्त्रियांसारिख्या स्त्रिया केल्या ॥२९॥

अहल्येची कथा :

कोणी न देखेच सुंदर । मग झालों चिंतातुर ।
मग म्यां भूटें केलीं नानाकार । जंगमादिस्थावरपर्यंत ॥३०॥
या समस्तांचें सुंदरपण । एकवटिलें न लागतां क्षण ।
तयांचें करीन कन्यारत्‍न । निश्चय पूर्ण मनीं केला ॥३१॥
विधाता म्हणे ते अवसरीं । सौंदर्याची निर्मिली कुमरी ।
नाम अहल्या सुंदरी । पुढें कैसी झाली परी तें ऐका ॥३२॥
अहल्येची यापरी उत्पत्ती । झालीसे गा अवनिजापती ।
तिचा पिता विधाता म्हणती । प्रसिद्ध शास्त्रीं बोलिजे ॥३३॥
धरणिजापति म्हणे इल्वलारी । तुवां उदधि प्राशिला आचमनेंकरीं ।
विंध्याद्रि निजविला पृथ्वीवरी । अद्यापवरी देखतसों ॥३४॥
यास्तव मागें महामुनी । अहल्येची उत्पत्ति ऐकिली कानीं ।
परंतु पुनः तुझ्या मुखेंकरूनीं । ऐकावी म्हणॊनि पुसतसें ॥३५॥
अगस्ति म्हणे अयोध्यापती । दिवसेंदिवस झाली वाढती ।
वर मिळाले पृथ्वीपती । देवगंधर्व ऋषीश्वर ॥३६॥
ऐसे समस्त मीनले । चंद्र चंद्र यम सूर्य आले ।
तपोधनही तेथें मिळाले । कन्याशा मनीं धरोनि ॥३७॥
ऐसें जाणॊनि चतुरानन । करिता झाला एक पण ।
म्हणे प्रथम येईल मेरुप्रदक्षिणा करून । त्यासी देईन अहल्या ॥३८॥
ऐकोनि ब्रह्मयाची वचनोक्ती । समस्त चालले प्रदक्षिणार्थी ।
इंद्र चढोनि ऐरावतीं । लाहेलाहें निघाला ॥३९॥
वरकड समस्त ऋषीश्वर । प्रदक्षणेसीं निघाले सत्वर ।
मागें गौतमें काय केले चतुर । पंडित जनीं अवधारिजे ॥४०॥
गोप्रसूतिकाळ देखोन । उभयतोमुखीतें प्रदक्षिणून ।
आला चतुराननें जाणॊन । कन्यादान गौतमा केलें ॥४१॥
प्रदक्षिणा करोनि सकळ सुरवर । तयांपुढें आला इंद्र ।
तंव अहल्येसी सांगे गौतम भ्रतार । देखोनि इंद्र कोपला ॥४२॥
इंद्र म्हणे ब्रह्मयासी । आम्हांहूनि शक्ति गौतमासी ।
आधीं आला म्हणॊनि अहल्येसीं । कन्यादानासी पैं केलें ॥४३॥
चतुरानन म्हणॆ अमरनाथा । गोप्रसूतिकाळीं येणें तत्वतां ।
प्रदक्षिणा केली ती मेरुसीं समता । म्हणॊनि दुहिता तया दिशली ॥४४॥
उभयतोमुखींची प्रदक्षिणा । ते मेरूप्रदक्षिणेसमान ।
ऐसें जाणोनि कन्यारत्‍न । गौतमालागोन दिधलें ॥४५॥
यापरी अहल्यापाणिग्रहण । गौतमासी झालें जाण ।
तो राग इंद्रे मनीं धरून । कपटें छळण मांडिलें ॥४६॥
अहल्येसीं गौतमें जाण । सूर्यग्रहणीं केले स्नान ।
पुढें अहल्या आश्रमीं एकटी जाण । तें संधीं इंद्र प्रवेशला ॥४७॥
स्नान करोनि अहल्या मंदिरीं । एकली असता इंद्र पापाचारी ।
गौतमवेष शरोनि ते अवसारीं । कामसंचारी प्रवेशला ॥४८॥
रति मागोनि तियेसी । इंद्र विचरता अधर्मासी ।
तंव द्वारीं योवोनि उभा ऋषी । दोहींच्या संयोगासी देखिलें ॥४९॥
देखोनि दोहींचे पापाचरण । ऋषीनें दोघां शाप दारुण ।
देवोनि तपा निघाला जाण । त्याचें शाप लक्षण अवधारा ॥५०॥
अहल्या विनवी कर जोडूण । इंद्र तुमचे वेषे रमोन ।
मन न कळेचि कपटपण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥५१॥
ऐकोनि अहल्येचें वचन । तत्काळ द्रवला तो कृपाघन ।
म्हणे इक्ष्वाकुकुळीं रघुनंदन । स्वयंवरा जातां उद्धरील स्पर्शे ॥५२॥
परद्वारिणी परम नष्टॆ । परपुरुषासीं रमलीस भ्रष्टे ।
शीघ्र शिळा होईं पापिष्ठे । या आश्रमामाझारीं ॥५३॥
अहल्या जाहली शिळा । भगें आलीं इंद्राच्या कपाळा ।
यालागीं कोणी कोणाचे छळा । न प्रवर्तावें देवेंद्रा ॥५४॥
शिळारूपें तपःस्थिती । केली अहल्येने नेमस्ती ।
उत्कृष्ट तप जाणॊनि रघुपतीं । चरणस्पर्शे उद्धरिली ॥५५॥
पुनीत झाली देखोनि अंगना । गौतमें अंगीकारिली जाणा ।
पुढें इंद्रा तुझ्या कथना । सावधाना अवधारीं ॥५६॥
ऋषिशापें गेली कळा । हीनत्व आलें वीर्यबळा ।
मुकलासी ऐश्वर्य सकळा । बांधोनि गळां राक्षसीं नेला ॥५७॥
तया पापाचें फ़ळ । तुज प्राप्त झालें प्रबळ ।
जैसी निर्दैवांला अवदशा केवळ । ठाकोनि ये घर पुसत ॥५८॥
जैसी निर्दैवाची संपत्ती । विषयासक्ताची तपःस्थिती ।
नपुंसकाची घरवादप्रीती । अंधाप्रती दीप जैसा ॥५९॥
परांगनास्पर्शाचेनि पापें । तुझी संपत्ती यश हरपे ।
क्रियाभिमान तुझा करपे । दुःखे अमूपें भोगिसी ॥६०॥
तुझें राज्य न होईल स्थिर । तूं हिंडसी देशदेशांतर ।
मनुष्यलोकीं तुज स्थिर । वास नोहे रहावया ॥६१॥

ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून इंद्राने यज्ञ केला :

ब्रह्मा म्हणॆ इंद्राप्रती । तूं याग करीं विष्णुप्रीत्यर्थ ।
तेणें तुज यश कीर्ती । आणि श्रीमंती पावसी ॥६२॥
विष्णुप्रीत्यर्थ करीं यज्ञ संतृप्त होती देवब्राह्मण ।
तेणॆं तुज होय कल्याण । हितवचन मी सांगतो ॥६३॥
तुझा पुत्र धरोनि नेला । तो क्षीरसागरीं स्वस्थ राखिला ।
तयाची ग्लानि वेळोवेळां । निजमानसीं धरूं नको ॥६४॥
इतुकें ब्रह्मयाचें ऐकोनि वचन । इंद्रें याग आरंभिला प्रीत्यर्थ भगवान ।
आचार्य अध्वर्या पाचारून । दीक्षाग्रहण पैं केलें ॥६५॥
गार्हपत्य दक्षिण आहवनी । तिन्ही अग्नि स्थापिले तिहीं स्थानीं ।
आचार्य ब्रह्मा मिळोनि । यापरी याग साधिला ॥६६॥
इंद्रें करोनि अवभृथस्नाना । ब्राह्मणां दिशलें कोटिगोदानां ।
सुखी केलें विश्वजना । श्रीभगवानाप्रीत्यर्थ ॥६७॥
यापरी यज्ञ सिद्धी पावला । सकळां देवां संतोषा झाला ।
तदनंतरे पुष्पवर्षाव केला । महावाअद्यें वाजविलीं ॥६८॥
येरीकडे श्रीरघुपती । थोर विस्मयो झाला चित्तीं ।
म्हणे अगा ये स्वामी अगस्ती । हरीची माया दुर्धर ॥६९॥

मायेची दुर्धरता :

मायेंनें इंद्रा छळिलें । पराशराचें तप ढालिलें ।
शंकराहातीं नरपाळ दिधलें । भिक्षा मागे घरोघरीं ॥७०॥
चंद्रासी कळंक लाविला थोर । शापें भस्म केले सगर ।
सरस्वती पाठीं लागला पितर । जो चराचरांचा पैं कर्ता ॥७१॥
पांडवां देशवता भारी । हिंडती दीनें वनांतरीं ।
भृगूची पुलोमा सुंदरी । मायावी दैत्य नेत होता ॥७२॥
द्रौपदी पतिव्रताशिरोरत्‍न । तीसही कष्ट झाले गहन ।
चांडाळ कौरवीं वस्त्रे हिरोन । सभेमध्ये उभी केली ॥७३॥
ऐसे मायेचें विंदान । सुरवरां न कळेचि लक्षण ।
तेथें आम्ही रंक दीन । काय जाणॊं मायेतें ॥७४॥
ऐसं बोलिला श्रीरघुपती । तया उत्तर दे अगस्ती । पु
ढिले अध्यायीं तयाची स्थिती । तयाप्रती सांगेल ॥७५॥
एका जनार्दना शरण । इंद्राहल्येचें आख्यान ।
सांग जाहलें संपूर्ण । जनार्दन निजनकृपा ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
इंद्राहल्याख्यानं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥ ओव्यां ॥७६॥

GO TOP