॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥


॥ श्रीभावार्थरामायण ॥


युद्धकांड


॥ अध्याय पंचाहत्तरावा ॥
शिवलिंगासह मारुतीचे आगमन -


॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मुक्त करोनि जनस्थान । ब्राह्मणां दिधलें दान ।
सुग्रीवासी किष्किंधाभुवन । सेतुबंधन सागरीं ॥ १ ॥
अगाधबोध रघुनाथा । हें हनुमंतवचन ऐकतां ।
संतोष झाला उमाकांता । होय सांगता पूर्ववृत्त ॥ २ ॥


श्रीशंकर मारुतीला विंध्याद्रीची कथा सांगतात :


ब्रह्मपुत्र श्रीनारद । सर्वेंद्रियब्रह्मबोध ।
ब्रह्मवीणासुस्वरनाद । नित्य आनंद ब्रह्मपदीं ॥ ३ ॥
ब्रह्मानंदें डुल्लतु । ब्रह्मसृष्टीं विचरत ।
भुवनें भुवन हिंडत । अधिकारियां देत परब्रह्म ॥ ४ ॥
उन्मत्तांसीं करोनि दंड । स्वेच्छा विचरत ब्रह्मांड ।
देखोनि विंध्याद्रि प्रचंड । आला नारद भेटीसीं ॥ ५ ॥
येरू उठोनि अति प्रीतीं । लोटांगण घातलें क्षितीं ।
पूजा करोनि नम्रवृत्तीं । स्वयें विनंती करीतसे ॥ ६ ॥
कोठोनि येणे झालें स्वामी । काय अपूर्व कोण भूमीं ।
कोणाच्या ठायीं कोण लक्ष्मी । बाहुल्ये तुम्ही देखिली ॥ ७ ॥
कोण कोण पर्वत । कोण ऐश्वर्ये वर्तत ।
सांगावें मज इत्थंभूत । कृपान्वित स्वामिया ॥ ८ ॥
तुम्हांसी सर्वत्र गमन । म्हणोनि केलें विज्ञापन ।
तुम्हांसी त्रैलोक्यीं वर्तन । कृपा करोन सांगावें ॥ ९ ॥
ऐकतां विंध्याद्रीची वाणी । हांसिन्नला नारदमुनी ।
यासी गर्व बहुसाल मनीं । समर्थपणीं वर्तत ॥ १० ॥
रत्‍नें प्रवाळनिकर । नाना धातु विचित्र ।
जळस्रोत परिकर । औषधि विचित्र पर्वतीं ॥ ११ ॥
चंपक चंदन मांदार । कल्पतरूंचे आगर ।
चिंतामणि सविस्तर । पर्वतीं अपार पसरले ॥ १२ ॥
खिल्लारे कामधेनूंचीं । पर्वतीं हिंडती सैरची ।
तेणें दृष्टि फिरली बुद्धीची । वाढला उंची अति गर्वे ॥ १३ ॥
जेथें धनधान्यसमृद्धी । तेथें विषयीं घोर बुद्धी ।
विषाहूनि विषयबुद्धी । अधिक त्रिशुद्धी घातक ॥ १४ ॥
विष खादलिया एकदां मरे । विषये कोट्यानुकोटी फेरे ।
भोगिताती योनिद्वारें । परी माघारें न सरती ॥१५ ॥
ऐसी विषयमद्यजाती । ते चढलीसे पर्वतीं ।
याची झडे गर्वस्थिती । तैसी युक्ती करावी ॥१६ ॥
ऐसें नेमूनि मानसीं । स्तवूं आदरिलें मेरूसी ।
समृद्धि सांगों तुझिया ऐसी । अधिक त्यासीं कोटिगुणें ॥ १७ ॥
सप्तऋषि त्यासीं जाण । नित्यकरिती प्रदक्षिण ।
वैकुंठ कैलासाहूनि गहन । संपत्ति जाण मेरूची ॥ १८ ॥
याचकांचे इच्छेवरी । मेरूच्या दातृत्वाची थोरी ।
पार नाहीं त्याचे गंभीरी । सुरासुरीं वानिजे ॥ १९ ॥
ब्रह्मा विष्गु उमाकांत । त्याची आज्ञा शिरीं वाहत ।
इंद्र त्याचा शरणागत । समृद्धि मागत तयापासी ॥ २० ॥
या ब्रह्मांडामाझारी । मेरुपर्वतासम सरी ।
सभाग्य नाहीं चराचरीं । अगाध थोरी मेरूची ॥२१ ॥
ऐसें सांगूनि नारदमुनी । स्वयें निघाला तत्क्षणी ।
ब्रह्मवीणा झणत्कारूनी । स्वेच्छागमनीं चमकला ॥२२ ॥
ऐकतां नारदाची मात । विंध्याद्रि झाला चिंताक्रांत ।
चढला अभिमान पोटांत । वाढला अद्‌मुत आकाशी ॥ २३ ॥
गति खुंटली रविशशी । ग्रहगणें झालीं पिशीं ।
नक्षत्रांची गति कायसी । कासाविसी सुरसिद्धां ॥ २४ ॥
खुंटले सकळ दिनमान । गडद पडलें दारुण ।
खुंटलें याजन यजन । सत्कर्म जाण खुंटलें ॥२५ ॥
क्षुधा पीडिले सुरवर । याग खुंटले समग्र ।
कासावीस ऋषीश्वर । कर्ममात्र स्फुरेना ॥२६ ॥
खुंटली दिनमानाची गती । उदय अस्त न कळे सर्वार्थीं ।
सकळ लोक तळमळती । कांही युक्ती स्फुरेना ॥२७ ॥
पडिला घोर अहंकार । खुंटला सकळ व्यवहार ।
ब्रह्मा हरि हर इंद्र चंद्र । चिंतातुर पैं झालें ॥२८ ॥
मिळोनी सकळ समुदायेंर्सी । ठाकोनि आले काशीपुरासी ।
लोटांगणीं अति प्रीतीसीं । चंद्रचूडासी भेटले ॥ २९ ॥
करोनियां विचित्र स्तवन । सांगते झाले विवंचन ।
गिरी वाढोन असाधारण । केले रोधन सकळांसी ॥ १३० ॥
खुंटली सकळांची गती । उदय अस्त न दिसती ।
सर्वथा न कळे दिनराती । कर्म सर्वार्थी राहिले ॥ ३१ ॥
राहिली यागादि क्रिया । लंघन पडिलें सुरवर्या ।
वेगी करोनि कुढाविया । स्वामिया प्राण संरक्षी ॥३२ ॥
ऐसी करितां विनवण । मजही चिंता दारुण ।
वर्तली पैं असाधारण । युक्ति हो जाण खुंटली ॥३३ ॥
तंव नारद पातला तेथ । तेणें सांगितलें सकळे वृत्त ।
ऐकोनि मेरूचें आचरित । गर्वे पर्वत वाढला ॥ ३४ ॥
त्या गर्वपरिहारासी । प्रार्थोनियां अगस्तीसीं ।
पाठवितां दक्षिणेसीं । तो पर्वतासी दंडील ॥ ३५ ॥
मार्ग मागोनियां पर्वता । त्यासी घालील पालथ ।
तेणें निर्मुक्ति समस्तां । शशिभास्वतां सुखें गमन ॥ ३६ ॥
गर्वहरण पर्वतासीं । निर्मुक्ति सकळ कर्मांसी ।
संपादन यागादिकांसी । तृप्ति सकळांसी होईल ॥ ३७ ॥
ऐसें नारदें सांगतां । सकळांचिया मानलें चित्ता ।
बुद्धी योजिली तत्वतां । आनंद चित्ता पैं झाला ॥ ३८ ॥
एका कार्ये दोनी अर्थ । संपादती इत्थंभूत ।
दंडकारण्य समस्त । अगस्ती निश्चित वसवील ॥ ३९ ॥
ऐसा करोनि निर्धार । विनविला तो मुनिवर ।
स्तुति करोनि विचित्र । प्रसन्नवक्त पै केला ॥ ४० ॥
प्रसन्न करोनियां ऋषी । विनविते झाले प्रीतीसीं ।
तुम्हीं जावे दक्षिणेसीं । दंडकारण्यासीं वसवावया ॥ ४१ ॥
दंडकाच्या शापें दारुण । उद्वस झालें तें वन ।
राक्षस येवोनि आपण । केलें रोधन वनाचें ॥ ४२ ॥
राक्षसांच्या भयें पूर्ण । राहिलें दक्षिणतीर्थाटन ।
तुम्हीं तेथें केल्या गमन । सुखें तें वन वसेल ॥ ४३ ॥
जेथें राहिले साधुसंत । तें स्थळ अति पुनीत ।
भूत प्रेत पिशाच तेथ । राक्षस समस्त पळतील ॥ ४४ ॥
दंडावया राक्षसांसी । परब्रह्म अनुग्रह तुम्हांसी ।
देखतांचि तयांसी । प्राणांत त्यांसी सहजचि ॥ ४५ ॥
जेथें ब्रह्मनिष्ठ राहती । तेथें सजीव निर्जीवपंक्ती।
त्यासीं अनायासें नित्य मुक्ती । सत्संगतीपासाव ॥ ४६ ॥
राक्षसांची क्रूरता । आणि भूतांची विषमता ।
दृष्टी पडतां साधुसंतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥ ४७ ॥
ऐसें साधूंचे सामर्थ्य । ते स्वयें तुम्ही वसतां तेथ ।
दंडकारण्य अत्यस्तुत । नित्यमुक्त होईल ॥ ४८ ॥
राक्षस उद्धारती समस्त । पांथिकां मार्ग निर्मुक्त ।
तीर्थवासी तीर्थ पावत । उद्धार समस्त जड जीवां ॥ ४९ ॥


काशी सोडावी लागणार म्हणून अगस्तींना दुःख:


ऐसै सांगतां तयासी । मूर्च्छा आली अगस्तीसीं ।
भूमीं आदळला वेगेंसीं । अति दुःखासी पावला ॥ ५० ॥
निदैव निजलिया पाहें । स्वप्नी सांपडे धनलोहे ।
जागा होतां हातींचें जाये । तैसें पाहें मज झालें ॥ ५१ ॥
कोणें भाग्ये अनायासीं । मज प्राप्त झाली काशी ।
सवेंचि ओढवल्या पापराशी । दुःख कोणासी मी सांगों ॥ ५२ ॥
न लागतां तपसायास । योग याग व्रत उपवास ।
करिता वाराणसीवास । मोक्षसुखास पाविजे ॥ ५३ ॥
पात न करितां पडणीं । कर्वत न भेदितां मूर्ध्नी ।
वासू करितां महाश्मशानी । सुखसमाधानीं महामोक्ष ॥ ५४ ॥
अंध पंगु मुकें पाहीं । ज्यांसी साधनाचा गंध नाहीं ।
काशीवास करितां तिहीं । सुखें पाही निजमोक्ष ॥ ५५ ॥
ऐसें वाराणसीचे महिमान । म्हणोनि विश्वास धरोन ।
राहिलों होतों वास करून । तंव महाविघ्न ओढवलें ॥ ५६ ॥
मज सांडितां काशीभुवन । तेचि काळी देहपतन ।
विश्रेश्वरदर्शनावांचून । न वांचती प्राण सर्वथा ॥ ५७ ॥
नित्य मणिकर्णिकेचें स्नान । विश्वेश्वराचे दर्शन ।
सांडूनि माझें न निघे मन । क्षणें प्राण जातील ॥ ५८ ॥
म्हणोनि चालिलें स्फुंदन । कंठीं बाष्प दाटलें पूर्ण ।
नेत्रीं चालिलें जीवन । तेणें दृश्यभान लोपलें ॥ ५९ ॥
वाचा झाली सद्‌गदित । प्राण पांगुळला जेथीचा तेथ ।
टकमकीत समस्त । जेथींच्या तेथ पै झाले ॥ ६० ॥
कैंचा ओढवला रावण । कैंचे रोधिलें अरण्य ।
काशीत्यागाचें वचन । तें दारुण विघ्न मजकडे ॥ ६१ ॥
काशीत्यागाची वार्ता । ऐकतां अगस्तीच्या चित्ता ।
झाली परमावस्था । प्राण तत्वता जाऊं पाहे ॥ ६२ ॥
ते काळीं सुरवर । झाले सकळ चिंतातुर ।
अळूमाळ न स्फुरे विचार । कार्य समग्र राहिलें ॥ ६३ ॥
विंध्याद्रि नावरे कांहीं । रविचंद्रां गति नाहीं ।
दंडकारण्याचे ठायीं । गमन तेंही पै नव्हे ॥ ६४ ॥
न सांडवे क्षेत्र काशी । वियोग न साहवे विश्वेशाशी ।
त्यागोनि जातां मणिकर्णिकेसी । दुःख अगस्तीसीं अनिवार ॥६५ ॥
त्या काळी म्यां आपण । उभय संकट जाणोन ।
अगस्तीसीं विनवण । प्रीतिकरोन पै केली ॥१६६ ॥


श्रीशंकरांकडून अगस्तींची प्रार्थना :


ऐक अगस्ति मुनिनाथा । चिंता न करावी सर्वथा ।
तुझ्या वियोगाची व्यथा । सकळ तत्वतां निरसेल ॥ ६७ ॥
विंध्याद्रि वाढला बहुवस । निरोधिलें उदयास्तास ।
सत्कर्म तेणें पडिलें ओस । याग अशेष राहिले ॥ ६८ ॥
तेणें पीडिले सुरगण । सुधेनें जाऊं पाहे प्राण ।
कांहीं न चले विंदान । म्हणोनि विनवण करूं आले ॥ ६९ ॥
निग्रहावया विंध्याद्रीसीं । वसवावया दंडकारण्यासी ।
सामर्थ्य नाहीं आणिकांसी । शरण तुम्हांसी ते आले ॥ ७० ॥
तरी शरणागतां शरण्य । साचार तुम्ही साधू सज्जन ।
सेवितां तुमचे श्रीचरण । भवबंधन लागेना ॥ ७१ ॥
तेथें इतर संकट बापुडें । केंवी राहे सत्संगापुढें ।
तुमचे कृपादृष्टीपुढें । भवसांकडें राहेना ॥ ७२ ॥
इतरीं दंडाचे पर्वतासी । तरी स्वधर्मनिष्ठ अहर्निशीं ।
सत्ता न चले स्वधर्मनिष्ठासीं । युक्तीने त्यासीं आवरावे ॥ ७३ ॥
धर्मिष्ठाचा निश्चियो जाणा । विश्वासावें साधु सज्जनां ।
सर्वस्व अर्पितां सज्जनां । निजमनाचा उल्लास ॥ ७४ ॥
याकारणें स्वामी आपण । सत्वर करोनियां गमन ।
पर्वतांचे आकर्षण । युक्ति करोन साधावें ॥ ७५ ॥
मार्ग मागोनि तयासी । नमन करावे दक्षिणेसीं ।
जातां आता करावी ऐसी । पुनरागमनेंसी ऊठिजे ॥ ७६ ॥
दक्षिणे करोनि गमन । वसवावें दंडकारण्य ।
रुद्रगयादि तीर्थदर्शन । दिनांसीं आपण करावें ॥ ७७ ॥
वाराणसीच्या वियोगासीं । सर्वथा न धरावे मानसीं ।
ब्रह्मरूप आचरतां कर्मासी । मुक्ति तुम्हांसी ओळंगती ॥ ७८ ॥
कोण तें म्हणसी ब्रह्म । ब्रह्मरूप ते कैसे कर्म ।
मुक्तीचे तें कैसे वर्म । ऐक ऐक सुगम सांगेन ॥ ७९ ॥


शांतं ब्रह्मवपुर्भूत्वा कर्म ब्रह्ममयं कुरु ।
ब्रह्मार्पणसमाचारो ब्रह्मीभवसि तत्क्षणात् ॥ १ ॥


ब्रह्मस्वरूपाचे विवेचन :


काम क्रोध सलोभता । तेथें नि:शेष नातळे चित्ता ।
त्या नांव ब्रह्मशांतता । जाण सर्वथा ऋषिवरा ॥ ८० ॥
कामक्रोधलोभरहित । सर्व काळीं सर्वगत ।
अंतर्बाह्य सदोदित । असे व्याप्त आनखाग ॥ ८१ ॥
भेदोनि सप्तपाताळांसी । वैकुंठादिक कैलासासी ।
रिता अवकाश नाहीं ज्यासी । शांतब्रह्म त्यासी पै म्हणती ॥ ८२ ॥
तयें व्यापकीं होवोनि निमग्न । आचरतां सकळ कर्माचरण ।
सर्वथा न बाधी मानाभिमान । कर्मबंधन तेथें कैंचें ॥ ८३ ॥
मुख्य बद्धतेचें आयतन । अहंता आणि ममता जाण ।
असावें जरी परिच्छिन्न । तरी बाधा पूर्ण तयांची ॥ ८४ ॥
जेथें परिच्छिन्नासी नाहीं ठावो । तेथें अहंममता समूळ वावो ।
बद्धतेचा अभावो । विरमे पहा हो मुक्तिही ॥ ८५ ॥
जेथें बद्धता समूळ नाहीं । तेथें मुक्तता कैंची कायी ।
ब्रह्मरूप कर्माच्या ठायीं । ऐसा लाभ पाहीं साधका ॥ ८६ ॥
जेंवी सागराच्या लहरी । अद्वैतें क्रीडती सागरीं ।
स्कृरण नाहीं तिळभरी । ब्रह्मामाझारी कर्म तैसें ॥ ८७ ॥
जेंवी रत्‍नांचे रत्‍नकीळ । ररत्‍नापुढें अति चपळ ।
अद्वैतशोभा अति प्रबळ । ब्रह्मीं केवळ कर्म तैसें ॥ ८८ ॥
येणें अनुस्याने तत्त्वतां । सकळ कर्मीं वर्तता ।
स्फुरण नाहीं सर्वथा । ब्रह्मरूपता सहजचि ॥ ८९ ॥
देहांती काशीचे ठायीं । जें मी उपदेशीं लवलाहीं ।
तये निष्ठेचे ठायीं । अनायासें पाहीं निजप्राप्ति ॥ ९० ॥
काशीक्षेत्र एकदेशी । ब्रह्म सर्वगत सर्वदेशीं ।
तूं स्वयें तद्‌रूपच आहेसी । संदेह मानसीं न धरावा ॥ ९१ ॥


अगस्तींचा प्रश्न :


ऐसें ऐकतां माझें वचन । न मानीं अगस्तीचें मन ।
अति युक्ती केला तेणें प्रश्न । ऐक सावधान सांगेन ॥ ९२ ॥
ऐक स्वामी विश्वनाथा । जे सांगितली ब्रह्मसंस्था ।
तेणें अनुसंधानें असतां । मुक्ति अंकिता पै होती ॥ ९३ ॥
हें मी जाणतो यथार्थता । तेथें संदेह नाहीं सर्वथा ।
परंतु ऐसिये स्थितीचा वक्ता । अधिक तत्वतां त्याहूनि तो ॥ ९४ ॥
ज्याचेनि वचनें ब्रह्मस्थिती । काय सांगों त्याची महती ।
वेदो न वर्णवे निश्चितीं । वेडावती शास्त्रार्थ ॥ ९५ ॥
ऐकतां त्याच्या वियोगासी । स्वहितीं कळवळा ज्यासी ।
प्राणांत हो पाहे त्यासीं । ते वृत्तीसीं ठाव कैंचा ॥ ९६ ॥
चहूं वाचांसीं उपरम । मनासीं कल्पितां दुर्गम ।
तये वस्तूची सुगम । मूस परम ओतली ॥ ९७ ॥
जे असे सर्वदा अगोचर । ते असतां इंद्रियगोचर ।
सांडूनि जाय तो पामर । संसारपार केंवी पावे ॥ ९८ ॥


अगस्तीला शंकरांचा वियोग असह्य :


म्हणोनियां स्वामिनाथा । तुझा वियोग तत्वतां ।
मज न सहावे सर्वथा । बहुत आतां काय सांगूं ॥ ९९ ॥
याउपरी विनवितां । क्षोभ स्वामीचिया चित्ता ।
येईल पै याकरितां । युक्ति सर्वथा योजेना ॥ १०० ॥
जैसें मानेल स्वामीसी । तैसी आता करीं आम्हांसी ।
म्हणोनि लागला चरणाची । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ १ ॥
संकट पडिलें सर्वांसी । अगस्ति न सांडी वाराणसी ।
कोण निग्रही विंध्याद्रीसी । उदयअस्तांसी गति कैंची ॥ २ ॥
ते काळीं मी आपण । बहुतां युक्ती करून ।
अगस्तीसीं समाधान । दिधले जाण अति प्रीतीं ॥ ३ ॥
तुज शिवदर्शनाची आवडी । तद्विषयीं धडफुडी ।
युक्ति सांगेन चोखडी । ऐक निर्वडीं बुद्धि त्याची ॥ ४ ॥


वियोग होऊ नये म्हणून शंकरांनी सुचविलेली युक्ती :


श्रीरामदर्शनीं अवस्था । अत्यंत आहे माझ्या चित्ता ।
उभय कार्यसंस्था । साधे तत्वतां जाण पै ॥ ५ ॥
ऐसी सांगेन मी युक्ती । उभयार्थ संपादती ।
सुरवरांची उगवे गुंती । अवस्थानिवृत्ती सत्यत्वें ॥ ६ ॥
पूर्ण ब्रह्म सदोदित । दाशरथी श्रीरघुनाथ ।
जनस्थान करोनि मुक्त । रावणघात करूं येईल ॥ ७ ॥
त्रिशिरा आणि खर दूषण । यांसीं करोनि निर्दळण ।
दक्षिणे येवोनि रघुनंदन । समुद्रा पालाण पर्वतीं ॥ ८ ॥
निशाचरां करोनि घात । लंकेशाचा निःपात ।
सुरवरांसी बंदिमुक्ति । क्षणें रघुनाथ करील ॥ ९ ॥
त्रैलोक्यासीं विजयोत्सवो । स्वयें परतेल रामरावो ।
तेणें काळें आम्ही पहाहो । येवो स्वयमेव दर्शना ॥ ११० ॥


काशीविरहमापन्नो मा भैस्त्वं कलशोद्‌भव ।
भवदथे कग्ष्यिामि आवासं पूर्वसागरे ॥ २ ॥


रामदर्शनार्थ स्वतः आपण येऊ तेव्हा तुला दर्शन होईल :


कलशोद्‍भवा मुनिवराद् । काशीविरहें विरहातुरा ।
तुजलागीं पूर्व सागरा । वास निर्धारा करीन मी ॥ ११ ॥
सकळांचें पूर्व श्रीरघुनाथ । दक्षिणे येईल रावणवधार्थ ।
म्हणोनियां विश्वनाथ । पूर्व म्हणत तिये दिशे ॥ १२ ॥
श्रीरामदर्शनाचे मिषें । मी येईन तिये दिशे ।
तुवां जावें सावकाशें । चिंता मानसी न करवी ॥ १३ ॥


श्रीरामनामाक्षनशमंत्रबीजं जाप्यं मदीयं परमामृतं मे ।
समुद्रजातं आटलं वृथा कृतं ध्येयं मदीयं स तु रामचंद्र ॥ ३ ॥


शिवकृत नाममहिमा :


श्रीरामनामावांचून पाही । मज आन प्रिय नाहीं ।
तुज सांगेन मी तेही । सावध पाहीं परियेसी ॥ १४ ॥
रामनाम युग्म अक्षर । वाचेसीं येतां एकवार ।
सर्वांगीं अमृताचा पूर । वेगवत्तर चालिला ॥ १५ ॥
त्या अमृताचेनि तेजें देख । करपोनि गेलें व्याळविख ।
पन्नग झालें निर्विख । अळंकारें देख बाधितीना ॥ १६ ॥
अल्प पन्नगाची गरळ । त्याहूनि विशेष हळाहळ ।
समुद्रमंथनीं तत्काळ । उठले जगतीतळ जाळीत ॥ १७ ॥
पीडित सकळ सुरगण । यक्ष किन्नर सिद्ध चारण ।
ऋषी आदि दीनजन । भूमंडळ जाण जाळित ॥ १८ ॥
तेणें काळे म्यां आपण । श्रीरामनामाच्या बळें जाण ।
न लागतां अर्थ क्षण । कंठी जाण धरियेलें ॥ १९ ॥
अल्पही त्याची बाधा नाहीं । त्याहूनि अपूर्व आणीक कांहीं ।
प्रळयानळातें गिळीं लवलाहीं । प्रतापें पाहीं रामाच्या ॥ १२० ॥
प्रळयकाळीं प्रळयानळ । उठतां जाळी जगतीतळ ।
तितुकाहीं प्राशितां सकळ । मज अकुमाळ बाधीना ॥ २१ ॥
ऐसा श्रीरामनामप ्रताप । जेणें विषहळांहळताप ।
भस्म झाला आपोआप । तें परम जाप्य जाण माझें ।! २२ ॥
वदनीं जप श्रीराम पूर्ण । मनीं रामाचें निजध्यान ।
निःसीम इंद्रियाचरण । रधुनंदननिजसेवा ॥ २३ ॥
तो मूर्तिमंत रघुनंदन । भूमंडळी अवतरेल पूर्णे ।
त्याचें ध्यावया दर्शन । अवश्य जाण येईन मी ॥ २४ ॥
न घेतां श्रीरामदर्शन । भूमिभार वृथा जीवन ।
यालागीं मी आपण । येईन जाण भेटीसीं ॥ २५ ॥
तुम्हा आम्हां दर्शन । तेणें काळें होईल जाण ।
सकळ भाग्याचें मंडन । आर्तनिरसन नं श्रीरामें ॥ २६ ॥
तंववरी जनस्थान जाण । तुम्हीं वसवावें आपण ।
देवकार्यसंपादन । पर्वतरोधन करावें ॥ २७ ॥
येणें लोभें अगस्तीसी । पाठविलें दक्षिणेसीं ।
निग्रहोनि पर्वतासी । जनस्थानासी वसविलें ॥ २८ ॥
ऐसें सांगतां बहुतां रीतीं । वियोग न साहावे ऋषीप्रती ।
कोणे काळें रघुपती । वनाप्रती येईल ॥ २९ ॥
कधी होईल सेतुबंधन । कै मरेल तो रावण ।
कै सुटती सुरगण । रघुनंदन भेटेल कैं ॥ १३० ॥
ग्लानी भाकितां दारुण । न करी दक्षिणे गमन ।
ते काळीं मागुतेन । त्यासीं आश्वासन दीधलें ॥ ३१ ॥
न करितां रावणवधासी । पहिलेंचि रामदर्शनासी ।
मी येईन निश्चियेसीं । म्हणोनि त्यासी भाक दीधली ॥ ३२ ॥
येणेंचि कार्ये तत्वता । तूं न सुटसी सर्वथा ।
उत्तरोत्तर सुरकार्यार्था । असे स्वस्थता तुझेनि हातें ॥ ३३ ॥
पुढील कल्प जो भावी । तुज तेथें व्यासपदवी ।
अनायासें निजस्वभावीं । निजगौरवीं होईल ॥ ३४ ॥
ऐसें शांतवोनि तयासी । पाठविलें दक्षिणेसी ।
निरोधोनि पर्वतासी । सत्कर्मासीं निर्मुक्ति ॥ ३५ ॥
हें कार्य साधलें तें गौण । पुढें महत्कृत्य दारुण ।
येवोनियां रघुनंदन । दशानन निवटील ॥ ३६ ॥
ऐसा केला इत्यर्थ । तो फळासी आला सिद्ध्यर्थ ।
राम येवोनि दक्षिणेआंत । केलें निर्मुक्त जनस्थान ॥ ३७ ॥
निवडून राक्षसगण । द्विजां दिधलें जनस्थान ।
संपविलें सेतुबंधन । आतां दशानन निवटेल ॥ ३८ ॥


श्रीशंकरांनी रामदर्शनासाठी स्वतःच जाण्याचा बेत मारुतीला सांगितला :


याकारणें परियेसीं । लिंगरूपें रामदर्शनासी ।
मीच येतों श्रीरामापासीं । ऐसे हनुमंतासी सांगितलें ॥ ३९ ॥
येणें रूपे भेटीसी । सांडोनि येतां वाराणसी ।
आकांत होईल सकळांसी । कोणी नगरीसी न राहे ॥ १४० ॥
ऐसें शंकराचें वचन । ऐकतां वायुनंदन ।
सुखें झाला सुखैकघन । आनंद पूर्ण उथळला ॥ ४१ ॥
लागोनियां शिवचरणां । विनविता झाला जाणा ।
शीघ द्यावें आज्ञापना । श्रीराम दर्शनालागोनी ॥ ४२ ॥


आत्मतेजयुक्त असे स्वतःचे लिंग निर्माण करून शंकरांनी मारुतीला दिले :


ऐसे हनुमंताचें विनवण । ऐकतांच शंकरे पूर्ण ।
निजात्मतेज आकर्षून । लिंग निर्माण पै केलें ॥ ४३ ॥
देतां हनुमंताचे हातीं । आनंद दाटला चित्तीं ।
वानरा आत्मलिंगप्राप्ती । अगाध ख्याती रामाची ॥ ४४ ॥
तरी नवल नव्हे येथ । जड जाड्याचा सांगात ।
धरितांचि त्वरित । मस्तकीं बैसत महंताच्या ॥ ४५ ॥


उत्तमानां प्रसंगेन साधवो यांति गौरवम् ।
पुष्पमालाप्रसंगेन सूत्रं शिरसि धार्यते ॥ ४ ॥


संगतीचा परिणाम :


तेहीविषींचा वृत्तांत । अति जड सूत्रतंत ।
जडा सुमनाचा सांगात । धरितां चढत राजमुकुटी ॥ ४६ ॥
सुमनमाळा कंठीं शिरीं । श्रीमंत मिरविती हारीं ।
तेंवी आम्ही रामसेवेकरी । वंद्य चराचरीं पै झालों ॥ ४७ ॥
विचारितां दोनी जडें । संगे श्रीमंतमुकुटीं चढे ।
चढोनि मिरविती कोडें । निजनिवाडें निजभक्ती ॥ ४८ ॥
तैसा नव्हे रघुनंदन । चिदानंदैकघन पूर्ण ।
त्याचे सेवितां श्रीचरण । दुष्प्राप्य कोण आम्हांसी ॥ ४९ ॥
ऐसें श्रीरामभजनें तत्वतां । स्वयें मानोनि कृतार्थता ।
लिंग घेवोनि होय निघता । श्रीरामदर्शनालागोनी ॥ १५० ॥


श्रीशंकरांना नमन करून मारुती श्रीरामांकडे निघाला :


विश्वनाथ करोनि नमन । नमिले समस्त शिवगण ।
स्वयें आला पुसोन । केलें उहु।ण रामनामें ॥ ५१ ॥
सबाह्य स्मरोनि रघुनंदन ।, भुभुःकार केला दारुण ।
तेणें दणाणिलें त्रिभुवनु । कुळाचळ पूर्ण गडाडिले ॥ ५२ ॥
दिवि भुवि अंतररिक्ष उमोप । जीवमात्रां सुटला कंप ।
देखतां मारुतिप्रताप । शिव अमूप गजबजिला ॥ ५३ ॥
शिवगणें कांपिन्नलीं । उमा शंकरा मिठी पाली ।
सकळ सृष्टि गजबजिली । पडली दातखिळी कृतांता ॥ ५४ ॥
उडानसमयीं हनुमान वीर । देखिला अतिशयें उग्र ।
नेत्र जैसे खदिरांगार । माथां पुच्छाग्र वाहिलें ॥ ५५ ॥
पिंजारल्या रोमावळी । बुबुळे गेली भंवयातळीं ।
दिसे विक्राळ दांताळी । जैसा प्रळयकाळीं महारुद्र ॥ ५६ ॥
देखतां हनुमंताचे चिन्ह । अति भयभीत शिवगण ।
येरें स्मरोनि रघुनंदन । केलें उड्डाण आकाशीं ॥ ५७ ॥
संधान मात्र श्रीरामबाण । क्षणें आक्रमी गगन ।
तैसा निघाला वायुनंदन । लाजवी उड्डाण गरुडाचें ॥ ५८ ॥
अति विस्मय सदाशिवासीं । उमा विस्मिता होय मानसीं ।
परमाश्चर्य शिवगणांसी । पवनात्मजासी देखोनी ॥ ५९ ॥
तटस्थ झाली काशीपुरी । जयजयकार करोनी खेचरीं ।
पुष्पवृष्टी कपीचे शिरीं । केली गजरीं अति प्रीतीं ॥ १६० ॥
स्वर्गी वंदिती सुरगण । श्रीरामभक्ताची आंगवण ।
जें चरित्र केलें अति पावन । ख्याति गहन त्रिलोकीं ॥ ६१ ॥
एका जनार्दना शरण । आत्मलिंग स्वयें आणून ।
हनुमंतें नमिला रघुनंदन । श्रोते अवधान देत स्वयें ॥ १६२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
आत्मलिंगानयनं नाम पंचसप्ततितमोऽध्यायः ॥ ७५ ॥
ओंव्या १६२ ॥ श्लोक ॥ ४ ॥ एवं ॥ १६६ ॥


GO TOP